शब्दांच्या वर्गवारीचे अन्वयार्थ

तत्सम-तद्भव-देशी वर्गवारी : भाषाविज्ञान आणि इतिहासाच्या नजरेतून
१. प्रस्तावना
भाषेचा इतिहास समजून घेताना आपण शब्दांच्या व्युत्पत्तीइतकंच त्यांचं वर्गीकरण करणाऱ्या संकल्पनांकडेही लक्ष द्यायला हवं. एखादा शब्द कुठून आला, कोणत्या रूपात टिकला, त्याच्या उच्चारात किंवा अर्थात काय बदल झाले, या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण काही परिचित संज्ञांचा आधार घेतो. पण त्या संज्ञा कोणत्या ज्ञानपरंपरेत घडल्या, कोणत्या भाषिक व्यवहाराचा उलगडा करण्यासाठी वापरल्या गेल्या, आणि आजच्या भाषांना लागू करताना त्यांचे अर्थ कसे बदलले, हे प्रश्न अनेकदा मागे पडतात. आपल्या शालेय शिक्षणातून परिचयाची झालेली तत्सम-तद्भव-देशी ही विभागणी या दृष्टीनं तपासून पाहण्याजोगी आहे.
या लेखात या विभागणीचा प्राकृतांच्या ज्ञानपरंपरेपासून आधुनिक भारतीय भाषांच्या अभ्यासापर्यंतचा प्रवास पाहायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला प्राकृतविषयक ज्ञानाच्या मांडणीचे निरनिराळे टप्पे आणि संस्कृत-प्राकृत यांच्या साहित्यिक व शास्त्रीय व्यवहारांचे परस्परसंबंध समजून घेऊ. या पार्श्वभूमीवर तत्सम-तद्भव-देशी या कोटींचं प्रयोजन तपासू आणि आधुनिक तुलनात्मक भाषाशास्त्रात त्यांचा स्वीकार होताना त्यांना कोणते नवे संदर्भ मिळाले ते पाहू. पुढे मराठीच्या उदाहरणांनी शब्दांचं रूप, शब्दलेखन, अर्थ आणि वापर यांच्या आधारे या विभागणीची उपयुक्तता व मर्यादा जोखू. शब्दांचा इतिहास आणि त्या इतिहासाचं आकलन घडवणाऱ्या संकल्पनांचा इतिहास यांची सांगड घालून मराठीच्या शब्दभांडाराकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे.
एक भाषावैज्ञानिक म्हणून आणि एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अशा दोन्ही भूमिकांमधून हा लेख लिहिलेला आहे. भाषावैज्ञानिक म्हणून शब्दांच्या रूपांचा, अर्थांचा आणि वापरांचा विचार करताना त्यांचं वर्गीकरण करणाऱ्या संकल्पना कितपत उपयोगी पडतात हे तपासायचं आहे. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून या संकल्पना कोणत्या व्यवहारांतून घडल्या आणि बदलत्या ज्ञानपरंपरांमध्ये त्यांना कोणते अर्थ मिळाले याचा माग घ्यायचा आहे. त्यामुळे पुढच्या विवेचनात भाषिक उदाहरणांच्या जोडीनं व्याकरणग्रंथांकडे आणि त्यांच्या अभ्यासाच्या इतिहासाकडेही वळावं लागेल. या दोन्ही भूमिकांच्या सांगडीतून आपल्या परिचयाच्या वर्गवारीकडे थोडं नव्यानं पाहता येईल अशी अपेक्षा आहे.
https://www.aisiakshare.com/files/diwali26/marathi_etymology.jpeg
२.१ संकल्पनांची ढोबळ उजळणी
परवा एका व्हॉट्सॅप ग्रुपवर कोणत्याशा शब्दाच्या व्युत्पत्तीची चर्चा चालली होती. तेव्हा एक अगदी सर्रास होणारा प्रयोग आम्हा भाषाविज्ञानाच्या, इतिहासाच्या विद्यार्थ्यांना खटकला. ती एक नेहमीची रचना होती – अमुक शब्द हा अमुक संस्कृत शब्दावरून आला किंवा झाला आहे. 'वृक्षपासून रुख, गृहपासून घर, जिव्हापासून जीभ आला आहे'. या रचनेत खटकण्यासारखं काय? तर यामागे ऐतिहासिक भाषाविज्ञानातलं एक सामान्य तत्त्व आहे – काही भाषा इतर भाषांशी संबंधित आहेत, पण म्हणून त्या इतर भाषांमधून निघाल्या आहेत, निपजल्या आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. मराठी, हिंदी, बांगला, काश्मिरी, पंजाबी इत्यादी भाषा आणि संस्कृत या एकमेकींशी संबंधित भाषा आहेत. पण म्हणून त्यांना सरधोपटपणे या संस्कृतातून उद्भवलेल्या आहेत असं म्हणणं म्हणजे मराठी, हिंदी, बांगला, काश्मिरी, पंजाबी इत्यादी भाषांच्या भाषिक सातत्याला नाकारणं. म्हणजेच या भाषांच्या इतिहासाला नाकारणं. शिवाय संस्कृत नावाची भाषा अनेक शतकं एकटीच वावरत होती आणि एका दिवशी तिनं या भाषांना जन्म देऊन टाकला असं बाळबोध अनैतिहासिक चित्र या मांडणीत गृहीत धरलेलं असतं. याबाबत मी वेगवेगळ्या ठिकाणी सविस्तर लिहिलेलं [(पाहा: धारूरकर (२०२५) – याच लेखाच्या शेवटी माझ्या आधीच्या लेखांचे संदर्भ आहेत] असल्यानं इथे त्याचा पुनरुच्चार टाळतो आणि या धारणेच्या मुळाशी असणाऱ्या एका पाठ्यपुस्तकीय कल्पनेचा खुलासा करतो. ती पाठ्यपुस्तकीय कल्पना म्हणजे, तत्सम, तद्भव आणि देशी ही शब्दांची केली जाणारी विभागणी. ही विभागणी कुठून आली, जिथून आली तिथे तिचं प्रयोजन काय होतं, आणि आज घडीला आपल्या भाषांमधली शब्दसंपदा समजून घ्यायला ती कितपत उपयोगी आहे याचा उलगडा आपण या लेखात करणार आहोत.
वर उल्लेखलेल्या शब्दांच्या आधारे या वर्गवारीची आपण उजळणी करू. वृक्ष, गृह, जिव्हा – तत्सम; रुख, घर, जीभ – तद्भव; आणि चटणी, खिडकी, धोंडा, लुगडं – देशी. देशी म्हणजे संस्कृत, प्राकृत यांमधून ज्यांची संगती लावता येत नाही ते शब्द. बाराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या देशीनाममाला या हेमचंद्रकृत ग्रंथात हे वर्गीकरण आढळतं. त्याआधीही भरताच्या नाट्यशास्त्रात, दण्डीच्या काव्यादर्शात, हरिवृद्धाच्या१ उल्लेखांमधून, हेमचंद्राच्या व्याकरणातून ही विभागणी सापडते.
तीन शब्दांना तीन रकान्यांमध्ये टाकणारी ही मांडणी आपल्या चांगलीच ओळखीची आहे, कारण आपण ती आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासली आहे आणि मराठीतले (तसेच हिंदी, बंगाली इत्यादी भाषांमधले) शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला ती उपयोगीही वाटलेली आहे. लेखाच्या या भागात आपण या विभागणीचा इतिहास जरा विस्तारपूर्वक पाहू या. आधी प्राकृत-, संस्कृत-, व्याकरण-, साहित्यशास्त्र-परंपरेत ही विभागणी कशी आकाराला आली हे पाहू, नंतर आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये येण्याआधी आधुनिक भाषाविज्ञानात या संज्ञा कशा रिचवल्या गेल्या ते पाहू.
२.२ प्राकृतच्या परंपरागत आकलनाचे तीन टप्पे
तर भरताच्या नाट्यशास्त्रात आणि दण्डीच्या काव्यादर्शात या विभागणीचा सुरुवातीचा उल्लेख आढळतो. संज्ञांचा किरकोळ फरक सोडला तर साधारण संकल्पना ही आपण वर उदाहरणांनी पाहिली तीच. हिच्या मुळाशी जाण्यासाठी आपण ॲन्ड्र्यू ऑलेट या प्राकृतांच्या चरित्रकारानं चितारलेले प्राकृतविषयक ज्ञानाच्या इतिहासातले तीन टप्पे समजून घेऊ. प्राकृत कसं समजून घेतलं जात होतं, त्याच्याबद्दलचं ज्ञान कसं मांडलं जात होतं, याचं चित्र हे तीन टप्पे उभं करतात.
