रिज़वाना

(पूर्वप्रकाशित)

एक दिवस आम्ही ढाब्यावर चहा पीत बसलेलो असताना अचानक आरिफ़भाई तिथे आले. बहुतेक ते माझ्याच खोलीकडे निघाले असावेत. आम्हाला ढाब्यावर पाहून ते थांबले. मला म्हणाले, "माझी बहीण येणार आहे इथे. उर्दूत M.A. करायला. ती तुझ्या खोलीवर राहील." एवढे बोलून निघून गेले. पुढच्या आठवड्यात त्यांचा फोन आला. "खोलीवर आहेस का? मी माझ्या बहिणीला घेऊन येतोय." मी "या" म्हणाले. दोघे दहा मिनिटात माझ्या खोलीवर हजर झाले. "ही रिज़वाना." एवढे बोलून आरिफ़भाई झरकन निघून गेले.
आरिफ़भाई आमचे नाटकवाले मित्र. ते जरा विचित्र वागण्याबद्दल प्रसिद्ध होते आणि तरीही अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या डोक्यात काय चालू असते हे आम्हाला कोणालाच कळत नसे. चारजण एकत्र बसले असतील तरी स्वत:ला वाटेल तेव्हा, कोणाचा निरोप न घेता, काही न बोलता, न सांगता एकदम उठून निघून जाणे ही तर त्यांची अतिप्रसिद्ध खासियत होती. ते इराणी पर्यटकांचे गाइड म्हणून काम करायचे, नाटकांमधून अभिनय करायचे, मुशायरे ऐकयला जायचे, विद्यापीठाच्या छात्र संघटनांमध्ये काम करायचे, दिवसा झोपायचे, रोज संध्याकाळी एक लीटर (त्यांच्या शब्दांत एक किलो) दूध प्यायचे, 'रोजगारनिर्मिती व्हावी’ या उदात्त हेतूने कुठेही कचरा फेकायचे, कायम लोकांना मदत करत हिंडायचे, आणि हो, ते पर्शियन भाषेत Ph.D.ही करत होते. वर्षातून एकदा त्यांना याची आठवण होई. मग चार-पाच दिवस आपल्या चारी-पाची रूममेट्सना आणि मित्रांना कामाला लावायचे. वेगवेगळी पुस्तके, जुने प्रबंध उघडून त्यांच्यासमोर ठेवायचे. त्यातून काय मजकूर उतरवायचा ते सांगायचे. हे लिखाण चालू असताना स्वत: फक्त खूप सिगरेटी ओढत बसायचे. चार-पाच दिवसांनंतर लिखाण थांबवण्याची आज्ञा करून सर्व मित्रांना स्वहस्ते शिजवलेल्या चिकनची पार्टी द्यायचे.
आरिफ़भाई किती आणि कसे लोकप्रिय आहेत त्याची कल्पना मला आमच्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी आली. नाटक ऐन भरात आले होते. गंभीर वातावरण. प्रेक्षकांच्या मनावर थोडा ताण. समोरच्या विंगेतून आरिफ़भाई स्टेजवर येतात, काही वाक्ये बोलतात आणि मी रडू लागते असा प्रसंग होता. वेळेवर नीट रडू यावे म्हणून मी आधीपासून श्वास रोखून उभी होते. आरिफ़भाईंनी स्टेजवर प्रवेश केला आणि शिट्ट्या-टाळ्या सुरू झाल्या. ताण एकदम निवळला. मी बावरले, या गंभीर प्रसंगात लोक शिट्ट्याबिट्ट्या काय वाजवू लागले? माझी साडीबिडी सुटलेली नाही याची मी खात्री करून घेतली. आरिफ़भाईंनी बोलायला सुरुवात केली तसे लोक हसूही लागले. त्या हशानेच मी रडवेली झाले, आणि ज्या ठिकाणी माझे रडणे अपेक्षित होते, तिथे रडले. वेळ निभावली. नाटकात पुढे जितक्या वेळ आरिफ़भाई स्टेजवर आले, तितक्या वेळा टाळ्या आणि हशांचा पाऊस पडला. नाटकानंतर दिग्दर्शक म्हणाले, "अरे आरिफ़भाई, किती हशे वसूल केलेस तू तुझ्या प्रवेशांना!" यावर आरिफ़भाई म्हणाले, "Sorry, मी माझ्या मित्रांना सांगायचे विसरलो की यावेळी माझी भूमिका विनोदी नाही" आणि झरकन निघून गेले.
आरिफ़भाई मुळचे बनारसजवळच्या एका गावचे. त्यांच्या विद्यापीठातले त्यांच्या भागातून आलेले सारे विद्यार्थी त्यांना मानत. ते डाव्या राजकीय पक्षाशी निगडित असल्यामुळे डावे विद्यार्थीही त्यांना मानत. आणि आमच्या नाटकांची निर्मिती-व्यवस्था तेच पाहत. त्यामुळे नाटकवालेही त्यांना धरून असत. आरिफ़भाई जेव्हा शेरोशायरी ऐकवायचे आणि आपल्या गावच्या सुरस व चमत्कारिक कथा सांगायचे तेव्हा तर सगळेजण त्यांच्यावर बेहद फ़िदा होऊन जात. ते शाळेत असताना त्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री शिक्षकांच्या घरावर दगडफेक करून शिक्षकांना धमकावले होते त्याची गोष्ट तर प्रसिद्ध होतीच, पण त्याहून अधिक TRP होता शिकारकथांना. कामांतून थोडी उसंत मिळाली की आरिफ़भाई शिकारीला जायचे. गावाकडच्या मित्रांबरोबर दोन-अडीच तासांचा प्रवास करून कुठल्याशा जंगलात जात. नीलगाय, हरिण आणि कसल्या कसल्या शिकारी करून विविध पशुपक्ष्यांवर ताव मारत. कबूतर त्यांना विशेष प्रिय होते. ते Ph.D करत होते त्या पर्शियन विभागाच्या इमारतीत खूप कबूतरे झाली होती. एकदा रात्री उशीरा ते कसे इमारतीत शिरले, चादर टाकून कसे एक कबूतर पकडले, मग वॉचमनने त्यांना कसे पकडले, आणि त्या गडबडीत पिशवीत टाकलेले कबूतर कसे उडून गेले याची हळहळती हकीगत ज्या व्यक्तीने ऐकलेली नाही, तिने आपला जन्म व्यर्थ गेला असे समजावे.
आरिफ़भाई इराणी पर्यटकांचे गाइड म्हणून काम करत. देवळे वगैरे बघताना पर्यटक त्यांना हिंदू धर्म, देवदेवता, पुराणकथा, साधू वगैरेंविषयी विचारून 'त्रस्त करून सोडत’. (एकदा अशा 'त्रास देणाऱ्या’ पर्यटकाला आरिफ़भाईंनी नंगा भिकारी दाखवून 'हाच साधू’ असे सांगून त्याचे तोंड बंद केले होते.) पर्यटकांच्या प्रश्नांनी त्रासून कधीकधी आरिफ़भाई आम्हाला हिंदू धर्माविषयी शंका विचारायला यायचे. कुठल्या देवाचे काय वैशिष्ट्य हे लक्षात ठेवणे त्यांना फार जड जात असे. मग ते वैतागायचे. लहानपणी टीव्हीवर महाभारत बघितले असते तर थोडी तरी माहिती झाली असती म्हणून हळहळायचे. ते लहान असताना त्यांच्या घरात टीव्ही नव्हता. मुले शेजारपाजारच्या टीव्हीवर महाभारत बघायला जातील या भीतीने महाभारत लागण्याच्या वेळेला घरात मुलांची शिरगणती व्हायची. त्यावेळी प्रत्येकाने घरीच राहिले पाहिजे अशी अट होती.
एका देवळात वेगवेगळ्या पुराणकथांची चित्रे काढलेली होती. आरिफ़भाईंना ती समजत नव्हती. म्हणून एक दिवस आरिफ़भाई आणि त्यांना गाइड करायला मी असे त्या देवळात गेलो. प्रत्येक चित्रासमोर उभे राहून त्यांना गोष्ट सांगावी लागली. त्यांच्या शंका फार. नाना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यातून, आमची देवळाविषयीची आस्था पाहून पुजारीबाबा पूर्ण वेळ आमच्या मागे मागे फिरत होते, त्यामुळे माझ्या मनावर किंचित दडपण आले. मंदिर मोठे होते. चित्रे पाहून आम्ही आणखी आत गेलो. एक चौक होता. समोर कोरीवकाम केलेली, उंच कळसाची एक अजून एक इमारत होती. त्यात शेकडो कबूतरे होती. चौकात शिरताच आरिफ़भाई ओरडले, "कबूतर!" एखाद्या लहान मुलाला खूप केक, चॉकलेटे, आइस्क्रिम वगैरे दिसल्यावर जसा आनंद होईल, तसा आनंद आरिफ़भाईंच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागला. मी घाबरले, आता हे पकडतात की काय एखादे कबूतर! "आरिफ़भाई, चला परत. मला उशीर होतोय." बळजबरीनेच त्यांना बाहेर काढावे लागले.
तर, आरिफ़भाईंची बहीण रिज़वाना. ती माझ्या खोलीवर राहायला आली.

रिज़वाना कमालीची गोड मुलगी होती. लाजरीबुजरी, बारकुडी, सावळी, चमकदार डोळ्यांची; खळी पाडून हसणे. तोंडातून एक शब्द निघेल तर शपथ! काही विचारले, की नुसती ह्सायची. तेसुद्धा 'मंद स्मित’ इतपतच. खूपच मागे लागले तर विचारलेल्या प्रश्नाचे एक-दोन शब्दांत उत्तर द्यायची नि परत मंद स्मित. माझ्या खोलीवर सतत कोणी ना कोणी येत असायचे. गाण्याची प्रॅक्टिस करायला, कॉम्प्युटरवर पिक्चर बघायला, पुस्तकांची अदलाबदल करायला - अश्शा विविध कारणांनी मैत्रिणी यायच्या आणि गप्पा मारत बसायच्या. इतक्या गप्पांत रिज़वानाने चुकूनसुद्धा कधी तोंड उघडले नाही. कधीतरी एखादा कटाक्ष टाकून, खळी पाडून हसायची फक्त.
एक दिवस रिज़वाना ह्ळूच म्हणाली,
"केस कुठे कापून मिळतील?"
मी तिला दोन-तीन ठिकाणे सांगितली. ती म्हणाली,
"मी तर कोणाला ओळखत नाही इथे. मी कशी जाऊ एकटी? तुम्ही याल का माझ्याबरोबर?"
मी बरोबर जायचे कबूल केले. आवाज आणखी खाली आणत ती म्हणाली,
"पण आरिफ़भाईंना सांगू नका. त्यांना कळले तर रागवतील."
"केसांची लांबी बघून कळेलच की."
"मी ओढणी घेईन डोक्यावरून. आणि घरी जाईन ईदला, त्याला अजून अवकाश आहे. तोपर्यंत वाढतील. म्हणजे घरीही कळणार नाही.आमच्या सगळ्यात मोठ्या भावाचे लग्न होते, तेव्हा मी आणि माझी बहीण गुपचूप जाऊन केस कापून आलो. अम्मीला माहीत होते, पण अब्बूंना सांगितले नव्हते. मी केर काढत असताना अचानक डोक्यावरून ओढणी घसरली, आणि अब्बूंना केस दिसले. ते अतिशय चिडले. म्हणाले - जिचे केस कापले तीही हरामी आणि जिने केस कापले तीही."
हे सांगताना तिचे डोळे असे काही मिश्किलपणे चमकत होते!
अशा रीतीने आमचा संवाद सुरू झाला. मुली निघून गेल्या आणि आम्ही दोघीच खोलीवर उरलो की ती चक्क बोलू लागली. आम्ही तास तास गप्पा मारू लागलो. एका खोलीवर राहणाऱ्या दोन अनोळखी व्यक्ती एकमेकींना ओळखू लागल्या.
रिज़वाना रोज सकाळी उठून इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही पेपर बराच वेळ घेऊन बसायची. तिला ना मराठीचा गंध होता ना फारसे इंग्रजी येत होते. पण रोज नेमाने ती वाचायची. एकदा माझे आणि माझ्या मैत्रिणीचे मराठी संभाषण तिने ऐकले. आम्ही पाचच मिनिटे बोललो असू. मैत्रीण निघून गेली, तशी आयुष्यात पहिल्यांदा मराठी ऐकलेली ही मुलगी म्हणाली,
"आणि का मतलब 'और’ होता है?"
मी थक्क झाले.
एकदा रिज़वानाने विचारले,
"तुम्ही सायकल चालवता?"
"हो, तुला चालवून पाहायची आहे?"
भुवया उडवत ती म्हणाली,
"मी कधीच सायकलवर बसलेली नाही. तुम्ही शिकवाल मला?"
मी रोज ठरवत असे, हिला उद्या नक्की सायकल शिकवायची.
'मला कॉम्प्युटर शिकवा’ असे तिने बरेचदा आरिफ़भाईंना सांगून पाहिले. आरिफ़भाईंना कुठला एवढा वेळ असायला! पण ती माझ्या कॉम्प्युटरवर उर्दू टायपिंग करत बसे. तिला बऱ्यापैकी टायपिंग येत होते. मग मी तिला 'इंटरनेट’ या प्रकाराची ओळख करून दिली. इतक्या चकाकत्या, उत्सुक डोळ्यांना शिकवायला कोणालाही छानच वाटेल.

