मेघमल्हार

कोसळला नभीचा भार
बरसला अवचित मेघमल्हार...
शमला प्रखर रवीअंगार
पुसली ग्रीष्म - कोरडी खार
दाटला गगनी घन:श्याम
थांबला दाहक संहार
दरवळला मृदगंधार
बरसला बघ मेघमल्हार

बळीराजाचे अवसान
पेरले घर्मबिंदूंचे बियाणं
वर्षले दैवाचे वरदान
आले आनंदास उधाण
जाहले पुन्हा संजीवन पान
बरसला पहा मेघमल्हार
नभीचा हलका भार
बरसला मेघमल्हार

धावे कशी लगबग ती नार
तिची चपळ चंचल चाल
ओढी कपडे दोरीवरुनी, सुकवी कोप-याआड
वाहत्या पवनावर, उधळीत वस्त्रे
सावरीत केश संभार
बरसला पहा मेघमल्हार
लपला सूर्य ढगाआड,
गर्जला पुन्हा मेघमल्हार

डोईवर छिद्रांकित छत्र
गोंधळ अत्र तत्र सर्वत्र
पावसाळी पादत्राण आणि वस्त्र
एम. एस. इ. बी. ची विजेची तार
त्यावर झुकल्या फांद्यांचा भार
लागे सर्व्यास काही सुधार
बरसली अवचित मुसळधार
आला गर्जत मेघमल्हार
वर्षला पुन्हा मेघमल्हार

बुडाच्या भारावर धपकन
पडतो पाय घसरून सपकन
चपलीचा अंगठा तुटतो कचकन
चिखलात बसली आपुली बसकण
पाणी उडवून पळते कार
पंचाईत होई अपार
हसतोय पहा मेघमल्हार
चिडवतोय पहा मेघमल्हार

वातायने बैसुनी वृद्धजन
स्मरती तयांचे वर्षदिन
बरसे भूत - भविष्य - वर्तमान
पाळतो थकवा अन आजार
मनास त्यांच्याही तरार
वेगे वर्षली वर्षाधार
आला पुन्हा मेघमल्हार

बोटी मागून धावती बाल
बॉल खेळूनी करती धमाल
गणवेशास चिखलाचा मार
तरुणाईही धरते ताल
जागी चैतन्याचा वार
बरसली सरसर वर्षाधार
घन घन हिरवे रान
बरसला पुन्हा मेघमल्हार

कुठेतरी छत्रीआड
हातात गुंफले हात
हलकेच वाहतो वात
मोरपिशी इंद्रधनू रंगात
संथ शिरव्याची साथ
रंगला पहा मेघमल्हार
वर्षला पुन्हा मेघमल्हार
हर्षला पुन्हा मेघमल्हार

गायला तान राग मल्हार
प्यायले चराचर संजीवनी धार
धरतीचा पुनर्जन्म साकार
घेईल नवजीवन आकार
गर्जला पुन्हा मेघमल्हार
गायला तान राग मल्हार
बरसला पुन्हा मेघमल्हार ...............

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता मनापासुन आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0