सर्वांत आधीच्या उपलब्ध खुणा अशा एका टप्प्याकडे निर्देश करतात, ज्यात प्राकृताबद्दलचं ज्ञान प्राकृतातूनच मांडलं जात होतं आणि संस्कृताच्या ज्ञानपरंपरेचा आधार फारसा घेतला जात नव्हता. म्हणजे प्राकृत समजून घेण्यासाठी आधी संस्कृत शिकून, मग संस्कृतच्या व्याकरणातून प्राकृताकडे यावं लागत नव्हतं. प्राकृत साहित्य वाचणाऱ्या, रचणाऱ्या, आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या लोकांसाठी प्राकृत भाषेतच त्यातल्या शब्दांचं आणि छंदांचं विवेचन उपलब्ध होतं. संस्कृतात आढळणाऱ्या एखाद्या छंदाची लक्षणं प्राकृताच्या छंदःशास्त्रात वेगळ्या पद्धतीनं सांगितली जाऊ शकत होती. यावरून प्राकृताची ज्ञानपरंपरा ही संस्कृतात आधीच मांडलेल्या ज्ञानाची नुसती पुनरावृत्ती नव्हती, हे लक्षात येतं. प्राकृताचं हे स्वतःचं वेगळेपण व्यक्त करण्यासाठी देशी ही संकल्पना महत्त्वाची ठरली आणि त्याबद्दलच्या ज्ञानाला देशीशास्त्र असं संबोधलं गेलं. पण इथे एक इशारा देणं आवश्यक आहे : देशी म्हणल्यावर आज मनात येणारा अर्थ थोडा वेगळा असतो. एखाद्या प्रदेशाची बोली म्हणजे देशी बोली एवढाच अर्थ तत्कालीन विवेचनात अभिप्रेत नव्हता. तो अर्थ समजून घेताना प्राकृताच्या स्वतःच्या साहित्यव्यवहारातून ओळखता येणारं त्याचं वैशिष्ट्यही लक्षात घेणं आवश्यक आहे. हरिवृद्धाचे उपलब्ध उल्लेख हे या टप्प्यावरचे; तसंच विरहाङ्क आणि स्वयंभू यांच्या छंदःशास्त्रीय लेखनात आणि धनपालाच्या कोशकार्यातही या पद्धतीचं दर्शन घडतं. त्यामुळे या पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य प्राकृताचा संस्कृताशी काहीच संबंध नव्हता असं नव्हे, तर प्राकृत जाणून घेण्यासाठी संस्कृताची मध्यस्थी अनिवार्य नव्हती हे खरं महत्त्वाचं वैशिष्ट्य.
यानंतरच्या टप्प्यात मात्र थोडा बदल झालेला दिसतो. संस्कृत आणि प्राकृत यांच्या श्रव्यकाव्याच्या स्वतंत्र परंपरा दिसतात आणि दोन्ही भाषांबद्दलच्या ज्ञानाची मांडणीही स्वतंत्रपणे होताना दिसते. मात्र प्राकृताचं वेगळेपण उलगडण्यासाठी आता संस्कृत भाषा आणि संस्कृत व्याकरणाची परिभाषा व विवेचनपद्धती वापरली जाते. म्हणजे विवेचनाची साधनं संस्कृताच्या ज्ञानपरंपरेतून घेतली असली, तरी ज्याचं विवेचन करायचं आहे ते प्राकृत त्याच्या स्वतःच्या साहित्यपरंपरेसह स्वतंत्रपणे विचारात घेतलं जातं. वररुचीच्या नावावर असलेल्या प्राकृतप्रकाशाचं मूळ रूप या टप्प्यावरचं आहे.
पुढे हेमचंद्राच्या काळात, म्हणजे बाराव्या शतकात, पुन्हा बदल झालेला दिसतो. या काळात संस्कृत आणि प्राकृत यांचं विवेचन एकाच ज्ञानचौकटीत केलेलं दिसतं. हेमचंद्रकृत सिद्धहेमचंद्रात संस्कृत व्याकरणाच्या सात अध्यायांनंतर आठव्या अध्यायात प्राकृताचं व्याकरण येतं. इतिहासाच्या या टप्प्यावर येईपर्यंत 'प्राकृत' हे नाव अनेक भाषांना सामावून घेणारं झालं आहे. नुसतं तितकंच नव्हे, इतर अनेक भाषांच्या व्याकरणाची संगती लावण्याचा साचाही प्राकृत या नावानं दिसतो. नाटकासारख्या दृश्यकाव्यात संस्कृतच्या बरोबरीनं प्राकृतांचं असणं हा संकेत तर रूढ झाला होताच, शिवाय प्राकृतांचं आणि संस्कृताचं ज्ञानविश्व एकत्रितपणे, एका दमात सांगणंही शक्य आणि प्राप्त होतं. हेमचंद्राचे सुरुवातीचे सात अध्याय हे संस्कृत व्याकरणाला वाहिलेले आहेत. कारण संस्कृत (आणि प्राकृतही) अध्ययन-अध्यापानाला एक नवी बैठक देण्याचा त्यात प्रयत्न आहे. आधीच्या टप्प्यात प्राकृताच्या स्वतंत्र साहित्यपरंपरेचं वेगळेपण संस्कृताच्या साधनांनी उलगडलं जात होतं; सिद्धहेमचंद्र या हेमचंद्राच्या व्याकरणात मात्र संस्कृत आणि विविध प्राकृतभाषा यांची एकत्रित, परस्परसंबद्ध मांडणी सापडते.
आपण इथवर निरनिराळे टप्पे पाहिले असले, तरी हे टप्पे एकामागून एक येऊन संपून जाणारे, बंदिस्त कालखंड नाहीत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्राकृताकडे पाहण्याच्या या पद्धती एकमेकींत मिसळतात आणि आधीच्या पद्धती पुढच्या टप्प्यांतही टिकून राहतात. प्राकृतप्रकाशात नंतर जोडल्या गेलेल्या इतर भाषांच्या विवेचनातूनही हे दिसतं. ऑलेटच्या मते या टप्प्यांमधला फरक फक्त काळाशी संबंधित नाही, तर निदान काही वेळा तरी हे ज्ञान कुणासाठी मांडलं जात होतं यामुळे पडलेला हा फरक असावा. प्राकृत साहित्याशी थेट परिचय असणाऱ्यांसाठी हे विवेचन होतं की संस्कृताच्या मध्यस्थीनं प्राकृताकडे येणाऱ्यांसाठी हे विवेचन होतं, त्याला अनुसरून पद्धतीत बदल झालेला असावा, असं ऑलेटचं मत आहे.
२.३ तत्सम-तद्भव-देशी यांच्या समीक्षेपूर्वी
ऑलेटची ही निरीक्षणं पार्श्वभूमीला ठेवून मी आता मुख्यतः तत्सम-तद्भव-देशी या विभागणीसंबंधी मला जे म्हणायचं आहे ते मांडतो. सांस्कृतिक इतिहासाची एक महत्त्वाची दृष्टी अशी – भाषेला (किंवा ज्याचा इतिहास समजून घ्यायचा आहे अशा कोणत्याही घटिताला) तिच्या आजच्या व्याख्या वापरून समजून न घेता, त्या काळात भाषा हे घटित कोणती कार्यं बजावत होतं; भाषेसंबंधीचे संकेत, रीतिरिवाज कसे पार पडत होते; एकूण भाषिक व्यवहार कसा चालत होता भाषा कुणाकडून, कशी, कधी, कोणत्या प्रसंगी, कशाप्रकारे वापरली जात होती या सगळ्याकडे बारकाईनं बघणं आणि त्यावरून भाषा, भाषाव्यवहार यांची उकल करणं.
संस्कृत-प्राकृतांच्या अभ्यासातून हाती आलेली आणखी एक महत्त्वाचं आकलन असं – संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा साहित्यिक-, व्याकरणिकदृष्ट्या व्यवस्थित तासलेल्या; साहित्य, शास्त्र यांच्या विविध प्रकारांसाठी सज्ज, सिद्ध केलेल्या होत्या. दोन्हींत थेट आपपर, उच्चनीच भाव प्रस्थापित करून, काळं-पांढरं करून त्यांच्यातले संबंध समजून घेणं हे परिस्थितीचा विपर्यास करणारं ठरेल. संस्कृत ही ब्राह्मणांची आणि राजांची, तर प्राकृत ही सामान्यजनांची असं सरधोपट द्वैत सत्याला धरून नाही. त्यामुळे हे चित्र बाजूला सारून आपल्याला या भाषांची व्यवस्था समजून घ्यावी लागते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट – प्राकृत ही जनसामान्यांची भाषा नव्हे. खरंतर जनसामान्यांच्या भाषांचा मागमूसही आपल्याला संस्कृत-प्राकृत साहित्याच्या आधारे लागणं कठीण आहे. संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही धार्मिक, राजकीयदृष्ट्या सबळ असणाऱ्या अभिजनांच्याच भाषा होत्या त्यातही त्या अभिजनांच्या दैनंदिन व्यवहाराच्या भाषा नसून साहित्यिक, धार्मिक, शास्त्रीय वापराच्या भाषा म्हणून समोर आलेल्या दिसतात.
