देऊळ

मला 'देऊळ' खूप आवडला.

मराठी सिनेमा म्हणजे असे काहीतरी ज्याला पदरचे पैसे खर्च करून जाणे हे आपले कर्तव्य असते; मग प्रत्यक्षात सिनेमा रंजन करणारा, विचार करायला लावणारा, अस्वस्थ करणारा असो वा नसो... अशी काहीतरी समजूत मराठी सिनेमाबद्दल दिसते. मराठी सिनेमांचे निर्मातेही 'लोक थेटरात येऊन पाहात नाहीत... सरकारने मदत करावी, मल्टिप्लेक्सवाल्यांनी शो लावावेत...' असले काहीतरी दीनवाणे बडबडत असतात.

या पार्श्वभूमीवर 'देऊळ'च्या मागे मात्र 'आपण एक झकास सिनेमा बनवू या - आपल्याला म्हणायचे आहे ते ठामपणे म्हणू या - मग ते गंभीर असो वा विनोदी, कुठल्याच प्रकाराला अस्पृश्य समजायचे काम नाही, लोकांना आवडले तर लोक पाहतील' असा काहीसा पक्का विचार जाणवला. स्टार कलाकारांना घेऊन आशय झाकोळेल वगैरे कचखाऊपणा नाही, गोष्टीच्या अनुषंगाने येणारे लैंगिक विनोद दाखवताना भित्रेपणा नाही (सहकुटुंब बघता येईलसे स्वच्छ मनोरंजन वगैरे हवे, म्हणून सपक दांभिक कौटुंबिकपणा इत्यादी), दत्तमंदिरासारख्या तथाकथित 'भावनाभडकाऊ' ठरू शकेलश्या (जो तसा ठरवला गेलाच) विषयाला हात घालताना ('दत्त दत्त' (दोन्ही), 'वेलकम हो राया', 'देवा तुला शोधू कुठं' या तिन्ही गाण्यांचे शब्द मुद्दामहून ऐकावेत) काचकूच नाही.

सिनेमा विचार करायला लावण्यासोबत आपले मनोरंजनही करतो आणि त्याबद्दल त्याला कुठेही शरमिंदे वाटत नाही, हे मला अतिशय महत्त्वाचे वाटले.

खेरीज नाना पाटेकर मला तरी 'भाऊ नाना पाटेकर' न वाटता भाऊच वाटला (पण हे सापेक्ष आहे हे मान्य आहे). सोनाली कुलकर्णीचे कामही निव्वळ खल्लास आहे. काहीशी सैल वागणारी, पुढारीपणात रस असलेली ती भोचक बाई सोनालीने कमालीची जिवंत केली आहे. तिची चाल, नेसणे - बोलणे सगळेच पाहण्यासारखे आहे. हेच सगळ्या लहान-सहान पात्रांचे. आतिषा नाईक, शशांक शेंडे, किशोर कदम, शर्वाणी पिल्लई, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष... ही नावे तरी प्रसिद्ध आहेत. पण निव्वळ चेहर्‍याने परिचित असलेले अनेक खणखणीत कलाकार 'देऊळ'मधे आहेत. एकेका फटकार्‍यातून त्यांनी रंगवलेल्या पात्रांचे जिवंत चित्र समोर उभे राहते, त्यांच्यातली जुगलबंदी पाहताना बेहद्द मजा येते.

नसीरुद्दीन शाहचे उच्चार मात्र खटकले; ते सफाईदार मराठीत आणणे अशक्य तर नक्कीच नसणार. हा सिनेमामधला एक मोठाच दोष आहे.

गिरीश कुलकर्णीच्या बेअरिंगबद्दल तर बोलायलाच नको. त्याच्या गावठी बोलण्यातली सहजता, बेरकीपणा, भोळेपणा, देवाबद्दलचे प्रेम, मैत्रिणीशी, आईशी असलेले त्याचे नाते ... सगळे लाजवाब आहे. त्यानेच लिहिलेली ही कथा, संवाद आहेत हे कळल्यावर तर मला त्याच्याबद्दल निव्वळ आदर वाटला.

(हे प्रथम उपक्रमावर संजोप राव यांच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिले होते. पूर्वप्रकाशित लेखनाबद्दल काही नियम असल्यास अप्रकाशित केले तरी चालेल.)

field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

चित्रपटात काय चांगलं आहे हे तुम्ही व्यवस्थित सांगितलेलं आहे. काही खटकलेल्या गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे. मात्र या समीक्षेत सर्वांनीच हा चित्रपट पाहिलेला आहे असं गृहित धरल्यासारखं वाटतं. कथेची थोडक्यात रूपरेषा, पात्रांची ओळख इत्यादी गोष्टी आल्या असत्या तर हे लेखन परिपूर्ण झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघना, लिहीलंस म्हणून सगळ्यात पहिले कौतुक, आभार, इ.इ.

तुझ्या प्रतिसादामुळे/लेखनामुळे 'देऊळ'बद्दल उत्सुकता आहे. 'नेटफ्लिक्स'वर आला की नक्की बघेन. राजेशच्या प्रतिसादाशी सहमत. प्रतिसाद लेख म्हणून टाकताना थोडा वाढवून टाकण्यास हरकत नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुर्जी: खराय. वर म्हटल्याप्रमाणे ते प्रतिक्रियात्मक लेखन होतं, त्यात प्रकाशित घालण्यापूर्वी भर घालायला हवी होती.
आदिती: कौतुकाबद्दल मंडळ आभारी आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन