अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण
अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण
लेखक - चिंतातुर जंतू
'आपला कलाव्यवहार आणि आपण' ह्या विषयाला साजेशा एखाद्या दर्जेदार मराठी पुस्तकाचा परिचय लिहावा असं डोक्यात आलं, तेव्हा 'कोरा कॅनव्हास’ - प्रभाकर बरवे, 'किमया' - माधव आचवल, द. ग. गोडसे ह्यांची पुस्तकं ही आधी आठवली. पण ही सगळी जुनी पुस्तकं होती. शिवाय, मराठी, भारतीय तसंच जगभरची संस्कृती, कलाकार आणि कलाव्यवहार ह्यांच्याशी असलेलं सकस नातं, त्याचा लेखकाच्या संवेदनेशी आपसूक झालेला मिलाफ, त्यातून घडलेली अनवट कलाजाणीव आणि ह्या सगळ्यांतून घडत गेलेल्या एका सघन 'माणसा'चं दर्शन, असं सगळं एखाद्या पुस्तकात एकवटलेलं असेल, तर ते खरं अंकाच्या विषयानुरूप होईल असं वाटलं. मग एक कल्पना सुचली आणि सुचताच ती मुक्रर करून टाकली. अरुण खोपकर हा तो बहुआयामी माणूस आणि त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली दोन पुस्तकं : 'चित्रव्यूह' आणि 'चलत्-चित्रव्यूह'. ह्या विषयाच्या परीघात बंदिस्त केल्यामुळे पुस्तकांना न्याय देता येणं कदाचित कठीण जाईल; तरीही, ह्या पुस्तक-परिचयामुळे 'ऐसी अक्षरे'च्या काही वाचकांना खोपकरांची पुस्तकं वाचावीशी वाटतील अशी आशा आहे.
लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'आपले वाङ्मय वृत्त' ह्या मासिकात ह्यांतले काही लेख ह्यापूर्वी येऊन गेले आहेत, तर काही इतरत्र प्रकाशित झालेले आहेत. वरवर पाहता त्यांचं स्वरूप ललित लेखन किंवा व्यक्तिचित्रण असं आहे; पण पुस्तकांचं वर्णन म्हणून ते अपुरं ठरेल. त्यांतलं विषयवैविध्य थक्क करणारं आहे. अनेक क्षेत्रांतल्या दिग्गज कलाकारांविषयीचे लेख त्यात आहेत. पानवाला, मांजर, मुंबईची बालमोहन शाळा, व्हेनिस शहर असेही काही लेखांचे विषय आहेत. काही लेखांत अभिरुची, राजकारण आणि भाषेसारख्या व्यापक संकल्पनांविषयी भाष्य आहे. पुस्तकातल्या अनेक लेखांविषयी प्रत्येकी एक स्वतंत्र (मेटा)लेख लिहिता येईल इतकी सघनता त्या लिखाणात आहे. जागेअभावी इथे फक्त काही कळीच्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. वेगवेगळ्या काळात किंवा निमित्तानं लिहिलेले स्वतंत्र लेख असूनही त्या लेखांतून काही समान सूत्रं जाणवतात. उदाहरणादाखल त्यांपैकी एक सूत्र असं मांडता येईल : कलाव्यवहार, जीवनव्यवहार आणि तत्त्वचिंतन अशा एरवी गहन वाटणाऱ्या मानवी अस्तित्वविषयक गोष्टी सुट्यासुट्या पाहायच्या नसून त्या समग्र पाहाव्या लागतात; त्या समग्रतेत माणूस घडवण्याची आणि कलानिर्मितीची ताकद आहे; अभिमान, अस्मिता वगैरेंच्या कुंपणात आपल्या संवेदनांना आणि विचारांना बंदिस्त मात्र करू नये.
प्रत्यक्षात जगड्व्याळ असणारी ही जाणीव खोपकर ह्या दोन खंडांतून लीलया करून देतात. भूपेन खक्कर आणि जहांगीर साबावाला ह्या दोन भिन्न प्रकृतीच्या चित्रकारांविषयीच्या खोपकरांच्या दोन लेखांची तुलना केली, तर ह्या समग्रतेचा अंदाज येऊ शकेल. साबावाला हे एका पिढ्यानपिढ्या सधन पारशी खानदानातले आबदार गृहस्थ होते, तर खक्कर ह्यांच्यासारखा दुसरा खट्याळ माणूस भारतीय कलाविश्वात शोधून सापडणार नाही. दोघांविषयीची अनेक मार्मिक निरीक्षणं खोपकर नोंदवतात. खक्कर ह्यांचं समलैंगिक असणं हे सहजपणे खोपकरांच्या लिखाणात येतं, आणि एखाद्या पुरुषाच्या स्पर्शाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले उपद्व्याप खोपकर आपल्या खुसखुशीत शैलीत सांगतात. ह्याउलट, साबावालांचा खानदानी आब त्यांच्या आजारातसुद्धा कसा टिकून होता, किंवा त्यांच्या पत्नी-मुलीच्या घराबाहेर पडण्याआधीच्या तयारीतही तो कसा दिसे, हेदेखील खोपकर सांगतात. हे सगळं सांगणं म्हणजे निव्वळ प्रख्यात व्यक्तींविषयीचे किस्से नाहीत, तर खोपकर दोन्ही कलाकारांच्या कलानिर्मितीशी त्यांचा संबंध लावतात. जुन्या पिढीतल्या अनेक समीक्षकांना आणि रसिकांना खक्कर ह्यांची कलात्मक संवेदना कळली नाही. त्यांच्या चित्रांतले भडक रंग, किंवा kitschचा वापर अनेक उच्चभ्रू अभिजाततावाद्यांना दिसला, पण झेपला नाही. खोपकरांच्या विश्लेषणात त्या चित्रशैलीचं सामर्थ्य उलगडतं. खक्कर ह्यांचा परिसर आणि त्यांचं व्यक्तित्व ह्या सगळ्याचा त्यांच्या चित्रशैलीशी कसा संबंध आहे, आणि आपली शैली विकसित करण्यामधून खक्कर ह्यांची प्रतिभा कशी दिसते ते खोपकर दाखवतात. असं लिखाण मराठीत दुर्मीळ आहे.
भारतीय कलाव्यवहाराचे अनेक पैलू खोपकरांच्या लिखाणात येतात. ते दाखवताना आत्मचरित्रात्मक म्हणता येतील असे काही, म्हणजे स्वत:च्या कलात्मक जडणघडणीतले तपशील विषयाच्या अनुषंगानं खोपकर देतात. आणि हे सांगता सांगता त्यांचं लिखाण तत्त्वचिंतनात्मक पातळीवर जातं. हे महाकर्मकठीण आहे. त्याचा अंदाज येण्यासाठी हे एक उदाहरण -
मैहरचे उस्ताद अल्लाउद्दिन खाँसाहेब ह्यांनी अनेक प्रतिभावंत घडवले. पं. रविशंकर हे त्यांपैकी कदाचित सर्वाधिक गाजलेलं नाव. खाँसाहेबांच्या शिष्यगणांमध्ये असणारी आणखी दोन प्रख्यात नावं - सिनेदिग्दर्शक ऋत्विक घटक आणि संगीतज्ञ पं. भास्कर चंदावरकर. ह्या दोघांच्या निर्मितीशी अनेक जण परिचित असतील. ह्या गुरुबंधूंमधल्या आणखी एका दुव्याविषयी खोपकर लिहितात. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये हे दोघं प्राध्यापक होते. आपल्या गुरूंच्या परंपरेनुसार त्यांनीही अनेक प्रतिभावंत शिष्य घडवले. त्यांपैकी घटक ह्यांचे दोन प्रख्यात शिष्य - सिनेदिग्दर्शक मणी कौल आणि सिनेछायालेखक के. के. महाजन. घटक, चंदावरकर, कौल आणि महाजन ह्या चौघांवर 'चलत्-चित्रव्यूह'मध्ये स्वतंत्र लेख आहेत. भारतीय चित्रपटाचा इतिहास ज्यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे हे चौघं जण आहेत. खोपकर मुंबईच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मध्ये भौतिकशास्त्राचं अध्यापन करत होते, तेव्हा अचानक आलेल्या एका संधीनं ते ह्या वर्तुळात खेचले गेले. मोहन राकेश ह्यांच्या 'आषाढ का एक दिन'वर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन मणी कौल करत होते. खोपकरांना त्यात महाकवी कालिदासाची भूमिका मिळाली. सिनेमाच्या तंत्राशी खोपकरांचा त्यापूर्वी फारसा परिचय नव्हता. ह्या क्षेत्रात आपण कारकीर्द करू असंही त्यांना तोवर वाटलं नसावं. चित्रीकरणादरम्यान केकेंसारख्या माणसांचा आणि चित्रपटाच्या सेटवरच्या एकंदर वातावरणाचा खोपकरांवर खोल परिणाम झाला. यथावकाश त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथे घटक आणि चंदावरकर ह्यांच्याशी झालेल्या देवाणघेवाणीतून ते अधिक समृद्ध झाले. इथे स्वतःविषयी बोलण्याऐवजी खोपकर ह्या चौघांच्या कलानिर्मितीविषयी आणि त्यामागच्या विचारांविषयी बोलतात. हे करत असताना ते अख्खा भारतीय कलाविचार आणि जागतिक कलाविचार आपल्या पोतडीतून गरजेनुसार काढतात. उदा : सुखवस्तू सत्यजित राय ह्यांच्या भद्र, सुबक बंगाली संवेदनेतून आलेल्या आखीवरेखीव चित्रपटांपेक्षा फाळणीनंतर निर्वासित होऊन भारतात आलेल्या ऋत्विकदांची क्षोभनाट्यं (मेलोड्रामा) वेगळी होती हे सांगताना ते थेट शैव किंवा तांत्रिक सौंदर्यविचारांशी त्यांचं नातं जोडतात; वाल्मिकी आणि व्यासांची निर्मिती महाकाव्य म्हणून का गणली गेली हे ते विशद करतात; आणि ऋत्विकदा ज्याला निर्मितीतला आपला बाप मानत त्या सेर्गेई आयजेनश्टाईन ह्या रशियन दिग्दर्शकाच्या क्षोभनाट्याच्या वापराविषयीही मार्मिक विवेचन करतात. परंपरा आणि नवतेची अशी बहुपेडी गुंफण करणारं लिखाण मराठीत आता वाचायला मिळत नाही.
पुस्तकात निव्वळ उच्चभ्रू कलाव्यवहारांविषयी उच्चभ्रू कलाविचार आहेत असा समज हे वाचून होऊ शकेल, पण ते तसं नाही. खक्कर ह्यांच्या खट्याळपणाविषयी वर सांगितलं आहेच, पण सोंगाड्या दादू इंदुरीकरांविषयीचा लेख ह्या संदर्भात पाहणं गरजेचं आहे. तमासगिरांचं गावकुसाबाहेरचं जग खोपकरांना अगदी आतून माहीत आहे. दादूंबरोबर बसून विडी-तंबाखू करत करत खोपकर त्यांच्या पोटात शिरले आहेत. त्यांच्या इरसालपणाचे अनेक ग्राम्य मासले खोपकर देतात; पण वाचकाचं सवंग मनोरंजन करणं हा त्यामागचा हेतू नाही, तर त्या विनोदामागचं करुण सामाजिक वास्तवही ते मांडतात. तमाशाच्या तंबूतला कलाव्यवहार, रात्रीच्या ऐन भरातला त्याचा दिमाख, दिवसा तो ओसरला की तमासगिरांच्या रोजच्या जिण्याचा धबडगा, त्यातच आपसूक चालणारं गुरुकुल पद्धतीसारखं व्यवसायशिक्षण असं समग्र चित्र खोपकर उभं करतात. दादूंच्या आयुष्यातला तमाशा सरल्यावर त्यांच्याशी रेल्वेच्या डब्यात अचानक पडलेल्या गाठीदरम्यान दादूंचं बोलणं म्हणजे एक 'परफॉर्मन्स'च होत जातो, आणि तो ऐकत ऐकत भोवती अख्खा डबा जमतो हा प्रसंग तर एकाच वेळी अचाट आणि हृद्य आहे. 'लोककला म्हणजेच महाराष्ट्राची खरी कला' असं अभिनिवेशानं म्हणून तमाशाचं शास्त्रीय नृत्य-संगीताशी असलेलं नातं नाकारणारा एकारलेला बहुजनवाद, किंवा तमाशाला हीन लेखणारा उच्चभ्रू अभिजाततावाद, ह्यांतलं कोणतंच टोक गाठायची गरज जातिवंत रसिकाला का पडत नाही, ते खोपकरांचं लिखाण वाचून कळतं. त्याचप्रमाणे, कर्कश देशीवाद किंवा पश्चिमेकडचं तेच सगळं चांगलं मानणारा, वसाहतीय न्यूनगंडातून उद्भवलेला तुच्छतावाद ह्या आवेशपूर्ण भूमिकांपैकी कोणती तरी एक भूमिका घेण्याचीही गरज खोपकरांना भासत नाही. खरा उदारमतवाद अंगी बाणण्यासाठी मध्यमवर्गीय दिवाणखान्यांतल्या (किंवा आता फेसबुकवरच्या) गरमागरम चर्चांत सहभागी होण्याची गरज नसते, तर मर्मभेदी कलोपासनेतूनसुद्धा तो उद्भवू शकतो, हे खोपकरांचं लिखाण वाचताना जाणवतं.
खोपकरांच्या लिखाणातून घडणारं आणखी एक दर्शन त्यांच्या सौंदर्यासक्तीशी संबंधित आहे. सौंदर्य ही एक पंचेंद्रियांनी अनुभवायची गोष्ट असते; एवढंच नाही, तर सौंदर्यासक्ती ही जीवनदृष्टी घडवणारी एक सामर्थ्यवान प्रवृत्ती असू शकते हे ह्या लिखाणात दिसतं. धुपक्या बंडीला येणारा विडीचा वास किंवा पानवाल्याच्या गादीवरची पितळी भांडी, पानं, कात, चुना ह्यांचे रंग अशा साध्या गोष्टींपासून ते 'चमचमित कांही ल्याहावें' ही रामदासांची ओळ, व्हेनिसचा अलौकिक भासणारा प्रकाश, चिनी अक्षरलेखनकलेमागचा झेन तत्त्वविचार अशा अनेक गोष्टींना ही सौंदर्यासक्ती कवेत घेते आणि त्यातून मूलगामी संकल्पनात्मक मांडणी करते. त्यामुळे ह्या पुस्तकांत दिसणारा कलाव्यवहार आणि त्यातून दिसणारी खोपकरांची जडणघडण थक्क करून सोडते. श्री. ना. पेंडशांच्या 'हत्या' कादंबरीचं रेडिओवर अभिवाचन इथे पु.ल. देशपांड्यांच्या हाताखाली होतं. अरुण कोलटकर, किरण नगरकर आणि र. कृ. जोशींसारखी हुन्नरी माणसं मुंबईच्या जाहिरातक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. Computer Aided Design (CAD) विषयीचा लघुपट निर्माण करण्याच्या प्रकल्पावर TIFRचे आर. नरसिंहन, रमणी, मथाई जोसेफ ह्यांसारख्या संगणकक्षेत्रात नावाजलेल्या लोकांसह र. कृ. जोशी, खोपकर, भास्कर चंदावरकर, राम मोहन (प्रख्यात अॅनिमेशनकार) एकत्र काम करतात. कत्थकचे महागुरू लच्छू महाराज एकीकडे 'मुघल-ए-आझम' आणि 'पाकीझा'चं नृत्यदिग्दर्शन करतात, तर दुसरीकडे एका साध्या बांधकाम मजूर स्त्रीच्या हालचालींतली लय त्यांना समजून घ्यावीशी वाटते. ही माणसं आपल्या परिसरातून स्वत:च्या संवेदना, व्यक्तिमत्वं आणि निर्मिती कशी घडवत गेली, हे खोपकरांच्या लिखाणात दिसतं. खोपकरांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर 'कलेकरता माणूस कशा आतल्या आगीनं जगतो', ह्याचा प्रत्यय ही पुस्तकं वाचताना अनेकदा येतो आणि हे सगळं अनुभवणारे खोपकर त्यातून स्वत:ला कसे घडवत गेले हेदेखील दिसतं.
आपल्या परिसरात कालानुरूप जी विद्रूपता आणि जे प्रदूषण वाढत गेलं त्याची जाणीव, आणि एक समाज म्हणून आपणच करत असलेली सौंदर्याची हेळसांड त्याला कशी कारणीभूत आहे ह्याचीसुद्धा जाणीव ही पुस्तकं वाचताना अनेक ठिकाणी होते. भंगारात काढलेल्या यांत्रिक भागांची सजावट करून मुलांना बागडण्यासाठी उद्यान उभारणं किंवा बर्फाचे डायनोसॉर उभे करणं अशी, म्हणजे साध्या गोष्टींमधून परिसर कसा सुंदर करता येतो, ह्याची उदाहरणं इथे सापडतात. त्याउलट, फिल्मचं संकलन करण्याऐवजी तिचे प्रत्यक्ष तुकडे करून दूरदर्शननं ती नष्ट करणं अशा किश्श्यांमधून आपल्याकडचं कलेविषयीचं निराशाजनक वातावरण दिसत राहतं. कोणत्याही उदारमतवादी व्यक्तीला अस्मितांच्या राजकारणाची चीड येणं साहजिक आहे; पण बारा भाषा येणाऱ्या पानवाल्याची गोष्ट खोपकर जेव्हा सांगतात, तेव्हा अशा राजकारणापोटी आपण काय काय गमावत असू ह्याचा अंदाज येऊ शकतो. 'भाषावार प्रांतरचना' ह्या लेखात खोपकर जेव्हा कारागिरांच्या भाषेविषयी विवेचन करतात, तेव्हा ते ह्या एकारलेल्या अस्मितांविरोधात एक भरभक्कम तत्त्वचिंतनात्मक फळी उभारताहेत असं दिसतं. आपल्या परिसराकडे संवेदनशील नजरेतून पाहणारं हे लिखाण बांधिलकीचं ओझं खांद्यावर बाळगत मराठीत एरवी लिहिल्या जाणाऱ्या प्रचारकी लिखाणापेक्षा अधिक परिणामकारक आणि अधिक व्यापक अर्थानं 'राजकीय' आहे. वाचणाऱ्याची संवेदनशीलता जोपासण्याची आणि वाढीला लावण्याची ताकद ह्या लिखाणात आहे. मराठी संस्कृतीतल्या इतर अनेक गोष्टी जशा ऱ्हास पावल्या, त्याप्रमाणे असं लिखाणदेखील आता विरळा झालं आहे. खोपकरांची ही पुस्तकं सध्याच्या वातावरणात त्यामुळे अधिकच महत्त्वाची आहेत.
ह्या पुस्तकांचे इतरत्र आलेले परिचय :
अथांग आणि अफलातून - कुमार केतकर (दिव्य मराठी)
कथा दोन पुस्तकांची - सुमेधा रायकर- म्हात्रे (प्रहार)
कलाविषयक भान जागवणारे संग्रह - शशिकांत सावंत (लोकसत्ता)
ऐसे ग्रंथ रसाळ निकें - निखिलेश चित्रे (महाराष्ट्र टाइम्स)
खोपकरांची जोडचित्रं- कलाप्रांताचा अद्भुत मागोवा - गणेश मतकरी ('अनुभव' मासिक)
प्रतिक्रिया
उत्तम
नेमके!!
आम्हास आम्ही पुन्हा पहावे हा गांधीजींविषयीचा कलेचा अंगाने घेतलेला आढावा हे देखील एक उत्तम उदाहरण
सुंदर
पुस्तक-परिचयाचा सुंदर नमुना.
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
व्वा!!
(अर्थातच) पुस्तक वाचलेले नाही. मात्र ऐसीच्या वाचकांना ही पुस्तके नक्की वाचाविशी वाटतील असा परिचय करून देणारा लेख.
अनेक आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बरयं.
उत्तम परिक्षण. अरुण खोपकरांचा फोटो डकावला असता तर नवख्यांची सोय झाली असती, आता अरुण खोपकर कोण हे माहितीये पण ते दिसतात कसे ह्यासाठी थोडे प्रयत्न करणं आलं.
परिक्षण तुलना-
कुमार केतकरांनी थोडक्यात आवरतं घेतलयं, मुळात त्यांचं लेखन फारस खिळवुन ठेवणारं नसतं आणि पुस्तक परिक्षण हा त्यांचा प्रांत आहे असंही वाटत नाही. सुमेधा रायकर- म्हात्रे ह्यांनी एका शाळेतल्या मराठीच्या शिक्षिकेने परिक्षण लिहावं तसं साधं/सोपं लिहिलयं, निखिलेश चित्रेंची शैली खुपशी चिंतातुर जंतूंसारखी आहे, अनेक सहसा वाचनात ने येणारे पण बँग-ऑन अर्थ असणारे(म्हणजे इतर जे दोन-चार ओळीत लिहितात ते एका शब्दात सांगणारे) शब्द आणि पसारा ना घालता मुद्दे मांडत-मांडत जाणारे लेखन हे काही विशेष मुद्दे. गणेश मतकरीं मोठी वाक्ये फार वापरतात, वाक्य संपताना नक्की काय वाचलं हे बर्याचदा विसरायला होतं. शशिकांत सावंत अर्थात लोकसत्ताचे लेख-पाडणारे वाटतात, त्यांनी किती मनापासुन हा लेख लिहिला असेल हि शंका येते.
उत्तम.
उत्तम परिचय.
हे मार्मिक आणि नेमके. या आणि यासारख्या वाक्यांनी लेख वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला आहे.
खोपकरांच्या बहुपेडी व्यक्तिमत्वाबद्दल ऐकलं आहे पण त्यांची पुस्तके अजून वाचली नाहीयत. ज्या पुस्तकांचा परिचयच एवढा सुरेख असेल ती पुस्तके वाचण्याची नक्कीच इच्छा आहे.
साहित्य अकादमी
अरुण खोपकरांना 'चलत्-चित्रव्यूह'साठी मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे अभिनंदन!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अरे वा! खोपकरांचे
अरे वा! खोपकरांचे अभिनंदन!
स्वगतः 'राईट टु पी'ची दखल भारतीय मिडीया, सरकार वगैरेच्या बरीच आधी ऐसीवर दिवाळी अंकात घेतली गेली होती. तितकी विस्ताराने मुलाखत आजही भारतीय मिडीयाने घेतलेली दिसत नाही. नंदा खरे, खोपकर आणि इतरह कित्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे लेखन ऐसीच्या दिवाळी अंकात वाचायला मिळत असते. या सगळ्याचा विचार केला तर एक ऐसीकर म्हणून उगाच फुशारायला होते - अभिमान वाटतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निळ्या ठशाला विशेष अनुमोदन
निळ्या ठशाला विशेष अनुमोदन देत खोपकर यांचे अभिनंदन!
(आत्ताही आपल्या विशेषांकांतल्या कोणत्या व्यक्ती मुख्यधारेत दिसू लागणार आहेत, त्याची यादी डोक्यात चालू आहे!)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
निळ्या ठशातील निवेदनास
निळ्या ठशातील निवेदनास अनुमोदन. ऐसी इज ऑन राइट ट्रॅक.
अभिनंदन!
अभिनंदन!
अवांतर आणि कदाचित खोडसाळही.
मागच्या दिवाळी अंकात काय कमतरता होती ते आता या वर्षीचे धागे बघताना समजतंय. चित्रांबद्दल असलेल्या पुस्तकाबद्दल लिहिलेल्या लेखाच्या वर चित्रं नाहीत त्यामुळे तो किती रिकामा वाटतोय!
अरुण खोपकरांचं अभिनंदन. 'साहित्य अकादमी'ने पुरस्कार देताना उदारमतवाद बाळगलेला बघून आनंद झाला. पुरस्कार परतीच्या, असहिष्णू वातावरणात, फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या संपाला पाठिंबा देत खोपकरांनी बथ्थडीकरणाचा समाचार घेणारं पत्र लिहिलं होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.