बालसाहित्याचा दीपस्तंभ

बालसाहित्याचा दीपस्तंभ

- सौ. नीला धडफळे

.
गेली अनेक वर्षे बालवाचकांना आकर्षित करणाऱ्या मोजक्याच मराठी लेखकांमध्ये भास्कर रामचंद्र भागवत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बालसाहित्यातली त्यांची कामगिरी केवळ अनन्यसाधारण अशी आढळते. कथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद या सर्व साहित्यप्रकारांत भागवतांच्या लेखणीने स्वैर संचार केलेला असला, तरी बालसाहित्यकार म्हणून जनमानसांत त्यांची प्रतिमा सुस्थिर झाल्याचे निदर्शनास येते.

भारांनी अनेक प्रकारचे लेखन केले. साहस, विज्ञान, निर्मळ विनोद त्यांच्या लेखनात डोकावत असे. त्यांचे सुरुवातीचे प्रौढांसाठीचे लेखन ('वैतागवनांतील वाफारे' आणि 'माझा विक्रम' - दोहोंचे प्रकाशनवर्ष १९३९) हे विनोदी आणि विडंबनात्मक होते. शाब्दिक कोट्यांनी युक्त असलेले ते लेखन खुमारीचे असल्याचे जाणवते. त्यांच्या कोट्यांमधून निर्भेळ आनंद सापडतो.

...

वि. स. खांडेकर, ना. धों. ताम्हनकर, न. चिं. केळकर यांनी भारांच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाची ('वैतागवनांतील वाफारे') प्रशंसा करताना 'निर्मळ' आणि 'निरागस' अशी विशेषणे वापरली आहेत. प्रौढांसाठीच्या इतर लेखनात (म्हणजे 'संत्रस्त' आणि 'भाराभर गवत' या कथासंग्रहांत) त्यांची विनोदी वृत्ती अधिकच जाणवते.

मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात संपादक राम कोलारकर ह्यांनी भा. रा. भागवतांच्या वीस कथांचा समावेश केलेला आहे, ही एकच बाब भारांची विनोदी कथालेखनातील निपुणता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. पण त्यांच्यावर विनोदी कथालेखकाचा शिक्का मात्र बसला नाही, कारण त्याच एका प्रांतापुरते त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. विविध विषयांवर त्यांचे लेखन झाले.

लहान मुलांसाठी काळजीपूर्वक लेखन करणारे भारा हे प्रौढसाहित्यात मात्र काही वेळा टीकास्त्राचा वापर करत. हिंदुमहासभा आणि सावरकर ह्यांवरचा त्यांचा लेख हे याचे एक उदाहरण.

पोरवयात घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. एवढेच नव्हे, तर बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. सुदैवाने ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती.

भारांचे वडील रामचंद्र भास्कर भागवत हे निरीश्वरवादी सुधारक होते. रँग्लर परांजपे यांच्याबरोबर ते वर्षानुवर्षे 'प्राईड अँड प्रेज्युडिसचे' वाचन करीत असत. भारा हे त्यांच्या वडिलांविषयी एके ठिकाणी लिहितात, "मुलींचीही मुंज केली पाहिजे असे ठासून सांगणारे माझे वडील पक्के रॅशनालिस्ट. धार्मिक कर्मकांड त्यांना मान्य नव्हते." या सुधारणावादी वातावरणामुळे भारांच्या लेखनात अंधश्रद्धेला विरोध करणारी व वास्तववादी कथासूत्रं वारंवार येतात.

बालपणीसुद्धा भारा हे भावंडांना गोष्टी सांगत, छोट्याछोट्या गोष्टी लिहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही उक्ती त्यांच्याबाबतीत चपखल ठरते. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची त्यांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णूशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भारांनी बालवयातच लेखन सुरू केले.

भारांनी इंग्रजी नियतकालिकातूनही विनोदी-कथालेखन केले. तथापि त्यांच्या इंग्रजी कथालेखनाची माहिती फारशी कोणाला नाही. त्यांना जात्याच लहान मुलांची आवड असल्याने त्या आवडीचा ठसा त्यांच्या साहित्यनिर्मितीवर उमटला.

मुलांविषयी प्रेम, आपुलकी व त्यांच्याशी गप्पा मारण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी 'प्रकाश' ह्या साप्ताहिकात बालसाहित्यासाठी एक पूर्ण स्तंभ राखून ठेवला होता. यातून त्यांना बालसाहित्याच्या क्षेत्रात काही करायची ओढ सुरुवातीपासून होती हे ध्यानात येते. त्यांच्या ह्या अभिनव उपक्रमाला इतर साप्ताहिकांनीही उचलून धरले. आजही अनेक दैनिकांत/नियतकालिकांत बालसाहित्याला वाहिलेली जागा असते. या प्रथेचे जनकत्व भा. रा. भागवतांकडे जाते.

