माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः)

माझे बी.जे. मधे "अ‍ॅडमिट" होणे.

तर कालांतराने जुलैच्या सुरुवातीला बीजे ची लिस्ट लागली, तोपर्यंत मी सराईत मच्छीमार झालेलो होतो. म्हणजे गळ(फॉर्म) टाकून अगदी कॉन्फिडन्टली आराम करणे अन सुटी एंजॉय करणे हे करत होतो. बाळासाहेबांनी जाऊन यादी पाहीली. यादीत मी ४३व्या नं वर होतो. (बीजे ला २०० जागा आहेत) म्हणजे अ‍ॅडमिशन पक्की होती. इंजिनियरिंगचीही लिस्ट त्याच वेळेला लागलेली होती. मला सिव्हिल किंवा मेक ब्रँच मिळत होती. आमच्याच वर्गातले दोन्ही टॉपर्स तिकडे नवीनच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचच्या लिस्टवर पहिले दुसरे होते. मला सिव्हिल/मेक इंजी. करायचं नसल्याने मी 'बीजे'लाच जाणार हे ठरलेलं होतं.

'You are selected for MBBS course. Attend interview on... " अशी तार घरी आली. (हो. 'तार'. त्याकाळी पोस्टातून तार येत असे. टेलेग्राम. कुणी मेलं, की नातेवाईकांना तार करायची पद्धत होती. बर्‍याच ठिकाणी नुस्ता पोस्टमन गल्लीत येऊन तारss असं ओरडला, तर त्याचा रोख असलेल्या ३-४ घरांतल्या बाया बापड्या अ‍ॅडव्हान्समधे रडायला सुरुवात करत. फोन पण बाहेरगावी ट्रंक कॉल करून लावावे लागत. पीपी कॉल नावाचा एक प्रकार होता.) त्यानुसार इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळी १० वाजता मी कागदे आणि पत्रे घेऊन बैजीवैमपु मधे दाखल झालो.

बिल्डिंग तुम्हाला आठवत असेलच. जाम इंप्रेसिव्ह आहे. ४ मजली असली, तरी एकेक मजला आजच्या २ मजली उंच आहे. १८ फूट.
तर कॉलेजात एन्ट्री केली, की समोरच फॉयरमधे दिसतो तो बैरामजींचा पुतळा.
सर बैरमजी जीजीभॉय
त्याच्या मागे एक मोठ्ठी स्टेअरकेस आहे. या स्टेअरकेसच्या खाली एका लायनीत हिरव्या काचेचे खडूफळे लावलेले आहेत. त्यावर काय वाट्टेल ते लिहीलं जाऊ शकतं. इथे फोटो मधे बॅकग्राऊंडला दिसतंय ते गणेशोत्सवाची पूर्वतयारी. तिथे नेहेमीच हँडमेड पोस्टर्स लावली जात अन जातात. स्टेअरकेसच्या दोन्ही बाजूंनी पाठीमागे जायला दोन छोटे पॅसेजेस आहेत, जे एम्जीए मधे उघडतात. म्हणजे एम.जी. ऑडिटोरियममधे (महात्मा गांधी ऑडिटोरियम. याची रचना जुन्या विधानसभेसारखी आहे. सिंहासन सिनेमात हाच हॉल विधानसभा म्हणून दाखवला आहे. प्रेमाने सगळे याला "एम्जीए" म्हणतात.) डाव्या पॅसेजच्या तोंडाशीच डीन ऑफिस आहे. अन इथून आतलाच एम्जीएचा दरवाजा नेहेमी वापरात असतो.