रिज़वानाचे वडील मौलाना, आई शिक्षिका होती. रिज़वाना माझ्या खोलीवर राहायला आली, तेव्हा तिची आई गेलेली होती. कधीतरी तिच्या बोलण्यात आईच्या आजारपणाचा उल्लेख यायचा. सख्खी भावंडे एकूण सात. तीन भाऊ, चार बहिणी- हादी, आरिफ़, जहाँनज़ीर, रिज़वाना, गुलशब्बो, शब्बीर, निलोफ़र. शिवाय शेजारीच दोघा काकांचीही कुटुंबे राहायची.
"सगळे एकत्र जमतात, बाहेरगावी राहणारी मुले-मुली, लग्न झालेल्या मुली आपापल्या पोरांसह घरी येतात, तेव्हा एकूण शंभरेक लोक होतात."
याशिवाय तिला ओळख्ही न दाखवणारी, पण आरिफ़भाईंचे लाड करणारी तिची खाला (मावशी), मुंबईला एका खोलीत राहणारी पण मुंबईच्या फुशारक्या मारणारी मामी आणि तिची आगाऊ पोरे, एका गावात राहूनही जिच्या घरी ती कधीच गेलेली नव्हती अशी श्रीमंत आजी, रिज़वाना ज्यांना कायम सांभाळत असे, ती 'चच्ची’ची चार पोरे अशा बऱ्याच नातेवाईकांविषयी ती बोलायची.
रिज़वानाकडे भल्याभल्या कंपन्यांच्या, ब्रॅण्ड्सच्या उत्तम वस्तू असायच्या - मोबाईल, शाम्पू, क्रीम्स. तिचा सगळ्यात मोठा भाऊ - हादीभाई - सौदीला राहायचा, तो बहिणींचे असे लाड करायचा. शिवाय नेहमी फोन, SMS करून उपदेशही करायचा, धार्मिकता सोडू नका. तिच्या गावातील प्रत्येक घरातील किमान एकजण तरी सौदीत असतोच म्हणे. सौदीच्या भावाचा पगार आणि आरिफ़भाईंचे टूरिस्ट-गाइडिंगचे पैसे यावर प्रामुख्याने कुटुंब चालायचे.
"घरी कायम पैशाची कडकी असते. मग आम्ही या दोन भावांकडूनच पैसे घेतो. नाही दिले तर भांडून मागून घेतो."
सौदीवाल्याची बायकोही कमावती होती. ती गावातल्याच शाळेत शिकवायची. नोकरी आहे तर कशाला सोडा, म्हणून भारतातच राहायची. सुट्टीत सौदीला जायची. तिची शाळा सरकारी, पण पोस्ट खाजगी असे काहीतरी त्रांगडे होते. नाममात्र पगार. म्हणून तिला सरकारी पोस्ट मिळावी असे प्रयत्न चालू होते. पन्नास हजार दिले तर काम होईल असे कळले होते. आरिफ़भाई, त्यांचे वडील खटपट करत होते.
एक दिवस रिज़वानाने सौदीवाल्या भावाचा SMS मला दाखवला -
'अजूनही नकाब (बुरखा) वापरतेस ना? आपली संस्कृती विसरू नकोस. धर्माविरुद्ध वागू नकोस.’
तिची वहिनी सौदीचे फोटो आणायची, तर प्रत्येक फोटोत एक बुरखाधारी व्यक्ती. "तीच वहिनी असे आपण समजून घ्यायचे." रिज़वाना हसत हसत म्हणाली. आमचे आरिफ़भाई तर बुरख्याच्या एकदम विरुद्ध. गावातून आल्या आल्या त्यांनी तिला बुरखा काढायला लावला. म्हणाले,
"इकडे नाही वापरायचा."
रिज़वानाने त्या क्षणापासून बुरखा वापरणे सोडून दिले. तिने कारणही विचारले नाही. तक्रारही केली नाही. बुरखा काढायला लागल्याबद्दलही नाही, बुरखा घालण्याबद्दलही नाही. इथे बुरखा घालायला लागत नाही याचा तिला आनंदही नाही, धर्म बुडाला वगैरे दु:खही नाही. घरी जाताक्षणी परत बुरखा घालायला लागेल याचेही दुःख नाही, किंवा तो घालायची आवडही नाही. कुठल्याही परिस्थितीत ती तेव्हढ्याच आनंदात राहील. खळी पाडून हसेल. भुवया उडवेल. तिचे डोळे चमकतील. 'बुरख्यात उकडत नाही का?’ 'कंटाळा येत नाही का?’ 'नकोसा वाटत नाही का?’ अशा सर्व प्रश्नांना तिचे एकच उत्तर असे - 'सवय होते’. एकदा म्हणाली,
"घरातील किंवा गावातील कोणी फोन केला तर सगळ्यात आधी हेच विचारतात, नकाब वापरतेस की नाही? अभ्यास कसा चालू आहे कोणी विचारत नाही. मुलगी सातवी - आठवीत गेली की अमच्याकडे कुजबूज सुरू होते - एवढी मोठी झाली तरी नकाब वापरत नाही म्हणून. मग घ्यावाच लागतो. माझी धाकटी बहीण टाळाटाळ करायची. एकदा अब्बू भयंकर ओरडले, मग काय बिशाद ...रोज घालायला लागली."
एके दिवशी तर तिने मला तिच्या शाळेतील बाईंची धमाल गोष्ट सांगितली. कुठल्याही परपुरुषाला आपला चेहरा दिसलेला नाही याबद्दल त्यांना भलताच अभिमान होता. पुरुषांनीच काय, शाळेतील मुलींनीही त्यांचा चेहरा कधीच पाहिला नव्हता. वर्गात शिकवताना बुरखा काढला आणि वर्गावरून कधी मौलानांनी चक्कर मारली, तर त्यांना चेहरा दिसेल म्हणून त्या मुलींच्या वर्गातही बुरखा पांघरत. या बाई कुठे परदेशी निघाल्या होत्या विमानाने. विमानतळावर तपासणीच्या वेळी बाई बुरखा हटवायलाच तयार होईनात. त्यांच्यामुळे विमान इतके लेट झाले की दुसऱ्या दिवसापर्यन्त उडालेच नाही. पण बाईंनी हट्ट सोडला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी त्यांना तसेच, चेहरा न पाहता आत सोडण्यात आले.
"पण का घालतात बुरखा?" मी एकदा न राहवून विचारले.
"आमच्याकडे छेडछाड होते फार. नकाब न घेता एखादी मुलगी बाहेर पडली तर तिची नक्की छेड काढतात. एकदा माझी एक मैत्रीण बिना नकाब बाहेर गेली तर एका मुलाने तिच्या हनुवटीला हात लावून ’सलाम आलेकुम’ केले. कोणी शिकत-वाचत नाही आमच्याकडे दीदी, फार अडाणीपणा. असे रिकामटेकडे उद्योग. म्हणून नकाब. आम्हाला मोकळेपणी बाहेर हिंडताफिरता येते."
माझ्या दृष्टीने बुरखा हे बंधन होते. तिच्या दॄष्टीने ते बाहेर फिरण्याची मोकळीक देणारे साधन होते.

