दुसरा सिनेमा

दुसरा सिनेमा

लेखक - अवधूत परळकर

कलात्मक सिनेमाला नावं ठेवणारा, येता जाता त्याची खिल्ली उडवणारा एक वर्ग आहे. हा वर्ग प्रायोगिक नाटक ह्या प्रकाराची टिंगल करत असतो आणि नवचित्रकलेलाही यथेच्छ नावं ठेवत असतो. नवीन काही स्वीकारायचं नाही; समजून न घेताच पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून त्याच्याविषयी वाईटसाईट बोलत राहायचं, असं ह्या मंडळींचं धोरण आहे. ह्याचा अर्थ, नवं ते सगळं चांगलं, असा नाही. पण नव्याकडे स्वागतार्ह भूमिकेतून पाहणं आणि त्यातलं बरं-वाईट तपासणं गरजेचं आहे. असंही होतं की, सिनेमातल्या नव्या प्रयोगांना नावं ठेवणारे काही जण चुकून केव्हातरी फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावतात आणि तिथले सिनेमे पाहून बदलून जातात. ज्या धर्माविषयी तिरस्कार आहे, त्या धर्माची मूळ तत्त्वं समजताच त्याच्याविषयीचे गैरसमज दूर होऊन जावेत आणि मनातल्या मनात धर्मांतर घडावं, तसं ह्या लोकांचं होऊन जातं.

वास्तविक कलात्मक सिनेमा असं काही नसतंच. सिनेमा हा मूलत: कलाविष्कार आहे. काही सिनेमे केवळ व्यावसायिक नफा डोळ्यांसमोर ठेवून काढले जातात. सिनेमा हा एक कलाविष्कार आहे हे भान ह्या नफेखोर वृत्तीत हरवून जातं. मग अधिकाधिक नफा मिळण्यासाठी धंदेवाईक तडजोडी करणं अटळ होऊन बसतं. ह्या प्रयत्नात सिनेमा कलेपासून दूर सरकतो, ह्याची फिकीर ह्या कलेच्या व्यापार्‍यांना नसते. कलात्मक सिनेमा म्हणून ओळखला जाणारा दुसरा सिनेमा, व्यावसायिक हित आणि कला ह्यांपैकी, कला ह्या घटकाला अधिक महत्त्व देतो. ‘कलात्मक’ ह्या विशेषणापेक्षा ‘कलानिष्ठ’ विशेषण त्यांच्या निर्मितींना अधिक शोभून दिसेल. थोडक्यात, ह्या दोन गटातल्या निर्मात्यांची सिनेमा ह्या गोष्टीकडे बघण्याची द्दष्टी भिन्न असते. अर्थात, ही ढोबळ विभागणी झाली. असेही निर्माते-दिग्दर्शक असतात जे कला आणि व्यवसाय ह्याचा तोल सांभाळून उत्तम कलाकृती निर्माण करतात. अशा सिनेमाची उदाहरणं हॉलिवुडच्या सिनेसृष्टीत मोठ्‌या प्रमाणात आढळतात. आपल्याकडेही असे काही मोजके प्रयत्न झालेले आहेत. तेव्हा सिनेमा हा व्यावसायिकद्दष्ट्या यशस्वी झाला आहे, म्हणून तो कलात्मकद्दष्टया कमी दर्जाचा असेल असं समजायचं कारण नाही. चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा असे दोनच प्रकार सिनेमात खर्‍या अर्थानं सिनेसृष्टीत अस्तित्वात आहेत.

आपल्याकडच्या सिनेमांवर नाटकांचा नको इतका प्रभाव आहे. सिनेमाध्यम हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे, ही जाण आपल्या भल्याभल्या निर्माते-दिग्दर्शकांत आढळत नाही. ज्यांनी सिनेमाची मर्मस्थानं ओळखून निर्मिती केली, त्यांनी प्रेक्षणीय आणि प्रशंसनीय कलाकृती रसिकांपुढं ठेवल्या आहेत. दर चित्रपटागणिक त्यांनी आपला सिनेमा विकसित करत नेला आणि त्याबरोबर सिनेमा हे माध्यमही अधिकाधिक विकसित करत नेलं.

धंदेवाईक चित्रपटांहून ह्या मंडळींचे सिनेमे वेगळे ठरतात, कारण किमान भांडवलाचा अत्यंत कल्पकतेनं वापर करून आपल्या सिनेमातून त्यांनी वेळोवेळी समाजातल्या गंभीर समस्यांना हात घातला आहे आणि हे साधताना त्यांनी कोणतीही कलाबाह्य तडजोड केलेली नाही. जिथं ‘मागणी तसा पुरवठा’ अशा उद्देशानं कलेशी प्रतारणा करून मोठया प्रमाणावर दर्जाहीन सिनेमे काढले जात आहेत, तिथं कलेशी एकनिष्ठ राहून निर्मिती करण्याचा लहानसा प्रयत्नदेखील मौलिक मानला गेला पाहिजे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात कलानिष्ठ सिनेमे काढण्यासाठी धडपडणार्‍या आपल्याकडच्या कलावंताचं विशेष कौतुक वाटतं. त्यांच्या फसलेल्या निर्मितीदेखील बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या कोणत्याही धंदेवाईक चित्रपटापेक्षा श्रेष्ठ ठरतात.

सिनेनिर्मितीला प्रचंड भांडवल लागतं. कलानिष्ठ सिनेमे काढणार्‍यांपुढची ही एक मोठी समस्या आहे. सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. ह्या मंडळींच्या सिनेमाला समीक्षकांची दाद मिळते, तो पुरस्कारानंही गौरवला जातो, पण त्याला थिएटर मिळत नाही. मिळालंच तर प्रेक्षक लाभत नाहीत. ह्या अवस्थेमुळं अशा सिनेमाला आर्थिक भांडवल पुरवायला सहसा कोणी पुढं येत नाही. अदूर गोपालकृष्णन् ह्या दिग्गज दिग्दर्शकाला केरळमधल्या रबराच्या मळेवाल्यांनी पैसा पुरवला, म्हणून तो व्यापारी हिताची पर्वा न करता मनाजोगत्या कलाकृती निर्माण करू शकला. इतरांचं काय? चाळीस वर्षांपूर्वी अशा बिकट अवस्थेत आपल्याकडचे कलाप्रेमी दिग्दर्शक सापडले होते. खूप कल्पना डोक्यात आहेत, पण पैशाअभावी काही करता येत नाही अशी अवस्था.

अशा वेळी ‘एन्.एफ्.डी.सी.’ (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) ही शासकीय पाठबळ असलेली संस्था पुढं आली. ह्या संस्थेनं दिलेल्या आर्थिक शक्तीमुळं आपल्या देशात सत्तरच्या दशकादरम्यान आणि नंतर उत्तमोत्तम कलापूर्ण चित्रपट निर्माण होऊ शकले. मृणाल सेन, श्याम बेनेगल, मणी कौल, सईद मिर्झा, कुमार शहानी, मुझफ्फर अली, गोविंद निहलाणी, गिरीश कार्नाड, बुद्धदेव दासगुप्ता, अरविंदन, गिरीश कासारवल्ली, केतन मेहता ह्यांसारखे दिग्दर्शक ह्या योजनेतून पुढं आले. त्यांनी वैयक्तिक मानसन्मान तर मिळवलेच, पण नव्या सिनेमाला देशात आणि परदेशात प्रतिष्ठा मिळवून दिली. एकोणीसशे सत्तर-ऐंशीच्या काळात सांस्कृतिक क्षेत्रात हिंदी सिनेमानं निर्माण केलेल्या धंदेवाईक बजबजपुरीला शह देण्याचा प्रयत्न ह्या होतकरू कलावंतांनी केला. त्यांच्या सर्व निर्मिती कलात्मकद्दष्टया उत्कृष्ट किंवा आदर्श होत्या, अशातला भाग नाही, पण ह्या कलाकृतींचं सिनेमापण वादातीत होतं. ‘असा सिनेमा असतो राजा’, असं अवघ्या चित्रदुनियेला सांगायचं काम ह्या चित्रपटांनी केलं, आणि भारतीय चित्रसृष्टीला ह्याची फार गरज होती.