हे आहे महात्मा गांधी सभागृह: (हॉगवॉर्ट्स चा ग्रेट हॉल आहे ना? तसं.)
MGA yetay ka

उजव्या अन डाव्या बाजूला समोरचे कॉरिडॉर आहेत. डावीकडे गेलं की ग्राऊंड फ्लोअरला संपूर्ण आस्थापना विभाग व को-ऑप स्टोअर. (हो. त्या काळी तिथे होतं. अन खूप छोटं होतं.) तिथून पुढे पीएसेम डिपार्ट्मेंट अन लायब्ररी. हे #$#%चं पीएसेम डिपार्टमेंट फर्स्ट इयरपासून अगदी इंटर्नशिप संपेपर्यंत बोकांडी बसलेलं असतं. बीजेचे हे एकमेव डिपार्टमेंट "तळघरात" आहे. (सुमारे २० वर्षांनंतर एका मित्राने सांगितलेले तत्वज्ञानः तळघरात हॉस्पिटल काढू नये. तळघरात फक्त २ नं चे 'धंदे' चालतात. ;)) पीएसेम वरचा सामान्य डॉक्टराचा राग अन योगायोग समजून घ्या...

उजवीकडे जाऊन पहिली लेडीज रूम, मग कँटीन. मग आर्ट्स सर्कलचं ऑफिस. (हो. तेच आर्ट्स सर्कल ज्याने डॉ. लागू, डॉ. मोहन आगाशे इ. प्रसवलेत.) मग टॉयलेट अन त्यासमोर जेन्ट्स कॉमन रूम. कोपर्‍यात बँक. (तिथे नंतर को-ऑप स्टोअर शिफ्ट झालं.) या पॅसेजमधे अन जी.सी. आर. मधे अनेक लाकडी लॉकर्स. रिकामा सापडला, अन कडी-कोंडा शाबूत असला, अन तुम्ही त्याला कुलुप लावलं की तो लॉकर तुमचा. दोन्ही कॉरिडॉर्स च्या टोकाशी छोटे जिने. तेपण टॉप फ्लोअर पर्यंत जाणारे.

फॉयरमधे डाव्या हाताला डीन ऑफिससमोरच्या नोटीसबोर्डावर लिस्ट लागलेली होती. नांव पाहून पुन्हा कन्फर्म केलं. मग एका गृहस्थांनी आत एम्जीए मधे जायला सांगितलं. तिथे सगळ्या इंटर्व्ह्यूएच्छुक पालक व बालकांना एकत्र बसवलेलं होतं. तिथून एकेक बालक बाजूलाच असलेल्या डीन्स चेंबरला जाऊन डीन साहेबांसमोर जाऊन 'मुलाखत' देऊन बाहेर येत होता. आल्यावर मग स्टेजवर ८-१० टेबलं टाकलेली, तिथे फी भरणे असा कार्यक्रम होता.

माझा नंबर लागल्यावर डीन ऑफिस मधे गेलो. वेटिंग रूम पासूनच संपूर्ण वुडन पॅनेलिंग. खाली सॉफ्ट कार्पेट. तिथे एका उघड्या दारातून दिसणारे "स्टेनो टू द डीन" साहेबांचे छोटे ऑफिस. त्यात दोन टायपिस्ट. एक शिपाई कायम डीन साहेबांच्या दाराशी उभा. स्पेशल युनिफॉर्म मधे असायचा. 'पट्टे वाला.' मुख्य ऑफिस भले मोठे. सुमारे २०-३० लोक बसू शकतील इतक्या खुर्च्या तिथे मांडलेल्या. मागे प्रचंड मोठा अँटीक लाकडी डेस्क. त्यावर हिरवे बेझ क्लॉथ, अन त्यावर काच. ३-४ फोन. त्याच्या मागे डीन सर स्वतः मोठ्ठ्या रिव्हॉल्व्हिंग चेअरवर बसलेले. डाव्या बाजूला १-२ असिस्टंट लोक सरांच्या हातात कागद द्यायला, एका छोट्या टेबल मागे.