रिज़वाना दोन दिवस अस्वस्थ असल्यासारखी वाटत होती. बोलेचना. 'काय गं, आरिफ़भाई ओरडले का?’ 'कुणाशी भांडण झाले का?’ सगळ्या प्रश्नांना नकारार्थी उत्तर देउन परत आपली चिमणीसारखे तोंड करून बसायची. आरिफ़भाईंकडून कळले की त्यांच्या गावात काहीतरी गडबड झाली आहे. कर्फ्यू जारी आहे. कोण्या गब्बर व्यक्तीच्या गाडीखाली तीनजण चिरडले गेले. पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याने लोक चिडले आणि त्यांनी पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. पोलिसांना वाटले की मुस्लिमबहुल भाग आहे, हिंदू-मुस्लिम दंगल पेटल्याचे निमित्त करून कडक उपाय योजता येतील, म्हणजे लोकांचा पोलिसांविषयीचा राग दडपता येईल. पोलीसच स्वत: दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांचा कावा लोकांनी ओळखला, एकीने गाडीवाल्याच्या विरोधात उभे राहिले. पोलिसांनी कर्फ्यू लावला. मोबाईलच्या टॉवर्वर चढून गावावर गोळीबार केला. रिज़वाना म्हणाली,
"आमच्याकडे सतत असले काहीतरी होत असते. कर्फ्यूचीही सवय झाली आहे. कर्फ्यू लागणार असे कळले की आम्ही पटापट भरपूर किराणा खरेदी करून ठेवतो. पण तरी माझ्या अप्पीची काळजी वाटते."
रिज़वानाच्या बोलण्यात ही अप्पी सतत येत असे. ती पण 'माझी’ या विशेषणासहित. ही अप्पी कोण ते मला बरेच दिवस कळत नव्हते. अप्पी म्हणजे तिची ताई. घरातील बाकी सगळे एवढे शिकलेले असूनही ही अप्पी मात्र पाच-सहा इयत्ताच शिकलेली याचेही मला आश्चर्य वाटे. एक दिवस कोडे उलगडले. रिज़वाना सांगत होती,
"आईचे आजारपण सुरू झाले. घरची कामे कोण करणार? आम्ही सगळीच मुले लहान होतो. तरीपण सगळी मिळून सांभाळायचो. आरिफ़भाई स्वयंपाक करायचे. थोड्या दिवसांनी हादीभाई नोकरीसाठी सौदीला गेले. आजारपणामुळे पैशांची गरजही होतीच. पाठोपाठ आरिफ़भाई शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडले. उरलेल्या भावंडांत अप्पीच सगळ्यांत मोठी. तिने शाळा सोडली आणि वर्षानुवर्षे घर सांभाळले. तिच्या बरोबरीच्या मुली पुढे शिकल्या, त्यांची लग्ने होऊन पोरेही झाली. ही अजूनही आमचे घर सांभाळत आहे. तिच्यामुळे आम्ही सगळे शिकू शकलो, गावाबाहेर पडू शकलो. त्यामुळे आम्ही तिला खूप मानतो. आरिफ़भाईही नेहमी म्हणतात, आज मी जो आहे तो तिच्यामुळे. आरिफ़भाई तिच्या लग्नात तिच्या नावाने एक घर बांधून देणार आहेत. प्लॉट घेतला आहे."

