पेठा
समस्त जालीय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना दीपोत्सवाच्या गोड गोड शुभेच्छा.
गोडाचं नाव निघालच आहे तर एखादी मिठाई होउन जाऊदे का?
एकदा लहान असताना मी चुकून खडीसाखरेचा मोठा खडा समजून हा आग्र्याचा पेठा उचलला होता. त्याचा पहिला चावा घेताच तो तोंडात असा काही विरघळला की यंव रे यंव. पेठ्याशी जुळलेलं पहिल्या नजरेतलं हे प्रेम आजही तस्संच टिकून आहे. भौगोलिक कारणांमुळे हे पहिलं प्रेम माझ्यासाठी हल्ली दुर्मिळ झालंय.
थोडी शोधाशोध केल्यावर कळल की घरच्या घरी पेठा बनवणं इतकं सोप्पं आहे की माझ्याने रहावेना. चला तर मग लागू या तयारीला.
साहित्य :
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर.
कृती :
कोहळं सोलून आतल्या बिया आणि स्पंजी भाग काढून टाकावा आणि एक ते दीड इंचाचे तुकडे करून घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपिकने सर्व बाजूंनी टोचे मारून घ्यावे.
चुना पाण्यात मिसळून त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे.
कपभर पाण्यात तुरटीही विरघळून घ्यावी.
दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवून घ्यावे.
एका भांड्यात भरपूर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शिजत ठेवावे.
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढून बाजूला ठेवावे.
एका भांड्यात मंद आचेवर साखर भिजेल इतपत पाणी टाकून उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.
मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल) तयात होऊ लागतील. आच थोडी मंदावून अजून थोडावेळ परतत रहावं.
एखाद्या ताटात हे तुकडे काढून वरून जाळी ठेवून किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे. (झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. )
पूर्णपणे थंड झाल्यावर वाटल्यास वरून गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे.
दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तयार असेल. हे असं.
पुनश्च एकदा दिवाळीच्या मंगल शुभेच्छा!
प्रतिक्रिया
भारीये
भारीये
.
ओहो! हा पदार्थ घरी बनवता येत
ओहो!
हा पदार्थ घरी बनवता येत असेल असा विचारच केला नव्हता.
कृतीसाठी वेळ बराच लागत असला तरी सोपी 'दिसतेय'
करून बघायचा मोह होतोय!
बाकी कोहळ्याला अॅशगार्ड म्हणतात ही सुद्धा माझ्यासाठी नवी माहिती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फस्क्लास एक्दम! भोपळा, पपई,
फस्क्लास एक्दम!
भोपळा, पपई, दुधी आणि तत्सम कुठल्याही फळाचा करता येईल काय रे?
धन्यवाद जाई, ऋ,
धन्यवाद जाई, ऋ, मंदार.

पेठ्यासाठी कोहळ्याला पर्याय असा विचारही मनाला शिवला नाही.
कोहळ्याला हिंदीत 'पेठे का फल' असच नाव आहे.
कोहळं उपलब्धच नसल्यास अर्धवट कच्चा भोपळा, पपई वा दुधी चालुन जावा. पण फार शिजवू नये अन्यथा पार गळुन गेले की मग मज्जा नाही यायची. पेठा खाताना एक प्रकारचा करकरीत पणा असतो तो टिकुन रहायला हवा.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा
सुरेख !
बाजारचा पेठा कधी खावासा वाटला नाही.
हा मात्र तोंपासु दिसतोय. वेळ मिळताच नक्की करणार.
छानच, पाकृ. आवडली.
छानच, पाकृ. आवडली.
माझी आई कोहाळ्याच्या वडया करायची, त्याही खूपश्या पेठ्यासारख्याच लागायच्या पण तुलनेने झटपट व्हायच्या. (एके वर्षी आमच्या परसात कोहाळ्याचा वेल आला होता, त्याला इतके कोहाळे लागले होते की आमच्या घरीच नव्हे तर आख्या गल्लीत प्रत्येकाकडे प्रतिदिवशी कोहाळ्याचे वेगवेगळे पदार्थ केले जायचे त्याची आठवण झाली.)
९५ सालचं भारतातून दिसलेलं,
९५ सालचं भारतातून दिसलेलं, दिवाळीतलं खग्रास सूर्यग्रहण उत्तर भारतातून पाहिलं होतं. तेव्हा तिथे चिक्कार पेठा चरला. तेव्हापासून पेठ्याचा कंटाळाच आला. या दिवाळीत पाकृ वाचून पुन्हा पेठा खाण्याची इच्छा झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दिवाळीची दणदणीत पाककृती
पेठा आवडतो मला. आता तर घरी सुद्धा करु शकतो म्हणजे चंगळच.
मस्त रे गणपा. दिवाळीची एक दणदणीत पाककृती दिलीस