Skip to main content

राहुल गांधींविषयी 'इकॉनॉमिस्ट'

'इकॉनॉमिस्ट' ह्या प्रतिष्ठित नियतकालिकानं राहुल गांधींविषयीच्या एका चरित्राचा आधार घेऊन ह्या युवराजाची राजकीय समज आणि एकूण बुद्धिमत्ता यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. WHAT is the point of Rahul Gandhi? हे लेखाचं पहिलं वाक्यच अतिशय बोलकं आहे. देशाचं काय करायचं याविषयी राहुलला काही म्हणता येत नाही कारण त्याला देशाच्या वास्तवाची जाण नाही; स्वत:पाशी काही दृष्टी नाही; आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचं राजकीय संधिसाधू शहाणपणसुद्धा नाही असे अनेक शेरे हा लेख मारतो. नेहरू घराण्याच्या करिश्म्यावर विसंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत हे काँग्रेसनं लवकर लक्षात घेतलं पाहिजे असंही लेखात म्हटलेलं आहे.

चरित्र : डीकोडिंग राहुल गांधी - आरती रामचंद्रन
लेखाचा दुवा - http://www.economist.com/blogs/banyan/2012/09/indias-gandhi-family

नितिन थत्ते Sat, 15/09/2012 - 23:20

ओक्के.

लेख वाचला. राहुल गांधींविषयी जे काही लिहिले आहे (राजकीय जाण नाही. बाकीही काही नाही) ते सत्यच आहे. आता प्रश्न हा आहे की तरीही त्या कुटुंबाची भारतीय राजकारणातली भूमिका कोणती?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदावरील नियुक्तीपर्यंत मागे जावे लागेल.

नेहरूंनंतर कोण या प्रश्नाची सोडवणूक नेहरूंनी आपल्या कार्यकाळातच केली होती. कामराज यांनी वृद्धांच्या निवृत्तीची योजना आणून बर्‍याच वृद्ध नेत्यांना पक्षकार्यात गुंतवले. तरीही नेहरूंनी काँग्रेस पक्षाची खास परवानगी घेऊन शास्त्रींना 'मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ' म्हणून मंत्रीमंडळात घेतले. नेहरूंच्या शेवटच्या काळात (आजारी असताना) शास्त्री डी-फॅक्टो पंतप्रधान होते. (संदर्भ- इंडिया आफ्टर गांधी: रामचंद्र गुहा) त्यामुळे नेहरूंनंतर लगेच नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला नाही.

शास्त्रींच्या अकाली निधनानंतर तो उभा राहिला. तेव्हा काँग्रेसमध्ये बरेच दिग्गज नेते होते. आणि त्यांच्यात संघर्ष अटळ झाला असता. त्याचवेळी काँग्रेसमधील नेत्यांनी एक अँकरपॉइंट म्हणून इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवले. त्या विठोबाची स्थापना करून बडवे कारभार करणार अशी ती योजना होती. [इंदिरा गांधींनी विठोबाचा रोल झुगारून दिला ही नंतरची गोष्ट. पण कल्पना विठोबा बनवण्याचीच होती).

पुढे इंदिरा गांधींच्या निधनानंतर परत हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि इतर मोठे नेते यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती. प्रणव मुखर्जींनी दावासुद्धा सांगितला होता असे ऐकले आहे. पुन्हा राजीव गांधी यांना पंतप्रधान करून हा संघर्ष टाळला गेला. राजीव गांधींनी विठोबाची भूमिका बरीचशी निभावली. अर्थात आधुनिकीकरणाचे वारे आणण्याचे काम त्यांनी काही प्रमाणात केले. त्यांच्या (खूपच लवकर झालेल्या) मृत्यूनंतर त्यांची जागा घेण्यासाठी लगेच कोणी विठोबा उपलब्ध नव्हता. राहुल प्रियांका खूप लहान होते. आणि सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या. त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांनी पाचवर्षे राज्य केले; मनमोहन सिंग यांच्याकरवी उदारीकरण आणले वगैरे सर्व घडले तरी काँग्रेस पक्षाची पीछेहाट मात्र चालूच राहिली. पक्षातले नेते पक्ष सोडून जाऊ लागले. काहींनी स्वतःचे पक्ष स्थापले, काहींनी तर भाजपमध्येही प्रवेश केला.

९९ मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणूकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. पण पुढे एक घडले की काँग्रेस पक्षाची फाटाफूट थांबली. आणि २००४ च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेस सोडून गेलेले बरेचसे नेते परत आले. २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे (सोनिया गांधींनी काँग्रेसला मते मिळवून दिली असा अर्थ नाही).

