संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!!

यापुर्वी आम्ही बॅचलर पाककृती लिहिली होती. या पाककृतीच्या नावात बॅचलर लिहिता येणार नाही अशी तंबी आम्हाला स्वयंपाक घरात जायच्या आधीच मिळाली. तसेही आम्हाला आज नव्याने कळलेला नियम म्हणजे " नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्‍याने स्वयपांक केल्याची खूण आहे"! तुम्हाला काय वाटले?? नवर्‍याने स्वयंपाक घर आवरले? अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का??? Wink Wink

तर आमच्या अशाच क्लृप्त्यांमुळे आम्ही आमच्या साठी स्वयंपाक घरात नो एंट्रीचा बोर्ड लाऊन घेतला आहे. आहोत ना आम्ही हुशार? तसे आम्ही एक नंबरचे आळशी आहोत त्यामुळे आम्हाला अशा कल्पना सुचतातच. आमच्या बॅचलर काळात आमच्या रुमवर रविवारच्या सकाळी (गेले ते दिवस....) आमच्या साठी खास चहा आणि वडापावची होम डिलीव्हरी पार्सल यायचे. पण आता रविवार सकाळी ७.३० पासुनच कचरावाला, कामवाली बाई, पेपरवाला सगळे दार बडवतात. तर मंडळी रविवारी अशा पहाटे पहाटे उठल्या नंतर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आम्हाला पडला होता आणि आमच्या समोर टिव्ही वर अवतीर्ण झाले फूड्फूड (ज्याला आम्ही करतो हुडहुड) नावाचे चॅनल. याआधी बायकोला हजारोवेळा टोमणे मारुन झाले असल्यामुळे आणि आज नको तितका उत्साह ओसांडुन वाहात असल्यामुळे आम्ही आज स्वयंपाक घरावर चाल करुन जायचे ठरवले.

असो नमनाला घडाभर तेल ओतून झालेले आहेच. या डिश ला काय म्हणायचे ते म्हणा बुवा आम्हाला तर याचे नाव माहित नाही. वेगवेगळ्या हॉटिलात आम्ही हे वेगवेगळ्या नावाखाली स्टार्टर म्हणून खाल्लेले आहे. तर आता आपण या नापाककृती साठी लागणार्‍या घटकांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात.

१. मायक्रोव्हेव विथ ग्रील अ‍ॅण्ड बार्बेक्यु स्टीक्स (आमच्या कडे आहे Wink जाहीरातच समजावी.)

२. एक बायको/ गर्लफ्रेंड ( भाज्या चिरायला. आधी मारे ऐटीत (आयटीत नव्हे) चल आज मी तुला खाऊ घालतो असे म्हणालो तरीही हिच्या मदती शिवाय तुमची पाकृ पुर्ण होणार नाहीच. (बायकोला यासाठी कसे पटवायचे याच्या टिप्स उत्सुकांना व्यनी द्वारे दिल्या जातील.) सर्व काम बायकोनं केल्यावर आपण फक्त क्रेडिट घ्यायला मोकळे Wink )

आता प्रत्यक्ष स्वयंपाकघरात असणारे साहित्यः ( सगळे घरात सापडेलच, जरा शोधा म्हणजे सापडेल. नसल्यास बायकोला बाजारात पिटाळा.)
मुख्य साहित्यः कोणत्याही रंगीबेरंगी भाज्या.
उदा. १. दोन मध्यम आकाराचे टोमॅटो (आकार मध्यम की कसा आहे, हे बायकोवर सोडावे कारण शेवटी भाज्या तिलाच चिरायच्या असतात)
२. दोन मध्यम आकाराचे बटाटे.
३. दोन सिमला मिरच्या
४. एक कांदा
५. दोन चमचे घट्ट दही(मॅरिनेट करण्यासाठी. म्हणजे काय म्हणून विचारले तर बायकोने गणपाला विचार असं सांगितलंय. त्यामुळे इच्छुकांनी थेट तिकडेच संपर्क साधावा)
६. स्वयंपाकघरात मिळतील ते मसाले: पिझ्झ्यासोबत आलेले ओरॅगिनो-चिली फ्लेक्स, धने-जिरे पूड, सासरवाडीहून आलेले मसाल्याचे तिखट, इ.
७. चवीपुरते मीठ(असे लिहायचे असते नाहीतर इथे पाकृ प्रकाशित होत नाही म्हणे.) आणि हो, जSSराशी साखर. बस्स.

कृती: दह्यात सगळे मसाले-मीठ-साखर घालून नीट मिक्स करा. त्यात चिरलेल्या भाज्यांच्या फोडी घालून सर्व फोडींना मसाला लागेल असे ढवळा. हे मिश्रण असेच वीसेक मिनिटे राहू द्या.

Marinated Vegeteables

नंतर या फोडी बार्बेक्यू स्टिक्सना लावा. या स्टिक्सची टोके जाम टोकदार असतात तेव्हा जपून. किंवा हलकंसं टोचवून घेऊन तिथं आलेलं रक्त बायकोला दाखवा. पुढचं काम ती करते.)

On sticks

त्यानंतर आपापल्या अनुभवाप्रमाणे आणि आवडीप्रमाणे ग्रिल्+मायक्रोवेव्ह किंवा नुसते ग्रिल करा. आम्ही पाच मिनिटे ग्रिल्+मायक्रोवेव्ह आणि नंतरची पाच मिनिटे फक्त ग्रिल केले.( हे काम मात्र मी एकट्याने केले हो!)
तर हे सगळे मायक्रोव्हेव मधे टाकल्यानंतर... बायकोला चल मी आता थोडी रेस्ट घेतो तो पर्यंत तु हे आवरुन घे असे म्हणावे आणि स्वत: सोफ्यावर तंगड्या पसरुन टिव्ही चा आस्वाद घ्यावा. मायक्रोव्हेव ने आवाज केलेला एकुन स्वयंपाक घरात यावे आणि बायकोला अजुन तुझे आवरुन झाले नाही का असे विचारुन घ्यावे. बायकोचा पारा एवढ्यावर चढला असेलच. वर आणखी आज मी अशी अशी पाकृ केली असे चार पाच मित्रांच्या बायकांना फोन करुन सांगावे.

तर अशा प्रकारे आमची रविवारची सकाळ सार्थकी लागली.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

हे लेखन तुझे नाही. मकीचे आहे. पैज आपली. मकीचीच साक्ष काढू. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे हो.. एक वेळ पाकृ तिचीए म्हणा...
पण लिखाण तर वरिजनल आहे... उदाहरण म्हणजे कित्तेक ठिकाणी के'ल्या' लिहिले आहे.
मकी ही माझी शुचि (शुद्धिचिकित्सक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चमचमीत लिखाण आहे. मात्र तुम्हाला फार प्रतिसाद मिळवण्याची इच्छा नाही असं वाटलं. नाही काय आहे, की अनेक फांद्या फुटण्याआधीच तोडून ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ

मायक्रोव्हेव विथ ग्रील अ‍ॅण्ड बार्बेक्यु स्टीक्स (आमच्या कडे आहे जाहीरातच समजावी.)

म्हटल्यावर 'क्षीण प्रयत्न' वगैरे प्रतिसादकांचं तोंड बंद नाही का झालं? त्यापेक्षा तसा प्रतिसाद येऊ द्यायचा आणि मग त्याला असं तोऱ्यात उत्तर द्यायचं. म्हणजे दोन एक्स्ट्रा प्रतिसाद होतात. एवढी साधी गोष्ट समजत नाही तुमच्यासारख्या झंटलमनला. आता भरा पाच पाच रुपये प्रत्येक प्रतिसादासाठी.

दोन चमचे घट्ट दही(मॅरिनेट करण्यासाठी. म्हणजे काय म्हणून विचारले तर बायकोने गणपाला विचार असं सांगितलंय. त्यामुळे इच्छुकांनी थेट तिकडेच संपर्क साधावा)

पुन्हा तेच. स्वतःचा टीआरपी वाढवायचा सोडून गणपा वगैरेंचा वाढवायचा. पाच पाच रुपये वर आलेले दिसताहेत.

वर आणखी आज मी अशी अशी पाकृ केली असे चार पाच मित्रांच्या बायकांना फोन करुन सांगावे.

हा मात्र भारीच चुकीचा सल्ला. अहो, तुम्हाला मैत्री टिकवायची आहे ना? त्यांच्या बायकांना तुम्ही दुरूनच्या डोंगराप्रमाणे साजरे दिसतात आणि मग आपल्या नवऱ्यांना 'त्या निखिलकडून शिका काहीतरी' असे बोल ऐकवले जातात. मग पुढच्या बैठकीत बिल कोणाला भरावं लागणार सांगा? ऑ ऑ?

असो, तरी एकंदरीत लग्न होऊनही बॅचलर मनस्थितीतून तुम्ही बाहेर पडलेला नाहीत असं दिसतंय. पडाल पडाल... बायको दाणकन् पाडेलच. लवकरच. तोपर्यंत त्याला फुकाचा विरोध करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का?
हे वाचून पुढचे काही वाचावेसे वाटले नाही. ऐसी 'पुर्ण' अक्षरे मेळवणार्‍या रसिकाला प्रणाम 'केल्या' पाहिजे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा हा हा
पाकृ झ्याक दिसत्येय पण बार्बेक्युच्या काड्या नसल्याने करता येणे कठीण दिसते.

बाकी, आताशी कुठे नवरा झाला आहेस!
त्यात तु(ही) उतावीळपणा करून स्वयंपाकघरात प्रवेश केला आहेस (भोग आता कर्माची फळं)
आता, काहि दिवसांत तु स्वयंपाक करूनही ओटा स्वच्छ राहिल व (अर्थातच अजुन काहि दिवसांनी) मकीची एकही सिरीयल चुकणार नाही असे भविष्य वर्तवतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रामो: पाकृ मध्ये माझे श्रेय आहे, आणि लेखनात फक्त काही चुका सुधारण्याइतपतच. (त्यातही सगळ्या सुधारल्या नाहीतच आहेत.)
ऋ: मी टॉम अँड जेरी आणि फूड-फूड वर दाखवलं जाणारं काहीही व्हेज पाहाते. त्यामुळे माझ्या सिरिअल्स तशाही चुकत नाहीत. बाकी, बार्बेक्यूच्या बांबू स्टीक्स सारख्या असतात त्या काड्या बाजारात सहाज मिळू शकाव्यात. खरंतर पनीर प्रेमींची बटाट्यांऐवजी पनीर क्यूब्ज वापरून करण्याची ही खूप फेव्हरिट पाकृ आहे. निखिल तुझ्यासारखा गुपचूप केक करण्याइतपत चांगला नवरा कधी बनेल याची वाट पाहातेय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

निखिल तुझ्यासारखा गुपचूप केक करण्याइतपत चांगला नवरा कधी बनेल याची वाट पाहातेय. Wink

@श्री निदे: मंगलाष्टकांत "सावधान!!" ऐकलं होतंस की नाही!? Wink
@सौ निदे: म्हणूनच तुला माझ्या बायकोचा नंबर दिलेला नाही किंवा भेट घडवलेली नाही. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> आज मी अशी अशी पाकृ केली असे चार पाच मित्रांच्या बायकांना फोन करुन सांगावे >>
बदडणार तुम्हाला ते मित्र..... आगलावेपणाबद्दल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोप्प दिसतंय प्रकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा