मन्वंतर: एक दृष्यकथा

मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात. त्यानंतर जे काही जोशी आणि कांबळे कुटुंबियांच्या घरात, मनांत आणि मनामनांत जी वादळे होतात, त्याची थोडक्यात कथा म्हणजे हे पुस्तक आहे.

जोशींच्या घरात ते स्वत:, बायको आणि दोन मुली आहेत. कांबळेंच्या कुटुंबातही नेमके तितकेच लोक आहेत. जोशींचा कांबळे कुटुंबावर यासाठी राग आहे की त्यांनी वेळीच मुलाला पोलिसांकडे सुपूर्त केले असते तर बारा वर्षं त्यांना मुलापासून दूर रहावं लागलं नसतं आनि आता जी आहे ती परिस्थिती उद्भवली नसती. कांबळे कुटुंबाने कोंड्याचा मांडा करताना प्रसंगी स्वत: अर्धपोटी राहून त्याला खाऊ घातलंय त्यामुळं त्यांना मुलाला(आधीचा वेद, नंतर सिद्धार्थ) सोडताना वाईट वाटणं साहजिक आहे. जोशींची बायको तर जन्मदात्री, तिने बराच काळ त्याच्या आठवणीत घालवलाय, त्याच्या अनुपस्थितीत त्याची खुर्ची राखून ठेवलीय, वाढदिवस ही साजरे केले आहेत. त्यामुळे प्रसंगी नमतं घेऊन मुलगा घरी रहावा अशी तिची इच्छा आहे. शेवटी कोणत्या घरी राहायचं, *कर्णाप्रमाणे कर्मवादाची वाट चोखाळायची की कृष्णाप्रमाणे जन्मदात्यांना श्रेष्ठत्व द्यायचं हा निर्णय सिद्धार्थवरच सोपवला जातो.

वास्तविकत: ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा जुना वाद कम संघर्ष आहे. तरी तो मांडताना आक्रस्ताळेपणा टाळलाय हे विशेष करून सांगावंसं वाटतं. पण मग ते करताना दोन्ही बाजूची माणसं अशक्यरित्या समंजसही दाखवली आहेत हे थोडंसं पटत नाही. बारा वर्षांनी मुलगा बारावीत असतो आणि रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा की नाही हा जर प्रश्न उपस्थित होतो तर तो पळवला जात असतानाचं त्याचं वय किमान ५ वर्षे असणं अपेक्षित आहे. इतक्या वयाच्या, सुस्थितीत वाढलेल्या आणि न्यायधीशाचा मुलगा असलेल्या मुलाला आपला पूर्वेतिहास लक्षात नसतो किंवा घरी परत जाण्याचा प्रयत्न करत नाही हे पट्त नाही. इतका वेळ जरी रागात असले तरी संयमाने वागणारे जस्टीस जोशी ऐनवेळी मुलाला रिझर्वेशनचा फायदा घे म्हणून सांगतात आणि रागारागाने मुद्दाम 'कांबळे' आडनांव लावणारा मुलगा स्वतःला ब्राह्मण मानून थेट नकार देतो.

या सगळ्या प्रकारात ज्याच्याभोवती ही कथा फिरते, तो कथानायक संभ्रमात आहे असं वाटतं. त्याला आधीतर तर जोशींकडे यायचंच नसतं. नंतर तो येतो ते जोशींकडे अनुकूल वातावरणात शिकून कांबळे कुटुंबाचा उद्धार करण्याच्या इराद्याने. त्याच्या मनातला विखार जात नाही. कपड्यांत, राहणीत बदल करणं हे त्याला आयडेंटिटी क्रायसिस वाटतं. त्याची मूळं कशात आहेत हेच त्याला उमगत नाही. आधी कांबळे म्हणून आग्रही असणारा नंतर जोशीत्व मान्य करतो पण त्यात त्याची भावनिक आंदोलने म्हणावी तितकी मनाला भिडत नाहीत. सिद्धार्थला सतत मार्गदर्शन करणारे गौतम सर देखिल त्याने काय करावे याचं उत्तर देताना पुन्हा हिंदू पुराण कथांचा आधार घेतात हे त्यांच्या चितारलेल्या व्यक्तिरेखेस विसंगत वाटते. पुस्तकाच्या शेवटीही सिद्धार्थला जोशी कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारावा असंच वाटत राहातं, पण जोशींच्या मते हिंदू धर्म काळानुसार बदलत आलाय तेव्हा त्यांना धर्मांतराची गरज नाही.जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था जितक्या लवकर समूळ नष्ट होईल तितके बरं, यावर मात्र दोघा बापलेकांचं एकमत आहे.

