पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२)
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
नशेचा परिणाम म्हणावा की व्यक्तिमत्वात असलेला विद्रोह आणि चळवळेपणा? पण '९५ च्या सुमारास पियुषने 'आर्ट वन' सोडली आणि पुन्हा पाचोळ्याप्रमाणे वार्‍यावर भिरभिर सुरू झाली.

मनाचा निर्णय होत नव्हता, कोषातल्या सुरवंटाला आकाश दिसत होते खरे पण वाढ अजुन सुरू होती..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

'रेजींग बुल' मधला जेक-ला-मोटा आठवतो का? यशाची लत लागलेला 'ऑन द एज' बॉक्सर. बेफाम, येईल त्या क्षणाला मत्तपणे भोगणारा, उधळणारा, विस्कटणारा. स्खलनशील, उद्दाम, ढेरी सुटल्यावर तुरूंगाची हवा लागल्यावर सैरभैर झालेला, धाय मोकलुन रडणारा. हातुन सगळेच निसटल्यावर गत दिवसांच्या आठवणींचा हिशेब लोकांत मांडून आला दिवस ढकलणारा. शेवटी स्वतःच्या 'इमेज' चा कैदी, ए पेल शॅडो ऑफ हिज फॉर्मर सेल्फ, व्हायलिंग अवे द डेज मीअरली शॅडो-बॉक्सिंग. रॉबर्ट डी नेरोचा मास्टरक्लास चित्रपट! हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच चित्रपट बघायची शिक्षा कुणी मला दिली तर हा त्यातला एक नक्की. मेथड अ‍ॅक्टींगचा कळसाध्याय समजावा असा. आता ते कॅरेक्टर आठवायचं कारण म्हणजे पियुषच्या आयुष्यात त्याच्या मनस्वीपणानं चालवलेल्या घडामोडी. अर्थात इथली पुढची वळणं जेकच्या तुलनेत कमी धोक्याची म्हणावी लागतील.

यशाची चढती कमान आहे, मनाजोगे सांगाती आहेत, उमेद शिल्लक आहे अशा परिस्थितीत मांडलेला डाव मोडायची, नवे फासे टाकायची ऊर्मी का येत असेल बरे? एखाद्याचा स्वभाव वाहवत जाण्याचा असतो तर एखाद्याला नवी क्षितीजे खुणावत असतात. पियुषच्या बाबत नक्की सांगता येणार नाही पण आर्ट वनच्या जमून आलेल्या खेळातुन तो उठला. आजवरच्या त्याच्या प्रवासात मुक्काम सोडण्याच्या घटना अनेक आल्या होत्या. आई-बाप-कुटुंब-मित्र यापासुन दूर जाण्याने झालेली सुरुवात कुठे नेणार होती कोण जाणे. तिग्मांशु धुलियाला आठवतो तो त्या दिवसातला अस्वस्थात्मा, धुमसणारा पियुष. जिथे घाम गाळला, एक एक प्रयोग पारखला, जिथे अनुभवाची वर्तुळे विस्तारली त्या संस्थेपासुन विलग होण्याचा निर्णय अखेरिस झाला होता. कदाचित विचारांची पक्वता, विस्तारणारी क्षितीजे ह्याला कारणीभूत असेल. एन के शर्मांच्या प्रभावळीत आलेले प्रत्येक माणुस त्यांच्या डाव्या, ठाम विचारसरणीच्या प्रभावाखाली येत असेच असे. त्या स्पष्ट, ऐतिहासिक मांडणीची भूल नव्या रंगरूटाला पडायचीच. दिल्लीच्या त्या डाव्या माहोलात, नाटकांच्या चळवळीत पियुषला आपल्या जीवनाचे सुकाणू सापडल्यासारखे वाटले होते तेव्हा. पण आता नव्या उंचीवरून कळू लागले होते की सगळ्यांचे पाय मातीचे, माणसाने केलेल्या डाव्या-उजव्या-मधल्या सगळ्याच विचारांच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या होत्या. रंग वेगळे, ढंग सारखेच.

