मराठी रंगभूमीच्या तीस रात्री - मकरंद साठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' - 'रात्र दहा'
मकरंद साठेलिखित 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' या पुस्तकाचं काल पुण्यात प्रकाशन झालं. मकरंद साठे यांनी त्या प्रसंगी बोलताना पुस्तक लिहिण्यामागचा आपला विचार थोडक्यात मांडला. त्यांच्या मते साहित्यामागे 'मी कोण' असा प्रश्न असतो (किंवा असावा). मराठीतला एक नाटककार या नात्यानं त्यांना असा शोध घ्यावासा वाटला. चांगलं नाटक कशाला म्हणायचं असाही प्रश्न त्यांच्या मनात होता. मराठी नाटकाच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत असं वाटल्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. मराठी नाटकाचा इतिहास महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासाशी घट्ट बांधलेला आहे आणि आजच्या वास्तवाच्या आपल्या आकलनाशीही त्याचा गहिरा संबंध आहे असं जाणवलं म्हणून 'मराठी नाटकाचा सामाजिक-राजकीय इतिहास' असा विषय ठरवला. पुढच्या पिढीला आपल्या आकलनाचा फायदा व्हावा अशी इच्छा असल्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन तरुण रंगकर्मींच्या हस्ते झालं. धर्मकीर्ति सुमंत, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र यांनी पुस्तक प्रकाशित केलं.

त्यानंतर अतुल पेठे, ज्योती सुभाष, गजानन परांजपे ओंकार गोवर्धन आणि पर्ण पेठे यांनी या त्रिखंडात्मक (आणि सुमारे सतराशे पानांच्या) पुस्तकातल्या निवडक २५ पानांचं अभिवाचन केलं. एक प्रायोगिक मराठी नाटककार आणि नाटकातला विदूषक यांच्यामधल्या तीस रात्रींच्या संवादाद्वारे हा इतिहास उलगडला आहे. सर्व प्रकारच्या नाटकांचा यात समावेश आहे. प्रायोगिक/व्यावसायिक रंगभूमी, संगीत रंगभूमी, कामगार रंगभूमी, शिवाय तमाशादि लोककलांचा नाटकाशी असलेला संबंध अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. नाटकांच्या संहिता आणि नाटकांविषयी नाटककार आणि इतरांनी केलेली रसग्रहणात्मक/समीक्षात्मक मांडणी हे इतिहासाचे स्रोत म्हणून घेतलेले आहेतच; त्याशिवाय नाटकांची तिकिटं, सरकारी फर्मानं अशा अनेक गोष्टी या इतिहासात स्रोत म्हणून समाविष्ट आहेत. उदा. अभिवाचनात जुन्या नाटकाची एक जाहिरात वाचली गेली; त्या काळात गरत्या स्त्रिया (म्हणजे घरंदाज किंवा उच्चवर्णीय स्त्रिया) आणि वेश्या यांच्यासाठी बसण्याची वेगवेगळी व्यवस्था आणि तिकिटांचे वेगवेगळे दर असत याचा त्यात उल्लेख होता. स्त्रीपार्टी नट गोरे आणि कोवळे दिसावेत म्हणून मिसरुड न फुटलेल्या लहान मुलांना फूस लावून नाटक कंपनीत कामाला लावलं जाई आणि तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असत. म्हणून लहान मुलांना फूस लावून नाटक कंपनीत दाखल करून घेणं हा ब्रिटिश सरकारनं गुन्हा म्हणून जाहीर केला होता असं एका (बहुधा पुण्यातल्या) फर्मानात दिसलं. पठ्ठे बापूरावांची मुंबईवरची लावणी आणि अण्णाभाऊ साठे यांची मुंबईवरची लावणी यांची तुलना, महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा' त्रिनाट्यधारेचं साठे यांनी केलेलं सामाजिक-राजकीय विश्लेषण हे पुस्तकातले उतारेही अभिवाचनात समाविष्ट होते.

पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतली चित्रं विख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांची आहेत. पुस्तकातले निवडक उतारे आणि चित्रं 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' या फेसबुक पानावर आहेत.

पुस्तकाविषयीची मकरंद साठे यांची भूमिका इथे वाचता येईल.

८ डिसेंबरला मुंबईत प्रकाशन सोहळा आहे. त्याविषयी अधिक माहिती इथे वाचता येईल.

टीपः 'ऐसी अक्षरे'वर किंवा इतरत्र ही बातमी देण्यासाठी 'पॉप्युलर प्रकाशन' किंवा कुणाहीकडून कसलाही आर्थिक मोबदला प्रस्तुत लेखकाला मिळालेला नाही.

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मकरंद साठे यांची भूमिकाही वाचली. 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात डॉ. सदानंद मोरे यांनी राजकारणासंदर्भात नाटकांची भूमिका दिलेली आहे. दुसर्‍या बाजूनेही केलेला अभ्यास वाचायला आवडेल.
पुस्तकाला '... तीस रात्री' असं नाव का दिलं असा प्रश्न पडला आहे. एक महिना या एककाबद्दल कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुस्तकाचे तीन खंड कालखंडानुसार विभागले आहेत. त्यातली एकेक रात्र म्हणजे विशिष्ट अंगानं केलेलं विश्लेषण असावं. अभिवाचनात जेवढा भाग वाचला गेला त्यातल्या नाटककार-विदूषक संवादावरून 'एक हजार आणि एक रात्री' किंवा 'वेताळ पंचविशी'ची आठवण झाली. थोडा गंमतीशीर, थोडा गंभीर संवाद करत विदूषक विवेचन करतो असं स्वरूप आहे. तीसच का? ती विभागणी मुद्द्यांनुसार असावी पण ३० या संख्येला विशेष महत्त्व नसावं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||