बर्‍याचशा गोष्टी संदिग्ध सोडल्या आहेत. जसे, सिद्धार्थ नक्की १२ वर्षांनंतर सापडला की १४? कारण यावरून त्याचे हरवतेवेळी काय वय असेल आणि तो थोडा का होईना जाणता होता की नाही याबद्दल आडाखे आणि प्रश्न बांधता येतात. तो स्वतः आणि इतरांच्या नावांमधूनही काही वेगळेपण दिसत नाही. एक त्याचं स्वतःचं आणि सरांचं नांव सोडलं, तर कुठेच अगदीच जातीय-धार्मिकवाद दिसत नाही. कांबळे कुटुंबात-मंगेश, लक्ष्मी, छाया अशी नावे आहेत तर जोशींकडे-विक्रम, मालती, रूचा(ऋचा नव्हे),सोनाली अशी आहेत. पाच वर्षाचा मुलगा सुखवस्तू घरातून नवीन कुटुंबात आल्यावरचं स्थित्यंतर कुठेही उल्लेखलेलं नाही. तेच तो एकदा जोशींकडे येऊन कांबळेंकडे परतल्यावर त्याला वाकळ(गोधडी)वर झोप न लागणं, सगळे दंतमंजनाने दात घासत असताना याने मात्र आत जाऊन टूथपेस्ट-ब्रश घेऊन येणं हे त्याचं नवीन घरात कंडीशन झालेलं असणं दाखवतं. हरवला तेव्हा तो नक्कीच ३-५ वर्षांचा असावा. म्हणजे नक्कीच त्याला त्याचं नांव सांगता येत असलं पाहिजे. अशावेळी सिद्धार्थ म्हणवलं जाणं यात काय अर्थ भरला आहे हे कळत नसलं तरी हे नांव वेगळं आहे हे एवढं तरी निश्चितच कळालं असणार. याबद्दलही त्याचे नवीन आईबाप काही भाष्य करत नाहीत. वर्तामानात मात्र त्याला सिद्धार्थच म्हणून घ्यायला आवडतं. आणि वेद नांव का आवडत नाही यावर ऋग्वेदातल्या पुरूषसूक्तात दहाव्या मंडलात कोणापासून कोण निर्माण झालेलं आहे हे दिलंय. म्हणजेच वेद हे नांवच मुळी वर्ण आणि जातीव्यवस्थेचे द्योतक आहे. तेव्हा त्याची जोशी-आई "आता आपल्यातही सिद्धार्थ-गौतम अशी नांवे असतात, तुला आवडते तर राहू दे सिद्धार्थच" म्हणून सगळ्यांना गप्प करते.

जोशींच्या मते, या नेमक्या वर्षी आपण याला आपल्या घरी आणला नसता तर याचं ब्राह्मण्य सिद्ध झालं नसतं, तो दलितच राहिला असता आणि त्यायोगे खचितच रिझर्वेशनच्या कोट्यातून एक जागा सहज त्याला मिळाली असती आणि डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झालं असतं. आता या परिस्थितीस ते कारणीभूत आहेत म्हणून, आणि एखादी इस्टेट विकण्याची झळ सोसली तर त्यांच्याकडे इतकी ऐपत आहे म्हणून ते सिद्धार्थल डोनेशन भरून मेडिकलला पाठवायला तयार होतात. मात्र त्यांनी हीच गोष्ट सोनालीसाठी केलेली नसते.

