विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी

मुले आईवडिलांसारखी दिसतात, कधीकधी आजी किंवा आजोबांवर जातात. हे इतके उघड आणि सर्वमान्य आहे की ते सांगण्याचीही गरज नाही. 'वरची वस्तू सोडून दिली की खाली पडते' या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे ते सार्वत्रिक सत्य आहे. गेल्या लेखात आपण 'रात्री अंधार का असतो?' या प्रश्नाचा खोलवर विचार केला तर विश्वाच्या जडणघडणीविषयी काही निष्कर्ष कसे काढता येतात हे आपण पाहिले. तसेच या साध्या निरीक्षणामागच्या वैज्ञानिक सत्याचा सखोल अभ्यास केला की १३० दाण्यांपासून अब्जावधी लोकांना जीवनदान देण्याची शक्ती येते. ती कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्राची तोंडओळख करून घेणे आवश्यक आहे.

आईवडिलांचे गुणधर्म मुलांत उतरतात या मूलभूत निरीक्षणावर डार्विनचा उत्क्रांतीवाद उभा होता. मात्र हे गुणधर्म नक्की कुठच्या पद्धतीने पुढच्या पिढीत जातात याबाबत निश्चित खात्री नव्हती. एक विचार असा होता की मुलांचे गुणधर्म म्हणजे आईवडिलांच्या गुणधर्मांची सरासरी असते. हे वरवर स्वीकारायला ठीक वाटते पण त्यात दोन मुख्य अडचणी होत्या. एक म्हणजे जर प्रत्येक वेळी साधारण सरासरी येत असेल तर अनेक पिढ्यांनंतर प्रजातीमधले वैविध्य नष्ट व्हायला हवे. म्हणजे समजा एका पिढीतली माणसे उंच, मध्यम, बुटकी अशी आहेत. आता यांच्या कशाही जोड्या लावल्या तरी सर्वात उंच व्यक्तीपेक्षा कमी उंचीचाच जोडीदार मिळणार. अर्थातच पुढच्या पिढीतले त्यांचे मूल हे त्याच्या उंच पालकापेक्षा कमी उंच असणार. हेच बुटक्यांबाबत म्हणता येते. सर्वात बुटक्या व्यक्तीचे मूल त्यापेक्षा कमी बुटके असणार. कारण त्या सर्वात बुटक्या वक्तीचा जोडीदार किंचित का होईना, उंचच असणार. मूल त्यांच्या मध्ये कुठेतरी. आणि हे पिढ्यानपिढ्या चालले तर एक वेळ अशी येईल की सर्वच माणसे सर्वसाधारणपणे सारख्याच उंचीची असतील. या गुणधर्मांच्या सरासरीतून जर प्रजातीतले वैविध्य नष्ट होत असेल तर उत्क्रांतीवाद कोसळतो. कारण नैसर्गिक निवड कार्य करण्यासाठी त्या प्रजातीत वेगवेगळ्या गुणधर्मांसाठी वैविध्य आवश्यकच आहे. कमी किंवा अधिक वेगाने पळणारे चित्ते असतील तरच त्यांना हरणे पकडणे सोपे किंवा कठीण जाईल. आणि तरच काही चित्ते अधिक प्रजा निर्माण करतील तर काही कमी करतील. सर्वच चित्ते सारख्याच वेगाने जात असतील तर नैसर्गिक निवड होऊच शकत नाही. दुसरी अडचण म्हणजे प्रत्यक्षात हे घडताना दिसत नव्हते. म्हणजे आईचे डोळे काळे असतील आणि वडिलांचे निळे असतील तर मुलाचे डोळे काळपट निळे नसतात. ते काळे किंवा निळे असलेलेच दिसून येतात.

डार्विनला अर्थातच हा प्रश्न सतावत होता. गुणधर्म नक्की कसे पुढे जातात? त्याच्या काळात याचा कुठचाच शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास नसल्याने त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण उत्क्रांती व्हायची असेल तर प्रजातीमध्ये वैविध्य टिकून राहायला हवे हे त्याला माहीत होते. त्याने उत्क्रांतीवाद मांडला, त्याच सुमाराला ग्रेगर मेंडेलने पद्धतशीर अभ्यास करून उत्तर काढले होते आणि ते प्रसिद्धही केले होते. दुर्दैवाने डार्विनला या प्रयोगांविषयी त्याच्या मृत्यूपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. आणि आपल्या सिद्धांतातली त्रुटी भरली गेलेली त्याला शेवटपर्यंत कळली नाही.