२००४ निवडणुकांनंतर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत याचे कारण आपली पक्षातली भूमिका विठोबाची आहे हे त्यांना समजले होते. आणि ते राहुललाही बहुधा ठाऊक आहे. पंतप्रधान होऊन देश चालवण्याची ताकद नाही हेही सोनिया गांधींना बहुधा कळत असावे.

आता एवढे सगळे लिहिल्यावर कोणाच्या मनात विचार येईल की असल्या विठोबाची गरज काय? त्याचे उत्तर "बडव्यांची भांडणे टाळण्यासाठी". विठोबा ठेवण्यात राजकीय शहाणपण आहे. (जे आज भाजपमध्ये नाही आणि पूर्वी समाजवादी नावाने असलेल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांत कधीच नव्हते).

नेहरू कुटुंबातल्या व्यक्तींनी देश खरोखर चालवावा अशी काँग्रेसमधल्या नेत्यांची कधीही (अगदी इंदिरा गांधींकडूनही) अपेक्षा नव्हती.

देशात दोन (ठळक) राजकीय स्पेसेस आहेत. एक पुराणमतवादी स्पेस भाजपने व्यापलेली आहे. दुसरी लिबरल स्पेस सध्या बरीचशी काँग्रेसने व्यापली आहे. ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी. आणि त्यासाठी विठोबा हवा.

इकॉनॉमिस्ट मधील लेख लिहिणार्‍यांनी हा विचार केला आहे का हे ठाऊक नाही.

श्रावण मोडक Sat, 15/09/2012 - 23:42

In reply to by नितिन थत्ते

इकॉनॉमिस्ट मधील लेख लिहिणार्‍यांनी हा विचार केला आहे का हे ठाऊक नाही.

वाटत नाही. ते लेखन एकूण मला फेसबुकी लेखन वाटतं.
बहुदा पंचाईत अशी आहे की, गांधींकडून या अशा लेखकांनी काही ठोकताळे म्हणावेत अशा अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि त्या पूर्ण होत नाहीत असं दिसलं की टीका सुरू होते.

लॉरी टांगटूंगकर Sun, 16/09/2012 - 00:33

In reply to by नितिन थत्ते

ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी.+१११

तिरशिंगराव Sun, 16/09/2012 - 14:25

In reply to by नितिन थत्ते

थत्ते यांनी काँग्रेसबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट मांडली, ते फार चांगले केले. इतके मुद्देसुद व विस्तृत विवेचन वाचल्यावर, त्यांचा काँग्रेसबद्दल एक ठराविक स्टँड का असतो, ते समजले. भाजपने गेल्या काही वर्षांत अत्यंत बेजबाबदारपणे वागून आपली प्रतिमा धुळीला मिळवली आहेच. त्या पार्श्वभूमीवर थत्ते यांचे म्हणणे पटू लागले आहे. आता ही दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याने आम्हाला इतर पक्षातलेही सर्व विठोबा स्पष्ट दिसू लागले आहेत. हिरव्यागार रानांची अपेक्षा सोडून आता 'वाळवंटातील डावाचीच' आम्हाला संवय करुन घेतली पाहिजे. (निदान दुसरा योग्य पक्ष क्षितिजावर दिसेपर्यंत)

क्रेमर Mon, 17/09/2012 - 20:27

In reply to by नितिन थत्ते

विठ्ठल निरुपण रोचक आहे. काँग्रेस सोडून दुसरा कुठलाच पर्याय लिबरल लोकांपाशी नाही या मताशी सहमतच आहे. बडवे, विठोबा वगैरे गोष्टी भारतीय लोकशाहीला आवश्यक आहेत हे समजा खरे आहे असे मानले तरी एखादा गांधीच विठोबा व्हायला हवा या अपरिहार्यतेबद्दल फारसे मार्गदर्शन प्रतिसादात आढळले नाही.

नितिन थत्ते Mon, 17/09/2012 - 21:07

In reply to by क्रेमर

>>बडवे, विठोबा वगैरे गोष्टी भारतीय लोकशाहीला आवश्यक आहेत हे समजा खरे आहे असे मानले

विठोबा असणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे असे नाही. लिबरल पर्याय हवा. विठोबाशिवाय तो मिळाला तर लोकशाहीसाठी चांगलेच आहे. आम्हाला आवडेल.

