कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १

कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १

लेखक - शैलेन

सहजपणे खिशात हात घातल्यावर हाती एखादे नाणे लागते, ते बहुधा रुपयाचेच असते. रुपयाचे दैनंदिन जीवनातले महत्त्व 'दाम करी काम आणि रुपया करी सलाम', 'रुपयाभोवती दुनिया फिरते' अशा म्हणी आणि वाक्प्रचारांतून, तसेच 'सब से बडा रुपैया' वगैरे हिंदी फिल्मी गाण्यांतून आपल्याला सतत जाणवत असते. स्टेनलेस स्टीलचे तेज असलेला, एका बाजूला 'अशोक स्तंभ' तर दुसऱ्या बाजूला मूल्य आणि नवीनच राजमान्यता मिळालेले ते विवक्षित चिन्ह असलेला हा आपला 'भारतीय' रुपया! अर्थात जगात इतरही काही देशांमध्ये 'रुपया' हे चलन चालते. पाकिस्तान, नेपाळ किंवा श्रीलंका हे तर आपले शेजारीच, परंतु तुलनेने दूर असलेल्या इंडोनेशिया, मॉरिशस किंवा सेशल्स अशा देशांमध्येही 'रुपया'ने आपले स्थान पटकावलेले आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण भारतीय उपखंडाच्या सामुद्री सीमेच्या पल्याड असलेल्या अरब देशांमध्ये चलनात भारतीय रुपयाच वापरला जायचा - अगदी चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीपर्यंत!

तर अशा ह्या रुपयाची ही कहाणी - पूर्वीच्या 'कहाण्यां'सारखी ही 'सुफळ संपूर्ण' होईल की नाही हे अजून ठरायचे आहे, पण 'साठां उत्तरां'तून 'पाचां उत्तरी' तरी तिला आताच करावे लागेल, कारण रुपयाचा इतिहास लिहायचा झाला तर त्याला काही खंड लागतील आणि इथे तर आपल्या हाती आहेत फक्त काही पाने!


'रुपया' म्हणजे काय? ह्या प्रश्नाने कहाणीची सुरुवात करायला हरकत नाही. प्रश्नाची उत्तरे एकापेक्षा जास्त आहेत आणि वरवर पाहता सोपी आहेत - 'रुपया' म्हणजे एक नाणे, किंबहुना एक 'मूल्यांक'; 'रुपया' म्हणजे शंभर पैसे आणि 'रुपया' म्हणजे 'पैसा' सुद्धा - 'अर्थ' किंवा 'वित्त' अशा अर्थाने! आणि रुपया हे सर्व आहे, म्हणजेच तो 'विनिमयाचे साधन'ही आहे; आपण त्याचा वापर मुख्यतः 'किंमत चुकती करण्यासाठी' करतो. 'किंमत चुकती करण्यासाठी वापरले जाते ते वित्त' ही 'पैशा'ची किंवा 'वित्ता'ची अगदी प्राथमिक स्वरूपाची व्याख्या झाली. नाणी हे त्याचमुळे 'वित्त' होऊ शकते, पण 'विनिमया'चे साधन म्हणून 'वित्ता'चा पसारा फक्त नाण्यापुरता मर्यादित नाही - त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो.

नाण्यांचा प्रवेश विनिमयाच्या पटावर व्हायच्या आधीपासून मानवी समाज वित्तीय व्यवहार करत आलेले आहेत. वस्तूंच्या देवाणघेवाणीतून विनिमय आणि वित्तीय व्यवहाराची सुरुवात झाली आणि लवकरच विनिमयाचे एक साधन म्हणून धातूंचा वापर होऊ लागला. ठराविक वजनाचे चांदी किंवा सोन्याचे ठोकळे व्यवहारात वापरले जाऊ लागले. ख्रि.पू. २५०० वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियन संस्कृतीतल्या 'कोनमय' अथवा 'क्युनिफॉर्म' लिपीत लिहिलेल्या लेखांमध्ये कर्जव्यवहार, मुद्दल आणि व्याजासंबंधी करारपत्रे, खरेदीविक्री आणि तत्सम व्यवहार इत्यादी वित्तीय व्यवहारांचा समावेश असलेले अनेक लेख सापडले आहेत. 'मिन', 'शेकेल' इत्यादी वजन-दर्शक शब्दांचा वापर ह्या लेखांमध्ये 'मूल्य' दर्शवण्यासाठी केला गेला आहे. आपल्याकडे वेदिक साहित्यातही 'हिरण्य' किंवा 'निष्क' अशा धातूंपासून बनलेल्या विनिमय साधनांचा उल्लेख सापडतो. तसेच 'शतमान' नामक वजनाचाही उल्लेख अशा संदर्भांत केलेला आहे. 'शंभर वजनाचे' असा त्याचा सरळ अर्थ आहे, सबब हे वजन शंभर गुंजा इतक्या वजनाचे असावे असा काही विद्वानांचा कयास आहे.


धातूंचा वापर विनिमयाचे साधन म्हणून होऊ लागला तरी त्यात एक मोठा प्रश्न उद्भवे - धातूची किंमत ही अखेरीस त्याच्या शुद्धतेवर अवलंबून असणार आणि वापरल्या गेलेल्या धातूचे वजन जरी प्रत्यक्ष पडताळून बघता येत असले तरी त्याची शुद्धता सहजासहजी जाणणे ही काही सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यातली गोष्ट नाही! मग ह्या शुद्धतेची हमी कोण घेणार आणि ती तशी घेतली गेली आहे हे विनिमय करणाऱ्यांना कसे काय समजणार? ह्या कार्यकारणभावात शुद्धतेची हमी घ्यायला शासन-संस्था पुढे आली आणि ती घेतली गेली आहे हे उद्धृत करण्यासाठी धातूच्या तुकड्यावर चिन्ह उमटवले जाऊ लागले. हा होता 'नाण्यां'चा जन्म - आणि तो जगात सर्वप्रथम 'लिडिया' ह्या ग्रीक प्रांतात (हा सध्या तुर्कस्तानच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे), ख्रि.पू. ६५० च्या आगेमागे झाला असे प्राचीन इतिहास अभ्यासणाऱ्यांचे मत आहे. नाण्यांचा उपयोग विनिमयात होऊ लागणे ही जगाच्या वित्तीय इतिहासातील एक क्रांतिकारी पायरी समजली जाते, आणि ह्या क्लृप्तीचा उगम झाल्यावर तिच्या फैलावाला फारसा अवधी लागला नाही असे उपलब्ध पुराव्यानुसार दिसून येते.


