अरुणचंद्र गवळीच्या कविता

कविता नव्वदोत्तरी

अरुणचंद्र गवळीच्या कविता

कवी - अरुणचंद्र गवळी

तेरीज

अकाली झालो बकाल
मायला हे शिक्षणच कंगाल
जरी नाही केला परमार्थ नाही साधला स्वार्थ
वाया गेलो करून लग्न
एक बायको अन् पोरं दोन
ठेवली करून सेल्फ डिपॉझीट व्हॉल्ट
कवितेच्या पडलो फंदात आलो वांध्यात
पुस्तकं घेतली भाराभार विकलीही तसूभर
एक ते तीस तारीक टाकल्या पाट्या
केले देणेकरी सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या
पडलो चळवळीत केली वळवळ
पावलो नाही समाधान बसलो घरात
मागणे एकच आता शेवटी
देव दीनाघरी धावला
हाणा तिच्या मायला.

---

गाईचा फेरा

त्याच्या मनात गाय कापायचं नव्हतंच
पण तिच्या मानेवर सुरा ठेवला
अन्‌ बाकीचं आपसूकच घडलं
त्याने नळाखाली हात धरला
तर हाताला रक्तबिक्त काहीच नव्हतं
त्याने समाधानानं गाईचे डोळे काढून घेतले.

त्याच्या मुलानं घरात ते फिशटँकमध्ये सोडले
तमाम मासे आशाळभूतपणे
त्या डोळ्यांकडं पाहायला लागले
इतक्यात कुणीतरी गाईचे डोळे न खाण्याचा
परंपरागत दाखला दिला
अन्‌ डोळे तसेच सताड राहिले.

अंधारात ते डोळे एकटक माझ्यांकडं (माझ्यांकडं का माझ्याकडं?)
पाहत राहायचे
मासे झुरून झुरून मरायला लागले
शेवटी एकच मासा शिल्लक राहिला.
आता त्याच्यावर कसलंच बंधन नव्हतं
डोळे तर अगदी तसेच ताजेतवाने
शेवटी त्या एकुलत्यानं आत्महत्या करून टाकली.

---

आंध्र : सर्वेक्षण


महाराष्ट्र ते आंध्र
पुढे धावणारी मिनार एक्स्प्रेस
किंवा मागे पळणारे रूळ
आणि त्याखालच्या खडीसारखे
लाखो वर्षे दबलेले आपण
उगाचच मैलांची व्यावहारिक परिमाणं मोजणारे.
पण कवितेनं मला शिकवलंय
प्रादेशिक अंतर मोजायला
सार्वत्रिक दारिद्र्याच्या समाईक फुटपट्टीनं.


आंध्र प्रदेश खरवडतो
माझ्या मध्यमवर्गीय जाणिवांची पुटं
आणि तेलंगणातले भूमिहीन, आदिवासींचे तांडे
शेकतात
त्यांच्या डोळ्यांत फुललेल्या निखाऱ्यांवर
माझ्या मेंदूचा डफ
त्या कडाडणाऱ्या डफाच्या
सुरात सूर मिसळून
तेलंगणातील जंगलं विचारतात
माझ्या कवितेला जाब
स्टालिनला बदनाम करणाऱ्या विश्वासघातकी नेतृत्वाबद्दल.


माझी कविता तर
तिच्या मर्यादांसह नेहमीच भिडते सत्याला
आणि म्हणूनच
तेलंगण बेल्छी साधूपूर मराठवाड्यापासून
बैरुतमधले फलांजिस्टांचे रक्तलांछित
खुनी पंजांचे संदर्भ
बदलवतात माझ्या लेखणीला हत्यारामध्ये
तेव्हा खाकींसमोर मी खुलेआम ठसे देतो
माझ्या कवितांचे.


कविता लिहिणारी बोटंच तर
मला आठवतात
इराणमधल्या विद्रोही कवींची
ज्यांची नखं उपटलीत शहा रझवी पहेलवीनं
पण त्याला माहीत नसतो
दूरवरच्या आंध्रचा इतिहास
जिथं कविता लिहिण्यासाठी
जरुरत भासत नाही
कृत्रिम शाईची किंवा तकलादू कागदाची
भूमैय्या आणि किश्ता गौडच्या रक्तानं
डिसेंबर ७५ मध्ये
लिहिल्या गेल्याहेत
अजरामर कविता आंध्रच्या मातीवर.


मातीत तर
भारताची काय किंवा तिसऱ्या जगाची काय
तिला आवश्यकता आहे
पिळवणुकीविरुद्ध लढण्याची
आम्ही कम्युनिस्ट तर
नसतो तर वचनबद्ध
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी
तर
उद्याच्या सार्वजनिक पिकासाठी,
तमाम नवनिर्मितीसाठीही.


नवनिर्मितीच तर
पण त्यापूर्वीची वादळं पसरलीयेत पृथ्वीवर सर्वत्र
जपानी गैशा ते अमेरिकेतील घेट्टो
किंवा दक्षिण आफ्रिका ते पॅलेस्टाईन
पण नजीकचं तुफानी वादळ
अनुभवतो मी आंध्रच्या खोपटात
पहाट चांदणीला जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यांत.


ओव्याच तर
त्यांनाही राजकीय संदर्भ सुटत नाहीत
जसे जमिनीपासून पाय,
म्हणूनच कच्च्याबच्च्या लेकीनं
जात्यात घास भरून
ते उलट फिरवताच माय तिला झापते
डांगे लाईनचा संदर्भ देऊन.
तेव्हा मला अडचण भासत नाही
कुठल्याच भाषेची.


पोलिटिकल लाईनच तर
तीही कळत असते जंगलांनादेखील
म्हणूनच तर तेलंगणातील तमाम जंगलं
अजूनही साथ देताहेत
लाखो डोळ्यांतल्या धगधगत्या अंगाराच्या
सशस्त्र संघर्षाला.


डोळेच तर
तेही बदलवू शकतात माणसाचा दृष्टिकोण स्वाभाविकतः
म्हणूनच आज
आंध्रच्या मातांची गर्भाशयं दिसतात मला
शस्त्रास्त्रं निर्मितीच्या कारखान्यात
जी बदलणार आहेत उद्याच्या यशाबरोबर
निळ्याभोर आकाशात.

---

(संग्रह : अरुणचंद्र गवळीच्या कविता. लोकवाङ्मय गृह, २०००)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी त्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

गाईच्या डोळ्यांची कविता आवडली. आंध्रवाली ६ वी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0