प्राकृतांचं परंपरागत आकलन कसं बदलत गेलं, त्यांचं संस्कृतसापेक्ष स्थान कशा स्वरूपाचं होतं हे व्याकरणांमधल्या वर्णनावरून कसं कळतं हे आपण वरच्या छेदकात पाहिलं. आता तत्सम-तद्भव-देशी ही विभागणी बघू. नाट्यशास्त्रापासून चालत आलेली ही विभागणीदेखील कालपरत्वे कोणते दृष्टिकोन व्यक्त करते हे पाहायला हवं. किंबहुना या विभागणीची समीक्षा हाच या लेखाचा मुख्य विषय आहे. आजच्या भाषांच्या प्रकाशात तत्सम-तद्भव-देशी या वर्गीकरणाला काही मर्यादा आहेत. गतकाळात शास्त्र- आणि व्याकरण-ग्रंथांमध्ये त्या विभागणीचा अर्थ वेगळा होता. त्या विभागणीचा प्रवास आता पाहू.
आजच्या पाठ्यपुस्तकी रचनेत येणाऱ्या तत्सम-तद्भव-देशी यांत एक प्रकारचा कालक्रम आज आपण गृहीत धरतो. त्यात संस्कृताला आद्य स्थान बहाल केलेलं असतं आणि मग 'त्यातून' पुढचा बदल समजून घेतला जातो. पण प्राचीन आणि सुरुवातीच्या मध्ययुगातले संस्कृत-प्राकृतांमधले संबंध पाहता संस्कृत आधी, प्राकृत त्यानंतर असा आदिपरभाव मानला जात होता का? या प्रश्नाची उत्तरं गुंतागुंतीची आहेत. ब्राह्मणी वैदिक धार्मिक कल्पनांनुसार वेद अनादी आणि अपौरुषेय मानल्यानंतर त्यांच्याशी संबंधित भाषा लैकिक बदलांना खुली ठेवता येणं शक्यच नव्हतं. म्हणून मग वैदिक भाषा आणि तिच्या पंक्तीतली शास्त्रीय संस्कृत भाषाही तत्त्वतः नित्य मानली गेली. नित्य म्हणजे अनादी-अनंत. जिच्यात कोणतेही विकार संभवत नाहीत, अशी. या नजरेतून पाहता संस्कृतेतर भाषिक आविष्कार ब्राह्मणी वैदिक गटाच्या नजरेतून अनित्य, म्हणजे अनादी-अनंत नसलेले, ज्यांच्यात विकार संभवतात असे, ठरले. परिणामी यांच्या नजरेत प्राकृतही अनित्य ठरली. थोडक्यात, धार्मिक क्षेत्रातले दृष्टिकोन भाषिक संसारालाही लागू झाले. प्राकृत ज्या धार्मिक अवकाशात वापरली जात होती, अगदी त्या अवकाशातही याच दृष्टिकोनाला मिळती-जुळती असलेली धारणा रुजली.
यथावकाश जैन गटांनी प्राकृताला नित्य, अनादी मानणं हेही झालं. ज्याप्रमाणे वेदांबाबतच्या धारणेतून संस्कृत भाषेला भाषानित्यत्वाची संकल्पना लावली गेली [पाहा देशपांडे (१९९५: २१९-२५०)], त्याचप्रमाणे त्याच प्रकारचं अनादिपण प्राकृताच्या बाबतीतही कल्पिलं गेलं. हेमचंद्र देशीनाममालेत देशीचं स्वरूप स्पष्ट करताना 'अनादिप्रवृत्तप्राकृतभाषाविशेष' असा उल्लेख करतो. या शब्दाचा अर्थ आहे अनादिकाळापासून प्रचलित असलेला प्राकृताचा एक विशिष्ट भाषाव्यवहार. इथे त्या शब्दाचा उद्देश प्राकृताच्या उत्पत्तीचा सिद्धान्त मांडणं हा नाही. तर पेक्षा आपल्या कोशात देशी म्हणून कोणत्या शब्दांचा समावेश करायचा, हे स्पष्ट करणं हा त्या शब्दाचा उद्देश आहे (हेमचंद्र, १९३८, देशीनाममाला १.४ व त्यावरील स्वोपज्ञ वृत्ती, पृ. ३).
जैन तत्त्वज्ञ प्रभाचंद्र आपल्या न्यायकुमुदचंद्र या ग्रंथात (इ.स. १०६०) संस्कृत शब्दांनाच शुद्धत्व आणि थेट अर्थबोधाची क्षमता आहे, तर प्राकृत शब्दांचा अर्थ संस्कृताच्या मध्यस्थीनं कळतो, या मताला आव्हान देतो. प्राकृत वापरणाऱ्यांना त्यांच्या शब्दांचा अर्थ थेट कळतो; त्यासाठी आधी संस्कृत शब्द आठवावा लागत नाही. तसं असतं तर संस्कृत न जाणणाऱ्या लोकांचा भाषाव्यवहारच शक्य झाला नसता. शिवाय 'संस्कार' म्हणजे आधीपासून असलेल्या गोष्टीवर केलेली प्रक्रिया; त्यामुळे संस्कृताला मूळ मानण्याऐवजी आधीच्या स्वाभाविक भाषाव्यवहाराचं 'संस्कारित' रूप मानता येईल, असाही युक्तिवाद प्रभाचंद्र करतो. हा वाद भाषेच्या शुद्धाशुद्धतेइतकाच अर्थ व्यक्त करण्याच्या स्वतंत्र अधिकाराचाही आहे. [(Dundas 1996:143–144), शिवाय पाहा Gurevitch (2025)].
अशा प्रकारे प्राकृतांकडे एक स्वायत्त व्यवस्था आहे; एक अधिकारी, स्वतंत्र कर्तृत्व आहे; आणि प्राकृत गौण नाहीत याबाबतचं भान तत्कालीन व्यवस्थेमध्ये होतं हे मुख्यतः धार्मिक तत्त्वचर्चांमधून दिसून येतं. याच्या जोडीनं साहित्य, नाट्य, काव्य, आणि पाठशालागत अध्ययन-अध्यापन या वर्तुळांमध्येही संस्कृत-प्राकृत एक जोडगोळी बनून वावरत होत्या. भाषिक पातळीवर शब्दभांडाराची संगती लावणं; साहित्य, काव्य, शास्त्र यांसाठी भाषा वापरणं; आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या नजरेतून भाषांबद्दल एखादी भूमिका असणं या गोष्टी परस्परसुसंगतीनं चालत, त्या बहुतेकदा परस्परांना छेद देणाऱ्या नसत. म्हणूनच 'प्रकृतिः संस्कृतम्। तत्र भवं तत आगतं वा प्राकृतम्।' (प्रकृती म्हणजे मूळ संस्कृत आहे आणि तिथून उद्भवलेली ती प्राकृत आहे) असं म्हणणारा हेमचंद्र हा स्वतः एक श्वेतांबर पंथी जैन मुनी होता आणि तरीही तो संस्कृतला मूळ स्थान देत होता, यात विसंगती नाही. कारण शिवाय प्रकृतिः संस्कृतम् (संस्कृत मूळ आहे) असं म्हणताना इथे प्रकृती (मूळ) हा शब्द कोणत्या अर्थानं वापरलेला आहे? व्याकरणिक नजरेतून पाहिलं, तर प्रकृती या शब्दामधून जगताचं मूळ असा अर्थ अभिप्रेत नसून शब्दांच्या संग्रहाची संगती लावण्यासाठी वापरलेली एक शाब्दिक शक्कल इतकाच आहे, आणि त्याहून अधिक गंभीर असा, भाषाजगताच्या उपपत्तीला भिडणारा अर्थ त्यात नाही असा युक्तिवाद करण्यात आला आहे२.
संस्कृत-प्राकृत यांची जोडगोळी झाली होती म्हणजे काय? आधुनिक भाषाविज्ञानात भाषिक भांडार ही एक संकल्पना वापरली जाते. त्या संकल्पनेच्या आधारे आपण ते समजून घेऊ. संस्कृत आणि प्राकृत यांचं साहित्यिक आणि भाषिक भांडार सामाईक स्वरूपाचं होतं. पण त्या भांडारातून काय, कधी, कसं, किती व्यक्त करायचं हे ठरवण्यासाठीची साधनं पाहिली, तर संस्कृत-प्राकृत वेगळ्या ठरत होत्या. दोन्ही भाषांमधल्या यांतील लेखकांना, कवींना आणि रसिकांना त्या-त्या भाषांच्या वृत्त-, छन्द-परंपरा, त्यांच्यातल्या साहित्यप्रकारांचा विस्तार आणि अविष्कार, त्यांच्यातले सृजनाचे संकेत आणि शक्यता यांचं अचूक व्यावहारिक भान होतं. नाटकासारख्या साहित्यप्रकारात तर या दोन भाषा मिळून एक साहित्यकृती निर्माण करू शकत होत्या. हे केवळ भाषिक साहचर्य नव्हतं तर एका व्यापक साहित्यिक-सामाजिक-राजकीय अशा सौंदर्यदृष्टीचा, अभिरुचीचा आविष्कार होता. नाटक नावाची एक साहित्यकृती ही या दोन्ही भाषां मिळून रचली जात होती, किंबहुना तीच नाटक लिहिण्याची सामान्य रीत होती.
