नाटकामागचं नाटक - १

इतरत्र एका चर्चेत नाटकाचा उल्लेख आला, आणि एक प्रतीसाद लिहायला घेतला, लिहितालिहिता वेगळा लेखच तयार होईल असं वाटलं म्हणून इथे लिहितोय

कळतं मला आपलं थोडंसं नाटकातलं.. पाहिली आहेत थोडी नाटकं.. कधी अडीअडचणीच्या प्रसंगी थोबाड रंगवून उभाही राहिलेला आहे विंगेत, तिथून धडपडत स्टेजवर, आणि तिथून परत धडपडत विंगेत...

पण नाटकाची एक धगधगती बाजू मात्र अगदी व्यवस्थीत, अगदी चटके बसतील इतक्या जवळून पाहिली.. ती म्हणजे त्या आयताकार स्टेजबाहेर, आणि दिव्यापाठीमागे अंधारात एक मोठं नाटक चालतं ते.

स्पर्धेच्या तारखेवर डोळे ठेवून असणे अथवा स्वता:च्याच ग्रूपच्या नाटयमहोत्सवाची तारीख ठरवणे, ती ठरल्यावर नेहेमीचे खंदे भिडू गोळा करणे,
प्रत्येकाचं मत घेऊन, नाटकाचा मूड, ढोबळ कास्टींग, वगैरेचा अंदाज घेउन साताठ संहीता गोळा करणे,
मित्राच्या रिकाम्या फ्लॅट्वर अथवा एखाद्या वाड्यातल्या एखाद्या खोलीत रात्रभर सगळे जमून सगळ्या संहितांच सँपल वाचन करणे. प्रत्येक संहीतेमधल्या मजबूत अथवा कमकूवत जागा यावर चर्चा करून दोनतीन संहीता फायनल करणे,
साधारण लूज कास्टींग इथेच होते, काहि भुमीका क्लेम केल्या जातात काही गळ्यात मारल्या जातात, बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते.
संहीता निवडली की त्याचा दिग्दर्शक ठरवणे, एकदोन हुकूमी दिग्दर्शक असतातच, त्यातला एक फायनल केला की त्याला संहीता आवडत नाही, मग ती बदलावी लागते, (इथे मल्टीपल लूप टू 'संहीता ठरवणे' स्टेप). मग त्याला कास्टींग आवडत नाही, ते थोडंसं बदलावं लागतं,

या सगळ्यामधे कुणाचं लफडं कुणाशी चालू आहे, कुणाचं कुणाशी पटत नाही, मागच्या वेळेला कुणी टांग मारली होती, कोण माजला आहे, कोण त्या ह्यांचा खास आहे, वगैरे सगळं लक्षात ठीवावं लागतं,

या सगळ्या गदारोळातून एकदाची संहीता आणि कास्टींग फायनल होतं. आणि त्याचदिवशी असं लक्षात येतं की प्रयोगाला खूपच कमी दिवस राहिलेले आहेत, मग इतकं अवघड स्क्रिप्ट निवडल्याबद्दल मला दोष देण्यात येतो, मग आता तालमी तरी व्यवस्थीत करा असं मलाच सांगण्यात येतं.

मग तालमीसाठी जागेचा शोध...

एखाद्याची रिकामी खोली, एखादा रिकामा फ्लॅट, एखाद्याच्या घराचा मोठा हॉल, एखादा पडका वाडा, गुळाचं गोडावून, खाजगी मालकीचं मंदीर यापैकी एक तालमीला मिळवावं लागतं, त्या जागा मालकाच्या नाकदुर्‍या काढल्यावर एकदाचा तालमीचा नारळ फुटतो..

मग तालीम सुरू होते, त्या नाटकात जर दोनपेक्षा अधीक पात्रे असतील, एखादा ड्यान्स वगैरे असेल तर जागामालक अचानक त्याच्या म्हातारीला आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करतो, मग पुन्हा मल्टीपल 'लूप टू जागा शोधणे'

प्रयोगाची तारीख जवळ येतच असते, जागेचा प्रश्न कसातरी सुटतो, मग तालीम वेग पकडते...

