एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 3

( मागील भागावरून पुढे)

गाभाऱ्यातील शिवलिंगाची पूजा अजूनही केली जात असलेले, तेर गावातील उत्तरेश्वर मंदीर, एक गाभारा सोडला तर आज पूर्णपणे भग्नावशेष स्वरुपातच दिसते. एके काळी मंदिराच्या बाह्य प्रवेशद्वाराचा भाग असलेली लाकडी चौकट मात्र अजूनही उभी आहे. इतकेच म्हणता येते की 1901 मध्ये, हेनरी कुझेन्स याने जेंव्हा या मंदिराला भेट दिली होती तेंव्हा मंदिराचे एकूण स्वरूप आजच्यापेक्षा थोडे जास्त उजवे होते आणि त्यामुळे कुझेन्सला काही निरीक्षणाची नोंद करणे शक्य झाले होते. कुझेन्स आपल्या निरीक्षणात म्हणतो:

"उत्तरेश्वर आणि त्याच्या बाजूला असलेले काळेश्वर ( या मंदिराचा आता मागमूसही उरलेला नाही.) ही दोन्ही मंदिरे अत्यंत प्राचीन असून साच्यातून बनवलेल्या किंवा वर नक्षीकाम कोरलेल्या विटांनी त्यांची बांधणी केलेली दिसते आहे. वेरूळ येथील कैलास मंदीर किंवा पट्टडकल येथील सर्वात प्राचीन मंदीरे, या दोन्ही मध्ये पाषाणावर ज्या पद्धतीने कोरीव काम केलेले दिसते तसेच काहीसे कोरीवकाम या मंदिरामधेही केलेले दिसते. हे (उत्तरेश्वर) मंदिर अत्यंत प्राचीन असण्याचा सर्वात सबळ पुरावा, त्याच्या बांधणीत दिसणारा पाषाणांचा संपूर्ण अभाव हा आहे असे खात्रीने म्हणता येते."

कुझेन्स पुढे म्हणतो की " मात्र हे मंदिर, गावातील बौद्ध चैत्यगृह किंवा त्रिविक्रम मंदीर बांधले गेल्याच्या कालाच्या नंतरच्या कालखंडात बांधली गेली असावीत असे खचितच म्हणता येते.”

उत्तरेश्वर मंदिरात आता काहीच उरलेले नसले तरी मुळात बाह्य प्रवेशद्वाराचा भाग असलेली जी लाकडी चौकट आजमितीला उभी आहे, तिच्याकडे विशेष लक्ष देण्याजोगी आहे. या चौकटीच्या बाहेरील बाजूस पाने, फुले व वेलींचे बारीक नक्षीकाम केलेले असून आतल्या भागात कोरीव काम केलेले आहे. मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस, निरनिराळी वाद्ये वाजवणारे वादक कोरलेले आहेत तर डाव्या बाजूस प्रार्थना करणारे भक्तगण दिसत आहेत. या कोरीव कामाच्या आतल्या बाजूस, कोरलेलेच उभे स्तंभ प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दिसतात. खालच्या बाजूस काही राजहंस कोरलेले आहेत. द्वाराच्या वरील बाजूस असणार्‍या चौकटीच्या भागावर (कॉर्निस) एका आडव्या पट्ट्यामध्ये अनेक मानव सदृश्य आकृत्या कोरलेल्या आहेत. कुझेन्सच्या मताने या आकृत्या शिव, ब्रम्हदेव आणि त्यांचे अनुयायी यांच्या आहेत व उत्तरेश्वर मंदीर शिवाचे असल्याने या आकृत्या अस्थायी आहेत असे काही म्हणता येणार नाही. मात्र या आकृत्यांच्या खालील बाजूस आणि दारालगत जो डिझाइन पॅटर्न कोरलेला आहे तो मात्र खचितच विस्मयकारक आहे. कुझेन्सच्या शब्दात सांगायचे तर:

" विशेष लक्षवेधी आकृत्यांनी सजवलेल्या या पट्ट्याखाली एक खोलवर कोरीव काम केलेली आणि एक चतुर्थांश गोलाकार दिलेली अशी एक कॉर्निस पट्टी आहे. या कॉर्निस पट्टीवर ठराविक अंतरावर एकूण चार (हिनयान पद्धतीच्या) बौद्ध चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींचे कोरीव काम वरवरचे नसून ठसठशीत दिसावे अशा रितीने बर्‍याच खोलीपर्यंत केलेले आहे. "

एका शिवमंदीरात, हिनयान पद्धतीच्या बौद्ध चैत्य कमानी कोरलेल्या आढळणे, याचा कोणतेही तर्कशुद्ध खुलासा करणे केवळ अशक्यप्राय असल्याने कुझेन्स आश्चर्य व्यक्त करताना म्हणतो की: " हे मुळात एखादे प्राचीन बौद्ध उपासनागृह तर नसेल ? "

तेर येथे दिसलेल्या प्राचीन खाणाखुणांनी कुझेन्स अत्यंत प्रभावित झाला होता. त्याने नंतर तेरच्या आसमंतात असणार्‍या इतर मंदिरांनाही भेटी दिल्या व भेटी अंती लिहिलेल्या आपल्या अहवालात तो म्हणतो:

" माझी भेट अगदी कमी काळाची होती कारण मला फक्त थोडेच दिवस वेळ होता. 1975 च्या डिसेंबर महिन्यात डॉ. बर्जेस यांच्या बरोबर मी धाराशिव कॅम्पमध्ये मुक्काम केला होता. त्या स्थानापासून फक्त 12 मैलावर इतके सारे बघायला मिळेल याची मला मी आलो तेंव्हा कल्पनाही करता आली नसती."

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रेकॉर्डमध्ये तेर गावाची नोंद एक ऐतिहासिक स्थान म्हणून झाल्यानंतर तेथे या विभागाने 1957-58; 1966-67 to 1968-69; 1974-75; 1987-88; 1988-89 या वर्षात उत्खनन मोहिमा केल्या. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने येथे 1987-88 मधे उत्खनन केले.

1957-58 मधल्या मोहिमेला फारसे यश लाभले नाही तसेच कोणत्याच वास्तू किंवा त्यांचे भग्नावशेष उत्खननात सापडले नाहीत. या जागेवर इ.स.पूर्व 400 ते इ.स. 400 या कालखंडात मानवी वस्ती होती हे मात्र सिद्ध करता आले. सापडलेल्या पुरातन वस्तुंमध्ये, बहुसंख्येने वर्तुळाकार असलेली पण भिन्न भिन्न आकारांची अशी एकेचाळीस तांब्याची नाणी, दगडी पाटे-वरवंटे, लोखंडातून बनवलेले दिवे, बाण व भाले यांची अग्रे, सुर्‍यांची पाती, अस्थींपासून बनवलेली अग्रे, मणी. भाजलेली माती- शिंपले, -काच आणि पाषाण यांपासून बनवलेली कंकणे, यांचा समावेश होता. अर्धवट जळालेले तांदूळ, गहू व डाळी यांचा येथे लागलेला शोध वैशिष्ट्यपूर्ण मानता यावा.

यानंतरच्या म्हणजे 1966-67 मधील मोहिमेला बर्‍यापैकी यश लाभले असे म्हणता येते. पुरातत्त्व विभागाच्या अहवालातील खालील नोंद मी उद्धृत करतो आहे.