>>खादा गांधीच विठोबा व्हायला हवा या अपरिहार्यतेबद्दल

अशी अपरिहार्यता नसणार. सध्या ममोसिंग नावाचा एक अ‍ॅडिशनल विठोबा आहे असे वाटते. पण गांधी नावाचा विठोबा (विठोबा म्हणून) अधिक यशस्वी होतो असे दिसते.

मी Sat, 15/09/2012 - 23:33

सद्य परिस्थितील मासिकांचे राजकीय विश्लेषण वाचता (उदा. मनमोहन सिंग- अंडरअचिव्हर, ट्रॅजिक फिगर, ओबामा - अंडर अचिव्हर) त्यांच्या खरेपणाबद्दल शंका घेण्यास बराच वाव दिसतो, अर्थात राहूल गांधींबद्दलचे मत योग्य किंवा अयोग्य असेलही पण त्यामागचा उद्देश राजकीयच असण्याची शक्यता अधिक, लेखात व्यक्त केलेल्या अनेक बाबी राहूल गांधींच्या सामाजिक प्रतिमेशी मिळते-जुळत्याच आहेत असे दिसते.

मन Sun, 16/09/2012 - 11:01

आमच्यासारख्या जनसामान्य भारतीयांसाठी राहुल गांधी दखलपात्र आहेत /आहे का?
राहुल गांधी असतील्/असला तरी आउअटलुक दखलपात्र आहे का?
भाजप ही दुसरी कॉग्रेस वाटत नाही का?(म्हंजे की काँग्रेस जाउन भाजपवाले आले तर भारताचे लागलिच सुवर्णयुग वगैरे अवतरणार असल्या दिव्य फेसबुकी संदेशांवर पब्लिकचा भरवसा आहे का.)
.
तरीही खालच्या प्रतिसादातील . २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे (सोनिया गांधींनी काँग्रेसला मते मिळवून दिली असा अर्थ नाही). खूपच हायक्ल्लास वाटलं. अगदि गांधी भक्तांसाठी आणि विरोधकांसाठीही. सूपर्ब.
.
प्रत्येक बातमीबद्दल आणि प्रत्येकानी प्रत्येकावर मारलेल्या शेर्‍याबद्दल धागा काढावा का?

रमाबाई कुरसुंदीकर Sun, 16/09/2012 - 15:53

नितिनचा प्रतिसाद चांगला आहे. माझ्यामते जनसंघवाल्यांना वाजपेयींना मुखवटा घालून विठोबा बनवायचा होता.तसे अडवाणी,जोशीह्यांनी बडव्यांची भूमिका पार पाडली १९९८- ते २००४ काळात म्हणा.
मला हा राहूल गांधी राम तेरी गंगा मैलीमधल्या राज कपूरच्या मुलासारखा दिसतो हुबेहुब.

ॲमी Sun, 16/09/2012 - 18:27

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

:-) राजीव कपूर पेक्षा चांगला दिसतो राहुल गांधी...
बाकी मत मिळवणारे लोकं परत काँग्रेस मधे आणणं पण एका दृष्टीने करिष्माच की...

नितिन थत्ते Sun, 16/09/2012 - 19:43

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

वाजपेयी मुखवटा आहेत (पक्षी- विठोबा आहेत) हे तर गोविंदाचार्यांनीच सांगितले होते की....

तेजा Mon, 17/09/2012 - 18:22

आपल्याच दैवतांचा आपण कसा अपमान करतो हे अनिल थत्ते यांनी विठोबा या शब्दाला विकृत करून दाखवून दिले आहे. हे वाईट आहे. अशा सवंग गोष्टींपासून आपण दूर राहायला हवे, असे मला वाटते. माझी अ‍ॅडमीनला विनंती आहे की, त्यांनी थत्ते यांचा प्रतिसाद उडवुन टाकावा. हा प्रतिसाद ‘बॅड टेस्ट'च्या कक्षेत मोडतो.

कोणती प्रतिके वापरून काय सांगण्याचा प्रयत्न होतो आहे हे आपणास आकळले नाही असे वाटते.
तेजा महोदय, चष्मा बदलून पुनः एकदा वाचून पहा, ही विनंती.

बिटकॉइनजी बाळा Thu, 16/05/2024 - 03:42

पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.

आज राहुल बद्दल काय वाटते लोकांना. अनेकांना मी राहुलचा फॅन झालेला पाहिले आहे.

विठोबा थेयरी अजून आहे का राहुल राजकारणच बदलून टाकायला निघाला आहे?

