पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)

..त्यानं पुढ्यात पेटी घेऊन असा काही रंग उभा केला म्हणता की अनुरागने तिथल्या तिथे त्याला गुलालचे संगीत कॉम्पोज करायला आवतान दिले!
**************************************************************************************

जब शहर हमारो सो गयो थो, रात गजब की
चहूँ ओर सब ओर दिशा से लाली छाई रे
जुगनी नाचे चुनर ओढ़े खून नहाई रे
सब ओरो गुल्लाल पुत गयो बिपदा छाई रे
जिस रात गगन से खून की बारिश आई रे..

गुलालबद्दल चार शब्द बोलल्याशिवाय पियुषची गोष्ट पुढे सरकणार नाही.

राजसिंह चौधरीच्या डोक्यात ही स्क्रिप्ट काही वर्षे घोळत होती. राजपुतान्याचे स्वप्न, त्यातले मोहरे, प्यादे आणि पट हा मुख्य विषय. पण अनुराग कश्यपचा हात त्या कथेवर फिरला तेव्हा मांडणी कॉम्प्लेक्स झाली. तसेही, लेअर्ड कथानकांची मांडणी हा अनुरागचा (आणि अर्थातच कुब्रिक, लिंच, स्कॉर्सिसी या त्याच्या आदर्शांचाही) प्रांत. त्यामुळे त्यात काही इतर प्रोफाईल्स बघता येतात. जसे दुके बाना, रणसा, करण, दिलीप या चार तर्‍हेच्या नायकांसमोर उभ्या असलेल्या दुकेची पत्नी, माधुरी, अनुजा आणि किरण या चार तर्‍हेच्या स्त्रिया. किंवा दुके बाना, पृथ्वी बाना आणि त्याचा 'अर्धनारिश्वर' म्हणजे अनुक्रमे अनिर्बंध सत्ताकांक्षा, तिचा नेभळा, उपहासात्मक विरोध आणि दोघांचा मूक साक्षीदार बनलेले न धड इकडचे, न तिकडचे विटनेसेस् या प्रवृत्ती. भेद आणि दंडशक्ती हेच नाणे जिथे चालते त्या (दुर्दैवाने सर्वंकष, सर्वव्यापी) राजकारणाचा फोलपणा, त्याचे बळी आणि त्याचे अनिवार्य 'डीजनरेशन' स्पष्ट आहे. एकूण वेगळ्या धाटणीचा चित्रपट.

हे वेगळेपण गाण्यात, शब्दांत, संवादांत, फ्रेम्समध्येही दिसावे असा दिग्दर्शकाचा आग्रह होता. पियुषचा लोककलामंडळीवाला जुना अवतार, त्याचे शब्दांवर मांड ठोकणे अनुराग विसरला नव्हता. ऑफिसातल्या भेटीत पियुषने जो माहोल उभा केला होता त्यानं अनुराग एकदम प्रभावित झाला. पियुषने रचलेली जुनी गाणी 'जब शहर हमारा सोता है!' आणि 'दुनिया' फिट्ट बसली असती गोष्टीत किंवा पार्श्वभूमीवर. थोडेफार बदल केले कथानकानुसार आणि ही गाणी तयार झालीपण!

'शहर' च्या ओळी वर येऊन गेल्यात. अख्खी कविता वाचण्यासारखी आहे. वानगीदाखल..

"अधनंगे जिस्मों की देखो लिपी-पुती सी लगी नुमाइश होती है
लार टपकते चेहरों को कुछ शैतानी करने की ख्वाहिश होती है
वो पूछे हैं हैरां होकर, ऐसा सब कुछ होता है कब
वो बतलाओ तो उनको ऐसा तब-तब, तब-तब होता है
जब शहर हमारा सोता है..."

वाटतंय ना असं की हे शब्द आजच्या वास्तवापुढे चकचकीत आरसा मांडताहेत?

'दुनिया' ची गोष्ट निराळी. वरवर पाहता वाटतं की साहिरच्या करूणसुंदर कवितेवर हे ग्राफ्टींग का केलंय? पण गंमत निराळीच आहे. साहिरचं 'ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है' कारुण्याच्या उच्च पातळीवर जातं तर पियुषची दुनिया जरा रोखठोक. आहे हे असं आहे. इथे सगळंच टाकाऊ नाही, काही चांगलं आहेच. पण त्याचा फार उदोउदो नको कारण पायाखाली जाळ पेटलाय. इथे सौंदर्याची, माणुसकीची उंच शिखरं आहेत तशाच हीनत्वाच्या, ज्वालाग्राही मनोविकारांच्या गर्ताही. किंबहुना एक आहे म्हणुन दुसर्‍याचं वेगळं अस्तित्व आहे. सद्हेतू बाळगून काही करायला जाणारे किती जण बिघडले इथे! आणि चिखलातुन उठून किती जणांनी सुंदर लेणी निर्माण केली.. आधी समजून घ्या या दुनियेला. लगेच घाण येते म्हणुन नाकाला फडकं नको. आणि आरतीचं तबक देखील नकोच!

जैसी बची है वैसी की वैसी बचा लो ये दुनिया
अपना समझके अपनों के जैसी उठालो ये दुनिया
छुट पुट सी बातों में जलने लगेगी संभालो ये दुनिया…
कट पिट के रातों में पलने लगेगी संभालो ये दुनिया..

पण पुढे जाऊन चित्र बदलतं. हे असं आहे म्हणुन थांबुन चालणार नाही, पुढे जावंच लागणार. पुर्वी पुष्कळ उत्तरं मिळाल्यासारखं वाटलं, शोधणार्‍यांनी पुष्कळ नावं दिली उत्तरांना. पण प्रश्न सुटलेच नाहीत अजुन. लख्खं उजेडी हातात दिवली घेऊन फिरण्याची गरज अजून आहेच की!

आलिम ये कहता वहाँ इश्वर है
फाजिल ये कहता वहाँ अल्लाह है
काबुर ये कहता वहाँ इसा है
मंजिल ये कहती तब इंसान से की

तुम्हारी है तुम ही सम्भालों ये दुनिया
ये बुझते हुए चंद बासी चरागों
तुम्हारे ये काले इरादों की दुनिया…

ओ री दुनिया..

मग पेटी ओढली पुढ्यात, सूर लावला आणि एकेक गाणं अस्तित्वात आलं. आवाज आतलाच, स्वतःचा. इतर गाणीही लिहिली, रचली चोख.

हात शिवशिवत होते काही रोल करायला. तसा रोल मिळाला. पृथ्वी बानाचं कॅरेक्टर म्हणजे हतबल, डोळे उघडे ठेऊन नि:संतान होणं पहाणार्‍या, तिरकस बोलणार्‍या 'कॉन्शन्स कीपर' माणसाचं. गळ्यात जॉन लेननचे लॉकेट, बॅन्डवाल्याचा ड्रेस आणि सावलीसारखा सोबत असणारा 'अर्धनारिश्वर'. थोडं अतिवास्तववादी झालंय पण अर्धनारिश्वराचा 'प्रॉप' सारखा उपयोग करून घेतो पृथ्वी बाना.

या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा स्टारडस्ट पुरस्कार पियुषला मिळाला. गीतकार म्हणुनही नावाजलं गेलं.

आता आभाळ मोकळं व्हायला लागलं होतं आणि दिशा सापडली होती.

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

क्रमशः

field_vote: 
0
No votes yet