"जमिनीत खोलवर आणि आडव्या पातळीत असे दोन्ही प्रकारातील उत्खनन केले गेले. सातवाहन कालातील रहाण्याची किंवा जीवन-पद्धती, घरांचे आराखडे नीट समजावे म्हणून आडव्या पातळीवरील उत्खनन केले गेले. यात 26 मीटर व्यासाच्या आणि विटा वापरून बांधलेल्या एका मोठ्या स्तूपाच्या तळाचा शोध लागला. या स्तूपाचा आराखडा एका चक्रासारखा होता. या चक्राच्या मध्यभागी स्तूपाचा तळ होता व त्यापासून, वक्र रेषांनी जोडलेल्या (circular ribs) कोनाकृती आकारातील, आठ आरे बाहेर निघत होते. या कोनाकृतीमध्ये विटा जमिनीत बसवलेल्या होत्या. स्तूपाच्या चारी दिशांना विटांमध्ये बांधलेले चार आयका चौथरे (ayaka platforms) व त्यांना जोडणारा एक प्रदक्षिणा पथही सापडला. या स्तूपाच्या बांधकामाचा कालखंड तेथे सापडलेल्या शिलालेखामध्ये उल्लेख केलेली गवंड्यांची नावे व सातवाहन राजा पुलुमवी याची छबी असलेल्या नाण्याचा तेथे लागलेला शोध, यावरून इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकामधील प्रथम अर्ध-शतकातील असला पाहिजे हे सिद्ध करता आले. याच कालखंडात, विटांमध्ये बांधले गेलेले आणि एक बाजू लंबवर्तुळाकार आकाराची असलेले एक मंदीर (apsidal brick temple) येथे सापडले. या मंदिराच्या आतील बाजूस सुद्धा एक स्तूप बांधलेला होता आणि मंदिरासमोर लाकडी मंडप होता. या मंदिराचा कालखंड सुद्धा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा पुलुमवी याची छबी असलेल्या नाण्याच्या शोधामुळे नक्की करता आला. या मंदिराची 3 वेळा डागडुजी केल्याचेही आढळून आले. या शिवाय, भाजलेल्या मातीतून आणि चिनी मातीतून (kaolin) बनवलेल्या छोट्या मूर्ती, आभूषणे, केश-रचना उपकरणे, भाजलेल्या मातीतील दिवे, कंकणे, रोमन कागदपत्रांना लावण्याची सिले (bullae), सूर्यदेवाचे चित्र असलेली क भाजलेल्या मातीतील एक चकती, शिंपल्यामध्ये कोरलेला एक सिंह, रोमन काचेची बाटली (Mediterranean type) कार्नेलियन, अ‍ॅगेट, लापिज-लाझुलि आणि शिंपले (carnelian, agate, lapis lazuli and shell) यापासून बनवलेले निरनिराळ्या आकारातील मणी एवढ्या गोष्टी उत्खननात सापडल्या."

ही उत्खनन मोहीम याच्या पुढच्या वर्षी सुद्धा चालू राहिली होती. त्याचा अहवाल काय म्हणतो ते पाहूया.

"या आधीच्या वर्षात केलेल्या उत्खननात चक्राकार आराखडा असलेला एक मोठा स्तूप सापडला होता. या शिवाय भारतीय बनावटीची नसलेली कार्नेलियन किंवा रक्तशिला सील्स, भाजलेल्या मातीमधून बनवलेली सील्स आणि विशेष प्रकारचे दिवे हे सापडले होते. या वर्षी कापडाला रंग देण्यासाठी म्हणून मुद्दाम बनवलेली मोठी पिंपे सापडल्याने येथून मोठ्या प्रमाणात कापडाचा निर्यात व्यापार चालत असावा असे म्हणता येते. आधीच्या वर्षातील आणखी एक मोठा शोध म्हणजे त्रिविक्रम मंदिराच्या जवळच सापडलेले आणि एक भिंत लंबवर्तुळाकार आकाराची असलेले मंदीर. विटांनी बांधलेल्या या मंदिरात एक स्तूप सापडला होता. या स्तूपाची कमीत कमी तीन वेळा तरी डागडुजी करून त्याला विटांचा चौथरा बांधून नवीन आधार दिल्याचे आढळून आले होते. राजा पुलमवी याचे नाणे सापडल्याने त्याच्या कालखंडाचा अंदाज बांधता आला. मंदिराच्या समोरील बाजूस केलेल्या उत्खननात, लाकडी खांबांच्या आधारावर उभारलेल्या एका मंडपाचे भग्नावशेष सापडले होते." ( या अहवालात जरी काही बाबींची पुनरावृत्ती झाली असली तरी थोडी जास्त महिती दिली असल्याने मी तो परत येथे उद्धृत केला आहे.)

या पुढील उत्खनन मोहीम 1974-75 मध्ये खालील उद्देशासाठी हातात घेतली गेली होती. 1) या स्थानावरील संस्कृतींचा कालक्रम 2) भाजलेली माती व चिनी माती (kaolin) या पासून बनवलेल्या छोट्या मूर्तींचा काल 3) या स्थानावर सातवाहन पूर्व कालातील वसाहती असल्यास त्यांचे स्वरूप. या स्थानावर असलेल्या अनेक छोट्या टेकड्यांपैकी "लामतुरे" टेकडी या नावाने ओळखली जाणारी व प्राचीन वसाहतींमुळे 8 ते 9 मीटर ऊंची प्राप्त झालेली टेकडी या वर्षीच्या उत्खननासाठी निवडण्यात आली. या जमिनीवर लामतुरे कुटुंबाची मालकी आहे आहे व या टेकडीला, टेकडी क्रमांक 1 या नावाने अहवालात संबोधले आहे. या अहवालाप्रमाणे या टेकडीच्या स्थानावर होऊन गेलेल्या वसाहतींचा इ.स.पूर्व तिसरे शतक ते इ.स. पश्चात तिसरे शतक हा कालखंड 3 टप्प्यांमध्ये विभागता येतो.

यापैकी पहिला टप्पा, या स्थानावर मानवी वसाहत प्रथम केली गेली तो काल आहे. या टप्प्याकडे निर्देश करतात ते येथे मिळालेले भाजलेल्या मातीतून बनवलेल्या काळ्या रंगाच्या आणि तकाकी दिलेल्या भांड्यांचे तुकडे. दुसर्‍या टप्प्यामध्ये या संपूर्ण वसाहती भोवती सागाच्या फळ्यांची लाकडी तटबंदी उभारलेली होती असे आढळून आले. या सागाच्या फळ्या एकमेकाला सागाच्या लाकडापासून बनवलेल्या पिनांनी जोडलेल्या होत्या. तिसरा टप्पा हा या वसाहतीच्या दृष्टीने सर्वात वैभव संपन्न होता असे दिसते. या टप्प्याबद्दल हा अहवाल म्हणतो.

"येथे सापडलेल्या भाजलेल्या व चिनी मातीच्या छोट्या मूर्ती, मणी, कोरीव काम केलेल्या हस्तीदंताच्या वस्तू, काळ्या-लाल रंगाच्या भाजलेल्या मातीच्या भांड्यांचे तुकडे, सातकर्णी आणि नंतरच्या राजांची नाणी या सर्व गोष्टी या टप्प्यामधे आढळून आल्या. या शिवाय भाजलेल्या मातीची तकाकी असलेली भांडी, दोन्ही बाजूंना कान असलेल्या बारीक गळ्याच्या सुरया (amphorae), मोठ्या प्रमाणात मिळालेली भाजलेल्या मातीतून बनवलेली सील्स (terracotta bullae) या मिळालेल्या गोष्टींमुळे या कालात ही वसाहत वैभव संपन्न होती या म्हणण्याला पुष्टी मिळते. या कालात येथे बांधल्या गेलेल्या वास्तू भाजलेल्या विटांमधून बनवलेल्या होत्या. घरातील जमिनींवर चुन्याचा ( चुनखडी आणि वाळू यांचे पाण्यात कालवलेले मिश्रण) (hydraulic lime-mortar) थर देण्यात येत असे. घरांना कौलारू छपरे होती. घरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी घराजवळच भाजलेल्या मातीच्या आणि एकावर एक बसवलेल्या रिंगांच्या मोठ्या नळ्या, खड्डे खणून जमिनीत पुरलेल्या असत."

या उत्खननातून असेही आढळून आले की इ.स. नंतरच्या तिसर्‍या शतकाच्या सुमारास ही वसाहत (लामतुरे टेकडी) काही कारणांमुळे उजाड झाली. अहवालाप्रमाणे, या कालानंतर परत कधीही येथे मानवी वसाहत झाल्याचा, कोणताही पुरावा या ठिकाणी केलेल्या खोदकामात मिळाला नाही.
(पुढे चालू)

21 मार्च 2015

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मोलाची माहीती देणारा धागा आहे. वाचुन माझ्या आयुष्यात अमुलाग्र (वैचारीक) बदल होणार अशी खरोखर चिन्हे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण लेख. चन्द्रशेखर ह्यांच्याकडून अशा पठडीबाहेरच्या विषयांवर केले जाणारे लिखाण नेहमीच नवी माहिती पुरविणारे आणि वाचनीय असते.

Corpus Inscriptionum Indicarum Vol VI 'Inscriptions of the Shilaharas' ह्या म.म.वा.वि.मिराशीसंपादित पुस्तकात शिलाहारांच्या सन्दर्भाने तगरपुरावर बरेच काही वाचायला मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनीय आणि माहितीपूर्ण. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय माहितीपूर्ण लेखमाला . पुढील भागाच्यी प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0