अपेक्षाभंग झालेल्या डाव्या कार्यकर्त्यांची, कलाकारांची घुसमट अनेक कलाकृतींतुन दिसून आलेली आहे. आर्थर कोसलरच्या 'गॉड दॅट फेल्ड' मध्ये कम्युनिस्टांची घुसमट, पंखछाटण फार प्रभावीपणे समोर येते. दु:खाला, वेदनेला मनोमन प्रतिसाद देणे हा जर डावेपणा असेल तर तसा पियुष नक्कीच होता. समतेच्या नावाखाली नवी वर्णव्यवस्था तयार करणारा डावा तो नक्कीच नव्हता आणि नाही. तर अखेरीस आर्ट वन सुटले पण मैत्रीचे बंध कायम होते.

हजा़रों ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
बहोत निकलें मेरे अरमाँ, लेकीन फिर भी कम निकले

मुहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का
उसी को देखकर जीतें है जिस काफिर पे दम निकले

असे काहीसे झाले होते.

आता नांगर उचलला होता आणि वारे नेईल तिकडे जाण्याची मनाची तयारी झालेली होतीच. मागे एकदा एकपात्री प्रयोग करून झाला होता. तोच करावा का? काहीतरी हालचाल करायलाच हवी होती लवकर. मग मित्रांच्या घरी, समारंभात, छोट्या कार्यक्रमात ह्याचा 'दूसरी दुनिया'चा एकपात्री प्रयोग सुरू झाला. मजा येत तर होती. जिगसॉचा हवा असलेला तुकडा सापडावा तसे वाटत होते. मग आणखी एक प्रयोग करायला घेतला. कम्युनिस्टांवर आगपाखड करणारा 'बेटी लेमन् को गुस्सा क्यों आता है?'. तो चालल्यावर मग अजुन एक, 'दुविधा'. मनातले द्वंद्व उघड करणारा.

ईमान मुझे रोके है जो खिंचे है मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है कलीसा मेरे आगे

ही टोचणी सगळ्या जातिवंत कलाकारांना छळते. इथे तर रोज आला दिवस कसा पाठीवर टाकावा ह्याची भ्रांत पडत चाललेली. मग कलेसाठी उस्तवार करायची की दामासाठी कला द्यायची?

हे तीन एकपात्री प्रयोग लोकांच्या चर्चेचा विषय बनु लागले होते. एन एस डी मध्ये केलेला 'दुविधा'चा प्रयोगाला छप्परफाड दाद मिळाली होती. हे तिन्ही प्रयोग एकत्र केले तर? एकदा विचार वळवळला की मग तो शेवटापर्यंत नेऊन दम घ्यायचा हा खाक्या. शेवटी ह्या तीन प्रयोगांचा एकत्र आविष्कार पियुषच्या डोक्यात साकार होऊ लागला. नाव साधेसुधेचः अ‍ॅन ईवनींग वुईथ पियुष मिश्रा.

जेव्हा जेव्हा हा प्रयोग होई तेव्हा तेव्हा प्रेक्षागारातले लोक अवाक होऊन या कलाकाराचा एका भूमिकेतुन दुसरीत होणारा परकायाप्रवेश पहात असत. सलग तीन तास खिळवुन ठेवलेला सगळा समुदाय जेव्हा निघायला उठे तेव्हा त्यातल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचे काहूर तर असेच पण त्याहुन अधिक असे ती एकच भावना: हा माणुस हे करतो तरी कसं आणि किती सहज! ते प्रयोग तुफान चालले. यश मूर्त होऊन दिसू लागलं. पण तेच ते किती काळ करत रहाणार? मनातला भटक्या जिप्सी एका जागी स्वस्थ राहू देईल तर शपथ!

रूटीनच्या चक्रात तो फिट नव्हताच, त्यात अधुन्-मधुन असुयाही जागी व्हायची. 'सत्या' च्या सातमजली यशानंतर मनोज वाजपेयी बॉलीवुडमध्ये बर्‍यापैकी स्थिरावला होता. द्रोहकाल, इस रात की सुबह नहीं नंतर आशिष विद्यार्थीही. 'माचिस' मधुन विशाल भारद्वाजला आपला सूर सापडला होता. पण पियुष? अजुन ऐलथडी-पैलथडीचा निर्णय होत नव्हताच त्याचा. पुन्हा दारूचा आसरा घेणे आलेच. आधी व्हिस्की, मग रम, मग मिळेल ते.

त्यात मदतीचा हात दिला तिग्मांशु धुलियाने. तो त्या वेळी 'दिल से' चे डायलॉग्ज लिहीत होता. एक लहानसा रोल दिला त्याने, सी बी आय् इन्स्पेक्टरचा. पन दुर्दैवाने दिल से आपटला आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू.

पहिल्या झटक्यापासुन त्याला मुंबईबद्दल जरा भीती वाटू लागलेली. आणि रागही. तिथे अभिनयाला विचारतो कोण? पैश्यासाठी पहिजे तर नेसूचे सोडून डोईला गुंडाळणारे लोक सगळे! दिल्लीत असे नाही ना! कलेची चाड असणारे, घरचे कसेतरी संभाळून लष्करच्या भाकरी भाजणारे कमी नाहीत दिल्लीत. शिवाय मुंबईतले काही नमूने पाहून हे काय करताहेत सिनेमात? यांनी आठवडी बाजारात कांदे विकावेत. असा काहीसा त्याचा ग्रह झाला होता. पण लग्न झालेले, एक मुलगा झालेला. काहीतरी करायलाच हवं ना? मग दिल्लीतल्या निरनिराळ्या कॉलेजात नाटके बसवणे सुरू केले. इकडे मित्रांनी आग्रह चालवला होताच. मनोज, विशाल यांची भुणभुण लागलेली असायची मुंबईत येच म्हणुन. म्हणून एकदाची स्वारी आली पुन्हा मुंबईत राजकुमार संतोषीच्या आमंत्रणावरुन. 'लेजन्ड ऑफ भगत सिंग' साठी डायलॉग्ज लिहिण्याकरिता. याची कथा मूळ पियुषचीच. 'गगन दमामा बाजयों' नावाचे एक नाटक त्याने लिहिले होते भगत सिंगांवर. पण पुन्हा नशिबाने कोलदांडा घातलाच. राजकुमार संतोषीने योग्य क्रेडिट द्यायला नकार दिला आणि पियुषच्या उत्साहावर पाणी पडले.

दिल्लीत आता काही नवे आव्हान दिसत नव्हते. संसाराची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती. मुंबईत किती नाही म्हटले तरी ईंडस्ट्री होती, मित्र होते. अमाप संधी होत्या. पण धीर धरून सबुरीने वाट पहायची गरज होती. असेच एकदा 'शूल' पहाण्यात आला. साल १९९९. अनुराग कश्यपचा पिच्चर? हो, हा तोच! फोन तरी करावा एकदा.. म्हणुन नंबर फिरवला आणि जिगसॉचा दुसरा तुकडा जुळला.

तोवर अनुराग कश्यपने अनेक संगीत दिग्दर्शकांच्या चाचण्या घेतल्या होत्या पण मनासारखा एकही भेटत नव्हता. विद्यार्थी चळवळ आणि फुटीर विचारांच्या कोलाज् वर एक चित्रपट त्याच्या डोक्यात घुमत होता. नाव 'गुलाल'. पियुष ऑफिसवर जाऊन थडकला तेव्हा अनुरागला काय करू अन् काय नको झालं! दिल्लीवाला आणि त्यात पियुष सारखा एकेकाळचा 'आयडॉल' वल्ली! त्यानं पुढ्यात पेटी घेऊन असा काही रंग उभा केला म्हणता की अनुरागने तिथल्या तिथे त्याला गुलालचे संगीत कॉम्पोज करायला आवतान दिले!

क्रमशः

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संगीत, लेखन, अभिनय अशा नानाविध गोष्टींवर हुकुमत असणाऱ्या वल्ली फार थोड्या असतात. पु.ल.देशपांडे त्यातले एक. अशाच बहुगुणी पियुष मिश्राची ओळख आवडते आहे. त्याचं मी काही फारसं पाहिलं नाही याचं वाईट वाटतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<संगीत, लेखन, अभिनय अशा नानाविध गोष्टींवर हुकुमत असणाऱ्या वल्ली फार थोड्या असतात. पु.ल.देशपांडे त्यातले एक.>>

किशोरकुमार आणि एक त्यातला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगीत, लेखन, अभिनय अशा नाही पण अनेक अन्य क्षेत्रांमध्ये लीलया संचार करू शके असे एक व्यक्तिमत्त्व आपल्याकडे होऊन गेले. ते म्हणजे आचार्य अत्रे.

ज्या ज्या गोष्टीत त्यांनी हात घातला तेथे तेथे ते प्रथम श्रेणीत जाऊन पोहोचले. (लिओनार्डो दा विंचीची हीच ख्याति होती.)

लंडन-रिटर्न्ड शिक्षक आणि मुख्याध्यापक (अत्रे-घाटे शालेय वाचनमाला, त्यांच्या ह्या पहिल्या पेशामुळेच त्यांना 'आचार्य' ही उपाधि चिकटली), कवि (विडंबनकाव्यसंग्रह 'झेंडूची फुले'), नाटककार (ब्रँडीची बाटली, तो मी नव्हेच), लेखक (मी कसा झालो आणि कर्‍हेचे पाणी ही आत्मचरित्रे), चित्रपटनिर्माते (श्यामची आई - १९५४ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरू झाला आणि पहिला पुरस्कार 'श्यामची आई'ला मिळाला), वृत्तपत्रकार (मराठा), पट्टीचे वक्ते (संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांची भाषणे अजून आठवतात), अशा अनेक क्षेत्रात त्यांनी लीलया संचार केला. प्रचंड आवाज, प्रचंड देह आणि हजरजबाबीपणा ह्यामुळे अत्र्यांशी सामना करायला भलेभले बिचकत असत. फडके-अत्रे वादात फडके ह्यांनी 'झंकार'मध्ये लिहिले, 'अत्रे म्हणजे एक कुत्रे आहे'. अत्र्यांनी प्रत्युत्तर म्हणून एक व्यंगचित्र छापले. त्यात एका उकिरडयावर एक फाटके फडके पडलेले आहे आणि त्यावर लिहिले आहे 'फडके'. शेजारी एक कुत्रे तंगडी वर करून त्यावर लघुशंका करीत आहे. कुत्र्यावर लिहिले आहे 'अत्रे'. 'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हयात हा 'च' कशाला हवा असा सवाल चव्हाणांनी केला. अत्रे त्यांना म्ह्णाले, 'तुमच्या नावातून 'च' काढला तर काय राहील?' न.र.फाटकांना 'नरकीटक'असे नाव देणे, 'शेम सदोबा शेम, महाराष्ट्राच्या भवितव्याशी तुम्ही खेळता गेम' असे स.का पाटलांना सुनावणे, तिंबूनाना (तेव्हाचे मंत्री डॉ त्र्यंबक रामचंद्र नरवणे), मुख्यमंत्री कन्नमवार ह्यांच्या खोडया काढणे अशा उद्योगांतून आपल्या वाचकांना ते भरपूर करमणुकीचे साहित्य पुरवीत असत.

अत्र्यांच्या तरल विनोद बुद्धीची थोडी कल्पना 'झेंडूची फुले' च्या अर्पणपत्रिकेवरून यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0