मेंडेलने मटारच्या शेंगांच्या रंगांचा अभ्यास केला. बहुतांश शेंगा हिरव्या रंगाच्या होत्या. त्यांचे एकमेकांमध्ये परागीभवन करून जी नवीन झाडे येत तीही हिरवीच होती. मग त्याने पिवळ्या शेंगांच्या झाडांबरोबर हिरव्यांचा संकर केला. त्यातली पहिल्या पिढीची सर्वच झाडे हिरव्या शेंगांची आली. आता याच हिरव्यांचे एकमेकांबरोबर परागीभवन केल्यावर मात्र त्याला काही आश्चर्यकारक निरीक्षणे मिळाली. कारण यातली बहुतांश झाडे हिरव्या शेंगांची असली तरी काही झाडे मात्र पिवळ्या शेंगांची होती. म्हणजे दोन हिरव्यांची संतती पिवळी होती. याचा अर्थ पहिल्या पिढीत दिसणारे गुणधर्म हे दुसऱ्या पिढीत दिसले नाहीत, तरी ते पुढे जाऊ शकतील अशा सूप्त स्वरूपात ते शिल्लक होते. त्याने जेव्हा वारंवार प्रयोग करून बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की अशा प्रकारे तिसऱ्या पिढीतल्या पिवळ्यांचे प्रमाण बरोब्बर एक चतुर्थांश असते.

हे असे का होतं? त्याचे उत्तर असे की रंगाचा गुणधर्म हा दोन्ही पालकांकडून येतो. पण त्यातला हिरवा रंगाचा गुणधर्म हा प्रभावी (डॉमिनंट) असतो. तर पिवळा रंग गुणधर्म हा अप्रभावी (रिसेसिव्ह) असतो. याचा अर्थ असा की एका पालकाकडून हिरवा आणि दुसऱ्या पालकाकडून पिवळा आला तर संतती पोपटी होत नाही. तर हिरवीच निपजते. मात्र त्यांमध्ये पुढच्या पिढीत पिवळ्या रंगाचा गुणधर्म पाठवण्याची क्षमता शिल्लक असते. जर दोन्ही पालकांकडून पिवळाच गुणधर्म पुढे गेला तरच संतती पिवळी निपजते. मेंडेलच्या प्रयोगात पहिल्या पिढीचे पालक शुद्ध पिवळे आणि शुद्ध हिरवे होते. म्हणजे दोन्हीत त्यांच्या दोन्ही पालकांकडून एकाच रंगाचा गुणधर्म आलेला होता. दुसरी पिढीत मात्र एक हिरवा आणि एक पिवळा अशी विभागणी होती. हिरवा रंग प्रभावी असल्यामुळे त्यांच्या शेंगा हिरव्या होत्या. मात्र तिसऱ्या पिढीचा जन्म होताना संकर या 'अशुद्ध' हिरव्यांचा झाला होता. म्हणजे त्यांच्यात हि.पि. + हि.पि अशा जोडीचा संकर होता. आता आईकडून कुठचातरी एक आणि वडिलांकडून कुठचा तरी एक असा गुणधर्म पुढच्या पिढीत जात असेल तर त्यांची चार संतती पुढीलप्रमाणे असेल. हि. हि, हि. पि., पि. हि., आणि पि. पि. हिरवा प्रभावी असल्यामुळे पहिले तीन हिरवेच होणार मात्र चौथ्यात दोन्ही पिवळे असल्यामुळे त्याच्या शेंगा पिवळ्या दिसतात. चारऐवजी जर शेकडो संतती असतील तर सरासरी एक चतुर्थांश झाडांना पिवळ्या शेंगा दिसतील.

मेंडेलच्या प्रयोगामुळे हे सिद्ध झाले की संततीमध्ये जाताना, आईवडिलांचे गुणधर्म एकमेकांत मिसळत नाहीत. म्हणजे दोन रंग मिसळून जाऊन मधला रंग तयार व्हावा असे होत नाही. तर अनेक बाबतीत एकतर आईचा किंवा एकतर वडिलांचा असे गुणधर्म येतात. त्यातून हेही दिसते की काही गुणधर्म आईवडिलांत स्पष्ट दिसून येत नसले तरी ते सूप्त स्वरूपात असतात, व वेळोवेळी दिसून येतात. मेंडेलने इतरही काही महत्त्वाचे प्रयोग केले. उदारणार्थ, याच प्रकारचा, पण किंचित अधिक क्लिष्ट स्वरूपाच प्रयोग करून त्याने दोन वेगवेगळे गुणधर्म तपासले. म्हणजे रंग आणि शेंगांवर असलेल्या सुरकुत्या. त्यावरून त्याच्या लक्षात आले की हे दोन गुणधर्म एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. म्हणजे रंग कुठचा आहे यावर शेंगांचे सुरकुतलेपण अवलंबून नसते.

मेंडेलच्या प्रयोगानंतर शतकाभराने, म्हणजे १९६० च्या दशकात सर्व जग उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. बहुतांश आशियाई आणि आफ्रिकी देश वसाहतवादाच्या जोखडीतून नुकतेच बाहेर पडले होते. हातात राज्य आले होते पण गरीबी, अज्ञान, अनारोग्य आणि अन्नाचा तुटवडा हे प्रश्न शिल्लक होतेच. अनेक रोगांवर औषधे सापडल्यामुळे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती, आणि त्याबरोबर हे प्रश्नही भयंकर होत होते. अशा वेळी अन्नोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता.

तांदूळ हे सर्वच जगाचे मुख्य अन्न. पण उंच, भरपूर पीक देणाऱ्या नवीन जाती निर्माण झाल्या होत्या, पण त्या धान्याच्या वजनाने माना टाकत. यावर उपाय म्हणून या जातींचा बुटक्या जातींशी संकर करून नवीन जात तयार करण्याचा प्रयत्न इंटरनॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूटने फिलिपीन्समध्ये सुरू केला. १९६२ साली ३८ वेगवेगळे संकर केलेले होते. त्यातली आठवी जात सर्वात चांगली वाटली म्हणून निवडली गेली. तीमध्ये फक्त १३० दाणे होते. या १३० दाण्यापासून कुंडीत रोपे लावली. ही पहिली पिढी - पिढी१. यातली सर्व रोपे उंच होती. ह्या पिढी१ पासून १०००० रोपे लावली. यातली एक चतुर्थांश रोपे बुटकी होती!

आपल्या मेंडेलच्या प्रयोगाप्रमाणे तंतोतंत घडलेले होते. उंचपणाचा गुणधर्म प्रभावी होता, त्यामुळे पहिल्या पिढीत सर्व उंच झाडे असली तरी त्यांमध्ये बुटकेपणाचा गुणधर्म सूप्तावस्थेत होता. पुढच्या पिढीत - पिढी२ मध्ये - जिथे दोन्ही पालकांकडून बुटकेपणाचा गुणधर्म आला तिथे ती झाडे बुटकी होती. हा एक-चतुर्थांश दिसल्यावर लगेच शास्त्रज्ञांना लक्षात आले की हा बुटकेपणाचा एक जीन आपण वेगळा करून तो एकत्र करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या पिढी२ मधली सर्व उंच झाडे सोडून देऊन पिढी३ तयार केली गेली. यातली २९८ रोपे निवडून त्यांच्या दाण्यांपासून विशिष्ट रांगांमध्ये रोपे लावली गेली - पिढी४. यातल्या २८८ व्या रांगेतले तिसरे रोप सर्वोत्तम ठरलं, आणि त्याला नाव पडले IR8-288-3. याच रोपापासून पुढची बियाणे तयार केली गेली. हाच तो सुप्रसिद्ध IR8! यापासून खत न घालता हेक्टरला पाच टन, तर योग्य खतपाण्यानंतर हेक्टरला दहा टन पीक निघाले. त्याकाळी सर्वसाधारणपणे हेक्टरला एक टन पीक यायचे. तसंच १६० ते १७० दिवसांऐवजी १३० दिवसातच पीक मिळायला लागले. हे बियाणे जगभर फुकटात उपलब्ध करून दिले गेलं, आणि भाताच्या बाबतीत हरितक्रांती घडली.

प्रश्न विचारले, त्यांचा पाठपुरावा केला, आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला की उत्तरे मिळतात. आपल्या परिसरात, आपल्या विश्वात अमुक एखादी गोष्ट का घडते हे समजून येते. आणि हे निव्वळ कोरडे ज्ञान नसते. १८६५ साली मेंडेलचा प्रयोग निव्वळ शास्त्रीय कुतुहल शमवण्याचा भाग वाटलाही असेल कोणाला. पण त्यानंतर शंभर वर्षांनी त्या छोट्याशा कल्पनाबीजापासून IR8 चे पणजोबा असलेले पहिले १३० दाणे झाले. आणि त्या १३० दाण्यांपासून जे अन्न तयार झाले त्यातून अब्जावधी लोक अन्नान्न होऊन तडफडण्यापासून वाचले. द्रौपदीच्या थाळीतून पदार्थ वाढला तरी थाळीतले अन्न संपत नाही, कितीही अतिथी आले तरी त्यांना पोटभर खाऊ घालू शकत असे अशी कथा आहे. या १३० दाण्यांच्या बाबतीत ते अक्षरशः सत्य आहे.

मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

याचा अर्थ पहिल्या पिढीत दिसणारे गुणधर्म हे दुसऱ्या पिढीत दिसले नाहीत, तरी ते पुढे जाऊ शकतील अशा सूप्त स्वरूपात ते शिल्लक होते. त्याने जेव्हा वारंवार प्रयोग करून बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की अशा प्रकारे तिसऱ्या पिढीतल्या पिवळ्यांचे प्रमाण बरोब्बर एक चतुर्थांश असते.

लेख खूपच आवडला.

हेच बोल्तो.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१

तिसऱ्या पिढीतल्या पिवळ्यांचे प्रमाण बरोब्बर एक चतुर्थांश असते.

कोणी एक आहेत पिवळे, ते मात्र थेट स्वताच्याच पिढीत पिवळे झाले आहेत आणि बरोबरीने डँबिस सुद्धा.

कोणी एक आहेत पिवळे, ते मात्र थेट स्वताच्याच पिढीत पिवळे झाले आहेत आणि बरोबरीने डँबिस सुद्धा.

वाचताँय, वाचताँय हां मी, अनुबाय!!!
Smile

परिणामकारक गोष्ट! लेख आवडला.

मिसळपाववरील प्रतिसाद इथेही देतो आहे; प्रतिसादाची नोम्द रहावी हे एक कारण;
दुसरं म्हनजे ह्यातल्या काही उपयुक्त माहितीने एखाद्या मधुमेही रुग्णास लाभ होउ शकतो.
हीच लेखमालिका मिसळपाववरही सुरु आहे. तिथे गविंनी विचारलय :-

याची निगेटिव्ह साईड नाही का
गवि - Thu, 21/01/2016 - 14:09
याची निगेटिव्ह साईड नाही का काहीच? फेवरेबल पीक आलं हे उत्तमच. पण काही इतर गुण,क्षमता वगैरे नाहीश्या होणं, काही छुपे अवगुण वाढीस लागणं किंवा परतीची वाट नाहीशी होणं असं काही संभव कितपत?

ह्याबद्दल बोलावंसं वाटलं.
काही दिवसांपूर्वी एका संस्थेबद्दल ऐकलं होतं.
मधुमेह /डायबेटिस हा पूर्ण परतावून लावता येउ शकतो; मधुमेहाच्या गोळ्या किम्वा इन्शुलिन इंजेक्शन जे घेतात त्यांचं इंजेक्शन घेणं पूर्णतः थांबवता येउ शकतं; असे दावे संस्थेनं केले.
हे सरळ सरळ "आल्टरनेट मेडिसिन " म्हणता यावं असं होतं. म्हणजे "मॉडर्न मेडिसिन" मध्ये (तथाकथित "अ‍ॅलोपथी" मध्ये ) मध्ये कदाचित बसणार नाही. त्यांनी कित्येक पेशण्ट्स बरे झाल्याचे दावे केले. त्यांनी चक्क जी टी टी -- ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मध्ये सुद्धा यश मिळवलं. ही टेस्ट म्हणजे ऑल्मोस्ट मधुमेह पूर्णतः परतवल्याची पावती असते. सुमारे ( तब्बल) पंधरा एक चमचे साखर खायला साम्गतात; त्यानंतर दोन तासानं रक्तातली साखर वगैरे तपासतात . तर अशा ह्या टेस्टमध्ये हे लोक यशस्वी झाले.
.
.
ह्यातून मला मिपा आणि उपक्रमावर लिहिलेली नरेंद्र गोळे ह्यांची लिहिलेली मालिका आठवली. त्यांनी हृदयविकार की हाय ब्लड प्रेशर कसे पूर्णतः परतवून लावले ; ह्याबद्दल त्यात लिहिले होते. सहसा ब्लड प्रेशर व डायबेटिस एकदा मागे लागले की जन्मभर तस्सेच राहणार अशीच मानसिकता दिसते. असो. तो मूळ मुद्दा नाही.
.
.

ह्या थेरपी मध्ये बर्‍याच गोष्टी अंतर्भूत आहेत.
त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.

त्यातील एक महत्वाचा मुद्दा होता; आप्ण खात असलेल्या गव्हाचा वापर संपूर्णतः बंद करणे.
त्याऐवजी "खपली गहू" म्हणजेच " लाँग व्हीट " वापरणे. सध्या रुढार्थाने आपण सगळे जो गहू खातो;

तो बाय डिफॉल्ट हरित क्रांतीतून आलेला गहू आहे . भरपूर उत्पादन क्षमता असणे , कमी पाणी लागणे ; कापणी वगैरे सोयीची असणे; अशा कारणातून ह्या हरित क्रांतीनंतरच्या हायब्रीड गव्हाचा प्रसार झाला .
त्यापूर्वी बाय डिफॉल्ट गहू म्हणजे खपली गहू असेच समीकरण होते.
तो गहू आज अत्यल्प ठिकाणी मिळतो. प्रचंड शोध घेतल्यानंतर आख्ख्या पुण्यात फक्त दोन किंवा तीन दुकाने साप्डली. अगदि कोपर्‍यावरच्या मारवाडी दुकानांपासून ते मोठ्या मंडईपर्यंत सर्वत्र शोधले. तीन शे चारशे दुकानं पालथी घातली असतील.
अर्थात काही नेहमीचे आक्षेप म्हणजे संस्था कशाच्या ओरावर दावे करते आहे; वगैरे म्हणता येइल.
तर त्यासाठी त्यांनी आधुनिक विज्ञानाल मान्य होतील असा सांख्यिकीय डेटा जमवायला सुरुवात केलेली आहे. मला ह्याबद्दल समजलंं; तेव्हा माझ्या एका परिचित मधुमेहिंना मी ह्याबद्दल सांगितलं.
त्यांचाही विश्वास बसेना. दाव्यातील सत्यता पडताळण्यासाठी ह्याचा कुणी लाभ घेतला आहे का; हे आम्ही शोधू लागलो. मिपाचेच एक माजी संपादक ह्याचा अनुभव घेतलेले आहेत; असे समजले.
ते दहाहून अधिक वर्शे इन्शुलिन घेत होते; इतका त्यांना प्रॉब्लेम होता.
ह्या थेरपीचे कडक पालन केल्याने दोनेक महिन्यात त्यांचे इन्शुलिन पूर्णतः थांबले.
आणी लवकरच गोळ्याही थांबल्या.
.
.
मी परिचिताला ह्याबद्दल ( मिपाच्या माजी संपादकांच्या अनुभवाबद्दल) सांगितलं.
परिचितांनी थेरपी सुरु केली. परिचितांना मधुमेह होउन दोनेक वर्षे झाली होती.
आता त्यांचा मधुमेह ऑल्मोस्ट गेल्यात जमा आहे. ( HBA1C 6.1 आलेली आहे.)
तर मी ज्या संस्थेबद्दल बोलत होतो तिची अधिक माहिती इथे मिळेल :-
http://www.freedomfromdiabetes.org/Program
.
.
ह्या संस्थेतील लोक नवीन काहीही सांगत नाहियेत. त्यांचे बहुतांश उपाय हे नील बर्नार्ड ह्या शास्त्रज्ञाच्या संशोधनावर आधारित आहेत. फक्त त्या़ंनी त्याचं भारतास / भारतीयांस अधिक अनुकूल असं रुपडं बनवलय.
नील बर्नार्ड ह्यांची अधिक माहिती :-