मी फाईल असिस्टंटच्या हातात दिली. ती त्यांनी सरांना ट्रान्स्फर केली. सरांनी आमच्या ज्यु. कॉलेजचं नांव वाचलं. मग माझ्याकडे पाहून, 'हं! तू पण "त्या"च कॉलेजचा काय?' असे थोडे तुसडेपणे विचारले. मी 'हो सर' असे पुटपुटत मान डोलावली. पुढे काहीच न बोलता त्यांनी फाईल असिस्टंटच्या टेबलावर आपटली. असिस्टंटनी मानेनेच हे उचल असं खुणावलं. फाईल घेऊन मी बाहेर पडलो. झाला 'इंटरव्ह्यू'.

त्यांना माझ्या कॉलेजचं नांव वाचून राग का आला, हे त्यावेळी समजलं नाही. पण नंतर त्या मागची स्टोरी समजली, अन त्रासही सहन करावा लागला. झालं होतं असं, की पुण्याबाहेरचं आमचंच एक कॉलेज असं होतं, जिथून एकाच कॉलेजातले (वर्गातले. दुसरी तुकडी 'टेक्निकल'ची होती, त्या तुकडीतले का।ई, अन आमच्या तुकडीतले दोन्ही ग्रूपवाले १२-१५ विंजिनेरिंगलाही गेलेले.) २४ विद्यार्थी एकाच वेळी बीजेला अ‍ॅडमिशन मिळवणारे होते. त्या काळी आमच्या अक्ख्या जिल्ह्यात हेच सायन्स कॉलेज 'बरं' असल्याने, असे घडणे फारसे आश्चर्यकारक नव्हते. २७ ही पूर्ण जिल्हाची प्रवेशसंख्या होती. (३ विद्यार्थी इतर कॉलेजेसचे) २०० पैकी २७ म्हणजे सुमारे १४% फक्त. पण तरीही त्यावरून आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे जणू मास कॉपी करूनच पास झाले असावेत अशा नजरेने डीनसाहेब पहात होते. बहुधा कुणीतरी त्यांचे कान फुंकले असावेत.

असे ऐकून आहे, की आमच्या कॉलेजमधून आलेल्या प्रत्येकाच्या सर्व कागदपत्रांची पुनः छाननी करण्यात आली. अगदी उत्तरपत्रीकांची सुद्धा. त्यात सहाजिकच प्रत्येकाचे उत्तर वेगळे लिहिल्याचे दिसल्याने ह्या मुळातल्याच बिनबुडाच्या आरोपास आपोआप सुरुंग लागला. याचा डायरेक्ट त्रास काही व्हेग बातम्या कानावर आल्या, याव्यतिरिक्त काही झाला नाही, पण इनडायरेक्ट त्रास म्हणजे आमच्या बॅचवर, विशेषत: आमच्या ज्यु.कॉ.बॅचवर फारच जास्त रॅगिंग झाली, अन तिला थोडा गुपचुप पाठिंबा 'वरून' मिळत होता. हे अती झालं तेंव्हा पोलीस तक्रारीपर्यंत जाऊन भांडणे केली, पण ते प्रकरण नंतर रॅगिंगच्या गंमती सोबत सांगेन. हे सगळंच प्रकरण एकंदरीत हश-हश. अन यातल्या पहिल्या भागास माझ्याजवळतरी कागदोपत्री नो पुरावा.

बाहेर येऊन परत "एम्जीए"मधे स्टेजवरच्या फी भरण्याच्या लाईनीत उभा राहिलो.

पहिल्या टेबलावर कॉलेज फी. जी मला एन.टी.एस. स्कॉलर असल्याने माफ होती, नसली तरी बरीच नगण्य होती. कधीच भरली नसल्याने नक्की किती होते ते आठवत नाही. तर फक्त अ‍ॅडमिशन फी काहीतरी १५० रु. घेतलेले. मग होस्टेल फी. ६० रु. १ टर्म साठी. विचार करा: १० रुपये महिना. तेवढ्यात २४ तास गरम पाणी, लाईट, इ. सह रहाणे. मग बाकी चिल्लर 'सेमी-ऑफिशियल' फिया. त्यात जिमखाना फी, को-ऑप स्टोअर चा शेअर, लायब्ररी डिपॉझिट, अगदी गणपती फेस्टीवलची वर्गणी सुद्धा, इ.इ. सगळे मिळून ५-६०० मधे काम भागलं.

