स्पेनचे ओझरते दर्शन - भाग १. टोलेडो, एल ग्रेको आणि भवानी तलवार.

अलीकडे स्पेनमधील टोलेडो ह्या ऐतिहासिक शहराला एक दिवसाची भेट दिली तिचा हा थोडक्यामध्ये वृत्तान्त.


टोलेडो हे सुमारे ८०,००० वस्तीचे ऐतिहासिक शहर स्पेनची राजधानी माद्रीदपासून सुमारे ७५ किमी अंतरावर दक्षिणेकडे आहे आणि आमच्या टूरिस्ट बसला माद्रीदच्या मध्यभागातून तेथे पोहोचायला तासभर लागला. तीन बाजूंनी तागुस नदीने वेढलेले हे गाव टेकडयांवर वसलेले आहे् आणि त्यामुळे शत्रूंपासून बचाव करण्यास सोपे आहे. सर्वप्रथम टोलेडोच्या इतिहासाकडे थोडी नजर टाकू.

रोमन काळापासून येथे काही ना काही सैन्याची छावणी असल्याचे पुरावे मिळतात. तार्शिश ह्या नावाने ज्यू इतिहासात ओळखले जाणारे शहर वा प्रदेश हा आजचा स्पेन असून प्राचीन इस्रायलमधून हाकलले गेलेले ज्यू मोठया प्रमाणात आजच्या स्पेनमध्ये वस्ती करायला आले आणि टोलेडोमध्ये रोमन काळापासून मोठया संखेने ज्यू वसाहत होती अशी समजूत आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून रोमन साम्राज्याचा ह्रास होऊ लागला आणि युरोपात रोमन सत्ता झुगारून वॅंडल, विजिगॉथ, ऑस्ट्रोगॉथ, फ्रॅंक अशा अनेक जमातींनी आपापल्या सत्ता निरनिराळ्या भागात निर्माण केल्या. त्यांपैकी विजिगॉथ लोकांनी टोलेडो ही राजधानी करून आसपासच्या प्रदेशात आपला जम बसवला. एव्हांना रोममध्ये ख्रिश्चन धर्म दृढमूल झालेला असल्यामुळे ह्या जमातींनीहि तो धर्म स्वीकारला होता. विजिगॉथ जमात तिच्या रेकारेड पहिला (५८६-६०१) ह्या राजाच्या काळात कॅथलिक पंथामध्ये आली पण तत्पूर्वी ख्रिश्चन धर्माच्या ’आरियन’ ह्या नंतर पाखंडी मानल्या गेलेल्या पंथामध्ये होती. तदनंतर आफ्रिकेमधून उत्तरेत आलेल्या, अरबी बोलणार्‍या बर्बर लोकांची सत्ता अल्-अंदालुस ह्या नावाने स्पेनमध्ये निर्माण झाली. त्यांना मूर असे ओळखले जाते. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते इसवी सन ७११ मध्ये उत्तर आफ्रिकेमधून आलेल्या आणि इस्लाम मानणार्‍या मूर लोकांकडून पराभूत होईपर्यंत विजिगॉथ सत्ता टोलेडोमधे होती. इ.स. ७११ पासून इ.स. १०८५ मध्ये अल्फोन्सो सहावा ह्याने टोलेडो शहर मूर राज्यकर्त्यांकडून जिंकून घेतले. मूर सत्तेला येथे पहिले ग्रहण लागले आणि पुढच्या चारशे वर्षांमध्ये तिचा ह्रास होत गेला. अखेरीस १४९२ मध्ये फर्डिनंड-इझाबेला ह्यांनी ग्रेनाडा जिंकल्यावर ७८० वर्षांचे मूर राजकीय अस्तित्व संपले. ह्या काळापर्यंत स्पेनमध्ये कोठलीच एकसंधी सत्ता नव्हती. कास्तिल, आरागॉन, गॅलिशिया, लेऑन अशा लहानलहान राज्यांमध्ये देश विभागलेला होता. आरागॉनचा फर्डिनंड आणि कास्तिलची इझाबेला ह्यांच्या विवाहानंतर आणि त्यांनी शेवटच्या मूर अमीराचा पराभव केल्यानंतर त्यांच्या वंशाकडे सत्ता केन्द्रित होऊ लागली आणि आधुनिक स्पेनची निर्मिति होऊ लागली. कोलंबसला अटलांटिकच्या पलीकडे जाण्यासाठी पाठिंबा देणारे हेच दोघे. (ह्यांची एक मुलगी आरागॉनची कॅथेरिन ही सहावा हेन्री ह्याची क्र. १ ची पत्नी आणि हिच्याकडून घटस्फोट द्यायला पोपने नकार दिल्यामुळे हेन्रीने पोपचे वर्चस्व झुगारून देऊन प्रोटेस्टंटिझमचा पाया इंग्लंडमध्ये घातला.)

रोमच्या पतनापासून १५व्या शतकापर्यंतचा युरोपातील काळ हा पोप आणि त्याचे धर्माधिकारी ह्यांच्या सर्व ज्ञानाची कवाडे बंद ठेवण्याच्या सवयीमुळे युरोपचे अंधारयुग मानला जातो. स्पेनमधील मूर राज्य ह्याच दिवसांत आपला सुवर्णकाल उपभोगीत होते. इस्लामचा प्रागतिक चेहरा ह्या काळात दिसून येतो. येथे मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन कमीअधिक सलोख्यामध्ये राहात होते. राज्यकर्त्यांना स्थापत्य, कला, नवनवे ज्ञान ह्यांमध्ये स्वारस्य होते. त्यांनी बांधलेल्या वास्तु - उदा. अल्हांब्रा प्रासाद - अजूनहि उभ्या आहेत. इस्लामी विद्वानांनी प्राचीन ग्रीक आणि लॅटिनमधील ज्ञान अरेबिकमध्ये भाषान्तर करून घेतले होते. हिंदुस्तान आणि चीनशीहि ते संपर्क ठेवून होते. ह्या संचित ज्ञानाचा लाभ घेऊन टोलेडोमध्ये १२व्या आणि १३व्या शतकात ज्यू विद्वानांच्या माध्यमामधून ते ज्ञान प्रथम कास्तिलिअनमध्ये - कास्तिल ह्या स्पेनच्या भागाची भाषा, इसाबेला ही कास्तिलचीच राज्ञी होती - आणि तेथून लॅटिनमध्ये भाषान्तरित होऊन युरोपात पसरले आणि तेथील अंधारयुग संपण्याला टोलेडोमध्ये झालेल्या कामाचा मोठा हातभार लागला. आपल्या Liber Abaci ह्या पुस्तकात फिबोनाची ज्याला Modus Indorum (the method of the Indians) असे म्हणतो ती आकडे लिहिण्याची युरोपला माहीत नसलेली नवी युक्ति त्याला आपल्या व्यापारी प्रवासात मूर व्यापार्‍यांकडून शिकायला मिळाली. (फर्डिनंड-इझाबेला ह्यांचे राज्य निर्माण झाल्यावर सहनशीलतेचा हा इतिहास संपला आणि कुप्रसिद्ध ’इन्क्विझिशन’च्या काळ्या छायेखाली इन्क्विझिशनला मान्य असलेले कॅथलिक वगळता बाकी सर्वांना - म्हणजे मुस्लिम मूर, ज्यू, प्रॉटेस्टंट, ल्युथेरन आणि अन्य पाखंडी - स्पेनमधून हाकलून लावण्याची अथवा त्यांना सार्वजनिक उपस्थितीत जिवंत जाळण्याची प्रथा पडली. ह्याला Auto da Fe - Act of Faith - म्हणत असत. ज्यू आणि मूर लोक स्पेनच्या इतिहासातून बाहेर फेकले गेले आणि युरोपीय संस्कृतीसाठी पुढील ४०० वर्षांसाठी खलनायक ठरले.)

उपलब्ध वेळात आता टोलेडो नगरदर्शन करू. हे जुने ऐतिहासिक शहर टेकडीवर वसलेले असल्यामुळे अशा अन्य शहरांप्रमाणे येथेहि बहुतेक रस्ते अरुंद, दगडात बांधलेले (cobbled) आणि चढउताराचे आहेत. त्यांच्यावरून मला इस्तनबूलची आठवण झाली कारण तेथेहि जुन्या भागात रस्ते असेच आहेत. अशा अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने २-३-४ मजल्यांची घरे आपापल्या मजबूत लाकडी दरवाज्यांमागे उभी आहेत. अनेक घरांना घराच्या मध्यभागी उजेड आणि हवा खेळती राहण्यासाठी आपल्याकडच्या वाडयांसारखे चौक बांधलेले आहेत. डोळे मिटून कल्पना केली तर मध्ययुगातील धार्मिक युद्धे. कत्तली आणि लूटमार ह्याच रस्त्यांवर कशी झाली असेल असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ह्या घरांमध्ये आणि रस्त्यांमध्ये १९व्या शतकाच्या मानाने विशेष फरक झाला आहे असे वाटत नाही. तुलनेसाठी १९व्या शतकातील रस्त्याचे चित्र खाली पहा.




विजिगॉथ काळापासून टोलेडो हे स्पेनचे प्रमुख धर्मस्थान आणि स्पेनच्या आर्चबिशपचे निवासस्थान राहिलेले आहे आणि आजहि ती स्थिति चालू आहे. अल्फोन्सो सहावा ह्याने मूर सत्ताधार्‍यांकडून टोलेडो जिंकून घेतले तेव्हा तेथील मुस्लिम समाजाच्या मशिदीला अभयवचन दिले होते. ही मशीद विजिगॉथ काळातील ५व्या-६व्या शतकातील चर्चच्या जागी ते चर्च पाडून उभी करण्यात आलेली होती. आता टोलेडो पुन: ख्रिश्चनांच्या ताब्यात आल्यावर अल्फोन्सोच्या अनुपस्थितीत त्याची राणी कॉन्स्टन्स आणि आर्चबिशप बर्नर्ड ह्यांनी बळजबरीने मशिदीचा ताबा घेतला आणि तिचे ख्रिश्चन चर्च केले. ( येथे इस्तनबूलमधले आया सोफ्या - Hagia Sophia - चर्च ताब्यात घेऊन ऑटोमनांनी त्याची मशीद केली हे आठवते.) पुढची सव्वाशे वर्षे हीच स्थिति चालू राहिली पण १२२७ मध्ये जुनी मशीद पूर्ण पाडून तिच्या जागेवर आर्चबिशपचे कथीड्रल-देऊळ उभारण्याचे काम सुरू झाले. त्याचे बांधकाम पुढची अडीचशे वर्षे चालूच होते. गॉथिक शैलीत बांधलेले आणि १७८ गुणिले ३८५ फूट अशा आकाराचे हे देऊळ भव्य म्हणता येईल असे आहे आणि अशा इमारतींच्या आणि कॅथलिक पंथाच्या पद्धतीने दीडदोन मीटर व्यासाचे अनेक दगडी स्तंभ, त्यांच्यावर तोलून धरलेला ११६ फूट उंचीवरचा घुमट, संतांची, पानाफुलांची, प्राण्यांची दगडात कोरलेली शिल्पे, बायबल कथा सांगणार्‍या रंगीत तावदानांच्या साडेसातशे खिडक्या, ठिकठिकाणी कमीअधिक प्रख्यात कलाकारांनी काढलेली आणि बायबलकथा सांगणारी चित्रे अशांनी खचाखच भरलेले आहे. मूर कामगार ह्या कामावर लावलेले असणारच कारण अनेक बाबीत, विशेषत: फळाफुलांच्या कोरीव कामात मूर शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. येथील प्रमुख प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे त्यामध्ये सहाव्या शतकातील विजिगॉथ काळातील आर्चबिशप सेंट इल्देफोन्सो ह्याला कुमारीमाता मेरीने स्वत: स्वर्गातून खाली उतरून आर्चबिशपची वस्त्रे - chasuble - देऊ केली ह्या रूढ आख्यायिकेचे चित्रीकरण दिसते. ह्या चित्रणाच्या खाली प्रवेशद्वाराचे दोन विभाग करणार्‍या स्तंभावर येशूचे शिल्प आहे आणि त्याच्या दोन बाजूंना भिंतीवर त्याचे सायमन/पीटरसारखे बारा जवळचे शिष्य, ज्यांना प्रभूने येशूच्या संदेशाचा जगात सर्वत्र पोहोचविण्याचे काम दिले होते असे apostles दिसतात. प्रवेशद्वाराच्या डावीकडे २९५ फूट उंचीचा गॉथिक शैलीत बांधलेला मनोरा आहे. दोन टन वजनाची घंटा ह्या मनोर्‍यावर चढविली आहे. देवळाच्या आत स्पेनच्या राजघराण्यातील मृतांची दफनस्थाने आहेत. देवळामधील सर्वात पवित्र जागा म्हणजे tabernacle. त्यामधील पूजापात्रे अमेरिकत स्पॅनिश वसाहती निर्माण झाल्यावर तेथून आणलेल्या पहिल्या सोन्यामधून बनविलेली आहेत. देवळाच्या आतील अनेक गोष्टींमध्ये विशेष प्रसिद्ध म्हणजे मुख्य आल्टरपीस, तसेच विशेष समारंभांमध्ये वरच्या श्रेणीच्या चर्चनेत्यांच्या बसायच्या जागा - choir stalls - ह्यांचा बोलबाला आहे. आल्टरपीसमध्ये अनेक भागांमध्ये जीजसचे आयुष्य दाखविले आहे. तेथील दोन भाग - ख्रिस्तजन्म आणि क्रूसावर ख्रिस्त येथे दाखवीत आहे. चर्चनेत्यांच्या समारंभात बसायच्या जागांवर अक्रोडाच्या लाकडात कोरलेले ग्रेनाडाच्या तेव्हा नुकत्याच संपलेल्या युद्धातील कोरलेले देखावे आहेत. देवळाच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये एका बाजूस आर्चबिशपचा प्रासाद आहे आणि देवळासमोरच्या बाजूस शहराचा टाउनहॉल आहे. ह्याची उभारणी एल ग्रेकोचा मुलगा जॉर्ज मनुएल, ज्याने आपल्या पित्यापासूनच शिक्षण घेतले होते, त्याने केली आहे. त्याने पुढील चित्रांवरून ह्या वर्णनाची कल्पना येईल.






एल ग्रेको (१५४१-१६१४) - मूळ नाव Domenikos Theotokopoulos - हा चित्रकार मूळचा वेनिसच्या साम्राज्याचा भाग असलेल्या क्रीट बेटाचा रहिवासी. चित्रकला शिकून व्यवसाय करण्यासाठी तो प्रथम वेनिसला आणि नंतर १५७० मध्ये रोमला गेला. रोममध्ये मिकेलऍंजेलो सारख्यांच्या प्रभावाखाली त्याला व्यवसायात यश आले नाही म्हणून तो १५७७ मध्ये दूरच्या टोलेडोला येऊन पोहोचला. येथे त्याचा चांगला जम बसला आणि आयुष्याच्या अंतापर्यंत तो तेथेच राहिला. येथे त्याचे मूळचे नाव मागे पडून तो एल ग्रेको (The Greek) ह्या नावाने प्रसिद्ध झाला.



एल ग्रेकोचे The Burial of the Count of Orgaz हे सर्वात प्रसिद्ध चित्र टोलेडोमधील चर्च ऑफ सेंट थॉमस ह्या लहान चर्चमध्ये पहायला मिळते. १५’×१२’ अशा आकाराचे हे मोठे चित्र ह्या चर्चमध्ये एक भिंत व्यापते. चित्राखालीच चित्राचा विषय असलेल्या काउंट ऑफ ओर्गाझचे दफनस्थान आहे. चित्रामागची गोष्ट अशी की काउंट ऑफ ओर्गाझ हा एक धर्मशील मनुष्य १३व्या आणि १४व्या शतकात टोलेडोच्या एका उपनगराचा रहिवासी होता. त्याचा १३१२ मध्ये मृत्यु झाला तेव्हा आपल्या मालमत्तेमधून काहीएक रक्कम दरवर्षी तो सदस्य असलेल्या चर्च ऑफ सेंट थॉमस ह्या चर्चला मिळत राहावी अशी तरतूद आपल्या मृत्युपत्रात त्याने केली होती. त्याच्या वारसांनी ती रक्कम देणे अडवून धरले. अडीचशे-पावणेतीनशे वर्षानंतर ती सर्व तुंबलेली रक्कम चर्चला मिळाली. चर्चचा तेव्हाचा प्रमुख फादर नुन्येझ ह्याने ह्या मोठया रकमेचा योग्य उपयोग व्हावा म्हणून त्याच चर्चचा सदस्य असलेल्या एल ग्रेकोला हे चित्र काढण्याचे काम दिले आणि काउंटबद्दलची प्रचलित आख्यायिका - काउंट हा मोठा पुण्यात्मा असल्याने त्याच्या दफनामध्ये भाग घेण्यासाठी स्वत: सेंट स्टीफन आणि सेंट ऑगस्टीन स्वर्गामधून उतरून आले होते - चित्रामध्ये रंगवायला एल ग्रेकोला सांगितले.
हे चित्र दोन स्तरांवर काढलेले आहे. खालचा स्तर म्हणजे हे जग आणि वरचा म्हणजे स्वर्ग. खालच्या स्तरावर सेंट स्टीफन (डाव्या बाजूचा) आणि सेंट ऑगस्टीन (उजव्या बाजूचा) लाल-सोनेरी वस्त्रे परिधान केलेले स्वर्गातून उतरून काउंटचे पूर्ण चिलखत घातलेले मृत शरीर कबरीमध्ये जपून ठेवतांना दिसतात. आसपासच्या व्यक्ति म्हणजे तेव्हाच्या टोलेडोमधील सर्वांच्या परिचयाच्या अनेक व्यक्ति आहेत. त्यांमध्ये अगदी उजव्या हाताला काहीतरी वाचण्यात गढलेला म्हणजे फादर नुन्येझ. सेंट स्टीफनच्या सरळ वर समोर बघत असलेला स्वत: एल ग्रेको आणि डाव्या हाताकडे दिसणारा लहान मुलगा म्हणजे एल ग्रेकोचा मुलगा जॉर्ज मनुएल. त्याच्या पांढर्‍या हातरुमालावर त्याचे जन्मवर्ष १५७८ आणि एल ग्रेकोची ग्रीक नावाची सही दिसते.
वरच्या स्तरामध्ये अगदी वरती येशू, त्याच्या खालच्या पातळीवर डाव्या बाजूला कुमारीमाता मेरी आणि उजव्या हाताला एका अपुर्‍या वस्त्रात सेंट जॉन द बॅप्टिस्ट. मेरीच्या मागे हातात स्वर्गाच्या किल्ल्या बाळगणारा सेंट पीटर. उजव्या वरच्या कोपर्‍यात अन्य संत आणि बायबलमधले काही राजे आहेत. त्यांच्यामध्ये तेव्हा हयात असलेला स्पेनचा राजा फिलिप दुसरा हाहि दिसतो. मेरी आणि सेंट जॉन ह्यांच्या खाली देवदूत तान्ह्या मुलाच्या रूपातील काउंटच्या आत्म्याला उचलून येशूकडे घेऊन जात आहे.

येथून जवळच एल ग्रेकोच्या चित्रांचे संग्रहालय आहे. त्याचे राहते घर आणि त्याला जोडून बांधलेली एक नवी इमारत असे मिळून हे छोटेखानी संग्रहालय निर्माण केले आहे. त्यातील ही काही चित्रे. अखेरचे चित्र संग्रहालयाचे मूर शैलीतील एक छत.




सान्ता मारिया ला ब्लांका ह्या नावाने ओळखली जाणारी ही जागा एक मूळची ज्यू सिनेगॉग आहे. १२०३ साली स्थापन झालेल्या सिनेगॉगची इमारत १५०० वर्षांच्या ज्यू संस्कृतीच्या आता तुरळक उरलेल्या अवशेषांपैकी एक आहे. तिच्या बांधणीमध्ये मूर कारागिरी आणि ज्यू धार्मिक खुणा एकत्र मिसळलेल्या दिसतात. ३२ अष्टकोनी खांबांवर घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी आणि वरच्या बाजूस स्त्रियांसाठी प्रार्थनेची वेगळी जागा दिसते. ज्यू प्रतीक असलेले पाइनकोन्स आणि शिंपले, तसेच डेविडचा षट्कोनी ताराहि अनेक जागी दिसतो आणि ह्यावरून ही जागा ज्यू प्रार्थनास्थळ स्थळ होते हे पटते. १६व्या शतकामध्ये सर्व ज्यू स्पेनमधून बाहेर काढल्यावर हिचे रूपान्तर चर्चमध्ये करण्यात आले. नंतर कालक्रमाने ती सैनिकांची बरॅक, माल ठेवायचे गोडाऊन आणि नृत्याचा हॉल अशाहि परिवर्तनातून गेली. सध्या ती एक संरक्षित स्मारक म्हणून जतन केली जात आहे.




आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. एकच स्थळाला भेट उरली आहे. ते म्हणजे Monasterio de San Juan de los Reyes (Monastery of St John of the Kings). फर्डिनंड आणि इझाबेला ह्यांना जॉन हा मुलगा झाला त्याप्रीत्यर्थ, तसेच त्यांच्या सैन्याला पोर्तुगीजांवर ’तोरोच्या लढाई’मध्ये मिळालेल्या विजयाचे स्मारक म्हणून फ्रान्सिस्कन भिक्षूंचे निवासस्थान अशी ही इमारत १४७७ ते १५०४ ह्या काळात बांधली गेली. फर्डिनंड आणि इझाबेला ह्यांचे दफन येथेच व्हायचे असे सुरुवातीस ठरले होते पण १४९२ मध्ये ग्रेनाडाच्या विजयानंतर ७८० वर्षांची मूर सत्ता स्पेनमधून अखेरची नष्ट झाल्यावर हा विचार बदलून दफनाची जागा ग्रेनाडा निश्चित करण्यात आली. ग्रेनाडाच्या विजयानंतर तेथील तुरुंगात असलेले ख्रिश्चन कैदी सुटले, त्यांच्या अंगावरच्या बेडया त्या विजयाचे स्मारक म्हणून इमारतीच्या दर्शनी भागावर भिंतीमध्ये बसवण्यात आल्या आणि आजहि त्या तेथेच आहेत. पुढील चित्रांमध्ये त्या बेडया, इमारतीच्या आतील फर्डिनंड आणि इझाबेला ह्यांचा Coat of Arms, आल्टरपीस आणि कोरीव कामाचे नमुने आणि इझाबेला ह्यांची चित्रे आहेत.





शीर्षकातील भवानी तलवारीच्या उल्लेखाचे स्पष्टीकरण देतो. मूर संस्कृतीने टोलेडोला ज्या देणग्या दिल्या त्यामध्ये दमासीन (Damascene) पद्धतीची सोन्याचांदीवरची कारागिरी आणि तलवारीची पाती बनवण्याचे कौशल्य ह्या दोन चीजा होत्या. पैकी दमासीन पद्धतीचे दागिने अजूनहि तेथे होतात. ऑक्सिडाइझ करून काळ्या बनलेल्या धातूमध्ये सोने वा चांदी भरून कला कुसर करणे ही कला मूर लोकांनी दमास्कसहून टोलेडोमध्ये आणली. हे तन्त्र वापरून आता जगभर अनेक जागी दागिने आणि शोभेच्या वस्तु बनविल्या जातात. मूर लोकांचे दुसरे कौशल्य म्हणजे उत्तम पाणी दिलेली तलवारीची पाती बनविणे, ज्यांना Toledo Blades असे म्हणत. ह्या तलवारींना जगभर मागणी असे. जपानचा सोळाव्या शतकात युरोपशी संबंध आल्यानंतर जपानी सामुराई टोलेडोच्या तलवारींना पसंत करीत. शिवाजी महाराजांची भवानी तलवार आज कोठे आहे हा एक वादाचा विषय आहे पण ती तलवार अथवा त्यांच्या अन्य तलवारींपैकी एखादी Toledo Blade असावी असा तर्क केला जातो. आज टोलेडोच्या तलवारींना शस्त्र म्हणून मागणी नाही तरीहि टूरिस्टांचे आकर्षण म्हणून अशा तलवारी टोलेडोमध्ये दुकानादुकानातून विकायला ठेवलेल्या आढळतात. अशा तलवारींची ही चित्रे पहा.



ह्या मॉनेस्टरीपासून जुन्या गावाची पश्चिम हद्द अगदी जवळ आहे आणि तेथून गावाला तीन बाजूने वेढणार्‍या तागुस नदीचा उत्तम देखावा दिसतो. तिची ही तीन चित्र पहा. तिसर्‍या चित्रामध्ये शहराच्या दोन बाजू जोडणारा आणि १४व्या शतकाहून जुना इतिहास असलेला सेंट मार्टिनच्या नावाचा पूल पहा. उपलब्ध इतिहासाप्रमाणे येथे प्रथम नावांच्या वर बांधलेला काही पूल होता. १३व्या शतकात त्याच्या जागी पक्का पूल बांधला गेला. नंतर एका युद्धामध्ये संरक्षक उपाय म्हणून तो पाडण्यात आला पण पुन: १४व्या शतकात नव्याने बांधला गेला. १६व्या शतकात त्याची काही डागडुजी झाली पण आत्ता समोर दिसणारा पूल जवळजवळ १४व्या शतकातील आहे. त्याच्या दोन टोकांचे संरक्षक बुरूजहि त्याच काळातील आहेत. चित्रात दिसणारी तागुस नदी सुमारे १००० कि.मी. लांबीची असून स्पेनच्या पूर्वमध्य भागात उगम पावून लिस्बनबाहेर समुद्राला मिळते. येथे इतका छोटा दिसणारा तिचा प्रवाह लिस्बनपाशी किती विस्तृत आहे हे माझ्याजवळील शेवटच्या चित्रावरून दिसेल. हे चित्र मी लिस्बनला कित्येक वर्षांपूर्वी घेतलेले आहे.




पुलाच्या पलीकडल्या बाजूस आमची बस उभी असलेली दिसत आहे. टेकडी पायवटेने उतरून आम्ही पुलावरून बसकडे निघतो आणि आमचा परतप्रवास सुरू होतो.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

ओहो "ल्युसिल" गाण्यातलं "टोलेडो" हेच शहर दिसतय.
.
https://www.youtube.com/watch?v=4SDVkdcO8ts
.

In a bar in Toledo
Across from the depot
On a bar stool she took off her ring

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

गाण्यातले नाव स्पेनमधल्या टोलेडोचे नसावे. ते ओहायोमधल्या टोलीडोचे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ओके तसच जास्त ठीक वाटतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हे चित्र दोन स्तरांवर काढलेले आहे. खालचा स्तर म्हणजे हे जग आणि...तान्ह्या मुलाच्या रूपातील काउंटच्या आत्म्याला उचलून येशूकडे घेऊन जात आहे.

हे चित्राचे वर्णन अतिशय आवडले. जालावर काही झूम इन भाग सापडले.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लेख आवडला, फोटोंची निवड आवडली आणि संक्षिप्त पार्श्वैतिहासही आवडला.
लेख वाचल्यावर कालाच्या आणि भूगोलाच्या विस्तीर्ण पटावर संस्कृतींच्या स्थलकालसापेक्ष उदयास्तांविषयी काही फुटकळ विचार मनात आले.
रोमन साम्राज्याच्या पतनानंतरच्या सत्तापोकळीत काही टोळ्या आणि मूर यांची सत्तास्थाने निर्माण झाली. रोमन साम्राज्याच्या र्‍हासानंतर मूर सत्तेचे पाय रोवले जाऊन तिने सुवर्णकाळ गाठणे हे 'राव गेले आणि पंतांना बढती' ह्या स्वरूपाचे असले तरी याच काळात रोमचे धर्मपीठ (कदाचित अस्तित्वाच्या लढाईसाठी) अत्यंत कर्मठ बनले. याच कर्मठपणामुळे पुढे अंधारयुग आले आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून कॅथलिकांविरुद्ध असंतोष वाढीस लागून प्रॉटेस्टंटांचा उदय आणि विद्येचे पुनरुज्जीवन झाले. आधुनिक औद्योगिक संस्कृती उदयाला आली. पश्चिम दिशा अशी उजळत असताना भारतीय उपखंडात मात्र सूर्याचा पत्ता नव्हता. पश्चिमेत विस्तारास प्रतिबंध झाल्यावर, आणि म्हणूनच की काय, इस्लामचा रोख पूर्वेकडे वळला. १४५३ मध्ये इस्तन्बूलचा पाडाव होऊन बाय्झन्टाइन साम्राज्य संपले आणि ऑटोमन साम्राज्य उदयास आले. ९९७ मध्ये गझ्नीच्या महंमदाने पंजाब व्यापला, १०१९ मध्ये प्रतिहारांचा पराभव केला. तरी पण दिल्लीवर मुसलमानी अंमल यायला १२२६ साल उजाडले. पुढे घोरी, गुलाम, खिल्जी, तुघ्लक, लोदी, मोगल अशी अनेक घराणी झाली तरी मुसलमानी अंमल १२२६ ते १८५८ असा ६३२ वर्षे टिकला. स्पेनमध्ये मूर सत्ता ७८० वर्षे टिकली म्हणजे भारतीय उपखंडापेक्षा थोडा अधिकच काळ. पण मूरसत्तेच्या उच्चाटनानंतर प्रचंड हाल-अपेष्टा आणि धर्मछळ सोसूनही यूरोपने प्रगतीची भव्य झेप घेतली. आपल्याकडे असे सर्वंकष पुनरुज्जीवन कधी होईल? असा निषेध-विद्रोह जोमाने कधी उभा राहील?
क्रियाप्रतिक्रिया, उदयास्त, निर्वात पोकळीत बाहेरचे वारे वेगाने शिरून झंझावात निर्माण होणे अशा भौगोलिक आणि पदार्थवैज्ञानिक क्रियांनी इतिहास व्यापलेला पाहून इतिहासाच्या, भूगोलाच्या आणि वस्तुमात्राच्या जुळलेपणाचा विस्मय वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख. आवडला. आजही बर्‍याच राजकीय कार्यक्रमांची सुरुवात व्यासपिठावरील नेत्याला तलवारीची भेट देऊन होते. थोडक्यात तलवारीचा महिमा आजच्या युगात देखील टिकून आहे. हे भाग्य दुसर्‍या कोणत्याच शस्त्रास लाभले नाही यावर तुमच्या लेखणीतून एखादा लेख येऊद्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेखन.
ऐतिहासिक माहिती आणि भटकंतीची सांगड आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!