नितिन थत्ते Thu, 16/05/2024 - 11:42

In reply to by बिटकॉइनजी बाळा

इतक्या वर्षानंतर मोदीही (राजकीय बुद्धी सोडल्यास) बुद्धीने पप्पूच आहेत हे लक्षात आले असेल. त्यांचाही मुख्य रोल अदानी-अंबानी आणि इतर भांडवलदार उद्योजकांचा विठोबा हाच आहे.

राहुल गांधीही दुनिया बदलून वगैरे काही टाकणार नाहीये. पण धार्मिक उन्माद कमी होईल असे वाटू शकेल. पण पराभूत झाले तर जखमी "शेर" अधिक चेवाने धार्मिक खेळ खेळतील अशीही शक्यता आहे.

पुंबा Thu, 16/05/2024 - 22:06

In reply to by बिटकॉइनजी बाळा

राहूल आणि प्रियंका दोघेही चांगल्या मनाच्या व्यक्ति आहेत. खुनशी, क्रूर आणि सत्तेसाठी हपापलेले नाहीत हे नक्की.
राहुल खुपच प्रगल्भ झाला आहे हे नक्की पण तरीही राजकारणात सातत्य हवे. मोदीला हरवण्यासाठी खुप दीर्घ संघर्ष करावा लागणार आहे. अगदी मोदी २४ ला हरला तरीही मोदीत्व दीर्घकाळ राहणार आहे.

'न'वी बाजू Fri, 17/05/2024 - 23:54

In reply to by पुंबा

राहुल खुपच प्रगल्भ झाला आहे हे नक्की

यंदा मीसुद्धा विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घ्यावा, म्हणतो. कोणास ठाऊक, कदाचित जिंकूनही जाईन!

(नाही, म्हणजे, मोदींबद्दल यत्किंचितही प्रेम नाही, परंतु... म्हणून काहीही?)

अगदी मोदी २४ ला हरला तरीही मोदीत्व दीर्घकाळ राहणार आहे.

हं, हे मात्र बरोबर वाटते. (तसेही, आमच्या ट्रंपतात्यांप्रमाणेच, मोदी हे cause नसून symptom आहेत. त्यामुळे...)

अबापट Sat, 18/05/2024 - 05:21

In reply to by 'न'वी बाजू

न बा, अजून तुम्ही राहुल गांधी या माणसाकडे आयटी सेलने यशस्वी पद्धतीने उभ्या केलेल्या पप्पू या इमेजदृष्टीने तर बघत नाही ना?
प्रगल्भ वगैरे जाऊ दे. तो काही कुणी तत्त्ववेत्ता,विचारवंत वगैरे नाही.
पण शाळा कॉलेजात गेलेला, थोडीफार जाण असंलेला एक नॉर्मल माणूस असावा असं त्याच्या (आयटीसेलने एडिट न केलेल्या) बहुतांश वक्तव्य, भाषणे यातून वाटते. निवडणूक वगैरे तो काही जिंकणार नाहीये नक्की.
सामान्य ममव भक्तवर्ग त्याला सिरियसली घेत नसला, तरी त्याच्या विरुद्ध उभे असणारे गृहस्थ मात्र त्याला नक्की सिरियसली घेत असावेत. हे 2019 पेक्षा वेगळे आहे.
त्याची भाषणे, त्याचा मॅनिफेस्टो वगैरे विषयी खोट्या माहित्या दर भाषणात देऊन (त्यांचा हातखंडा प्रयोग म्हणजे) भीती आणि तेढ पसरवत आहेत. अक्षरशः रोज त्याला रिऍक्ट होत आहेत.
तेवढं विश्वसुंदरी स्पर्धेत वगैरे मात्र भाग घेऊ नये कृपया.

आता तुमची पन्नाशी ओलांडून कैक वर्षे झाली. तिकडे घेत नाहीत म्हणे तरुण नसलेल्या स्पर्धकांना.
चिल !!

'न'वी बाजू Sat, 18/05/2024 - 23:39

In reply to by अबापट

न बा, अजून तुम्ही राहुल गांधी या माणसाकडे आयटी सेलने यशस्वी पद्धतीने उभ्या केलेल्या पप्पू या इमेजदृष्टीने तर बघत नाही ना?

नाही ब्वॉ. तसली घाण (पक्षी: आयटी सेलचा प्रचार) मी नाही ऐकत/पाहात.

