कवि ग्रेस यांना साहित्य अकादेमी पुरस्कार

आताच हाती आलेल्या माहितीनुसार कवि ग्रेस , ऊर्फ माणिक गोडघाटे यांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार घोषित झालेला आहे. त्यांच्या "वार्‍याने हलते रान" या निबंधसंग्रहास हा पुरस्कार मिळालेला आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या संबंधातले वृत्त :
http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Amazing-Grace-Brilliant-p...

काही कलावंतांना, त्यांच्या हयातीतच दंतकथा बनण्याचे भाग्य लाभते असं म्हणतात. ग्रेस यांच्या बाबतीत हे विधान कदाचित लागू होईल. सत्तरच्या दशकातल्या "राजपुत्र आणि डार्लिंग" आणि नंतर आलेल्या "चंद्रमाधवीचे प्रदेश" या संग्रहांमुळे ग्रेस प्रकाशात आले. सत्तरच्या दशकात पॉप्युलर प्रकाशनाने ज्या नव्या कवींना "लाँच" केले त्यात ग्रेस होते (अन्य नावांपैकी काही : नाधों महानोर , रजनी परुळेकर)

ग्रेस यांच्या कवितेबद्दल बरेच लिहिले गेलेले आहे. त्यांच्याबद्दलच्या एका पुस्तकाचे नावच मुळी "ग्रेस आणि दुर्बोधता" असे आहे.ग्रेस यांच्या लिखाणाचा परिचय जरी चर्चबेल मधल्या त्या चिमण्यांबद्दलच्या पाठ्यपुस्तकात सामील केल्या गेलेल्या धड्यामुळे अनेकाना झालेला असला तरी, ग्रेस या "एलीट" कविचे नाव घरोघर झाले ते हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या त्या चार गाण्यांमुळे ; यात शंका नाही. ऐंशीच्या दशकात असे क्वचितच एखादे मराठी घर असेल ज्यांनी निवडुंगमधली गाणी ऐकली नसतील.

या सर्व काळात चर्चबेल , मितवा सारखे ललितलेख संग्रह येत राहिले. अक्षयकुमार काळे यांना दिलेली एक लांबच लांब मुलाखत आली. या सार्‍या निर्मितीतून , भरभरून बोलण्यातून ग्रेस अधिकाधिक दुर्बोधतेच्या धुक्यात गुरफटलेले जाणवत राहिले.

द भि कुलकर्णी हे ग्रेस यांचे मराठीचे प्राध्यापक. त्यांच्या या विद्यार्थी-शिक्षक संबंधांबद्दल कुलकर्णी यांनी लिहिलेले आहे. नंतर नंतर त्यांचे संबंध कटुतेकडे झुकले होते. दभिंनी आपल्यालाच तेव्हढी ग्रेसची कविता कळते असा दंभ बाळगू नये अशा स्वरूपाचे मत ग्रेसनी व्यक्त केले होते. ग्रेस आणि जीए कुलकर्णी यांची भेट कधी झाली नाही पण दोघांचा पत्रव्यवहार खूप मोठा होता. यापैकी जीएंनी आपल्याला आलेली जवळजवळ सर्वच पत्रे जाळून टाकली त्यामुळे या दस्तावेजाचा हा भाग कधी प्रकाशात येणे अशक्य.

पुढे ग्रेस यांनी सामना मधे चालवलेला कॉलम , त्यांचे "कावळे उडाले स्वामी" या शीर्षकांतर्गतचे काम, त्याला आलेला प्रतिसाद हे सगळं त्यांच्या ऐंशीच्या दशकात कमावलेल्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे असं चित्र रंगवणारं. अर्थात, ग्रेस कधीच "प्रचंड लोकप्रिय" नव्हते, तसा त्यांचा प्रयत्न , दावा , असं काहीकाही नव्हतंच.

आज ग्रेस यांच्याबद्दल काय वाटते ? माझ्यापुरतं बोलायचं तर ग्रेस हा घुटक्याघुटक्याने प्यायचा कवी आहे. त्यांच्या ओळी , त्यांची काही विधानं , ललित लेखांमधले काही खंड , त्यांचं प्रतिमारूपकांनी संपृक्त असलेलं जग या सार्‍याने दीपायला होते. परंतु "समग्र" असा अर्थ घेऊन तो अर्थ "लावावा" हा प्रयत्न ग्रेस यांच्या बाबत फोल आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कलावंताना सामाजिक आणि एकंदरीतच तात्कालिक जगण्याच्या इतर कुठल्याही पैलूंबद्दल "दूरदूरतक" काही देणेघेणे कधी नव्हतेच. परंतु , त्यांचे स्वतःचे जे काही जग आहे त्यामधे क्षणिक चमकदार , अत्यंत संस्मरणीय असे तुकडे आहेत. त्या तुकड्यांनी मिळून काही प्रतिसृष्टी निर्माण केली आहे - जशी लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधे मिळते किंवा जीएंच्या प्रदीर्घ कथानकांमधून शिल्पकाम केल्याचे प्रत्ययास येते - तसं काही दिसत नाही.