https://en.wikipedia.org/wiki/Neal_D._Barnard
.
.
काही प्रमाणात Dean Michael Ornish ह्यांचीही स्कूल ऑफ थॉट्स हे लोक आचरीत असल्याचं दिसलं
.
.
नवीन मिळणारी हल्लीची कोणतीही प्रजाती लोकवन असो किम्वा अजून कोणतीही ; ही मुळात अस्सल स्थानिक, भारतीय पारंपरिक प्रजाती नाहिये म्हणे. हायब्रीड आहे.
तर ह्या हायब्रीड मध्ये काही त्रासदायक असे गुणधर्म आलेत (किंवा उपयुक्त गुणधर्म त्यातून निघून गेलेत) .
ह्या हरवलेल्या गुणधर्मांमुळे सगळ्यांना नव्हे; पण कित्येकांना मधुमेहाचा धोका कैकपट वाढलाय.
.
.
प्लीझ नोट:-

१. हा प्रकार सध्या मेनस्ट्रिम मध्ये नाहिये; आधुनिक वैद्यकशास्त्र नाहिये; असे म्हणणे असेल तर ते मान्य आहे. आधुनिक वैद्यकास मान्य होण्यासाठी कित्येक निकष असतात; त्यातला सांख्यिकीय निकष, प्लासिबो बरोबर तुलना वगैरे सगळ्याची कल्पना आहे.
"फ्रीडम फ्रॉम डडायबेटिश्या संस्थेतली लोकं; आधुनिक वैद्यकास ( अ‍ॅलोपथीस) मान्य होइल अशी रचना , रिसर्च पेपर बनवत आहेतच. सर्व रुग्णांची माहिती; मेडिकल रिपोर्ट्स ते जमवताहेत.
.
.
२. हे सगळं सांगतोय म्हणजे हरित क्रांती ; हायब्रीड, नॉर्मन बॉरलॉग वगैरेंना नाकारत नाहिये. तातडीचा, महत्वाचा प्रश्न हा अन्न/भूक हा आहेच; हे मी जाणतो. खरं तर बोरलॉग, हरित क्रांती वगैरेला माझ्या
सर्टिफिकेटचीही गरज नाहिये; फक्त मी भ्रमात नाहिये; इतकच सांगायचं आहे.
(खपली गहू हा सामान्य गव्हाच्या चौपट ते पाचपट किमतीस मिळतो; ह्यावरुन काय तो अंदाज बांधावा.)

मुद्दा काय आहे हेच न कळल्यानी गोंधळायला झाले.

जर हे संशोधन ट्रायल च्या परीक्षांना पास झाले तर मॉडर्न मेडीसीन आत्मसात करेलच की!!! मॉडर्न मेडीसीन ही काही कोणाच्या अस्मितेची चळवळ नाही की विरोधा साठी विरोध करायला. जे जे सिद्ध होऊ शकते ते ते मॉडर्न मेडीसीन मधे घेतले जाते.

आणि मीनव्हाईल, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अश्या गोष्टींचा उपयोग करुन बघायला हरकत नाहीच ना.

------------

पण क्लिनीकल ट्रायलच्या आधी जहिरात करुन आपली थेरपी विकणे ही गोष्ट माझ्या फार पचनी पडत नाही.

------------

अ‍ॅमवे ची प्रॉडक्ट बाकीच्या कंपन्यांच्या प्रॉडक्ट पेक्षा भारी कशी असु शकतात आणि असली तर बाकीच्या कंपन्या त्यांची कॉपी का करत नाहीत, हे पण समजत नाही. अ‍ॅमवे ची प्रॉडक्ट भारी असतील तर ते ती थेट दुकानात विकायला का ठेवत नाहीत?

म्ला वाटते जनुकसुधारित गव्हाच्या बियांण्यामुळे किंवा त्याने जुन्या असंकरित-असुधारित बियाण्यावर मात केल्यामुळे खपलीसारख्या असंस्कारित बियाण्यातले मधुमेहरोधक गुण मानवासाठी अनुपलब्ध झाले असे मनोबांना म्हणायचे आहे.

ते मान्य आहे राही तै. फक्त प्रॉपर प्रोसेस फॉलो करावी जी लोक संशोधन करत आहेत त्यांनी इतकीच अपेक्षा.

पृथ्वीतला वर एकही अशी गोष्ट नाही की जिचा औषधी उपयोग होऊ शकणार नाही अश्या अर्थाचे काहीतरी आयुर्वेद सांगतो. जे खरे असण्याची शक्यता आहे.