रिज़वाना रात्री लवकर झोपून जायची. रात्री कोणी मैत्रिणी खोलीवर आलेल्या असल्या की गप्पांना ऊत यायचा. ती झोपलेली असली तरी आमची गप्पासत्रे चालूच. मग आम्हाला अपराधी वाटे.
"तू घरीही इतकी लवकर झोपायचीस का?"
एकदा आमच्या एका मैत्रिणीने तिला विचारले.
"नाही. घरी तर कमीत कमी दोन-तीन वाजेपर्यन्त जागावे लागते. काम असते."
"इतक्या रात्री काय काम असतेघरी?"
"माग चालवायला लागतो."
"माग? वॉव! तुमच्याकडे हातमाग आहे?" दुसऱ्या एकीला ते फारच 'कूल’ वाटून ती चीत्कारली.
"नाही. यंत्रमाग. दोन. आमच्याकडे दहा दहा तास वीज नसते. मग जेव्हा केव्हा वीज असेल तेव्हा माग चालवावा लागतो. रात्र आहे का अपरात्र न बघता."
"तुमचा पारंपरिक व्यवसाय विणकराचा का?"
"आमच्या भागात सगळीकडेच माग चालतात. गावात प्रत्येक घरी माग असतोच. रात्रंदिवस सगळीकडे विणकामच चालू असते."
मी विकिपीडिया उघडला. तिच्या जिल्ह्यात एकूण किती हजार माग आहेत ते सांगून रिज़वानाला चकित केले.
"घरोघरी साड्या विणल्या जातात. एकेका वेळी ६०/ ७० साड्यांची ऑर्डर असते. एकेक साडी कमीतकमी हजार रुपयाला विकली जाते. अगदी दहा हजारापर्यन्तच्या साड्याही आम्ही विणतो. जितका रुंद काठ तितकी महाग साडी. पण आम्हाला - विणणाऱ्यांना शंभर रुपये जेमतेम मिळतात. क्वचित १५०. त्याहून अधिक नाही."
"तुम्ही स्वत:च साड्या डिझाईन करता का?"
"नाही. साड्यांची डिझाईन बनवणे हा स्वतंत्र व्यवसाय असतो. ते लोक चिकार कमाई करतात. शिवाय घरोघरी कच्चा माल देऊन ऑर्डरप्रमाणे विणून घेणे आणि विणलेल्या साड्या गोळा करून शहरात जाऊन विकणे हा आणखी वेगळा व्यवसाय. आम्ही स्वत: काहीच ठरवू शकत नाही. मी काय करते, माग चालू करून टीव्ही बघत बसते. मधे मधे जाऊन दोरे अडकत नाहीत ना ते पाहून यायचे. मला नाही इतके छान विणता येत. माझी बहीण फार सुरेख विणते."
"कारखाने नाहीत का तुमच्या भागात? सगळ्यांच्या घरी स्वत:चे माग असतात?"
"कारखाने आहेत. ज्यांच्याकडे घरही नसते ना, असे लोक कारखान्यात जाऊन विणतात. बाकी घरीच."

"काय गं, तुला पिक्चर बघायला आवडतात का?" एक दिवस मी रिज़वानाला विचारले.
"मग? टीव्ही आहे ना आमच्या घरात. आरिफ़भाई घरी आले की कॉम्प्युटरवरही दाखवायचे."
"सिनेमा हॉलमधे नाही का न्यायचे?"
"छे, छे. शक्यच नाही. मुली तर सोडाच, मुलगेही थिएटरमधे पिक्चर बघायला गेलेले अब्बूंना आवडत नाही. छोटा भाऊ जातो बिनधास्त, आल्यावर अब्बूंना सांगतोही आणि भांडतो. मुली मात्र कधीच जात नाहीत."
"कुठल्याच मुली जात नाहीत? का फक्त तुमच्या घरातल्या मुली?"
"नाही. तुमच्या हिंदूंच्या मुली जातात की. आम्ही मुसलमान मुली अशा वागलो तर आम्हाला गावात चारित्र्यहीन समजतील. एवढेच काय, तुम्ही हे नाचगाणी, नाटक करता ... आमच्यात असे काही चालत नाही."
"आरिफ़भाई करतात ते?"
"त्यांचे कुठे पटते अब्बूंशी? आरिफ़भाई फारसे धर्म पाळत नाहीत. चुकून कधी रोजे ठेवलेच, तरी सिगरेट पितात. मी पाहिले आहे ना माझ्या डोळ्यांनी. मग अब्बूंशी भांडणे."

आपले गाव भारताच्या नकाशात कुठे येते याबद्दल रिज़वानाला कल्पना नव्हती. मग तिला एक मोठा नकाशा दाखवला. त्यात तिचे गाव, दिल्ली, मुंबई, लखनऊ, बनारस वगैरे तिला माहीत असलेली शहरे दाखवली. तिने माझ्या सर्व मैत्रिणींची नावे घेऊन त्यांची शहरे, गावे कुठे आहेत ते पाहून घेतले. मग तिला जगाचा नकाशा बघायचा होता. इंग्रज लोक, ओठ-नाक मोठे असलेले कुरळ्या केसांचे लोक यांचे देश, सौदी, रियाध हे सगळे तिने विचारून घेतले. 'South Pacific Ocean' लिहिलेले वाचताना मोठ्या प्रयासाने तिने 'South' एवढेच वाचले आणि उद्गारली, 'साऊथ आफ्रिका!’ मी जे जे काय सांगितले ते तिने नीट ऐकून घेतले, नकाशाचे बारीक निरीक्षण केले आणि शेवटी नकाशात रियाधचे स्पेलिंग चुकीचे असल्याचे जाहीर केले.

या मुलीची सामाजिक आणि राजकीय जाण चांगलीच होती. दंगली, निवडणुका, राजकीय पक्ष, नेते अशा विषयांवर ती पटापट बोलायची. एकदा काहीतरी बोलणे चालू असताना मी विचारले,
"तू मतदान केले आहेस की नाही कधी?"
"हो, मशीनचे बटण दाबूनही आणि त्याआधी शिक्का मारूनही."
मी मनातल्या मनात हिशोब केला, ही अठरा वर्षांची झाली तोवर मतदानयंत्रे सगळीकडे आलेली होती. हिने शिक्का मारून कसे काय मतदान केले?
"आमच्याकडे भरपूर फसवणूक चालते ना ...." ती हसली. तिचे डोळे चमकले.
"आम्ही बोगस मतदान करतो. कोणी मेलेले असते, कोणी गावात राहात नसते. आम्ही त्यांच्या नावावर मतदान करतो. एक मत देऊन बाहेर आले की केमिकलने नखावरची शाई पुसायची, की दुसऱ्या केन्द्रावर. नकाब असल्याने फारशी अडचण येत नाही. अठरा वर्षांची होण्यापूर्वीच मी बोगस मतदान केले आहे. पैसे मिळतात. आमच्या भागात तर या कामात वाकबगार म्हणून काहीजण प्रसिद्ध आहेत. एकाने एकदा एका दिवसात ३५ वेळा मतदान केले." खुशीत येऊन ती सांगत होती.
"अगं बये, पण असे करणे चुकीचे नाही का?"
ती परत एकदा हसली. डोळे चमकले.
तिच्या छोट्या बहिणीला एकदा पोलिसांनी पकडले होते बोगस मतदान करताना. इतकी बारकीशी पोरटी पाहिल्यावर पोलिसांना कळलेच. बुरखा असला म्हणून काय झाले? पोलिसांनी चौकीत बसवून ठेवले. मग लागली धोधो रडायला. पूर्ण गावात बातमी पसरली - मौलानासाहेबांच्या मुलीला पकडले. तिच्या अब्बूंनी येऊन तिला सोडवून नेले.
'वर्गात शिकवलेले समजत नाही’ असे रिज़वाना बऱ्याचदा म्हणायची. 'सुरुवातीला होते असे, हळुहळू समजेल’ असे मी तिला समजावत असे. उर्दूबरोबर अरेबिकही शिकावे लागेल असे तिच्या प्रोफेसरांनी सांगितल्यावर ती जरा घाबरलीच. आता कसे निभावणार?
"अगं, तू शाळेत शिकली आहेस ना अरेबिक?" मी विचारले.
लाजत ती म्हणाली, "चिटिंग करून पास झाले आहे. इंटरला (बारावी) काही अभ्यासबिभ्यास नाही केला, कॉपी होते ना आमच्याकडे!" भुवया उडवत पुढे म्हणाली, "शिकवणाऱ्यांनाच फारसे काही येत नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना येण्याचा प्रश्नच नसतो. मग पूर्ण परीक्षाकेन्द्रच कॉपी करते. आडगावातील केन्द्र निवडून 'गाईड’ बरोबर घेऊन जायचे, सर्व जणांनी सर्व उत्तरे गाईडमधे बघून लिहायची आणि मजेत पास व्हायचे!
"तुम्ही स्वत: कसे केन्द्र निवडता?"
"पैसा असेल तर काय करता येत नाही सांगा? आम्हा प्रत्येकाकडून १८०० रुपये घेतले होते शाळेने. त्यांनीच सगळी सोय केली. हे तर काहीच नाही, काही वर्षांपूर्वी बारावी पास होणाऱ्यांना वीस हजार रुपये देण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. मग काय, अचानक शेकडो लोकांनी आपल्या विविध वयाच्या पोरापोरींना इंटरला घातले. कॉपी करून सगळे पास झाले आणि वीस वीस हजार मिळवले. सत्तापालट झाल्यावर हे बंद झाले."
हा प्रकार आता बंद झाला हे ऐकून, गोष्टीतील राजपुत्राने राक्षसाला मारल्यावर व्हावा तसा आनंद मला झाला. पण तिला वाईट वाटलेले दिसले.
"मला पण मिळाले होते ना वीस हजार. वाटले होते, दोघी धाकट्या बहिणींनाही मिळतील. पण...बंदच झाली ना योजना.." ती चुकचुकली.
"केलेत काय तुम्ही इतक्या पैशांचे?"
"इतके पैसे मिळाल्यावर नातेवाईक, शेजारी म्हणू लागले, जेवायला कधी बोलवताय? पाचसहा हजार मेजवान्यांतच गेले. सगळ्यांना गोश्त खिलवले. उरलेल्या पैशातून खूप शॉपिंग केले घरातल्या सगळ्यांसाठी." मी डोक्याला हातच लावला.