अर्थात, काळाबद्दल जसं "काळ क्रूर असतो" किंवा "काळाने जुन्या जखमा बुजतात" अशा स्वरूपाची विधानं ऐकतो , त्याप्रमाणे काळ "इज नॉट विदाउट अ सेन्स ऑफ आयरनी" असं म्हणायला हरकत नाही. ग्रेस सत्तरी ऐंशीमधे वलयांकित होते. त्यांच्या प्रतिभेला नवनवे धुमारे फुटत होते. तरुण पिढी त्यांच्या कविता गाण्यांबद्दल बेहोश होती, ओठाओठांवर गाणी खेळत होती , या सार्‍या दरम्यान साहित्य अकादेमीला त्यांची आठवण झाल्याचे स्मरत नाही. आज "आउट ऑफ द ब्लू" कुणी न ऐकलेल्या एखाद्या रीसायकल्ड शीर्षकाच्या संग्रहाला राष्ट्रीय पारितोषिक मिळते. म्ह्ण्टलं ना , काळाचा विनोद कधीकधी असा विचित्र असतो !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

ग्रेसच्या चाहत्यांना या बातमीचा आनंद होणं स्वाभाविक आहे, पण ज्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे ते कसं आहे? कुणी ते वाचलं आहे का? मला स्वतःला त्यांच्या 'चर्चबेल' आणि 'चंद्रमाधवीचे प्रदेश' काळातलं काही गद्य-पद्य लिखाण विलक्षण ताकदीचं वाटतं, पण अलीकडच्या काळात जे सुटंसुटं वाचलं होतं (उदा: दिवाळी अंकांतल्या कविता किंवा वृत्तपत्रांतली सदरं) त्यात काहीशी पुनरावृत्ती जाणवली होती. त्यामुळे नवं पुस्तक घेऊन वाचावं असं वाटलं नव्हतं. प्रस्तुत पुस्तक कुणी वाचलं असेल तर त्याविषयीचा अभिप्राय हा त्यामुळे वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समयोचित व सम-दृष्टी लेखन मुसु.. धन्यवाद.. !!

वाचून कमी, ऐकून अधिक माहित आहेत ग्रेस.. चंद्रकांत काळे व माधुरी पुरंदरे ह्यांचा 'साजण वेळा' कार्यक्रम एक उत्कट अनुभव, व आपण म्हणालात तसे अर्थातच हृदयनाथांच्या चाली.. व खुद्द ग्रेस ह्यांचे काही कार्यक्रम.. काही छोट्या भेटी इत्यादी.. बस.. एवढेच ग्रेस ऐकलेत.. पण कणाकणाने आठवत राहते त्यांची कविता.. काही दिवसान पूर्वी त्यांना दिनानाथ हॉस्पिटलच्या कॉरीडोर मध्ये अस्वस्थ येरझा-या घालताना पाहिले.. घर थकलेले संन्यासी . काय वाटत असेल नक्की ह्या लोकांना पुरस्कार इत्यादी मिळाल्या वर काय माहित.. पण बहुधा आनंद वगेरे होत असावाच.. !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

आमच्यासारख्या सामान्यांना कळणारी त्यांची गिते/कविता गाजल्या, बाकी लेखन अस्मादिकांच्या आस्वादमगदूरहीनतेमुळे अगम्य गमते, कदाचित आधी पुरस्कार न मिळाल्याच्या उदासपणात त्यांच्याकडून विशेष कलाकृती घडली नसावी पण आता मिळाल्याच्या आनंदात सुर्यसवितेचा प्रदेश वगैरे थोर काव्यसंग्रह येण्यास हरकत नसावी.

त्यांच्या अभिनंदनाप्रित्यर्थ चार ओळी -

शब्दांनी हरवुन जावे, शब्दांचा होता घोळ
ही सांज नशेची वेळ, प्याल्याच्या कलत्या छाया...

ते दुर्बोध शब्द होते कि कंदिल धुरकट होता
शब्द मराठी तरीही अर्थ अनवट, वारुणी तीच तरीही घोट कडवट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेस यांच्या कविता छानच असतात.
खास करुन चंद्रमाधवीचे प्रदेश अप्रतिम आहे

माझ्यामते साहित्य अकादमी पुरस्कार हा लेखकाच्या कामगिरीसाठी दिला जातो.
त्यासाठी एखादे पुस्तक हे निमित्तमात्र ठरते.

शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे याबाबत उत्तम उदाहरण ठरावे. त्यांचे नटसम्राट व विशाखा दोन्ही सारखेच गाजले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>माझ्यामते साहित्य अकादमी पुरस्कार हा लेखकाच्या कामगिरीसाठी दिला जातो.
त्यासाठी एखादे पुस्तक हे निमित्तमात्र ठरते.

साहित्य अकादमीतर्फे अधिकृतरीत्या घेतली जाणारी भूमिका अशी आहे: भाषा सन्मान किंवा फेलोशिप हे लेखकाला त्याच्या एकंदर कामगिरीवरून दिले जातात, तर ग्रेसना आता मिळालेला अकादमी पुरस्कार हा विशिष्ट पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार आहे. अधिक माहिती इथे मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझी माहिती ऐकीवच होती. त्यात नेमका दुवा देऊन आपण भर टाकल्याबद्दल धन्यवाद. Smile
एखाद्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी मिळत असेल तर ते पुस्तक तितक्याच ताकदीचे असावे.

ग्रेस यांचे हे पुरस्कारप्राप्त पुस्तक अवश्य वाचेन

अवांतरः तुमचे नाव चिंतातुर जंतु का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या निमित्ताने तरी दुर्बोध साहित्य वाचण्याचा प्रयत्न होईल.
साहित्य अकादमी साधारणतः नोबेल समितीसारखी वागते का? अनेक शास्त्रज्ञांना शोध लावल्यानंतर काही दशकांनी पुरस्कार मिळाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@-म्ह्ण्टलं ना,काळाचा विनोद कधीकधी असा विचित्र असतो !... >>> पूर्ण सहमत... अतिशय अर्थपूर्ण शेवट केलात लेखाचा...

@-१)त्यांच्याबद्दलच्या एका पुस्तकाचे नावच मुळी "ग्रेस आणि दुर्बोधता" असे आहे.२)या सार्‍या निर्मितीतून,भरभरून बोलण्यातून ग्रेस अधिकाधिक दुर्बोधतेच्या धुक्यात गुरफटलेले जाणवत राहिले.>>>

>>

अवांतर-हे मी त्यांच्यावर होणार्‍या दुर्बोधतेच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणुन दिलेले नाही,,, फार तर त्यांचेच स्पष्टिकरण इथे मांडले असे म्हणा... कारण मी ग्रेस यांचा चाहाता आहे,भक्त नाही...म्हणुन हा खुलासा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

सुसंस्कृत समाजाची साहित्य-कला ही एक भूक असते आणि समाजाने म्हणजेच त्या समाजाचे ज्या संघटनेकडे नेतृत्व असते त्याने विविध कलांना उत्तेजन देणे क्रमप्राप्त असते. मग ज्या लेखकाला/कलाकाराला त्या उत्तेजनापोटी मिळालेला तो पुरस्कार काय मोलाचा वाटतो या पेक्षा त्यामुळे त्याच्या साहित्य-कलेवर प्रेम करणार्‍यांना त्यामुळे किती आनंद झाला हे पाहणे (मला वाटते) महत्वाचे ठरावे. ज्ञानपीठ पारितोषिक हे जसे त्या व्यक्तीने साहित्यक्षेत्रातासाठी दिलेल्या सेवेबाबत कृतज्ञतेची पावती ठरते, तद्वतच 'साहित्य अकादमी' त्या त्या भाषेतील कलाकृतीबद्दल प्रदान करण्यात येते. या दोन्हीमुळे (च) तो साहित्यिक उच्चकोटीच्या दर्जाचा ठरतो असे मानण्याचे बिलकुल कारण नाही. अकादमीचा मराठी साहित्याबाबतचा या विषयातील मागोवा घेतल्यास 'ग्रेस' सारख्या मराठी कवितेतील एक दुर्मिळ 'जेम' असलेल्या विलक्षण कविला या पुरस्कारासाठी तब्बल ५० वर्षे लिखाणात काढावी लागल्याने त्याना या पारितोषिकाच्या बातमीने आनंद होण्याखेरीत कटुताच वाटली, जी दिनानाथ हॉस्पिटलच्या बेडवरून दिलेल्या धावत्या मुलाखतीत प्रकट झालेली दिसतेच ~ “I have been writing for 50 years. Why didn’t anyone come for reactions to me for so many years? What has the award changed?” ही त्यांची भावना पुरेशी बोलकी आहेच.

गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या सर्वार्थाने ज्येष्ठ असलेल्या साहित्यिकाच्या अगोदर 'नामदेव कांबळे' याना हे साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळते, तर ग्रेस यांच्या अगोदर राजन गवसला. म्हणजेच नेमकी कोणती चाळणी लावली जाते या पुरस्कारांसाठी, तो एक संशोधनाचा विषय होईल. शिवाय त्या त्या भाषेत तो तो लेखक आपल्या कोणत्या लिखाणपद्धतीने सुपरिचित आहे याकडेही दुर्लक्ष. मर्ढेकरांना मिळतो तो त्यांच्या कवितेबद्दल नाही तर सौंदर्यशास्त्राबाबत तर कथालेखनात अग्रेसर नाव असलेल्या विजया राजाध्यक्षांना लाभतो तो त्यानी मर्ढेकरांवर लिहिलेल्या समीक्षेला; नेमाड्यांना 'कोसला' बद्दल नाही तर 'टीकास्वयंवर' बद्दल. याच तालावर ग्रेसना 'चंद्रमाधवीचे प्रदेश' किंवा 'राजपुत्र आणि डार्लिंग' बद्दल नव्हे तर ललित लेखन 'वार्‍याने हलते रान' बद्दल. जे त्यानी रविवारच्या वर्तमानपत्राच्या तत्सम साप्ताहिक आवृत्तीत प्रकाशनला दिलेल्या लेखातून निर्माण झालेले पुस्तक, जे अजून ग्रेसप्रेमींच्या हातीही आले नसेल. [मी यातील दोनचार फुटकळ लेख वाचलेत, पण एकत्रित नाहीच.]

पण असो. या निमित्ताने आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या 'ग्रेस' चे नाव तरी काही दिवस सर्वांच्या समोर येत राहील. नेमाडेसारखे टीकाकार ग्रेस आणि जी.ए. याना 'दोघेही दुर्बोध लिहितात' असे म्हणत जुमानत नाहीत. नेमाडेसम टीकाकारांच्या मते, "जीए लिहितात ते मोठ्यांच्या ;चांदोबा, गुलबकावलीसाठी तर ग्रेस यांचा प्रकार मॉडर्निस्ट टेंडन्सी, म्हणून त्यांच्या कवितांपासून आनंद मिळत नाही", त्यांची अशी मते तो त्यांचा अधिकार आहे. पण एक सामान्य वाचक म्हणून मला जितके जी.ए. जवळचे वाटतात तितकेच ग्रेसही. कवि म्हणून त्यांच्या लिखाणाचा आढावा घेण्यासाठी माधव आचवल आणि विजयाताई यांच्यासारखीच प्रतिभा अंगी असणे आवश्यक आहे. [या संदर्भात आजच्या पिढीत ती ताकद अरुणा ढेरे, मिलिंद बोकील आणि मोहिनी गजेन्द्रगडकर यांच्याकडे निश्चित आहे. अरुणा जरूर "ग्रेस" या विषयावर येत्या काही दिवसात भरभरून लिहिल असा पक्का विश्वास आहे.]

पॉप्युलरच्या रामदास भटकळांनी १९६७-६८ साली 'नवे कवी, नवी कविता' ही मालिका संकल्पना आपल्या प्रकाशनातर्फे राबविण्याचे ठरविले आणि त्याचे पहिले मानाचे पान त्यानी दिले ते 'ग्रेस' यांच्या 'संध्याकाळच्या कविता' या संग्रहाला. मी तर म्हणेन केवळ याच संग्रहाने ती मालिका पुढे यशस्वी झाली आणि मग पाठोपाठ ना.धों.महानोर, वसंत सावंत, वसंत गुजर, पुरुषोत्तम पाटील अशी एक समृद्ध रेषा तयार झाली (वर मुसु लिहितात त्याप्रमाणे यात रजनी परुळेकर होत्या काय, याबाबत साशंक आहे, पण असो.)
"संध्याकाळच्या कविते" नंतर ग्रेस आणि त्यांचे मित्र सुभाष अवचट यानी कविता आणि कवितेच्या भावनेची रेखाटने यांची जादू रसिकावर घातली जी आज ४० वर्षानंतरही कायम आहे. जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस : "इन्ग्रीड बर्गमन" ही त्या दोघांच्या हृदयातील एक हळवा कोपरा. कधीतरी जीएंनी तिच्यावर आपल्या लेखणीची जादू चालविण्याचे पाहण्यास मिळावे असे मला वाटत असे, ते शेवटी राहिलेच. आमचे भाग्य थोर, यासाठी की यांच्या साहित्याच्या आनंदात, ज्यासाठी त्यांचे नाव मराठी भाषेत कायमचे कोरले जाईल, आम्ही न्हावून निघालो.

