पाटा पीचवर टाकलेले आपटबार : खिलाडी ७८६ परीक्षण

जगात मानवांचं वर्गीकरण दोन भागात करायचं म्हटलं तर पहिले असतात साधारण मर्त्य मानव आणि दुसरे अतिमानव. या अतिमानवांना आशीष आर मोहन हे नाव माहीत असतं, ते हिमेश रेशमियाने गायलेली गाणी सहज ऐकू शकतात आणि एण्जॉयही करू शकतात आणि लोहा लोहे को काटता है तसंच अतिमानव अतिमानवांशीच व्यवहार ठेवतात.

खिलाडी ७८६ हा अशा अतिमानवांनी नटलेला एक चित्रपट आहे. हिमेश रेशमिया नामक लेखक, पटकथाकार, संवाद लेखक, संकलक, हाणमारदिग्दर्शक, नृत्यरचनाकार, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि नायक या सर्व भूमिकेतून यापूर्वी आपल्याला भेटलेल्या महामानवाने यावेळी इतरही काही लोकांच्या रोजगाराचा स्तुत्य विचार करून नायकाचा रोल अक्षयकुमार साठी सोडलेला आहे आणि दिग्दर्शकाची खुर्ची आशीष मोहनला दिली आहे (खुर्ची देतानाच त्याला त्याने मुझे तेरे घर में रोटी चाहीये असं नक्कीच सांगितलेलं असणार). अमिताभ बच्चनने नाकारलेल्या भूमिकेत वयानुसार बदल केल्याने चित्रपट रिलीज व्हायला वेळ लागला खरा पण अकुच्या नावावर सिनेमा चालेल कि नाही या शंकेने हिमेशने स्वतः अबची भूमिका केली आहे आणि त्याचं फळ म्हणून जबरदस्त ओपनिंग देखील मिळाली आहे (अशा प्रकारे अकुच्या घरी देखील रोटीची व्यवस्था झाली ).

सिनेमाची कथा सांगायला थोडा वाव ठेवलेला आहे. सुरुवातीपासून आणि प्रोमोज व पोष्टरमधून आपले आणि दिग्दर्शकाचे एक कॉण्ट्रॅक्ट साईन झालेले असते. यात प्रेक्षकाने गंभीर होऊन सिनेमा पाहील्यास आम्ही जबाबदार नाही हे एक महत्वाचे कलम असते. त्याचप्रमाणे सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल आक्षेप घेण्याचा मर्त्य मानवांना काहीही अधिकार नाही हे भादंवि चे कलमही त्यात उद्धृत केलेले असते. कथालेखकाची प्रतिभा आणि दिग्दर्शकाचे कसब अशा बाबींची मागणी जे लोक बिल्डरकडे ताबा घेण्याआधी कव्हेयन्स डीडची मागणी करू शकत नाहीत त्यांनी करू नये हे कलम अर्थातच मार्गदर्शक तत्त्वांमधे टाकलेले असले तरी आपण काय आज सिनेमा पाहतो काय ? कुठला सिनेमा कसा एण्जॉय करायचा हे तरबेज प्रेक्षकाला चांगलेच कळत असल्याने तो कधीही चीडचीड करत बाहेर येत नाही. अगदी वाईटातल्या वाईट गोष्टीतही काहीतरी चांगले असतेच या उक्तीवर सामान्य प्रेक्षकाचा विश्वास असतो म्हणूनच अक्षयकुमारच्या एण्ट्रीला थेटरात शिट्ट्या पडतात आणि नंतरही त्या पडतच राहतात तेव्हां आश्चर्य वाटून घेऊन नये.

बहत्तर सिंगच (अक्षयकुमार) पंजाबात प्रसिद्ध खानदान आहे. या खानदानात सत्तरसिंग, एकहत्तरसिंग, बहात्तरसिंग आणि चौहत्तरसिंग अशी नावं ठेवण्याची परंपरा आहे. इथं वाचकाला योग्य शंका पडेल कि तिहत्तरसिंग का नाही ? तर हीच शंका सिनेमातही अनेक पात्रं विचारताना दिसतात आणि त्याचं लॉजिकल उत्तरही आपल्याला मिळतं. सस्पेन्स वगैरे काही नाही आणि फोडला तरी चालेल असं असलं तरीही चुकून कुणी खिलाडी पहायला जाणार असल्यास औचित्यभंगाचं पाप नको. तर या खानदानात कुणीही शहाणा माणूस मुलगी देत नसतो. म्हणूनच एक सून कॅनेडीयन, एक चायनीज तर एक चक्क आफ्रिकन. आफ्रिकन अर्थातच बहत्तरची मां असते. या बहत्तर सिंगला पंजाब पोलिसांकडून ट्रकमधला बेकायदेशीर माल लुटायची कामगिरी मिळत असते त्यात त्यांची ब-यापैकी कमाई होत असते. त्यासाठी अ‍ॅक्शन आलीच.

खिलाडीभैय्या साऊथच्या नॉनसेन्स अ‍ॅक्शनच्या पुढे जाऊन सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि बॅटमॅन यांच्या कानाखाली आवाज काढावा अशी साहसदृश्ये बहत्तरसिंग आपल्याला देतो. एखाद्या गुंडाने त्याला आव्हान दिले कि तो गुंड त्याच्या समोरून निमिषार्धात गायब होत असतो. तो बाजूच्या कच-याच्या पेटीत कसा पोहोचला हे ना आपल्याला कळतं, ना त्या पडद्यावरच्या बिचा-या गुंडांना ! आपली गाठ एका अतिमानवाशी पडलीये हे ठाऊक नसणा-या त्या मानवांची दया नक्कीच येते. मग नायकाला दया येऊन तो समजावून सांगतो ते असं...

दुनियामे तीन चीजे कभी दिखती नही
एक - भूतों का संसार
दो - सच्चा प्यार..... और
तीन - बहत्तरसिंग की रफ्तार

मग अतिस्लो मोशन मधे आपल्याला बहत्तरसिंगच्या हालचाली दिसतात. अरेच्चा , मघाशी नॉर्मल स्पीडमधे एकाच जागी शुंभासारखा उभा असल्यासारख्या वाटणा-या नायकाने मारलेली किक, गुंडाचे उड्डाण हे अतिस्लोमोशनमधेही सुपरफास्ट दिसले आता. बापरे बाप ! वटवाघळाला आपला आवाज ऐकू येतो इतरांना मात्र ऐकू येत नाही हे सायंटिफिक तत्त्व रेशममियांनी वापरलेले दिसतेय. इथे आपण त्यांना मनातल्या मनात सा. दं. घालतो आणि या असाधारण प्रतिभावंताची हेटाळणी झालेली आठवते, पण म्हणतात ना.. चलेगा हाथी, उडेगी धूल, ना रहेगा हाथ, ना रहेगा फूल !!

आपल्यापुढे काय वाढलं जाणार आहे हे आता आपल्याला कळून चुकलेलं असतं. इकडे मुंबईत हिमेशभाईंचे पिताजी लग्न लावण्याच्या व्यवसायात मुलाकडून येणा-या अडथळ्याने त्रस्त झालेले असतात. एका लग्नात मात्र मार खायची पाळी आल्याने मुलाला ते हाकलून देतात आणि रानोमाळ भटकत असलेल्या या निर्मात्या - अभिनेत्यास तात्या तेंडूलकर (मिथून चक्रवर्ती) च्या बहिणीचे (आसीन) चे लग्न लावण्याचे काम अकस्मात मिळते. तात्या स्वतः डॉन असला तरी त्याला शरीफ खानदानात आसीन जावी असे वाटत असते जे अशक्य दिसत असते. त्यातूनही कुणी मिळालाच तर त्याला आप्ली ही नायिका पळवून लावत असते.

हे काम स्विकारताना हिमेशच्या डोक्यात पंजाबातला बहत्तरसिंग असतो. त्याने त्याला पोलिसाच्या वेषात पाहिलेला असतो. मात्र तो पोलीस नाही हे त्याला माहीत नसते. इकडे तो मिथूनला पोलिसाचे स्थळ आणलेय म्हणून खोटा एसीपी बनण्याची विनंती करतो. हिमेशने फार्सिकल घोळ घालायची पुरती तयारी केली होती. पण सिनेमातल्या लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांचा मोह न सुटल्याने त्यातच हसण्याच्या जागा चाणाक्ष प्रेक्षक शोधतो. प्रेक्षक दोन प्रकारे हसत असतात, एक हिमेशला हवे तसे हसणारे आणि एक स्वतःला हवे तसे ! हा विलक्षण अनुभव देणारं नाव आशीष मोहन असल्याचं गुगळून पाहील्यावर समजलं. मात्र सिनेमाचा इफेक्ट असा काही होता कि ब्राऊझरमधेही google 786 ctrl + Enter असं टाईपल गेलं.

कथा काय वळणं घेणार हे प्रेक्षकाला माहीत असते हे लेखकाने ओळखल्याने त्याने काही उपकथानकं आणून नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावरून ही कथा वाचकांच्या प्रतिक्रिया वाचत ऑनलाईन लिहीलीये कि काय अशी शंका येते. अर्थात त्यामुळे क्लायमॅक्सची सोय झाली हे ही कमी नाही आणि सत्तर, एकाहत्तरचा पाढा पूर्ण करून दिग्दर्शक, लेखक आपल्या प्रतिभेची जाता जाता चुणूक दाखवतात तेव्हा भावनाविवश व्हायला होतं. हो, अशा महामानवांची नोंद एक रसिक प्रेक्षक म्हणवून घेणा-या आपण घेतली नाही याची जाणिव होऊन स्वतःबद्दल अत्यंत घृणा निर्माण होते.

अभिनयाबद्दल काय बोलायचं ? सिनेमात अशा फालतू थेरांना वाव नाही. संगीत आधीच लोकप्रिय झालंय ही जमेची बाजू आहे. हिमेशचा आवाज ही एक स्वर्गीय देणगी आपण बरेच दिवस मिस केली होती. आता रस्त्यावरची कुत्री काही दिवस झोपणार नाहीत, गॅलरीत कपडे वाळताना दिसणार नाहीत हे नक्की ( मागे एकदा हिमेशचं संगीत गाजत असताना कपड्याचे चिमटे गायब होत असत म्हणे ) ! एका विरह कि दु:खी अशा गीतात मात्र हिमेशने असा काही आवाज लावलाय कि बस्स ! संगीत फक्त सात सुरापुरतंच सीमीत असतं अशी कल्पना करून घेतलेल्यांसाठी त्यात बरंच काही शिकण्यासारखं आहे. सा च्या खालीही अनेक स्वर आहेत आणि नी नंतरही ते आहेत याची जाणिव आपल्याला रेशममिया करून देतात. विरहगीत ऐकतानाही प्रेक्षकाचं हसू थांबणार नाही अशी काळजी इथे संगीत दिग्दर्शक घेतो.

एकंदरीत ढोणीने घरच्या पाटा पीचवर पाहुण्यांना सहज लोळवायचं स्वप्न पहावं आणि गोलंदाजांनी मात्र तिथं फक्त आपटबार टाकल्यासारख्या पाट्या टाकाव्या तसंच खिलाडी ७८६ च्या बाबत झालंय. अक्षयकुमार, या वर्षात ओह माय गॉड देणारा तूच का रे तो ? गेला बाजार, रावडी राठोडही त्यातल्या नॉन सेन्स अ‍ॅक्शनसहीत वेगळ्या नाट्यामुळे चक्क सहनेबल होता. शरद पवार जसे पंप्रपदापर्यंत पोहोचून माघारी फिरतात तसं तू ही सुपरस्टारच्या पदावर हक्क सांगून ऐनवेळी असं काहीतरी करतोस बघ !! गेट वेल सून माय बॉय !!!

अवांतर : ज्या लोकांना राजेश खन्नाचं वय वाढल्यावर त्याचे गंभीर सिनेमे त्याच्या अभिनयाच्या बळावर विनोदी म्हणून एण्जॉय करता आले, ज्यांनी जानी राजकुमारला एण्जॉय केलं त्यांना सांगण्याची गरज नाहीच. मात्र ज्यांना आपल्याला हा सिनेमा कळाला नाही असा न्यूनगंड आला असेल त्यांच्यासाठी फारएण्डने क्लासेस सुरू करावेत ही नम्र विनंती ! )

Kiran
प्रथम प्रकाशन
८.१२.२०१२

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)