दि प्रेस्टीज नावाच्या 2006 साली गाजलेल्या चित्रपटातील एका दृश्यात एक जादूगार अमेरिकेतील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिकाच्या कार्यशाळेत येतो. बाहेरच्या उघड्या हिरवळीवर बर्फमध्ये 10-12 बल्बमधून प्रकाश येत असतो. जादूगार आश्चर्यचकित होऊन बघू लागतो. गंमत म्हणजे या बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी तारा-केबल यांची सोयच नव्हती! स्वतंत्र दिव्याप्रमाणे ते पेटलेले होते. वायरलेस टेलिफोन सेवेसारखी ही एक वायरलेस विद्युत यंत्रणा होती! मुळातच वैत्रानिकांनी अशा प्रकारचे जादूचे प्रयोग करून प्रसिद्धी मिळवण्याला इतर सहकारी नाक मुरडत असतात. 2006 सालच्या या चित्रपटातील हे दृश्य काल्पनिक असले तरी अशा प्रकारचा प्रयोग शंभर वर्षापूर्वी, 1899मध्ये, निकोला टेस्ला (1856-1943) या अमेरिकेतील वैज्ञानिकाने प्रत्यक्षपणे करून दाखविले होते, यावर आज विश्वासही बसणार नाही. पृथ्वी विद्युतवाहक म्हणून कार्य करू शकते हे सिद्ध करणारा प्रयोग तो त्या काळी करत होता. जमिनीच्या या गुणधर्माचा वापर करून टेस्ला यानी प्रयोगशाळेपासून काही किलोमीटर्स दूरवरील जमिनीला जोडलेले निऑन ट्यूब्स पेटवून दाखवू शकला. परंतु त्याला हे कसे शक्य झाले याचा शोध आजपर्यंत लागला नाही. (असाच एक प्रयोग 2007 मध्ये अमेरिकेतील MIT तील वैज्ञानिकांनी हवेतून 2 -3 मीटर्स उंचीवरून कुठल्याही केबल वा तारांच्या जोडणीविना वीज प्रवाह पाठवू शकले. परंतु टेस्लाने कुठली तांत्रिकप्रक्रिया वापरली हे अजूनही गूढ आहे.)
निकोला टेस्लाचा जन्म युरोपमधील Croatia येथे झाला. वडील चर्चचे पाद्री होते. तल्लख बुद्धीच्या टेस्लाला लहानपणापासूनच तंत्रज्ञानातील बारकाव्यांची आवड. विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी शिक्षण त्यानी तेथील पॉलिटेक्निक व ग्राझ विद्यापीठातून घेतले. शिक्षण घेत असतानाच त्याच्यातील विक्षिप्तपणाची कल्पना मित्रांना येवू लागली. एकदा तर 2-3 टर्म्स कॉलेजमध्ये न आल्यामुळे त्यानी नदीत जीव दिला अशी अफवा पसरली. कसेबसे काही टर्म्स त्यानी संपविले. काही वर्ष तो बुडापेस्ट येथील एका टेलिफोन कंपनीत काम करू लागला. (1881) कुठलीही गोष्ट एकदा पाहिले की ते त्याच्या डोक्यात फिट्ट बसत होते. 70-80 टक्के स्किमॅटिक्स त्याच्या डोक्यात असत. एखाद्या रचनेची इत्थंभूत माहिती, आकृत्या, त्यातील बारकावे, बारीक-सारीक डायमेन्शन्स, जोडणीचा क्रम इत्यादी डोक्यात साठवल्या जात होत्या. त्यांना कागदावर उतरविण्याची गरजच त्याला भासत नव्हती. कितीही गुंतागुंतीची रचना असली तरी टेस्ला त्याच्यातील फोटोग्राफिक स्मृतीमुळे काही क्षणात सर्व काही आठवणीत ठेवत असे.
स्वत:च्या देशात काही वर्षे घालविल्यानंतर एका ओळखीच्या इंजिनियरच्या शिफारशीवरून तो अमेरिकेतील थॉमस एडिसनच्या प्रयोगशाळेत शिकावू उमेदवार म्हणून काम करू लागला. (1884) परंतु त्याची व एडिसनची वेव्हलेंग्थ जुळेना. एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा. त्यामुळे टेस्ला जॉर्ज वेस्टिंगहाउसबरोबर भागीदारी करून AC तंत्रज्ञानाचा पाया रचला. 11000 व्होल्टच्या उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाला हाताळण्यास सुरक्षित अशा 110/220 व्होल्ट्स पर्यंत आणणार्या विद्युत प्रवाह तंत्रज्ञानाच्या शोधात टेस्लाचा सिंहाचा वाटा होता. मायकेल फॅरडे यानी विद्युत उत्पादन जनित्रांचा शोध लावून जगाला आश्चर्यचकित केले. परंतु त्या विद्युत ऊर्जाचा व्यावहारिक उपयोग, विद्युत प्रवाहाचे उत्पादन, प्रेषण, वितरण, सुरक्षितता यासाठी टेस्लाचे नाव घ्यावे लागेल. आज आपण विद्युत ऊर्जा वापरून ज्या सोई सुविधा भोगत आहोत त्यासाठी आपल्याला टेस्लाला ऋणी रहावे लागेल. खरे पाहता 20व्या शतकातील बहुतेक सोई सुविधांचा जनक म्हणून त्याचे नाव हवे होते. परंतु त्यानी शोधलेल्या एकूण एक सिद्धांताची रेवडी त्याकाळात उडवली. फॅरडे, एडिसन, मार्कोनी, यांच्या नावाचा जो दबदबा होता तो टेस्लाच्या नावाला नाही, हीच खरी शोकांतिका. जगाने त्याला एक वैज्ञानिक वा अभियंता म्हणून न ओळखता एक तर्हेवाइक, विक्षिप्त, वेड्या वैज्ञानिकाच्या स्वरूपातच ओळखले.
कुशाग्र बुद्धीच्या या वैज्ञानिकाने अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांचा शोध लावला. विद्युत जनित्र, रेडिओ लहरी, FM रेडिओ , स्पार्क प्लग, फ्लुरोसेंट प्रकाश, क्ष-किरण, रोबोटिक्स, टेलीऑटोमेशन, रिमोट कंट्रोल, रेडिओ-नियंत्रित जहाज, टेस्ला कॉइल, इत्यादीसंबंधीच्या तंत्रज्ञानांचा पाया त्यानी रचला. ब्लेडविरहित जनित्राची कल्पना त्याचीच होती. रेडिओ लहरीच्या शोधात तो मार्कोनीचा स्पर्धक होता. टेस्लाचेच 17 पेटंट्सचा वापर करून मार्कोनी यानी रेडिओ लहरीच्या शोधात आघाडी मिळवली. कार्समधील स्पीडोमीटर्सचा शोध त्यानी लावला. यांत्रिकी फेरेगणकाचा शोधही त्याचाच. विद्युत लहरींचा वापर करून काही रोगावर उपचार करू शकणार्या मशीनच्या शोधातही टेस्लाचे नाव जोडलेले आहे. नायगरा जलपातापासूनच्या विद्युत निर्मितीतही त्याचा सहभाग होता.
1900च्या सुमारास न्यूयार्कपासून 100 किमी दूर असलेल्या ठिकाणी टेस्ला यानी स्वत:च्या प्रयोगशाळेसाठी एका प्रचंड टॉवरची उभारणी केली. त्याला आता वार्डनक्लिफ टेस्ला टॉवर म्हणून ओळखतात. अवकाशातील कॉस्मिक किरणांना आकर्षित करून वीज निर्मिती करण्याची टेस्लाची एक अफलातली कल्पना होती. टेस्लाच्या कल्पनेप्रमाणे कॉस्मिक किरणाद्वारे वीज, केबलविना ट्रान्समिशन व वितरण असे झाले असते तर या जगातील ऊर्जेसंबंधीच्या सर्व समस्या कधीच संपल्या असत्या. थर्मल, हायड्रॉलिक वा न्यूक्लियर पॉवरपासून मिळणार्या खर्चिक विद्युत उत्पादनाच्या मागे आपण धावलो नसतो. परंतु टेस्लाच्या प्रयोगातून कॉस्मिक किरणाऐवजी asteroid आकर्षित होतात असा जावईशोध कुणीतरी लावला. 1908च्या सुमारास रशियातील तुंगुस्का येथे asteroid कोसळले व शेकडो किमीचे जंगल जळून जाण्यास कारणीभूत ठरले, अशी अफवा पसरली. परंतु शेवटपर्यंत हे कुणीही सप्रमाण सिद्ध करू शकले नाहीत. काही वर्षानंतर त्याच्या या प्रयोगशाळेला आग लागली व त्यातील अनेक महत्वाची कागदपत्रे, सामान जळून खाक झाल्या.
वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा अत्यंत उत्साहाने तो काम करत होता. त्याकाळी प्रकाश किरणाने त्याला मोहित केले. प्रकाशाचे एकाच वेळी प्रकटित होणारे तरंग व कण या स्वरूपाचा वापर करून टेस्ला यानी 'प्रकाशभिंत' उभी करून सर्वांना चकित केले. विद्युत-चुंबकीय लहरींना पाहिजे तसे वळवून, वाकवून असे काही तरी करता येते हे त्याच्या डोक्यात आले होते. अवकाश, वस्तू व गुरुत्व यांचा योग्य उपयोग करून घेतल्यास प्रकाश किरणांना आकार देऊन 'प्रकाशभिंत' उभी करता येते असा त्याचा दावा होता.