भारतातील सर्वात प्राचीन नाणी साधारणतः ख्रि.पू. ४५० च्या सुमाराची आहेत असे तज्ञांचे मत आहे. ग्रीक जगतातल्या प्राचीनतम नाण्यांवर स्वामित्वदर्शक म्हणून लहान-लहान खुणा उमटवलेल्या असत. त्यानंतर लवकरच ग्रीक जगतांत ठशांपासून नाणी बनवण्यात येऊ लागली. नाण्यांवर जे अंकन होणे अपेक्षित असे ते उलट्या स्वरूपात ठशांवर कोरले जाई, मग धातूचा मान्य शुद्धतेचा आणि वजनाचा तुकडा अशा दोन ठशांच्या मध्ये ठेवून वरच्या बाजूच्या ठशावर हातोड्याने आघात केला जाई. आघातामुळे आलेल्या दाबाने ठशांवर असलेल्या चित्रणाचे अंकन नाण्यांवर होई. नाण्यांचे उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी ही प्रक्रिया उत्तम होती. परंतु सुरुवातीची दोनतीनशे वर्षे तरी भारतातील प्राचीनतम नाणी ही खुणा उमटवण्याच्या पद्धतीनेच बनवली जात राहिली. त्यांच्या दृश्य स्वरूपामुळे त्यांना 'आहत' नाणी किंवा 'पंच-मार्क्ड कॉइन्स' असे नामाभिधान प्राप्त झाले (चित्र १).
चित्र १ - 'आहत' नाणे, गोदावरी खोरे, महाराष्ट्र, ख्रिस्तपूर्व सुमारे चौथे शतक.


सध्याचा रुपया जरी स्टेनलेस स्टीलच्या रंगाचा आणि आतून शुद्ध लोखंडाचा असला तरी त्याच्या नावावरून आपल्या लक्षात येईल की ते त्याचे मूळ स्वरूप निश्चितच नाही. 'रुपया' ह्या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला दोन संस्कृत शब्दांपासून साधता येते - 'रुप' म्हणजे 'चांदी' आणि 'रुप्य' म्हणजे 'ठसा असलेले, घाट/आकार असलेले' म्हणजेच लक्षणार्थाने 'नाणे'! फार पूर्वीपासून भारतीय वित्तीय व्यवस्था ही 'चांदी-ग्राही' म्हणून प्रसिद्ध होती. सोन्याची कितीही भलामण प्राचीन साहित्यात केलेली असली, तरी प्रत्यक्ष पुराव्यानुसार नाण्यांकरता तरी प्राचीन भारतीयांनी थोडी-थोडकी नव्हे तर तीनचारशे वर्षे केवळ चांदीचा प्रामुख्याने वापर केला. 'रुप' म्हणजे 'चांदी', त्यापासून 'रुप्य' हे विशेषण आणि त्यापासून बनलेला तो 'रुपया' ही व्युत्पत्ती त्याचमुळे अधिक जवळची वाटते. वर उल्लेखिलेली प्राचीनतम अशी 'आहत' नाणीही चांदीचीच आहेत. ग्रीक राजा अलेक्झांडर जेव्हा भारताच्या सीमेवर तक्षशीला येथे येऊन ठेपला, तेव्हा तिथल्या अंभी नामक राजाने त्याला खंडणी म्हणून 'मुद्रित स्वरूपातील चांदी' दिली असा स्पष्ट उल्लेख ग्रीक इतिहासकार करतात. किंबहुना भारतात चांदीच्या नाण्यांचे प्रचलन हे ग्रीकांच्या आगमनापूर्वीच झालेले होते हे सांगणारा हा पुरावा आहे. विनिमयाचे साधन म्हणून चांदीवर असलेला भर हे भारतीय वित्तीय इतिहासातले एक महत्त्वाचे लक्षण आहे.


परंतु भारतात चांदीची खनिजे विशेष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नाण्यांसाठी चांदी ही बहुशः भारताबाहेरून इथे येत असे. इतकेच नव्हे, तर चांदीच्या आयातीत पडणाऱ्या फरकांमुळे भारतीय नाण्यांच्या उत्पादनावर तसेच स्वरूपावरही सखोल स्वरूपाचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. जेव्हा जेव्हा चांदी उपलब्ध होत राहिली तेव्हा तेव्हा त्या त्या वेळच्या राजकीय सत्तेने त्याचा भरपूर फायदा उठवला.


इ.स.च्या पहिल्या शतकात रोमन नौवित्तिकांना मान्सून वाऱ्यांचा 'शोध' लागला आणि भारतीय माल रोमपर्यंत पोचणे पूर्वीपेक्षा सुलभ झाले. रोमन नाणी युरोपात उपलब्ध असलेल्या चांदीपासून बनवली जायची. त्या चांदीच्या नाण्यांचा ओघ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरु झाल्यावर इथल्या राजकीय सत्तांमध्ये त्या धनावर स्वामित्त्व मिळवण्याच्या हेतूने युद्धे पेटली. सातवाहन आणि क्षहरात ह्या घराण्यांत संघर्ष होऊन त्यात सातवाहन विजयी झाले. रोमन संपत्तीचा ओघ पुढची दोनशे वर्षे अव्याहतपणे चालू राहिला आणि त्यातून दक्खनमध्ये 'नागरीकरणा'ला चालना मिळून अनेकानेक महत्त्वपूर्ण वास्तूंची आणि नगरांची निर्मिती झाली.


ज्याप्रमाणे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर होत असलेल्या व्यापारामुळे चांदीच्या आयातीला इतिहासाच्या प्राचीन कालखंडात चालना मिळाली, त्याचप्रमाणे मध्ययुगीन काळात बंगाल प्रांतात मिळाली. परंतु इथे चांदीचे आगमन पश्चिमेकडून न होता पूर्वेकडून झाले. चीनच्या दक्षिणेकडे असलेल्या युन्नान प्रांतात चांदीचे मोठे साठे आहेत, तिथून चांदी बंगालात येऊ लागली. बंगाल प्रांताच्या अर्थकारणात कवड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे, सबब आयात होणाऱ्या चांदीचे रुपांतर चांदीच्या नाण्यात झाले नाही. बाराव्या शतकात इतर उत्तर भारताप्रमाणे बंगालही तुर्की आक्रमकांच्या कबज्यात गेला. तुर्कांचे राजकीय केंद्र दिल्ली होते आणि त्यांची राज्यव्यवस्था करांच्या कठोर वसुलीवर अवलंबून होती. सबब नाण्यांच्या स्वरूपात कर भरण्यावर तुर्कांनी विशेष भर दिला, कारण तो तसाच्या तसा दिल्लीपर्यंत पोचवता येऊन सरकारी खजिन्यात त्याचा भरणा करता येई.

तुर्कांचे राज्य जसे जसे पसरत गेले तसे तसे त्या त्या भागात टांकसाळी स्थापन करण्यात आल्या. तुर्कांच्या मागोमाग दिल्लीच्या तख्तावर आलेल्या प्रत्येक घराण्याने ही परंपरा दरोबस्त चालवली. टांकसाळी उघडण्याचा आणखी एक फायदा होता. इस्लामी शास्त्राप्रमाणे प्रचलित नाण्यांवर राजाचे नाव असणे ही महत्त्वपूर्ण गोष्ट होती, कारण त्याद्वारे त्याची राजसत्ता धार्मिक दृष्टिकोनातून 'मान्य' ठरे. किंबहुना, 'सिक्का' म्हणजे नाण्यावरील उल्लेख आणि 'खुत्बा' म्हणजे शुक्रवारच्या प्रार्थनेत राजाच्या नावाचा उद्घोष हे इस्लामी धर्मशास्त्रान्वये राजाच्या 'राजत्त्वा'चे निदर्शक होते. एखादा प्रांत सर झाल्यावर तिथे टांकसाळ उघडून स्वतःच्या नावाची नाणी पाडणे ही त्याचमुळे इस्लामी राज्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होती.


तुर्क आणि त्यामागून दिल्लीच्या तख्तावर आलेल्या अफगाण घराण्यांचे बंगाल आणि भारतीय उपखंडाच्या उत्तर-पश्चिम दिशेला असलेले मध्य आशियाई प्रदिश ह्या दोन्ही प्रभागांशी व्यापारी संबंध होते. सबब ह्या दोन्ही मार्गांनी चांदीचा ओघ भारतात चालू राहिला आणि दिल्लीच्या सुलतानांची नाणे-व्यवस्था ही चांदीवर आधारित अशी महत्त्वाची विनिमय व्यवस्था म्हणून उदयास आली. दिल्लीच्या सुलतानांनी उत्तर हिंदुस्तानात दिल्ली, रणथंभोर, बंगालात लखनौती, तसेच दक्खनमध्ये देवगीर (दौलताबाद) इथे टांकसाळी घातल्या. त्यांच्या राज्यात प्रचलित असलेल्या चांदीच्या नाण्यांस 'टंका' असे नाव होते. हा 'टंका' साधारणपणे १०.८ ग्रॅम्स वजनाचा होता (चित्र २).


चित्र २ - सुलतान अल्लाउद्दिन खिलजी ह्याचा दिल्लीच्या टांकसाळीत पाडलेला चांदीचा 'टंका'

सुमारे दोनशे वर्षांनी, इसवी सनाच्या चौदाव्या शतकात ही परिस्थिती पालटली. बंगाल दिल्लीच्या वर्चस्वापासून वेगळा झाला आणि तिथे स्वतंत्र सुलतान घराणी राज्य करू लागली. मध्य आशियामध्ये तैमूर लंगाच्या मोगल टोळ्यांनी थैमान घातले आणि तिथे अराजक माजले. सबब ह्या दोन्ही मार्गांनी दिल्लीपर्यंत येणारा चांदीचा पुरवठा हळूहळू कमी झाला. त्याचे दिल्ली सल्तनतीच्या नाण्यांवर दूरगामी परिणाम झाले. चांदीच्या 'टंक्यां'ची निर्मिती थांबली. त्यांची जागा अत्यल्प चांदी आणि बरेचसे तांबे असलेल्या मिश्र धातूच्या नाण्यांनी घेतली. चीनहून येणाऱ्या चांदीचा ओघ बंगालात चालू राहिला. संपूर्ण हिंदुस्तानात बंगाल हा असा एकच प्रांत राहिला की जिथे चांदीचे 'टंके' छापणे आणि वापरणे हे अविच्छिन्न चालू राहिले. त्या टंक्यांचा बंगाल आणि बंगाली भाषा ह्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की अद्यापही बंगालीत 'रुपया'ला 'टाका' हाच प्रतिशब्द आहे, आणि बांगलादेशच्या राष्ट्रीय चलनाचे नाव म्हणून त्याचे प्रचलन अजूनही चालू आहे!


बंगालमध्ये असलेला चांदीचा 'झरा' एकाच राजकीय शक्तीच्या हाती पुन्हा लागायला सोळावे शतक उजाडावे लागले. १५२६ साली आग्रा-दिल्ली प्रांतात मध्य आशियाई मुघल राजा बाबर ह्याची सत्ता प्रस्थापित झाली. अफगाण सुलतानांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून बोलावले गेलेल्या बाबराने स्वतःच आग्र्यात बस्तान बसवले. बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. त्याच्या कारकीर्दीत नवजात मुघल सल्तनतीवर बरीच अरिष्टे ओढवली. दिल्ली-आग्रा प्रांतातून अफगाण सत्ता जरी हाकलली गेली होती तरी बंगाल-बिहार प्रांतात अद्यापही अफगाणांचे वर्चस्व होते. शेरखान सूरी नामक त्यांच्या एका सेनानीने हुमायूनच्या अधिपत्याला आव्हान दिले. तो स्वतःला 'शेरशाह' म्हणवू लागला आणि त्याने स्वतःच्या नावाची नाणीही पाडली. त्याच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून हुमायूनने बंगालवर स्वारी केली, पण त्या स्वारीत हुमायूनचा पराभव होऊन त्याला आग्र्याच्या दिशेने माघार घ्यावी लागली. शेरशाह सुरीच्या नेतृत्त्वाखालील विजीगिषु अफगाणांनी मुघल सैन्याचा पाठलाग थेट आग्र्यापर्यंत केला आणि अखेरीस हुमायूनला परागंदा व्हावयास भाग पडून दिल्ली-आग्रा, तसेच त्यापलीकडील पंजाबापर्यंत शेरशाहने आपली हुकुमत बसवली.


ह्याच वादळी राजकीय परिस्थितीत 'रुपया'चा जन्म झाला. वर वर पाहता त्यात काही विशेष झाले नाही; शेरशाहने बंगाल प्रांतात चांदीचा जो 'टंका' प्रचलीत होता त्याच्या वजनात थोडा फरक केला. त्याचे वजन १०.८ ग्रॅम्सवरून ११.२ ते ११.५ ग्रॅम्सपर्यंत वाढवण्यात आले. हे वजन 'तोळा' ह्या वजनाच्या जवळ होते आणि त्यामुळे 'एक तोळा वजनाचे आणि शुद्ध चांदीचे नाणे' तो 'रुपया' ही रुपयाची मूलभूत व्याख्या जन्माला आली. हा फरक तसे म्हणायला गेल्यास सूक्ष्म वाटेल पण त्यात एक महत्त्वाची 'मेख' होती. चांदीच्या नाण्यांचे वजन जेव्हा १०.८ ग्रॅम्स होते, तेव्हा ती पाडून घ्यायला टांकसाळीत जो खर्च येई तो गिऱ्हाईकाकडून वेगळा वसूल केला जाई. म्हणजेच एक 'टंका' हा गिऱ्हाईकाला त्याच्यात असलेल्या चांदीच्या किंमतीपेक्षा थोडासा 'महाग' पडे. शेरशाहने हा खर्च नाण्याच्या वजनातच अंतर्भूत केला. ह्या हुशार खेळीमुळे त्याची नाणी लोकांना अधिक भावली आणि त्यांचे प्रचलन वाढले.


