एका डेटींगची गोष्ट-भाग तिसरा

“छोट्याशा विश्रांतीनंतर आमच्या या ‘talk show” मध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिद्ध बिझनेसमनच्या आयुष्याची कहाणी त्यांच्याच शब्दांत.” अँकरच्या या शब्दांनी तो भानावर आला. खूप वर्षांपूर्वी घडलेल्या त्या डेटची गोष्ट तो आज सगळ्यांसमोर सांगत होता. “हं , तर सर , तुम्ही असे हॉटेलचा दरवाजा जवळजवळ ढकलतच आत पोचलात. तुमची अस्वस्थ नजर अक्ख्या हॉटेलभर फिरली. आणि पुढे? ती होती का सर तिथे?? तुमची वाट बघत ती थांबली होती का?? ” तो हसला. पुन्हा भूतकाळात गेला. क्षणभर थांबून पुन्हा वर्तमानात आला. पक्का बिझनेसमन होता तो. सगळंच काही उलगडून सांगणार नव्हताच. चारचौघात काय बोलायचं आणि किती बोलायचं याचं चांगलंच भान त्याला तेव्हाही होतं आणि आज इतक्या वर्षानंतर तर ते अजुनच पक्कं झालं होतं. तो म्हणाला, ” तशी तर आयुष्यात मी केलेली कुठलीच ‘मिटिंग’ निष्फळ गेल्याची मला आठवत नाही. त्यामुळे ती ‘मीटिंग’ सुद्धा… तो अर्थपूर्ण हसला. फक्त त्या दिवशी, ‘मिनिट्स ऑफ मिटिंग” काढायचे राहून गेले. आणि हे म्हणतानाच, त्याला जाणवलं “अरे अजूनही आपण त्या डेट ला मिटींगच म्हणतो. तिला हे अजिबात आवडत नाही खरंतर. चालायचंच मूळ स्वभाव बदलता येत नाहीच म्हणा.” “म्हणजे सर ती डेट सक्सेसफुल झाली म्हणायची तर!!” तो पुन्हा हसला आणि म्हणाला,” प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘डेट’ असते अशी नवीन म्हण काढायला काही हरकत नाही…”
तिने tv बंद केला. बेडरूममध्ये जाऊन कपाटात ठेवलेली डायरी काढली. तसं बऱ्याच दिवसांनी त्याने डेटची आठवण काढलेली. तिथेही तो डेटला ‘मीटिंग’च म्हणाला, नाही म्हटलं तरी तिला लागलंच ते. आताशा सवयही झाली होती. त्याचं काम आणि त्याच्या कामाच्या टर्मिनोलाॅजिस यांना ती सरावली होती. तिने डायरी उघडली. त्या पानात नेहमीच बुकमार्क ठेवलेला असायचा. कारण त्या पानापाशीच तिच्या आयुष्यातला एक चाप्टर संपून दुसरा सुरु झाला होता. मनातल्या मनात ती डायरीमधला मजकूर वाचू लागली. “कळत नव्हतं काय करावं, थांबावं कि निघावं. नात्यांबाद्द्ल विचार करायला लागले. नातं टिकवायचं म्हणजे तडजोड आलीच. नाती असतात बॅलंसशीट सारखी. अॅसेट आणि लायबिलीटीजचा खेळ. त्याच्या ज्या गोष्टी आवडत नाहीयेत त्यात प्रेमाची अॅडीशन करायची आणि तरीही हिशोब कधी मागाय्चाही नाही आणि चुकताही करायचा नाही. जमेल का आपल्याला हे?? इतक्यात त्याच्याशी नजरानजर झाली. तो आवेगाने समोरच्या खुर्चीवर येउन बसला. बरचसं काही बोलला. नेहमीसारखा तोच बोलला पण आज नुसता स्वतःबद्दल नाही तर ‘दोघांबद्दल’ बोलत होता. त्या बोलण्यातून मला तो आणि त्याला मी जास्त समजत गेले. त्या ‘डेट’ने आमच्या नात्याचा पाया घातला. उशीरा येऊनही त्याने ‘मीटिंग’ सक्सेसफुल केलीच.” तेव्हापासून मी ही डायरी लिहिते. ज्या दिवशी तो कामाला जास्त वेळ देतो तेव्हा या डायरीची बॅलंसशीट करते आणि त्याच्यावरच्या प्रेमाला अॅसेटमध्ये घालून बॅलंस करते. आणि जेव्हा तो मला खूप सारा वेळ देतो तेव्हा पुन्हा या डायरीत ती आठवण लिहून ठेवते. कदाचित म्हणूनच जशी वर्षं सरत गेली तशी त्याचा बिझनेस आणि आमचं नातं प्रगल्भ होत गेलं. इतक्यात तिचा मोबाईल वाजला. ” डीअर, आज रात्री आपण डीनरला जातोय. मी घरी पोहोचेन तोवर तयार हो.” तिने डायरीत आजची तारीख लिहिली. प्रसन्न हसली. आणि त्याच उत्साहाने तयारीला लागली. ‘ती’ डेट आणि आजची ‘डेट’ . वर्षं उलटली तरी उत्साह कायम होता. फरक इतकाच होता. आज टेबल त्याने बुक केलं होतं, साडी त्याने आणली होती आणि वेळ तो पाळणार होता. इतका सारा बदल. कारण अर्थातच आता ती बायको होती आणि तो नवरा. आणि त्याला हे मनोमन पटलं होतं कि “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक ‘डेट’ असते .”

(समाप्त)

-अभिषेक राऊत

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अ-प्र-ति-म!!! फार सुंदर अंत केलात अभिषेक. खूप मस्त. लिहीत रहा. असेच सकस लिखाण येऊ द्यात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...