प्रॉपर प्रोसेस फॉलो करा, क्लिनिकल ट्रायल करा आणि मग स्वताला पब्लिश करा इतकेच म्हणणे आहे.

तसेही रक्तदाब आणि डायबेटीस हे काही प्रमाणा जीवन आणि आहार पद्धती संबंधीत रोग आहेत हे मॉडर्न मेडीसीन सांगतेच सांगते.

जनरली अल्टरनेट मेडिसिनमधले दावे ज्यात मॉडर्न मेडिसिनकडे उपचार नाहीत अशा रोगांविषयीच असतात.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टोमणेबाजी आणी सिनिसिझमने भरलेला , कुतूहलाचा अभाव असणारा प्रतिसाद वाइड बॉल समजून सोडून देत आहे

वस्तुस्थिती आहे.

तुम्हाला अमुक तमुक थेरपीने टायफॉईड, क्षयरोग, कुष्ठरोग, कॉलरा पूर्ण बरा झाला असे दावे आढळणार नाहीत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

so what ?

खपली गव्हामागची कारणमीमांसा माहीत नाही. कदाचित "क्युअर" वगैरे हे गिमिक असावं आणि तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स किंवा तत्सम कारण असावं. (जे अनपॉलिश्ड तांदूळ, ओट्स किंवा अन्य प्रकारांनाही लागू होईल.) एकंदरीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणं आणि व्यायाम ही मॉडर्न मेडिसिनमधेही सर्वाधिक प्रेफरेबल ट्रीटमेंट लाईन आहे. त्याने नाही कंट्रोल झालं तर पुढच्या स्टेप्स.

पण हा जो आल्टर्नेट मेडिसिनच्या दाव्यांचा जनरल मुद्दा आहे त्याबद्दल.. थत्तेचाचा, तुमच्या विधानात किंचित बदल सुचवतो..

मॉडर्न मेडिसिनने बरे होणारे (पक्षी: टायफॉईड, कुष्ठरोग, कॉलरा, टीबी वगैरे) रोग - यावरही आल्टरनेट मेडिसिनकडे उपचार असतातच. आणि ते "बिना साईड इफेक्टचे" असतात. Wink

मॉडर्न मेडिसिन ज्यावर आपल्याकडे आजतरी उपाय नाही हे मान्य करतं त्यावर तर आल्टरनेट मेडिसिनमधे अक्सीर इलाज असतोच असतो.. आणि त्या इलाजाचा फायदा = "चांगला गुण आला" असा मोघम असतो. पूर्ण बरे झालेले रोगी (जाहिरातीतले ते हसत हसत सामान्य जीवन जगणारे..) हे ज्या भौगोलिक परिसरात जाहिरात छापून येतेय तिथपासून किमान दीडहजार किलोमीटरवरच्या राज्यांमधे असतात. आणि नेहमी लास्ट नेम बेसिसवर असतात. (शर्माजींचा सोरायसिस ठीक झाला, श्रीमती मिश्रांचे केस लांब झाले, श्री. रेड्डींच्या लिम्फोमाला उतार पडला.. वगैरे)

खपली गव्हामागची कारणमीमांसा माहीत नाही. कदाचित "क्युअर" वगैरे हे गिमिक असावं आणि तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स किंवा तत्सम कारण असावं. (जे अनपॉलिश्ड तांदूळ, ओट्स किंवा अन्य प्रकारांनाही लागू होईल.) एकंदरीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणं आणि व्यायाम ही मॉडर्न मेडिसिनमधेही सर्वाधिक प्रेफरेबल ट्रीटमेंट लाईन आहे. त्याने नाही कंट्रोल झालं तर पुढच्या स्टेप्स.

१००% मान्य. मार्केटींग गिमिक असू शकतं हे मान्य. मला वैद्यकातलं आणि आहारशास्त्रातलं ज्ञान नाही.
.
.

पूर्ण बरे झालेले रोगी (जाहिरातीतले ते हसत हसत सामान्य जीवन जगणारे..) हे ज्या भौगोलिक परिसरात जाहिरात छापून येतेय तिथपासून किमान दीडहजार किलोमीटरवरच्या राज्यांमधे असतात.

हे जर ह्या केसबाबत म्हणत असाल तर --
मिपाचे माजी संपादक आहेत. अधून मधून पुण्यात असतात. ते मार्गदर्शन करु शकतील. तुमेहे पुण्याहून हजारभर मैल लांब रहात नसावात.
तुमचा इ मेल आय डी द्या. मेदिकल रिपोर्ट्स पाटह्वतो माझ्या परिचितांचे.

हे जर ह्या केसबाबत म्हणत असाल तर --

मी आल्टरनेट मेडिसिन ही मॉडर्न मेडिसिनपेक्षा वेगळी मानून त्यावर क्वॅकरी चालवणार्‍यांबद्दल म्हणजेच एका मोठ्या जनरल व्यापाराविषयी बोलतोय. या केसविषयी नव्हे.

यात पेपरमधे जाहिराती, कधीही संपर्क होऊ न शकणारी टेस्टिमोनियल्स, बारीक अक्षरात कातडीबचाऊ डिस्क्लेमर्स हे सर्व असतं. (ही केवळ पूरक उपचारपद्धती आहे. तुमच्या नेहमीच्या औषधांसोबत घ्या. आहार आणि व्यायाम यांच्या जोडीला पूरक म्हणून घेणे. इ इ टाईपचं बरंच काही असतं)

गवि - तुमचा हा दृष्टीकोन एकदम "नही चलेगा" टाइप चा आहे.

हा खपली गहू का कायसा, कुठे मिळतो?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुणे :-
१. तुळशीबागेजवळ शहा ब्रदर्स का अशाच कैतरी नावाचं किराणा दुकान आहे; तिथे मिळतो.
(इथे पूर्वीपासून मिळतो. शौकीन लोक गव्हाच्या खिचडीसातेहे वगैरे मुद्दामहून इथून नेत.)
इथे सत्तर पंचाहत्तर रुपये किलो आहे.
२. मिलेट्स अ‍ॅण्ड मोअर म्हणून एक दुकान आहे औंधमध्ये. नवजागृत हेल्थ कॉन्शस लोक हे ह्यांचं टार्गेट ऑडियन्स.
इथे शंभर ते एकशे दहा रुपये किलो इतकी किंमत आहे.
३. येरवड्यात एक दुकान आहे. ते घरपोच डिलिवरी देतात; नाव विसरलो. ह्यांचंही नवजागृत हेल्थ कॉन्शस लोक हेच टार्गेट ऑडियन्स.
इथेही शंभर ते एकशे दहा रुपये किलो इतकी किंमत आहे.

धन्यवाद! चवीला कसा असतो? नॉर्मल गव्हासारखा?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

थोडासा वेगळा. किंचित अधिक चविष्ट. पोळी लालसर दिसते गरम असताना.
पोळी करणं सुरुवातीस एखादा आठवडा जड जातं असं वापरकर्त्याकडून ऐकलय.

खूप वर्षांपूर्वी पाहिला होता आणि जात्याच वनस्पतींमध्ये, अनवट आणि अस्तंगत होणार्‍या गोष्टींमध्ये प्रचंड रस असल्यामुळे घरी आणून खाल्लाही होता. तेव्हा फारसा आटापिटा न करता मिळत असे. आणि भरड असल्याने स्वस्तही असे. दिसायला काळसर. मधली रेघ ठळक आणि दाणा थोडा लांबट इतके आठवतेय. फारसा आकर्षक दिसत नसे. पीठही जरा जाडसरच आले होते. गहू-तांदूळ अनेक ठिकाणचे मुद्दाम आणून खाऊन बघितले आहेत. दक्षिण महाराष्ट्रातले एक ओळखीचे गृहस्थ त्यांच्या शेतात पिकवीत. त्यांनी जोरदार शिफारस केली होती आणि आता असली त्यांच्या मते पारंपरिक म्हणून पौष्टिक धान्ये कुणी खात नाही म्हणून खंतही व्यक्त केली होती.

खपली ही बहुधा अधिक ग्लूटन असलेली जात असावी.

माझी आजी म्हणे की खास पुरणपोळी करण्यासाठी ती खपली गहू आणत असे. पुरणपोळीची कणिक मळल्यावर कणकेला लांबलचक तार यावी लागते (म्हणजे कणकेचा पोळी-इतपत गोळा दोन हातांनी ओढला, तर तुटून दोन गोळे होण्यापूर्वी गोळा तारेसारखा लांबलचक व्हावा लागतो. अशी असल्यास लाटताना पुरणावरती पातळ पापुद्र्यासारखी कणीक राहिली, तरी पापुद्रा फाटत नाही.) तिंबलेल्या कणकेत तार ग्लूटनमुळे तयार होते, म्हणून खपली गव्हाच्या कणकेत ग्लूटनचा अंश अधिक असावा असा माझा कयास आहे.

खपली गहू अधिक कडक/टणक असते हे वर अनेकांनी सांगितलेलेच आहे.

ग्लूटन अधिक असलेला गहू अधिक टणक असतो. अधिक ग्लूटन आवश्यक असलेल्या ब्रेडकरिता सुद्धा "hard wheat" जाती वापरतात. केक वगैरे पदार्थांत ग्लूटन कमी असलेले बरे, त्यांकरिता soft wheat पासून तयार केलेला मैदा वापतात.

हे त्रिपाठी बरेच ऐकायला मिळतात आजकाल. औषध न देता कुठला तरी विचित्र डाएट फॉलो करायला लाऊन शुगर कमी करवतात म्हणे. सकाळी दूध चहा न पिता पालक/ओवा वगैरे घातलेली स्मूदी प्या फक्त वगैरे वगैरे प्रकार असतात.

ओळखिच्यात २-३ लोकांनी लाभ घेतला आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बहुतांश लोकांची मधुमेहाची जी स्टेज असते त्यामधे निव्वळ आहारानेच शुगर कंट्रोलमधे राहू शकते हे सत्य इथे विसरलं जातं. आहारात बदल केला, ग्लायसेमिक इंडेक्स आणि योग्य बॅलन्समधे प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स सांभाळले तर शुगर कंट्रोलमधे राहतेच. यामधे मॉडर्न मेडिसिनच्या विरोधी काही नाही. अगदीच अनकंट्रोल्ड स्थितीला पोचलेल्या केसेसमधे कंपल्सरी औषध, इंशुलिन वगैरे लागतंच.

बहुतांश लोकांची मधुमेहाची जी स्टेज असते त्यामधे निव्वळ आहारानेच शुगर कंट्रोलमधे राहू शकते हे सत्य इथे विसरलं जातं. आहारात बदल केला, ग्लायसेमिक इंडेक्स आणि योग्य बॅलन्समधे प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स सांभाळले तर शुगर कंट्रोलमधे राहतेच. यामधे मॉडर्न मेडिसिनच्या विरोधी काही नाही. अगदीच अनकंट्रोल्ड स्थितीला पोचलेल्या केसेसमधे कंपल्सरी औषध, इंशुलिन वगैरे लागतंच.

+१ अस्सेलही तसं.
बाकी अनुप मह्णतो तसं हे विचित्र वाटू शकतं.

रोज इन्शुलिन घ्यायला लागत असे अशा लोकांचा मधुमेह पूर्ण बरा झाला असा दावा करतात.

माझी पत्नी गेल्या रविवारी त्रिपाठीच्या लेक्चरला गेली होती. तिथे असे सांगणारे दोन तीन लोक होते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रोज इन्शुलिन घ्यायला लागत असे अशा लोकांचा मधुमेह पूर्ण बरा झाला असा दावा करतात.

हेच बोल्तो. शुगर ५०० वरून १५० वर आली वगैरे अचाट गोष्टी असतात. ३५० वरून १५० आलेली जवळची व्यक्ति माहिती आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला म्हणायचं होतं ते गविंनी आणि अनुरावांनी बहुतांश म्हटलेलं आहे.

हरितक्रांतीमधून जे अब्जावधी टनांनी उत्पादन वाढलं त्याने आयुष्यं वाचली पण त्याचा तोटा म्हणून जुन्या काही जाती नष्ट झाल्या हे खरं आहे. त्यातल्या अमुकतमुक जातीत डायाबिटिस निवारण्याची क्षमता होती आणि आता ती नष्ट झाली असं या प्रतिसादातून भासतं. त्याबद्दल थोडं.

आपण एवढं मिळवलं, पण काहीतरी हरवलं राजा - हा विचार अनेकांना सतावत असतो. त्यातून अशा दाव्यांना पुरेसं पाठबळ नसलं तरीही त्यांवर चटकन विश्वास बसतो. आता पुरेसं पाठबळ म्हणजे काय? इतक्या लोकांनी आपल्या कहाण्या सांगितल्या आहेत हे पुरेसं नाही का? तर कोणीतरी खपली गव्हाचा अभ्यास करण्याइतकं कदाचित पुरेसं असेलही. मात्र यात अनेक संभाव्य अडचणी आहेत.

१. खपली गव्हात डायाबिटिसवर मात करणारे गुणधर्म आहेत की निव्वळ लो ग्लायसेमिक इंडेक्सपोटी हे होतं?
२. एकंदरीत आहारावर नियंत्रण, व्यायाम यामुळे अनेक मधुमेहींची साखर कमी व्हायला मदत होते. हे उपाय आधुनिक वैद्यकही सांगतं. मग या आल्टरनेट पद्धतीत वेगळं काही आहे का?

थोडक्यात पद्धत कुठे संपते आणि फॅड कुठे सुरू होतं याची कल्पना नाही. म्हणून क्लिनिकल ट्रायल झाल्याशिवाय अशा पद्धतींवर फार विसंबू नये असं वाटतं. त्यांमधलं चांगलं जरूर घ्यावं - उदाहरणार्थ नियमित व्यायाम आणि शर्कराजनक पदार्थांवर नियंत्रण. पण कुठल्यातरी पदार्थात जादूई गुणधर्म आहेत यावर फक्त क्लिनिकल ट्रायल झाल्यावरच विश्वास ठेवा.

मान्य. मला स्वतःला विशेष गती/ज्ञान वैद्यकीय क्षेत्रात(ही) नाही. फॅड असणंही शक्य असावं.

मला म्हणायचं होतं ते गविंनी आणि अनुरावांनी बहुतांश म्हटलेलं आहे.

घासुगुर्जींच्या ह्या वाक्यानी मला धन्य झाल्याचे फीलींग आले, अगदी सिरीयसली.

ह्या धाग्यावर आणि हय विषयावर अधिक प्रतिसाद देणे मला शक्य नाही.
सदर विषयातील मला पुरेसे ज्ञान नाही.

खपली गहू म्हणजे ज्याला बकव्हीट म्हटले जाते तोच काय?

b

नाही बकव्हीटची चव वेगळी असते आणि त्यात ग्लूटेन नसतं. त्यामुळे ग्लूटेन-फ्री डाएटमध्ये ते वापरता येतं, पण त्याच्या पोळ्या करणं जमणार नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मनोबा, खपली गव्हाचा फोटो टाकता येईल काय?

पोळ्यांचे माहिती नाही पण धिरडी/डोसे मात्र करता येतात. कोरेगाव पार्कात फ्रेंच क्रेपरी नामक हाटेल अलीकडेच सुरू झालेय तिथे हा प्रकार मिळतो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं