विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र

"समुद्राचा विस्तार निश्चल आहे. त्याच्या किनाऱ्यावरील क्षारांच्या खडकांत मृत आकृती जन्म घेतात, प्रतिबिंबांत आपल्या खुणा उमटवतात. परंतु त्यामुळे समुद्रात विचलता येत नाही. त्याला भरती नाही म्हणून त्याला ओहोटीही नाही. त्याच्यात जन्माचा स्फोट नाही त्यामुळे मरणाचे विसर्जनही नाही. त्याला मृत्यूची भीती नाही, त्यामुळे मृत समुद्र अमर आहे.

त्यालाच चिंतन नाही, कारण त्याच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे.

आता समुद्र केवळ आहे."

जी. ए. कुलकर्णी, ‘अस्तिस्तोत्र’ - सांजशकुन, पॉप्युलर प्रकाशन.
-----

जी. ए. कुलकर्णींच्या कथांमध्ये आपल्याला एका अजब विश्वातून भरकटवत नेण्याची शक्ती आहे. त्यांच्या प्रासादिक भाषेमुळे हा प्रवास करताना आपण गुंग होऊन त्या विश्वात सामावून जातो. 'अस्तिस्तोत्र' ही अशी बलवान कथा. ही खरी तर कथा म्हणण्यापेक्षा मृत समुद्राच्या अस्तित्वाचं, त्याच्या आसपास चालू असणाऱ्या अव्याहत मृत्यूचक्राचे चित्रण आहे. किनाऱ्यावर महाप्रचंड प्राण्यांचे अवशेष मृत्यूच्या खुणा दाखवतात. एकेकाळी कोण्या जिवाला आधार देणाऱ्या त्या हाडांमध्ये कोणी नवीन जीव आसरा घेतो, मृत पावतो आणि त्याचा सांगाडा अजून दुसऱ्या जिवाला आत पोसतो. एकात एक गुंतलेली ही जिवांची मालिका चालू असताना समुद्र शांत, स्तब्ध, निर्मम, निरीक्षक असतो. तो हे जीव निर्माण करत नाही की मारत नाही. तो केवळ असतो.

या कथेतल्या समुद्रातला भगभगीत कोरडा मेलेलेपणा काढून टाकला तर निसर्गाबद्दलही असेच म्हणता येते.

निसर्ग केवळ आहे.

मात्र मृत समुद्र एकीकडे आणि वाळूत वावरणारे जीव एकीकडे अशी स्पष्ट रेखीव विभागणी करणारा किनारा निसर्गाला नाही. कारण जीव आणि भौतिक असे द्वैतच त्याच्याकडे नाही. जल-वायू-भूमी-आकाश-अग्नि अशी पंचमहाभूते एकमेकांत मिसळून जीव तयार करतात, जगवतात, मारतातही. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा प्राण्यांवर प्रभाव होतो, तर प्राण्यांच्या अस्तित्वाने निसर्गाला आकार येतो. निसर्ग म्हटल्यावर आपल्या मनात एक लसलसते काही डोळ्यासमोर येते. रूढार्थाने मंगळावरही 'निसर्ग' आहे. मात्र प्राणीसृष्टीचा अभाव असल्यामुळे आपल्या मनातला निसर्ग तिथे नाही. हिरवी झाडं, दवाचे थेंब, हवेत भरलेला एक जीवंत वास, आसपास चाललेली पक्ष्यांची भिरभिर - काही काही नाही. आपल्यासमोर निसर्ग म्हणजे काय याची काही एक कल्पना असते. तरीही आपण निसर्गाला आपल्या शरीराच्या मर्यादेच्या पलिकडचे काहीतरी - असे मानतो. आपण आपल्या शरीराच्या मर्यादेनंतर संपतो - त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचे आपण नैसर्गिक आणि कृत्रिम असे नीटस दोन भाग करतो. मी - माझ्या आसपास दिसणारे मानवनिर्मित जग - या दोन गोष्टी सोडल्या की बाकीचा सगळा निसर्ग.

ही विभागणी अनेक वेळा सोयीची पडते खरी पण अनेक वेळा त्यामुळे अडचणही निर्माण होते. कारण आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपल्याला विसरायला होते. अनेक वेळा 'मी आणि निसर्ग' या द्वैताचे रूपांतर 'मी विरुद्ध निसर्ग' या मांडणीत होते. मानवनिर्मित ते सगळे वाईट, आणि नैसर्गिक म्हणजे सर्व काही सुंदर अशा रोमॅंटिक कल्पनाही बळावतात. किंवा निसर्ग गेला खड्ड्यात, माझे सुख तेवढे महत्त्वाचे अशी तद्दन भोगवादी प्रवृत्तीही दिसते. काही वेळा निसर्गात घडणाऱ्या गोष्टी जणू काही मानवाच्या कृत्यांपोटी होतात अशी समजूत निर्माण होते. सर्वच आदीम संस्कृतींमध्ये निसर्गाच्या शक्तींना देव मानण्याची आणि त्यांची पूजा करण्याची प्रथा आढळून येते. अवर्षण झालं, याचे कारण गावात काहीतरी पाप घडले. भूकंप झाला, कारण धरतीमाता कोपली. रोगराईची साथ आली, कारण समाजात अनाचार वाढला. एक ना दोन, अनेक बाबतीत निसर्गावर मानवी भावनांचे आरोपण करून नैसर्गिक घटनांचे वेगळे अर्थ काढले जातात. पाऊस पडावा म्हणून पूजा करणे इथपर्यंतही काही हरकत नाही, पण त्यासाठी नरबळी देण्यापर्यंतही मजल जात असे.

आता आपल्याला माहीत आहे की पाऊस का पडतो, मान्सूनचे वारे कसे फिरतात, ज्वालामुखीचे उत्पात का होतात, रोगराईच्या साथी कशामुळे पसरतात. समाज म्हणून हे ज्ञान वापरून आपण अनेक बाबतीत ताबा मिळवला आहे. देवी, पोलिओसारख्या घातक रोगांचे उच्चाटन केलेले आहे. पावसावर ताबा आला नसला तरी पाण्यावर थोडाफार ताबा मिळवलेला आहे. पशूंपासून स्वतःचे रक्षण केलेले आहे. मात्र निसर्गाच्या गूढपणाचा सुंभ जळला असला तरी त्याला व्यक्तीरूप देण्याचा, त्याला मानवकेंद्रित बनवण्याचा पीळ अजून शिल्लकच आहे. आपल्या विचार करण्याच्या आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीतून तो वेळोवेळी दिसून येतो. 'ओल्ड टेस्टामेंट'मधला देव जेव्हा म्हणतो की 'मी हे विश्व मानवासाठी निर्माण केलेले आहे, जा त्याचा आनंद घ्या.' तेव्हा तो याच मानवकेंद्रित निसर्गाचा अवतार बनतो. या दृष्टिकोनामुळे एका बाजूला भविष्याचा विचार न करता स्वार्थीपणाने केलेली निसर्गाची नासधूस दिसते तर दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या कुठच्याही बाबतीत कणभरही ढवळाढवळ करणे म्हणजे पाप अशी विचारसरणी दिसते.

याचे मुख्य कारण म्हणजे माणूस स्वतःला निसर्गापासून वेगळे स्थान देतो. ते अगदीच गैर नाही - मानवासारखा बुद्धिमान प्राणी आजपर्यंत झाला नाही. इतर कुठचाही प्राणी मानवाइतक्या कौशल्याने भाषा किंवा अवजारे वापरत नाही. या बौद्धिक वर्चस्वामुळे आपल्याला सतत कुठेतरी वाटत राहाते की माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. तो निर्माण व्हावा ही निसर्गाची इच्छा आहे. इतर प्राणीमात्र त्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हे चित्र अर्थातच साफ चूक आहे.

जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे कोडे उत्क्रांतीवादामुळे सुटलेले आहे. त्यातून माणूस हाही इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत झाला हे स्पष्ट झालेले आहे. आपण कपडे घालत असलो तरी त्यांच्या आत लपलेले शरीर हे इतर प्राण्यांप्रमाणेच रक्ता-मांसा-पेशींचे बनलेले आहे. ज्या चिंपांझींचे आपण दूरचे भाऊबंद लागतो त्यांच्याप्रमाणेच आपणही हिंस्र आणि हिंसक आहोत. कळपाने राहाण्याची, कळपातल्यांना मदत करण्याची, प्रसंगी प्राणही देण्याची प्रवृत्तीही आपल्यात इतर प्राण्यांप्रमाणे दिसते. इतर अनेक सजीवांप्रमाणे आपल्यालाही दात-नखे आहेत, तसंच धडधडणारे हृदयही आहे. ही सजीवसृष्टी आपोआप, नैसर्गिक नियमांनुसार बनली. ती निसर्गाने 'निर्माण केली' असे म्हणता येत नाही. डोंगराच्या उतारावरून पावसाचे पाणी अनेक धारांतून एकत्र येऊन खाली पडते. त्याला आपण ‘डोंगराने हा प्रवाह निर्माण केला’ असे म्हणत नाही. पाऊस पडतो, पाणी खळाळतं, एकमेकांत मिळते तितक्याच सहजपणे निसर्गात जीव निर्माण होतात, नैसर्गिक निवडीने काही काळाने बदलतात, त्यांच्यापासून प्रजाती वेगळ्या होतात, आणि आपापले जीवन जगतात. निसर्ग त्यांना तयार करत नाही. किंबहुना या प्रक्रियेतून जे निर्माण झाले त्या चराचराला आणि त्यातल्या घटकांच्या परस्परसंबंधांना आपण निसर्ग म्हणतो. मनुष्यप्राणी तयार व्हावा अशी निसर्गाची इच्छा नाही. कारण निसर्गाला इच्छाच नाही. मनुष्य हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. इतर प्राणी निर्माण झाले तसाच मनुष्यही उत्क्रांत झाला. तो सर्वात उत्क्रांत, सर्वश्रेष्ठ वगैरे नाही. कारण उत्क्रांतीत सर्वश्रेष्ठ असणे महत्त्वाचे नाही, तर आसपासच्या परिस्थितीत, इतर प्राण्यांच्या संगतीने आणि त्यांच्याशी झगडा देत तग धरून राहाणे हेच केवळ ध्येय असते.

निसर्गाचा अमुक दिशेने जावे असा प्रयत्न नसतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात. गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली पडतात. कमी-अधिक दाबाप्रमाणे वारे वाहातात आणि महाकाय डोंगर पोखरतात. रासायनिक अभिक्रिया आपोआप घडतात. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी एखाद्या जगड्व्याळ फॅक्टरीप्रमाणे ठराविक पदार्थ आत घेते, प्रक्रिया करते, हवी ती रसायने घडवते, ऊर्जा तयार करते, आणि कचरा बाहेर टाकते. प्राणी जन्मतात, पक्षी उडतात, झाडे हिरवीगार होतात तीही आपोआपच. निसर्ग ती ठरवून बनवत नाही. सर्व भौतिक नियमांनी घडणाऱ्या या चमत्कृतीपूर्ण वाटणाऱ्या घटनांतून निसर्ग प्रतीत होतो. तो कर्ता नाही, तर कर्म आहे. त्याला कसले नियंत्रण करण्याची इच्छा नाही, गरज नाही, कारण घटना नियंत्रण करण्याची त्याची क्षमताच नाही. तोच एक घटित आहे - सर्व घटनांच्या परिपाकांतून दिसून येणारे.

निसर्ग केवळ आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

हा भागही फारच आवडला. ह्यातील विचारांशी जुळणारे काही प्रतिसाद इतरत्र लिहिले आहेत.
'सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:| अनेन प्रसविष्यध्वम् एषवोsस्त्विष्टकामधुक्|| इथेही 'इंटेलिजन्ट डिज़ाइन' तत्त्वाचा थोडासा भास होतो.
निसर्गातली प्रत्येक क्रिया ही अपरिवर्तनीय असते. वार्‍याची सळसळ, माणसाचे श्वसन, पावसाचे पडणे वगैरे आणि या प्रत्येक क्षणांशात उष्मा वाढत असते. 'एन्ट्रॉपी ऑफ दि युनिवर्स इस इन्क्रीज़िंग' असे कायसेसे.
आणि निसर्ग केवळ असतो. त्याला हेतु नसतो. तो कर्ताही नसतो आणि त्याच्यासाठी काही नियतकर्मही नसते. हे तर अप्रतिम.
आपण ज्याला मानवाचे सर्जन किंवा सृजन म्हणतो ते खरे तर ऊर्जेचे उत्सर्जन असते.
मला कधी कधी (म्हणजे बरेचदा) वाटते की पर्यावरणवाद हा मुळात मानवी उपयुक्ततावाद आहे. (हे अर्थात इतरांनाही वाटत असते आणि ते बर्‍यापैकी दस्त-ऐवजीकृत आहे.) मानवाच्या पुढच्या पिढ्यांसाठी हे विश्व आपण आहे तसे राखले पाहिजे. (आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत वगैरे.) आपल्याला सदैव हिरवी कुरणे, गायीगुरे, निर्झर, धबधबे दिसले पाहिजेत, सस्यश्यामल दिसले पाहिजे, तरच ते मंगल वगैरे.
पण आम्ही जेव्हा पहाड तासले आणि अजंठा-वेरूळ बनवले, गुंफा खोदल्या, सात टेकड्या सपाट करून रोम वसवले, त्यासाठी दूरवरचे पाण्याचे प्रवाह बदलून रोममध्ये पाणी आणले, धरणे बांधली, भूगर्भात मेट्रोसाठी, रस्त्यांसाठी, विद्युन्निर्मितीसाठी बोगदे खणले, अंतरिक्षात मानवनिर्मित यानांची गर्दी करून सोडली, तेव्हा आपण नक्की काय केले? वाळवंटात नंदनवन फुलवणे हे आपले एक उदात्त स्वप्न आणि मंगल पवित्र ध्येय असते. वाळवंटाचे निसर्गजन्य रूप बदलून आपण काय साधीत असतो? तर मानवासाठी दृष्टिसुख आणि राहाण्यासाठी जागा. तर समतोल साधणे महत्त्वाचे. 'तेन त्यक्तेन भुञ्जीथा:, मा गृधः कस्यस्विद धनम्' इ.
असो. नेहमीप्रमाणे अवांतर खूप झाले. पण लेख बेहद्द आवडला. पहिल्या दोन लेखांपेक्षाही अधिक.

अवांतरप्रेमी, अवांतरभूषण इ.

प्रतिसाद अतिशय आवडला

प्रकाटाआ

मला कधी कधी (म्हणजे बरेचदा) वाटते की पर्यावरणवाद हा मुळात मानवी उपयुक्ततावाद आहे.

माझ्या मते पर्यावरणवादामागे आणि त्याच्या विरोधामागे असलेल्या भूमिकेतही मानवकेंद्रित (अॅंथ्रोपोसेंट्रिक) विचार आहे. 'मी एक माणूस म्हणून, आणि आपण एकंदरीत मानवजात म्हणून आपल्यावर निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आहे.' असा काहीतरी एक विचार दिसतो. म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेत पोपट म्हणतो की देवाने आपल्याला शेपटी दिली आहे तेव्हा आपण तिचा वापर करणं कर्तव्य आहे - तसं काहीसं. त्याच्या विरोधी भूमिकेतही 'निसर्ग हा माझ्यासाठीच आहे, त्यातून मी हवं तसं ओरबाडून घेणार.' या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाबडेपणा आहे. पहिल्यात, गावात शत्रुसैन्य येऊन ते लुटणार असं कळल्यावर हातात आपली लाकडी तलवार घेऊन छाती पुढे काढून 'मी शतलूपासून लक्षन कलीन' म्हणणाऱ्या तीन वर्षांच्या पोराचा. तर दुसऱ्यात 'मला हावं' म्हणत खर्चाचा विचार न करणाऱ्या अधाशी पोराचा. पहिला फ्रॉइडचा सुपरइगो आहे तर दुसरा इड आहे. आणि या दोन्हीमध्ये मी आणि निसर्ग हे द्वैत आहे. तसंच दोन्हीमध्ये 'निसर्गाचा उद्देश' काही ना काही प्रमाणात गृहित धरलेला आहे.

हे अर्थात इतरांनाही वाटत असते आणि ते बर्‍यापैकी दस्त-ऐवजीकृत आहे.

याबद्दल तोंडओळख करून देणारं काही लिखाण आलं तर आवडेल.

"पृथ्वी वाचवा" ही घोषणा अत्यंत विनोदी आहे यात शंका नाही आणि ती न्यूयॉर्क ते मुंबई अशा मोठमोठ्या शहरांत राहणार्‍या कॉर्पोरेट पर्यावरणवाद्यांनी काढलेली टूम आहे. अहिंसा, पर्यावरण इत्यादी गोष्टी हायजॅक करणार्‍या कॉर्पोरेट मशिनरीचा तो भाग आहे. त्यालाच पर्यावरणवाद समजणे हाच खूप मोठा भाबडेपणा आहे. प्रत्यक्षात पर्यावरणवादाचा स्पेक्ट्रम खूप मोठा असून त्यातही प्रिमिटिव्हिजमपासून निहिलिजमपर्यंत मतमतांतरे आहेत. त्याला केवळ एका "पर्यावरणवाद" असे लेबल लावलेल्या रकान्यात भरुन हात झटकता येणार नाहीत.
अर्थात बर्‍याचशा पर्यावरणवादामागे मानवी सुखाचाच विचार आहे; पण म्हणून तो भांडवलशहांच्या उपयुक्ततावादासारखाच आहे असे म्हणणे बाळबोध आहे. (इथे अ‍ॅसिमोव्हचे ते सुप्रसिद्ध वचन आठवते, लोकशाही म्हणजे माझे अज्ञान तुमच्या ज्ञानाइतकेच चांगले आहे वगैरे वगैरे). "आपल्याकडे एकच पाव असून तो आपण पुरवुन-पुरवुन वापरला पाहिजे आणि ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात आपल्याच सुरक्षेसाठी लुडबूड करु नये" हा विचार आणि "काही होत नाही. आपण इतके हुशार आहोत की हा पाव संपला तर दुसरं काहीतरी नक्कीच शोधू वेळ आल्यावर आणि त्याचवेळी आपण इतके क्षुद्र आहोत की आपल्या लुडबुडीने काही होत नाही; उलट ती नैसर्गिकच आहे" हा विचार हे दोन्ही सारखेच असून निव्वळ "उपयुक्ततावाद" या मथळ्याखाली टाकून देता येत असतील तर त्याच न्यायाने संभोग आणि बलात्कार यात काही फरक नाही हेही सहज सिद्ध करता येईल.
निसर्ग फक्त आहे याबाबतीत मात्र सहमती आणि लेख आवडला. तळतळ फक्त याची वाटते की माणसाला हे अस्तित्वाचे सार समजूनही स्वत:चा हट्ट सोडवत नाही.

पहिल्यात, गावात शत्रुसैन्य येऊन ते लुटणार असं कळल्यावर हातात आपली लाकडी तलवार घेऊन छाती पुढे काढून 'मी शतलूपासून लक्षन कलीन' म्हणणाऱ्या तीन वर्षांच्या पोराचा. तर दुसऱ्यात 'मला हावं' म्हणत खर्चाचा विचार न करणाऱ्या अधाशी पोराचा. पहिला फ्रॉइडचा सुपरइगो आहे तर दुसरा इड आहे. आणि या दोन्हीमध्ये मी आणि निसर्ग हे द्वैत आहे

या विधानात फ्रॉइडच्या इड आणि सुपरइगो चा संबंध नेमक कसा जोडला यावर अधिक विस्ताराने लिहील तर आवडेल.
फ्रॉइडच्या संकल्पना मला वाटत या उदाहरणात इथे चपखल बसत नाहीत.

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

आपल्याला सदैव हिरवी कुरणे, गायीगुरे, निर्झर, धबधबे दिसले पाहिजेत, सस्यश्यामल दिसले पाहिजे, तरच ते मंगल वगैरे.

माफ करा, पण पर्यावरणवाद म्हणजे फक्त हे आणि हेच आहे असे म्हणणे अज्ञानमूलक आहे.

फार सुंदर लेख. राही यांचा प्रतिसादही आवडला.
अवांतरः (बहुधा) नवेगावबांध येथील विस्तिर्ण माळरानांवर वृक्षारोपणाची मोहीम राबवण्याची कल्पना तिथल्या नैसर्गिक चक्राच्या, प्राणी-पक्षी यांच्या मूळावर कशी आली यासंबधी एक लेख वाचला होता.

पर्यावरणवादामध्ये माणसाने स्वतःकडे पर्यावरणरक्षणकर्त्याची स्वतःच्या क्षमतेपलीकडची भूमिका घेतली आहे हे तर खरेच. म्हणजे मानव कर्तबगार आणि बुद्धिमान आहे, इतर प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून ही जबाबदारी त्यानेच उचलायला हवी, ते त्याचे 'निसर्गदत्त' कर्तव्य आहे ही भूमिका. पण त्याचबरोबर त्यात माणसाने आपला स्वार्थदेखील पाहिला आहे. म्हणजे पाऊस वेळेवर पडायला हवा, नद्या वाहायल हव्या, धरणे भरायला हवी, पीक चांगले यायला हवे, अन्नधान्याची, दूधदुभत्याची रेलचेल व्हायला हवी, ग्लोबल वॉर्मिंगमुळे किनारे धुपता नयेत, समुद्राने शेतजमिनींवर आक्रमण करू नये, मासळी भरपूर मिळायला हवी म्हणजे थोडक्यात मानवजातीचे कल्याण व्हायला हवे ही मानवकेंद्रित स्वार्थी भूमिकासुद्धा असतेच.
लिहायचे मनात आहे बरेच दिवस, पण संदर्भ शोधा, उतारे धुंडाळा, हे त्रासदायक प्रकरण आणि शिवाय आळसही. लिखाणाचा किडा डोक्यात घुसवल्याबद्दल धन्यवाद.
ता. क. : राजेश, प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर होता, पण लिहिताना घाईगडबड झाली. तरीही तो तुम्हाला उद्देशून आहे हे स्पष्ट आहे म्हणून दुरुस्ती करीत नाही.

काही "असणे" म्हणजे असणार्‍याची हेतुपुरस्सर क्रिया असावी... हा गैरसमज भाषेच्या लकबींमुळे, व्याकरणाच्या तपशिलांमुळे होऊ शकतो.

एरव्ही "अस्ति" (आहे) अशा अर्थाचे पद उपलब्धच नसलेल्या भाषा आहेत (उदाहरणार्थ, अरबी). किंवा असे पद गाळायची लकब असलेल्या भाषा आहेत (उदाहरणार्थ संस्कृत). "क्रिया"पदाशिवाय माहिती सांगणे आणि ऐकून समजणे हे मानवी प्रज्ञेच्या आवाक्यात आहे. मराठीत नुसती वर्णनात्मक (क्रिया नसलेली) माहिती सांगतानासुद्धा "आहे/अय्/ए" असे क्रियापद उच्चारावे लागते. मराठी ते अध्याहृत ठेवता येत नाही - "तिथे डोंगर" किंवा "झाड उंच" असे म्हटल्यास वाक्य अर्धवट ठरते. "तिथे डोंगर आहे", "झाड उंच आहे" असे क्रियापद वापरावेच लागते.

माराठीसारखाच कित्येक भाषांमध्ये "कुठल्याही वाक्यात एकतरी क्रियापद असलेच पाहिजे" असा व्याकरणाचा नियम असतो. संस्कृतात "अस्ति"चा वापर जरी नगण्य असला, तरी ते क्रियापद उपलब्ध आहे. ते उपलब्ध आहे, म्हणून संस्कृत वैयाकरण क्रियापद नसलेल्या वाक्यात "अस्ति" (किंवा अस्मि/.../सन्ति पैकी एक) "अध्याहृत" आहे, असे मानतात. आणि मग "वाक्यात एक[तरी] क्रियापद असलेच पाहिजे, ते अध्याहृत का असेना" असा नियम संस्कृताकरिता सार्वत्रिक होऊ शकतो.

क्रियापदांच्या अर्थाचा विचार करताना संस्कृत वैयाकरण-तत्त्वज्ञान्यांना "अस्ति"बाबत कोडे पडले. "अस्ति" सोडल्यास बाकी कुठली क्रिया करणारा/सोसणारा/मनन करणारा कोणी कर्ता असतो. कर्ता काहीतरी हेतुपुरस्सर हालचाल/प्रयत्न करत असतो. पण "अस्ति" क्रियापदाचा वाक्यातला जो व्याकरणानुसार कर्ता आहे त्याचे काय? तो तर काहीच हालचाल/प्रयत्न करताना दिसत नाही. तर "क्रियापदांचा अर्थ = कर्त्याने प्रयत्नपूर्वक केलेले काही" असा करायला गेलो, तर हा "अस्ति" शब्द अपवाद होतो. व्याखेतला मोठा अडथळा होऊन बसतो.

त्याचे स्पष्टीकरण करताना संस्कृत वैयाकरण एक वाक्य संदर्भासहित सांगतात - कोणी मरायला टेकलेले आहे, त्याच्याबाबत कोणी दोघे परिचित एकमेकांशी बोलत आहेत.
एक परिचित विचारतो - "अस्ति, नास्ति वा सः?" (आहे की नाही तो?)
दुसरा परिचित उत्तरतो "महता प्रयत्नेन अस्ति ।" (प्रयत्न करत-करत तो [अजून] आहे.)

जीवनमरणाच्या टोकाशी असलेला तडफडत प्रयत्न करत "अस्ति" याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आपल्याला कळतो ना? अशाच प्रकारे जो मरणासन्न नाही, तोही काही तडफड-दिसेलसा-नाही-तरी-थोडा-काही हेतुपुरस्सर उद्योग करतच असावा. अशा प्रकारे "अस्ति" मध्येसुद्धा क्रिया आहेच.

संस्कृत वैयाकरणांचे विवेचन बिंदुगामी आहे, परंतु ते वस्तुनिष्ठ अस्तित्वाबद्दल नव्हे. त्यांचा हा विचार "अस्ति" (मराठीतल्या "आहे") शब्दाच्या मानसिक समजाबाबत आहे. अशा प्रकारे आपल्या भाषेच्या व्याकरणाच्या नियमांनी "असणे म्हणजे काही हेतुपुरस्सर क्रिया" असे गुपचूप गृहीतक (implicit assumption) आत्मसात होते.

हे गुपचूप गृहीतक ओळखले नाही, आणि खरोखरचे तात्त्विक/वस्तुनिष्ठ/स्वयंस्पष्ट गृहीतक मानल्यामुळे उगाच क्लिष्ट आणि कोड्यांनी भरलेल्या तत्त्वज्ञान-प्रणाली (किंवा घटक तत्त्वविचार) बोकाळू शकतात.
------------------
अरबी मध्ये "अस्तित्व" विचार सांगण्याबाबत/मुश्किलीबाबत दुवा :
**(1) "The term used by ibn Sina to designate 'being' is hasti, a Persian term for which no equivalent appears in his Arabic texts. To be sure, in Shifa' he points out the term wujud (existence) has several meanings: (1) haqiqa (the essence, reality of something, the fact that it exists), and (2) the particular existence of something, and by making these distinctions, he confirms his awareness of the various senses of 'existence', but even in view of these different senses of 'existence', there is still no term in his Arabic works which could render hasti adequately. **