एक मुद्दा मात्र व्यवस्थितरित्या मांडलेला दिसतो. वेद-सिद्धार्थचा कांबळे ते जोशी हा प्रवास हा अगदीच अचानकपणे किंवा अधांतरी वाटत नाही. जोशांची मुलगी आणि वेदची मोठी बहीण सोनल ही वेळोवेळी त्याच्या संकल्पना कशा खोट्या आणि चुकीच्या आहेत हे दाखवून देते. तिच्या लेखी जाती-धर्म ही अवडंबरं आहेत. ती पांघरून वेद तिच्याकडे गेला तर ती त्याला नक्कीच मदत करणार नाही. पण जर माणूस म्हणून मदत मागायला गेला तर मात्र हमखास करेल. आधी खळखळ करून पण नंतर पटल्यावर तिचं म्हणणं तो पटकन मान्य करूतो.

लेखकाच्या मते चित्रपट लिहिण्यासाठी जी लिहिली जाते, ती दृष्यकथा. कदाचित मी चूक असेन, पण मला हे नाटकाचं पुस्तक असल्यासारखं वाटलं. पण नाटकात असणारी स्वगते आणि प्रसंगांची पूर्वबैठक सांगणारी वर्णने तितकीशी नाहीत. बहुधा फक्त संवाद लिहिण्याचं काम लेखकाचं असावं आणि बाकीचं दिग्दर्शकानं निभावलं असावं. उत्कृष्ट कथा-पटकथा-संवादासाठी झी गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार "जोशी की कांबळे" ला मिळाला होता. कदाचित दृक्श्राव्य माध्यम नुसत्या पुस्तकाहून अधिक प्रभावीपणे मांडलं गेलं असेल. चित्रपट अजून पाहिला नाहीय, कदाचित पाहिल्यावर वेगळं मत असू शकेल.

लेखक : श्रीधर तिळवे
नवता प्रकाशन
पृष्ठसंख्या:६२

*कर्ण आणि कृष्ण दोघेही जन्मदात्यांच्या घरी वाढले नाहीत. जेव्हा सत्य कळाले तेव्हाही कर्ण पालनपोषण करणार्‍यांच्या घरी राहिला, अर्थात त्याला त्याच्या जन्मादात्रीने स्वीकारले नव्हते हा भाग इथे सोयीस्कररित्या गाळला आहे खरा. पण कृष्ण मात्र जन्मदात्यांकडे परत गेला. कर्ण कर्मदात्यांकडे राहिला म्हणून तो कर्मवाद आणि कृष्णाचा तो जन्मवाद. "देवादिकांनीही अशा वेळेस एकसारखेच आचरण केले नाहीय, तर तू देखिल तुला जो योग्य वाटतो तो पंथ अनुसर" असा सल्ला सिद्धार्थला त्याचे सर देतात.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

पुस्तकाची ओळख आवडली. फक्त ६२ पानांत लिहीलेल्या पुस्तकावर दोन तासांचा चित्रपट 'मावतो' का? असा एक तांत्रिक प्रश्न पडला आहे. न्यायाधीश जोशींचं पात्र हे काहीसं पापभीरू आणि साधारणतः लिबरल होण्याचा प्रयत्न करणारं पण त्यात ओढाताण होणारं असावं असं वाटतं.
मुळात कथा वाचली पाहिजे.

(बर्‍याच दिवसांनी आंतरजालावर दिसल्याबद्दल मकामावशींचे स्वागत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रकथा हा प्रकार वेताळ, मॅंड्रेक वगैरेच्या पलिकडे जाऊन गंभीर कथांसाठी देखील वापरला जातो हे नवीनच कळलं.

जोशी, कांबळे, वेद-सिद्धार्थ ड्युआलिटी, बिछडा हुआ बेटा वगैरे एलिमेंट्स जरा बाळबोध वाटले. पण एकदा ते स्वीकारले की वेगवेगळ्या प्रसंगांत अपेक्षा निर्माण होतात. त्या अगदी सगळ्या पुऱ्या झाल्या नसाव्यात असं परीक्षणावरून वाटलं. रिझर्व्हेशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यातून सद्यव्यवस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न सर्वच करतात हे दिसून येतं. कर्णाशी तुलना आवडली.

अजून येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळख दोन तासात होणे कठीण्च !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान परिचय. कधी मिळालं तर वाचेन

मला एकुणच कथानक वाचुन कॉनरॅड रिक्टर यांच्या 'द लाईट इन द फॉरेस्ट' या अप्रतिम कादंबरीची आठवण झाली. या कादंबरीतही एका मुळ ब्रिटिश बालकाला अमेरिकेतील मुळ इंडीयन्स वाढवतात. इतके की तो स्वतःला 'इन्डीयन' समजतो व गोर्‍यांचा द्वेष करत असतो. मात्र पुढे आपली भुमी वाचवण्यासाठी इंडियन टोळ्या जे करार करतात त्यात ही मुले पुन्हा आपल्या 'ओरिजिनल' आई-वडिलांकडे जातात.. त्यामुलाचे भावविश्व या कादंबरीत अत्यंत म्हणजे अत्यंतच सुंदर रेखाटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रवींद्रनाथांची "गोरा" आणि रडियार्ड किप्लिंगची "किम" कादंबरी याच शैलीतले आहेत - गोरा स्वतः ला भारतीय समजत असतो पण तो असतो मुळात आइरिश; किम काळाकुट्ट असला तरी तो असतो गोरा - "Though he was burnt black as any native; though he spoke the vernacular by preference and his mother-tongue in a clipped uncertain sing-song; though he consorted on terms of perfect equality with the small boys of the bazar; Kim was white, a white of the very poorest."

जोशी-कांबळे सिनेमा मी पाहिला नाही, पण परीक्षण वाचून पात्रे आणि मांडणी खूप स्टीरियोटिपिकल वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोशी-कांबळे सिनेमा मी पाहिला नाही, पण परीक्षण वाचून पात्रे आणि मांडणी खूप स्टीरियोटिपिकल वाटली.
याच्याशी सहमत आहे. तिळव्यांनी नव्वदोत्तरीचा डोंगर पोखरून अगदीच उंदीर काढलेला दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"तरी तो मांडताना आक्रस्ताळेपणा टाळलाय हे विशेष करून सांगावंसं वाटतं."

~ असे असेल तर त्याला कारणीभूत आहे 'जोशी की कांबळे' या चित्रपटाची संहिता. तिथे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या (सौम्य) मताचा लेखकाला विचार करणे भाग पडते. लिखित स्वरुपात श्रीधर तिळवे या विषयावर चौफर लिहितात आणि बोलतातही. त्यांची वाङ्मयीन वाटचाल पाहता स्पष्ट दिसते की तो त्यांचा बेसच बनला आहे. पाश्चिमात्य औद्योगिकीकरण आणि त्याची भारतीय आवृत्ती यावर आधारित नवतेचे लिखाण कसे झाले पाहिजे याबाबतचा त्यांचा अट्टाहास त्यांच्याबरोबरीच्या चर्चेतून मिळतोच. (तिळवे कोल्हापूरचेच असल्याने तो अनुभव इथल्या साहित्यप्रेमींनी घेतला आहे. ते एक चांगले बुद्धिबळपटूही आहेत, ही त्यांच्याविषयीची जादाची माहिती. विद्यापीठाचे चॅम्पिअनही होते.). नेमाडे, कोलटकर, सारंग, चित्रे यांच्यासारख्यांनी त्यांच्याअगोदरच्या पिढीतील खांडेकर, फडके, पेंडसे, कुसुमाग्रज, पु.ल. यांच्या नावाने खडी फोडली होती, व प्रत्यक्ष लिखाणाच्या अगोदरच 'बर्‍यापैकी नाव' ही कमाविले होते, त्याच अलगुजावर तिळव्यानी नेमाडे कोलटकर आणि कंपनीच्या नावाने आरडाओरड करून प्रकाशकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले होते. 'पॉप्युलर' ला तर काय गण्या आला काय किंवा गोंद्या आला काय, आपल्या वाड्यात आबादीआबाद होत राहील हेच सावकार बघत राहतो त्याप्रमाणे तिळवे यांनाही त्यानी प्रसिद्धीची वाट दिलीच. असो. बाकी 'जोशी की कांबळे' ला "झी' आणि 'म.टा.पुरस्कार' मिळाला म्हणून त्या चित्रपटाला अनन्यसाधारण महत्व आहे असे म्हणण्यात काही अर्थ नसतो. काय दर्जा आहे या पोतेपोतेभर पुरस्कार वाटपाच्या पद्धतीत ?