ह्या खेळीबरोबरच शेरशाहने टांकसाळींचे व्यवस्थापन सरकारी हातात घेतले आणि त्याच्यावर कडक नजर ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे टांकसाळीत नाणी पाडताना जे संभाव्य गैरव्यवहार (मुख्यत्त्वेकरून धातूची शुद्धता आणि वजन ह्यांच्यात तफावत असणे) होऊ शकत त्यांच्यावर आळा राहिला आणि नाण्यांची विश्वासार्हता वाढली. शेरशाहने त्याच्या राज्यात जागोजागी टांकसाळी घातल्या. त्यामुळे चलनाची उपलब्धता वाढून अर्थव्यवस्थेचे 'नाणकीकरण' व्हायला लागले, म्हणजेच कर भरण्यापुरतेच नव्हे तर खरेदी-विक्री व्यवहारातही नाण्यांच्या वापराचे प्रमाण वाढीस लागले. चांदीच्या नाण्याच्या जोडीला तांब्याचे चलनही शेरशाहने सुरु केले आणि त्यांचे परस्पर मूल्याधारित प्रमाणही ठरवून दिले. एक चांदीचा रुपया म्हणजे तांब्याचे चाळीस 'फुलूस' किंवा 'पैसे' होत असत. त्यासाठी लागणारे तांबे प्रामुख्याने दिल्लीच्या दक्षिणेला राजस्थानच्या पूर्व सीमेवर असलेल्या तांब्याच्या खाणींतून प्राप्त होत असे आणि ह्या उत्पादनावर सरकारी मालकी असल्याने चांदी-तांब्याच्या परस्पर मूल्यांत होणारे चढ-उतार सरकारी हस्तक्षेपाने रोखता येत असत. चलनाच्या बाबतीत शेरशाहने ह्या ज्या सुधारणा घडवून आणल्या त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या वित्तीय इतिहासावर झाले आणि पुढची काही शतके होत राहिले.चित्र ३ - शेर शाह सूरीचा 'रुपया', हिजरी सन ९४९


शेरशाहच्या रुपयांवरील कालोल्लेखावरून 'रुपया'चे उत्पादन आणि प्रचलन त्याने हिजरी सन ९४५, म्हणजे इ.स. १५३८च्या सुमारास सुरु केले असे दिसून येते (चित्र ३). ह्या नाण्यांवर तत्कालीन पद्धतीप्रमाणे एका बाजूला इस्लामी धर्माची 'कबुली', म्हणजेच 'कलिमा' किंवा 'शहदा' - 'ला इलाह इल-अल्लाह मुहम्मद अर्रसूल अल्लाह' - आणि पहिल्या चार इस्लामी खलीफांची नावे आहेत. दुसऱ्या बाजूला शेरशाहचे पूर्ण नाव ('इस्म', 'लक़ब' आणि 'कुन्यत' ह्या भागांसह) आणि टांकसाळीचे नाव तसेच कालोल्लेख दिसतो.

हिजरी सन ९४५ मध्येच हुमायूननेही बंगाल प्रांताच्या स्वारीवर असताना 'रुपया'च्या वजनाची नाणी पाडलेलीही आपल्याला ज्ञात आहेत. ह्या दोन युद्धप्रवण राजांत 'रुपया'चा निर्माता नक्की कुठला हा प्रश्न केवळ नाण्यांच्या पुराव्यावरून आपल्याला सोडवता येत नाही. त्यासाठी आपल्याला लिखित साधनांची मदत घ्यावी लागते, आणि ती अकबराच्या पदरी असलेल्या अबुल फझल ह्या मंत्र्याच्या 'आईन-ए-अकबरी' ह्या ग्रंथातील वर्णनावरून मिळते. त्यात 'शेरखान' ह्याचा रुपयाचा जनक म्हणून स्पष्ट उल्लेख अबुल फझल करतो, त्यामुळे शेरशाह हाच रुपयाचा निर्माता होता हे निर्विवादपणे सिद्ध होते. (त्याला 'शाह' ही पदवी न लावता 'खान' हे दुय्यम प्रतीचे संबोधन अबुल फझल त्याच्याकरता वापरतो).


शेरशाहची कारकीर्द दुर्दैवाने अल्पकालीन ठरली आणि त्याचे वारसदार बहुशः नालायक निघाले. ह्या निर्नायकीचा फायदा तोपर्यंत परागंदा अवस्थेत भटकत असलेल्या हुमायूनने उठवला आणि तो अफगाणांच्या हाती गेलेले आपले राज्य परत मिळवायच्या तजविजीस लागला. त्याच्या ह्या प्रयत्नांना यश येऊन १५५५ च्या शेवटी त्याला आग्र्यावर परत कब्जा मिळवणे शक्य झाले. दुसऱ्यांदा झालेली राज्यप्राप्ती फार काल भोगणे त्याच्या नशिबी नसावे, कारण काही महिन्यातच दगडी जिन्यावरून पडल्याचे निमित्त होऊन तो प्राणास मुकला. त्याच्यामागे त्याचा अल्पवयीन मुलगा अकबर हा त्याचा वारसदार ठरला. अकबराने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अफगाण व त्यांच्या मांडलिकांचे शह पूर्णपणे मोडून काढले आणि दिल्ली-आग्र्याच्या तख्तांवर मुघल हुकुमत कायम केली.


अकबर जरी अक्षरशत्रू असला तरी राज्यकारभाराची त्याला उत्तम जाण होती. वित्तीय व्यवहारांबाबत त्याने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे शेरशाहने चलन पद्धतीत घडवून आणलेल्या सुधारणा त्याने उचलून धरल्या. आपल्याला माहीतच आहे की, मुघल राजघराणे हे मूळचे मध्य आशियातून आलेले होते. सबब बाबराच्या नेतृत्वाखाली जेव्हा त्यांनी आपली सत्ता भारतात प्रथम बसवली, तेव्हा नाण्यांच्या बाबतीत त्यांनी मध्य आशियाई पद्धतीचा उपयोग केला. साधारण चार ग्रॅम्स वजनाचे 'शाहरुखी' नामक नाणे हे ह्या पद्धतीत पायाभूत होते. ह्या नाण्यांचे चलन हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेकडे कधीच झालेले नव्हते, तेव्हा मुघलांनी जेव्हा भारतात 'शाहरुखी' पाडायला सुरुवात केली तेव्हा सामान्य जनतेकडून ह्या नाण्यांचे विशेष स्वागत झाले नाही. पुढे जेव्हा शेरशाहने सुधारणा करून चांदीचा 'रुपया' आणि तांब्याचे 'दाम' अथवा 'फुलूस' ही पद्धत अंगिकारली तेव्हा तिच्या विश्वासार्हतेमुळे लोकांनी ती मोठ्या प्रमाणावर उचलून धरली. हुमायूनचा आणि विशेषतः अकबराचा मोठेपणा आणि दूरदर्शीपणा हा की, त्यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न केला नाही आणि मूळच्या मुघल पद्धतीच्या 'शाहरूखीं'ना फाटा दिला. त्याऐवजी 'रुपया'चेच उत्पादन आणि चलन चालू ठेवले.


राज्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांत अकबराच्या मुघल फौजांनी गुजरात, बंगाल, माळवा आणि काश्मीर इथे राज्य करणाऱ्या विविध सुलतानशाह्यांचा पराभव करून ते ते प्रांत आपल्या राज्याला जोडले. सोळाव्या शतकाच्या अंती मुघल सैन्य दक्खनचे दरवाजेही ठोठावू लागले. ह्या विशाल साम्राज्याचे आर्थिक एकीकरण अकबराने घडवून आणले. त्याच्या राज्यकारभाराचा उत्तम लेखाजोखा अबुल फझलच्या 'आईन-ए-अकबरी'त घेतलेला आहे. नाण्यांची व त्यांच्या उत्पादनाची माहिती द्यायला अबुल फझल एक स्वतंत्र प्रकरण खर्ची घालतो. शेरशाहचा उल्लेख त्याने रुपयाचा जनक म्हणून केल्याचा उल्लेख मागे आला आहेच. अबुल फझलच्या माहितीनुसार अकबराच्या वेळी चौदा टांकसाळीतून चांदीची नाणी पाडली जात. पण प्रत्यक्ष नाण्यांच्या पुराव्यावरून रुपये पाडले जाणाऱ्या टांकसाळी चाळीसहून अधिक ठिकाणी होत्या हे स्पष्ट होते. सोळाव्या शतकाच्या नंतर रुपयाची 'यशोगाथा' सुरू होते - त्या यशोगाथेत शेरशाहचे त्याचा 'निर्माता' म्हणून आणि अकबराचे त्याचा 'प्रसारकर्ता' म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.


