चौसष्ट्तेरा
चौसष्ट्तेरा
लेखक - जयदीप चिपलकट्टी
एखादी कलाकृती चौसष्ट्तेरा असणं म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणं देतो.
(१) पिएरो मान्झोनीची 'मेर्दा द आर्तीस्ता' ही कृती. यामध्ये त्याने काही पत्र्याच्या चपट्या डब्या आतमध्ये स्वत:ची विष्ठा घालून सीलबंद केल्या आहेत, आणि प्रत्येकीवर तारखेचं लेबल लावून सही केलेली आहे.
अनेक कलाकृतींच्या बाबतीत त्यांचा निर्माता कोण आहे याला फार महत्त्व असतं. उदाहरणार्थ, 'वीनर डॉग' या नावाचं एक कुत्र्याचं चित्र आहे. ते पिकासोने काढलेलं आहे अशी एके काळी समजूत होती, तेव्हा या चित्राची बाजारातली किंमत खूपच होती. पण ते खरोखरीच त्याचं आहे का यावर नंतर कुणीतरी शंका घेतली, तेव्हा ही किंमत एकदम खाली आली. भोळा विचार केला तर याची संगती लागत नाही. 'वीनर डॉग' हे एक चित्र म्हणून चांगलं आहे की वाईट एवढ्यावरच त्याची किंमत ठरायला हवी. चांगलं असेल तर किंमत चांगली येईल, नपेक्षा वाईट येईल. ते कुणी काढलेलं आहे याला महत्त्व असू नये. पण ते प्रत्यक्षात असतं याचं आश्चर्य कुणालाही वाटत नाही.
मान्झोनीने याची खिल्ली उडवलेली आहे. 'कलाकारा'ची विष्ठा ही तुमच्यामाझ्या विष्ठेपेक्षा अशी काय मूल्यवान असणार आहे? किंवा तिच्यामागची निर्मितिप्रक्रिया ही तुमच्यामाझ्यातल्या प्रक्रियेपेक्षा काय वेगळी असणार आहे? आणि डबी अपारदर्शक असल्यामुळे, त्याची विष्ठा खरोखरीच आत आहे की नाही, हे कलाकृती नष्ट न करता कसं समजणार? समजा अल्फा नावाच्या व्यक्तीने औत्सुक्यापोटी त्यातल्या एका डबीचं सील उघडलं, आणि डीएनए अॅनॅलिसिसवरून त्याला असा शोध लागला की, आतली विष्ठा मान्झोनीची नव्हे, तर 'कलाकार' नसलेल्या कोण्या सामान्य माणसाची आहे. अशा परिस्थितीत आपली (किंवा जगाची) फसवणूक झाली असं अल्फाला म्हणता येईल का? समजा डबी उघडली जाऊ नये अशीच मुळात बीटाची इच्छा होती; पण ती मी उघडली आणि माझा अपेक्षाभंग झाला, असं अल्फाने त्याला सांगितलं. तर आता या कलाकृतीचा अर्थ आपल्यासाठी बदलला असं बीटाला वाटेल का? इतर कोणत्याही कलाकृतीप्रमाणेच या पत्र्याच्या डब्यांचीदेखील कलावस्तूंच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खरेदीविक्री होते. अल्फाने आपल्याला लागलेल्या या शोधाचा जर गौप्यस्फोट केला, तर या डब्यांच्या बाजारू किंमतीत काय चढउतार होईल? जो काही होईल आणि ज्या कारणांसाठी होईल, त्याची खिल्ली उडवण्यासाठी एक नवी कलाकृती निर्माण करता येईल का?
(२) अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे १९९०च्या सुमाराला, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर आधारित अशी एक सीरियल 'दूरदर्शन'वर होती. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने तिला थोडंफार अनुदानही दिलेलं होतं. या सीरियलमधल्या 'चौसष्ट्तेरा' या एपिसोडचं कथानक असं: आडगावातला लहानसा एस.टी. स्टँड होता. तिथे नेहमी त्याच त्या ठरावीक बसगाड्या वावरत असल्यामुळे, आणि त्यांच्यावरचे ड्रायव्हरही नेहमीचेच असल्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गाडीनंबरने हाक मारायची प्रथा पडून गेलेली होती. म्हणजे समजा, MHK 3897 बऱ्याचदा जाधव ड्रायव्हरकडे असत असेल, तर त्याला अडतीससत्याण्णव म्हणत. तर चौसष्टतेराला दारू प्यायची सवय होती, आणि ताकीद देऊनही उपयोग झालेला नव्हता. एके दिवशी तो स्टँडवरून निघाल्यानंतर काही वेळाने अशी बातमी येऊन पोहोचली की, चौसष्टतेराने बस झाडावर आदळली, पण नुकसान किरकोळ आहे. त्याच्या पाठीमागे शिव्यांचा भडिमार झाला, आणि चौसष्टतेराला डिसमिस केला पाहिजे असं सगळे म्हणू लागले. हे आपण आधीच का केलं नाही म्हणून डेपो कंट्रोलर कानकोंडा झाला. आणखी काही तासांनी बातमीचा तपशील कळला तो असा की, बस चालवताना चौसष्टतेरा पूर्ण शुद्धीवर होता. ओव्हरटेक करत समोरून ट्रक आला; तो चुकवण्यासाठी म्हणून त्याने झाड दिसत असतानाही बस जाणूनबुजून डावीकडे वळवली. छातीत स्टिअरिंग घुसून चौसष्टतेरा जागच्याजागी मेला, पण प्रवाशांचे प्राण वाचले. त्याला दिलेल्या शिव्या, देणाऱ्यांजवळ आयुष्यभर राहिल्या.
'मेर्दा द आर्तीस्ता' आणि हा एपिसोड, या दोन्ही कलाकृतींतलं साम्य असं की, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही तरी चालेल, किंवा जवळजवळ चालेल. वर मी मान्झोनीच्या कलाकृतीचं वर्णन केलेलं आहे, तिचा मला जाणवलेला अर्थ दिलेला आहे, आणि त्यातून माझ्या मनात उद्भवलेले काही प्रश्न (किंवा खरंतर Gedankenexperiments) विस्कळीत स्वरूपात मांडलेले आहेत. हा अर्थ न पटल्यास तुम्ही वेगळा अर्थ लावू शकता, किंवा या प्रश्नांत तुम्हांला रस न वाटल्यास स्वत:चे वेगळे प्रश्न विचारू शकता. जे काही करायचं, ते करायला तुम्ही मुखत्यार आहात; पण डबी प्रत्यक्ष समोर बघितल्यामुळे याबाबतीत काही फरक पडेल असं वाटत नाही.
जिचा मी वर उल्लेख केला, ती सीरियल अस्तित्वात नाही. अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे १९९० च्या सुमाराला, कुठल्यातरी दिवाळी अंकात मी एक दीर्घकथा वाचली होती. त्यामधल्या एका पात्राला, अशा सीरियलची आणि विशेष म्हणजे त्यातल्या अशा एका एपिसोडची कल्पना सुचली होती, आणि ती त्याने दुसऱ्या एका पात्राला वर्णन करून सांगितली होती. तेव्हा त्या कथेतल्या पात्रांसाठीदेखील ही सीरियल अजून प्रत्यक्षात आलेली नव्हतीच. पण म्हणून काहीच बिघडत नाही. 'एका चांगल्या माणसाला विनाकारण दोष दिला जाणं, आणि नंतर त्याबद्दल माफी मागण्याची संधी काही कारणाने निसटल्यामुळे हळहळ वाटत राहणं' ही थीम, माझ्या मते, या अस्तित्वात नसलेल्या एपिसोडमधून व्यक्त झालेली आहे. मी लावलेला हा अर्थ तुम्हांला न पटल्यास स्वत:चा अर्थ लावायला तुम्हांला पूर्ण मोकळीक आहे. दीर्घकथेत दिलेलं वर्णन ह्यासाठी पुरेसं होतं; आणि ती कथा जर तुम्ही वाचलेली नसेल, तर त्या वर्णनाचं मी केलेलं वर्णनही तितकंच पुरेसं आहे.
'ज्या कलाकृतीचा परिणाम तिच्या प्रत्यक्ष आस्वादावर बव्हंशी अवलंबून नसतो' त्या कलाकृतीला चौसष्टतेरा म्हणावं असं काहीसं मला अभिप्रेत आहे. (तो परिणाम कशावर अवलंबून असतो याबद्दल इथे काही म्हटलेलं नाही.) पण अशा प्रकारच्या व्याख्या निर्दोषपणे करणं अवघड आहे, आणि एवीतेवी त्यांच्या उपयुक्ततेबद्दल मला फार शंका आहेत. (इथे गुंतागुंत अशी की, 'चौसष्टतेरा' हा एपिसोड जर अस्तित्वात असता, तर तो बहुतेक चौसष्टतेरा राहिला नसता. कदाचित निळू फुल्यांनी चौसष्टतेराचं काम आवर्जून बघण्यासारखं केल्यामुळे ते बघणं आपल्याला भाग पडलं असतं.)
(३) 'चौसष्टतेरा' या कल्पनेचं हे सर्वांत सोपं उदाहरण असू शकेल. जॉन केजच्या 4'33'' ह्या संगीतरचनेमध्ये कलाकार पियानोसमोर येतो, आणि घड्याळ लावून चार मिनिटं तेहतीस सेकंद स्तब्धपणे बसून राहतो. हा कालावधी शांततेचा त्रास व्हावा इतका मोठा आहे, पण ती असह्य व्हावी इतका मोठा नाही. अनेक कॉन्सर्ट हॉल्समध्ये या रचनेचे प्रयोग झालेले आहेत. अशा ठिकाणी महागाची तिकिटं काढून, भारीतले कपडे घालून, दाटीवाटीने बसावं लागल्यामुळे मनावर दडपण येतं; आणि परिणामी बूट घासल्याचे, कार्यक्रमपत्रिका चाळल्याचे, जड श्वासोच्छवासांचे किंवा हलक्या खोकल्याचे आवाज काढणं यापलीकडे या चार मिनिटं तेहतीस सेकंदांमध्ये ऐकणाऱ्यांचं योगदान असत नाही. पण जर 19'' (एकोणीस सेकंद) किंवा 1˚22'55'' (एक तास, बावीस मिनिटं, पंचावन्न सेकंद) या अजून अस्तित्वात नसलेल्या संगीतरचनांचे असेच प्रयोग करायचे ठरवले, तर वेगळे अनुभव येऊ शकतील. तेव्हा 4'33'' चा संपूर्ण परिणाम लक्षात घेण्यासाठी याही शक्यता मनात धरायला हव्यात; याचाच अर्थ 4'33'' ही चौसष्टतेरा कलाकृती तितक्याच चौसष्टतेरा असलेल्या इतर अनेक कलाकृतींवर अवलंबून आहे.
(४) अमुक एक कलाकृती चौसष्टतेरा आहे की नाही, आणि असेल तर किती प्रमाणात, हे ठरवणं काही वेळा सोपं नसतं; उदाहरणार्थ, आन्द्रेस सेरानोचं 'इमर्शन (पिस क्राईस्ट)' हे छायाचित्र. यामध्ये त्याने स्वत:ची लघवी एका काचेच्या जारमध्ये भरून घेऊन, त्यात एक क्रुसिफिक्स बुडवून, फोटो काढलेला आहे. इथे दोन वेगळे मुद्दे आहेत:
➤ यामागची sacrilege, म्हणजेच पावित्र्यहनन ही कल्पना. ती जाणवण्यासाठी फोटो पाहण्याची गरज नाही; क्रुसिफिक्स ही पवित्र वस्तू आहे, आणि लघवीचा स्पर्श घाणेरडा समजतात इतकं प्राथमिक ज्ञान यासाठी पुरेसं आहे.
➤ चमकत्या द्रवातून दिसणारी क्रुसिफिक्सवर खिळलेली येशू क्रिस्ताची अस्पष्ट आकृती. हा दृश्य परिणाम अनुभवण्यासाठी फोटो पाहण्याखेरीज गत्यंतर नाही असं सुरुवातीला वाटतं, पण हे इतकं सरळ नाही. गूगलमध्ये या फोटोवर जर इमेज सर्च केला, तर लघवीचा रंग काही प्रमाणात लालसर दिसतो. (सेरानोने फोटो री-टच केला होता, त्याची लघवी तशा रंगाची होती, की इतर काही कारण यामागे आहे, हे मला माहीत नाही.) इतकंच नव्हे तर या लालपिवळ्या रंगछटा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या दिसतात; तेव्हा मूळ रंग कोणता (आणि या प्रश्नाला काही अर्थ आहे का) याबद्दल अनिश्चिती राहतेच. एका प्रतिमेकडे दोन व्यक्तींनी पाहिलं, तर त्यांना तोच रंग दिसतो का, या सैद्धान्तिक आडरानात न शिरताही हा मुद्दा स्पष्ट आहे. मग असं जर असेल, तर फोटोला बगल देऊन हा रंग मनातच पाहिला तर काय बिघडेल? आणि असं जर असेल, तर 'पिस क्राईस्ट' ही कलाकृती पूर्णपणे नसली, तरी पुष्कळच चौसष्टतेरा आहे असं म्हणता येईल.
या प्रकरणाला एक पुस्ती आहे. फ्रान्समध्ये अॅव्हिन्यॉ शहरातल्या एका प्रदर्शनात हा फोटो ठेवला गेला होता, आणि क्रिस्ताचा अपमान झाल्याबद्दल चिडलेल्या एका माणसाने त्यावर हातोडा मारला. यामुळे तयार झालेल्या नव्या कलाकृतीलादेखील चौसष्टतेरा म्हणता येईल, कारण जाड पुठ्ठ्यावर हातोडा मारला तर कसं दिसेल याची ढोबळ कल्पना प्रत्येकाकडे असते.
(५) किरण नगरकरांच्या 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबरीमध्ये शिरीन नावाच्या एका पारशी बाईचं वर्णन येतं:
त्या पारशी बाईच्या खोलीत अजून दिवा जळतोय. पंधरा वर्षं एकटी राहिलेली शिरीन रात्री दोन वाजता दिवा लावून काय करते? उरलेली पंधरा आणि अधिक वर्षं अशीच. लग्न नाही करणार ती. काटक्यांनी बनवलेली. साडीत बांधलेली. तिच्या चोळीच्या गळ्याबाहेर नवजोतपासून घालत आलेला सफेद सदरा. सोललेल्या कोंबडीसारखी. फक्त वरचा तुरा राहिलाय. लिहीत असेल. पुढच्या खेपेला भेटेल तेव्हा वाचावं लागेलच. कुठल्याही घोळक्यामधे तिचा एकलकोंडेपणा तिला हुडकून काढतो. तिच्या इच्छेनुसार, विरुद्ध, नकळत तिला वाळीत टाकतो. आता त्याचं तिला व्यसन जडलंय. एकमेकांशिवाय त्या दोघांचं चालत नाही. इतकी वर्षं बेकार पडलेलं तिचं मिसळण्याचं इंद्रिय आता काम देईनासं झालंय. तिला एकांत चढतो. तंबाखू दाढांवर गिरवतात तसा ती त्याला स्वत:वर चोळते. मग तल्लफ आली की कविता करायला लागते. आपल्या अलिगढमधल्या बालपणावर. लढाईच्या दिवसांत पाहिलेल्या जय जवानाला उद्देशून एक टापटीप अलिप्त कविता. एकदाच जाणवलेल्या कदाचित प्रेमावर लेझबियनिझमचं दडपण आहे असा भास करून घेते. पॅरिसमधल्या आपल्या अकरा वर्षांना आळवते. शेजाऱ्यांच्या वैकुंठवासी मांजरावर कडवी रचते. एक पान. जास्तीत जास्त दीड पान… आखूड भावनांवर आखूड कविता… तिच्यासारख्याच रक्तहीन. किंचित बेचव. मोजूनमापून आयरनी…
शिरीन आणि कादंबरीचा नायक कुशंक यांच्यातलं जे संभाषण कादंबरीत यापुढे दिलेलं आहे, ते इंग्रजीत आहे, आणि एकूण संदर्भांवरून शिरीनला फारसं मराठी येत असावं असं वाटत नाही. तेव्हा तिच्या या कविता इंग्रजीत असाव्यात असं समजणं अतार्किक नाही. पण 'लेझबियनिझमचं दडपण' व्यक्त करणाऱ्या कवितेत अध्येमध्ये तुटक फ्रेंच ओळी असूही शकतील. ही कविता काय असेल याबद्दल वाटत असलेलं कुतूहल शमणं फार अवघड आहे. उपलब्ध सामुग्रीच्या आधारे ती स्वत: करून पाहणं हा एक उपाय यावर आहे, पण तोही अमलात आणणं तितकंच अवघड आहे. एकतर शिरीनचं जे वर्णन दिलेलं आहे, त्यावरून तिचं भावविश्व पूर्णपणे निश्चित होतं आणि ती कशा प्रकारच्या कविता करत असेल हे नेमकं समजतं, असं गृहीत धरणं धार्ष्ट्याचं ठरेल. आणि जरी समजलं, तरीही त्या भावविश्वाचा स्वत: अंगीकार करून तिच्यासारखी कविता करणं हा परकायाप्रवेश फार बिकट आहे. (सर्वसाधारणपणे तंबाखू दाढांवर गिरवल्यानंतर तल्लफ न येता जाते, पण याबाबतीत शिरीन चारचौघींपेक्षा वेगळी आहे. मग इतरही बाबतींत का असणार नाही?)
निष्कर्ष असा की शिरीनची ही कविता चौसष्टबारा आहे, कारण चौसष्टतेरा होण्यासाठी तिच्यात काहीतरी कमी आहे. पण हे एका आकड्याचं अंतर कितीही प्रयत्न केला, तरी कापता येण्यासारखं नाही.
प्रतिक्रिया
६४१३ का? (बाकी प्रतिक्रिया
६४१३ का?
(बाकी प्रतिक्रिया सवडीने)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
६४१३ का?
कारण त्यांत ३ १४ खुबीने लपवला आहे म्हणून असावे,
हम्म. इंटरेस्टिँग! लेख आवडला.
हम्म. इंटरेस्टिँग! लेख आवडला.
.
.
'ज्या कलाकृतीचा परिणाम तिच्या
हे फारच गमतीदार प्रकरण आहे. 'मीडियम इज द मेसेज' च्या बरोब्बर विरुद्ध. माध्यम बाजूला काढलं, निर्माता बाजूला काढला तरीही परिणामात काही फरक पडत नाही ती चौसष्ट्तेरा.
पण हे तरी पूर्णपणे खरं आहे का? त्या कलाकृतीच्या अस्तित्वाचं ज्ञान आवश्यकच आहे. कदाचित 'तेवढं ज्ञान पुरेसं असणं' हा ६४१३ प्रकाराचा निकष असावा. पण हे ज्ञान पोचवावं कसं? शब्दांनी, वर्णनांनी? मग पुन्हा आपण कुठल्यातरी माध्यमात अडकतो. की तेवढे तरल, विरल माध्यमाचे पिंजरे असले तर चालवून घ्यावं?
हे प्रश्न पूर्णपणे सुटले नसले तरी मला एक कलाकृती या कॅटेगरीत बसते का याचा विचार व्हावा असं वाटतं. १९९० च्या दशकात अमेरिकन वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी आली होती. काही कलाकारांनी अमेरिकन सरकारकडून कलाकारांसाठीची हजारो डॉलर्सची ग्रांट घेतली होती. त्या पैशांचं त्यांनी काय केलं असावं? युएस मेक्सिकन बॉर्डरवर जाऊन त्यांनी मेक्सिकनांना प्रत्येकी दहा दहा डॉलरच्या नोटा वाटल्या. हे त्यांनी मीडियातल्या लोकांना सांगून केलं. साहजिकच ही बातमी पसरली आणि लोकांचा संताप वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त झाला. या कलाकारांनी आपली कलाकृती यशस्वी झाल्याचं जाहीर केलं. वर्तमानपत्रं, टीव्ही न्यूज हे त्यांचं कलाकृतीचं माध्यम होतं. यांमध्ये बातम्यांची स्पंदनं निर्माण करणं हीच त्यांची कलाकृती. अवघे दहा वीस हजार डॉलर खर्च करून इतक्या मोठ्या प्रमाणात स्पंदनं निर्माण करणं, कोट्यवधी लोकांपर्यंत पोचणं सोपं नसतं. अर्थातच त्यांनी या सगळ्याला कलाकृती म्हटल्यावर आणखीन गदारोळ उमटला. शेवटी हे शमलं कसं हे आता लक्षात नाही.
या प्रकाराला ६४१३ म्हणता येईल का असा प्रश्न आहे. कदाचित मी ६४१४ म्हणेन. म्हणजे या कलाकृतीचा आस्वाद लुटणं यासाठी तुम्हालाच त्या कलाकृतीचा भाग व्हावं लागतं. किंबहुना तुम्ही जिचा जाहीरपणे आस्वाद लुटता तो आस्वाद हीच ती कलाकृती ठरते. आस्वादाव्यतिरिक्त त्या कलाकृतीला अस्तित्वच नाही.
हा लेख ६४१३ नाही असे
हा लेख पूर्णतः ६४१३ नाही असे वाटते. पण समजा कुणाचे अमुक एक प्रकारची कला प्रसवण्याबद्दल रेप्युटेशन आहे आणि त्याला सुसंगत असेच एखादे चित्रबित्र त्याने काढले तर त्याच्य मूल्याचे पर्सेप्शन जे काही होईल त्यानुसार ते ६४१३ थोडे तरी ठरेलच असे वाटतेय. थोडक्यात, ६४१३ पणापासून पिस ख्राईस्ट काय किंवा बाकीची 'चांगली' चित्रे काय, कुणाचीच पूर्णांशाने सुटका नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्वप्ने
'ज्या कलाकृतीचा परिणाम तिच्या प्रत्यक्ष आस्वादावर बव्हंशी अवलंबून नसतो'>>>
रोचक स्वप्ने ही ६४१३ टाईप कलाकृती असतात की ८११७ टाईप? मुळात स्वप्ने ही कलाकृती असतात का?
जर ती झोपेतून जागे झाल्यावर आपल्याला आठवली आणि ती आपण इतरांना सांगितली (किंवा इतरांनी त्यांना आठवणारी त्यांची स्वप्ने आपल्याला सांगितली) तर मग त्यांचा टाईप कोणता?
परंतु चौसष्टतेरा ही कलाकृती चौसष्टतेरा म्हणून पटत नाही
जयदीप चिपलकट्टी यांची "चौसष्टतेरा" ही निबंध-अंतर्गत कलाकृती आहे. म्हणजे एका काल्पनिक दूरदर्हन मालिकेतल्या काल्पनिक भागाचे संक्षिप्त वर्णन आणि आस्वादग्रहण. ही कलाकृती मूर्त आहे, तिला स्वतःचा आशय आहे, स्वतःचे माध्यम आहे. एखाद्या काल्पनिक राजाच्या युद्धातील काल्पनिक विजयाचे वर्णन आणि त्यातून नैतिक बोध असलेल्या कलाकृती तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. इतकेच का? - महाभारत म्हणजे अमुक कथेचा नैमिषारण्यात कोणी तमुक ऋषीने वृत्तांत सांगितला त्याचा वृत्तांत आहे!
"काल्पनिक कलाकृतीचे वर्णन आणि रसग्रहण" या genre ची जातकुळी वेगळी, आणि या "मेर्दा दि आर्तिस्ता"ची वेगळी. बोर्हेसने "नसलेल्या कलाकृतींची रसग्रहणे" अनेक लिहिली, आणि त्या सर्व "कथा" नेहमीच्या कथांप्रमाणे रसिकांनी मान्य केल्या. ती रसग्रहणे म्हणजे कोरी पाने नाहीत, लेखकाला काळजीपूर्वक, कलात्मक शब्दांकन करावेच लागले.
जॉन केजची ४'३३" सुद्धा "मेर्दा दि आर्तिस्ता"च्या जोडीने वर्गवारी करण्यालायक आहे का? याबाबत मी साशंक आहे. परंतु श्री. चिपलकट्टी यांच्या "चौसष्टतेरा" या अंतर्गत कलाकृतीपेक्षा या दोन्हीना एका वर्गात बसवण्यास मी तयार आहे.
लॉरेन्स स्टर्नने त्याच्या "ट्रिस्ट्रम शॅन्डी" कादंबरीत एक प्रकरण म्हणजे पानभर काळा चौकोन, हा प्रयोग केलेला आहे. परंतु उर्वरित कादंबरीच्या चौकटीत असल्यामुळे हा प्रयोग ४'३३"पेक्षा वेगळा आहे. तरी ४'३३"ला सुद्धा चौकटीची आवश्यकता आहे. या संगीत-कलाकृतीचे स्टूडियो (ऑडियो) रेकॉर्डिंग करून चालायचे नाही. चित्रफीत हवी. पियानो हवा. काही न-वाजवणारा पियानो"वादक" हवा.
"मेर्दा दि आर्तिस्ता" आणि ४'३३" यांच्या मधला दुवा जोडणारे मार्सेल दुशांपचे "फाउंटन" मानले, तर कलाकृतींचे हे वर्गीकरण काहीसे एकसंध म्हणून समजण्यास मदत होते. (दुवा : यात एक मुतारी टेबलावर उलटी ठेवलेली आहे, आणि "फाउंटन" हे नाव दिलेले आहे. R Mutt अशी सही त्यावर आहे.)
कलाकॄती आवडली, आस्वाद घेतो आहे.
यापेक्षा योग्य प्रतिसाद देऊ शकलो नसतो.
-Nile
खरं सांगु का? काही नीट कळ्ळं
खरं सांगु का? काही नीट कळ्ळं नाही
आमच्या आकलनक्षमतेचा दोष हो.. दुसरं कै नै!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सिक्सर
गावस्करने कधीच न मारलेल्या उत्तुंग षटकाराचे वर्णन ६४१३ होइल का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
येस. पण गावसकरच्या बाबतीत ते
येस. पण गावसकरच्या बाबतीत ते चौकाराचे वर्णन असेल तर जास्त ६४१३ नेस येईल असे वाट्टे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेख आवडला.
लेख आवडला.
वर्ड्सवर्थचे Yarrow Unvisited
वर्ड्सवर्थची Yarrow Unvisited नावाची कविता आहे. तिच्यात तो अखेरीस म्हणतो:
"Be Yarrow stream unseen, unknown!
It must, or we shall rue it:
We have a vision of our own;
Ah! why should we undo it?
The treasured dreams of times long past,
We'll keep them, winsome Marrow!
For when we'er there, although 'tis fair,
'Twill be another Yarrow!
"If Care with freezing years should come,
And wandering seem but folly,—
Should we be loth to stir from home,
And yet be melancholy;
Should life be dull, and spirits low,
'Twill soothe us in our sorrow,
That earth has something yet to show,
The bonny holms of Yarrow!"
यॅरो गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे अशी कवीचा विश्वास आहे तरीहि त्याला तेथे जायचे नाही कारण गाव पाहिले तर त्याच्या मनातील त्या गावाची प्रतिमा नष्ट होईल असे त्यास वाटते. तसे होण्यापेक्षा ती प्रतिमा जपून ठेऊन तिच्या आधाराने वार्धक्याच्या दिवसात आपले दिवस सुसह्य होतील असे त्यास वाटते.
कवीच्या मनातील यॅरो हे चौसष्टतेराच आहे कारण प्रत्यक्षात - ते सुंदर असले तरीहि - प्रतिमेहून निराळेच असणार. यॅरोचे ते अस्तित्वहीन दृश्य हे चौसष्टतेराच आहे असे मी म्हणेन.
ही वाट दूर जाते -
"ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का
तेथे असेल रावा?"
या कवितेतली "स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे" ही ओळ तर अगदीच खलास करते.