"मन्वंतर" कथा अजिबात पटत नाही. या राज्यात न्यायाधिश पदावर नोकरी करीत असलेली व्यक्ती आपल्या मुलाला 'रीझर्व्हेशन' चा फायदा घे असा सल्ला देऊ करेल हे कदापिही पटणार नाही (निदान मला तरी). त्यातच त्यांच्याकडे 'इस्टेट' ही आहे असेही लेखक म्हणतात. तीच गोष्ट 'कर्णाचा कर्मवाद आणि कृष्णाचा जन्मवाद'. हे अचाट तत्वज्ञान शिकविणारा डी.एड.क्वालिफिकेशनचा प्राथमिक शिक्षक या सांप्रत देशी या क्षणी असेल तर त्यालाही 'झी गौरव पुरस्कारा'ची ती थाळी द्यायला हवी.

चालायचेच. बी.आर. चोप्रांचा 'धूल का फूल' हा १९६० च्या दशकातील चित्रपटही अशाच कथानकाचा होता. लग्नाआधी जन्मलेले म्हणून धूळीत टाकून दिलेले हिंदु दांपत्याचे मूल अल्लाचे फुल म्हणून एक मुसलमान आपल्या घरी आणतो, वाढवितो, आणि मग तो जाणता झाल्यावर परत तेच दांपत्य आपला 'ओरिजिनल क्लेम' सांगण्यास त्या मुस्लिम वस्तीत येते. (योगायोग म्हणजे या चित्रपटातील हिंदु बापही 'जस्टिस' च दाखविला गेला होता.)

बाकी मस्त कलंदर यानी उल्लेख केलेला 'रुचा' (ऋचा नव्हे) प्रकार इथल्या भागात सर्रास चालू आहे. शाळा कॉलेजमध्ये Rucha, Richa, Rishikesh, Rituparna, अशा नोंदी केल्या जातात. 'रघुनाथ, राघवेन्द्र' अशा थाटातील ही नावे आहेत या समजुतीने तेथील क्लार्क लोक अशा स्पेलिंग्जचे थेट देवनागरी रुपांतर करतात ते "रुचा, रिचा, रिशिकेश, रितुपर्ण" - फक्त काही ठिकाणी रिशीकेशचे ऋषिकेश, हृषिकेश झालेले दिसते.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी 'जोशी की कांबळे' ला "झी' आणि 'म.टा.पुरस्कार' मिळाला म्हणून त्या चित्रपटाला अनन्यसाधारण महत्व आहे असे म्हणण्यात काही अर्थ नसतो. काय दर्जा आहे या पोतेपोतेभर पुरस्कार वाटपाच्या पद्धतीत ?

खरंतर मी या आधी तिळवेंचे लेखन बिल्कुलच वाचले नव्हते किंवा त्यांचे नांवही तितकेसे ऐकले नव्हते त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धी वलयाबद्दल मला काहीच माहिती नव्हती. पुस्तक वाचून काही प्रश्न पडतता किंवा संभ्रम निर्माण होतो तरी देखील चित्रपटाला काही पुरस्कार मिळाले असतील, तर तो नक्कीच काही बाबतीत का होईना इतर चित्रपटांच्या तुलनेत चांगला असावा. (दृष्यकथेत न जाणवणारी बलस्थाने दृकश्राव्य माध्यमात जास्त प्रभावीपणे आली असावीत) हा त्यामागचा माझा तर्क.

"मन्वंतर" कथा अजिबात पटत नाही. या राज्यात न्यायाधिश पदावर नोकरी करीत असलेली व्यक्ती आपल्या मुलाला 'रीझर्व्हेशन' चा फायदा घे असा सल्ला देऊ करेल हे कदापिही पटणार नाही (निदान मला तरी). त्यातच त्यांच्याकडे 'इस्टेट' ही आहे असेही लेखक म्हणतात.

तेच. मुलाचे स्वप्न ऐन परिक्षेच्या वर्षी आलेल्या मानसिक धक्क्यामुळे किंबहुना आपण त्याच्या मनाविरूद्ध त्याला घरी आणल्यामुळे भंगले जात आहे, हे जोशींना जाणवते. मग येनकेन प्रकारेण ते स्वप्न पुरे होऊ द्यावे अशी यामागची धारणा वाटली. नाहीतरी मुलगा हट्टाने कांबळे आडनांव आणि आईबाबा म्हणूनही तीच नांवे लावतो. बाकी इस्टेट कशी, किती याचे तपशील येत नाहीत. जी इस्टेट मोठ्या मुलीसाठी विकली नाही, मात्र प्रायश्चित्त म्हणून मुलासाठी ती विकली जाते, यावरून त्यांच्याकडे आजकालच्या मालिकांत दाखवतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे पाचशे हजार करोडची इस्टेट नसावी हे उघड आहे.

