"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं. असं असूनही 'द जर्नी होम' या नावाचं एक इंग्लिश पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या उपरोल्लेखित वैशिष्ठ्याला न जागता मी या पुस्तकाचा अगदी फडशा पाडला.

मुखपृष्ठ "मुखपृष्ठ"

१९६९-७० साली 'काऊण्टर कल्चर' किंवा ज्याला 'हिप्पी' संकृती असंही म्हटलं जातं, जेव्हा ऐन भरात होतं, तेव्हा 'रिचर्ड स्लेवीन' नावाचा शिकागोला राहणारा, महाविद्यालयात शिकणारा १९ वर्षांचा मुलगा त्यात सामील होतो आणि पूर्ण सत्याच्या शोधात घराबाहेर पडतो, त्याची ही कहाणी आहे. सामान्य गो~या अमेरिकन मुलांपेक्षा वेगळा विचार करणारा रिचर्ड धार्मिक, श्रद्धाळू, पापभीरू तर आहेच पण त्याला संगीत आणि तत्त्वज्ञानाचीही आवड आहे. तो उत्तम 'हार्मोनिका' वादक आहे आणि स्वत: धर्माने ज्यू असूनही त्याची ख्रिस्तावर श्रद्धा आहे. पण तरीही त्याच्या मनात परमेश्वराच्या मूळ स्वरूपाविषयी काही शंका आहेत. तत्कालीन समजुतीनुसार तुमची उत्तरं तुम्हीच शोधायची या विचाराने महाविद्यालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो तुटपुंजे पैसे गाठीला बांधून युरोपात आपल्या गॅरी नावाच्या बालमित्रासोबत सहलीला जातो. या सहली दरम्यान त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. हिप्पी कल्चरचा भाग झाल्याने प्रवासात त्याला समविचारी-समवयस्क मित्र भेटतात आणि त्यांच्याबरोबर रिचर्ड पुढे आपला प्रवास सुरू ठेवतो. पैशांच्या कमतरतेमुळे येणा~या-जाणा~या वाहनांकडे लिफ्ट मागून पुढल्या शहरात जायचे ही 'हिचहायकिंग' ची पद्धत संपूर्ण प्रवासात रिचर्ड वापरतो. त्याच्या प्रवासातले प्रत्येक नव्या देशात प्रवेश करण्यापूर्वी तिथल्या इमिग्रेशन ऑफिसचे अनुभवही विलक्षण असेच आहेत. अशा प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत इटली, इंग्लंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रांस असे देश फिरून तिथल्या धर्म-पंथांचा अभ्यास करून ग्रीस मध्ये आल्यावर त्याच्या मनात आवाज उमटतो, "भारतात जा".

रिचर्ड स्लेवीन १९७० (पासपोर्टवरील फोटो) "रिचर्ड स्लेवीन १९७० (पासपोर्टवरील फोटो)"

आपल्या अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन हा अननुभवी १९ वर्षांचा नवयुवक हिचहायकिंग करत ग्रीसहून तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे अत्यंत हालअपेष्टा सोसून, संकटांचा सामना करत भारतात दाखल होतो. भारतातही तो सत्याच्या शोधात परीव्राजकाचं जीवन स्वीकारतो. हिमालयातल्या जंगलांमध्ये नैसर्गिक गुहांमध्ये निवास करून राहणार्‍या रिचर्डला तिथल्या नागाबाबांचा एक गट आपल्यातच सामील करून घेतो. त्यांचे मुख्य त्याला आपल्या पंथाची दीक्षा देऊ इच्छितात पण रिचर्डची स्वतःच्या मनाची खात्री झाल्याखेरिज कुठलाही अशा प्रकारचा समर्पणाचा निर्णय घेण्याची तयारी नसते. पुढे त्यांची साथ सोडून तो एकटाच आपला शोध जारी ठेवतो. दरम्यान त्याला त्याच्यासारखेच एकटे ध्यान करणारे एक साधुबाबा भेटतात आणि ते खर्‍या अर्थाने एका साधुची जीवनी त्याला शिकवतात. त्याच्या पाश्चात्य कपड्यांचा त्याग करवून पूर्ण भारतीय असा कौपिन, उत्तरीय आणि अधरीय असा पोषाख देतात. एकमेकांची भाषा अजिबात न येणारे हे दोघे अनेक दिवस एकत्र ध्यान-धारणा करतात. पुढे त्यांच्या सहवासात पूर्ण साधु बनलेला रिचर्ड आपल्या पुढच्या प्रवासासाठी त्यांचा निरोप घेतो आणि आपलं मार्गक्रमण सुरू ठेवतो. या प्रवासातही अनेक साधुसंतांची तो भेट घेतो, अनेक पंथोपपंथीय साधु त्याला दीक्षा देण्याची तयारी दर्शवतात पण अखेर त्याच्या विचारांचा, मतांचा आदरही करतात.

हिमालयात गंगेच्या किनार्‍यावर वास्तव्य करत असताना त्याच्या हृदयाकाशात मंत्रबोध होतो आणि मंत्राचा अर्थ अजिबात कळत नसतानाही त्याचा सतत जप सुरू होतो. हिवाळ्यात रिचर्ड भारतातील इतर तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. तो अयोध्येतल्या रामभक्तीचा आस्वाद घेतो, काशी - प्रयागतीर्थाचं दर्शन करतो. तिथून परतीच्या प्रवासात दिल्लीला जाणार्‍या गाडीतून पाणी पिण्यासाठी खाली उतरलेल्या रिचर्डला पुन्हा गाडीत शिरायलाच मिळत नाही आणि त्या स्टेशनवरच राहतो. ते स्टेशन असतं मथुरा आणि तिथूनच त्याला त्याच्या पत्ता लागतो वृन्दावनाचा. वृन्दावनात पोहोचल्यावर त्याला त्याच्या आयुष्यभराच्या एकेका प्रश्नाचं उत्तर मिळून त्याच्यावर श्रीकृष्णाचं गारुड पडत जातं आणि श्रीकृष्ण-भक्तीची कवाडं त्याच्यासाठी उघडली जातात. याचाच एक भाग म्हणून पुढे मुंबई मुक्कामी क्रॉस मैदानातील एका कार्यक्रमात त्याची भेट 'आंतरराष्ट्रिय श्रीकृष्णभावनामृत संघा'च्या (इस्कॉन) संस्थापक आचार्यांशी, भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपादांशी होते. यांच्या साहित्याच्या वाचनानंतर, अभ्यासानंतर तो त्यांचं शिष्यत्व पत्करतो.

राधानाथ स्वामी "राधानाथ स्वामी"

रिचर्ड स्लेवीनचे राधानाथ दास बनण्याची कथा आहे "द जर्नी होम". परमेश्वराला जाणण्याची उत्कट इच्छा असणार्‍या तरुणाच्या भावनिक आणि अध्यात्मिक अनुभवांची शिदोरी हे पुस्तक आपल्यापाशी उघडतं आणि स्वत: राधानाथ स्वामींच्या निर्मळ कथनातून आपण त्यांचे सहप्रवासी बनून त्यांच्या या जाणीव - नेणीवांचाच एक भाग बनतो.

जरूर वाचा!

या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'तृषार्त पथिक' नावाने प्रकाशित झाला आहे.

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

इतरत्र पूर्वप्रकशित

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आहे.

मराठी अनुवाद आला आहे हे उत्तम ,आवड्ता विषय.जरूर वाचणार , धन्यवाद .

जुई