अकबराच्या कारकीर्दीत झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे प्रतिबिंब त्याच्या नाण्यांत दिसून येते. सुरुवातीला त्याच्या रुपयांवर इस्लामी पद्धतीचा प्रभाव होता. शेर शाहप्रमाणेच अकबराच्या नाण्यांवरही 'कलिमा' असे. पण १५८२ साली बऱ्याच धार्मिक विचारमंथनानंतर अकबराने 'दिन-ए-इलाही' नामक सर्वधर्मसमावेशक पंथाचा पुरस्कार केला. त्याचा परिणाम म्हणून नाण्यांवरच्या 'कलिम्या'ला चाट मिळाली आणि त्याची जागा इलाही पंथाच्या 'अल्लाहु अकबर जल जलालहु' ह्या मंत्राने घेतली. 'ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे तेज तेजाळत राहो' असा मूळ अर्थ असलेल्या ह्या मंत्रातून 'अकबर हा ईश्वर आहे, त्याचे तेज तेजाळत राहो' असा सुप्त अर्थही निघू शकतो! 'जलाल' म्हणजे 'तेज' हा शब्द अकबराच्या नावाचाही भाग होता; 'जलालउद्दीन' ही त्याची 'लक़ब' होती.

चित्र ४ - अकबराचे 'रुपया' शब्द लिहिलेले आग्रा येथील टांकसाळीत पाडलेले नाणे


हा मंत्र असलेल्या अकबराच्या नाण्यांना नाणेतज्ज्ञ 'इलाही' प्रकारची नाणी म्हणून ओळखतात. अशाच एका 'इलाही' प्रकारच्या रुपयावरील फारसी लेखात सर्वप्रथम 'रुपया' हा शब्द लिहिलेला आपल्याला दिसून येतो (चित्र ४) . हा रुपया आग्रा इथल्या टांकसाळीत पाडला गेला आहे. इथे हे सांगितले पाहिजे की मुघल काळात रुपयाच्या बहुतांशी नाण्यांवर, किंबहुना कुठल्याच सोन्या-चांदीच्या नाण्यावर, मूल्यत्वदर्शक शब्द लिहायची पद्धत नव्हती. ठोक वजन आणि धातूची शुद्धता या दोन निकषांवर नाण्याचे मूल्य ठरत असल्याने एक तोळा वजनाचा तो रुपया, अर्ध्या तोळ्याचा अर्धा रुपया किंवा आठ आणे, आणि पाव तोळ्याचा पाव रुपया किंवा चार आणे इत्यादी भाग-मूल्यांक वजनावरच ठरत. ह्या पार्श्वभूमीवर 'रुपया' असा शब्द लिहिलेले नाणे हे अपवादात्मकच म्हणायला पाहिजे. परंतु ह्याच प्रकारचे अर्ध्या रुपयाचे नाणेही ज्ञात असून त्यावर 'दरब' हा अर्ध्या रुपयाच्या निदर्शक शब्द (ज्याचा उल्लेख अबुल फझलही करतो) कोरला गेलेला आहे, सबब नाण्यांवरील लेखनात अशा शब्दांचा अंतर्भाव हा वहिवाट म्हणून नसून नाण्यांवरच्या लेखनाचा 'संरचनात्मक' भाग म्हणून केला गेला असावा असे वाटते.

(क्रमशः)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

माहितीने खच्चून भरलेला लेख.
चंद्रशेखर, अरविंद कोल्हटकर ही मंडळी ह्या स्थळावर लिहितात त्याच जातकुळीचा, संदर्भमूल्य ठरेल इतका छान लेख.
.
बादवे, शैलेन आपला ह्यापूर्वी वावर ह्या स्थळावर अधिक दिसला नाही. इतरही बरच माहितीपर खजिना तुमच्याकडे असणार असं वाटायला लागलाय.
"क्रमशः" हे वाचून प्रचंड आनंद झाला. पुढेल अंकासाठी उत्सुक.
.

किंबहुना भारतात चांदीच्या नाण्यांचे प्रचलन हे ग्रीकांच्या आगमनापूर्वीच झालेले होते हे सांगणारा हा पुरावा आहे.
साहजिअकच आहे. खुष्कीच्या मार्गाने "चंद्रकोरीच्या प्रदेशाशी" भारतीयांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संपर्क होताच. तिथून अशी प्रशासनाइक कल्पनांची देवाण घेवाण लै आधीच झालेली असू शकते.
शिवाय, सोळा महाजनपदांचा भरभराटिचा काळ, गौतम बुद्धाचा काल हा सिकंदराच्या थोडासा आधीच आलेला दिसतो. त्यावेळी सुस्थापित अशी शासनयंत्रणा होती.
त्याला पूरक आणि अनुकूल गोष्टी ऑलरेडी असलयशिवाय ही यंत्रणा टिकणे सोपे वाटत नाही.
.
परंतु भारतात चांदीची खनिजे विशेष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नाण्यांसाठी चांदी ही बहुशः भारताबाहेरून इथे येत असे.

शेर
सोने-चांदी ह्याबाबत माला मोठी गंमत वाटते. ह्यांचे भारतात उत्पादन होत नाही. पण तरीसुद्धा परंपरेत ह्या गोष्टी अशा काही गुंफल्या गेल्या आहेत;
"घरात थोडेतरी सोने गाठिशी बाळगून असावे" ही संकल्पना इतकी घट्ट रुजली आहे की आश्चर्य वाटते.
हे म्हणजे खरेतर तुळस ह्या वनस्पतीचे रख्रखीत अरबी वाळवंटात राहनार्‍यांना महत्व पटण्यासारखे आहे.
भारतीय जुन्या काळातील चांगले सराईत व्यापारी असावेत. त्याशिवाय अशा कल्प्ना रुजणे कठीण.
.

इ.स.च्या पहिल्या शतकात रोमन नौवित्तिकांना मान्सून वाऱ्यांचा 'शोध' लागला आणि भारतीय माल रोमपर्यंत पोचणे पूर्वीपेक्षा सुलभ झाले.

हे मी पूर्वीही वाचलय. पण अर्थ कळ्ळा नै. रोमन समुद्र मार्गानं भारतापर्यंत यायचे का? मग वास्को द गामा चे कौतुक कशाला "प्रथमच समुद्र मार्गे आलेला प्राणी" म्हणून?
रोमन- भारत्/सातवाहन हा व्यापार नक्की कसा होइ? कोणता भाग खुष्किने येइ? कोणत्या भागात समुद्र मार्ग असे?
.
सबब नाण्यांच्या रुपात कर भरण्यावर तुर्कांनी विशेष भर दिला कारण त्या स्वरूपात भरला गेलेला कर हा शाश्वत रुपाने दिल्लीपर्यंत पोचवता येऊन सरकारी खजिन्यात त्याचा भरणा करता येई.
दिल्लीच्या सुलतानांनी उत्तर हिंदुस्तानात दिल्ली, रणथंभोर, बंगालात लखनौती, तसेच दक्खनमध्ये देवगीर (दौलताबाद) इथे टांकसाळी घातल्या.