वित्तोरिओ दे सिका या इटालियन दिग्दर्शकाच्या ‘बायसिकल् थीव्ह्ज़्’ ह्या चित्रपटानं प्रभावित होऊन सत्यजित रायनं ‘पथेर पांचाली’ ही अजरामर कलाकृती निर्माण केली हे सर्वज्ञात आहे, पण ह्या सिनेमामागे एवढी एकच प्रेरणा नव्हती. सत्यजित राय एका लेखात म्हणतात, ‘आपल्या प्रेक्षकांना काय हवंय, ते बंगाली चित्रपटांना फार पूर्वीपासून उमगले होते. ते तेव्हापासून आपल्या बिनधोक मार्गाला घट्ट चिकटून होते. खरे म्हणजे बेचव, ठोकळेबाज, सर्व प्रकारची भेसळ असलेल्या बंगाली चित्रपटांमुळेच तर मला मुख्यत्वे काहीतरी करायची प्रेरणा मिळाली’. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला ‘पथेर पांचाली’ उठून दिसणं साहजिक होतं, असं त्यांनी पुढं म्हटलंय. हिंदी सिनेमा जेव्हा गीतकार आणि संगीतकारांच्या अद्भुत कामगिरीवर लोकप्रियता मिळवत होता आणि तद्दन कौटुंबिक मेलोड्रामांचा भडीमार प्रेक्षकांवर करत होता, तेव्हा अप्रस्तुत गाणी आणि नृत्यांना फाटा देणारा, तत्कालीन सामाजिक चित्र आपल्या कलाकृतीतून मांडू पाहणारा सिनेमा सत्यजित राय, मृणाल सेन, गिरीश कार्नाड प्रभृतींनी सर्वांसमोर आणला. सिनेमा हे करमणुकीचं माध्यम असेल, पण करमणूक निर्बुद्ध असली पाहिजे असा काही नियम नाही, हे भारतीय प्रेक्षकांना ह्या चित्रपटांनी दाखवून दिलं.

चित्रपटसृष्टीतल्या ह्या नव्या प्रवाहाचं नातं युरोपातल्या वास्तववादी सिनेमाच्या लाटेशी आणि त्यापाठोपाठ आलेल्या न्यू-वेव्ह चळवळीशी होतं.

काय होती ही न्यू-वेव्ह चळवळ?

आलेक्सांद्र आस्त्रूक या फ्रेंच कादंबरीकारानं १९४८ साली ‘कॅमेरा पेन’ या मथळ्याखाली मांडलेले विचार, हा ह्या न्यू वेव्ह सिने-चळवळीचा अघोषित जाहीरनामा मानला जातो. आस्त्रूकनं आपल्या लेखातून तरुणांना आवाहन केलं,
”लेखनकला आणि चित्रपटकला ह्यांच्याइतकीच चित्रपटकलाही अभिव्यक्तीचं प्रभावी साधन बनू पाहते आहे. ह्या कलेचं अंगीभूत सामर्थ्य जाणून घ्या आणि ती अशा प्रकारे राबवा की, तुमचा कॅमेरा म्हणजे तुमची लेखणी बनून गेला पाहिजे. मग पाहा, लिखित भाषेइतकीच प्रभावी भाषा तुम्हांला पडद्यावर निर्माण करता येते की नाही.”

ह्या विचारातून एक नवं वातावरण सिनेसृष्टीत निर्माण झालं. पडद्यावर गोष्ट सांगण्यापेक्षा कॅमेर्‍याचा लेखणीप्रमाणे वापर करून आपल्या मनातले विचार, आपली भूमिका, सिद्धांत मांडण्याची संकल्पना पुढं आली. पडद्यावर प्रतिमांच्या रूपात वैचारिक लेख, कविता लिहिल्या जाऊ लागल्या. कागदावर लिहिलेल्या पटकथा चित्रित करण्याऐवजी कॅमेरा हातात घेऊन द्दश्यांच्या लिपीतून पटकथाकार पटकथा लिहायला लागले. स्टुडिओ आणि त्यातले बेगडी सेट धुडकावून नव्या तरुण दिग्दर्शकांनी कॅमेरे स्टुडिओबाहेर रस्त्यावर आणले. रस्त्यावरल्या जिवंत पार्श्वभूमीवर चित्रपटातले प्रसंग चित्रित होऊ लागले. सरधोपटपणा टाळून सिनेमाच्या रचनेत अभिनव प्रयोग केले जाऊ लागले.

न्यू-वेव्ह सिनेमाचा प्रणेता असलेल्या ज्याँ ल्यूक गोदारनं आपल्या बंडखोर निर्मितीनं भल्याभल्या समीक्षकांना चक्रावून टाकलं. त्याच्या निर्मितीनं गोंधळलेल्या एका पत्रकारानं गोदारला विचारलं, “चित्रपटाला सुरुवात, मध्य आणि शेवट असतो हे आपण मानता की नाही?” ह्यावर गोदार म्हणाला, “मानतो ना, माझ्या चित्रपटात हे तीनही घटक असतात. पण तुम्ही म्हणताय त्या क्रमानं नाही.”

अत्यंत बेफामपणे न्यू-वेव्ह चळवळ युरोपातल्या तरुण दिग्दर्शकांत फोफावली. सिनेमाच्या विकासाला तिनं वेग दिला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या संदर्भातल्या विचारांना क्रांतिकारी परिमाण दिलं. चित्रपटविषयक जुन्या सिद्धांतांची, चित्रणशैलीतल्या जुन्या परंपरांची मोडतोड करून, आशय आणि तंत्र या दोन्ही क्षेत्रांत अभिनव प्रयोग करणार्‍या कलाकृती ह्या चळवळीतून आकाराला आल्या.

ते जागतिकीकरणाचे दिवस नव्हते, पण सिनेमाध्यम त्याच्या जन्मापासून विश्वव्यापी होतं. युरोपातल्या ह्या चळवळीच्या नव्या लाटा दूरवर पोचल्या. आशियाई देशांनी त्यापासून प्रेरणा घेतली. पण थेट नक्कल न करता तिथल्या कलावंतांनी आपआपल्या सांस्कृतिक पर्यावरणाशी सांधा जुळवून न्यू-वेव्ह चळवळीच्या देशी आवृत्ती घडवल्या. प्रत्यक्ष युरोप खंडातही देशातल्या सांस्कृतिक पर्यावरणाचे संदर्भ लक्षात घेऊन ह्या चळवळीचे अन्वय लावण्यात येत होते. फ्रान्समध्ये गोदार आणि फ्रान्स्वा त्रूफो न्यू-वेव्ह चळवळीची पायाभरणी करत असता तिथं इटलीत फेदरिको फेलीनी, मिकेलान्जेलो अन्तोनिओनी हे तिथल्या नव्या सिनेमाला आकार देत होते. अन्तोनिओनीचा ‘लावेन्तुरा’, ‘एक्लिप्स’, ‘द नाईट’, तर फेलिनीच्या ‘ला दोल्चे विता’, ‘एट् अॅन्ड हाफ’ ह्या कलाकृती न्यू वेव्ह सिनेमाच्या इटालियन आवृत्त्या मानल्या गेल्या. स्वीडनमध्ये इंगमार बर्गमननं आपल्या पद्धतीनं ह्या लाटेला प्रतिसाद दिला. क्लोजअपमधून त्याचा कॅमेरा थेट माणसांच्या अंतरंगात शिरला. जबरदस्त आंतरिक संघर्षाचा, परंतु घटनाहीन असा, सिनेमा त्यानं पेश केला. चेकोस्लोवाकियात जेरी मेनझिलनं नव्या लाटेचं नेतृत्व केलं. विनोदी शैलीत तो प्रचलित दांभिक मूल्यांची रेवडी उडवू लागला. तिथं जपानमध्ये पडद्यावरलं नवकाव्य म्हणता येईल असा ‘डायरी ऑफ शुजुंकी थीफ’ हा चमत्कारिक शैलीतला खळबळजनक सिनेमा काढला. पोलंडमध्ये आन्द्रे वायदा आणि रोमान पोलान्स्की नवचित्रपटाच्या चळवळीत आघाडीवर राहिले. नववास्तववादी चित्रपटांनी धंदेवाईक सिनेमाविरूद्ध बंड पुकारलंच होतं. न्यू वेव्ह सिनेमानं त्याला लढाईचं रूप दिलं. चित्रपटाचं नवं व्याकरण, नवी लिपी पडद्यावर मांडली जाऊ लागली. असाही सिनेमा असतो किंवा सिनेमा खरा असाच असतो ही जाणीव प्रेक्षक, समीक्षक आणि व्यावसायिक चित्रनिर्मात्यात पसरली.

फिल्म फेस्टिव्हलच्या चळवळीची साथ मिळाल्यानं न्यू वेव्ह चळवळ जगभर पसरायला मदत झाली. फेस्टिव्हलमध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत चळवळीतल्या मंडळींच्या सिनेमाला पुरस्कार मिळत गेल्यानं ह्या सिनेमाला जागतिक प्रतिष्ठाही मिळाली.

भारतात ही चळवळ पोचायला १९७० साल उजाडावं लागलं. मृणाल सेनच्या ‘भुवन शोम’ चित्रपटावर ह्या चळवळीचा पहिलावहिला प्रभाव दिसून आला. फ्रीज्ड शॉट्स, फास्ट मोशन, स्लो-मोशन, जंप कटिंग ही आधुनिक तंत्रं सेननं ‘भुवन शोम’मध्ये अत्यंत चपखलपणे वापरली. ‘भुवन शोम’च्या समीक्षकी आणि व्यापारी यशानं नव्या दिग्दर्शक, निर्मातेमंडळीत उत्साह संचारला. एन.एफ.डी.सी.च्या आर्थिक साहाय्यावर गिरीश कार्नाड, गिरीश कासारवल्ली, अदूर गोपालकृष्णन, अरविंदन, कुमार शहानी, मणि कौल, एम.एस सत्यू ह्यांसारख्या दिग्गजांनी आपल्या कलाकृतीतून न्यू वेव्ह चळवळीच्या भारतीय आवृत्तीला आकार आणि प्रतिष्ठा दिली. एन.एफ.डी.सी.च्या कलाकृतींना देशात आणि विदेशात पुरस्कार मिळू लागले. भारतीय चित्रसृष्टीचं लक्ष नव्या सिनेमाकडे वळलं. कलावर्तुळात हा सिनेमा चर्चिला जाऊ लागला.

राज कपूर, बी. आर. चोप्रा, देव आनंद ह्यांचा सिनेमा व्यापारी पातळीवर अफाट यश मिळवत होता; त्याच सुमारास नव्या लाटेतून निर्माण झालेला सिनेमा कलात्मक पातळीवरची प्रतिष्ठा आणि जाणकार समीक्षकांची वाहवा मिळवत होता. श्याम बेनेगल आणि नंतर त्याचा कॅमेरामन गोविंद निहलाणी ह्यांनी आपल्या चित्रपटांतून आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाला हात घातला. स्त्रिया आणि आदिवासींवरील अत्याचार, जमीनदारांची जुलूमशाही, शासकीय-प्रशासकीय पातळीवरला भ्रष्टाचार, हे सर्व वास्तव प्रभावीपणे पडद्यावर उतरू लागलं. हिंदी सिनेमानं दडवलेला खरा भारत ह्या मंडळींनी पडद्यावर आणला. सिनेमाला कौटुंबिक ड्रामाबाजीतून बाहेर काढून व्यापक सामाजिक परिमाण दिलं.

समांतर सिनेमा म्हणून हा सिनेमा ओळखला जाऊ लागला. ह्या कलाकृतींचा दर्जा कमीजास्त असला, तरी विषयाची निवड आणि मांडणीतील सतेजपण जाणकारांची दाद मिळवून गेलं. सुरुवातीच्या ह्या सिनेमातून प्रेरणा घेऊन नंतरच्या पिढीतले तरुण या क्षेत्रात उतरले, सिनेमाच्या सामाजिक बांधिलकीचं सूत्र त्यांनी अधिक पुढं नेलं आणि व्यवस्थेतले आणखी सूक्ष्म तपशील समोर आणले.

कलात्मक पातळीवर समांतर सिनेमानं बाजी मारली, तरी जनमानसापर्यंत मात्र तो पोहोचू शकला नाही. आजही या सिनेमाला ह्या पातळीवर फारसं यश मिळालं आहे, असं म्हणता येत नाही. एन.एफ.डी.सी. ह्या संस्थेनं ह्या सिनेमाला उभं करण्यात मोलाची कामगिरी बजावली हे खरं असलं, तरी ह्या सिनेमाचं मार्केटिंग करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले नाहीत. मुंबईत ह्या संस्थेनं आकाशवाणी केंद्रात अशा सिनेमाच्या प्रदर्शनासाठी थिएटर निर्माण केलं. पण ते शहराच्या एका टोकाला, नरीमन पॉंइंट विभागात, असल्यानं त्याला प्रेक्षक मिळाले नाहीत. शेवटी प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी ते बंद करायची पाळी आली. ह्या संस्थेची ही उदासीनता आजही कायम आहे. समांतर सिनेमा लोकांपर्यंत पोचवायचं काम फिल्म् सोसायट्यांनी अधिक चांगल्या प्रकारे केलं. त्यांनी केवळ भारतीय समांतर सिनेमा नाही, तर युरोप-आशियातला नवा सिनेमा सर्वसामान्यांपर्यंत नेला. साठ साली सुरू झालेल्या चळवळीनं आज चांगलं बाळसं धरलं आहे. अलीकडे फिल्म फेस्टिव्हलला तरुणांची बर्‍यापैकी गर्दी असते. फिल्म फेस्टिव्हल्सची संख्याही दर वर्षी वाढते आहे. हे सुचिन्हच आहे. अर्थात समांतर सिनेमा कितीही लोकप्रिय झाला, तरी मुख्य प्रवाहातल्या सिनेमाच्या लोकप्रियतेशी ह्या सिनेमाची तुलना होऊ शकणार नाही. मुख्य प्रवाहाचा प्रेक्षक चुकून फिल्म सोसायटीतला सिनेमा पाहायला आला की तो ह्या सिनेमानं प्रभावित होतो आणि आपण करमणुकीच्या नावाखाली तकलादू सिनेमे बघत आलो, अशी पश्चात्तापदग्ध जाणीव त्याला होते हे मात्र खरं आहे. नेटवरून आज समांतर सिनेमाच्या आशय आणि तंत्राबद्दल अत्यंत उद्बोधक चर्चा चालते, हे पाहून बरं वाटतं.

मध्यंतरी मुंबई दूरदर्शननं दर रविवारी कालनिष्ठ सिनेमे दाखवायला सुरुवात केली होती. प्रादेशिक भाषेतल्या पुरस्कारप्राप्त कलाकृती घरबसल्या लोकांना पाहायला मिळायची सोय या सिनेमालिकेमुळे झाली. नव्या लाटेमुळे प्रादेशिक भाषेतल्या सिनेमाचं पुनरुज्जीवन झालं हे मुद्दाम नोंदवायला हवं. त्या त्या प्रदेशाची निव्वळ भाषा नाही, तर इतरही सांस्कृतिक वैशिष्टयं घेऊन हा सिनेमा राष्ट्रीय पातळीवर आला. सिनेसोसायटीतल्या लहान वर्तुळात परिचित असलेला हा सिनेमा संपूर्ण देशातल्या रसिकांसाठी उपलब्ध होणं गरजेचं होतं. दूरदर्शनचे प्रेक्षक देशभर पसरलेले असल्यानं ह्या प्रादेशिक कलाकृतींना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळाला.

युरोपमधल्या सिनेचळवळीतून उदयाला आलेल्या समांतर सिनेमाची काही खास वैशिष्टयं होती आणि आजही आहेत. ह्या सिनेमात स्थानिक बोलीचा अधिकाधिक वापर असतो. त्यामुळे निसर्गाबरोबर ह्या सिनेमांना एक भाषिक नेपथ्यही मिळतं. ह्या सिनेमात सुपरस्टार नसतात. बरेच अभिनेते रंगभूमीवरून आल्यानं उच्च प्रतीचा अभिनय पाहायला मिळतो. पण हा सिनेमा स्टार-सिस्टमच्या विरोधात आहे. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, असा ह्या मंडळींचा दावा आहे. त्यामुळे प्रथितयश नटमंडळींच्या मागं ते धावत नाहीत. गावातल्या जमीनदाराचं काम अक्षयकुमार, त्याच्या सावकार मित्राच्या भूमिकेत ऋषी कपूर, असली भानगड इथं नसते. त्यामुळे सर्व पात्रं अस्सल वाटतात. ज्या प्रदेशात हा कलानिष्ठ सिनेमा वितरित होतो, तिथल्या प्रेक्षकवर्गाला अभिनेते अपरिचित असल्यानं चित्रपटातलं एकूण पर्यावरण त्याला एकदम वास्तववादी वाटतं.

समांतर सिनेमातल्या कलाकृतीवरला मोठा आक्षेप हा की, हे सिनेमे अत्यंत मंदगतीत प्रवास करताना दिसतात. या गतीनं प्रेक्षक बोअर होतात. बाहेरचे अॅक्शनपॅक्ड सिनेमे पाहायची सवय असलेल्यांना समांतर सिनेमातले मंद गतीनं प्रवास करणारे चित्रपट खटकणं स्वाभाविक आहे. वास्तविक समांतर सिनेमाची संथगती ही दिग्दर्शकानं हेतुत: निवडलेली गती असते. या जातकुळीतल्या बर्‍याच चित्रपटांतलं नाटय हे ग्रामीण पार्श्वभूमीवर साकारतं. तिथल्या जीवनाची गती कॅमेर्‍यात पकडणं गरजेचं होऊन बसतं. सिनेमा त्यामुळे काहींना नीरस वाटला तर त्याला नाईलाज असतो. अनेकदा पात्रांच्या जीवनशैलीला वेढून राहिलेली नीरसता दिग्दर्शकाला चित्रणाच्या गतीमधून ठळकपणे अधोरेखित करायची असते. सादरीकरणाच्या गतीमागचं हे प्रयोजन प्रेक्षकांनी समजून घेणं आवश्यक आहे. पारंपरिक सिनेमे पाहायच्या सवयीमुळं सिनेमाच्या कथानकाबद्दल जे आडाखे असतात, त्यांना ह्या सिनेमाच्या कथाप्रवासात अनेकदा धक्के बसतात. समांतर सिनेकृतीचा आस्वाद घेण्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता असते आणि काहीशी बौद्धिक तयारीही लागते, हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. केवळ टाईमपास म्हणून चित्रपट पाहू इच्छिणार्‍यांसाठी हा सिनेमा नाही.

परदेशातून जेव्हा ह्या धाटणीचे सिनेमे येतात, तेव्हा ते आपल्याबरोबर त्या देशाचा इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र घेऊन येतात. त्या देशातल्या नागरिकांचा, त्यांच्या मानसिक जडणघडणीचा, त्यांच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीचा परिचय ह्या चित्रपटांतून कळत-नकळत होत राहतो. सिनेमाबद्दलच्या जुन्या संकल्पना बाजूला ठेवून नव्या नजरेनं नव्या सिनेमाकडे पाहायचं ठरवलं, तर नवा सिनेमा कथानक आणि आशयापलीकडे जाऊन बरंच काही देतो आहे, हे मान्य करावं लागेल.

फिल्म फेस्टिव्हल उपक्रमाच्या जोरदार प्रसारामुळे आणि नेटवरून उत्तमोत्तम जागतिक सिनेकृती पाहायची सोय झाल्यामुळे समांतर सिनेमाला आता जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. दुसरीकडे ह्या सिनेमानं पुढं आणलेल्या नव्या आशयात्मक बदलांचे आणि तंत्राचे संस्कार मुख्य प्रवाहातल्या सिनेमावर पडू लागल्याचं स्पष्ट दिसू लागलं आहे. व्यावसायिक हिंदी सिनेमा बदलतो आहे आणि व्यावसायिक प्रादेशिक सिनेमाच्या रूपातही परिवर्तन होऊ लागलं आहे. मराठी सिनेमात तर ह्या बदलाच्या खुणा स्पष्ट जाणवू लागल्या आहेत. हा नवचित्रपटांच्या लाटेचा मोठा विजय आहे. प्रायोगिक नाटकाचा अप्रत्यक्ष परिणाम मराठी व्यावसायिक रंगभूमीचा दर्जा सुधारण्यात झाला, तसा सिनेमातल्या प्रायोगिकतेचा अप्रत्यक्ष परिणाम व्यावसायिक मराठी सिनेमावर होतो आहे आणि मराठी प्रेक्षकांची अभिरुचीही बदलत चालली आहे, ही मोठी घटना आजच्या परिभाषेत - ब्रेकिंग न्यूज आहे.

व्यावसायिक सिनेमा महत्त्वाचा की कलानिष्ठ सिनेमा हा महत्त्वाचा, ह्या वादाला अर्थ नाही. महत्त्वाचं आहे सिनेमाचं सिनेमापण टिकवून ठेवणं. दोन्ही जातकुळींच्या सिनेमात त्या दिशेनं प्रयत्न होत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

फिल्म फेस्टिव्हल उपक्रमाच्या जोरदार प्रसारामुळे आणि नेटवरून उत्तमोत्तम जागतिक सिनेकृती पाहायची सोय झाल्यामुळे समांतर सिनेमाला आता जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे.
महत्त्वाचं आहे सिनेमाचं सिनेमापण टिकवून ठेवणं. दोन्ही जातकुळींच्या सिनेमात त्या दिशेनं प्रयत्न होत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

गंगेत घोड न्हालं!!

आता त्यामुळे प्रेक्षकांना सुजाण करणारे, विचाराला दिशा देणारे लेखन करणारे नवसमीक्षावादी आता फक्त तुच्छताविरहीत, हुच्चभ्रुगिरीविरहीत लिहायच्या दिशेनं प्रयत्न करायला लागले की सुदिन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखात न पटण्यासारखं काही नाहीच. पण टायमिंग थो-डं गंडल्यासारखं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघनाशी सहमत.
न पटण्यासारखं, न समजण्यासारखं काही नसलं तरी मुद्द्यांच्या अतिविस्तारामुळे लेख थ्थोड्डास्सा रटाळ झाला आहे. किमान मला वाटला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला पण काहीसा एकांगी वाटला ("ह्याचा अर्थ, नवं ते सगळं चांगलं, असा नाही." अशा स्वरूपाची मेख एक दोन ठिकाणी मारून ठेवली असली तरीही).

"...जे कला आणि व्यवसाय ह्याचा तोल सांभाळून उत्तम कलाकृती निर्माण करतात. अशा सिनेमाची उदाहरणं हॉलिवुडच्या सिनेसृष्टीत मोठ्‌या प्रमाणात आढळतात."
हे काही पटले नाही. हॉलिवुडमध्ये बनणारे बहुतेक चित्रपटही तद्दन धंदेवाईक असतात.

"सिनेनिर्मितीला प्रचंड भांडवल लागतं."
इथेच तर सगळी गोम आहे. ह्या क्षेत्रात एकाच्या कलाविष्काराचा, कलासक्तीचा भुर्दंड दुसर्‍या कोणाला तरी (निर्माता, फायनॅन्शियर, वितरक) सोसावा लागतो. कलेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नसेल तर ह्या मंडळींनी धंद्याच्या दृष्टिने केलेल्या सूचना-सुचवण्या दिग्दर्शकाला मान्य करता येणे शक्य नसते. असे अटी-शर्तींविना भांडवल पुरवणारे दानशूर कर्ण कोणत्याही काळी विरळाच. NFDCसारख्या संस्थांनी काही काळ पतपुरवठा केला पण शेवटी सरकारनेही हात आखडता घेतला.

"मुंबईत ह्या संस्थेनं आकाशवाणी केंद्रात अशा सिनेमाच्या प्रदर्शनासाठी थिएटर निर्माण केलं. पण ते शहराच्या एका टोकाला, नरीमन पॉंइंट विभागात असल्यानं त्याला प्रेक्षक मिळाले नाहीत.
NCPAसुद्धा शासनाने व संबंधित नाट्य- व कलाक्षेत्रातील 'धूरिणां'नी दक्षिण मुंबईच्या टोकाला बांधून सामान्य कलाप्रेमी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली. ह्याच एलिटिझममुळे म्हणा, दक्षिण मुंबईबाहेर राहणार्‍यांना काय करायचे आहे दर्जेदार चित्रपट व नाटके पाहून ह्या कलाक्षेत्रातील कंपूवृत्तीमुळे म्हणा, सर्वसामान्य लोक ह्या चित्रपटांपासून, नाटकांपासून अधिकच दुरावले. चित्रपट महोत्सवांची व फिल्म सोसायट्यांचीही कथा थोडी अशीच आहे. तिथली मंडळी आपल्या वर्तुळात इतकी रमलेली असतात की नव्या माणसाला उपरेपणाची भावना होते. कदाचित म्हणूनच आता जालावर हे सिनेमे उपलब्ध होऊ लागल्यावर बर्‍याच जास्त संख्येने लोक ते पाहू लागलेत, त्यांच्याकडे आकृष्ट झालेत, त्याविषयी चर्चा करू लागलेत. कारण जालावर भिंती नसतात.

समांतर चित्रपटांच्या धीम्या गतीचे परळकरांनी केलेले समर्थन अंशतः पटण्यासारखे असले तरी मणी कौल व कुमार शहानी ह्यांचे चित्रपट पाहताना सुनील गावस्करने त्याच्या पुस्तकात पतौडीच्या एका खेळीविषयी लिहिलेले आठवल्यावाचून राहत नाही. गावस्कर लिहितात की पतौडी अत्यंत संथ गतीने फलदांजी करत असल्यामुळे प्रेक्षक हुर्यो करू लागले, त्याच्या नावाने शंख करू लागले. त्यांची जिरवायला, खुन्नस काढायला पतौडी अधिकच हळूहळू खेळू लागला, अगदी फुल टॉसलाही डिफेन्ड करू लागला, व त्याने नव्वद मिनिटात केवळ तीन (चू.भू.दे.घे.) धावा काढल्या. कौल व शहानींचेही असेच होते काय? 'आमच्या चित्रपटांना संथ म्हणता काय? घ्या, आम्ही अजून रटाळ करतो त्यांना.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

ह्याच एलिटिझममुळे म्हणा, दक्षिण मुंबईबाहेर राहणार्‍यांना काय करायचे आहे दर्जेदार चित्रपट व नाटके पाहून ह्या कलाक्षेत्रातील कंपूवृत्तीमुळे म्हणा, सर्वसामान्य लोक ह्या चित्रपटांपासून, नाटकांपासून अधिकच दुरावले. चित्रपट महोत्सवांची व फिल्म सोसायट्यांचीही कथा थोडी अशीच आहे. तिथली मंडळी आपल्या वर्तुळात इतकी रमलेली असतात की नव्या माणसाला उपरेपणाची भावना होते.

सहमत आहे. पूर्वीच्या आपापल्या वर्तुळात घटपटादि चर्चा करणार्‍या पंडितांना नावे ठेवणार्‍या इंटुकांची स्थिती त्यांच्यापेक्षा फार काही वेगळी नसतेच. हा विरोधभक्तीचा एक नमुना म्हणावा की काय असा प्रश्नही पडतो कैकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंटुक म्हणजे काय?
.
बादवे, विरोध ज्याल करतो, त्याच्या जागीच आपणच स्थापित होतो ही जुनीच प्रोसेस आहे.
"प्रस्थापितांना विरोध" वगैरे करणारे प्रायोगिक वाले स्वतःच "प्रस्थापित" झालेले दिसतात तेव्हा मौज वाटते.
.
क्रांती करुन सत्ता उलथवणरा क्रांतीकारक स्वतः सत्तारुढ होताच, परिवर्तनाच्या विरोधात जातो;
स्थैर्याचे महत्व पब्लिकला पटवून द्यायला लागतो; स्वतः अस्सल सत्ताधारी होतो.
.
हे सृष्टीचक्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इंटुक्=इंटेलेक्चुअल चा शॉर्टफॉर्म.

बाकी मजा याची की स्वतः प्रस्थापित होऊनही प्रस्थापितांविरुद्ध गळे काढल्या जातात तेव्हा त्यातून स्वतःला वगळले जाते. सृष्टिचक्राबद्दलही सहमत, फक्त हे करणार्‍यांना दिसून येत नाही त्याची मजा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रपट महोत्सवांची व फिल्म सोसायट्यांचीही कथा थोडी अशीच आहे. तिथली मंडळी आपल्या वर्तुळात इतकी रमलेली असतात की नव्या माणसाला उपरेपणाची भावना होते.

+१
हीच गत अनेक चित्रकारांची व त्यांच्या सर्कल्सची, प्रायोगिक नाटकांची (आणि अनेक नवकवींचीही ;)) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्याकडे गल्लीतला कोणीही क्रिकेटप्रेमी, सचिन, कपील ही नावे वगळूनही भारतीय क्रिकेट बद्दल भरभरुन बोलू शकतो पण हे असे लेख लिहणार्‍यांपैकी किती जण कुरासावा, ओशीमा, कोबेयाशी वगळून जपान सिनेमा, बर्गमन, हाल्स्ट्रोम वगळून स्वीडीश सिनेमाबद्दल भरभरुन बोलू शकतात हे कुठे तपासुन मिळेल ? एकदा का इंगमार बर्गमन चे नाव दिले की स्वीडन मधे २०१२ मधे किती सिनेमे आले व मराठीत किती आले हे न तपासले तरी चालते. एकदा कुरासावा म्हणले की बरेचसे जपानी प्रेक्षक किती पॉर्न प्रेमी, अनिमे/मांगा प्रेमी आहेत याकडे दुर्लक्ष करता येते. पण आपल्याकडे बनवणारे मूर्ख व बघणारे ७ मुर्ख म्हणले की समीक्षा कशी तृप्त होते. फॅशन प्रमाणे मग कधी कोरीयन, कधी इराणी सिनेमाचे कौतुक करायचे व ते अती झाले म्हणायची वेळ येईस्तोवर सोमाली, सिरीयन नवजाणीवाकार तयार होतीलच कौतुकासपात्र!

ते असो. एक मुद्दा असाही आहे की आपल्यादेशात खाद्यसंस्कृती इतकी संपन्न, वैविध्यपूर्ण आहे असे आपण म्हणतो, मानतो. पण लोक बाहेर खायला गेले तर वरचष्मा राहीला आहे इडली, डोसा, उतप्पा अथवा पावभाजी बटाटेवडा मिसळ अथवा त्याच त्या पंजाबी भाज्या पनीरवाल्या, रोटी. आणी एक दोन प्रकारच्या थाळ्या.... दोन चार मराठी, पंजाबी व सौथिंडीयन बास वर्तूळ पूर्ण. आज भारतातील किती प्रमुख शहरात गेल्यावर आपण म्हणू शकतो आजपासुन रोज ३० दिवस जेवण हे वेगवेगळे भारतातील प्रत्येक राज्यातील हवे. खाण्यात जर कित्येक लोक आपली चव, पिण्यात आपला ब्रँड बदलू शकत नाहीत. ही सगळी मानसिकता आधी बदलायला हवी.

जेव्हा नाविन्याचा ध्यास, हौस आतून येते तेव्हाच मग धोपट मार्ग सोडायला मनुष्य उत्सुक होतो. याकरता प्रयत्न व्हायला हवेत. शालेय जीवनापासुन सर्वांनी एकच प्रकारची घोकंपट्टी एकाच साच्याची उत्तरे देण्यापेक्षा सर्वांनी वेगवेगळे स्वतंत्र काम करावे असे अभ्यास हवे. जगातील प्रमुख शहरात सर्व प्रकारच्या कलांची जी उधळण होते त्यामागे खुल्या मानसिकतेचा एक मोठा भाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च् च्च्! पहिला मुद्दा रोचक आहे, असं म्हणेम्हणेपर्यंत प्रतिसाद कायच्याकाय भरकटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पहिला मुद्दा झाल्यावर पुढील मुद्दे मी एकंदर आपल्या अनुभवाच्या , रस घेण्याच्या कक्षा आपणच रुंदावून पाहील्या पाहीजेत असे प्रत्येकाने काय वेगळे करावे अश्या हेतूने लिहले आहे. आजही आपल्याला आसपास असे लोक दिसतात की तेच ते चार पदार्थ सोडून बाकीचे खायला तयार नसतात. बहुतकरुन आपल्या प्रांताचे अथवा वर उल्लेख केलेले टिपीकल चार पदार्थ खातो. अजुनही सर्व राज्यांचे स्पेशल असे रेस्टॉरंट सहज उपलब्ध नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाण्याचा विषय निघालाय म्हणून तोंड उघडतोय.
आज भारतातील किती प्रमुख शहरात गेल्यावर आपण म्हणू शकतो आजपासुन रोज ३० दिवस जेवण हे वेगवेगळे भारतातील प्रत्येक राज्यातील हवे.
दिल्लीजवळील गुरगाव/गुडगाव येथे kingdom of dreams नावाच भन्नाट प्रकार आहे.
तिथे वेगवेगळ्या राज्यांचे स्टॉल्स आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटिज् तिथे मिळतात.
ब्याक्ग्राउंड मध्ये आधी मंद मंद चालणारे आणि काही तासांनी ठेका धरणारे संगीत अशी वातावरण निर्मितीसुद्ध उत्तम आहे.
नेपथ्यही झकास.
एकाच छताखाली भारतातील बर्‍याच चवी पहायच्या सतील तर इथे जावं.
प्रचंड महाग आहेच ठिकाण; पण त्याचा प्रमुख टार्गॅत ऑडियन्स हा भारतात येणारे पर्यटक व भारतातील पैशेवाली मंडळी आहेत हे एकदा मान्य केलं तर त्या गोष्टीचं इतकं काही वाटत नाही.
(गूगल केले तर अधिक माहिती मिळेल त्याबद्दल)
प्रगती मैदानलासुद्धा असच काहीतरी असते असे ऐकले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> पण हे असे लेख लिहणार्‍यांपैकी किती जण कुरासावा, ओशीमा, कोबेयाशी वगळून जपान सिनेमा, बर्गमन, हाल्स्ट्रोम वगळून स्वीडीश सिनेमाबद्दल भरभरुन बोलू शकतात हे कुठे तपासुन मिळेल ? एकदा का इंगमार बर्गमन चे नाव दिले की स्वीडन मधे २०१२ मधे किती सिनेमे आले व मराठीत किती आले हे न तपासले तरी चालते. एकदा कुरासावा म्हणले की बरेचसे जपानी प्रेक्षक किती पॉर्न प्रेमी, अनिमे/मांगा प्रेमी आहेत याकडे दुर्लक्ष करता येते.

त्रागा अस्थानी वाटला. ज्यांना जपानी बहुजनसंस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, ते पॉर्न/अनिमे/मांगाचा अभ्यास करतील (आणि करतातही). ज्यांना जागतिक दर्जाच्या जपानी सिनेमामध्ये रस आहे ते कुरोसावा, ओझू, ओशिमा, कोबायाशी प्रभृतींना टाळू शकत नाहीत. पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्याचं भान राखणं गरजेचं आहे असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आम्ही कुठे लेखक परफेक्ट मांडू शकणारे हो! मुद्दा हा होता की अश्या "अभ्यासपूर्ण" लेखात समिक्षक नावे टाकतो, जणु काही त्या सिनेमा, दिग्दर्शकामुळे तो देश, समाज , जग असे बदलले आहे, त्या प्रेक्षकांची अभिरुची ती काय व आपण कुठे बघा व लगेच आपल्या मेनस्ट्रीम सिनेमाला शिव्या. जणू सगळे काही काळे-पांढरे असते. त्याचे भान राखले गेले की त्रागा आपसूक जाईल असे वाटते. Wink

असो आमच्या कळत्या-नकळत्या वयात दूरदर्शनवर रविवारी दुपारी प्रादेशिक सिनेमा, शुक्रुवार / शनिवार विदेशी सिनेमा, एन एफ डी सी वाले निवडक हिंदी सिनेमे हा दूरदर्शनला धन्यवाद द्यायचा राहीलाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> जणु काही त्या सिनेमा, दिग्दर्शकामुळे तो देश, समाज , जग असे बदलले आहे, त्या प्रेक्षकांची अभिरुची ती काय व आपण कुठे बघा व लगेच आपल्या मेनस्ट्रीम सिनेमाला शिव्या. जणू सगळे काही काळे-पांढरे असते.

बर्गमन, कुरोसावा प्रभृतींनी सिनेमाचा इतिहास घडवला, नवे प्रवाह आणले आणि गांभीर्यानं सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या अभिरुचीत बदल घडवून आणले हे खरं आहे. त्याबद्दल त्रागा करावा असं त्यात काही मला तरी दिसत नाही. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला (बहुजनसंस्कृतीतल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणे) इतिहास असतो. त्यातही नवे प्रवाह (ट्रेन्ड्स) येतात. त्यांचाही अभ्यास करता येतोच. पण त्यांनी जागतिक सिनेमाचा इतिहास घडवला असं सहसा दिसत नाही. अडचण नक्की काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बर्गमन, कुरोसावा प्रभृतींनी सिनेमाचा इतिहास घडवला, नवे प्रवाह आणले आणि गांभीर्यानं सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या अभिरुचीत बदल घडवून आणले हे खरं आहे. त्याबद्दल त्रागा करावा असं त्यात काही मला तरी दिसत नाही.

मलाही.

बर्गमन, कुरोसावा लोकांबद्दल आदर आहेच. त्यांच्याबद्दल त्रागा केला नाहीच आहे.

एलिटिस्ट अ‍ॅटीट्युड समीक्षेबदल केला आहे. त्या चार लोकांच्या पालख्या, दिंड्या घेउन मठ, क्लासेस चालवणार्‍यांबद्दल केला आहे. असो त्यांना फरक पडणार नाही आहे. जाउ दे स्वॉरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं
जणु काही त्या सिनेमा, दिग्दर्शकामुळे तो देश, समाज , जग असे बदलले आहे एकदा सिनेमा ही "लिपी" किम्वा "भाषा" किम्वा "सशक्त माध्यम" म्हणून मानल्यावर समजाला दूरगामी असं काहीतरी त्यानं देउन जाण्याची अपेक्षा ह्या वाक्यातून आलेली आहे.
म्हणजे समाजावर त्याचा ठळक असा प्रभाव पडणं.( नायक नायिके मुळे येणार्‍या कपड्यांच्या तात्कालिक फॅशन पेक्षा अधिक काहीतरी.)
.
हे अधिक म्हणजे काय? तर समजाची सरासरी खोली म्हणा उंची म्हणा, ते वाढववणं.
समाज सुसंस्कृततेच्या इतक्या पातळीला नेणं की लोकांचा समूहसुद्धा विवेकानच वागेल. "मॉब"चं सरासरी वय हे बालबुद्धीचं राहणार नाही.
35=10 हे खोटं ठरेल ह्या दिशेनं प्रवास सुरु करणं.
.
तर एखाद्या माध्यमाचा खरच असा प्रबहव पडू शकतो?
नक्कीच पडू शकतो की. युरोपातील आख्खे प्रबोधन म्हणजे कलेच्या, माध्यमाच्या पडलेल्या थेट ठशाची कहाणीच तर आहे की.
किंवा रुसो (Jean Rousseau,च्यामारी ह्याच्या प्रथम नावाचा उच्चार ठाउक नाही ) च्या तत्वज्ञानाचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांतीवर स्पष्ट दिसतो.
तसा प्रभाव असा. समाजाशी नाळ असावी, समाज बदलावा असं काहीतरी त्या वाक्यात दिलय असं वाटतं.
अभ्यस्त मंडळींची चर्चा नुसती वाचायची ठरवली होती; पण रहावलं नाही म्हणून प्रतिसाद दिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१.
दुसरा सिनेमा येण्यापूर्वी राज कपूर काय, बीआर चोप्रा काय किंवा बिमल रॉय काय... आपापल्या परीने समाजातल्या समस्या मांडतच होते.

दुसर्‍या सिनेमाचे योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.

सिनेमा हा धंदा आहे म्हटल्यावर धंद्याचे गणित पाळायलाच हवे. [आणि ते कुठल्याही कलेबाबत खरे आहे]. हॉटेलवाल्यालाही आपले पदार्थ हेल्दी बनवण्यापेक्षा टेस्टी बनवण्याकडेच लक्ष द्यावे लागते.

२.
हे कितपत खरे आहे ठाऊक नाही पण...
दुसर्‍या सिनेमाने समाजातली अनेक वास्तवे उघड करून दाखवली. न्याय-अन्याय, त्यातले विविध राजकारणाचे पदर उकलून दाखवले. त्याचे दर्शन झालेले नव्हते तेव्हा कदाचित माणसांना भविष्याबद्दल (भाबडी का होईना) आशा* वाटत असेल. दुष्टांचा शेवटी नायनाट होणार असे वाटत असेल. आदर्शवादी व्यक्ती समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असतील. दुसर्‍या सिनेमाने घडवलेल्या नागड्या समाजदर्शनाने लोक सिनिकल झाले असण्याची शक्यता आहे. समाज असाच रहायचा; आपण आपला फायदा कुठे आहे ते पाहू** असा विचार बळावला अशी शक्यता आहे.

*दुसरा सिनेमा आजकाल नसल्याने अण्णांच्या आंदोलनकाळात नवे तरूण उत्साही होते. दुसरा सिनेमा पाहिलेले माझ्यासारखे जुने लोक उत्साही नव्हते.
**दुसरा सिनेमा ज्या वर्गात (काहीश्या एलाइट नोकर्‍या करणारा वर्ग) लोकप्रिय होता तो वर्गच मुख्यत्वे रॅटरेस नावाच्या चरकात धावत असतो असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख आवडला. आणि प्रतिसाददेखील रोचक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख काळामध्ये मागेपुढे हलतो. कोणते सिनेमे कोणत्या काळात बनले हे ज्याला माहीत नाही त्या अनभिज्ञ वाचकाचा थोडा गोंधळ होण्याची शक्यता वाटते. उदा : 'बायसिकल थीफ' हा १९४८चा सिनेमा आणि 'पाथेर पांचाली' १९५५चा. पण त्यांचा उल्लेख आहे त्याआधीच्या परिच्छेदात सत्तर-ऐंशीच्या काळाचा आणि एन.एफ.डी.सी.चा उल्लेख आहे. लेखात त्यानंतर 'फ्रेंच न्यू वेव्ह'चा उल्लेख आहे. ज्या गोदारचं उद्धृत तिथे येतं त्याचा पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा (आणि त्याबरोबरच 'फ्रेंच न्यू वेव्ह'ची सुरुवात) १९५९ची. हे माहीत नसेल, तर 'भुवन शोम' आपल्याकडे यायला १९७० उजाडलं म्हणजे किती वर्षं गेली हे कळणार नाही.

युरोपियन सिनेमात सुपरस्टार नसतात, हे तितकंसं खरं नाही. गोदारच्या 'ब्रेथलेस'चा (१९५९) नायक जॉ पॉल बेलमोंदो किंवा 'फ्रेंच न्यू वेव्ह'चा चेहरा असलेल्या कॅथरीन दनव्ह, जान मोरो आणि ब्रिजित बार्दो हे सर्व फ्रेंच सुपरस्टार आहेत. त्यांच्याकडच्या नव्या / वेगळ्या सिनेमातूनसुद्धा सुपरस्टार घडले हे 'फ्रेंच न्यू वेव्ह'चं वेगळेपण म्हणता येईल. तसंच अॅन्तोनिअोनीच्या सिनेमातले मार्चेलो मास्त्रोइआनी आणि मोनिका व्हित्ती वगैरे अभिनेते हेसुद्धा इटलीतले अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार होते. त्यांनी अनेक तद्दन व्यावसायिक सिनेमांमध्ये कामं केली. सुपरस्टार जागतिक दर्जाचे अभिनेतेसुद्धा असू शकतात हे युरोपिअन सिनेमाचं वेगळेपण म्हणता येईल. शिवाय, तिथे स्टार सिस्टिमसुद्धा होती आणि अजूनही आहे, पण हे सुपरस्टार अभिनेते एखाद्या फेलिनी किंवा अॅन्तोनिओनीकडे जेव्हा काम करत, तेव्हा त्याच्या कामाचं मूल्य आणि वेगळेपण ओळखून आपला सगळा स्टारपणा बाजूला सारत. अगदी आजही हेच चित्र दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

न्यू-वेव्ह चळवळीमुळे फ्रेंच समाजजिवनात फरक कसा पडला हे थोडक्यात कळल्यास दुसर्‍या सिनेमाचे महत्त्व जास्त लक्षात येईल, अन्यथा जाणिव समृद्ध झालेल्यांचा टाइमपास ह्यापलिकडे त्याला फारसे महत्त्व नाही.

दुसरा सिनेमा हे शीर्षक 'सेकंड सेक्स' च्या धर्तीवर आहे असे दिसते, पण ते इथे तितकेसे लागु होउ नये असे वाटते, दुसरा सिनेमा हा दुसराच बरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यू-वेव्ह चळवळीमुळे फ्रेंच समाजजिवनात फरक कसा पडला हे थोडक्यात कळल्यास दुसर्‍या सिनेमाचे महत्त्व जास्त लक्षात येईल, अन्यथा जाणिव समृद्ध झालेल्यांचा टाइमपास ह्यापलिकडे त्याला फारसे महत्त्व नाही.

सहमत!! कलेची उद्दिष्टे काय याबद्दल खल तर नेहमीच करता येईल, महत्त्व कुठल्या परिप्रेक्ष्यात (आयला वापरलाच शब्द एकदा) पाहतोय यावरच ते अवलंबून आहे. नपेक्षा असा कुठला पिच्चर काय नि रघुनाथपंडितांची चूर्णिका काय, आड्यन्स नि परिणाम तेवढाच मर्यादित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> न्यू-वेव्ह चळवळीमुळे फ्रेंच समाजजिवनात फरक कसा पडला हे थोडक्यात कळल्यास दुसर्‍या सिनेमाचे महत्त्व जास्त लक्षात येईल

हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे, त्यामुळे सध्या फक्त त्रूफोचं एक उद्धृत देतो :

`तरुण चित्रपटकर्त्यांची अभिव्यक्ती प्रथमपुरुषी असेल; ते त्यांच्या आयुष्यात काय घडलं ते सांगतील. ती त्यांच्या पहिल्या किंवा शेवटच्या प्रेमाची गोष्ट असू शकते; त्यांची राजकीय जागृती, एखाद्या प्रवासाची गोष्ट, एखाद्या आजाराची गोष्ट, त्यांची सैन्यातली चाकरी, त्यांचं लग्न, त्यांनी घालवलेली सुट्टी, ... आणि आपल्याला ती (गोष्ट) नक्कीच आवडेल, कारण ती खरी असेल आणि नवी असेल... उद्याचा चित्रपट त्याच्या निर्मिकासारखा दिसेल.'

ह्यामुळे झालं काय, तर समाजात जे चाललं आहे आणि चित्रपटात जे दिसतं ह्यात दरी उरली नाही. सिनेमा हा खरा समाजाचा आरसा बनला. मानवी अस्तित्वातला कोणताच पैलू सिनेमाला वर्ज्य राहिला नाही. त्यातून समाज समजणं शक्य झालं. आणि समाजाविषयीचं हे भाष्य सर्वसामान्यांना आपलं वाटू लागलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू लागलं. तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ अशा उच्चभ्रू, पंडिती वर्तुळांपुरतं ते मर्यादित राहिलं नाही. असं हॉलिवूडच्या किंवा भारतीय सिनेमाबद्दल म्हणता येत नाही. हा क्रांतिकारी बदल होता असं (पश्चातबुद्धीनं, आता) म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्यामुळे झालं काय, तर समाजात जे चाललं आहे आणि चित्रपटात जे दिसतं ह्यात दरी उरली नाही. सिनेमा हा खरा समाजाचा आरसा बनला. मानवी अस्तित्वातला कोणताच पैलू सिनेमाला वर्ज्य राहिला नाही. त्यातून समाज समजणं शक्य झालं. आणि समाजाविषयीचं हे भाष्य सर्वसामान्यांना आपलं वाटू लागलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू लागलं. तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ अशा उच्चभ्रू, पंडिती वर्तुळांपुरतं ते मर्यादित राहिलं नाही. असं हॉलिवूडच्या किंवा भारतीय सिनेमाबद्दल म्हणता येत नाही. हा क्रांतिकारी बदल होता असं (पश्चातबुद्धीनं, आता) म्हणता येईल.

धन्यवाद. हे फार महत्त्वाचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम लेख. प्रचंड आवडला.
प्रत्येक व्यक्ती वेगळी, त्या व्यक्तीचं व्यक्त होणं वेगळं. ठोकळेबाजपणे कलाविष्कार सादर करणे आणि त्यातून व्यक्त होणे यातला फरक लक्षात घेतला तर पिकासो, व्हॅन गो आणि इतर अनेक मंडळींनी जे नवं डायमेन्शन दिलं तसंच समांतर सिनेमानं दिलं. खरं तर या माध्यमाची विलक्षण ताकद पाहता त्याचा पूर्ण ताकदीने वापर करणारा कलावंत अजूनही भेटायचा आहे असं वाटतं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/