बहुतेक सगळी पात्रे ही दिवसाढवळ्या कुठेतरी कॉलेज, मामाचं किराणामालाचं दुकान, बापाचं चहाचं हॉटेल, मेडीकलचं दुकान, सराफी पेढी, कॉम्पुटरदुरुस्तीचा व्यवसाय वगैरे व्यवधानात व्यस्त असल्यामूळे तालमी नेहेमीच रात्री कराव्या लागतात.. एखादं नाटक असेल तर ठीक आहे पण नाट्यमहोत्सवात तीन नाटके करताना रात्री नऊला तालीम सुरू करून सकाळी सहाला संपवावी लागते..

नाटक आता जरा बाळसं धरू लागतं..

तेवढ्यात कुणालातरी आठवण येते, की आपण लेखकाची परवानगी नावाचा सोपस्कार अद्याप केलेलाच नाही, मग लेखकाचा फोननंबर आणी करंट पत्ता याची शोधाशोध.. तो काही मिळत नाही, मग पुस्तकातल्याच पत्त्यावर एक पत्र आणि एकशेएक रुपये मानधनाचा चेक पाठवला जातो..

तालमीत कोण कमी पडतोय, कोण जड होतोय, कोण झोपतोय, कोण कचकचीत,कोण ऐनवेळी पो घालणार यावर रोज रणकंदन आणि उखाळ्यापाखाळ्या. (या प्रसंगी मात्र माझ्या थोड्याशा हुकूमशाही स्वभावाचा आणि माजुर्डेपणाचा फायदा खूप व्हायचा..)

मग कपडेपट, साउंड, आणि नेपथ्य...

नाटकातल्या मुलींचे कपडे जमवणं आणी नाटकात काम करायला मुली जमवणं यात जास्त अवघड काय हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहिये..

साउंडवाला जो निवडलेला असतो त्याला सगळ्या प्रसंगात बॅकग्राउंडला सनईच वाजवायची हुक्की येते, सनई नसेल तर बॅगपायपर.. मग कुणाचातरी कॉप्युटर पकडायचा, साउंड एडीटींग सॉफ्ट्वेअर दोन दिवसात मीच शिकायचं आणि सगळे ट्रॅक परत एडीट करायचे..

आता नेपथ्य,
दिग्दर्शक सोडून सगळ्यांच मत असतं की नेपथ्य एकदम साधं करायचं यावेळेला, पण दिग्दर्शक अडून बसतो.. त्याचं म्हणणं पडतं की नेपथ्य जबरा नसेल तर पहिला अंक पालथा पडेल आणि दुसरा अंक उठणारच नाही. नेपथ्य करायचं ठरतं... काय करता.. जमतील तेवढ्या टूव्हीलर घेऊन जत्रा हार्डवेअर च्या दुकानात... (गावाकडे नेपथ्य भाड्यानं मिळत नाही भाऊ, स्वत: खपून बनवावं लागतं..)

मग प्लायवूड, लाकूड, खिळे वगैरे खरेदी, ते घेऊन ओळखीच्या सुताराकडे.. हा एकटाच माणूस असा असतो की जो प्रोफेशनल असूनही त्याला नाटकाच्या कुठल्याही कामात मनापासून विन्ट्रेष्ट असतो.. तो मनापासून आठ बाय तीन चे फ्लॅट बनवून देतो..

ते फ्लॅट घेउन जत्रा पुन्हा कुणाच्यातरी बागेत अथवा गोडावून मधे.. अहो नुसते फ्लॅट तयार करून चालत नाहीत, ते रंगवावे लागतात.. रात्री सगळी पुर्वतयारी होते, डिस्टेंपरचे डबे, ब्रश, दारे खिडक्या रंगवायला एक त्यातल्यात्यात बरा चित्रकार जमवले जातात.. रात्री अकरा वाजता डिस्टेंपरचा डबा फुटतो आणि लक्षात येतं की थिनर आणायचा राहिला.. मग एखाद्या हार्डवेरवाल्या मगनलाल मालपाणीच्या पोराला फितवून, दुकान उघडून थिनर आणायचा..

सगळे फ्लॅट जमीनीवर आडवे टाकून कंबर मोडेपर्यंत पहिला हात मारायचा, रात्रभर पाठीचा आणि कंबरेचा भुकना पडतो.. मग दुसर्‍यादिवशी रंग वाळू द्यायचा, मग रात्री परत दुसरा हात... एवढं सगळं करून नाटकाचे फ्लॅट नावाची लपलपणारी वस्तू तयार होते..

क्रमश:

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सुदैवाने मी जेव्हा नाटकं केली तेव्हा प्रॅक्टिस करायला आयायटीत भरपूर जागा होती. काही मोक्याच्या जागा ठरलेल्याही होत्या. स्टेजेस होती. सेट करण्यासाठी वर्कशॉप होतं. तसंही सेट फारसे न वापरण्याचीच नाटकं असायची. बाकीच्या भानगडी एकदम तश्शाच.

पण सगळ्यात कठीण काम म्हणजे नाटकासाठी मुली सापडणं. हॉस्टेलतर्फे केलेल्या नाटकांमध्ये तर मुलगी घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बिनमुलीची नाटकंच शोधावी लागत. आख्ख्या आयायटीच्या ऍन प्रॉड साठी मग प्रश्न यायचा.

त्यावरून आणखीन एक आठवलं. याच सगळ्या नाटकाआधीच्या गमतीजमतींचं वर्णन करणारं आणि विशेषतः प्रायोगिक नाटकांची खिल्ली उडवणारं एक नाटक आययटीतल्या एका विद्यार्थ्याने लिहिलं होतं. त्याचं नाव होतं 'संगीत नाट्यानुभवाचा कल्पनाविलास'. ते नाटक हॉस्टेलच्या स्पर्धेसाठी म्हणून 'पाडलेलं' - पण ते इतकं छान होतं की आत्तापर्यंत मी पाहिलेल्या मराठी विनोदी नाटकांत सर्वोत्कृष्ट म्हणून सहज मानता यावं. त्याचे लेखक म्हणजे दुसरंतिसरं कोणी नसून 'मनोगत'चे वेलणकर. ते नाटक जेव्हा ऍनप्रॉडसाठी केलं तेव्हा माझ्याबरोबरच त्यात काम करणारे होते अजय गल्लेवाले - मायबोलीचे मालक. त्या नाट्यानुभवाविषयीही कधीतरी लिहायची इच्छा आहे. पण बघू जमेल तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"....पण सगळ्यात कठीण काम म्हणजे नाटकासाठी मुली सापडणं....."

~ श्री.घासकडवी याना आलेला हा अनुभव कोणत्या दशकातील आहे हे समजून येत नाही [हल्ली काही मोठ्या शहरातील या संदर्भातील स्थिती बदलत चालल्याचे आढळते, हे एक प्रकारचे सुचिन्हच म्हणावे लागेल, हौशी नाट्यकर्मींसाठी...], पण ७० च्या दशकात मी आणि माझ्या नाट्यप्रेमी मित्रांनी 'मुली' संदर्भात घेतलेल्या काही कडू तर काही गोड अनुभवाची शिदोरी आठवली.....अन् मराठीत 'नाकदुर्‍या काढणे' असे जे आपण म्हणतो, त्याचा नेमका काय अर्थ, त्याचा पुरेपूर अनुभव घेतला होता. कोल्हापूरात 'संगीत मेळे' [नंतर त्यांचे 'कलापथका'त रुपांतर झाले होते] यांची परंपरा खूप चांगली होती....विशेषतः गणेशोत्सवानंतर अशा 'ताज संगीत मेळा....किरण संगीत मेळा....आकाश संगीत मेळा..." आदी खुल्या रंगमंचावर होणारे करमणुकीचे प्रकार [त्या काळी] लोकांच्या आकर्षणाचे केन्द्रबिंदू असत. या मेळ्यातील मुलींना मग आमच्यासारखी काही हौशी नाटक मंडळी एखाद्या नाटकातील भूमिकेसाठी राजी करत असू...तेही त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत. काहीवेळा होकारार्थी प्रतिसाद येई, पण कोल्हापूर हद्दीच्या बाहेर आमची मुलगी येणार नाही या मुद्द्यावर बाप-काका ठाम असत. 'मेळे' गावातच असत आणि रात्री बारासाडेबाराला मुलीला मेळ्याचे व्यवस्थापक जातीने घरी सोडत ही बाब त्या पालकांना भावत असे. पण हौशी नाट्यकर्मी असे एकाच गावात प्रयोग करणारे नसतात....प्रयोगांसाठी सांगली, रत्नागिरी, बेळगाव इथे जावेच लागे....अशावेळी 'नटी' साठी अडून बसल्याने काय काय मिनतवार्‍या करायला लागायच्या हा एक इतिहासच आहे.

'लग्नाच्या बेडी' मध्ये मध्यवर्ती 'रश्मी' च्या भूमिकेसाठी एका होतकरू मुलीला तयार केले होते...पण बापाने अट घातली होती की, "आमची मुलगी स्कर्ट घालणार नाही, तिला पूर्ण नाटकात साडीमध्येच दाखविले पाहिजे तुम्ही...ही अट मान्य असेल तरच मुलगी तालमीला येईल...." 'रश्मी...अन् तीही साडीत ? अत्र्यांना चक्करच आली असती. पण तेही आम्ही केले. हौसेला मोल नसते हेच शिकलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज बे एरियात ऑडिशनसाठी या नाटकातला प्रवेश निवडला, आणि सहज गुगल केलं तेंव्हा घासकडवींची ही पोस्ट दिसली.
या नाटकात सूत्रधाराचं काम करून मी डॉ गिरिश ओकांच्या हस्ते अभिनयाचं पारितोषक मिळवलंय! पुढे अमेरिकेतही तेच काम केलं. लेखक महेश "वेलच्या" वेलणकरच्या आणखी दोन नाटकात मी मुख्य भुमिका केल्या आंतरवसतीगृह (आय आय टी मुंबई) स्पर्धेत - "बैल, हत्ती आणि घारे डोळे", आणि "स्क्रीप्ट आहे, पोरगी नाही"! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवा कितीतरी वर्षांनी पुरुषोत्तम करंडकाच्या निमित्ताने कॉलेजच्या मुलामुलींनी सादर केलेल्या एकांकिका पाहिल्या आणि मनात गुलजारच्या चित्रपटांसारखा एक फ्लॅशबॅक सुरु झाला. ती जाग्रणं, पाठांतरं, चुका, रुसवेफुगवे वगैरे...
लेख आणि घासकडवींचा प्रतिसाद मनापासून आवडला. नाटकामागचं नाटक हा सिनेमामागच्या सिनेमासारखाच रंजक प्रकार आहे. वेलणकरांचा हा पैलू माहिती नव्हता, पण वेलणकरांबाबत काहीच माहिती नसल्यामुळे आणि तशी त्यांनी जबरदस्त खबरदारी घेतल्यामुळे त्यात काही नवल वाटले नाही. पण वेलणकर आणि विनोद हे एका श्वासात उच्चारायला जड गेलं. इतकं की घासकडवींचं म्हणणं खोटंच आहे असं वाटू लागलं. घासकडवी, कशाला गरीबांच्या तंगड्या खेचताय? उद्या मुक्तसुनीत कोणे एके काळी सहजसुलभ, चार लोकांना कळेल असं लिहीत असत असं म्हणाल, धनंजय बिनगुंतागुंतीचे प्रतिसाद लिहीत असे असं म्हणाल, रमताराम वाद न करणारे लेखन करत असे असं म्हणाल, खवचटखान आपल्या खर्‍या आयडीने लिहीत असत असे म्हणाल... बच्चे की जानही ले लोगे?
नाटकातल्या मुलींचे कपडे जमवणं आणी नाटकात काम करायला मुली जमवणं यात जास्त अवघड काय हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहिये..
हम्म.. नाटकातल्या मुलींचे कास्टिंग करण्यामागचे विविध (खरे तर एकच) हेतू आठवले आणि काही खपल्या उचकटल्या गेल्या. ये खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

इतकं की घासकडवींचं म्हणणं खोटंच आहे असं वाटू लागलं. घासकडवी, कशाला गरीबांच्या तंगड्या खेचताय? उद्या मुक्तसुनीत कोणे एके काळी सहजसुलभ, चार लोकांना कळेल असं लिहीत असत असं म्हणाल, धनंजय बिनगुंतागुंतीचे प्रतिसाद लिहीत असे असं म्हणाल, रमताराम वाद न करणारे लेखन करत असे असं म्हणाल, खवचटखान आपल्या खर्‍या आयडीने लिहीत असत असे म्हणाल... बच्चे की जानही ले लोगे?

