दोन कविता

दोन कविता

कवी - श्रीरंजन आवटे

१.

स्तनाळली धरतीही
आज हसली मधाळ
काहुरल्या वार्‍याने गं
केली चुगली ढगाळ ॥१॥

आभाळीच्या समाधीचा
आज झाला म्हणे भंग
कामायनी धरतीचा
असा शृंगारी अभंग ॥२॥

अंग अंग शहारले
कण कण पुलकित
किती जन्मांची कहाणी
तरी मधुर गुपित ॥३॥

सारा सढळ संभोग
असा आदिम सर्जक
धरतीच्या गर्भाशयी
कुण्या झाडाचे अर्भक? ॥४॥

२.

चंद्रकिरणांच्या विभ्रमणानंतरही
मी नाही मोजू शकलो
तुझ्या डोळ्याचा अपवर्तनांक,
चक्राकार मार्गांनी
किती जावं आत-आत,
खोल-खोल गुहेमध्ये
थडकतच नाही किरण
कोणत्याही पृष्ठभागावर
आणि
विशुद्ध परावर्तनाच्या प्रतीक्षेत
असतो भोळा चंद्र
पण
प्रक्षिप्त किरण पोहोचतात
निळ्याशार जलाशयात.
कवडशावर पडतो
पाण्याचा गोलाकार थेंब
सम्मिलित होतात किरण
एका तेजोमय बिंदूपाशी
तेव्हा
आता तरी
कळू देत
तुझ्या द्वैती लाटांची तरंगलांबी
जिने
बदलली दिशा किरणांची
आणि
तू घेऊन गेलीस मला
अज्ञाताच्या प्रदेशात;
तरीही
माध्यमांची घनता मोजत
मी पोहोचत होतो
उत्तरापाशी;
पण
आजकाल
तुझ्या डोळ्यांवर चष्मा असतो!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

दोन वेगवेगळ्या कवितांची सहप्रस्तुती लक्षणीय आहे.

पहिली कविता निसर्ग/पावसाळा/आकाश-पृथ्वी-रति उपमेचे उदाहरण, तर दुसरी कविता फार्सिकल.

सहप्रस्तुतीमुळे काही विशेष परिणाम होतो आहे काय,* हा विचार करतो आहे.

*भागांपेक्षा-पूर्ण-अधिक प्रकारचा

------
कवीने फेसबुकवर दिलेल्या एका प्रतिसादावरून वाटते, की प्रत्येक कविता एक-एक करूनही समजता येते.
------
पहिली कविता अष्टाक्षरी छंदात आहेत, लाडिक "गं" अशी हाक मारणारी आहे, आणि त्यातील उपमा पारंपरिक आहे. पारंपरिक उपमा प्रत्येक नवीन कवी आपल्या कल्पकतेने वेगळी खुलवतो. मला खुद्द पारंपरिक उपमा वापरायला क्वचितच आवडतात. मी खुद्द अशी कविता केली, तर त्याला एका प्रकारचा कॉस्ट्यूम ज्वेलरीचा खोटेपणा जाणवेल. तो नकलीपणा वाचकापर्यंत न्यायचा असेल - कवितेचा हेतू वक्रोक्तीचा असेल - तर तसे काहीतरी ध्वनित करून मी अशी उपमा मग वापरेनही - कारण ती उपमा त्या हेतूकरिता प्रामाणिक असते.
परंतु पारंपरिक उपमा सरळधोपटपणे आणि प्रामाणिकपणे वापरणारे कवी असतात. त्यांच्या भूमिकेत शिरून त्यांची उत्कट अनुभूती मीसुद्धा अनुभवू इच्छितो. अशा कविता वाचताना मी पारंपरिक वाचक बनतो, व्यंजनेने अर्थ काढत नाही, आणि मनापासून आस्वाद घेऊ शकतो.

पहिली कविता स्वतंत्रपणे घेतली तर वक्रोक्तीकडे निर्देश असल्यास फारच थोडे आहेत. "स्तनाळलेली" ही थोडीशी विचित्र नवशब्दनिर्मिती सोडली, "आज झाला म्हणे भंग" मध्ये "मणे"ने येणारी "लोकप्रवादच आहे, खरे नाही" हे ध्वनित सोडले, तर वाचकाचा पाय ओढणारे काहीही सुस्पष्ट दिसत नाही. म्हणूनच स्वतंत्रपणे पहिली कविता वाचली, तर पारंपरिक उपमा खुलवलेली वाटते : आकाश, पृथ्वी, आणि नवे बीजांकुर यांची तुलना अनुक्रमे प्रियकर, प्रेयसी आणि रतीनंतर राहिलेला गर्भ यांच्याशी केलेली आहे.

-----
दुसरी कविता स्वतःहून बघितली, तर ती गंभीर नसावी असे बरेच सुगावे मिळतात. एक तर बरेच तांत्रिक शब्द वापरलेले आहेत. आणि शेवटी सगळ्याचे हसणे करणारी कलाटणी दिलेली आहे. डोळ्यांत निरखून बघून त्यांचा थांग घेणारा आता तसा शोध घेऊ शकत नाही - डोळ्यांवर आताशा चष्मा लागला आहे, त्यामुळे डोळ्यांत खोलवर बघणे जमतच नाही.
-----
दुसर्‍या कवितेतला हास्योत्पादक शेवट, रोमँटिकविरोधी शब्द-निवड वगैरे जवळच्या पहिल्या कवितेच्या आकलनावर फरक पाडतो. आता "स्तनाळलेली", "म्हणे", वगैरे गर्भित वक्रोक्तीकडे निर्देश असल्याची शंका बळावू लागते. "गं" हाकेचा लडिवाळपणा खरा नसून लोक "लाडं-लाडं" करून एखाद्याला चिडवतात, तसे असल्याची शंका येते. असा सुता-सुतापासून दोरखंड पिळत पूर्ण कवितेचा "जुनाट घिशापिट्या उपमांची टीका करणारे विडंबन" असा हेतू असल्याची शंका बळावत जाते.

पहिल्या कवितेच्या संसर्गाने दुसर्‍या कवितेबाबतही वेगळा अर्थ मनात येऊ शकतो. पहिल्या कवितेत भौतिक हवामानाकरिता रतीची उपमा, तर दुसर्‍या कवितेत शृंगारात भौतिक मोजमापाची उपमा... असे बांधणीचे परस्पर-प्रतिबिंब दिसते. असे केल्यामुळे "अपवर्तनांक", "तरंगलांबी" हे शब्द अतिरेकी हास्यास्पद नसून साधेही वाचण्यास चालना मिळते.
-----
अशा प्रकारे सहप्रस्तुतीमुळे प्रत्येक कवितेचा जाणवणारा हेतू, आणि त्यामुळे अर्थही काहीसा वेगळा लागतो. किंवा लागू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही कविता आवडल्या. धनंजय ह्यांची समीक्षाही आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

धनंजय,
आपण म्हणालात ते खरे आहे तथापि या दोन्ही कविता स्वतंत्र आहेत. त्यांच्या सहप्रस्तुतीमध्ये समान आशय सूत्र अथवा विशिष्ट असा उद्देश नाही. बाकी कविता लिहिल्यानंतर कवीने त्यावर बोलू नये असे मला वाटते. जे म्हणायचे आहे ते कवितेतून म्हटलेले आहेच. अर्थांतरणासाठी/ निर्वचनासाठी कवितेने दरवाजे सतत खुले ठेवायला हवेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! ही वाचली नव्हती. अतिशय आशयगर्भ, अलंकारीक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0