या दोन प्रतिभावंत पत्रमित्रांना कॅन्सरने गाठले. एक रस्ता संपला तरीही कधी न संपणार्‍या प्रवासाची कथा सांगत पुढे गेला आहे, तर दुसरा त्याच प्रवासाची कथा कवितेच्या रुपात अजूनही लिहित राहिल अशी प्रार्थना करणेच आपल्या हाती आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>नेमाडेसारखे टीकाकार ग्रेस आणि जी.ए. याना 'दोघेही दुर्बोध लिहितात' असे म्हणत जुमानत नाहीत. नेमाडेसम टीकाकारांच्या मते, "जीए लिहितात ते मोठ्यांच्या ;चांदोबा, गुलबकावलीसाठी तर ग्रेस यांचा प्रकार मॉडर्निस्ट टेंडन्सी, म्हणून त्यांच्या कवितांपासून आनंद मिळत नाही", त्यांची अशी मते तो त्यांचा अधिकार आहे.

नेमाड्यांची ही अशी शेरेबाजी ही 'विशिष्ट सामाजिक/राजकीय भूमिका न घेणारे सर्व तुच्छच' अशा त्यांच्या तुच्छतावादी दृष्टीतून आलेली असावी असं वाटतं. सुसंबद्ध समीक्षेतून सकारण टीका करायला कुणाचीच हरकत नसावी, पण असली एकारलेली शेरेबाजी मात्र समीक्षक म्हणून नेमाड्यांचंच स्थान डळमळीत करते असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साहित्यिकांचे साहित्य व त्यांच्या मुलाखती यांचे वर्णन साधारण लज्जतदार चहा आणि खाली राहिलेली भुकटी असे मला करावेसे वाटते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चहा आणि शिल्लक राहिलेली भुकटी हा प्रकार मराठी साहित्याला अजिबात नवखा नाही. "ईरेला पडलो तर मीदेखील फाडीन त्याला मुलाखतीत बच्चमजी !" असाच आविर्भाव जवळपास प्रत्येक पिढीतील साहित्यिकांनी बाळगला असल्याने अगदी रविकिरण मंडळाच्या स्थापनेपासूनची ही "चहा-भुकटी" रीत अव्याहतपणे चालू राहिल्याची साहित्य परंपरेचा इतिहास सांगतो. आचार्य अत्रे याना या प्रकारच्या वावटळीचे अध्वर्यू नि:संशय मानले जाते. त्यानी अशा बेधडक मुलाखतींचा पायंडा पाडला होता व आपल्या लेखणी आणि वाणीने साहित्यबाबतच्या त्यांच्या व्याख्येत न बसणार्‍यांची त्यानी गय केली नाही, निर्दयतेनेच वागविले. मग कुठेतरी त्यांच्या विधानाला काटशह देणारे क्षीण प्रकारही झाले पण अत्र्यांच्या मुलुखमैदानासमोर बिचारी पटवर्धनी लवंगी फटाकी फुसकीच ठरल्याचे अंती सिद्ध झाले.

शिवाय ४० ते ८० ही चार दशके वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांनी साहित्यचर्चेसाठी ठेवली असल्याने तेसुद्धा हरेक साप्ताहिकात अशाच चमचमीत मिसळी वाचकांना देण्याचा प्रयत्न करणारच. शिवाय 'ललित', 'अभिरुची', 'अस्मितादर्श', आणि अन्य प्रादेशिक मुखपत्रेही 'चहा' पेक्षा 'भुकटी' वर मुद्दाम जोर देत असतच.

ज्या 'ग्रेस' वरून ही चर्चा इथे सुरू झाली त्याच ग्रेसना त्यानी नावारुपाला आणलेल्या "युगवाणी" मध्ये तर काय थोडा त्रास झाला होता ? घाणेरड्या जातीय राजकारणाला वैतागूनच त्याना संपादकपदाचा राजिनामा द्यावा लागल्याचा त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास सांगतो. 'संदर्भ' चालू केले पण ते बाळ आईच्या पोटातच कसे मरेल हे पाहणारी नतद्रष्ट मंडळी सांप्रत त्यांच्याच गावात होती. त्याबाबतची भुकटीही त्यांच्याविरूद्ध असणार्‍याना खूपच लज्जतदार भासली होती.

कोणत्याही कारणाने का असेना पण जी.ए.कुलकर्णी यानी "कडेमनी कंपाऊंड" हे आपल्या घराचे नाव धारवाडमध्ये अगदी यथार्थपणे व्यवहारात आणले आणि त्या कम्पाऊंडच्या मर्यादेतच केवळ लज्जतदार चहाच्या पुढे आपले नाव जाऊ दिले नाही, ते योग्यच म्हणावे लागेल.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाटीलबावा, टोपी काढली आहे. :D>

(अरेच्या, उपप्रतिसादाची सोय नाहीशी झाली वाटतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अरे वा! एखाद लेख आणि मोजक्या कविता या उप्पर काहि खास भाष्य करावे इतके ग्रेस वाचलेले नाहित.. मात्र पुरस्कार मिळाला हे ऐकून चांगले वाटले
ग्रेस यांचे अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कवि ग्रेस यांचे अभिनंदन!

उशीरा का होईना साहित्य अकादमीला त्यांची आठवण झाली म्हणायची! कदाचित कोणाच्या तरी लक्षात आलं असेल, की अरे या कविला पुरस्कार द्यायचा राहिलाय वाटतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री.रमताराम यानी दिलेला "टोपी काढली आहे" हा प्रतिसाद वाचून त्याबद्दल त्याना आभाराची एक ओळ लिहावी असे मनात असतानाच नेमका पुण्यात मुलाच्या घरी 'रविवार लोकमत' चा आजचा अंक आणि त्यासोबतची पुरवणी आली. योगायोगाने याच पुरवणीमध्ये कवि ग्रेस यांची साहित्य अकादमी पुरस्कारासंदर्भात एक प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाल्याचे दिसले. ती वाचली. इथे प्रदर्शित झालेल्या काही मतांच्या अनुषंगानेच ग्रेस यांची या विषयाबाबतची मतधारणा असल्याने या निमित्ताने इथे प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि विषयाची आवड आहे, मात्र वाचनमात्र राहिलेल्या, सदस्यांसाठी त्या मुलाखतीची लिंक इथे देत आहे. सडेतोड मते मांडली आहेत ग्रेस यानी, ती कदाचित काहींच्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे म्हणून हा लिंक देण्याचा प्रयास.

कवि ग्रेस - पारितोषिक प्रतिक्रिया

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुव्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुर्बोध आणि निरर्थक यामधील सीमारेषा एवढी धूसर असते हे मला त्यांचे लेखन वाचूनच पहिल्यांदा जाणवले. (हि भावना नंतर दृढ झाली श्याम मनोहरांचे लेखन वाचून) SmileSmile
असो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल महराष्ट्र साहित्य पत्रिकेचा नवीन अंक (ऑ-डि २०११) आला; त्यात शंकर सारडाचा 'बोक्या सातबंडेचे यश' असा लेख वाचला. मालिकेची छान ओळख आहे, पण दिलीप प्रभावळकरांना नुक्ताच जाहिर झालेला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे गेल्या वर्षी हा पुरस्कार अनिल अवचटांच्या "सृष्टीत...गोष्टीत" पुस्तकाला मिळाली होती, ही नवीन माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आताच हाती आलेल्या बातमीनुसार, एका तासापूर्वी ग्रेस यांचं पुण्यात दीनानाथ हॉस्पिटल मधे निधन झालं. गेला काही काळ ते कॅन्सरशी लढा देत होते.

त्यांच्यामागे त्यांचे शब्द दीर्घकाळ आपली सोबत करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता !
- ग्रेस

कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रध्दंजली ..
परमेश्वर त्यांना सदगती देवो ! आमीन !!
~ वाहीदा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईट वाटले
त्यांना विनम्र श्रद्धांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणते.
अशा वेळी वाईट वाटतेच. पण लेखक मागे राहतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या साठी वेगळा धागा केला तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.