हा हा हा.. (तरी बरं, माझं नाव या यादीत दिसलं नाही ते Smile ) पण आम्ही लटिके ना बोलू. हवे असतील तर त्या नाटकाच्या प्रयोगाचे साक्षीदार इथे उभे करतो. मला इतक्या वर्षांनंतर त्या नाटकाचे संवादच्या संवाद पाठ आहेत. प्रायोगिक नाटकं करण्याचा कंड, त्यासाठी ग्रुपची जमवाजमव, दिग्दर्शकाचं काहीतरी गंभीर बोलणं, स्क्रिप्ट जमवण्यासाठी केलेल्या उचापती, तसल्या नाटकांमधल्या काही ठाशीव घटना, समीक्षकांनी केलेली समीक्षा ... या सगळ्याची खिल्ली प्रायोगिक नाटकाच्या शैलीतच नाटक केली होती. वर त्यात नांदी, सूत्रधार, एकदोन गाणी, राजा परधानाचा सीन वगैरे असला मसालाही भरपूर होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख नॉस्टॅल्जिक करून गेला!
अतिशय नेमका लेख आहे. क्रमशः बघुन सुखावलो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लेख आणि प्रतिसाद!
अवांतर: कोणी तेँडुलकर + इतर यांच्या, स्फोटक विषय असलेल्या नाटकांचा परीचय/समिक्षा यावर लेखमाला लिहु शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते.
अत्युच्च ओळ. मर्फिज् लॉ च.
.
काही जण ग्रुपमध्ये नवीन असतील, सोवळे असतील तर ते त्यांचं काही (त्यांना ) धाडसी वाटणार्‍या सीनला नाही नाही म्हणणं, त्यात काही पर्याय आहे का असं सतत विचारत्/शोधत राहणं हे गंमतीशीर वाटतं.
.
दोन -तीन अंकी बसवत असाल तर run through च्या वेळेस, आधी एक एक अंक/प्रवेश सुटा सुटा करत असाल तर प्रथमच अथ पासून इतिपर्यंत करत असल्यास गडबडून जाणे. थेट दोन्-तीन पाने खाउन पुढेच उडी मारणे असेही किस्से असतात. स्त्री कलाकरांचे येण्याजाण्याचे टायमिंग सांभाळणे, स्त्री कलाकाराच्या घरी नाट्यकलेची काही पार्श्वभूमी नसेल तर त्यासाठी त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करणे हे एक अग्निदिव्य.
.
ग्रुपमध्ये कित्येकदा एखादा अ‍ॅडिशनसम्राट असतो.तो आयत्यावेळी स्वतःला लक्ष्मीकांत बेर्डे समजत वाटेल तसे अ‍ॅडिशन सुचवीत जातो, तालमीत करतो, तेव्हा त्याला दिग्दर्शक, इतर ग्रुप समजून तरे घेउ शकतो, तिथे दुरुस्तीस वाव असतो. पण काहीजण भूमिकेत इतके शिरतात की ऐनवेळेस खुद्द प्रयोगात अ‍ॅडिशन सुरु ! आणि समोरचा ती पेलण्याइतका ताकदीचा नसेल तर स्वतःच्याच प्रयोगास हिटविकेट.
.
एक अवांतर शंका :- अंकुश चित्रपटातील नना पाटेकर- सुहास पळशीकर ह्या बेरोजगार तरुणांप्रमाणे दाढ्या वाढवत नि शिगारेटी फुकणारेच चांगले कलाकार बनतात की चांगले कलाकार बनल्यावर ते असे बनतात?
.
हल्ली कुठे तसे होत नाही, पण फार मागे ग्रामीण भागात संहितेची गरज म्हणून कधीच कुणी स्वत्;ची मिशी कापून देण्यास तयार होत नसे. अगदि स्त्रीचे काम करणारे पुरुष कलाकारही.
.
कित्येकजण आपापलं वैयक्तिक सादरीकरण उत्कृष्ट करतात, पण इतरांचे संवाद सुरु असतानाही बाकीचेही त्याच नाटकाचा भाग असतात, हे समजावून सांगताना नाकी नउ येतात. टिपिकल केस; - जेव्हा एखाद्या प्रमुख पात्राचे स्वगत, किम्वा इतर कुठलेही लांबलचक संवाद सुरु असतील, तेव्हा इतरांनी काय करायचं? हे प्रत्येकास दरवेळी सम्जावून सांगणं आनि ते त्यांनी तसच पाळणं कर्मकठीण आहे.
.
तालमीच्या काळात भूक मुख्यत्वे भागते ती वडापाव, चहा-बिस्किटे वगैरेवर. कारण सगळे उपद्व्याप सांभाळून तालमी करायच्या तर घरी जाण्यस पुरेसा वेळ नसतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त लेख, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
बाकी स्त्री-भूमिकांकरता कलाकार शोधणे, ही समस्या अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांच्या हौशी कमिट्यांनाही भेडसावते. पण बर्‍याचदा खुद्द नाटकांपेक्षाही तालमींना अधिक मजा येते; हे नक्की. आमच्या मंडळाने 'आसं रामायण' (धुनिक संगीत रामायण) काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवासाठी बसवलं होतं. भिडू गोळा करण्यापासून ते इंग्रजी माध्यमात शिकलेल्या काहींचा संवाद उच्चारताना होणारा घोळ निस्तरण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत (ओनामा चे ओसामा इ.) नाटक उभं राहतंय की नाही आणि राहिलंच तर आधुनिक संगीत रामायण असल्याने प्रभू श्रीराम 'जानेजाँ ढूंढता फिर रहा' गात रावणाने पळवून नेलेल्या सीतेचा शोध घेत आहेत, हे प्रेक्षकांना रुचेल की नाही - त्यासाठी नाटकाआधी डिस्क्लेमर द्यावा का इ. अनेक गोष्टींवर तात्त्विक मतभेद होते; पण एकदा दणक्यात प्रयोग झाल्यावर आता त्या तालमी आठवून गंमत वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचून भयंकरच नॉस्टाल्जिक झालो. अशा समस्त हौशी नाट्यनिर्मात्यांबद्दल अत्यंत आदर आहे.

स्वतःच एकांकिका लिहून ती स्वतःच्या देखरेखीखाली उभी करायची, दिग्दर्शन करायचे आणि स्वतःच त्यात छोटी भूमिकाही करायची असले सव्यापसव्य यत्ता पाचवी ते वय वर्षे चाळीसपर्यंत कांही वेळा केल्याने या सगळ्या बाळंतपणातून गेलो आहे. पूर्णपणे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट ते काल्पनिक ऐतिहासिक स्क्रिप्ट, दोन पात्री स्त्रीपात्र-विरहित ते वीस पात्री मॉबसीनसह स्त्री भूमिका असा नटसंच, काल्पनिक जंगल ते राजवाड्याचा सेट अशा विविध प्रकारांचे नेपथ्य, कॅसिओ कीबोर्डवर वाजवलेले लाईव्ह म्यूझिक ते अ‍ॅडोबी ऑडिशनवर केलेले फोरट्रॅक म्युझिक, जनरल फ्लड लाईट्स ते दहा-बारा बेबीज (स्पॉटस) अशी कसलीही प्रकाश-योजना असे सर्व प्रकार प्रसंगी खिशाला खार लावून केलेले आहेत. आता दमलो.

नको ते सव्यापसव्य. एकदा 'अ डिसॅप्पिअरिंग नंबर' नावाचं श्रीनिवास रामानुजन आणि जी.एच. हार्डी यांच्यावरचं नाटक बघितलं आणि आपण कुठे आहोत त्याची जाणीव झाली. पुरे झाले आता हे नाटक करण्याचं माझं नाटक. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0