ह्यातल्या बहुतांश जित राज्यांच्या राज्धान्या होत्या. त्यांना झोनल हेडक्वार्टर बनवणे सोपे होते; म्हणून हे केले असावे.
.
त्यांच्या राज्यात प्रचलित असलेल्या चांदीच्या नाण्यांस 'टंका' असे नाव होते. हा 'टंका' साधारणपणे १०.८ ग्रॅम्स वजनाचा होता (चित्र २).

लहान असताना मस्त लयीत एक सुभाषित म्हणत असू ते आठवले.
टका धर्मस् टका कर्मस्
टका हि परमं पदम्
यस्मिन् गृहे टका नास्ति
हा हा टकाम् टकटकायते इति ||
असं काहीतरी सुभाषित होतं.(माझ्या लिहिण्यानं संस्कृतची वाईट लागली आहे; त्याबद्दल सॉरी.)
.
हा फरक तसे म्हणायला गेल्यास सूक्ष्म वाटेल पण त्यात एक महत्त्वाची 'मेख' होती. चांदीच्या नाण्यांचे वजन जेव्हा १०.८ ग्रॅम्स होते, तेव्हा ती पाडून घ्यायला टांकसाळीत जो खर्च येई तो गिऱ्हाईकाकडून वेगळा वसूल केला जाई. म्हणजेच एक 'टंका' हा गिऱ्हाईकाला त्याच्यात असलेल्या चांदीच्या किंमतीपेक्षा थोडासा 'महाग' पडे. शेर शाहने हा खर्च नाण्याच्या वजनातच अंतर्भूत केला. ह्या हुशार खेळीमुळे त्याची नाणी लोकांना अधिक भावली आणि त्यांचे प्रचलन वाढले.
आधुनिक काळातही एक नियम आहे. चलनाच्या निर्मितीचा खर्च आणि त्यातील कंटेंटची किंमत ही चलनातील मौल्यवान वस्तूपेक्षा कमीच असली पाहिजे.
(ह्यामुळेच दोनेक दशकापूर्वी रिझर्व्ह ब्यांकेने एक व दोन रुपयाच्या नोटांची छपाई बंद केली.) एका अर्थाने, चलन हे त्यातील "वस्तू" पेक्षा त्यामागे उभ्या असलेल्या "व्यवस्थे"वरील विश्वासावरच अधिक चालते.
.
.
अवांतरः-
हे करणारा शेरसहह जिनियस , ऑल टैम ग्रॅत व्यक्ती होताच. त्याने केलेली जिल्हा-तालुका शेतसारा योजना अगदि आधुनिक काळापर्यंत वापरात होती.
ब्रिटिशांनीही तिच्याच आधारे आपले महसूल ठरवणे सुरु ठेवले होते. शिवाय शेर शाह ने ग्रँड ट्रन्क रोडचे पुनरुज्जीवन* सुरु केले. थेट ढाक्यापासून ते काबूल- पेशावर पर्यंत सुरक्षित
राजमार्ग बनवणे, व्यापरास बळकटी देणे हे त्याने प्रथमच मोठ्या प्रमाणावर केले.


अकबर जरी अक्षरशत्रू असला तरी राज्यकारभाराची त्याला उत्तम जाण होती.

यप्स . शिवाय त्याला सोबतीला राजा तोडरमल सारखे जिनियस कुशल प्रशासकही मिळाले. अशा रत्नांची त्याची पारखही महत्वाचीच.
अकबराच्या राजकिय व लष्करी विजयांबद्दल बोललं जातं. पण त्यानं मजबूत प्रशासन ठेवल्यानं असंतोष प्रमानाबाहेर कधीच वआधला नाही, राजसत्ता स्थिर राहिली.
ह्याचा अधिक उल्लेख कुठे दिसत नाही.
.
वित्तीय व्यवहारांबाबत त्याने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे शेर शाहने ज्या चलन पद्धतीत ज्या सुधारणा घडवून आणल्या होत्या, त्या त्याने उचलून धरल्या.

हे तोडरमलचीच सूचना असावी. तोडरमल हा शेरशाहच्याच ताममीत तयार झालेला प्रशासक होता असे ऐकले आहे. (संदर्भः- डिस्कवरी ऑफ इंडिया. पं जवाहरलाल नेहरु.)
.
आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटते की लेखात मुहम्मद तुघलकाचा उल्लेख कसा नाही. त्याची तांब्याचे नाणे बनवायची योअजना सपाटून आपटली; तरी ती संकल्पना आधुनिक काळात सर्वत्र
पब्लिकने स्वीकारलेलीच दिसते की. मला तर तो काळाच्या पुढे गेलेला व्हिजनरी आणि वेडसर इसम ह्यातला नक्की काय आहे हे समजत नाही.
.
*गृअँड ट्रन्क रोड शेर शाह ने बनवला की त्याच्यापूर्वी मौर्यांनी प्रथम वापरात आणला हे महत्वाचे नाही. त्याच्या काळात तो तितका वापराचा राहिला नव्हता.
त्याने तो बनवला नसला असे जरी मानले तरी पुनरुज्जीवन नक्कीच केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीने खच्चून भरलेला लेख.
चंद्रशेखर, अरविंद कोल्हटकर ही मंडळी ह्या स्थळावर लिहितात त्याच जातकुळीचा, संदर्भमूल्य ठरेल इतका छान लेख.

सहमत.

रोमन समुद्र मार्गानं भारतापर्यंत यायचे का? मग वास्को द गामा चे कौतुक कशाला "प्रथमच समुद्र मार्गे आलेला प्राणी" म्हणून?
रोमन- भारत्/सातवाहन हा व्यापार नक्की कसा होइ? कोणता भाग खुष्किने येइ? कोणत्या भागात समुद्र मार्ग असे?

माझ्या अल्प माहितीनुसार, भुमध्य समुद्रातून जहाजे नाईल नदीच्या मुखातून काही अंतर आत येत. नक्की कुठपर्यंत ते माहीत नाही. तिथून थोड्या खुश्कीच्या मार्गाने तांबड्या समुद्रापर्यंत. आणि तिथून अरबी समुद्रातून सोपारे, कल्याण, चौल आदी बंदरात.

वास्को द गामाचे कौतुक अशासाठी की त्याने थेट समुद्री मार्ग शोधला.

मूळ लेख छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे त्यानं अरब्- ऑटोमन-मुस्लिम ह्यांना समुद्री "बायपास" शोधला; म्हणून कौतुक.
ह्यातून अवांतर आठवलं.

अवांतर१:-
ऑटोमनांनी रोमन साम्रजयाची शाखा, बाय्झेंटाइन जिंकले. खुद्द कॉन्स्टॅटिनोपल किम्वा इस्तंबूलही त्यांच्या ताब्यात गेल्यानं युरोपात आशियातून, प्रामुख्याने "हिंद"मधून
येणार्‍या वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. मसाल्याचे पदार्थ वगैरेची चणचण भासू लागली. दैनंदिन जीवनावर जाणवेल इतपत परिणाम सुरु झाला. म्हणूनच पर्यायी समुद्री मार्ग शोधायला
विविध दर्यावर्दी खलाशांना राजसत्ता प्रोत्साहन देउ लागल्या.
तो मार्ग रुळेपर्यंत टंचाई तशीच होती. काळे मिरे, pepper हे इतके मौल्यवान बनले की चक्क "चलन" म्हणून काही ठिकाणी वापरले गेले!
.
अवांतर२;-
ऑटोमनांनी जशी आख्ख्या युरोपची कोंडी केली तशीच कोंडी नेपोलियन ब्रिटनची करायला गेला. holy roman emperor शार्लमान ह्याच्याकाळानंतर प्रथमच
युरोपात इतक्या मोठ्या विस्तृत सलग भूभागावर एक्सलग सत्ता कुणी प्रस्थापित केली होती. त्यानं स्पेन, इटाली,प्रशिया ह्या ठिकाणच्या कित्येक प्रांतात आपल्या मर्जीची सर्कारे बसवली.
युरोपिअन मेनलँडवर आपला वरचष्मा बसवला. व ब्रिटनवर व्यापारासाठी सुप्रसिद्ध embargo लावला.
पण त्याचा प्रत्यक्ष परिणाम अत्यल्प होता. पहिले कारण अर्थातच स्मगलिंग. लोकांनी निर्बंध झिडकारून फायदा दिसेल तिथे व्यापार सुरुच ठेवला.
दुसरे म्हणजे ब्रिटनला पर्यायी समुद्री रस्ते तोवर उपलब्ध झाले होते. तिसरे म्हणजे नेपोलियनची सत्ता फार काळ काही टिकू शकली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटते की लेखात मुहम्मद तुघलकाचा उल्लेख कसा नाही" - हा लेख केवळ रुपया ह्या मूल्यांकाच्या नाण्यावर बेतलेला असल्याने त्यात मुहम्मद तुघ्लकाचा आणि त्याच्या नाणेविषयक प्रयोगांचा उल्लेख केलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे त्यानं अरब्- ऑटोमन-मुस्लिम ह्यांना समुद्री "बायपास" शोधला; म्हणून कौतुक

यस्स.

त्यानंतर चारच शतकात, खिळखिळ्या ऑटोमनांचा धाक राहिला नाही आणि इजिप्तही ताब्यात आलेला. तेव्हा तो वास्को द गामाचा लांबचा बायपास वापरण्यापेक्षा भुमध्य आणि तांबडा हे दोन्ही समुद्र एकमेकांशी जोडले तर एंड टु एंड समुद्री वाहतूक होऊ शकेल, या विचारातून सुवेझ कालव्याची निर्मिती ब्रिटिशांनी केली.

म्हणजे मार्ग पुन्हा दोन हजार वर्षांपूर्वीचाच पण आता पूर्ण सागरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिक विचारपूर्वक प्रतिक्रिया देण्यापूर्वी हलकीफुलकी देतो :
माझ्या एका मैत्रिणीसाठी शाहरुखी अभिनय म्हणजे खणखणीत बंदा रुपया.
माझ्याकरिता मात्र नव्याची नवलाई संपल्यानंतर त्याला तितकेसे मूल्य राहिले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम माहितीने परिपूर्ण लेख.

रोमन लोकांना मान्सून वार्‍यांचा शोध लागला ह्यापेक्षा उत्तर आफ्रिकेतील इजिप्शिअन-अरब लोकांना मान्सून वार्‍यांचा उपयोग करून एका वर्षात हिंदपर्यंत जाऊन परत कसे यायचे हे ठाऊक होते आणि रोमन व्यापारी अरबांच्या मदतीने हा प्रवास करीत असत असे म्हणणे अधिक योग्य असावे असे वाटते. नीरोच्या छळापासून सुटका करून घेण्यासाठी एका रोमनाने ऑस्टिआ - रोमचे टायबरच्या मुखावरील बंदर - ते उज्जैन अशा केलेल्या प्रवासाचे वर्णन मी अगदी गेल्या ५-६ दिवसातच कोठेतरी वाचले आहे पण कोठे ते शोधण्याचा बराच प्रयत्न करूनहि आता सापडत नाही. थोरल्या प्लिनीने केलेले अशाच मार्गाचे वर्णन येथे उपलब्ध आहे. त्या अनुसार प्रवासी नाइलच्या वार्‍यांचा उपयोग करून प्रथम नाइलमधून दक्षिणेकडे १२ दिवस आणि ३०९ मैल प्रवास करून केफ्त/केफ्ट येथे पोहोचत, तेथून १२ दिवसात खुष्कीमार्गाने तांबडया समुद्रावर बेरेनिस येथे येत आणि तेथून नावेने ७० दिवसात दक्षिण भारतातील क्रांगानोरे सारख्या बंदरापर्यंत पोहोचत असे दिसते. वार्‍याची दिशा बदलली की पुनः उलटे निघून रोमला परतत आणि हा सर्व प्रवास एका वर्षात होई. प्लिनीच्या वर्णनातील बहुतेक गावांची आणि बंदरांची नावे आता दुर्बोध आहेत.

प्लिनीने वर्णिलेला हा मार्ग त्याच्या काळात नुकताच समजला होता असे त्यानेच लिहिले आहे. तसेच अशा माहितीचा व्यापाराला लाभ काय हेहि तो लिहितो. दर वर्षी हिंदमधून आयात झालेल्या मालापोटी रोममधून ५० मिलिअन सेस्टरसीज इतली रक्कम हिंदकडे जाई आणि हा माल मूळ किमतीच्या १०० पटीने चढया भावाने रोम विकत घेत आहे असा हिशेब त्याने दाखविला आहे. हा ओघ थांबविण्यासाठी मधले दलाल वगळणे हाच इलाज होता.

इतकी चांदी वा सोने हिंदमध्ये येत असे हेहि ह्यावरून दिसते.

(दुसरी एक अवान्तर शंका - 'नौवित्तिक' हा काय शब्द आहे आणि तो कसा तयार होतो हे जाणण्याची इच्छा आहे. हा शब्द माझ्यातरी वाचनात अजूनपर्यंत आलेला नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(दुसरी एक अवान्तर शंका - 'नौवित्तिक' हा काय शब्द आहे आणि तो कसा तयार होतो हे जाणण्याची इच्छा आहे. हा शब्द माझ्यातरी वाचनात अजूनपर्यंत आलेला नाही.)

सी-ट्रेडर्ज़?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरी एक अवान्तर शंका - 'नौवित्तिक' हा काय शब्द आहे आणि तो कसा तयार होतो हे जाणण्याची इच्छा आहे. हा शब्द माझ्यातरी वाचनात अजूनपर्यंत आलेला नाही.)

प्रसिद्ध इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी कोंकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी नामक एक उत्तम लेख लिहिला आहे. त्यात कोंकणच्या इतिहासाचा अगदी जुन्या काळापासून त्रोटक परंतु अतिशय रोचक मागोवा घेतला आहे. त्यात एके ठिकाणी हा शब्द येतो. कुमारपाल नामक राजा होता त्याचा 'नौवित्तक' कुणी वासैद नामक अरब होता असा उल्लेख आहे. हा राजा कोण, कुठला, कधीचा, इ. बाकीचे सर्व संदर्भ सध्या विसरलोय, पण हा एक उल्लेख तेवढा ध्यानात राहिला आहे. नौवित्तक म्हणजे नौ हेच ज्याचे वित्त आहे असा तो, अशी त्याची फोड शेजवलकरांनीच आपल्या लेखात दिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीत अजून थोडी भर घालायची म्हणजे रोम-भारत सागरी व्यापाराची माहिती प्लिनीपेक्षाही आपल्याला 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' ह्या इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिल्या गेलेल्या 'गाईड'मधून अधिक चांगली मिळते. ही टेक्स्ट मान्सूनच्या तथाकथित 'शोधा'नंतर लगेचच लिहिली गेलेली आहे. (अर्थात कुठल्याही भौगोलिक / नैसर्गिक बाबीचा 'शोध' एका कोणातरी व्यक्तीला लागला हे काहीसे अतिशयोक्तच म्हणायला पाहिजे कारण दक्षिण अरेबियातले सेबियन्स, हिम्याराईट वगैरे लोक ह्या वाऱ्यांशी परिचित होतेच) ह्या टेक्स्टचा लेखक एक अनामिक ग्रीक-इजिप्शियन दर्यावर्दी होता. लिओनेल कॅसन ह्या विद्वानांनी ह्या टेक्स्टवर आणि तिच्या ऐतिहासिक उपयुक्ततेवर उत्तम संशोधन केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिओनेल कॅसन ह्या विद्वानांनी ह्या टेक्स्टवर आणि तिच्या ऐतिहासिक उपयुक्ततेवर उत्तम संशोधन केले आहे.

जमल्यास त्यांच्या रिसर्च पेपर/पुस्तकाची लिंक देऊ शकाल का प्लीज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अय हय, क्या बात! धन्यवाद शैलेन सर. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीत अजून थोडी भर घालायची म्हणजे रोम-भारत सागरी व्यापाराची माहिती प्लिनीपेक्षाही आपल्याला 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' ह्या इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिल्या गेलेल्या 'गाईड'मधून अधिक चांगली मिळते. ही टेक्स्ट मान्सूनच्या तथाकथित 'शोधा'नंतर लगेचच लिहिली गेलेली आहे. (अर्थात कुठल्याही भौगोलिक / नैसर्गिक बाबीचा 'शोध' एका कोणातरी व्यक्तीला लागला हे काहीसे अतिशयोक्तच म्हणायला पाहिजे कारण दक्षिण अरेबियातले सेबियन्स, हिम्याराईट वगैरे लोक ह्या वाऱ्यांशी परिचित होतेच) ह्या टेक्स्टचा लेखक एक अनामिक ग्रीक-इजिप्शियन दर्यावर्दी होता. लिओनेल कॅसन ह्या विद्वानांनी ह्या टेक्स्टवर आणि तिच्या ऐतिहासिक उपयुक्ततेवर उत्तम संशोधन केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या शब्दाचा अर्थ समुद्री प्रवासाशी संबंधित अर्थशास्त्र असा असावा. सागरी अर्थशास्त्र असे मराठी भाषांतर होऊ शकेल. (पण त्यामध्ये प्रवास ही संकल्पना येणार नाही) इंग्लिशमध्ये जिओपुलिटिकल, सोशिओपुलिटिकल्, थर्मोडाय्नॅमिक्स, एलेक्ट्रोमॅग्नेटिक असे शब्द बनवले गेले आहेत. मराठीत मात्र हे थोडेसे अवघड होते. नौवित्तिक हा 'समुद्रप्रवासामध्ये असणारा आणि समुद्रप्रवासामुळे निर्माण होऊ शकणारा अर्थव्यवहार' इतका मोठा आशय व्यक्त करू शकणारा शब्द बनू शकेल. शब्द आवडलाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फार आवडला. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मन ह्यांनी वर दर्शविलेला श्लोक आणि त्याच्याबरोबरचा अजून एक श्लोक थोडया शोधानंतर मला स्वामी दयानन्द सरस्वतींच्या सत्यार्थप्रकाश मध्ये सापडला. श्लोक दयानन्दांनीच केलेले आहेत का अन्य कोणी हे कळले नाही पण श्लोक असे आहेतः

टका धर्मष्टका कर्म टका हि परमं पदम् ।
यस्य गृहे टका नास्ति हा टकां टकटकायते।।१।।
आणा अंशकला: प्रोक्ता रूप्योऽसौ भगवान् स्वयम् ।
अतस्तं सर्व इच्छन्ति रूप्यं हि गुणवत्तमम्।।२।।
(श्लोक आधुनिक असावा कारण जुन्या श्लोकाची सफाई त्यात दिसत नाही. उदा. 'यस्य गृहे' येथे एक मात्रा कमी आहे.)

(टका - पैसा - हाच धर्म आणि हेच कर्म आणि सर्वश्रेष्ठ स्थान. ज्याच्या घरात टका नाही तो टक्याकडे ध्यान लावून बसलेला असतो.
भगवत्स्वरूप अशा रुपयाची आणा ही (सोळावी) कला आहे. म्हणून सर्वजण त्याला इच्छितात आणि सर्वात गुणी रुपयाच आहे.)

पैशावर रचलेले असे अनेक श्लोक आठवतात. येथे एकच देतो:

दुन्दुभिस्तु नितरामचेतनस्तन्मुखादपि धनं धनं धनम्|
इत्थमेव निनदः प्रवर्तते किं पुनर्यदि भवेत्सचेतनः||

नगारा हा सर्वार्थाने अचेतन आहे तरीहि त्याच्या मुखातून स्वर निघतो तो म्हणजे 'धनं धनं धनम्'. हाच आवाज तो काढतो तर मग सजीवाचे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भर्तृहरी रचित वैराग्यशतक, नीतिशतक, शृंगारशतक ही सुभाषितांची शतकत्रयी फार फार पूर्वी; शालेय दिवसात वाचली होती.
त्यातल्याच कशाततरी दिसलेला श्लोक लयीत म्हटला गेल्याने तोडका मोडका का असेना; पण लक्षात आहे.
भर्तृहरी म्हणजे लैच जुना( पंधराशे वर्षे तरी झाली असतील असा) काळ. अर्थात प्रक्षिप्त असणे नाकारता येत नाहिच.
त्याबद्दल मला काही आयड्या नाही.
.
अत्यार्थप्रकाश किंवा इतरत्रही दयानंदांनी स्वतः रचलेलं फार थोडं आहे. बहुताम्श वेळा ते कुणाला तरी quote करत,
कुणाचा तरी संदर्भ देत पुढे जातात.(च्यायला तेसुद्धा वाचून दशक उलटून गेलय.)
अलिकडच्या काळात रचलं गेलं असेलच;
तर ते अलिकडच्या काळातील त्यांच्याशिवाय इतर कुणी रचलं असण्याची शक्यता अधिक वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद _/\_
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0