भीती

बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता .
किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ?
आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत .
बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला .
किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार !
अन इथे ! इथल्या वृक्षांना रानातल्या वृक्षांची सर कुठून येणार ? त्यांचे बुंधे किती डेरेदार ? किती तरी पक्षी त्यांच्या आंगाखांद्यावर खेळायचे ? अन ती खोडकर माकडं ! किती किती गंम्मत होती त्या रानात . त्या अवखळ खारी , ते पक्ष्यांचे थवे , रातकिड्यांचा आवाज , तो काजव्यांचा लखलखाट , खळखळणारी नदी , हिरवेगार पहाड !
एक एक गोष्टं किती सुंदर !
अन आपला रुबाब तर काय वर्णावा ? सगळे नतमस्तक होत होते आदर अन भयाने . आता कुठून येणार परतून ते दिवस ?
इथे तर एका कुत्र्याहूनही वाईट परिस्थिती आहे आपली , त्यांना तरी मोकळीक आहे बाहेर वाट्टेल तसं भटकायला , अन आपण मात्र इथे पिंज-यात कोंडलेले . काय गोड पाणी होतं रानातल्या नदीचं ! इथल्या टाक्यातलं पाणी हत् ! अन खायला तरी काय ? शिळं पाकं ! कोणीतरी मारलेलं , कापलेलं ! कळतं तरी का त्यांना काही शिकारीतल ? कोणत्या प्राण्याची निवड करावी खाण्या साठी हे सुध्दा कळत नाही . ना चव ना ढव !
किती दिवस झालेत आपल्याला मनासारखं पोटभर खाउन ? अगदी लख्ख आठवतं ते सुंदर हरीण नुकताच वयात आलेलं , गोंधळलेलं , आपल्या तावडीत सापडलच होतं , अगदी तोंडाशी आलेली शिकार ! पण तेव्हाच काय घात झाला कुणास ठाऊक ? जागे झालो तर पिंज-यातच तेव्हापासून आपण इथेच .
ही काय जागा आहे राहण्याची ? भटकण्याची गोष्टं सोडा , पाय मोकळे करण्यासाठी सुध्दा धड जागा नाही इथे . अगदी मरून जावसं वाटतं , दिवस भर गोंगाट नुसता , झोपू पण देत नाही . कितीतरी दिवसांपासून रात्री कसली ठकठक सुरु आहे समोर कुणास ठाऊक ? समोरच्या वाटे पलीकडे कसलासा जाळ्यांचा पिंजरा उभारताहेत ?
हं आणणार असतील कोणत्या तरी प्राण्याला . सुचतं तरी काय दुसरं ह्यांना ?
जाऊ दे आज तरी ते ठकठक करणारे अजूनतरी आलेले दिसत नाहीत , दिवसा कुठे झोपू देतात ? रात्रीचं जागरण कधीच बंद झालय .
इथे आल्या पासून सगळ्या सवयीच पार बदलून गेल्या आपल्या !
पडावं आता थोडावेळ तरी शांत पणे .
अं हं ! कुणाचा आवाज हा ?
थोडा वेळ्ही शांत पणे पडु देत नाहीत , हत् !
कोण आहे ह्या वेळी ?
हा तर हरणांचा गंध !
कुठून ?
खूप सारी हरणं असली पाहिजेत , वासावरूनच कळतंय .
कुठे ?
अरे समोर जाळीच्या पिंज-या मागून कुणाचे डोळे चमकताहेत ?
हरणाचेच की ?
कसा विसरील मी ?
तीच तर माझी सगळ्यात आवडती शिकार होती त्या दिवसात .
अरे तेच हरीण आवाज देताय की मला , जाळीवर पाय टाकून उभं आहे तेच !
हो तेच ! अगदी तेच हरीण !
आपलं शेवटच .
हे इथं कसं ?
काय करतंय इथं ?
तू इथे कसा ? वाघाने हरीणाला विचारले .
ओळखलंस मला ? हरीणाने विचारले .
ओळखलं ओळखलं ! कसा विसरणार तुला मी ? वाघ म्हणाला .
अन मी पण तुला ? हरीण म्हणाले .
खरंच की ! वाघ म्हणाला .
तू इथे कसा रे ? वाघाने परत विचारले . तुझा कदाचित विश्वास नाही बसणार पण मी आता तुझाच विचार करत होतो .
माझा विचार ! हरीण आश्चर्यचकीत झाले , खरंच विश्वास नाही बसत , मला तर वाटलं की तू मला विसरूनही गेला असशील .
शक्य तरी आहे का तुला विसरणं ? तू माझी शेवटची शिकार होतास अगदी तोंडाशी आलेली ,वाघ म्हणाला ,
तेव्हाच तू मला खाउन टाकलं असतंस ना तर फार बरं झालं असतं रे , हरीण म्हणाले .
का रे ? असं का म्हणतोस ? वाघाने विचारले .
ह्या सगळ्यातून तर सुटलो असतो ना ! हरीण म्हणाले .
हू ! वाघाने उसासा सोडला , असं जगण्या पेक्षा मरण बरंच की ! एका अर्थानी बरोबरच आहे तुझं म्हणणं , पण तू इथे कसा पोहचलास ? वाघाने विचारले .
तुझ्या सारखाच , जसा तू आलास तसाच मी ही आलो , अजून कसा येणार इथे ? हरीण म्हणाले .
हो ते ही खरंच , स्वत:हून इथे कोण येणार ? पण तू तर पळून गेला होतास ना मला चांगलं आठवतंय ? मी जेव्हा खाली पडलो तेव्हा तर तू माझा नजरेआडही झाला होतास . वाघ म्हणाला .
तोच तर मूर्खपणा झाला ना माझा , हरीण म्हणाले .
काय झालं रे नंतर ? तूच सांग , मला तर काहीही आठवत नाही , वाघ म्हणाला .
अरे मी तर जीव घेऊन पळत होतो वाटत होतं संपला आपला कारभार ! बघ तुझे पंजे ही पोहोचले होते माझ्याजवळ , बघ अजूनही आहेत ओरखडे तुझ्या नखांचे , हरीण म्हणाले .
अरे रे ! च च ! जाऊ दे . वाघ म्हणाला .
हो ! आता काय त्याचं ? हरीण म्हणाले . तुला आठवतंय आपण पळत असताना मागून मोठ्ठा आवाज आलेला ?
हो . मग मागे कंबरेला बोचलं काही तरी , वाघ म्हणाला .
मग तू कोसळलास , हरीण म्हणाले .
हो रे , मग मला एकदम गुंगी यायला लागली , बोचल्यां नंतर फार धावूही शकलो नाही मी , झापड येत होती डोळ्यावर एकदा पडल्या नंतरच तर काहीही आठवत नाही मला , वाघ म्हणाला .
मला ही खूप दूर गेल्यावर कळलं ते , हरीण म्हणाले . मी टेकडीवर पोहचल्यावर कळलं की आता काही धोका नाही म्हणून . मग मी मागे वळून खाली बघितलं तर चार माणसं तुला कशानी तरी बांधत होती , मी म्हटले चला ह्यांच्या मुळेच जीव वाचला आपला , किती चांगलं वाटत होतं मला तेव्हा त्यांच्या बद्दल , पण !
पण काय ? पुढे काय झालं ? वाघ म्हणाला .
कसचं काय रे ! एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं , अन संपलं सगळं ! हरीण म्हणाले .
का काय झालं ? वाघाने विचारले .
तेच रे , त्यांच्यातील एकाने त्याचा हात पुढे केला त्याच्या हातात काही तरी होतं काय ते मला दिसलं नाही पण तसाच मोठ्ठा आवाज झाला अन माझ्याही अंगात काहीतरी रुतलं , मग मला पण तुझ्या सारखी गुंगी आली , हरीण म्हणाले .
तू इथे कधी आलास ? मला तर ह्या आधी कधीही दिसला नाहीस ? वाघानी विचारले .
कसा दिसणार ? तुला तुझ्या पिंज-यातून कितीसं दिसतं ? हरीण म्हणाले .
हो तेही खरचं की ! वाघ खिन्न होऊन म्हणाला , तुम्हाला मोकळं फिरू देतात का ?
नाही रे , हरीण म्हणाले , पण आमचा पिंजरा तुमच्या दगडमातीच्या पिंज-या पेक्षा बराच मोठा असतो ? जाळीचा , त्यात थोडं फार फिरता येतं पण त्यात आपल्या रानातल्या फिरण्या सारखी मजा कुठे असणार ?
हो ते ही खरंच ! पण तुला कसं कळलं माझ्याबद्दल ? तू कुठे होतास आजवर ? वाघ म्हणाला .
अरे आत्ता पर्यंत आम्ही सगळे पलिकडच्या भागात होतो कोप-यात , आता इथे आणलं आम्हाला . तिथे आता पुष्कळसे दगड मातीचे पिंजरे बनवत आहेत , अगदी तुझ्या पिंज-या सारखेच , हरीण म्हणाले .
मग मला आता तिथे नेणार की काय ? वाघ म्हणाला .
मला कसं ठाऊक असणार ? पण एक मात्र बरं झालं आपली त्यामुळे भेट तरी होऊ शकली , हरीण म्हणाले . किती तरी दिवसांपासून तुला भेटायची इच्छा होती , तिथे फक्त तुझा आवाजच ऐकू यायचा मला , मी ओळखलं तुला तुझ्या आवाजावरून , तुझा आवाज मी कसा विसरील ? आपल्या वनातले सगळे आवाज अगदी मनात बसलेले आहेत .
हो रे किती किती छान होतं ना आपलं वन , अगदी एकेका प्राण्याची आठवण येते , वाघ म्हणाला .
हो ना मलाही येते , पण काय करणार ? हरीण उदास झाले , आता तर तिथे काहीही नाही .
काय ? वाघ म्हणाला , सगळ्याना पकडलं का त्यांनी ?
नाही रे आता तर तिथे आपलं जंगलच नाही , हरीण म्हणाले .
म्हणजे ? वाघ म्हणाला .
माणसांनी ते सगळच्या सगळं जंगल कापून टाकलंय , हरीण म्हणाले .
मग आता तिथे काय आहे ? वाघ म्हणाला .
आता तिथे मोठ्ठ गाव आहे आपल्या रानातल्या गावांसारखं लहान नाही , खूप खूप मोठ्ठ गाव , दगडमातीच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या वाटा , दगड मातीचीच उंचच उंच घरं अगदी पहाडां पेक्षा उंच ! आपल्या रानतल्या घरां सारखी नाही , काही घरं तर खुप खुप मोठ्ठी आहेत , त्यातुन खुप मोठ्ठा आवज येत असतो , आणि सतत खुप धूर ही येत असतो असं म्हणतात , आणि आपल्या नदीचं पाणी अडवलयं त्यांनी दगड मातीनी , हरीणानी सांगितले .
कशाला ? वाघाने विचारले .
आता ते मला कसं ठाउक असणार ? हरीण म्हणाले .
हो ते ही खरंच म्हणा ! आणि आपल्या रानातली माणसं , ती कशी आहेत ? वाघाने विचारले
आता त्यांच्या पैकी कुणीही तिथं नाही , निघुन गेलेत सगळे , हरीणाने सांगीतले .
अरे रे ! पण हे सगळं तुला कसं ठाऊक ? वाघाने विचारले .
हरीण म्हणाले , मागच्याच थंडीत अजूनही काही हरणं आली ना इथे आपल्या रानातली , त्यांनीच सांगितलं .
अरे रे ! किती वाईट झालं ना ? वाघ म्हणाला .
हं ! काय करणार ? हरीणाने उसासा सोडला .
माणुस किती वाईट अन क्रूर आहे ना ? वाघ म्हणाला .
हू ! हरीणाने उसासा सोडला , पण सगळेच सारखे नसतात रे , हरीण म्हणाले .
हू ! वाघ म्हणाला .
आपल्या जंगलातली माणसं कुठे इतकी वाईट होती सांग ? हरीण म्हणाले .
हो ते ही खरंच , वाघ म्हणाला .
कधीतरी त्यांनी उगाच आपल्याला त्रास दिला का ? हरीण म्हणाले .
नाही कधीच नाही , वाघ म्हणाला .
कधी तू त्यांच्या गावात शिरलास तर ते प्रतिकार करायचे , हरीणांनाही मारून खायचे कधी कधी , पण तेही कधी तरी आणि फक्त चवीसाठी आणि फक्त भुके पुरतं , तेवढं तर चालायचंच जंगलात पण मुद्दाम म्हणून असं पकडून , कोंडून त्रास दिलाय का त्यांनी कधी तरी ? हरीण पुढे म्हणाले , जेव्हा ते काही वाजवायचे , नाचायचे ते किती किती ऐकावसं अन बघावसं वाटायचं , ते स्वर ऐकून आम्ही तर थबकून जायचो अन कान टवकारून ऐकत राहायचो , हरीण म्हणाले .
मलाही ते खूप आवडायचं रे , वाघ म्हणाला .
किती किती एकरूप झालो होतो रे आपण ! नदी , पहाड , जंगल , प्राणी आणि माणूस , सगळं किती सुंदर होतं ! हरीण म्हणाले .
हो , गेलं ते सगळं ? वाघाने उसासा सोडला .
अरे एक तर तुला सांगायचं विसरूनच गेलो मी ! हरीण म्हणाले .
काय ? वाघाने विचारले .
अरे आपल्या रानातल्या माणसांचे बच्चे दिसले होते मला इथं , हरीण म्हणाले .
इथं ! इतक्या दूर ? इथे कसे काय पोहचले ते ? वाघाने विचारले .
अरे आत्ताच सांगितलं नाही का आता सगळं जंगल नष्टं झालंय म्हणून , आता रानातली गावंही राहिली नाहीत ती देखील संपलीत ना सगळ्यांसोबत ? आपल्या रानातल्या माणसांचीही अगदी आपल्या सारखी अवस्था झाली आहे . जंगल कापल्या गेलं आता ते तिथे कसे राहणार ? काय खाणार ? तेही निघून गेले तिथून . निघून कशाला पळ्वूनच लावलं म्हणे ह्यांनी त्यांना ! हरीण म्हणाले .
हं ! वाघ म्हणाला .
आता त्यांना आसरा कुठे आहे ? वाट चुकून आले असतील ते बच्चे कदाचित . मी तर त्यांना त्यांच्या गंध आणि उच्चारावरूनच ओळखलं , मी तर सतत त्यांच्या पुढेपुढेच करत होतो , उपाशी दिसत होती ते , हरीण म्हणाले .
अरे रे ! वाघाचा चेहरा उतरला होता . कुठे गेले ते मग ?
ऐक , तेच तर सांगतोय , हरीण म्हणाले , त्यांनी इथल्या एकाच्या हातातून काहीतरी ओढलं आणि पळू लागले .
मग ? वाघांनी विचारले .
किती आरडाओरडा झाला म्हणून सांगू ? पकडलं सगळ्यांनी त्यांना अन खूप मारलं , रक्ताळून गेले होते बिचारे , हरीण म्हणाले .
अरे रे ! आपल्या जातीतल्यां सोबतही हे असे वागतात ? मग काय झालं ? वाघाने विचारले .
पकडून घेऊन गेले त्यांना , हरीण म्हणाले .
कुठे ? वाघानी विचारले .
कुठे म्हणजे ? कुणालाही पकडून हे कुठे टाकतात ? हरीणाने प्रतिप्रश्न केला , कदाचित त्यांनाही आपल्या सारखं पिंज-यातच टाकलं असेल कुठेतरी .
हं ! वाघ म्हणाला , अजून येतंच काय ह्यांना ? अन पिंज-यांची काय कमी आहे ह्यांच्या कडे ?
आपण तरी काय करू शकतो , हरीण खिन्न होउन म्हणाले .
हू ! वाघ म्हणाला .
तू किती उतरलास रे ! पूर्वीची रया काही राहिली नाही तुझी , हरीण म्हणाले .
कशी राहणार तूच सांग ? वाघ म्हणाला .
ते ही खरंच म्हणा , पण जंगलात काय रुबाब होता तुझा , हरीण म्हणाले . आता तर तुझ्या डरकाळीत पहिले सारखा दरारा राहिला नाही , हरीण म्हणाले .
जाऊ दे रे , पहिले सारखं काय राहिलंय तूच सांग ? पहिले कुणाची तरी छाती होती का माझ्यापुढे यायची , तो सिंह तरी माझ्या मधे यायचा का कधी ? पण इथे ! इथे मात्र कुणीही येऊन खडा मारून जातो , मी असा बंदिस्त काय करणार ? आजकाल तर डरकाळी फोडायची इच्छाही होत नाही पहिले सारखी . कधी चिडून एखादवेळा गुरगुरलो तर ही माणसं घाबरून मागे सरकतात पण मग थोडया वेळानी खदाखदा हसायला लागतात , इतकं वाईट वाटतं म्हणून सांगू ? असं वाटतं की ह्या अपमाना पेक्षा मरण बरं , वाघ म्हणाला .
हू ! आता हरीणाने उसासा सोडला .
पण काय रे ? वाघाने हसून हरणाला विचारले , जंगलात असताना किती घाबरायचास मला , आता भीती नाही वाटत का माझी ?
खरं सांगू ? हरीण म्हणाले , आता मला तुझी इतकी भीती नाही वाटत . तू तर बोलून चालून वाघ आहेस , जसं मी पाला , गवत खातो तसं तू मला खाशील हे तर चालायचच रानात , ते तर आपण बदलू शकत नाही , पण तू खाशील तर फक्त भुके पुरता , पण कमजोर म्हणून उगाच त्रास तर देणार नाहीस ? हरीणाने वाघाला विचारले .
खरं आहे तुझं म्हणणं , वाघ उत्तरला .
ते जाऊ दे एक विचार कर , हरीण पुढे म्हणाले , आपण तर वेगळ्या जातीचे आपल्याशी हे कसे वागतात ते एकवेळ सोडुन देउ , पण हे आपल्या जातीतल्यांशीच कसे वागतात बघ ना ? इतका दुष्टपणा कोणत्यातरी जनावरात आढळतो का सांग ?
नाही रे , वाघ म्हणाला .
म्हणूनच मला फार भीती वाटते रे ह्यांची , हरीण म्हणाले .
हूं ! खरं सांगू ? वाघ म्हणाला .
बोल , हरीण म्हणाले .
मला पण , वाघ म्हणाला .
बाप रे ! तुला पण ? मग तर संपलंच की सगळं ! हरीण उदास झाले .
( समाप्त )

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आवडलं. खुपच छान पद्धतीने बेफाम शहरीकरणाचे परीणाम लिहिलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरीकरणामुळे, एकाच ठिकाणी होणार्‍या औद्योगिक प्रगतीमुळे, प्लॅनिंगशिवाय होणार्‍या जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो आहे हे दिसतं आहेच. पण त्याचबरोबर वाघ आणि हरीण हे एकेकाळच्या स्वयंपूर्ण खेड्यांतले सावकार आणि मजूर जे आता हतबल झालेले आहेत असं काहीसं रूपक वाटलं.
कथा थोडी छोटी असती तर अधिक परिणामकारक वाटली असती. पुलेशु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिल्पा , अदिती , प्रतीसादा साठी धन्यवाद .
अदिती कथा थोडी छोटी असायला हवी होती हे तुमचं म्हणणं योग्य आहे , कमीत कमी शब्दात कथा लिहिण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो . माझ्या सर्व कथांमधे ही कथा सर्वात मोठी कथा झाली आहे . जिथे शक्य असेल तिथे कात्री लावीलच .
प्रतीसादा साठी पुन्हा एकदा धन्यवाद .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0