या पार्श्वभूमीवर व्याकरणग्रंथांमध्ये एकीच्या परिभाषेत दुसरी समजावून सांगणं तितकं विचित्र वाटत नाही. हे कमी विचित्र वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे या दोन भाषांचं स्वतःचं असं खास संचित. संस्कृताचं संचित व्याकरण हे होतं, तर प्राकृतांचं संचित साहित्यिक वापर-वावर-विस्तार हे होतं. संस्कृत जो अधिकार व्याकरणाच्या माध्यमातून गाजवत होती, तो अधिकार प्राकृतांना साहित्यिक आविष्कारांच्या माध्यमातून प्राप्त होत होता. संस्कृतकडे व्याकरण (grammar) होतं, तर प्राकृतांची घडणच वाङ्मयविद्येच्या स्वरूपाची (philological) होती. प्राकृतांना लवचीक, वळणदार, वृत्ताला अनुकूल असणं हे गुण चिकटतात, कारण प्राकृतभाषा प्रत्यक्ष वापरातून साकारत होत्या. संस्कृतकडे भाषेचं साहित्य होतं, तर प्राकृतकडे साहित्याची भाषा होती. अर्थात हे हवाबंद कप्पे नव्हेत. प्रामुख्यानं हे क्रियाविशेषण वापरून केलेलं हे वर्णन आहे असं मानलं, तरच हे वर्णन लागू ठरतं.
संस्कृतच्या माध्यमातून प्राकृत समजून घेण्याला आणखीही एक कारण आहे. तत्कालीन भाषिक व्यवस्थेत संस्कृताला व्याकरणिक थोरलेपणा होता. त्यातून ही परिस्थिती संभवते. संस्कृत ही भाषा हे प्राकृत समजून घेण्याचं माध्यम नसून संस्कृत व्याकरणाचा घासून-पुसून चमकवलेला तिचा सरंजाम हे प्राकृत समजून घेण्याचं माध्यम आहे. नाटकात या भाषा जश्या नाटकीय आविष्काराचं साधन म्हणून वावरतात, तशाच व्याकरणिक वर्णनांत प्राकृताच्या रूपाचं विवेचन करण्यासाठीचं साधन म्हणून संस्कृतव्याकरण येतं. त्या व्यापक द्वैभाषिक भांडाराचाच हाही एक आविष्कार म्हणून हे समजून घेता येतं.
संस्कृत आणि प्राकृत यांच्याकडे एका सामाईक साहित्यिक-भाषिक भांडारातली साधनं म्हणून पाहिलं, तर तत्सम-तद्भव-देशी या विभागणीतून त्या साधनांचे परस्परसंबंध उलगडतात. दोन्हीकडे परिचित रूपांत उपलब्ध असलेलं काय आहे, नियमित रूपांतरांच्या आधारे ओळखता येण्यासारखं काय आहे, आणि स्वतंत्र प्राकृत व्यवहाराच्या परिचयातून समजून घ्यावं लागेल असं काय आहे, हे या विभागणीतून स्पष्ट होतं. या दृष्टीनं पाहता, ही विभागणी केवळ शब्दांचे प्रकार ठरवत नाही; तर एका भाषेतलं ज्ञान दुसरीकडे कुठवर उपयोगी पडतं आणि कुठे नव्यानं शिकावं लागतं, हेही दाखवते. या अर्थानं तत्सम-तद्भव-देशी ही विभागणी केवळ भाषांमधल्या शब्दांमधले फरक सांगून थांबत नाही, तर व्याकरणांकडे पाहणारी दृष्टी ठरते. कोणाला काय ओळखीचं, काय अनोळखी हेही या विभागणीतून स्पष्ट होतं.
२.४ तत्सम-तद्भव-देशी प्राकृतविश्वातून आधुनिक इंडिक भाषांमध्ये
ग्रिअर्सन आणि इतर आधुनिक अभ्यासकांनी तत्सम-तद्भव-देशी ही विभागणी प्राकृतांच्या विवेचनातून मराठी, हिंदी, बंगाली यांसारख्या नव्या भारतीय इंडिकभाषांच्या शब्दसंपदेच्या अभ्यासात आणली; मात्र या प्रक्रियेत तिचं स्वरूपही बदललं. संस्कृत आणि प्राकृत रूपांमधलं साम्य, नियमित रूपांतर, किंवा संस्कृताच्या आधारे न उलगडणारा प्राकृतांमधला वापर या सगळ्याची संगती प्राकृत व्याकरणाच्या चौकटीत लावली जात होती. आधुनिक ऐतिहासिक भाषाविज्ञानात मात्र एखादा शब्द एखाद्या भाषेत कोणत्या मार्गानं आला, हे सांगण्यासाठी या संज्ञा वापरल्या जाऊ लागल्या. संस्कृतातून फारसा बदल न होता घेतलेला शब्द तत्सम, तर जुन्या भाषिक अवस्थांतून बदलत वारशानं आलेला शब्द तद्भव ठरला. देशी ही संज्ञा स्थानिक मानल्या गेलेल्या शब्दांसाठी किंवा ज्यांचा संस्कृताशी व्युत्पत्तिसंबंध निश्चित करता आला नव्हता अशा शब्दांसाठी वापरली गेली. उदाहरणार्थ, मराठीत हस्त आणि हात हे दोन्ही शब्द उपलब्ध असले, तरी त्यांच्या येण्याच्या ऐतिहासिक वाटा वेगळ्या आहेत. हस्त हा थेट संस्कृतमधून उचललेला शब्द आहे, तर हात हा शब्द विविध ऐतिहासिक टप्प्यांमधून ध्वनिबदलाचे विविध टप्पे पार करत मराठीत रुजलेला आहे. त्यामुळे हस्त हा तत्सम, तर हात हा तद्भव शब्द मानला गेला.
विविध काळांत घेतलेल्या संस्कृत शब्दांत नंतर बदल झाल्यामुळे अर्धतत्समसारख्या अतिरिक्त श्रेणींचीही गरज भासली. अशा रितीनं दोन भाषिक क्षेत्रांमधले संबंध उलगडणारी जुनी चौकट एका भाषेत अस्तित्वात असलेल्या शब्दांचे वेगवेगळे इतिहास सांगणारी वर्गवारी बनली [Masica (1991: 65–66), Ollett (2017: 154–155), Chatterji (1926: 189-192)]. अर्धतत्सम ही संकल्पना बंगाली किंवा एकूणच पूर्व-इंडिक भाषांना जितकी निकडीची ठरते तितकी आपल्याला – मराठीला ठरत नाही. किमान वरवर स्पेलिंग (शब्दलेखन) पाहता तरी ती आपल्याला आवश्यक नाही. बंगालीत अ हा स्वरच नसल्यामुळे सर्व संस्कृत शब्दांतमधल्या अ या स्वराचा ऑ किंवा ओ (क्वचित आ) होतो. तेवढ्याकरता त्या सगळ्या शब्दांना तत्समत्वापासून पारखं ठेवून तद्भव कशाला म्हणा, अशा विचारानं बंगालीनं त्यांना अर्धतत्सम हे नाव देऊ केलं. बंगालीतली उदाहरणं – अपराजिता (ऑपोराजिता), कारण (कारोण), आत्मा (आत्ता). या शब्दांना सरसकट तद्भव ठरवण्याऐवजी अर्धतत्सम या कोटीत ठेवलं गेलं. मराठीतही अशी काही उदाहरणं हुडकून काढता येतील – जाह्नवी (जान्हवी), ब्राह्मण (ब्राम्हण), प्रश्न (प्रष्ण) हे शब्द अर्धतत्समाची उदाहरणं म्हणून देता येतील. या अर्धतत्समाच्या जोडीला देशी आणि विदेशी अशाही कोटी इंडिक भाषांच्या शब्दसंपदेसाठी वापरल्या जातात. देशी म्हणजे ज्यांची संगती किंवा मुळं संस्कृतात सापडत नाहीत असे शब्द; तर विदेशी म्हणजे फार्शी, अरबी, पोर्तुगीज, इत्यादी भाषांमधून आलेले शब्द३.
या सगळ्या वर्गीकरणात कालक्रमाची कल्पना ठाशीवपणे येते. इतकी ठाशीवपणे, की शब्दभांडाराच्या विभागणीची ही कल्पना हा इंडिक भाषांच्या अंतर्गत संगतीचा भाग नसून हा जणू सामान्यपणे ऐतिहासिक भाषाविज्ञानातल्या संकल्पनांशी तुल्य असा भाग आहे असं गृहीतक त्यात आलं. ऐतिहासिक भाषाविज्ञानाची काही पुस्तकं त्या वर्गीकरणाचा उल्लेख त्याच पद्धतीनं आणि अधिकारानं करतात. पण आपण सुरुवातीच्या एका छेदकात पाहिलं, त्याप्रमाणे प्राकृत-व्याकरणकारांच्या मनात हा कालक्रम नसेल अशी एक शक्यता आहे हे विसरता येत नाही. दुसरीही एक विसंगती आधुनिक इंडिक भाषांना हे वर्गीकरण सहज लागू करण्यात आहे. ती अशी – संस्कृतमधून आलेल्या तत्सम शब्दांना मराठीच्या शब्दलेखनात एक विशिष्ट आब, मान दिला जातो. उदाहरणार्थ, र्हस्वान्त तत्सम शब्द सामासिक शब्दात प्रथमपदी आल्यास र्हस्वान्त लिहावेत, इतर ठिकाणी मात्र दीर्घान्त लिहावेत असा एक नियम आहे (मती - मतिभ्रष्ट). सामान्यरूपात तत्सम शब्दांचे उपान्त्य इकार-उकार बदलण्याची मुभा नाही (प्रतीक - प्रतीकाला, मंडूक - मंडूकाला). तसा मान काही इतर अभिजात भाषांमधून येणाऱ्या शब्दांना मात्र मिळत नाही. उदाहरणार्थ, ख़ुशी हा फार्शी शब्द. तत्सम शब्दांचं लेखन संस्कृतातल्या मूळ लेखनानुसार होतं. म्हणून भूमी यातला भू, ऊर्जामधला ऊ, हे दीर्घ लिहिले जातात. पण ख़ुशी, ख़ुद या फार्शी शब्दांचं लेखन मूळ फार्शी शब्दलेखनाच्या जवळपासही जाणारं नसतं. नुक्ता तर मराठीनं स्वीकारलेलाही नाही. तत्समाचा मान या विदेशी शब्दाला दिला जात असता, तर ख़ूशी, ख़ूद अशी शब्दलेखनाची पद्धत हवी होती.
थोडक्यात तत्समाची संकल्पना थेट प्राकृत पद्धतीमधून जशीच्या तशी घेतल्यानं आपल्या व्याकरणपरंपरांनी त्या तत्समत्वाचा उदार असा विस्तार केला नाही. त्यात संकोच आणि रूढिप्रियता राहिली. प्राकृतांनी संस्कृताला एक संदर्भ मानलं, आपणही मानू या. ती चौकट ओलांडून आपली व्याकरणपरंपरा गेली नाही. संस्कृताला सोडून आपल्या व्याकरणाची चौकट कशी कल्पावी या व्यापक प्रश्नाला सामोरं जाण्यापेक्षा जुन्या व्यवस्थेचा संस्कृतनिष्ठा दाखवणारा भाग बिनबोभाट आपलासा करणं आपल्या व्याकरणकारांनी स्वीकारलं हे उघडच आहे. परिणामी संस्कृताच्या शब्दलेखनाला आपण जे विशेष स्थान देतो, ते दुसऱ्या अभिजात भाषांना देत नाही. अरबी-फार्शींना नाहीच नाही, पण तमिळलाही नाही४.
भाषेच्या आकलनातली एक फसवी संकल्पना म्हणजे शब्दांची उसनवारी. खरोखरीच शब्दांची उसनवारी अशी काही शक्य असते का? आणि त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचा प्रश्न म्हणजे हे उसनं घेतलेले आणि हे उसनं न घेतलेले शब्द असं आपण ज्यांच्या आधारे म्हणू शकू असे काही वस्तुनिष्ठ निकष आपल्याकडे आहेत का? आपण भाषेच्या वर्तमान टप्प्यावर ही तथाकथित 'उसनवारी' जोखण्याचं काही गमक नाही. म्हणून उसनवारी या संकल्पनेची सगळी भिस्त ही ऐतिहासिक कालक्रमावरच जाऊन पडते. त्यातही अनेक अडचणी आहेत –
१. उसना घेतलेला शब्द सर्वस्वी तत्सम असत नाही. कारण त्याच्या शब्दलेखनात नाही, तरी उच्चारात अनेक बदल होणं अटळच असतं. उच्चार म्हणताना फक्त व्यंजन-ध्वनी अपेक्षित नसून, स्वरांचे तपशील, कुठे जोर दिला जातो, सिलॅबल कसे समजून घेतले जातात याही गोष्टी अभिप्रेत आहेत. त्या अटळपणे बदलतात आणि म्हणून सर्वस्वी तत्सम असा काही शब्द असत नाही. केवळ स्पेलिंग-शब्दलेखनाच्या पातळीवरच काय ती संगती लागते, पण शब्दभांडाराबद्दल काही ठोस सांगणारी एक कोटी म्हणून तत्सम या कोटीचा काही उपयोग वाटत नाही. जाह्नवी, ब्राह्मण, चिह्न हे शब्द लेखनात संस्कृत रूप राखतात; मराठी बोलण्यात मात्र जान्हवी, ब्राम्हण, चिन्ह असे उच्चार ऐकू येतात. मूळ व्यंजनं टिकली तरी त्यांचा क्रम बदललेला असू शकतो. शब्दलेखनात दिसणारं समत्व आणि प्रत्यक्ष बोलण्यातलं समत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तथापि, या उच्चारभेदांमुळे शब्दाचा संस्कृताशी असलेला ऐतिहासिक संबंध पुसला जात नाही.
२. उसना घेतलेला शब्द हा बहुतेक वेळा त्याचा अर्थविस्तार किंवा अर्थसंकोच घेऊन अवतरतो. त्यामुळे अर्थाच्या बाबतीत त्याचं समत्व इथे प्रस्थापित होत नसतं. शिक्षा हे विशेष बोलकं उदाहरण आहे. संस्कृतात या शब्दाच्या अर्थात शिकवण, शिक्षण, आणि उच्चारशास्त्र यांचा समावेश होतो; मराठीत मात्र 'त्याला शिक्षा झाली' म्हटल्यावर दंडाचा अर्थ पुढे येतो. संशोधन या शब्दातही संस्कृतातलं शुद्ध करणं, दुरुस्त करणं किंवा तपासणं यांच्याशी संबंधित अर्थक्षेत्र आणि आजच्या मराठीतला संशोधनकार्याचा प्रचलित अर्थ यांत फरक दिसतो. शब्दाचं रूप टिकूनही त्याच्या अर्थांचं प्राधान्य आणि वापराची क्षेत्रं बदलू शकतात.
३. उसना आलेला शब्द हा अनेकदा प्रयोगाची एखादी छटा घेऊन येतो. त्यातून वक्त्याचा श्रोत्याप्रती, एकूण प्रसंगाप्रती काही एक दृष्टिकोन व्यक्त असतो. हा फरक त्या शब्दाचं मूळ भाषेतल्या शब्दापेक्षा असलेलं वेगळेपण अधोरेखित करत असतो. आई आली आणि मातेचं आगमन झालं, किंवा तो मेला आणि त्याचं निधन झालं, या जोड्यांत फरक केवळ त्यातून व्यक्त होणार्या माहितीचा नाही. आगमन, निधन यांसारखी संस्कृतरूपं अनेक प्रसंगांत औपचारिकता, आदर, किंवा गांभीर्य व्यक्त करतात. संस्कृतात एखादी कृती किंवा घटना सांगण्यासाठी उपलब्ध असलेला शब्द मराठीच्या भाषिक भांडारात विशिष्ट प्रसंगाची आणि वक्त्याच्या दृष्टिकोनाची खूणही बनतो. मात्र ही छटा शब्दाच्या संस्कृत उगमात कायमची बांधलेली नसते; मराठीतल्या वापरातून ती टिकते किंवा बदलते.
थोडक्यात, संस्कृतातून आलेल्या शब्दांचं शब्दलेखन ठरवण्यासाठी आणि त्यांच्या ऐतिहासिक वाटा वेगळ्या दाखवण्यासाठी तत्सम ही कोटी उपयोगी पडते; पण आजच्या मराठीत हे शब्द कसे उच्चारले जातात, काय अर्थ व्यक्त करतात आणि वापरात कोणत्या छटा धारण करतात, हे समजून घेण्यासाठी तिचा उपयोग बेताचा किंवा नगण्य आहे.
तद्भव ही कोटी मात्र तत्समाच्या सापेक्ष काही बाबतींत उपयुक्त ठरते. हस्त-हात, दन्त-दात, कर्ण-कान अशा जोड्यांत संबंधित रूपांच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक वाटा दिसतात. तद्भव म्हणल्यावर जुन्या भाषिक अवस्थांतून बदलत आलेल्या रूपाकडे लक्ष जातं, तर तत्सम म्हटल्यावर संस्कृतातून स्वीकारलेल्या रूपाकडे लक्ष वेधलं जात. मात्र ही तुलना करताना हात हा मराठीतल्या हस्तचा बदललेला उच्चार आहे, असं समजायचं नाही; दोन्ही रूपं वेगवेगळ्या मार्गांनी आजच्या मराठीत एकत्र आली आहेत असं समजायचं.
या ऐतिहासिक फरकाबरोबरच त्यांच्या वापरातलं अंतरही तपासता येतं. आपण हात धुतो, दात घासतो, कान देऊन ऐकतो; तर हस्तक्षेप, दन्तचिकित्सा, कर्णमधुर अशा शब्दांत संस्कृतरूपं वापरतो. या जोड्यांतून रोजच्या व्यवहारात रुळलेली रूपं आणि विशिष्ट साहित्यिक, शास्त्रीय किंवा औपचारिक व्यवहारांत वापरली जाणारी रूपं यांचा संबंध दिसतो.
अर्थात ही विभागणी निरपवाद नाही. त्यामुळे तत्सम-तद्भव हा भेद भाषेच्या इतिहासाचा केवळ एक धागा देतो; त्या धाग्याला आजच्या अर्थांची आणि वापरांची जोड दिली, तर मराठीच्या भाषिक भांडारातली अंतर्गत विविधताही उलगडता येते.
अर्थात हा उलगडाही संस्कृतसापेक्षच उरतो. फार्शीतून ध्वनिबदल होऊन मराठीत स्थिरावलेले शब्द मात्र रूढ व्याख्येनुसार तद्भवांत मोडत नाहीत. म्हणजे संस्कृतातून ध्वनिबदल होऊन आले तरच त्यांना तद्भवत्व, फार्शी-अरबीतून आले तर नाही अशी शब्दांमधल्या ध्वनिबदलांमध्ये संस्कृतातून येणाऱ्यांना शब्दांना विशेष कोटी बहाल करणारी विभागणी संस्कृताला विशेष मानते. या विभागणीचा भर शब्दांमधले कालक्रमात होणारे ध्वनिबदल यावर नसून संस्कृतातून कोण-कोणते आले त्यांना वेगळं स्थान देणारी आहे. प्राकृतांची ही विभागणी जशास-तशी घेताना आधुनिक वळणावर भारतीय भाषांनी विशेष विचार त्यात टाकला नाही यामागे संस्कृत-प्राकृत परंपरेच्या विभागणीला डोळे झाकून कवटाळण्याचा भाग म्हणून पाहावं लागेल.
ऑलेटनं आपल्या पुस्तकात या वर्गवारीला आधुनिक इंडिक भाषांना लागू करण्याचं श्रेय ग्रिअरसन आणि त्याच्या शिष्यांना देऊ केलं आहे [पाहा Ollett (2017: 154)]. वर आपण अर्धतत्समांची चर्चा केली त्याचं आणि ही वर्गवारी अधिक रूढ करण्याचंही श्रेय ग्रिअरसनला देता येईल. पण या संकल्पनांची त्याआधीही चर्चा बीम्स करतो [पाहा Beames (1872-79)]. अर्धतत्सम हे नाव जरी बीम्स उच्चारत नसला तरी त्या आशयाची चर्चा तिथे येते, ती कालौघात नंतरच्या टप्प्यावर अल्पसे ध्वनिबदल होऊन साकारणाऱ्या तद्भव रूपांच्या संदर्भात (उदाहरणार्थ, रात्रि - रात्र - रात अशी रूपं आधुनिक इंडिक भाषांत, तर राइ असं रूप प्राचीन प्राकृतांत). इथे मुद्दा आधी कोण असा नाही. ही वर्गवारी काळाच्या त्या टप्प्यावर आधुनिक इंडिक भाषांना लागू करून एक आकलन निर्माण केलं जात होतं. त्या ज्ञानसाधनाच्या ऐतिहासिक जातकुळीचं स्वरूप काय होतं, भारतीय भाषा अशा प्रकारे समजून घेणाऱ्यांबद्दल आपल्याला काय कळतं, ते पाहण्यासाठी आपण हे विस्तारानं समजून घेतो आहोत. हे काही मुद्दे पाहा –
१. एकोणिसाव्या शतकातील तुलनात्मक भाषाशास्त्र आणि 'शुद्धतेचा' आग्रह : जॉन बीम्सनं जेव्हा भारतीय भाषांमधील तत्सम, तद्भव आणि देशी या त्रैभाषिक वर्गीकरणाचा वापर केला, तेव्हा तो केवळ शब्दसाठा गोळा करत नव्हता; तो युरोपीय तुलनात्मक भाषाशास्त्राचे (उदा. बोप्प आणि श्लायशर यांचे सिद्धांत) निकष भारतीय भाषांवर लादत होता. त्याच्यासाठी तत्सम या शब्दामधून जुन्या संस्कृतच्या जतन केलेल्या रूपांचा बोध होत होता, तर तद्भव या शब्दामधून कालौघात झालेला नैसर्गिक अपभ्रंश रूपांचा. भारतीय भाषांचा विकासही युरोपीय भाषांप्रमाणेच सार्वत्रिक ऐतिहासिक नियमांनुसार झाला आहे हे तो या प्रक्रियेतून सिद्ध करू पाहात होता. आपण मागे पाहिल्याप्रमाणे शब्दभांडाराचं स्थिर वर्णन करणारी, प्राकृत व्याकरणांमध्ये सापडणारी ही वर्गवारी बीम्स इत्यादी मंडळींनी वापरल्यावर ती प्रक्रियात्मक (तद्भव शब्द हे अपभ्रष्ट झाले अशा प्रक्रियेची, आधी शुद्ध रूप होतं आणि त्याचा नंतर क्षय झाला असं सुचवणारी) भासू लागली.
२. प्रशासकीय नियंत्रणाची गरज : भारतीय भाषा आणि व्याकरणाच्या परंपरेमध्ये हे तीन वर्ग लवचीक होते, संस्कृताच्या संदर्भात प्राकृत समजून घ्यायला पूरक आणि उपकारक होते. परंतु, ब्रिटिश प्रशासक म्हणून वावरणार्या बीम्सला भाषेचं वर्गीकरण करून तिला निश्चित चौकटीत बसवणं आवश्यक वाटलं असावं. ग्रामीण जनतेच्या तोंडून येणारी तद्भव रूपं ही त्याला अस्सल लोकभाषा वाटत होती, तर पंडितांच्या ताब्यातले तत्सम शब्द अभिजात वाटत होते. यातून वसाहतवादी प्रशासनाला हवी असलेली एक कठोर शास्त्रीय श्रेणी तयार झाली.
३. युरोपी साच्यात बसवणं : लॅटिन भाषेतून रोमान्स भाषांच्या उगमाचा संदर्भ देऊन बीम्स भारतीय इंडिक भाषांचा विकास समजून घेतो. मात्र, शेल्डन पॉलकसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिल्याप्रमाणे, युरोपमध्ये लॅटिन नष्ट होऊन त्यानंतर प्रादेशिक भाषा आल्या, तशी स्थिती भारतात नव्हती. भारतात संस्कृत कधीही पूर्णपणे मृत भाषा बनली नाही, तर ती प्रादेशिक भाषांच्या सोबतीनं शतकानुशतकं अस्तित्वात राहिली. बीम्सनं या गुंतागुंतीच्या बहुभाषिक वास्तवाला एका सरधोपट युरोपीय वंशवृक्षाच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न केला. वर्गवारीच्या या संज्ञा वरवर भारतीय असल्या, तरी त्यांच्या प्रयोगामागचा तर्क युरोपावरून प्रेरित झालेला दिसतो.
इथे एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे बीम्स हे लिहीत होता, तेव्हा भारतीय भाषा त्यांच्या प्रमाणीकरणाच्या टप्प्यापासून दूर होत्या. शब्दांचं प्रयोगाच्या संदर्भातलं वितरण, एकूण प्रमाण पारिभाषिक ऐवज, शब्दकोशांची भर हे सगळं व्हायचं होतं. आधुनिक प्रमाणीकरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय भाषांनी उच्च प्रशासकीय व्यवस्थेतल्या स्थानाची ठामपणे मागणी केलेली नव्हती. तेव्हा त्या उदयोन्मुख अवस्थेत होता.
४. बीम्सचं काम खऱ्या अर्थानं ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात पाहायचं असेल, - म्हणजे पारंपरिक देशी कोशरचनेचं एक साधन (lexicographical tool) वसाहतवादी तुलनात्मक भाषाशास्त्रानं कसं आपल्या ताब्यात घेतलं, त्याची अंगभूत संवादात्मक लवचीकता कशी दाबून टाकली, आणि तिचं रूपांतर एका हुकमी व्युत्पत्तियंत्रणेत कसं केलं – तर हे समजून घ्यायला लागेल. बीम्स केवळ शब्दांचं वर्गीकरण करण्यासाठी तत्सम-तद्भव-देशी या वर्गवारीचा वापर करत नव्हता, तर ती वर्गवारी वापरून एकोणिसाव्या शतकातल्या युरोपीय ऐतिहासिक भाषाशास्त्राला पुष्टी देणारे भारतीय दाखले निर्माण करत होता. भारतीय उपखंडाच्या गुंतागुंतीच्या व बहुभाषिक सामाजिक-भाषिक साहचर्याचं (sociolinguistic ecology) वसाहतवादी तर्काला साजेसं सपाट, एकांगी चित्र उभं करत होता५.
देशी ही कोटीही तत्सम-तद्भव यांच्या सापेक्ष उभी राहते; मात्र तिच्यात एक वेगळी अडचण आहे. शब्दाचं संस्कृताशी साम्य दाखवता आलं नाही किंवा नियमित रूपांतरांच्या आधारे त्याची संगती लावता आली नाही, तर तो देशी ठरतो. पण संस्कृताशी संबंध न सापडणं म्हणजे त्या शब्दाचा उगम सापडणं नव्हेच. अशा शब्दांमध्ये स्थानिक भाषांतून आलेले शब्द, ध्वन्यनुकरणातून घडलेले शब्द, आणि ज्यांचा इतिहास अद्याप उलगडलेला नाही असे शब्दही असू शकतात. त्यामुळे देशी ही एकाच उगमाची शब्दसंपदा नसून, वेगवेगळे इतिहास असलेले शब्द सामावणारी कोटी ठरते. तिची मर्यादा अशी की ही वास्तविक आपल्या ऐतिहासिक ज्ञानातली उणीव आहे. पण त्या कोटीमुळे ते शब्दाचं वैशिष्ट्यच असल्यासारखं भासू लागतं. तरी तिचं महत्त्व कमी होत नाही : मराठीची सगळी शब्दसंपदा संस्कृताच्या आधारे उलगडता येत नाही, याची जाणीव ही कोटी करून देते. केवळ या विभागणीवर विसंबून राहिल्यास मराठीतले द्रविड मुळाचे शब्द देशी ठरतात. पण प्राकृत व्याकरणांमध्ये एखाद्या शब्दाला देशी म्हणण्यासाठी त्या शब्दाच्या उगमाचा थांग न लागणं, त्या शब्दाचा संस्कृताशी संबंध नसणं अपेक्षित आहे. कालक्रमात द्रविडभाषांचं वेगळं कूळ प्रस्थापित झालं, त्यांतून झालेली शब्दांची उसनवारी स्पष्ट झाली तेव्हा देशी या वर्गवारीत काय मोडतं आणि काय मोडत नाही याचीही पुनरेकवार उजळणी करून ही कोटी अधिक तासून घेतली जायला हवी होती. पण तसं झालं नाही. तसं झालं असतं, तर प्राकृतव्याकरणांच्या नजरेतून पाहिल्यावर डोळा, लाकूड, धोंडा हे शब्द, ज्यांच्या मुळाचा ठाव कुठेच लागत नाही, तेवढे देशी या कोटीत मोडले असते. तेच त्या वर्गवारीच्या सुरुवातीपासून अपेक्षित होतं.
थोडक्यात, शब्दसंपदेची प्राकृतांची वर्गवारी आधुनिक इंडिक भाषांना लावताना त्या वर्गवारीत मुळात अनुस्यूत नसलेला एक कालक्रम कल्पिला गेला आणि ही वर्गवारी जणू काही ऐतिहासिक भाषाविज्ञानाचं साधनच असावी अशा प्रकारे वापरात आली. असं करण्याच्या मर्यादा आपण वर पाहिल्या. मराठीतल्या शब्दलेखनालाही तत्समाचा आधार किंवा उपयोग आहे, कारण हे शब्दलेखन सातत्यानं संस्कृतसापेक्ष, संस्कृतधार्जिणं राहिलं आहे. त्यामुळे प्राकृतांच्या शब्दभांडाराची ही विभागणी मराठीच्या पथ्यावर पडत असली, वरकरणी उपयुक्त वाटत असली; तरी थोडं खोलात गेल्यास चोख ऐतिहासिक आकलन निर्माण करताना या विभागणीमुळे ज्या मर्यादा पडतात, त्या स्पष्ट दिसून येतात.
आजच्या भाषकाला एखादा शब्द किती जवळचा, किती भावात्मक आशय व्यक्त करणारा, किती औपचारिक, किती पुस्तकी इत्यादी वाटतो, हे या वर्गवारीवरून ठरत नाही. फार्शीतून आलेला शब्दही घरातला होऊ शकतो आणि देशी ठरवलेला एखादा प्रादेशिक शब्द दुसऱ्या मराठी भाषकाला अपरिचित असू शकतो. म्हणून शब्दाचा उगम, त्याची ऐतिहासिक ओळख, आणि व्यवहारात त्या शब्दाविषयी वाटणारा आपलेपणा या तीन वेगळ्या गोष्टी म्हणून पाहायला हव्यात.
३. समारोप
भाषेची शब्दसंपदा समजून घेताना केवळ शब्दांची सरधोपट देवघेव म्हणून पाहण्याच्या प्रवृत्तीपासून सुटका करून घेणे, हा या संपूर्ण विवेचनाचा गाभा आहे. प्राकृत व्याकरणांनी तयार केलेल्या वर्गवारीत आपले शब्द बसवून घेण्यातले खाचखळगे कोणते, याचं विवेचन आपण पाहिलं. हे वर्गीकरण चिरेबंद नाही, गैरलागू आहे अशी सरळसोट विधानं करत आपण त्यावर फुल्या मारलेल्या नाहीत, तर ही वर्गवारी आधुनिक इंडिक भाषांना लावताना त्यामागच्या प्रेरणा कोणत्या होत्या याचं ऐतिहासिक स्पष्टीकरण दिलं.
तत्सम-तद्भव-देशी ही त्रिविध वर्गवारी मुळात प्राकृत व्याकरणांध्ये शब्दांची संगती लावणारी एक व्यवस्था म्हणून तयार झाली होती. प्राकृत व्याकरणांमध्ये या वर्गवारीत कालक्रम कल्पिलेला होता असं मानण्याचं कारण दिसत नाही. पण पुढे बीम्स, ग्रिअर्सन यांनी या वर्गवारीला आधुनिक इंडिक भाषांना लावताना कालक्रमाची, अमुकचा तमुक 'झाला', अमुक इतके शब्द अलीकडच्या काळात या भाषांत रिचवले गेले असं म्हणत अर्धतत्सम या कल्पनेची भर घातली. तेव्हा कालक्रम अधिकच गडदरीत्या दिसतो. खरंतर अर्धतत्समाच्या मांडणीत तत्सम या कोटीच्या मर्यादा स्पष्ट होतात, पण वसाहतवादी प्रकल्पाला श्रेणीबद्ध वर्गवारीची भूक अनावर झाली असताना ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या संकल्पना आणि ही त्रिविध वर्गवारी या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचं भान राहिलं नाही.
संधी हा शब्द आणि संकल्पना आधुनिक भाषाविज्ञानात रीतसर रिचवली गेली, पण तत्सम-तद्भव-देशीची मांडणी ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या शिस्तीला पूरक नसल्यानं आणि अतिशय मर्यादित अर्थानं संस्कृतच्या सापेक्ष शब्दसंपदेची संगती लावत असल्यानं अगदी शेजारच्या इराणी भाषाकुळाच्या शब्दसंपदेवर भाष्य करताना ही वर्गवारी वापरली गेली नाही. तशी ती वापरली गेली असती तर अरबी शब्दांना तत्सम, अरबीतून बदल होत फार्शीत सामावलेल्या शब्दांना तद्भव आणि कुठेच उगम सापडत नाही शब्दांना देशी हा तर्क आधुनिक फ़ारसीच्या मांडणीत दिसला असता किंवा अन्यत्र इतर भाषाकुळांच्या इतिहासात ही त्रिविध विभागणी लावता आली असती. परंतु ध्वनिबदलाची, शब्दांच्या उसनवारीची, कालक्रमात चालत येणाऱ्या शब्दसंपदेची उकल करणाऱ्या संकल्पना६ ऐतिहासिक भाषाविज्ञानात असताना या वर्गवारीची वाट मुख्यप्रवाहातल्या ऐतिहासिक भाषाविज्ञानं चोखाळलेली दिसत नाही, अगदी इंडो-युरोपियन भाषांच्या अभ्यासातही इंडिक शाखासोडून इतर उपशाखांमध्येही त्रिविध वर्गवारी लावली जात नाही.
संस्कृतावर आधारलेल्या लेखनव्यवस्थेला एक टेकू मिळवून देणं या पलीकडे ही त्रिविध वर्गवारी मराठी (व इतर इंडिक भाषांच्या) व्याकरणात काही मोलाची विश्लेषण दृष्टी देऊ करत नाही. आपल्या भाषांचं संस्कृताशी एक खासच नातं आहे, संस्कृतच्या सापेक्ष आपल्या भाषा समजून घेतल्यानं विश्लेषणाच्या, सांस्कृतिक संचिताच्या पातळीवर आपल्या भाषा उजळून निघतात अशी काहीशी धारणा आज घडीला ही वर्गवारी टिकवून ठेवताना असावी. प्राकृत व्याकरणांनी व्याकरणिक परिभाषा आणि आयुधं संस्कृताकडून घेतली, तशीच आजच्या आधुनिक भारतीय भाषांच्या व्याकरणिक विश्लेषणाच्या परिभाषेत संस्कृताचे असे अंश आणणं हे भाषिक आकलनाचा तो आधीचा वसा सांगण्यासारखं आहे. अर्थात शब्दसंपदेला कालक्रम आणि श्रेणिव्यवस्था हे आयाम दिल्यानं वसाहतवादी अपेक्षा पूर्ण केल्या गेल्या, त्या मराठीच्या (आणि इतर भारतीय भाषांच्या) ब्राह्मणी संस्कृतकेंद्री भाषिक विचारधारेच्या पथ्यावर पडल्या.