बाकी तुमच्या प्रतिसाद(गाभा आणि पद्धत) यांवरून आमचे जालीय मित्र श्री. इंद्रराज पवार(कोल्हापूरकर) आठवले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

बाकी तुमच्या प्रतिसाद(गाभा आणि पद्धत) यांवरून आमचे जालीय मित्र श्री. इंद्रराज पवार(कोल्हापूरकर) आठवले.

नको तितक्या लवकर तुला नको ते कसं काय आठवतं गं? तरी बरं, इंद्राची हायफन न टाकता ~ हे चिन्ह टाकण्याची शैली तुझ्या ध्यानी नाही आली ते. नाही तर ते म्हणजेच अशोक पाटील असं म्हटलं असतंस. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तर तो नक्कीच काही बाबतीत का होईना इतर चित्रपटांच्या तुलनेत चांगला असावा."
~ पुरस्कार समितीतील सदस्यांना "जोशी की कांबळे" अशा शीर्षकाच्या चित्रपटाला पारितोषिक दिले नाही तर मिडियाच्यादृष्टीने आपण "प्रतिगामी" विचाराचे ठरू अशी साधार भीती वाटत असतेच. बरे दिले तरी बिघडते कुठे ? कारण 'या चित्रपटाला पारितोषिक मिळालेच कसे ?" असाही हाकाटा होण्याची शक्यता असतेच. त्यामुळेच टु बी ऑन सेफर साईड, देऊ या ढीगभर बाहुल्यातील एक.

"यावरून त्यांच्याकडे आजकालच्या मालिकांत दाखवतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे पाचशे हजार करोडची इस्टेट नसावी हे उघड आहे."
~ चला वादाकरीता हेही गृहितक मान्य करू या की जोशींच्याकडे नसेल मालिकापरंपरेतील पाचशे-हजार कोटीची इस्टेट. पण बिलिव्ह मी, गेली ३० वर्षे माझ्या कामानिमित्य माझा कोर्टकचेर्‍यांशी संबंध येत आहे, [काहींशी तर अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत] आणि त्यावरून अगदी दाव्याने सांगू शकतो की इतक्या प्रदीर्घ नोकरीतील अनुभवात मला एकही (आय रीपिट, एकही) न्यायाधीश असे दिसले नाहीत की ज्यांच्या अपत्याच्या (इररिस्पेक्टीव्ह ऑफ जेन्डर) उच्च शैक्षणिक वाटचालीमध्ये कसल्याही सामाजिक रचनेचा वा आर्थिक बाजूचा अडथळा आला आहे. वैफल्याची तर बात अलगच.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीक्षणावरुनतरी कथा चित्रपट अन गोंधळलेल्या भावना असलेला वाटतोय. म्हणजे कोणाच्याच भावना न दुखावता काहीतरी दाखवायचं..
ज्यांचे आईबाप आंतरजातीय विवाह केलेले आहेत त्यांच्या मुलांचं काय? तसंच आंतरधर्मीय वगैरे वगैरे जे काही आंतर असेल त्या प्रकारचे विवाह केलेल्या लोकांच्या अपत्यांचे काय विचार असतील? लोकं सर्वसाधाराणपणे जे फायद्याचं तेच बघतात.

चित्रपट बघण्याजोगा अन कथा वाचण्याजोगी वाटत नाही हे माझं मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती आणि रामदासकाका,
हे पुस्तक लिखित नाटकात जसे फक्त संवाद असतात तसे आहे. त्यामुळे मधल्या जागा नक्कीच अभिनय, एखादे गाणे आणि इतर गोष्टींनी भरून निघाल्या असाव्यात. सिनेमा अजून पाहिला नाहीय, पाह्यला मिळाल्यास आणखी चांगलं सांगू शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे