१ जुलै - कॅनडा दिन

१७६०-७० च्या दशकांमध्ये अमेरिकेतील १३ ब्रिटिश वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडण्याचे घोषित केल्यावर जी युद्धसदृश स्थिति निर्माण झाली तिचा परिणाम म्हणून ब्रिटिश राजसत्ता मान्य करणार्‍या आणि United Empire Loyalists असे ओळखल्या जाणार्‍या सुमारे ५०,००० जनतेने अमेरिकेमधून उत्तरेकडे स्थलान्तर करून अमेरिका खंडाच्या पूर्वोत्तर भागात वसती केली आणि त्या वसतीला ब्रिटिश नॉर्थ अमेरिका असे नाव पडले. येथेच पूर्वेकडील भागामध्ये फ्रेंच सत्तेचा प्रभाव तत्पूर्वीपासून होता आणि त्या भागाला New France असे नाव होते आणि फ्रेंच प्रभाव त्या भागापासून सुरुवात करून आजचा ऑंटारिओ, महासरोवरांचा प्रदेश आणि १३ वसाहतींच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश व्यापून पार आजच्या लुइझिआना राज्यापर्यंत पसरलेला होता. फ्रेंच प्रभावाखालील ह्या विस्तृत प्रदेशाला अकेडिया (Acadia) असे सार्वत्रिक नाव आहे. ब्रिटनने व्यापलेल्या १३ वसाहती आणि तदनंतरची ब्रिटिश नॉर्थ अमेरिका ह्यांच्या अस्तित्वामुळे हे जवळजवळ मोकळे असलेले हे नवे खंड व्यापण्याची स्पर्धा ब्रिटन आणि फ्रान्स ह्यांच्यामध्ये सुरू झाली. प्रारंभी स्कॉटलंडमधून आलेल्यांनी सुरू केलेल्या नोवा स्कोशिया (New Scotland) ह्या वसाहतीमध्ये काही United Empire Loyalists लोकांना ब्रिटनने वसविले. नोवा स्कोशियाने अकेडियाचाच काही भाग व्यापला होता. १८व्या शतकापासून ब्रिटन आणि फ्रान्स, तसेच स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड अशा राष्ट्रांमध्ये जगातील वेगवेगळ्य़ा भागांमध्ये आपला जम बसविण्याची जी तीव्र स्पर्धा चालू होती. १७१३ साली ह्या राष्ट्रांमध्ये यूट्रेख्ट ह्या गावी जो शान्तीचा करार झाला (Treaty of Utrecht) त्याअंतर्गत नोवा स्कोशिया ब्रिटिश सत्तेखाली आला आणि फ्रान्सशी प्रामाणिक असलेल्या सर्व अकेडियन प्रजेला तेथून निर्वासित केले गेले. १७६३ साली ब्रिटन आणि फ्रान्समधील सप्तवर्षीय युद्ध (Seven Year's War) पॅरिस तहामुळे संपले आणि New France चा भागहि ब्रिटिश सत्तेखाली आला. ह्या भागाला क्युबेक (Province of Quebec) असे नाव मिळाले. क्युबेकचा विस्तार पूर्व किनार्‍यापासून सेंट लॉरेन्स नदीच्या उत्तरेकडील भाग, आणि महासरोवरांचा भाग येथपर्यंत पसरला होता. १७८४ मध्ये नोवा स्कोशियाच्या पश्चिम भागामध्ये अमेरिकेतून स्थलान्तर केलेल्यांसाठी एक नवी वसाहत काढली आणि तिला न्यू ब्रुन्स्विक (New Brunswick) असे नाव दिले.

१७९१ सालच्या ब्रिटिश पार्लमेंटच्या Constitutional Act खाली क्युबेकचे दोन भाग करण्यात आले. पश्चिमेकडील भाग इंग्लिश भाषा बोलणारा आणि सेंट लॉरेन्स नदीच्या उगमाजवळचा म्हणून त्याला Upper Canada असे नाव मिळाले. पश्चिमेकडील भाग सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाजवळचा म्हणून त्याला Lower Canada असे नाव मिळाले.

हे सर्व प्रान्त अजूनपर्यंत ब्रिटिश सत्तेच्याच अधीन होते आणि त्यांचा कारभाराची सूत्रे ब्रिटनहून आलेल्या गवर्नर जनरलच्या हातात होती. आपला कारभार आपण चालवायचे हक्क मिळविण्याच्या हेतूने १८३७ साली ह्या दोन्ही प्रांन्तांमध्ये सशस्त्र उठाव झाले आणि त्याचा परिणाम म्हणून दोन्ही प्रान्तांना पुन: एकत्र करून Province of Canada निर्माण करण्यात आला आणि वेस्टमिन्स्टर पद्धतीचे सरकार तेथे क्रमाक्रमाने अस्तित्वात आले. नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रुन्स्विक ह्या प्रान्तांना, तसेच आणखी उत्तरेकडील प्रथमपासून ब्रिटनच्या ताब्यात असलेल्या New Foundland and Labrador ह्या प्रदेशालाहि अशी सरकारे मिळाली. अजूनहि हे चार प्रान्त स्वतन्त्रपणे ब्रिटनकडे तोंड करूनच होते.

मार्च २९, १८६७ ह्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने British North America Act मंजूर केला. त्याला विक्टोरिया राणीची संमति १ जुलै. १८६७ ह्या दिवशी मिळाली आणि त्यामुळे Province of Canada, नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रुन्स्विक ह्यांची ’कॅनडा’ असे नाव असलेली एक वसाहत (Domimion) निर्माण झाली. त्या घटनेची आधारभूत असलेली राणीची घोषणा अशी होती:

"We do ordain, declare, and command that on and after the First day of July, One Thousand Eight Hundred and Sixty-seven, the Provinces of Canada, Nova Scotia, and New Brunswick, shall form and be One Dominion, under the name of Canada."

कॅनडाच्या जडणघडणीमध्ये नंतरच्या वर्षांमध्ये अन्यहि महत्त्वाच्या घटना होत होत आजचा देश निर्माण झाला पण त्या सर्वाचे बीज जुलै १, १८६७ ह्या दिवशी रोवले गेले म्ह्णून हा दिवस कॅनडाचा जन्मदिवस मानला जातो आणि Canada Day ह्या नावाने सर्व कॅनडाभर साजरा होतो.

(आजचे Google Doodle कॅनडाविषयकच आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

समयोचित लेख आवडला. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या संयुक्त संस्थानांद्वारे, कॅनडाचा भूभागही सामावून घेऊन संपूर्ण उत्तर अमेरिका खंडात एक भाषा बोलणारे एक महा-राष्ट्र निर्माण करण्याचे मनसुबे कसे वेळोवेळी रचले गेले, हे पाहणेही रोचक ठरावे - https://en.wikipedia.org/wiki/Manifest_destiny#Continentalism

[थोडा छिद्रान्वेषीपणा:

पश्चिमेकडील भाग इंग्लिश भाषा बोलणारा आणि सेंट लॉरेन्स नदीच्या उगमाजवळचा म्हणून त्याला Upper Canada असे नाव मिळाले. पश्चिमेकडील भाग सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाजवळचा म्हणून त्याला Lower Canada असे नाव मिळाले.

यातला अधोरेखित शब्द पूर्वेकडील असा हवा.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0