Skip to main content

ब्रेड अँड बटर, भाग ६: साधा सँडविच ब्रेड

रुची च्या मालिकेत हा लेख जरा बिचकतच टाकतेय. पण गेल्या काही आठवड्यात साध्या सँडविच पावाचे प्रयोग केले, आणि भारतात उपलब्ध सामग्री वापरून केलेल्या ब्रेड साठी वेगळा धागा काढावंसं वाटलं. एक चांगली कृती सापडली, आणि मैदा, रागी, कणीक चे प्रमाण बदलून पाहिले. प्रयोगासाठी दोन छोटे पॅन घेतले, त्यामुळे कृतीतली सगळी सामग्री अर्धी वापरली. एकूण ही कृती, खासकरून कमी मळण्याची पद्धत, सोपी आणि उपयुक्त आहे.

P1030758

सामग्री:
१ चमचा प्रेश बेकर्स यीस्ट
६० मिलि फेटलेली साय
१२५ मिलि ताक, दह्यावरचे पाणी किंवा पनीर करून उरलेले पाणी (व्हे), थोडे कोमट केलेले
३/४ चमचा मीठ
२२५ ग्रॅम मैदा (अथवा १७५ ग्रॅम मैदा/ ५०ग्रॅम नाचणीचे पीठ, अथवा १५० ग्रॅम मैदा, ७५ ग्रॅम कणीक - यासाठी खाली टीप पहा)
१ चमचा साखर
हवे असल्यास - भोपळ्याच्या बिया, जवसाच्या बिया, ओवा, जिरे, खसखस इ.
छोटा (मिनि लोफ) पॅन

P1030776
maidaatta2

कृती:
ताकात अथवा व्हे मधे साखर आणि यीस्ट घालून १०-१५ मिनिट ठेवावे. थोडे बुडबुडे दिसायला लागले की यीस्ट तयार.
परातीत पिठं आणि मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साय आणि व्हे-यीस्ट चे पाणी घालून सैलसर कणीक तयार करावी. फडक्याने झाकून १० मिनिट ठेवून द्यावे.
१० मिनिटांनी ओट्यावर दोन-तीन थेंब तेल लावून १०-२० सेकंद कणीक हलकेच मळावी. पुन्हा १० मिनिट झाकून ठेवून द्यावे. असेच अजून दोनदा करावे.
तिसर्‍यांदा मळून झाल्यावर कणीक दीड-दोन तास ठेवून द्यावी. फुगून आकारात दुप्पट होईल.
ओट्यावर पुन्हा थोडे तेल लावून कणकेला आयताकृतीत सपाट करावे. वरचा तृतियांश भाग मधल्यावर दुमडावा. मग खालचा तृतियांश पुन्हा मधल्यावर दुमडावा. आता पुन्हा उजवा अर्धा भाग बाजूने डाव्यावर दुमडून घ्यावी. कडेने चिमटे मारून घड्या बंद करून घ्याव्या, आणि जमेल तितके खाली खोचून घ्याव्या.
लोफ -पॅनला थोडा तेलाचा हात लावून कणकेचा गोळा त्यात पुन्हा फुगायला ठेवावा. पॅनच्या दीड-दोन सेंटिमीटर वर फुगून आली, की भाजायला तयार.
दुसर्‍यांदा तयार होण्याआधी १०-१५ मिनिट भट्टी २५० सेल्सियस वर गरम करून घ्यावी. कणीक फुगली की तापमान २२० से. वर कमी करून ४५-५० मिनिट भाजावी.

P1030867
ragimaida1

टीपः
१) नाचणी आणि कणीक वापरली, तेव्हा व्हे-यीस्ट मधे फक्त ५० ग्रॅम मैदा आणि अन्य पीठ मिसळून ७-८ तास फ्रिज मधे ठेवावे. मग बाहेर काढून उरलेला मैदा आणि साय त्यात घालावी. पुढील कृती तशीच. या "प्री-फर्मेंटेशन" ने ग्लूटेनचे धागे बळकट होण्यास मदत होते.
२) नाचणी ने चांगला लालसर रंग आला, पण ब्रेड किंचित कडू लागला.
३) ओवा, जिरे इ. घालायचे असल्यास कणकेला आकार देताना पहिल्यांदा दुमडायच्या आधी पसरून किंचित दाबून ठेवाव्या. बिया लोफ भाजायच्या आधी त्याच्या डोक्यावर (अक्षतासारखे) सुद्धा टाकता येतात.
४) तिसरा लोफ फ्रेश यीस्ट च्या जोडीला आधीच तयार केलेलं विरजण वापरलं - सावरडो ची चव मस्त लागते.

maidaatta1

येत्या आठवड्यातले प्रयोगः १) ज्वारी, किंवा थोडा रवा घालून पाहणे २) सायीच्या ऐवजी दूध, मग हळूहळू दुधात पाण्याचे प्रमाण वाढवणे
हा धागा अशाच साध्या, रोज खाता येणार्‍या, भारतातील सामग्रीने केलेल्या प्रयोगांसाठी सर्वांनी वापरावा.

आवड/नावड

रुची Tue, 26/08/2014 - 10:41

रोचना ब्रेड किती सुरेख दिसतोय, अगदी हलका, पाहूनच खावासा वाटणारा. ताकात यीस्ट सुरु करायची पद्धत नवीन वाटली, करून पहायला हवे. नाचणीची चव कडवट म्हणजे रायसारखी लागली का?
तू सावरडो बनवलाय कधी? भारतातल्या उष्ण हवेत पट्कन बनत असेल सावरडो.
ताक. दुधाबरोबर थोडी दुधाची पावडर वापरूनही मिल्क ब्रेड छान होतो.

ऋषिकेश Tue, 26/08/2014 - 10:42

वावा! नवा ब्रेड :)
गणपतीच्या धांदलीनंतर लगेच करून बघेन

मला पुढील भाग नीटसा कळला नाही

ओट्यावर पुन्हा थोडे तेल लावून कणकेला आयताकृतीत सपाट करावे. वरचा तृतियांश भाग मधल्यावर दुमडावा. मग खालचा तृतियांश पुन्हा मधल्यावर दुमडावा. आता पुन्हा उजवा अर्धा भाग बाजूने डाव्यावर दुमडून घ्यावी. कडेने चिमटे मारून घड्या बंद करून घ्याव्या, आणि जमेल तितके खाली खोचून घ्याव्या.

एखादा फटु असेल काय?
इतरत्र तत्सम विडीयो कोणी जालावर चढवलेला असेल तर तो ही चालेल

रोचना Tue, 26/08/2014 - 11:05

In reply to by ऋषिकेश

ऋ, "शेपिंग अ सँडविच लोफ" गुगलून पहा. बरेच विडियो आहेत.

रुची, हो, थोडी रायसारखीच चव होती. माझे सावरडो चे विरजण आधीच्या फुगलेल्या कणकेचा गोळा ठेवून केले होते. त्याला खुराक दिल्यावर चांगले फुगले, पण कणीक हवी तेवढी फुगली नाही. आता सुरुवातीपासून तयार करून पाहणार आहे.

चिंतातुर जंतू Tue, 26/08/2014 - 18:19

In reply to by रोचना

>> माझे सावरडो चे विरजण आधीच्या फुगलेल्या कणकेचा गोळा ठेवून केले होते

म्हणजे इटालिअन स्टार्टर 'बिगा' का? बिगा साधारणतः कमी प्रमाणात, म्हणजे विरजण म्हणावं इतपतच वापरतात. फ्रेंच स्टार्टर त्याहूनही पुढे जातात. ब्रेडचा गोळा मळताना त्यातला अर्धा भाग आदल्या दिवशी ब्रेडसाठी आंबवलेल्या गोळ्यातला काढून घेतलेला आणि अर्धा ताजा असतो. ब्रेड हलका आणि चविष्ट करायला हे मिश्रण चांगलं पडतं.

रोचना Tue, 26/08/2014 - 19:25

In reply to by चिंतातुर जंतू

युरोपीयन प्रोवेनन्स माहित नाही :-) एका साइटीवर सहज वाचले होते, आणि दहीसाठी विरजण आदल्या दिवशीचं ठेवतो तसं ठेवलं होतं.

घनु Tue, 26/08/2014 - 11:03

वा :) नाचणिचा ब्रेड पाहून धम्मगिरी विपश्यना केंद्रातील सकाळच्या नाष्ट्याची आठवण झाली :)
पण हे फार कष्टाचं आणि चिकाटीचं काम दिसतय, हॅट्स ऑफ तुम्हाला!