शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

पृथ्वीगोलापासून किंचित दूर
निळ्या स्ट्रैटोस्फिअर मध्ये
असतात वस्ती करून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

संथपणे …. फिरणाऱ्या पृथ्वीला
आंजारत गोंजारत, प्रसंगी लाचलुचपत देत
असतात तग धरून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

हिंदकळतात वारयानं
हेलावून जातात नव्या वर्षाच्या रोषणाईनं
घाबरतात धूमकेतूंना
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

पहिल्या रडण्याचा किनरा आवाज
सूक्ष्मपणे ऐकतात
पहिल्या अडखळणाऱ्या पावलांकडे
असतात लक्ष ठेवून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

धूर सोडणाऱ्या आगगाड्या
कौतुकानं न्याहाळतात
होतात हवालदिल
जंगलातल्या वणव्यानं
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

तासावर नवीनच आलेल्या मास्तराकडे
पाहून बावचळलेल्या छोट्या हृदयातली धडधड
ऐकतात स्पष्टपणे
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

आपल्या भाषेत रिल्के वाचताना
शहारून जातो नवीन कवि
मोहरून जातात मग
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

पोजनान - ५ नोव्हेंबर २०१३

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)