(आणि, दुसरी गोष्ट. मला तो पप्पू नाही वाटत. (किंबहुना, कधीच नाही वाटला.) मात्र, क्लूलेस वाटतो. फरक आहे.)

प्रगल्भ वगैरे जाऊ दे. तो काही कुणी तत्त्ववेत्ता,विचारवंत वगैरे नाही.
पण शाळा कॉलेजात गेलेला, थोडीफार जाण असंलेला एक नॉर्मल माणूस असावा असं त्याच्या (आयटीसेलने एडिट न केलेल्या) बहुतांश वक्तव्य, भाषणे यातून वाटते. निवडणूक वगैरे तो काही जिंकणार नाहीये नक्की.

निवडणूक जर जिंकणार नसेल, तर मग उभा नक्की कशासाठी राहातोय? वेळ जात नाही म्हणून? आज गरज कशाची आहे? मोदींना (आणि एकंदरीतच भाजपला) हरवू शकेल (पर्यायाने, स्वतः जिंकू शकेल) अशा नेतृत्वाची. नाही काय?

स्वतः जिंकू शकत नसेल, तर बाजूला व्हावे, नि जे कोणी जिंकू शकतील अशांना पुढे आणावे, नि अशांच्या हाती सूत्रे द्यावीत. राहुल गांधी महत्त्वाचा, की पक्ष निवडून येणे महत्त्वाचे? (आणि, पक्ष जर हरणार असेल, तर म्हणजे मग मोदी/भाजपच निवडून येणार, नाही काय? कारण, सद्यपरिस्थितीत दुसरे कोण आहे? मग अशा परिस्थितीत, स्वतः जिंकायचे नसेल नि मोदींना/भाजपलाच जर निवडून आणायचे असेल, तर मग निवडणुका लढवायच्या तरी कशासाठी?)

आणि, माणूस भले नॉर्मल असेल, शिकलेला असेल, नि स्वच्छ प्रतिमासुद्धा असेल. (फार कशाला, अगदी प्रत्यक्षात स्वच्छसुद्धा असेल.) पण निवडून जर येणार नसेल, तर स्वच्छ प्रतिमा काय चाटायची आहे?

(आणि, स्वच्छ प्रतिमा हे राजकारणातल्या अननुभवाचे/फारसे यश न मिळाल्याचे द्योतक असावे काय? फार कशाला, भाजप/पूर्वाश्रमीचा जनसंघसुद्धा, १९७०-८०च्या दशकांपर्यंत, जोवर निवडणुकांतून बऱ्यापैकी भरघोस यश (१९७७मध्ये जनता पक्षाचा भाग म्हणून मिळाले तो अपवाद वगळता) वगैरे मिळत नव्हते, तोवर त्यांची प्रतिमासुद्धा, (निदान काही गोटांतून तरी) भले उजवे असले तरी स्वच्छ, principled, disciplined लोक वगैरे अशीच होती, विसरलात काय? मग पुढे ऑफऑलदपीपल शिवसेनेशी (‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर) युती वगैरे काय केलेनीत्, रथयात्रा काय काढल्यानीत्, नंतर मग कोठे हळूहळू निवडून येऊ लागले.)

तेव्हा, मनुष्य राजकारणात आहे, म्हटल्यावर थोडीफार घाण ही असायचीच. आपल्याला अर्थात अत्यंत गलिच्छ राजकारणी नकोत, हे ठीकच आहे, परंतु… ‘स्वच्छ प्रतिमा’वाला राजकारणी काय कामाचा? (जिंकून) काम करू शकणारा राजकारणी पाहिजे, नव्हे काय?

नाही, राहुल गांधी हा अत्यंत निरागस मनुष्य असेलही. व्यक्तिशः त्याच्याविरुद्ध मला काहीच म्हणायचे नाही. पण काँग्रेस निवडून येणे जर गरजेचे असेल, तर मग निरागस मनुष्यापेक्षा तेथे निर्ढावलेला (हा शब्द वाईट आहे, परंतु तरीही), अनुभवी, मुरब्बी, आणि मुख्य म्हणजे killer instinctवाला राजकारणी पाहिजे, नाही का?

अशी कोणतीच लक्षणे मला राहुल गांधीत (तूर्तास तरी) दिसत नाहीत!

(स्वतः किंवा) काँग्रेस पक्ष निवडून येणे ही राहुल गांधीची वैयक्तिक निकड नसेलही कदाचित. परंतु, काँग्रेस पक्षाची (आणि, कोणास ठाऊक, कदाचित देशाचीसुद्धा) ती निकड असावयास नको काय?

(माफ करा, परंतु राजकारणातली माझी समज वरवरचीच आहे, तेव्हा, कमीजास्त बोललो असेन नक्कीच, ते पोटात घालून सोडून द्या. परंतु, मला जे काही वाटले, ते मांडले.)

(आणि, पप्पू नसेलही कदाचित. किंबहुना, I daresay तो पप्पू नाहीच. मात्र, What exactly has he to offer to the electorate that they must elect him and his party (instead of the the incumbents) for? एवढेच विचारू इच्छितो.)

तेवढं विश्वसुंदरी स्पर्धेत वगैरे मात्र भाग घेऊ नये कृपया.
आता तुमची पन्नाशी ओलांडून कैक वर्षे झाली. तिकडे घेत नाहीत म्हणे तरुण नसलेल्या स्पर्धकांना.

:D हॅहॅहॅ तोच तर पाँइंट होता. बोले तो, राहुल गांधी जर निवडून येणार असेल, तर मी विश्वसुंदरी का बरे होऊ शकत नाही? कोणास ठाऊक, होईनही कदाचित!

अबापट Sun, 19/05/2024 - 11:11

In reply to by 'न'वी बाजू

अहो न बा ,
राहुल गांधी जिंकायला उभा आहे.( मी त्याच्या इंडिया आघाडीबद्दल बोलत आहे)
तो हारेल असे तो म्हणत नसून मी म्हणत आहे.
तो जिथे उमेदवार म्हणून उभा आहे तिथे तो निवडून येऊन खासदार होईल गेल्या वेळसारखा.
परंतु सत्तापालट यावेळी होणार नाही असे तुम्हाला सांगणे होते.
असो.

Rajesh188 Thu, 16/05/2024 - 20:04

रिॲलिटी कडे दुर्लक्ष करू नका.निवडणूक लढून जिंकणे हे वेगळे क्षेत्र आहे आणि सरकार चालवणे हे वेगळे क्षेत्र आहे.

त्या मुळे सर्व पक्षात दोन विभाग असेलच पाहिजेत.
सोनियाजी नी प्रचार केला आणि मनमोहन सिंग ह्यांनी सरकार चालवले हे अगदी योग्य होते.

ब्जप हिंदू हिंदू करून मत मिळवते ते निवडणूक जिंकण्यासाठी योग्य च आहे पण bjp चे सरकार येते तेव्हा जो कोणी सरकार प्रमुख असतो तो घटणे प्रमाणेच सरकार चालवतो .
हिंदू ना काही फ्री रेल्वे,बस,रशन पेट्रोल,नसते.
Gst, टोल, सर्व भरावे लागते.

हिंदू ना सर्व करातून ,कायद्यातून सूट दिली तर आक्षेप घेता येईल.

राहुल जी उत्तम जाणकार आहेत त्यांना राजकारण पासून,अर्थकारण,विदेश निती पण अगदी उत्तम रित्या समजते

मार्मिक गोडसे Thu, 16/05/2024 - 22:38

In reply to by Rajesh188

२०१४ नंतर ठरावीक हिंदूंना बलात्कार, विनयभंगसारखे गुन्हे माफ आहेत. खासकरून उजव्यांना. भले ते उजव्या विचारांचे असले तरी असे गुन्हे करताना ते सेक्युलर असतात.

Rajesh188 Thu, 16/05/2024 - 20:36

अजून पण भारतीय जनता ( जगात काय स्थिती आहे माहीत नाही)
स्व बुद्धी नी विचार करून मतदान करण्या इतकी प्रगल्भ झाली नाही पुढे होईल असे पण वाटत नाही.

स्वच्छ प्रशासन, धर्म जात विरहित समज व्यवस्था, स्वच्छ चरित्र चे उमेदवार एकाध्या राजकीय पक्षांनी दिले आणि तसे आश्वासन पण दिले तरी त्यांचा एक पण उमेदवार भारतीय जनता निवडून देणार नाही.
अन् जात,धर्म ह्या वर आधारित प्रचार केला तसेच उमेदवार दिले, निवडणुकीत पैसे वाटले तर मात्र तो पक्ष भारतीय जनता निवडून देईल .

राजकीय पक्षांना आवडत नसले तरी निवडून येण्यासाठी तोच मार्ग निवडावा लागतो..त्यांची majburi आहे.
राहुलजी उगाच स्वच्छ तेच्या मागे लागतात म्हणून ते राजकारण मधील पप्पू आहेत .
बाकी काही नाही.