या चर्चेतून हाती आलेले ऐतिहासिक व समाजशास्त्रीय आयाम दूरगामी परिणाम दर्शवणारे आहेत. जॉन बीम्ससारख्या एकोणिसाव्या शतकातील भाषाशास्त्रज्ञांनी जेव्हा युरोपीय ऐतिहासिक भाषाशास्त्राचे नियम भारतीय भाषांवर लादले, तेव्हा त्यांनी युरोपमधील लॅटिन व रोमान्स भाषांच्या उत्क्रांतीचा साचा भारतीय उपखंडाच्या बहुभाषिक वास्तवावर हुबेहूब बसवण्याचा प्रयत्न केला. युरोपमध्ये लॅटिन नष्ट होऊन प्रादेशिक भाषा उदयास आल्या तशी स्थिती भारतात कधीच नव्हती; इथे संस्कृत, प्राकृत, संतसाहित्यातून भक्तिचळवळीतून बोलत्या झालेल्या भाषा, फार्शी, तमीळ या भाषांचं साहचर्य समृद्ध प्रकारचं होतं, या भाषांचे विस्तार आणि प्रयोजनं क्वचित पूरक, क्वचित छेद देणारी असली तरी त्या सोबतीनं शतकानुशतकं सहअस्तित्वात आणि संवादात राहिल्या होत्या. वसाहतवादी प्रशासकीय नियंत्रणाची गरज आणि शास्त्रीय शुद्धतेचा आग्रह यातून निर्माण झालेल्या या भूमिकेनं भारतीय भाषांच्या गुंतागुंतीच्या परिसंस्थेला कळत-नकळत सपाट करून टाकलं.
थोडक्यात सांगायचं तर, भाषेचा इतिहास म्हणजे कोणत्याही एका उच्च, कुलीन भाषेपासून फुटून निघालेल्या फांद्यांचा इतिहास नव्हे, तर तो वेगवेगळ्या समाजघटकांच्या परस्परसंवादातून घडलेला एक अखंड प्रवाही प्रवास आहे. शब्दांचा उगम, त्यांची ऐतिहासिक वाट, आणि वर्तमानकाळातील त्यांचा भावनिक व व्यावहारिक वापर या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासल्याशिवाय कोणत्याही भाषेचे खरेखुरे स्वरूप समजू शकत नाही. प्राकृत-संस्कृत परंपरेच्या ऐतिहासिक वारशाचा स्वीकार करतानाच, त्याच्या वसाहतवादी आकलनाच्या मर्यादा ओळखून इंडिक भाषांचं अनेक पदरी असणं, त्यांत अनेक ऐतिहासिक थर सामावलेले असणं, त्यांत विविध लोकांच्या अस्मिता गोवलेल्या असणं हे अधिक व्यापक व सखोल दृष्टीनं तपासण्याची गरज आहे.
तळटिपा :
१. जरी हरिवृद्धाचा मूळ ग्रंथ आज उपलब्ध नसला, तरी प्राचीन प्राकृत व्याकरणाच्या आणि टीकासाहित्याच्या इतिहासात (उदा. रत्नश्रीज्ञानाच्या टीकेत) त्यांच्या नावाचे संदर्भ सापडतात. हरिवृद्धाने त्यासाठी 'सद्दसम' (तत्सम्), 'सद्दभव' (तद्भव) आणि 'देशी' अशा संज्ञा वापरलेल्या आहेत.
२. असा युक्तिवाद खुद्द ऑलेट यांनी केलेला आहे. ऑलेट प्राकृताच्या अनादित्वाबद्दल बोलताना हेमचंद्राच्या देशीनाममालेतल्या पहिल्या वर्गातल्या चौथ्या गाथेचा आधार घेतो. गाथेतल्या 'अणाइपाइअपयट्टभासाविसेसओ देसी' या शब्दांचं स्पष्टीकरण करताना हेमचंद्र स्वतःच्या संस्कृत वृत्तीत 'अनादिप्रवृत्तप्राकृतभाषाविशेष' असा शब्दप्रयोग करतो. याचा अर्थ अनादिकाळापासून प्रचलित असलेला प्राकृताचा एक विशिष्ट भाषाव्यवहार असा घेता येईल. मात्र हा उल्लेख देशी शब्दांचं स्वरूप आणि आपल्या कोशाची व्याप्ती स्पष्ट करण्याच्या संदर्भात येतो. प्रत्येक प्रदेशात प्रचलित असलेले सगळेच शब्द गोळा करायचे म्हटले तर त्यांना अंत उरणार नाही; म्हणून हेमचंद्र देशी ही संज्ञा प्राकृतात परंपरेने रूढ असलेल्या विशिष्ट शब्दसंपदेपुरती मर्यादित करतो. त्यामुळे ऑलेटने या उताऱ्यात प्राकृताच्या अनादित्वाची कल्पना नोंदवली असली, तरी हेमचंद्र इथं सर्व प्राकृतभाषांच्या उत्पत्तीबद्दल स्वतंत्र सिद्धान्त मांडत आहे, असा व्यापक निष्कर्ष काढताना सावध राहायला हवं (हेमचंद्र, १९३८, १.४ व त्यावरील स्वोपज्ञ वृत्ती, पृ. ३; Ollett (2017:155, 251 अन्त्यटीप क्र०50).
३. मुळात फार्शी आणि तिच्या मार्गे आपल्यापर्यंत आलेल्या शब्दांना विदेशी म्हणणं मला व्यक्तिशः पटणारं नाही. व्यापक पर्शियनेट विश्वाचा भाग असणं हे यात पुरेपूर विस्मरणात गेलेलं आहेच, शिवाय फार्सीची इस्लामशी सांगड घालून त्यातला शब्दांना परकं लेखून विदेशी ठरवणं यात एक खास अनैतिहासिक दृष्टी आहे.
४. मल्याळममध्ये मात्र संस्कृत आणि तमिळ यांच्या शब्दलेखनाला तत्समासारखा मान आहे. उर्दू लेखनातही अर्थातच अरबी-फ़ार्सीचं शब्दलेखन तत्समाप्रमाणे केलं जातं, तिथे तत्सम असा शब्द वापरत नाहीत.
५. The language thus composed was undoubtedly, when tested by the standard of classical Latin, very uncouth and barbarous, and was in consequence for many centuries despised by learned men, who continued to write, and even to speak, Latin. It was not till the thirteenth century that some great minds broke through the prejudices of their age, and, influenced by a strong desire of being intelligible to the mass of their countrymen, commenced timidly and half apologetically to write in the vulgar tongue. If this was the case in Southern Europe, we are justified, by the known analogy between the Romance processes of development and those of the modern Aryans, in believing that the same thing took place in India. The assumption is so much the more reasonable in the latter class of languages, because the Brahmans were animated by an openly avowed and steadily pursued design of keeping their writings sacred from the intrusion of the people, and, believing or professing to believe their language to be of divine origin, were more earnest and careful in preserving it from being polluted by the introduction of "low-caste" words, than the Roman poets and historians, who had no higher motives than a search after grace and euphony. [पाहा Beames (1972-79) मधलं हे अवतरण]
६. इथे मला doubles, cognates, reflexes अशा संज्ञा, संकल्पना अपेक्षित आहेत.
संदर्भ :
हेमचंद्र. (१९३८). देशीनाममाला (रि. पिशेल, संपा.; प. वें. रामानुजस्वामी, सुधारित द्वितीय आवृत्ती). पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर.
देशपांडे, मा. मु. (१९९५) संस्कृत आणि प्राकृत भाषा व्यवहार, नियमन आणि शास्त्रचर्चा. पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन.
धारूरकर, चि. (२०२५, २० ऑक्टोबर). मराठीचं ज्ञानभाषापण. ऐसीअक्षरे.
Beames, J. (1872–1879). A comparative grammar of the modern Aryan languages of India: To wit, Hindi, Panjabi, Sindhi, Gujarati, Marathi, Oriya, and Bangali (Vol. 1–3). Trübner & Co.
Chatterji, S. K. (1926). The origin and development of the Bengali language. Calcutta, India: Calcutta University Press.
Dundas, P. (1996) Jain attitudes towards the Sanskrit language. In J. E. M. Houben (Ed.), Ideology and status of Sanskrit: Contributions to the history of the Sanskrit language (pp. 137–156). Leiden, Netherlands: E. J. Brill.
Gurevitch, E. (2025) "Chapter 6 Words and Signs in the Vernacular in Sanskrit". In Signs and Signification in a Global Comparative Perspective. Leiden, The Netherlands: Brill.
Masica, C. P. (1991) The Indo-Aryan languages. Cambridge, England: CUP.
Ollett, A. (2017) Language of the Snakes. Oakland, California: University of California Press.
Pollock, S. (2006). The language of the gods in the world of beings: Sanskrit, culture, and power in premodern India. University of California Press.