बाहेर येऊन वर टॉप फ्लोअरला अ‍ॅनाटॉमी विभागात जाऊन रोल नंबर व पुस्तकांची यादी घ्या व तिथेच नोटीस बोर्डावर टाईमटेबल आहे ते उतरवून घ्या असं सांगितलं गेलं. त्या प्रमाणे माझ्या जवळपास नंबर असलेला अभ्या अन मी, असे दोघे ती भव्य संगमरवरी स्टेअरकेस (याला जिना म्हणणे हा या वास्तूविशेषाचा अपमान आहे.) ४ मजले चढून वर अ‍ॅनाटॉमी विभागात गेलो. यापुढच्या आयुष्यात बीजे सोडेपर्यंत दररोज सुमारे ४-६ वेळा ४-५ मजले चढणे अन उतरणे हा व्यायाम सगळ्याच भावी डॉक्टरांच्या नशीबी येतो.

याच अ‍ॅनाटॉमी -शरीररचनाशास्त्र- विभागात 'मुडदे फाडले' जातात अशी बातमी तोपर्यंत आम्हाला लागलेली होती. म्हणून उत्सुकतेने इकडे तिकडे पहात होतो. पण तसलं काही दिसलं नाही. मोठ्ठा कॉरिडॉर, एका बाजूला बरेच बंद दरवाजे अन खिडक्या. अन त्यातच परत कॉरिडॉरमधेच टेबल टाकून रोल नं. देणारा 'हिटलर'. हे गृहस्थ विभागाचे खरंतर एक ज्येष्ठ कारकून होते. आमची हजेरी ठेवणं हे त्यांचं काम. सडपातळ. थोडे सॉल्ट पेपर(काळेपांढरे) असे केस. पांढरा शर्ट, पांढरी पँट. त्यांच्या पँटच्या खिशातून एक स्टीलची स्वस्तिकाची कीचेन कायम बाहेर लोंबत असायची, अन आम्ही हजेरी (खोटी) लावताना ते बर्‍याचदा आम्हाला "पकडून" झापायचे, म्हणून त्यांना हिटलर नांव पडलेलं. यांचं खरं नांव कधी काळी ठाऊक होतं, पण अत्ता ठार विसरलो आहे. रोलनंबर घ्यायला गेलो तेंव्हाही त्यांचं नांव/टोपणनांव सुद्धा ठाऊक नव्हतंच.

तिथे जाऊन लायनीत उभे राहून रोल नंबर घेतले. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह्ड बेसीसवर अभ्याला ५१ अन मला ५२ नंबर मिळाला. याचा सिग्निफिकन्स पुढे येईलच. नोटिसबोर्डावरून टाईमटेबल, पुस्तकांची यादी लिहून घेतलं. तिथून सांगितलं की खाली को-ऑप स्टोअरला जाऊन आयकार्ड विकत घ्या, त्याला फोटो लावून अमुक ठिकाणी जमा करा, अन घरी जा. हे सगळं करून आम्ही तरंगत तरंगत घरी निघालो. हो! डॉक्टर झालोच आहोत असं फीलींग आलेलं होतं ना! नंतरच्या ६ महिन्यात 'आम्ही ना, मेडिको आहोत' हे दाखविण्याचा आम्ही जितका आटापिटा केला, त्याच्या तिप्पट जास्त आटापिटा सिनियर झाल्यावर (म्हणजे पुढच्या बॅचने अ‍ॅडमिशन घेतल्यावर) आमच्याच वयाच्या नवोदित वासरू मेडिकोजना हे दाखविण्यापासून परावृत्त करण्याचा केला. कारण तोपर्यंत विमानं लँड होतात, अन हँगोव्हर, आय मीन हँगर मधे जायला लागतात.

त्या अ‍ॅडमिट होण्याच्या दिवसापासून डिस्चार्ज मिळे पर्यंत पुढे या आमच्या १२वी पास वय वर्षे १७ चिरंजीव अस्मादिकांवर आमच्या सहित वेगवेगळ्या कारागीरांनी कधी कुरवाळून, कधी थापट्या मारमारून, कधी भिंतीवर डोके तर कधी डोक्यावर भिंत आपटून, कधी फार फुगलेल्या फुग्याला पिन मारून, कधी फुगे फुगवून, मडकी पक्कीशी झाल्यावर प्रसंगी डोकी आपटून, कधी डोकं लढवून, मोठ्या कष्टाने, मजेने, काळजीपूर्वक, तर कधी उगाच गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून- आमचे रुपडे आकारास आणले. अन ते "डॉक्टर" म्हणून समाजावर मोकाट सोडले.

***
टीपः फोटू नेटावरून घेतले आहेत. माझे नाहीत. फोटू पेक्षा बैरामजींचा पुतळा प्रत्यक्षात भयंकर इम्प्रेसिव्ह दिसतो.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

field_vote: 
3.142855
Your rating: None Average: 3.1 (7 votes)

प्रतिक्रिया

मस्तच. बी जे मध्ये २०० मध्ये ४३ वी रँक म्हणजे, व्हेरी इम्प्रेसिव्ह!!!
मास कॉपी चं किटाळ वगैरे वर्णन आवडले. छान रंगतेय स्टोरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताच तिन्ही भाग वाचलेत.
कोणी समोर बसून सांगतंय, आणि आपण ते ऐकतोय असं वाटलं वाचताना.
पुढचा भाग येऊ देत लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आयला डॉक्टर, एन्टीएसपण! किती किती क्षीण प्रयत्न कराल आम्हाला इंप्रेस करण्याचा! Wink

असो. मजा येते आहे वाचायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो डिंग्या नॉट मारिंग हो. सहज आठवलं ते लिहीलं. १ टर्म ती स्कॉलरशिप घालवली पण होती मी. फार्मॅकॉलॉजी चा पेपर फेकून आलो होतो. नापास झालो मग एक टर्म स्कॉलरशिप गेलेली. तो किस्सा पुन्हा कधीतरी. अन या १२वी पर्यंतच्या हुशारीचा तिथे काडीचा उपयोग नसतो, हे पण पुढे सांगायचं आहे. अगदी जिल्ह्यात पहिले, बोर्डात वगैरे आलेले ७-७ अटेंप्ट पहिल्या वर्षाला घेतात असेही होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्त मस्त मस्त.
पुढच्या भागाची वाट पाहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मस्त
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आधीचे दोन भाग ९० च्या दशकातल्या प्रवेशपद्धतीवर वगैरे गेले आणि त्यातून गेलेलो असल्याने विशेष वाटलं नाही. या भागात मात्र कॉलेजच्या वर्णनाने पुढे येणार्‍या माझ्यासाठी अज्ञात असलेल्या जगाबद्दलच्या रंजक माहितीची पार्श्वभूमी तयार झालीय असं वाटतंय.
अनिल अवचटांच्या लेखांमधून बीजेतल्या वातावरणाची आणि संस्कृतीची थोडीफार झलक पाहायला मिळाली होती.
पुढच्या भागांमध्ये रंजक काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिन्ही भाग छान झालेत.

जबरी हुश्शार दिसताय की डॉक्टर, एन्टीएस काय, बीजेत ४३ नंबर काय सहीच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला याच अ‍ॅडमिशन प्रोसेसमधून गेलो आहे... बीजे मध्ये लिस्ट लागत असे... बीजेत पुष्कळ मित्रही होते... सर्व आठवणी आल्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय. लवकर येऊ द्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित फारसे कोणी नसल्याने बर्‍याच नव्या माहितीची अपेक्षा करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0