भारा हे उत्तम पत्रकारही होते. दैनिक सकाळ, साप्ताहिक प्रकाश आदींमधून त्यांनी लेखन केले. पण कलंदर स्वभावामुळे पत्रकारितेचा त्याग करून त्यांनी आपला मोहरा 'वहाँ' या चित्रपटाच्या (१९३७) कथालेखनाकडे वळवला. पण दिग्दर्शक के. नारायण काळे यांनी त्या कथेत एवढे बदल केले, की सात्त्विक संतापाने भागवतांनी, "ही कथा माझी नव्हे" असा पुकारा करत प्रभात चित्रपटसंस्थेतून राजीनामा दिला.

मुलांमध्ये रमणारे, मुलांत मूल होऊन राहणारे, मुलांसाठी स्वतंत्र साहित्यविश्वाची उभारणी करणारे भा. रा. भागवत यांच्याविषयी ज्येष्ठ साहित्यिक राजा मंगळवेढेकर खालील उद्गार काढतात: "भारांच्या सगळ्या लेखनात उत्कटतेने जाणवतो तो त्यांच्या ठायी असलेला निर्मळ, निरलस आणि टवटवीत असा सुंदर बालभाव."

भारतातील, महाराष्ट्रातील तत्कालीन घडामोडींचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटत असे. त्याची उदाहरणे म्हणजे 'फास्टर फेणेची काश्मिरी करामत', 'गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे', 'फास्टर फेणेचा रणरंग', इत्यादी.

परकीय साहित्याच्या परिशीलनाने भारांनी मराठीतील बालवाचकांना सकस साहित्य उपलब्ध करून दिले. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांचे वाचन असल्याने अनेक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यांच्या हातून घडले. बालवाचकांप्रमाणेच प्रौढ वाचकांनाही हे अनुवाद आवडत. पाश्चात्त्य रहस्यकथांचेही त्यांनी केलेले अनुवाद उल्लेखनीय आहेत.

'आरसेनगरीत जाई' (मूळः थ्रू द लुकिङ् ग्लास (Through the looking glass)) हे त्यांच्या रूपांतरकौशल्याचे उत्तम उदाहरण मानता येईल. रूपांतर करताना भारांचा कटाक्ष हा लेखन परिपूर्ण करण्याकडे असे. टॉलस्टॉय, ओ. हेन्री, मोपाँसा अशांच्या कितीतरी कथा भारांनी 'बिपिन बुकलवार सांगतो आहे' या माध्यमातून रूपांतरित केल्या. त्याचप्रमाणे लॉरा इंगल्स वाईल्डर यांच्या 'लिटिल हाउस' मालिकेतील साहित्याचाही अनुवाद केला. मुलांना थोरांची चरित्रे कळावीत या हेतूने त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, आणि बेन फ्रँकलिन ह्यांची चरित्रे भाषांतरित केली.

भागवतांच्या भाषांतरांवर कायम वैज्ञानिक प्रभाव राहिला. त्यांच्या लेखनातली अद्भुतरम्यता ही कायम विज्ञानाची कास धरून आली. ती गो. ना. दातारांसारखी परीकथांची अद्भुतरम्यता नाही. असं का असावं, याबाबत मनात उत्कंठापूर्ण विचार येतो. भा. रा. भागवतांचा स्वभाव विज्ञाननिष्ठ होता. 'प्रल्हादविजयाच्या गोष्टी मुलांना न सांगता त्यांना तर्कनिष्ठ, बुद्धिवादी बनवणे हे आपले कर्तव्य आहे' असे ते म्हणत. त्यांनी रूपांतरित केलेल्या 'चंद्रावर स्वारी' आणि 'पाताळलोकची अद्भुत यात्रा' या कथांतील शास्त्रीयता वाखाणण्यासारखी आहे. ग्रहांविषयी लेखन करताना भारा हे शंभर वर्षांपूर्वीची पंचांगे अभ्यासत आणि शास्त्रीय माहितीच्या अचूकतेकडे लक्ष देत. जणू काही प्रत्यक्ष पात्रेच आपल्याशी संवाद साधत आहेत, असा भास या लेखनात होतो. भारांना विज्ञानकथांच्या वाचनाची विलक्षण आवड होती. वाचनाला विज्ञानाच्या अभ्यासाची जोड देऊन आणि शास्त्रीय माहिती आत्मसात करून लिहिलेले त्यांचे लेखन वास्तववादी वाटे. कालातीत विषयांमुळे त्या कथा आजच्या वाचकांनाही भावतात.

ज्यूल व्हर्न या फ्रेंच लेखकाच्या अनेक कादंबऱ्यांचे त्यांनी भाषांतर/रूपांतर केलेले आहे. ज्यूल व्हर्नच्या साहित्यातले मुळातले सगळे सौंदर्य अबाधित ठेवून त्यांनी त्यांतला आशाय मराठी मुलांपर्यंत अगदी लीलया पोहोचवला. अनुवादांतले विस्मयकारक प्रसंग, अद्भुतरम्यता या गोष्टी लहानांनाच नव्हे; तर मोठ्यांनाही वेड लावणाऱ्या आहेत.

आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 'बालमित्र' ह्या मासिकाची निर्मिती. या मासिकाने बालमित्रांची साहित्यिक भूक भागवली. उत्कृष्ट दर्जा, उत्तमोत्तम चित्रे, साहसकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा, माहिती आदींचा खजिनाच या मासिकात सापडायचा. वैविध्याने नटलेला बालमित्रचा अंक दर महिन्याला मुलांना मिळायचा. या दर्जेदार मासिकाच्या निर्मितीमध्ये भागवतांच्या पत्नी लीलावती भागवत ह्यांचेही मोलाचे योगदान होते. वेळप्रसंगी आपले दागिने मोडून त्यांनी 'बालमित्र'ला बाळलेणी घातली होती. भारांचे लेखन क्वचितप्रसंगी 'चंदन गुप्ते' या टोपणनावानेही प्रसिद्ध होत असे. 'बालमित्र'चे संपादनही अर्थात भारांचेच असे.

भा. रा. भागवतांच्या सर्व साहित्यनिर्मितीत त्यांचा मानसपुत्र 'फास्टर फेणे' ह्याला एक वेगळे स्थान आहे. फास्टर फेणेची पहिली कादंबरी त्यांनी १९६५मध्ये लिहिली. पुढे १९८६पर्यंत फास्टर फेणेचे वीस भाग लिहिले. फास्टर फेणे इतका लोकप्रिय झाला की पुढे अनेक वर्षे तो कुठे कुठे हजेरी लावत असे. 'कुमार', 'किशोर', 'बालवाडी', 'टॉनिक', इ. मासिकांतून तो दिमाखाने झळकत असे. अनेक वृत्तपत्रांतून अर्कचित्रांच्या माध्यमातून, दूरदर्शनवरच्या मालिकेतून आणि आकाशवाणीवरूनही फास्टर फेणे बालवाचकांपर्यंत पोचला. सचित्र पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या 'अमर चित्रकथा' या संस्थेने फास्टर फेणेला मराठीबरोबरच गुजराती, कानडी, तेलुगू, तमिळ, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतल्या बालवाचकांपर्यंत पोचवले. ललिता पै यांनी 'रंगरेखा' नामक चित्रपट्ट्यांतून फास्टर फेणे मुलांच्या भेटीला आणला. अलीकडच्या काळात तेजस मोडक या तरुणाने 'प्रतापगडावर फास्टर फेणे' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले आहे.

भारांच्या म्हणण्यानुसार माहिती-तंत्रज्ञानयुगात मुलांची दुनिया बदलली आहे. बदलत्या काळात मुलांची भूक वेगळी असणार, ती जाणून घेऊन लेखक लिहिता असावा. पिढी चांगली घडावी यासाठी वाचनासारखा चांगला मित्र त्यांना मिळाला पाहिजे.

'बालसाहित्याचे सर्जक' म्हणून भा. रा. भागवतांची सर्वदूर ओळख आहे. गेल्या शतकातील सातव्या आणि आठव्या दशकात जन्मलेली पिढी आज प्रौढावस्थेतही फास्टर फेणेच्या जनकाविषयी आदर बाळगून आहे. एवढेच नव्हे; तर आज मेहतांची अनुवादित पुस्तके वाचणारा वाचकवर्गही भागवतांच्या अनुवादाच्या खुराकावर वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

एकूणच भा. रा. भागवतांचे समग्र बालसाहित्य बालवाचकांबरोबरच अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरते; नव्हे दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरते, यात शंकाच नाही.

***
'माझा विक्रम' व 'वैतागवनातील वाफारे' यांची मुखपृष्ठचित्रे: भागवत कुटुंबीयांकडून
स्रोतोल्लेखरहित चित्र: जालावरून साभार

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बालसाहित्यासोबतच इतर अंगांवरही प्रकाश टाकणारा हा लेख वाचनीय आहे. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!