टेस्लाच्या नावे सुमारे 700 पेटंट्स असूनसुद्धा तो शेवटपर्यंत कफल्लकच राहिला. काही दिवस खड्डे खणून त्याला पोट भरावे लागले. त्याला आठ भाषा येत होत्या. त्याच्या आधारे तो काही काळ अनुवादक म्हणूनही काम करत असे. एक तर्हेवाइक म्हणून ख्याती असलेल्या टेस्लाला फसविणारेच जास्त भेटले. जॉर्ज वेस्टिंगहाउस व जे पी मॉर्गनसुद्धा यास अपवाद नाहीत. स्टॉक मार्केटमधील घोटाळा, पेटंट ऑफिसमधील गैरवर्तन यामुळे त्याचे आर्थिकरित्या फार नुकसान झाले. मुळात त्याला इतरांशी कसे वागावे हेच कधी कळले नाही. अपवाद फक्त मार्क ट्वेनचा. प्रत्येक वेळी त्याच्या डोक्यात नवीन कल्पना यायच्या. त्याच्या मागे हात धुवून तो लागायचा व त्याच्या जुन्या कल्पना अडगळीत पडायच्या. त्यामुळे बहुतेक कामे अर्धवट स्थितीत रहायचे. स्वामी विवेकानंदांचे वेदांतावरील भाषण ऐकून तो संस्कृत शिकू लागला व त्याच्या डोक्यातील काही कल्पनांना संस्कृत नाव दिले. आजन्म अविवाहित, गोलाकारातील वस्तूबद्दल मनस्वी तिटकारा, तीन या संख्येने भाग न जाणार्या गोष्टीबद्दल तिरस्कार, मूक प्राण्यावर व विशेषकरून कबूतरांवर निस्सीम प्रेम, लठ्ठ लोकांचा दुस्वास, स्वच्छतेबद्दलच्या विचित्र कल्पना, मोती-दागिन्याशी हाडवैर, अशा काही विक्षिप्त आवडी-निवडीमुळे आयुष्यभर त्याला हाल सोसावे लागले. (वि़क्षिप्तपणाचे अजून एक उदाहरण म्हणजे त्याचे ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्यामुळे शास्त्रशोधास मदत होते असे त्याचे मत होते.) काहींच्या मते Obsessive Compulsive disorder हा मानसिक रोग त्याला जडला होता. परंतु टेस्ला हा एक चांगला शोमन होता. स्वत:च्या प्रयोगांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे त्याला फार आवडत होते. एखाद्या कलाकृतीच्या प्रदर्शनाप्रमाणे माणसांना जमवून आपण लावलेला शोध तो दाखवून जमलेल्यांना आश्चर्यचकित करत असे. एकदा त्याने एका खोलीत विजेचा गोळा तयार करून दाखवला व घाबरलेल्या जमावाला ते किती सुरक्षित आहे हे पटवून देवू लागला.
अब्जाधीश होण्याच्या लायकीच्या या विक्षिप्त वैज्ञानिकाचा फार मोठा गौरवही झाला नाही. त्याच्या 75 व्या वाढदिवशी Time या साप्ताहिकाने मात्र त्याची कव्हर स्टोरी छापून त्याला प्रसिद्धी दिली. युगोस्लोव्हिया प्रशासनाने त्याच्या वृद्धाप्यकाळाकरिता प्रतीवर्षी 7500 डॉलर्स देऊ केले. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक जगानी त्याच्या कार्याचा मरणोत्तर गौरव केला. व्होल्ट, अँपीअर, ओहम, हर्टझ् या वैज्ञानिकांच्या स्मरणार्थ ज्याप्रमाणे काही मापन एककांना त्यांची नावे दिली त्याचप्रमाणे विद्युतचुंबकीय क्षेत्रातील फ्लक्स मोजणारे एकक म्हणून टेस्लाचे नाव देण्यात आले. नोबल पारितोषकासाठी एडिसन व टेस्ला या दोन्ही नावांची शिफारस होती. परंतु एकाला दिल्यास दुसरा नाराज होईल म्हणून ते दोघानाही दिले नाही.
अत्यंत गरीबीतच त्याचे म्हातारपण गेले. हॉटेलमधील दोन खोल्यातच त्याला रहावे लागत होते. त्याच्या कबूतरावरील प्रेमामुळे (व कबूतरं हॉटेल घाण करतात म्हणून !) त्याला अनेक वेळा हॉटेल बदलावे लागले. मृत्युच्या वेळी त्याचे वय 86 वर्षाचे होते. त्याचे मरणसुद्धा सुखासुखी नव्हते. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. मरणाअगोदर एकदा त्यानी एका सैन्याधिकारीला फोनवरून शत्रूंना नाश करू शकणार्या मृत्युकिरणावर (death rays or peace rays) काम करत आहे असे सांगितले होते. त्यामुळे मृत्युनंतरच्या काही क्षणातच त्याच्या रहात्या हॉटेलच्या भोवती FBI ने कडक सुरक्षा उभी करून त्याच्या खोलीतील सर्व सामान अस्ताव्यस्त करून प्रत्येक चिठ्ठी चपाटींचा अभ्यास केला. मात्र हाती काही लागले नाही. फक्त एका कागदावर 'पुढील काळात एकाच वृत्तपत्रांच्या अनेक आवृत्त्या एकाच वेळी शहराशहरात छपाई होऊन वाचकापर्यंत पोचतील ' असे लिहिलेले भाकित आढळले. कदाचित आताची इंटरनेट प्रणालीची चाहूल त्याच्या सुपीक डोक्यात तेव्हा त्याला आली असावी.
यापुढे जेव्हा आपण एखादे स्विच वापरून पूर्ण घर प्रकाशाने न्हाऊन काढू तेव्हा आपल्याला नक्कीच निकोला टेस्लाची आठवण येत राहील!
हा लेख आवडला विशेषतः टेस्ला
हा लेख आवडला विशेषतः टेस्ला बद्दल थोडेफार (किंचीत) माहीत असल्याने अधिक आवडला.
एडिसनचा अघोरी प्रयोग?
एडिसन आणि टेस्ला, डीसी आणि एसी प्रवाहांचे प्रचालक, ह्यांच्या मध्ये मोठी चुरस होती. एसी प्रवाह धोकादायक आहे हे जगाला दिसावे म्हणून एडिसनने ६६०० पौंड वजनाचा 'टॉप्सी' नावाचा २८ वर्षांचा एक हत्ती एसी प्रवाहाचा धक्का देऊन मारला अशी गोष्ट प्रचलित आहे. त्या प्रसंगाची केली गेलेली फिल्म येथे आहे.
त्याच प्रसंगाची दुसरी एक शक्यता येथे आहे.
टेस्लावरील एक चित्रफीत
टेस्लावरील एक चित्रफीत
लेख आवडला.
लेख आवडला.
माहितीपुर्ण लेख. टेस्लाच्या
माहितीपुर्ण लेख.
टेस्लाच्या शोधाबद्दल अनेकदा वाचनात येते. त्याच्या सवयी, आवडी-निवडीं, त्याचे आयुष्य, 'लाइफ इव्हेन्ट्स' इत्यादीबाबत मराठीतून फारसे वाचलेले नाही. त्याबद्दल अधिक तपशीलात लिहिलेत तर आवडेल
रोचक लेख.
रोचक लेख.
सहिच!
.
पृथ्वी विद्युतवाहक म्हणून
हा प्रकार फ्रॉड असावा असे मनापासुन वाटते. हे शास्त्रीयदृष्ट्या शक्य वाटत नाही आणि जर खरच शक्य असते तर गेल्या १०० वर्षात सहज सिद्ध झाले असते.
जमिनीच्या या गुणधर्माचा वापर
बाकी सर्व महत्वाच्या शोधांमधे आणि संशोधनांमधे एवढा एकच उल्लेख "शिवकर तळपदे विमान"छाप वाटला हे खरं.
एवढा एकच लेख नीट वाचला
लेख नीट वाचला नसावा. असो.
निकोला टेस्ला बद्दल एक
निकोला टेस्ला बद्दल एक interesting लेखः
http://theoatmeal.com/comics/tesla
वा! हा लेख मुलीला पाठवेन.
वा! हा लेख मुलीला पाठवेन.
interesting लेख!
अंतु बर्वा या आय डीला धन्यवाद!
अत्यंत वाचनीय असा लेख त्यानी सुचविला आहे..
तंत्रज्ञानातील out of the box कल्पनांसाठी टेस्लासारख्या Geeks व/वा Nerdsची खरोखरच गरज आहे.
लेख आवडला. एक ऐकीव किस्सा
लेख आवडला.
एक ऐकीव किस्सा (बहुतेकांनी ऐकला असेल) तो खरा आहे की दंतकथा? आईनस्टाईनला पत्रकाराने विचारलं, "कसं वाटतं तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान माणूस असल्यावर?"
त्यावर आईनस्टाईन (म्हणे) उत्तरला, "मला माहित नाही. टेस्लाला विचारावं लागेल." (टेस्ला २३ वर्षांनी मोठा होता म्हणे आईनस्टाईनपेक्षा.