जंटलमन्स गेम - विझी, लाला आणि सीके

भारतात आणि भारतीय उपखंडात क्रिकेटचा खेळ आणला तो ईस्ट इंडीया कंपनीच्या गोर्‍या इंग्रज साहेबांनी!

भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा पहिला संदर्भ सापडतो तो ईस्ट इंडीया कंपनीच्याच एका रिपोर्टमध्ये. १७३७ मधल्या या रिपोर्टात बडोद्याजवळ कॅम्बे इथे १७२१ पासून इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत असल्याचा स्पष्टं उल्लेख आढळतो. पुढे १७८२ मध्ये कलकत्ता फुटबॉल आणि क्रिकेट क्लबची स्थापना झाली. काही वर्षांनीच मद्रासलाही क्रिकेट खेळलं गेल्याचा उल्लेख आढळतो. टिपू सुल्तानाचा पराभव केल्यावर विजयी ब्रिटीश सैनिकांनी १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणम् इथे क्रिकेट क्लबची स्थापना केल्याचाही एक उल्लेख आढळून येतो!
सुरवातीला केवळ साहेबाचा खेळ म्हणून दुर्लक्षित असलेलं क्रिकेट हळूहळू इथल्या जनसामान्यांमध्येही रुजत गेलं.

१८६४ चा काळ!

कलकत्त्याच्या एका मैदानावर एक ऐतिहासिक घटना घडत होती!

भारतात आणि भारतीय उपखंडातील पहिलीवहिली फर्स्ट क्लास क्रिकेट मॅच कलकत्त्याच्या त्या मैदानावर सुरु झाली होती!

कलकत्ता विरुद्ध मद्रास!

इंग्रज साहेबाच्या क्रिकेटवरील हुकूमतीला भारतात सर्वप्रथम आव्हान मिळालं ते मुंबईत!

मुंबईच्या पारशी लोकांनी १८७७ मध्ये झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. या क्लबने बाँबे जिमखाना क्लबच्या इंग्रजांना दोन दिवसाच्या क्रिकेट मॅचसाठी १८७७ मध्ये खुलं आव्हान दिलं! पारश्यांना आपण सहजपणे हरवू शकू या कल्पनेत असलेल्या इंग्रजांना पहिल्या इनिंग्जमध्ये लीड घेऊन पारशी खेळाडूंनी चांगलाच दणका दिला होता! अखेरीस ही मॅच ड्रॉ झाली असली, तरीही जवळपास संपूर्ण मॅचवर पारशी टीमचं वर्चस्व होतं!

पुढे मुंबईच्या ट्रँग्युलर, क्वाड्रँग्युलर आणि पेंटॅग्युलर सामन्यांची गंगोत्री म्हणजेच दरवर्षी खेळली जाणारी हीच ती बाँबे प्रेसिडन्सी मॅच!

इंग्रज आणि पारशी यांच्या सामन्यांमध्ये तिसरी टीम दाखल झाली ती १९०७ मध्ये! ही टीम होती हिंदू!

वास्तविक १९०६ मध्येच हिंदू जिमखान्याने झोराष्ट्रीयन क्लबला मॅचसाठी निमंत्रण दिलं होतं, परंतु पारशी मंडळींनी हिंदूंशी खेळण्यास नकार दिला! पारश्यांच्या नकारानंतर हिंदू विरुद्ध इंग्रज अशी मॅच झाली आणि हिंदूंनी ती ११० रन्सनी जिंकली!

(दुर्दैवाने या संघात असलेल्या पी. बाळू याला केवळ दलित असल्यामुळे कॅप्टन पदापासून वंचित राहवं लागलं होतं! पुढे त्याच्या भावाची पी. विठ्ठ्लची १९२३ मध्ये हिंदूंनी कॅप्टन म्हणून सन्मानाने निवड केली!)

१९१२ मध्ये बाँबे ट्रँग्युलरची बाँबे क्वाड्रँग्युलर झाली! पूर्वीच्या तीन संघांमध्ये भर पडली ती मुस्लिम संघाची! (तत्कालीन मुंबईत क्रिकेट संघांचं वर्गीकरण धर्माधारीत होतं!) पहिल्या महायुद्धाच्या काळातही नियमीतपणे या मॅचेस होत असत!

१९१६ पर्यंत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये होत असलेल्या या मॅचेस १९१७ पासून पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये खेळल्या जाऊ लागल्या. १९१६ पर्यंत कोणतीही मॅच असली तरी अंपायर्स हे बाँबे जिमखान्याने नेमणूक केलेले इंग्रज अंपायर्सच असंत! परंतु १९१७ ज्या दोन टीम्स खेळत आहेत त्या सोडून इतर अंपायर्स नेमण्याची परंपरा सुरू झाली! तटस्थ (न्यूट्रल) अंपायर्सचा हा जगातला पहिला प्रयोग होता!

बाँबे क्वाड्रँग्युलरच्या या लोकप्रियतेचा इतका जोरदार परिणाम आणि प्रसार झाला होता की त्यापासून प्रेरणा घेऊन लाहोरला ट्रँग्युलर आणि कराची आणि नागपूरला क्वाड्रँग्युलर मॅचेस सुरु झाल्या! अत्यंत यशस्वी आणि सामान्यं लोकांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या या मॅचेसना एका व्यक्तीचा मात्रं विरोध होता!

मोहनदास करमचंद गांधी!

गांधीजींचा क्रिकेटला विरोध नव्हता, परंतु धर्माधारीत संघांना होता. क्वाड्रँग्युलर मॅचेस या ब्रिटीशांच्या धोरणावर आधारीत आहेत असं गांधीजींच मत होतं. या सामन्यांतील संघांची निवड धार्मिक निकषावर करण्याला त्यांचा आक्षेप होता!

१९३० मधला मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे क्वाड्रँग्युलर मॅचेस रद्द करण्यात आल्या त्या १९३४ पर्यंत. १९३५ मध्ये मुंबई क्रॉनिकलचे क्रीडा संपादक जे. सी. मैत्रा यांनी धार्मिक निकषांवर आधारीत संघांमध्ये मॅचेस न खेळवता भौगोलिक दृष्ट्या संघांची निवड करण्याची सूचना केली. दुसर्या एका पत्रकाराने त्याला प्रतिवाद म्हणून भारतीय ख्रिश्चनांच्या पाचव्या टीमचा समावेश करुन पेंटॅग्युलर टूर्नामेंटची कल्पना मांडली.

सामान्यं प्रेक्षकांचा कल मात्रं पूर्वीच्याच स्वरुपात ही स्पर्धा हवी असल्याचा होता, त्यामुळे या सूचनांकडे साफ दुर्लक्षं करण्यात आलं!

१९३७ मध्ये अखेर पाचव्या संघाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आणि बाँबे क्वाड्रँग्युलर स्पर्धा पेंटॅग्युलर झाली! हा संघ होता 'इतर' खेळाडूंचा! यात भारतीय ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू यांचा समावेश होता. क्वचित प्रसंगी सिलोनहून (श्रीलंका) आलेल्या खेळाडूंचाही त्यात समावेश असे!

अखेर १९४६ मध्ये फाळणीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांची अखेर झाली!

१९३४ मध्ये रणजी ट्रॉफीची सुरवात होऊनही १९४६ मध्ये फाळणीची घोषणा होईपर्यंत भारतातील फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या स्पर्धांचं स्थान अग्रगण्यं होतं!

१९०५ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका या तीन टेस्ट क्रिकेट दर्जा असलेल्या संघांच्या अधिकार्यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर एक जागतिक स्तरावर संस्था स्थापन केली.

इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स!

सुरवातीला केवळ ब्रिटीश साम्राज्यातील देशांनाच या संघटनेचं सभासदत्वं देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं! १९२६ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीकेच्या जोडीला आणखीन तीन संघांचा यात समावेश करण्यात आला.

वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि भारत!

आज इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आय सी सी) या नावाने ओळखल्या जाणार्या क्रिकेट संघटनेचं हे सुरवातीचं रुप होतं!

(हिंदुस्थानच्या फाळणीनंतर पाकिस्तान १९५२ मध्ये आयसीसीचा सदस्य झाला. १९६१ मध्ये कॉमनवेल्थमधून बाहेर पडल्यामुळे दक्षिण आफ्रीकेची गच्छन्ती झाली. श्रीलंका (१९८१), अपार्थाईड पद्धती संपुष्टात आल्यावर पुन्हा दक्षिण आफ्रीका (१९९१), झिंबाब्वे (१९९२) आणि बांग्लादेश (२०००) यांना टेस्ट क्रिकेटचा दर्जा देण्यात आला).

१९२६ मध्ये भारताला टेस्टचा दर्जा मिळाला असला तरी भारतीय संघाचं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण होण्यासाठी १९३२ साल उजाडावं लागलं! यामागचा इतिहासही तितकाच मनोरंजक आहे!

१९३० च्या दशकात भारताच्या राष्ट्रीय संघाचं नेतृत्व एखाद्या महाराजाकडे असणं हा जणू अलिखीत नियम होता! अर्थात तत्कालिन संस्थानिकांपैकी अनेकांना क्रिकेटबद्दल अत्यंत आस्था होती आणि भारतात क्रिकेटचा खेळ रुजावा यासाठी त्यांनी सढळ हाताने वेळोवेळी अनेक वेळेस मदतही केली होती. नवानगरचे जामसाहेब महाराजा रणजीतसिंह आणि दुलिपसिंहांसारखे खेळाडू तर इंग्लंडसाठी टेस्टमध्येही खेळले होते! अर्थात रणजी जन्माने राजकुमार नव्हते आणि नवानगरचे राजे म्हणून आपली नेमणूक करुन घेण्यासाठी त्यांनी क्रिकेटमधील आपल्या कौशल्याचा आणि संशयास्पद कागदपत्रांचा वापर केला असला, तरी भारतीय खेळाडूंमध्ये आकर्षक आणि आक्रमक क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याची ब्रिटीशांची खात्री पटण्यास रणजी आणि दुलिप बर्‍याच अंशी कारणीभूत होते.

क्रिकेटविषयी आपुलकी असलेल्या संस्थानिकांची मदत ही बहुतेक वेळेस क्रिकेटसाठी आवश्यक त्या सुविधा, मैदानं उभारणं, सामने आयोजित करणं, क्वचितप्रसंगी परदेशी खेळाडूंना पाचारण करणं इथपर्यंत असे, परंतु काही महाभाग असे होते ज्यांना स्वतः मैदानात उतरून क्रिकेट खेळण्यात आणि खेळाडूंवर हुकूमत गाजवण्यात जास्तं इंटरेस्ट होता!

या सर्वांचा मुकुटमणी म्हणजे अर्थातच...

विजय आनंद गणपती राजू
उर्फ
महाराजकुमार ऑफ विझीनगरम
उर्फ
विझी!

१९०५ मध्ये विझीनगरम इथे जन्मलेला हा महाराजकुमार कमालीचा महत्वाकांक्षी होता! त्याची महत्वाकांक्षा होती ती भारतीय संघाचा कॅप्टन होण्याची! अर्थात राजघराण्यात जन्मल्यामुळे भारताचा कॅप्टन होणं हा जणू आपला अधिकारच आहे अशी त्याची ठाम धारणा होती!

एकच मोठा प्रॉब्लेम होता!

क्रिकेटचा खेळ, त्यातले बारकावे आणि खेळातील नैपुण्या याबाबतीत विझीची साफ बोंब होती!

१९२६ मध्ये विझीने बनारस इथे स्वत:चं क्रिकेट ग्राऊंड उभारलं! १९३०-३१ च्या मोसमात एमसीसीने भारताचा दौरा रद्द केल्यावर विझीने स्वतःची टीम बनवून भारतातील काही शहरांचा आणि सिलोनचा दौरा आखला! या टीममध्ये खेळण्यासाठी दोन सुप्रसिद्ध खेळाडूंना राजी करण्यात विझीला यश आलं होतं!

जॅक हॉब्ज आणि हर्बर्ट सटक्लीफ!

या दौर्‍यामुळे विझीचा चांगलाच बोलबाला झाला. इंग्लिश खेळाडूंवर त्याने भेटींचा वर्षाव केला होता! अर्थात आपल्याबद्दल इंग्लंडमध्ये अनुकूल मत व्हावं आणि १९३२ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघाचं नेतृत्व आपल्याकडे देण्यात यावं हा त्यामागे सुप्त हेतू होता! प्रसिद्ध इंग्लिश खेळाडूंनी इंग्लंडमध्ये लॉबिंग करावं ही त्याची अपेक्षा होती!

परंतु....

विझीला याबाबतीत एक तगडा प्रतिस्पर्धी होता!

पटीयालाचा महाराजा भूपिंदर सिंह!

१९११ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. महाराजा भूपिंदर सिंह या दौर्‍यावर भारतीय संघाचा कॅप्टन होता. १९२६/२७ च्या मोसमात तो एमसीसी च्या संघातून इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटही खेळला होता! या सर्व सामन्यांत त्याची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नसली तरी शेवटी तो महाराजा होता आणि प्रत्यक्षं इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी जमा झाला होता!

१९३२ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या संघाच्या कॅप्टनपदाची माळ अखेरीस पटीयालाच्या महाराजाच्या गळ्यात पडली! विझीची नेमणूक व्हाईस कॅप्टन म्हणून करण्यात आली!

कप्तानपद हुकल्याने नाराज झालेल्या विझीने खराब फॉर्म आणि आजरपणाचं निमीत्त करुन या दौर्‍यातून अंग काढून घेतलं! विझी दौर्‍यावर जाणार नाही हे नक्की होताच भूपिंदर सिंहानेही दौर्‍यावर जाण्याचं रहित केलं! शेवटी कॅप्टनपदाची माळ गळ्यात पडली ती पोरबंदरचा महाराजा राणा श्री नटवरसिंह भावसिंहाच्या गळ्यात!

इंग्लंडमधील सुरवातीच्या काही सामन्यांमधील जेमतेम कामगिरीनंतर क्रिकेट हे आपल्या आवाक्याबाहेरचं असल्याचं महाराजा नटवरसिंहाच्या ध्यानी आलं होतं. त्याहूनही महत्वाचं म्हणजे स्वत:ची मर्यादा ओळखून ती स्वीकारण्याचा संस्थानिकांच्या ठायी अभावानेच आढळणारा दिलदारपणा त्याच्या अंगी होता. दौर्‍यातील एकमेव टेस्टमॅचपूर्वीच त्याने टीममधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या पहिल्यावहिल्या टेस्टमध्ये कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवली ती बाँबे क्वाड्रँग्युलर मधल्या गाजलेल्या बॅट्समनकडे..

कोट्टारी कंकय्या - सी के नायडू!

१९२६-२७ मध्ये आर्थर गिलीगनच्या नेतृत्वात एमसीसीच्या संघाने प्रथमच भारताचा दौरा केला होता. बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर या संघाविरुद्ध खे़ळताना सीकेनी ११६ मिनीटात १५३ रन्स झोडपून काढल्या होत्या! त्यात ११ षटकार होते! इंग्लिश बॉलर्सची, विशेषतः फास्ट बॉलर मॉरीस टेटची त्यानी चांगलीच धुलाई केली होती! बॉब वॅटला मारलेला एक षटकार थेट बाँबे जिमखान्याच्या छतावरुन पार गेला होता!

अर्थात बर्ट सटक्लीफ, डग्लस जार्डीन, वॉली हॅमंड, लेस अ‍ॅमेस, एडी पायन्टर असे बॅट्समन आणि बिल बोस, बिल व्होस, फ्रेडी ब्राऊन, वॉल्टर रॉबिन्स असे बॉलर्स असल्यामुळे इंग्लंडसमोर भारताचा निभाव लागणं कठीणच होतं आणि त्याप्रमाणे भारताच्या नशिबी १५८ रन्सनी पराभव आला. महंमद निसारने इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या ५ विकेट्स आणि सीकेच्या पहिल्या इनिंग्जमधल्या ४० आणि अमरसिंगच्या दुसर्‍या इनिंग्जमधल्या ५१ रन्स हीच काय ती भारताच्या दृष्टीने जमेची बाजू होती!

दरम्यानच्या काळात महाराजा भूपिंदर सिंह आणि लॉर्ड विलिंग्डन यांच्यात बेबनाव झाला होता. चाणाक्षं विझीने याचा फायदा घेत विलिंग्डनशी जवळीक वाढवली! इतकंच नव्हे तर विलिंग्डनला खूश करण्यासाठी नुकत्याच बांधून तयार झालेल्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडीयममधील एका पॅव्हेलियनला त्याने विलिंग्डनचं नावही दिलं! विझीची महत्वाकांक्षा होती ती एमसीसीच्या भारताच्या दौर्‍यावर येणार्‍या संघाविरुद्धच भारताचं नेतृत्व करण्याची! परंतु पुन्हा एकदा महाराजा भूपिंदर सिंहाने त्याला मात दिली!

१९३३-३४ मध्ये डग्लस जार्डीनच्या नेतृत्वात भारतात आलेल्या एमसीसीच्या संघाविरुद्धही सीके नायडूच कॅप्टन होता!

पहिली टेस्ट मुंबईला झाली. भारताला २१९ मध्ये गुंडाळल्यावर इंग्लंडने बरोबर दुप्पट - ४३८ रन्स केल्या त्या वॉल्टर्स (७८), जार्डीन (६०) आणि ब्रायन व्हॅलेंटाईन (१३६) यांच्यामुळे. दुसर्या इनिंग्जमध्ये सीकेनी ६७ रन्स फटकावल्या परंतु या इनिंग्जचा मानकरी ठरला तो त्या मॅचमध्ये पदार्पणात २१ चौकारांसह ११८ रन्स फटकावून काढणारा एक हरहुन्नरी ऑलराऊंडर..

लाला अमरनाथ!

अमरनाथ आऊट होऊन परतत असताना मॅच पाहण्यासाठी आलेल्या स्त्रियांपैकी काहीजणींनी त्याच्या दिशेने दागिन्यांचा वर्षाव केला!

भारताच्या नशिबी पराभव आला असला तरी अमरनाथ मात्रं हिरो ठरला होता!

याच सिरीजमध्ये महाराजा भूपिंदरसिंहाचा मुलगा, पटीयालाचा युवराज यादवेंद्रसिंह याने टेस्टमध्ये पदार्पण केलं. आपल्या एकमेव मॅचमध्ये त्याने पहिल्या इनिंग्जमध्ये २४ आणि दुसर्‍या इनिंग्जमध्ये ६० रन्स फटकावल्या होत्या!

भारतीय क्रिकेट संघाला जागतिक स्तरावर इतरांना तोडीसतोड टक्कर देण्याच्या दृष्टीने भारतात देशपातळीवरील फर्स्ट क्लास स्पर्धा असण्याची आवश्यकता क्रिकेटधुरीणांच्या ध्यानी आली होती. त्यातच गांधीजींच्या आंदोलनामुळे १९३० पासून बाँबे क्वाड्रँग्युलर्सही बंद होत्या. महाराजा भूपिंदर सिंहाच्या चाणाक्षं नजरेने भारतीय क्रिकेटवर वर्चस्व मिळवण्याची ही संधी हेरली. भारतात प्रथम श्रेणीची स्पर्धा घेण्याची आणि या स्पर्धेतील विजेत्यांना ५०० पौंडाची सोन्याची ट्रॉफी देण्याची त्याने घोषणा केली!

रणजी ट्रॉफी!

पटीयालाच्या महाराजाच्या या चाणाक्षं खेळीमुळे विझीचा तिळपापड झाला! भारतीय क्रिकेटवर हुकूमत गाजवण्याची संधी आपल्या हातून निसटून चालली असल्याचं त्याला वाटू लागलं होतं! परंतु हार मानेल तर तो विझी कसला?

रणजीनी आपलं सगळं क्रिकेट भारताबाहेर इंग्लंडमध्ये खेळल्याचं आणि त्यानी कायम स्वतःला इंग्लिश क्रिकेटर म्हणवून घेतल्याचं विझीने प्रतिपादन केलं! रणजींच्या तुलनेत लॉर्ड विलिंग्डननी भारतात जास्तं काळ वास्तव्यं केल्याने भारतातल्या प्रथम श्रेणी स्पर्धेला आपण इंग्लंडहून तयार करवून आणलेली शुद्ध सोन्याची ट्रॉफीच लॉर्ड विलिंग्डनच्या नावाने देण्यात येईल असं जाहीर करण्यास त्याने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना भाग पाडलं!

परंतु.. इथेही विझीच्या नशिबात अपयश आलं!
त्याने विलिंग्डन ट्रॉफीची घोषणा करण्यापूर्वीच रणजी स्पर्धेच्या दोन मॅचेस झाल्या होत्या!

दरम्यानच्या काळातच विझी आणि महाराजा भूपिंदर सिंह, दोघांचेही संघ हैद्राबादच्या मोईन उद्दौला स्पर्धेत खेळत होते. पटीयालाच्या संघावर मात करण्याच्या हेतूने विझीने आपल्या संघात वेस्ट इंडीयन फास्ट बॉलर लिअरी कॉन्स्टंटाईनची (खुद्दं डग्लस जार्डीनला बॉडीलाईन टाकणारा!) वर्णी लावली होती! फायनलमध्ये मॅटींग विकेटवर कॉन्स्टंटाईनने तुफान वेगात बॉलिंग टाकून पटीयालाच्या बॅट्समनवर चांगलाच दबाव आणला होता, परंतु लाला अमरनाथने त्याच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवत शतक फटकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला!

विझीचा आणखीन एक डाव फुकट गेला होता!

या सगळ्या भानगडीत रणजी ट्रॉफीचे सामनेही सुरुच होते! अर्थात बाँबे क्वाड्रँग्युलरइतकी लोकप्रियता मात्रं त्यांना मिळाली नव्हती! प्रेक्षकांचा प्रतिसादही तसा थंडच होता! मुंबईला झालेली फायनल मुंबई संघानेच जिंकूनही क्वाड्रँग्युलरच्या तुलनेत लोकांचा इंटरेस्ट एकंदर कमीच होता!

विझीच्या उपद्व्यापांची पूर्ण कल्पना असलेल्या पटीयालाच्या महाराजाने एक अफलातून चाल खेळली! रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित करण्यासाठी त्याने भारतीय क्रिकेट बोर्डाला भरघोस देणगी दिली! लॉर्ड विलिंग्डनशी असलेले आपले मतभेद मिटवण्यातही त्याने काही प्रमाणात यश मिळवलं होतं! याचा परिणाम म्हणून क्रिकेट क्लब ऑफ इंडीया (सीसीआय) चा अध्यक्षं म्हणून महाराजा भूपिंदर सिंहाची नेमणूक करण्यात आली! रणजी विजेत्या मुंबई संघाला खुद्दं लॉर्ड विलिंग्डनच्या हस्ते देण्यात आली ती रणजी ट्रॉफी!

इतकंच करुन महाराजा भूपिंदर सिंह थांबला नाही!

१९३६ सालच्या इंग्लंडच्या दौर्‍यासाठी पटीयालाचा युवराज यादवेंद्रसिंह याचा कॅप्टनपदासाठी विचार करण्यात येईल अशी लॉर्ड विलिंग्डनकरवी त्याने घोषणा करवली!

विझीचं माथं भडकलं!

भारताचं नेतृत्व करण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षेला सीके नायडूबरोबरच आणखीन एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता!

सीसीआयचा प्रेसिडेंट म्हणून नेमणूक होताच महाराजा भूपिंदर सिंहाने फ्रँक टॅरेंट याची ऑस्ट्रेलियाला रवानगी केली. भारतीय संघाविरुद्ध अनधिकृत टेस्ट मॅचेस खेळण्यासाठ ऑस्ट्रेलियन खेळाडूंना राजी करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतात येण्यासाठी राजी करण्यात टॅरेंट यशस्वी झाला असला तरी हे बहुतेक खेळाडू चाळीशी उलटलेले आणि निवृत्तीला आलेले होते. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघातील एकाही खेळाडूचा त्यात समावेश नव्हता!

ऑस्ट्रेलियन संघाचं भारतात आगमन होण्यापूर्वीच विझीने एक चतुर चाल खेळली. इंग्लंडचा बादशाह किंग जॉर्ज ५ वा याच्या सन्मानार्थ त्याने एक खास रौप्यमहोत्सवी स्पर्धा आयोजित केली! या स्पर्धेत खेळण्यासाठी आपल्या संघात विझीने त्याकाळच्या बहुतेक अग्रणी खेळाडूंचा समावेश केला होता! अगदी सीके नायडूसह!

अर्थात या स्पर्धेत महाराजा भूपिंदर सिंहाचा पटीयालाचा संघ होताच! फायनलमध्ये विझीच्या संघाने भूपिंदर सिंहाच्या संघावर मात केल्यावर विझीचा आनंद गगनात मावेनासा झाला! लॉर्ड विलिंग्डनच्या हस्ते विझीने मुद्दाम तयार करवून घेतलेली विलिंग्डन ट्रॉफी विजयी कॅप्टन म्हणून विझीलाच देण्यात आली!

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी म्हणून नवाब पतौडी (सिनीयर) भारतात आला होता. १९३२ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये (कुप्रसिद्ध बॉडीलाईन सिरीज) पतौडीने इंग्लंडतर्फे पदार्पणातच शतक झळकावलं होतं. महाराजा भूपिंदर सिंहासह सर्व सिलेक्टर्सना १९३६ च्या इंग्लंड दौर्‍यात भारताचं नेतृत्व करण्यासाठी पतौडीच योग्य वाटत होता!

विझीला याची कुणकुण लागताच त्याच्या कपाळावर आठी उमटली नसती तरच नवल! पतौडीची निवड त्याच्या महत्वाकांक्षेच्या मुळावरच येणार होती! परंतु पतौडीला केवळ विझीचाच विरोध नव्हता! आतापर्यंत चार टेस्टमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलेल्या सीके नायडूनीही पतौडीच्या निवडीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्तं केली! परंतु सिलेक्टर्सनी नायडूच्या नाराजीला वाटाण्याचा अक्षताच लावल्या! उलट या वादात गोवले गेल्यामुळे सीके नायडूची प्रतिमा मलिन करण्यात विझीला काही प्रमाणात का होईना यश आलं! अर्थात पतौडी विरुद्ध सीके नायडूला उचकवण्यामागे विझीचाच हात असावा असं मानण्यास जागा आहे!

विझीने पतौडीशीही गुप्तपणे संधान बांधलं असावं असं मानण्यासही वाव आहे. ऑस्ट्रेलियनांविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत टेस्टमधून फिटनेसचं कारण पुढे करुन पतौडीने आपलं अंग काढून घेतलं होतं. अशातच नशिबाचं एक दान विझीच्या बाजूने पडलं...

सिलेक्टर्सपैकी एक असलेल्या दुलिपसिंहाने प्रकृतीच्या कारणास्तव राजिनामा दिला! त्याच्या जागी सिलेक्टर म्हणून लॉर्ड विलिंग्डनने कोणाची नेमणूक करावी?

महाराजकुमार ऑफ विझीनगरम उर्फ विझी!

सिलेक्शन कमिटीमध्ये निवड होताच विझीने, पतौडी आणि होर्मसजी दोराबजी कांगा (कांगा लीग याच्याच स्मरणार्थ खेळवली जाते) यांच्याशी विचार विनिमय केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅप्टन म्हणून सीके नायडूच्या नावाला पतौडी विरोध करणार हे विझीला अपेक्षीत होतं आणि त्याप्रमाणे पतौडीने सीकेच्या नावाला ठाम नकार दिला! विझीने परिस्थितीचा फायदा उठवत चाणाक्षपणे कोणाचं नाव सुचवावं?

पटीयालाचा युवराज यादवेंद्रसिंह!

आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेला महाराजा भूपिंदर सिंहाच्या युवराजाला कर्णधारपदासाठी पुढे करण्याची विझीची खेळी वरकरणी आत्मघातकी वाटली तरी त्यामागे त्याचा हेतू वेगळाच होता!

जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या सीके नायडूला डावलून कर्णधारपदावर वर्णी लावण्यात आलेल्या युवराज यादवेंद्रसिंहाविरुद्ध जनमत प्रक्षुब्धं झालं होतं. यादवेंद्रसिंह बॅटींगला आल्यावर प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली! आधीच कर्णधारपदाच्या दडपणाखाली असलेला युवराज प्रेक्षकांच्या उघड विरोधामुळे अधिकच नर्व्हस झाला आणि साफ ढेपाळला! त्याच्या खेळावर व्हायचा तो परिणाम झालाच, पण कॅप्टन म्हणूनही तो सपशेल नापास ठरला! ऑस्ट्रेलियनांनी भारताचा दणदणीत पराभव केला!

या पराभवाबरोबरच १९३६ च्या इंग्लंड दौर्याच्या कर्णधारपदाच्या स्पर्धतून युवराज यादवेंद्रसिंह बाहेर फेकला गेला!

महापाताळयंत्री विझीला नेमकं हेच तर अपेक्षीत होतं!

ऑस्ट्रेलियनांची पुढची मॅच विझीच्या संघाविरुद्ध होती. या मॅचमध्ये बॅटींगमधलं आपलं सर्वकाही कौशल्यं पणाला लावून विझीने नाबाद ४० रन्स काढल्या आणि मॅच ड्रॉ करण्यात यश मिळवलं!

युवराज यादवेंद्रसिंहाचा अडसर विझीच्या मार्गातून दूर झाल्यावर त्याचं पुढचं लक्ष्यं होतं सीके नायडू!

ऑस्ट्रेलियनांविरुद्ध दुसर्‍या अनधिकृत टेस्टमध्ये कॅप्टन म्हणून सी़के नायडूची निवड करणं विझीला भाग पडलं होतं! लोकप्रिय खेळाडू असलेल्या सीकेची कॅप्टन म्हणून नेमणूक होताच लोकांमध्ये उत्साहाची भावना निर्माण झाली होती, परंतु विझीचा मात्रं जळफळाट झाला होता! कलकत्त्याच्या दुसर्‍या अनधिकृत टेस्टपूर्वी कॅप्टन सीके नायडू आणि फास्ट बॉलर अमरसिंग यांची जोरदार वादावादी झाली. अमरसिंगने सीकेच्या नेतृत्वाखाली खेळण्यास नकार दिला आणि मॅचमधून आपलं अंग काढून घेतलं!

अमरसिंग आणि सीके नायडू यांच्यातल्या वादाला १९३२ च्या इंग्लंड दौर्‍याची पार्श्वभूमी होती. त्यावेळी इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या काही खेळाडूंनी शिस्तप्रिय कॅप्टन असलेल्या सीके नायडूच्या सूचना झुगारून लावत अनेक रात्री बाहेर गुण उधळले होते! इतकंच नव्हे तर अनेकदा मॅचेसच्या दिवशीही काही जण दारु पिऊन झिंगलेल्या अवस्थेत आढळून आलेल होते! या सर्व रंगील्या खेळाडूंचा म्होरक्या होता तो म्हणजे अमरसिंग! सीकेशी त्याचा तेव्हाही जोरदार खटका उडाला होता, परंतु महाराजा नटवरसिंहानी दोघांमध्ये मध्यस्थी करून परिस्थिती हाताबाहेर जावू न देण्याची खबरदारी घेतली होती!

अमरसिंहाने माघार घेताच भारतीय संघाची बॉलिंग चांगलीच कमकुवत झाली होती. ऑस्ट्रेलियनांनी याचा फायदा उठवत ८ विकेट्सनी मॅच जिंकली!

निमित्ताला टपलेल्या विझीने लाहोरच्या तिसर्‍या अनधिकृत टेस्टमध्ये विझीच्या जागी कर्णधारपदावर नवीन नेमणूक केली!

वझीर अली!

आता मात्रं सीकेच्या सहनशक्तीचा अंत झाला! वझीर अली उत्कृष्ट बॅट्समन असला तरी सीकेच्या तुलनेत तो बराच ज्युनियर होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सीकेने साफ नकार दिला आणि लाहोरच्या मॅचमधून माघार घेतली! सीकेनी माघार घेताच अमरसिंगने आपण खेळण्यास उपलब्ध असल्याचं जाहीर केलं! वझीर अलीने ऑस्ट्रेलियनांविरुद्ध अप्रतिम बॅटींग करत शतक फटकावलं! अमरसिंगच्या फास्ट बॉलिंगसमोर ढेपाळलेल्या ऑस्ट्रेलियनांना अखेर पराभव पत्करावा लागला!

वझीर अलीच्या नेतृत्वात खेळण्यास नकार देणार्‍या सीकेची चौथ्या अनधिकृत टेस्टमधून शिस्तभंगाच्या कारवाईच्या नावाखाली विझीने हकालपट्टी केली! या मॅचमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला खडे चारले ते लाला अमरनाथच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आणि विजय मर्चंटच्या बॅटींगच्या जोरावर! सीकेच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियनांवर मात केल्यावर विझीच्या आनंदाला सीमा उरली नाही!

दरम्यान एकंदर सगळ्या राजकारणाचा रागरंग पाहून नवाब पतौडीने या भानगडीतून शिताफीने स्वतःची सुटका करुन घेतली! प्रकृतीच्या कारणास्तव आपण इंग्लंडच्या दौर्‍यावर भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास असमर्थ असल्याचं त्याने सिलेक्टर्सना कळवून टाकलं! वझीर अलीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास नकार देणार्‍या सीकेची कॅप्टन म्हणून निवड न करण्याबद्दल सिलेक्टर्सवर विझीने चांगलाच दबाव आणला होता! सीकेची कॅप्टन म्हणून निवड करण्याचा निर्णय ५ विरुद्ध १० मतांनी फेटाळला गेला!

शेवटी १९३६ च्या इंग्लंड दौर्‍यासाठी कॅप्टन म्हणून राहता राहिला तो एकच माणूस!

महाराजकुमार ऑफ विझीनगरम!
विझी!

('भारतीय क्रिकेटने कायकाय अत्याचार सहन केलेत!' - इति शिरीष कणेकर!)

अखेर एकदाची विझीची महत्वाकांक्षा पूर्ण झाली होती!

विझीने आयोजित केलेल्या स्पर्धेत आपल्या संघात त्याने कॅप्टन जॅक ब्रिटन-जोन्स नामक प्राण्याची वर्णी लावली होती. या कॅप्टन ब्रिटन-जोन्सचं क्रिकेट कौशल्य संशयास्पद असलं तरी तो विझीचा पहिल्या नंबरचा चमचा होता! १९३६ च्या दौर्‍यावर कॅप्टन म्हणून नेमणूक होताच विझीने या कॅप्टन ब्रिटन-जोन्सची टूर मॅनेजर म्हणून नेमणूक केली! दौर्‍यावर खजिनदार म्हणून विझीचा दुसरा सांगकाम्या हादी याची निवड झाली! दौर्‍यासाठी व्हाईस कॅप्टन वगैरे नेमण्याच्या भानगडीत विझी पडलाच नाही! ब्रिटन-जोन्सच्या जोडीने स्वत: विझीचा शब्द दौर्‍यावर अखेरचा असणार होता!

विझीच्या भारतीय संघात अनेक उत्तम खेळाडूंचा भरणा होता. अमरसिंग आणि महंमद निसार ही १९३२ च्या दौर्‍यावर गाजलेली फास्ट बॉलर्सची जोडी होतीच, आणि त्यांच्या जोडीला जहांगीर खानही होता! विजय मर्चंट, मुश्ताक अली, सीके नायडू, वझीर अली हे उत्तम बॅट्समन होतेच, शिवाय लाला अमरनाथ सारखा ऑलराऊंडर होता. दत्ता हिंदळेकर हा त्याकाळचा सर्वोत्कृष्ट विकेटकीपर होता! कोटा रामस्वामी हा चांगल्यापैकी बॅट्समन आणि सीएस नायडू (सीकेचा धाकटा भाऊ!) आणि अमीर इलाही हे आणखीन दोन ऑलराऊंडर, मेहेरवानजी आणि दिलावर हुसेन हे दोघे विकेटकीपर होते....

आणि

...बाका जिलानी होता!

(जहांगीर खान आणि अमीर इलाही हे दोघंही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानात गेले. जहांगीर खानचा मुलगा म्हणजे पुढे पाकिस्तानचा उत्तम बॅट्समन म्हणून नावाजला गेलेला माजिद खान!)

दौर्‍यावरील सुरवातीचे सामने हे कौंटी संघाविरुद्ध होते. अनेक कौंटी कॅप्टन्सवर आणि विशेषत: बॉलर्सवर विझीने वेगवेगळ्या भेटवस्तूंचा वर्षाव केला होता! या भेटवस्तूंच्या बदल्यात आपण स्वतः बॅटींग करताना त्यांनी थोडीफार 'सढळ' हाताने बॉलिंग करावी अशी विझीची अपेक्षा होती! सुरवातीला काही कौंटी बॉलर्स विझीच्या भेटींच्या आमिषाला बळी पडले असले, तरी व्यावसायिक इंग्लिश खेळाडूंना एका मर्यादेपलिकडे विझीवर मेहेरबानी करणं अशक्यंच होतं.

याचा व्हायचा तोच परिणाम झाला!

दौर्‍यावर सर्वाधिक रन्स काढणार्‍या बॅट्समनच्या यादीत विझी तळाला गेला होता! अगदी बॉलर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या महंमद निसार आणि जहांगिर खानच्या एकूण रन्सही विझीपेक्षा थोड्या जास्तंच होत्या!

इतक्यावर भागलं नव्हतं!

भगीरथ प्रयत्नांनी आणि पाताळयंत्रीपणे सूत्रं हलवून कर्णधारपदावर स्वतःचा अभिषेक करवू घेतलेल्या विझीची क्रिकेटच्या कौशल्यात साफ बोंब होतीच, पण फिल्डींग प्लेसमेंटचाही त्याला गंध नव्हता! बॅटींग ऑर्डरमध्ये कधीही चमत्कारीक बदल करण्याचीही त्याला हौस होती! त्याबद्दल कोणी काहीही कुरकूर केली की विझीने त्याच्यावर डूख धरलाच म्हणून समजावं!

लाला अमरनाथ या दौर्‍याच्यावेळी अवघ्या २४ वर्षांचा तरूण होता. भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वप्रथम शतक झळकावल्यामुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. दौर्‍याच्या सुरवातीलाच विझीने लालाला एका बाजूला घेऊन सीके नायडू आणि विजय मर्चंट यांच्यापासून दूर राहण्याची सूचना दिली! चकीत झालेल्या आणि गोंधळलेल्या लालाने होकार देताच विझीला फार आनंद झाला! त्यातच लालाने नॉर्थहॅम्टनशायरविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावल्यावर तर विझीने त्याच्यावर कौतुकाच वर्षाव केला! विझीचं हे कौतूक इतक्या थराला जाऊन पोहोचलं, की रोज ग्राऊंडपर्यंत येण्याजाण्यासाठी तो लालाला आपल्या कारमधून नेऊ लागला!

परंतु लवकरच विझीच्या लहरीपणचा फटका लालाला बसलाच!

लेस्टरशायरविरुद्धच्या मॅचमध्ये लालाने फिल्डींग बदलण्याची विझीकडे मागणी केली! लेस्टरशायरच्या विकेट्स काढण्याच्या दृष्टीने लालाची ही मागणी योग्यंच होती, परंतु ती विझीच्या फिल्ड प्लेसमेंटच्या अगदी विरुद्ध होती!

परिणाम?

लालाची बॉलिंग बंद करुन विझीने त्याला बाऊंड्रीवर फिल्डींगसाठी पाठवून दिलं!

वैतागलेल्या लालाने विझीच्या लहरीपणाबद्दल संघातील काही सहकार्‍यांशी चर्चा केली! अर्थात विझीला याची खबर लागलीच!

"मी या दौर्‍यावर कॅप्टन म्हणून आलो आहे! मला वाटेल तो निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे!" विझीने लालाला बजावलं!

"त्या अधिकारात आपल्या सहकार्‍यांचा हवा तसा अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही!" मूर्तीमंत पंजाबी रांगडेपण पुरेपूर मुरलेल्या लालाने ठणकावलं!

(फटकळ स्पष्टवक्तेपणाचा असा वारसा लाभलेल्या मोहिंदरने 'सिलेक्टर्स आर जोकर्स' असं म्हणावं यात आश्चर्य ते काय?)

विझीला तेवढं निमीत्तं पुरेसं होतं! त्याने ताबडतोब मॅनेजर ब्रिटन-जोन्सकडे लालाची तक्रार केली! आता हा ब्रिटन-जोन्स बोलूनचालून विझीचा चमचाच! त्याने लालाला विझीची माफी मागण्याची सूचना दिली! वरती लँकेशायर लीगमध्ये बर्‍याच मोठ्या रकमेचं काँट्रॅक्ट मिळवून देण्याची लालूचही दाखवली!

गोंधळलेल्या मनस्थितीत लालाने विझीची माफी मागितली!

अर्थात एवढ्यावर समाधान मानेल तर तो विझी कसला?

मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात लॉर्डसवर विझीने पुन्हा एकदा लालाची रवानगी बाऊंड्रीवर केली! इतकंच नव्हे तर २९ रन्समध्ये ६ विकेट घेणार्‍या लालाची बॉलिंग त्याने बंद केली ती पूर्ण मॅचमध्ये पुन्हा त्याच्याकडे बॉल दिलाच नाही!

भडकलेल्या लालाने विझीचा राग काढला तो इसेक्सच्या बॉलर्सवर! इसेक्सविरुद्ध त्याने दोन्ही इनिंग्जमध्ये शतक झळकावलं!

दरम्यान पाठदुखीमुळे लाला बेजार झाला होता. थोड्याफार उपचारांनंतर वेदनांनी तळमळत असतानाही विझीने त्याला बॉलिंग करायला भाग पाडलंच, पण इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा फिल्डींगसाठी बाऊंड्रीवर पिटाळलं! दिवसाचा खेळ संपल्यावर अमीर इलाही आणि बाका जिलानीबरोबर लाला या बद्दल चर्चा करत असल्याचं आढळून आल्यावर मेजर ब्रिटन-जोन्सने त्याला सक्तं ताकीद दिली!

त्यानंतर मेजर ब्रिटन-जोन्सने लालावर एक अत्यंत गंभीर परंतु संशयास्पद आरोप लावला!
बाहेरख्यालीपणा आणि वेश्यागमन!

भडकलेल्या लालाने ब्रिटन-जोन्सला आरोप सिद्ध करुन दाखवण्याचं जाहीर आव्हान दिलं! केवळ संघातील इतर खेळाडूंची बदनामी नको या सबबीखाली ब्रिटन-जोन्सने मानभावीपणाने अखेर हा आरोप मागे घेतला, परंतु खवळलेल्या लालाला आवरता आवरता सीके नायडू आणि अमीर इलाहीच्या नाकी नऊ आले होते!

या सर्व प्रकरणांना तोंड देतानाही लालाच्या कामगिरीत तसूभरही उणीव नव्हती! आतापर्यंतच्या सर्व मॅचेसमध्ये लालाने ११ मॅचेसमध्ये ५९१ रन्स काढल्या होत्या. ३१ विकेट्सही त्याच्या खात्यावर जमा होत्या!

या सगळ्या प्रकरणाचा कळसाध्याय गाठला गेला तो मायनर काउंटीज विरुद्धच्या मॅचमध्ये!

भारताने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर चौथ्या क्रमांकावर बॅटींग करण्यासाठी तयार राहण्याची विझीने लालाला सूचना दिली. सलामीला गेलेल्या विजय मर्चंट आणि मुश्ताक अलीने २१५ रन्सची प्रचंड पार्टनरशीप केली. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला जाण्याची वाट पाहत बसलेल्या लालाच्या आधी विझीने अमरसिंग, सीके नायडू आणि वझीर अली यांना बॅटींगला पाठवलं! ५ विकेट्स पडल्यावर आणि आणि दिवसाची जेमतेम काही मिनीटं शिल्लक असताना अखेर लालाची वर्णी लावण्यात आली!

लालाने दिवसाचा उरलेला वेळ खेळून काढला, परंतु ड्रेसिंगरुममध्ये परतल्यावर त्याच्या संतापाचा बांध फुटला!

नुकतीच सोडलेली पॅड्स एका बाजूला भिरकावत अस्सल पंजाबी भाषेत त्याने कॅप्टनला उद्देशून कचकचीत शिव्या घातल्या!

नेमकी याच मॅचमधून विझीने विश्रांती घेतली असल्याने या शिव्या वाट्याला आल्या त्या सीके नायडूच्या! अर्थात लालाच्या या शिव्यांचा रोख आपल्यावर नसून विझीवर आहे याची सीकेला पूर्ण कल्पना होती!

विझी आणि मेजर ब्रिटन-जोन्सला इतकंच निमीत्तं पुरेसं होतं!

मायनर काऊंटीज् विरुद्धची मॅच संपल्याच्या दुसर्‍याच दिवशी मेजर ब्रिटन-जोन्सने काही खेळाडूंच्या सह्या असल्याचं एक पत्रंक पुढे आणलं! लालाने कॅप्टन विझीशी गैरवर्तणूक केल्याचं त्यात नमूद केलं होतं! याची शिक्षा म्हणून दुसर्‍याच दिवशी कैसर-ए-हिंद बोटीवरुन लालाला भारतात परत पाठवण्यात येणार असल्याचंही मेजर ब्रिटन-जोन्सने जाहीर केलं!

सीके नायडू, वझीर अली, महंमद निसार, कोटा रामस्वामी, दत्ता हिंदळेकर यांनी विझीची गाठ घेऊन लालाला परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली! विझीने त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं तोंडदेखलं आश्वासन दिलं खरं, परंतु लालाला परत पाठवण्याबद्दल तो ठाम होता! सीके आणि वझीर अलीच्या सूचनेवरुन लालाने विझीची माफी मागणार्‍या चिठीवर सहीदेखील केली, परंतु लालाला परत पाठवण्याचा निर्णय मेजर ब्रिटन-जोन्सने घेतला आहे आणि तो निर्णय बदलण्यास तयार नाही अशी विझीने सारवासारव केली!

अखेर पूर्वनियोजित बेताप्रमाणे लालाची कैसर-ए-हिंद बोटीवरुन भारतात रवानगी झालीच!

विझीच्या या सगळ्या उपद्व्यापांना आणि प्रत्यक्ष मैदानावरील लहरीपणाला आणि अगम्य फिल्ड प्लेसमेंट आणि डावपेचांना सीके नायडू चांगलाच वैतागला होता. कितीही झालं तरी तो अत्यंत गाजलेला आणि सिनीयर खेळाडू होता. त्याच्या जोडीला कॅप्टनपदाचाही त्याला अनुभव होता. विझीच्या विक्षीप्त निर्णयांमुळे संघाचं नुकसान होत असल्याने त्याने उघडपणे आपली नाराजी व्यक्तं केली होती!

लाला अमरनाथला परत पाठवण्याच्या प्रकरणानंतर पहिल्या टेस्टपूर्वी संघातील सिनीयर खेळाडूंनी विझी आणि कॅप्टन ब्रिटन-जोन्सची भेट घेऊन एकूण चार महत्वाचे मुद्दे मांडले -

विझी कॅप्टन असला तरी सीके नायडू किंवा वझीर अली यांच्यापैकी एकाची व्हाईस कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात यावी.
सिनीयर खेळाडूंचा योग्य तो मान राखला जावा!
मैदानावरील डावपेचांत संघातील सर्व खेळाडूंचं मत विचारात घेण्यात यावं.
सर्वात महत्वाचं म्हणजे विझी आणि ब्रिटन-जोन्स यांनी कोणत्याही खेळाडूला हेतूपुरस्पर झुकतं माप देवू नये!

खेळाडूंच्या दबावासमोर झुकल्याचं नाटक करत विझीने वरकरणी हे सगळं मान्य केलं खरं, परंतु मनातून त्याचा जळफळाट होत होता. या सगळ्यामागे सीके नायडूचीच फूस असल्याची त्याची ठाम समजूत झाली होती! आधीच १९३२ सालच्या दौर्‍यावर सीके नायडूने एक सामान्य माणूस असूनही राजघराण्यात जन्मलेल्या व्यक्तीचा अधिकार असलेलं भारतीय संघाचं कॅप्टनपद स्वीकारण्याचा अक्षम्य अपराध (विझीच्या दृष्टीने) केला होता! त्यातच या प्रकाराची भर!

हे म्हणजे विझीसारख्या दीर्घद्वेषी माणसाला माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखंच होतं!

भारतीय संघाची आता विझीचे समर्थव विरुद्ध सीकेचे समर्थक अशी दोन गटांत विभागणी झाली होती! विजय मर्चंट, मुश्ताक अली यांच्या सारखे जेमतेम दोन-तीन खेळाडूच कोणत्याही गटात नव्हते!

लॉर्ड्सवर पहिली टेस्ट झाली ती अशा परिस्थितीत!

इंग्लिश कॅप्टन गबी अ‍ॅलनने टॉस जिंकून फिल्डींग घेतली. मर्चंट (३५) आणि हिंदळेकर (२६) यांनी ६२ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली, परंतु बाकी कोणालाच फारसं काही करता न आल्यामुळे भारताची पहिली इनिंग्ज १४७ मध्ये आटपली! मर्चंट आणि हिंदळेकर यांच्यानंतर सर्वात जास्तं रन्स होत्या त्या विझीच्या (१९)! परंतु भारताला झटपट गुंडाळल्याचा गबी अ‍ॅलनचा आनंद फार काळ टिकला नाही! महंमद निसार आणि अमरसिंग यांच्या फास्ट बॉलिंगपुढे इंग्लंडची इनिंग्ज १३४ वरच आटपली! अमरसिंगने ६ विकेट्स काढल्या होत्या! इंग्लंडकडून मॉरीस लेलँड (६०) वगळता कोणालाच त्यांना तोंड देणं जमलं नाही! भारताची दुसर्‍या इनिंग्जमध्ये अधिकच दारूण अवस्था झाली! हिंदळेकर (१७), पालिया (१६) आणि जहांगीर खान (१३) यांच्यामुळे भारताने कशीबशी ९३ पर्यंत मजल मारली! अर्थात इंग्लंडने केवळ अ‍ॅलन मिचेलच्या बदल्यात विजयासाठी आवश्यक असलेल्या १०८ रन्स फटकावून काढल्या. पहिल्या इनिंग्जमध्ये ६ विकेट्स घेणारा अमरसिंग दुसर्‍या इनिंग्जमध्ये साफ निष्प्रभ ठरला!

दरम्यान लाला अमरनाथला परत पाठवण्याच्या निर्णयावरुन भारतात वादळ उठलं होतं! सामान्य लोक भलतेच प्रक्षुब्ध झाले होतेच, परंतु क्रिकेटविषयी आस्था असलेल्या अनेक राजे-महाराजांनाही विझीचा हा तुघलकी निर्णय पटला नव्हता. भोपाळच्या नवाबाच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी ब्यूमाँट कमिटीची नेमणूक करण्यात आली. या चौकशीत लाला निर्दोष आढळून आल्यावर त्याला पुन्हा इंग्लंडला पाठवण्याची भोपाळच्या नवाबाने तयारी सुरूही केली होती....

इंग्लंडमध्ये असलेल्या विझीला याचा वास लागताच त्याने कोणत्याही परिस्थितीत लालाला पुन्हा इंग्लंडला येऊ न देण्याचा चंग बांधला! त्याच्या दृष्टीने हा आता त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता! आपलं सगळं राजकीय वजन वापरून आणि शेवटी खुद्दं लॉर्ड विलिंग्डनला भरीला घालून लालाला इंग्लंड्मध्ये परतण्यापासून रोखण्यास अखेर विझी यशस्वी झाला!

दरम्यान ज्या घोषणेची विझी आतुरतेने वाट पाहत होता ती घोषणा करण्यात आली!

विझीला सरदारकी देण्यात आली होती!

(अर्थात या सरदारकीचा विझीच्या क्रिकेटशी काहिही संबंध नव्हता! अनेक सामाजिक कार्यांना त्याने सढळ हाताने मदत केलेली होती. त्याचा गौरव करण्यासाठी किंग जॉर्जने त्याला सरदारकी बहाल केली होती. परंतु क्रिकेटशी काहीही संबंध नसताना (आणि क्रिकेटमधलं ओ की ठो कळत नसताना), रिटायर होण्यापूर्वी - खेळत असताना सरदारकी देण्यात आलेला एकमेव खेळाडू म्हणून विझीची नोंद झाली आहे!)

१५ जुलैला विझीला सरदारकी देण्याचा सोहळा सुरु असतानाच सीके नायडूच्या नेतृत्वात भारतीय संघाची लँकेशायर विरुद्ध मॅच सुरु होती. लँकेशायरला विजयासाठि १९९ रन्सचं लक्ष्यं देण्यात आलं होतं. सरदारकीच्या सोहळ्यातून वेळ काढून विझीने निसारच्या नावे तार पाठवून त्याला केवळ फुलटॉस बॉल टाकण्याची सूचना केली! कॅप्टन म्हणून एकही मॅच जिंकू न शकलेल्या विझीची सीकेला विजयाचं श्रेय मिळू नये अशी अपेक्षा होती! विझीच्या सूचनेप्रमाणे निसारने बॉलिंग करण्यास सुरवात केली, परंतु चाणाक्षं सीकेच्या ध्यानात सगळा प्रकार आला होता! त्याने निसारच्या जागी जहांगीर खानला बॉलिंगला आणलं आणि दुसर्‍या बाजूने स्वतः बॉलिंग टाकण्यास सुरवात केली! लँकेशायरचा एकही बॅट्समन या दोघांपुढे टिकू शकला नाही आणि अखेरीस सीकेच्या खात्यात विजयाची नोंद झालीच!

सरदारकी मिळवून परतल्याच्या आनंदात असतानाच विझीला एक अनपेक्षीत झटका मिळाला!

विजय मर्चंट संघातल्या गटबाजीपासून पूर्णपणे आलिप्त होता. विझी किंवा नायडू दोघांच्याही गटांपासून तो योग्य अंतर राखून असला तरी त्याची सहानुभूती सीकेलाच होती. दुसर्‍या टेस्टच्या आधी मर्चंटने विझीची गाठ घेऊन कॅप्टन म्हणून त्याच्या मर्यादांची स्पष्ट शब्दांत विझीला जाणिव करुन दिली! इतकंच करुन मर्चंट थांबला नाही, तर विझीने कॅप्टनपद सोडून सीके किंवा वझीर अली यांच्यावर ती जबाबदारी सोपवावी अशीही सूचना केली!

या सूचनेनंतर विझीचा तिळपापड झाला नसेल तरच नवल!

दुसर्‍या टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमध्ये भारताने २०३ पर्यंत मजल मारली ती मर्चंट (३३), वझीर (४२) आणि रामस्वामी (४०) यांच्यामुळे. हॅडली व्हॅरेटीच्या स्पिनपुढे भारतीयांची भंबेरी उडाली होती. भारताच्या २०३ रन्सच्या उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये ५७१/८ अशी टोलजंग इनिंग्ज उभारली ती वॉली हॅमंड (१६७), स्टॅन वर्दिंग्टन (८७), जोसेफ हार्डस्टाफ ज्युनिअर (९४), वॉल्टर रॉबिन्स (७६) आणि हॅडली व्हॅरेटी (६६) यांच्या फटकेबाजीमुळे! पहिल्या इनिंग्जमध्ये इंग्लंडने तब्बल ३६८ रन्सचा लीड घेतला होता!

भारताच्या दुसर्‍या इनिंग्जला सुरवात होण्यापूर्वी एक विलक्षण प्रकार घडला!

दत्ता हिंदळेकर जखमी झाल्यामुळे या मॅचमध्ये खेळत नव्हता. त्याच्या ऐवजी विजय मर्चंटच्या जोडीला मुश्ताक अलीला सलामीला पाठवण्यात आलं. पहिल्या इनिंग्जमध्ये मुश्ताक रनआऊट झाला होता. आता तो बॅटींगला जाणार तोच विझीने त्याला सूचना दिली.

"मर्चंटला रनआऊट कर!"

विझीला कर्णधारपद सोडण्याची सूचना देण्याबद्दल हे प्रायश्चित्त होतं!

विझीची ही आत्मघातकी सूचना ऐकून मुश्ताक चकीतच झाला. परंतु स्वतःला सावरत काहीच न बोलता तो बॅटींगला गेला. क्रिजवर पोहोचताच आधीच पुढे आलेल्या मर्चंटशी त्याची गाठ पडली. विझीने दिलेली सूचना त्याने मर्चंटच्या कानी घातली आणि दोघे मनमुराद खो-खो हसत सुटले!

विझीच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावत मुश्ताक अली (११२) आणि विजय मर्चंट (११४) यांनी तब्बल २०३ रन्सची सलामी करुन दिली! कोटा रामस्वामी (६०), सीके (३४) आणि अमरसिंग (४८) यांनी त्यांची मेहनत वाया जाणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे ही मॅच ड्रॉ करण्यात भारताला यश आलं!

अर्थात विझीच्या विक्षीप्त आणि लहरीपणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही! उलट दुसर्‍या टेस्टपूर्वी विजय मर्चंटने कॅप्टनपदावरुन पायउतार होण्याच्या केलेल्या सूचनेमागेही सीकेचीच फूस असावी असं त्याच्या मनाने घेतलं होतं!

कोणत्याही परिस्थितीत सीकेला अपमानित केलंच पाहिजे हा त्याने ठाम निश्चय केला!
अर्थात सीके सारख्या खेळाडूला परिस्थिती इतकी स्फोटक असताना सरळसरळ डावलणं विझीलाही शक्यं नव्हतं!

अखेर विझीने एक वेगळीच शक्कल लढवली!

आणि इथेच या नाटकात प्रवेश झाला तो बाका जिलानीचा!

बाका जिलानी हा एक सुमार दर्जाचा मिडीयम पेस बॉलर होता. आतापर्यंत दौर्‍यावर अनेकदा संधी मिळूनही त्याची कामगिरी यथातथाच होती. परंतु खेळाडूंपैकी कोण काय बोलतं हे वेळोवेळी विझीच्या कानाला लागून सांगत असल्यामुळे विझीची त्याच्यावर खास मेहेरबानी होती!

आता तर विझीने त्याला उघड-उघड 'ऑफर' दिली!
सीकेचा न भूतो न भविष्यती असा अपमान केल्यास टेस्टमध्ये पदार्पणाची संधी!

बाका जिलानीसारख्या अतिसामान्य कुवतीच्या खेळाडूला टेस्ट मॅच खेळण्याची यापेक्षा दुसरी कोणती चांगली संधी मिळणार होती?

विझीच्या सूचनेला त्याने ताबडतोब होकार दिला!

आणि दुसर्‍याच दिवशी सकाळी ब्रेकफास्ट घेताना जिलानीने सीकेवर अत्यंत अपमानास्पद शब्दांत हल्ला चढवला! जिलानीच्या शाब्दिक हल्ल्याने सीके इतका अवाक् झाला होता की काय बोलावं त्याला काहीच कळेना! भानावर येऊन तो जिलानीची हाडं खिळखिळी करणार असा रागरंग दिसू लागताच विझी 'योग्य' वेळी मध्ये पडला होता!

विझीने कबूल केल्याप्रमाणे बाका जिलानीची तिसर्‍या टेस्टमध्ये वर्णी लागली!

केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या तिसर्‍या टेस्टमध्ये भारताच्या नशिबी पुन्हा एकदा पराभव आला. वॉली हॅमंड (२१७), वर्दींग्टन (१२८) यांच्या २६६ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर इंग्लंडने ४७१ रन्स काढल्या. भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये मर्चंट (५२), मुश्ताक अली (५२) आणि दिलावर हुसेन (३५) यांच्या व्यतिरिक्त कोणाच्याच हाती काही फारसं लागलं नाही. फॉलोऑननंतर मर्चंट (५२), दिलावर हुसेन (५४), अमरसिंग (४४), रामस्वामी (४१) आणि सीके (८१) यांनी इनिंग्जने पराभव टाळला असला तरी इंग्लंडने ९ विकेट्सने भारताला धूळ चारलीच!

तीन टेस्टमधील सहा इनिंग्जमध्ये विझीने एकूण ३३ रन्स काढल्या होत्या!

विझीची ही 'कामगिरी' पाहून एका प्रेक्षकाने एक मार्मिक टिपण्णी केली.
The Kumar’s total number of runs during the tour was nowhere close to the number of Rolls Royce in his garage!

१९३७ च्या जानेवारीत ब्यूमाँट कमिटीचा रिपोर्ट बाहेर आला!

विझीच्या कप्तानीवर या रिपोर्टमध्ये अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे झाडण्यात आले होते. "फिल्ड प्लेसमेंट आणि बॉलिंग चेंजमधलं त्याला काहिही कळत नाही! संपूर्ण दौर्‍यावर एक विशिष्ट बॅटींग ऑर्डर त्याने नियमीतपणे ठेवली नाही! कित्येक चांगल्या खेळाडूंची महत्वाच्या सामन्यांत निवडच करण्यात आली नाही!" अशा शब्दांत विझीच्या कप्तानीच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगण्यात आली होती!

कॅप्टन म्हणून विझीला डच्चू देण्यात आला!
सुदैवाने एक खेळाडू म्हणूनही पुन्हा कधी त्याची निवड करण्यात आली नाही हे क्रिकेटचं नशिब!

टीममधून गचांडी मिळाल्यानंतरही विझीची खुमखुमी अजून गेली नव्हती!
सीके नायडूचा अपमान करण्याची एकही संधी सोडण्यास तो तयार नव्हता!

१९३७ मध्ये लॉर्ड टेनिसनच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ भारतात दाखल झाला. या दौर्‍यात तीन अनधिकृत टेस्ट मॅचेस खेळण्यात येणार होत्या. या टेस्टस अनधिकृत असल्या तरी भारतीयांच्या दृष्टीने त्यांना अपार महत्वं होतं. विझीला खेळाडू म्हणून नारळ देण्यात आलेला असला तरी अद्यापही तो सिलेक्टर्सवर आपला प्रभाव राखून होता!

विझीला डच्चू मिळाल्यावर कॅप्टनपदाची माळ गळ्यात पली होती ती विजय मर्चंटच्या! पहिल्या अनधिकृत टेस्टमध्ये इंग्लिश खेळाडूंनी मर्चंट्च्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारताची पार दुर्दशा करुन टाकली होती. अमरसिंगची तर अक्षरशः दयनिय अवस्था झाली होती. इतरांची कामगिरीही यथातथाच झाली होती!

कर्नल मिस्त्रींच्या अध्यक्षतेखालील सिलेक्शन कमिटीने दुसर्‍या अनधिकृत टेस्टसाठी सीके नायडूची निवड केली! या निर्णयाचं जनसामान्यांमधून जोरदार स्वागत करण्यात आलं असलं तरी एका माणसाच्या चेहर्‍यावर मात्रं आठी उमटून गेली!

विझी!

अमरसिंगचा सीकेशी पूर्वीपासूनच छत्तीसचा आकडा होता. सीके संघात येणार असेल तर आपण खेळण्यास तयार नाही असं त्याने उघडपणे बोलून दाखवलं होतं! सीकेचा त्यावेळी अगदीच नवीन असलेल्या विनू मंकडशीही वाद होताच! पाताळयंत्री विझीने या परिस्थितीचा फायदा उठवला नसता तरच नवल! अमरसिंगच्या फूस लावणीने आणि विझीच्या पूर्ण पाठिंब्याने भारतीय संघातील १४ पैकी ९ खेळाडूंनी सिलेक्टर्सच्या नावे एक पत्रं लिहून सीके नायडूची निवड झाल्यास आपण खेळण्यास राजी नसल्याचं पत्राद्वारे कळवलं!

सिलेक्टर्सच्या हाती हे पत्रं पडताच विझीने योग्य ते मोहरे पडद्यामागून हलवले! क्वाड्रँग्युलर सामन्यांमधून हिंदूंच्या संघाने माघार घेतली असल्यामुळे अद्यापही त्या मोसमात सीके नायडूने एकही सामना खेळला नव्हता, त्यामुळे सीकेचा फॉर्म कसा आहे हे पाहण्याची कोणालाच संधी मिळाली नव्हती! परंतु पाताळयंत्री विझीने फॉर्ममध्ये नसल्याने सीकेची निवड करण्यात आलेली नाही असं सिलेक्शन कमिटीतील पोपटांच्या तोंडून वदवून घेतलं. आश्चर्याची गोष्टं म्हणजे तेव्हा सिलेक्शन कमिटीत असलेला कॅप्टन विजय मर्चंटही विझीच्या या चालीला बळी पडला होता!

सीकेच्या ऐवजी कोणा महंमद सईदची निवड करण्यात आली!
या मॅचनंतर पुन्हा कधी त्याचं नावही कोणाला ऐकू आलं नाही!

मॅचच्या दिवशी सकाळी सीकेला वगळल्याची बातमी प्रेक्षकांना वर्तमानपत्रांतून समजली! खुद्दं सीकेलाही ही बातमी कॅप्टन असलेल्या मर्चंटकडून न कळता पेपर वाचल्यावरच समजली. त्यावेळी तो इंदोरहून मुंबईला मॅच खेळण्यासाठी येऊन पोहोचला होता!

या सामन्यात जेव्हा विजय मर्चंट लवकर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला! जणू सीकेच्या अपमानाचा बदला घेतला गेला होता! सेंटीनलच्या वार्ताहराने याचं नेमक्या शब्दांत वर्णन केलं,

"The cures of the 35,000 who had gathered to watch the match seems to have worked. Seldom had such cheers greeted the home captain’s dismissal."

अर्थात मर्चंटने आपली चूक खुल्या दिलाने मान्यं केली आणि सीकेची जाहीर माफी मागितली! परंतु विझीचा हेतू मात्रं साध्यं झाला होता.

एव्हाना ४१ वर्षांचा असलेला सीके नायडू पुन्हा भारतासाठी एकही मॅच खेळला नाही!

मात्रं पुढची वीस वर्ष, वयाच्या ६१ व्या वर्षांपर्यंत तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता!

मजेची गोष्टं अशी की पुढे बीसीसीआयचा व्हाईस प्रेसिडेंट या नात्याने १९५१ मध्ये अथक प्रयत्न करुन लाला अमरनाथला पुन्हा भारतीय संघात आणण्यामागे विझीचा फार मोठा पुढाकार होता! इतकंच नव्हे तर उत्तर प्रदेशात क्रिकेटचा प्रसार करण्याच्या दृष्टीने आणि कानपूरला टेस्ट क्रिकेट सेंटर बनवण्यात विझीचा सिंहाचा वाटा होता!

रणजी ट्रॉफीत उत्तर प्रदेशचं नेतृत्व करण्याची सीके नायडूना स्वतः विझीने विनंती केली होती!

आपल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्धी आणि विक्षीप्त कॅप्टनची ही विनंती सी़केनी स्वीकारली आणि वयाच्या ६१ व्या वर्षी सीकेनी उत्तर प्रदेशच्या कॅप्टनपदाची जबाबदारी स्वीकारली!

विझीच्या शब्दाखातर!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तिथला प्रतिसाद इथे चिकटवत आहे.
काळ कोणताही असला तरी हेवेदावे, खर्‍याखोट्या मानापमानाच्या कल्पना या सार्वकालिक असतात.
सी.के.नायडु, निस्सार, अमरसिंग, पालवणकर बाळू, विझी ही नावे वाचून पुस्तकांतला जुना काळ जागा झाला. आर्काइव्ज़ वाचणे हा अत्यंत आवडता छंद आहे. मग त्या चित्रपटांच्या असोत की क्रिकेटच्या.
'दि जामसाहिब ऑव्ह नवानगर' या नावाचा एक व्यक्तिचित्रणात्मक असा सुंदर निबंध १९३०-३२ सालच्या इंग्लिश क्रमिक पुस्तकात होता. ते पुस्तक बरीच वर्षे संग्रही होते. मला वाटते तो आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर(अल्फा ऑव्ह द प्लाउ') यांनी लिहिलेला असावा. (किंवा चेस्टर्टनही असेल. नक्की आठवत नाही.) पण अप्रतिम होता. त्यातले रणजितसिंहांच्या क्रिकेटचे वर्णन अत्यंत लालित्यपूर्ण होते.
हे विझी अत्यंत रटाळ कॉमेंट्री करून बोअर करीत असे जुने लोक सांगत.
सुरेख शैलीतला लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0