एक दिवस विद्या आमच्या खोलीवर आली. तिला कुठल्याशा पार्टीला जायचे होते. तिने रिज़वानाकडून मेक-अप करून घेतला. हेअरस्टाईल करून घेतली. रिज़वानाचा कुर्ताही हौशीने मागून घेऊन घातला. तयार झाल्यावर विद्या आरशात स्वत:ला न्याहाळत असताना एकदम म्हणाली,
"शी! मी तर अगदी मुसलमान दिसते आहे."
आणि घाईघाईने काळ्या रंगाचा एक ठिपका भुवयांमधे लावला. माझा चेहरा साफ पडला. रिज़वानाने एकदा माझ्याकडे पाहिले आणि फार समजुतीचे हसली फक्त.

रिज़वानाची आणि माझी हळुहळू छान मैत्री झाली होती. इतक्यात अचानक मला आपले बस्तान हलवावे लागले. रिज़वानाची जबाबदारी आरिफ़भाईंवर परत सोपवून मी काहीशा गडबडीनेच दुसऱ्या शहरात राहायला गेले. रिज़वानाला इंग्रजी शिकायचे होते, कॉम्प्युटर शिकायचा होता, सायकल चालवायला शिकायचे होते. सगळेच राहून गेले. तिच्याबरोबर केव्हाच केस कापायला जायला हवे होते. तिला थिएटरमधे न्यायला हवे होते. मला फार चुटपुट लागून राहिली. जसजशी मी नव्या शहरात नव्या कामात गुंगत गेले तसतसे नाटक - आरिफ़भाई - शिकारकथा - रिज़वाना - तिची अप्पी - कर्फ्यू - माग सगळे मागे पडत गेले.
कधी कबूतर दिसले तर आरिफभाईंची आठवण येते. कधी पेपरात बोगस मतदानाच्या बातम्या आल्या की रिज़वानाची आठवण येते. त्याबरोबर, नवे शिकायला उत्सुक असलेले तिचे चमकदार डोळे आठवतात. असे डोळे सगळ्यांना मिळतीलच असे नाही, आणि अशा डोळ्यांची माणसे सगळ्यांना भेटतीलच असेही नाही!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

अहा.. काय सुरेख लेख आहे. कुठे फुकाची समाजसुधारणेची चूष नाही, फुकट अंग हेलकावून सहानुभूतीने चुकचुकणे नाही. निरीक्षणे मात्र अगदी चौफेर - चौफेरच का, ३६० अंशांमध्ये, आहेत आणि किती बोलकी - नि तरी किती सटल - आहेत. तुम्ही अजून लिहा बा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आवडला. या विश्वाशी थोडा का होईना परिचय असल्याने अधिक रिलेट झाले. एकच नंबर.

(ईदप्रेमी मिरजकर) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्या बात! खूप दिवसांनी छान काहीतरी वाचायला मिळालं. मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काही मुस्लिमांशी परिचय आहे.
जगणे ओळखीचे वाटले.
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं.
पण काही शंका :-

पैसा नसेल तर काय करता येत नाही सांगा? आम्हा प्रत्येकाकडून १८०० रुपये घेतले होते शाळेने

हे वाक्य "पैसा असेल तर....." असे असायला हवे होते ना ?
.
.

एक दिवस विद्या आमच्या खोलीवर आली. तिला कुठल्याशा पार्टीला जायचे होते. तिने रिज़वानाकडून मेक-अप करून घेतला. हेअरस्टाईल करून घेतली. रिज़वानाचा कुर्ताही हौशीने मागून घेऊन घातला. तयार झाल्यावर विद्या आरशात स्वत:ला न्याहाळत असताना एकदम म्हणाली,
"शी! मी तर अगदी मुसलमान दिसते आहे."

'विद्या'ला तुमच्या रुममेटचं मुस्लिम असणं ठौक होतं का ? की ठौक नसताना ही कमेंट आली ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलय. आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! खासच लेखन आहे.
पुन्हा पुन्हा वाचावं असं.. मस्तच मस्त!

अजून लिहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार सुंदर लेख, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या लेखणीतून रिजवानाचे व्यक्तीचित्रण फारच सुरेख उतरले आहे. मात्र याचे श्रेय केवळ तुमच्या प्रतिभेला द्यायचे की तुमच्या आणि रिजवानाच्या नातेसंबंधाला (जर ते खरोखरीच असतील तर) अशा संभ्रमावस्थेत पडलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर व्यक्तीचित्र. कितीतरी दिवसांनी एवढं नेमकं आणि अविर्भाव-रहीत वाचायला मिळालं. कुठलीही भूमिका नाही ,काही उपदेशाचा, शहाणपणाचा आव नाही. खूप खूप छान .

आणि लिहीत रहा. अजून खुप काही असेल तुमच्या खजिन्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

* प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार...आपलं.. शुक्रिया!

* मनोबा, 'पैसा असेल तर' असं हवं होतं. दुरुस्त करते.
रि़जवानाचं मुस्लिम असणं विद्याला ठाऊक आहे का नाही, मलाही ठाऊक नाही. ते त्रोटक पात्र असल्याने एवढा विचार नव्हता केला. ठाऊक असो वा नसो, विद्याचे उद्गार अनुदारच आहेत.

*

तुमच्या आणि रिजवानाच्या नातेसंबंधाला (जर ते खरोखरीच असतील तर)

रिजवाना माझी खरोखरीची मैत्रीण होती (नाव वेगळं). तिच्या दोन धाकट्या बहिणी, दोन भाऊ, एक वहिनी असे सगळे एकाच वेळी एकाच विद्यापीठात शिकत होते, आणि माझ्या दोस्तांपैकी होते. नमुनेदार मंडळी होती सगळी! या लेखनातला बराच भाग (अगदी तसाच्या तसा घडलेला नसला तरी) खराखुरा आहे. पण लहानपणी तुपट भटी वातावरणात वाढलेल्या माझी या सगळ्यांशी मैत्री होऊ शकली, आणि मी त्यांना समजून घेऊ शकले त्याचं कारण म्हणजे त्या सुमाराला मी multiculturalism, alternative rationality, alternative modernity वगैरे थिअर्‍या शिकत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण लहानपणी तुपट भटी वातावरणात वाढलेल्या माझी या सगळ्यांशी मैत्री होऊ शकली, आणि मी त्यांना समजून घेऊ शकले त्याचं कारण म्हणजे त्या सुमाराला मी multiculturalism, alternative rationality, alternative modernity वगैरे थिअर्‍या शिकत होते.

रोचक आहे. जे तुपट भटी वातावरणात वाढलेले नसतील त्यांना बहुधा या सर्व सैद्धांतिक होमवर्कची गरज पडत नसावी असे कैक उदाहरणांवरून दिसते. एनीवे, थेर्‍यांचा उपयोग झाला हेही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अलबत ! किंबहुना अशा थेर्‍या वाचून त्या वास्तविक जगात अप्लाय करणार्‍या माझ्या बघण्यात तर तुम्हीच पहिल्या ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशिब माझे की मला कोणाशी मैत्री करायला त्याचा धर्म, जात वगैरे बघायला लागत नाही. आणि घर्म्/जाती बाहेर मैत्री करायला कधी कुठल्या थियर्‍यांचा अभ्यास पण करायला लागला नाही.
मला न आवडणारी लोक जास्त करुन माझ्याच जातीतली आहेत कारण त्यांच्याशीच जास्त संबंध येतो.

@ चार्वी - तुमच्या उदाहरणावरुन असे वाटते की अरबस्तानात ह्या थियर्‍या शिकवणे आणि शिकणे कंपलसरी करायला पाहीजे म्हणजे एकुणातच समस्या कमी होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशिब माझे की मला कोणाशी मैत्री करायला त्याचा धर्म, जात वगैरे बघायला लागत नाही. आणि घर्म्/जाती बाहेर मैत्री करायला कधी कुठल्या थियर्‍यांचा अभ्यास पण करायला लागला नाही.

सेम हिअर.

बाकी ते तुपट भटी अपब्रिंगिंगचा इफेक्ट कमी झाला म्हणून मांसट , खजुरट इ. अरबी अपब्रिंगिंग कमी होईल असे सांगता येईल याबद्दल शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

alternative rationality

मंजे काय ओ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुपट भटी' प्रकाराबद्दल अगदी सहमत. थिअऱ्या शिकलेल्या नसल्यामुळे multiculturalism, alternative rationality, alternative modernity वगैरे गोष्टी जेव्हा धाडकन समोर आल्या तेव्हा माझी बरीच तारांबळ उडाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे व्यक्तिचित्र वाचायचंच राहून गेलं होतं. आऱिफभाई आणि रिज़वाना दोघेही डोळ्यासमोर उभे राहिले. जबरदस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख लिहिलंय...

व्यक्तिचित्रणासाठी जो फ्लो हवा, त्याची लय बिलकुल बिघडूं दिली नाही...

उलट तुमच्या बारीक, अचूक निरीक्षणातून आलेले डिटेल्सनी मजा आली...

एकहि धागा तुटला नाही...याची जाणीव ठेवली...

अभिनंदन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग