श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, घरची राखण करणारा वगैरे वगैरे…’ तर असा हा कुत्रा माझाही खूप आवडता होता.

खरे तर माझ्या बाबांचा तो खूप प्रिय प्राणी! त्यांना आमच्या घरात ‘कुत्रा आमचा पाळीव प्राणी’ असे म्हणायला एक आणायचा पण होता. परंतु माझी आई ठाम होती की दोन पायांच्या मानव प्राण्याशिवाय घरात कोणालाही प्रवेश नाही. अपवाद पाल आणि झुरळ असावेत. कधीतरी चिमणी पण यायची. पण ते स्वमर्जीने येत व जात. आईला त्याचा त्रास नव्हता. कुत्रा पाळायचा म्हणजे त्याची काळजी घ्यायची जबाबदारी आली. म्हणून बाबांनी मी मोठी होता होता मला कुत्र्याविषयी प्रेम वाटेल याची पूर्ण काळजी घेतली व त्यांचा ‘श्वान-प्रेमी पक्ष’ मजबूत केला. पण ती माझी आई होती. मला आणि माझ्या कार्यक्षमतेला पूर्णत: ओळखणारी! माझ्या मदतीच्या भरवश्यावर ती काही तयार झाली नाही आणि ‘कुत्रा आमचा पाळीव प्राणी’ झाला नाही. असो!

लग्न झाल्यावर ते श्वान-प्रेम कमी झाले तरी आत कुठेतरी जिव्हाळा शाबूत होता. कुत्रा आवडत होता.

तुमच्या लक्षात आलय का की मी सतत ‘होता’ म्हणते आहे. हो! कारण माझी आवड आणि प्रेम आता भूतकाळात जमा झालय. का?

तारीख – १ एप्रिल २००३
वेळ – भर दुपारची
स्थळ – हमरस्ता

घटना – मी शाळेतून मुलांना घरी घेऊन येण्यासाठी बाहेर पडले. दुपारची वेळ म्हणून सोबतीला छत्रीला पण घेतले. सावली शोधत कडे कडेने चालत होते. इतक्यात एक पिसाटलेला कुत्रा धावत आला आणि माझा पाय तोंडात पकडला. घाबरून किंचाळले. छत्री उगारली. तेव्हा आला तसा निघूनही गेला. पाय मात्र ठणकायला लागला. सलवार फाटली. कशीबशी शाळेकडे पोहोचले. मुलांना घेऊन घरी आले. मुलेही लहान असल्यामुळे घाबरली होती आणि खरे तर जास्त प्रमाणत गोंधळली होती. त्यानी त्यांच्या बाबाना, आजीला, काकीला फोन केले. पण कोणाचा विश्वास बसत नव्हता. कारण तो दिवस महान होता ना! शेवटी माझी लेक रडकुंडीला आली तेव्हा त्यांचा विश्वास बसला. आजपर्यंत माहेरून आणि सासरहून अक्ख्या घराण्यात कोणालाही कुत्रा न चावल्यामुळे मला कुत्रा चावणे ही ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली होती. तोपर्यंत संध्याकाळ झाली. सासू, दीर, जाऊ, पुतण्या आणि माझा नवरा सगळेच जमले होते आणि हास्याचा गडगडाट होत होता. इतकावेळ केविलवाणी असलेली माझी दोन्ही मुलेही फितूर होऊन त्यांना सामील झाली. एक विरुद्ध सात असा सामना रंगला होता. गडगडाटी हास्याचा धबधबा ओसरल्यावर त्यांच्या लक्षात आले की मला इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जावे लागणर.
‘हिला इंजेक्शन द्यायची गरज आहे का? मला वाटते गरज त्या कुत्र्याला असणार. आपण त्याला शोधूया.’
‘तो नेमका तुलाच कसा चावला? आता त्याचे काही खरे नाही.’ असे विनोद करून झाले आणि मग आमची स्वारी निघाली डॉ.कडे. तिथे गेल्यावर त्यांच्यासकट सगळे छोट्या हास्य धबधब्यात न्हाऊन निघाले. आता मी सुद्धा त्यांच्यात सामील झाले. कारण दुखायचे कमी झाले होते आणि हास्याची लागण झाल्याशिवाय फार काळ तुम्ही नाही राहू शकत. इंजेक्शनचा संपूर्ण कोर्स होईपर्यंत माझे नाव त्या केमिस्टला नीट लक्षात राहिले आणि अजूनही आहे. तुम्हाला सांगते पहिले इंजेक्शन आणायला गेले तेव्हा तोही हसतोय असा मला भास(?) झाला होता.

अजूनही दरवर्षी घरचे विसरले तर मी आठवण करून देते आणि हसा पोटभरून असेही सांगते. इतर कोणाला सांगितले तर विश्वास नाही बसत. ‘एप्रिल फूल’ करतेय असे समजतात. पण त्यांना थोडे हसवावे म्हणून सांगते झालं.

हसा आणि हसवत राहा हा वसा आपुला!

तुमचा विश्वास बसलाय का?

– उल्का कडले

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

काही कळले नाही उल्काकाकू. तुम्हाला आम्हाला एप्रिलफूल करायचे आहे का? का खरंच तुम्हाला कुत्रा चावला होता?

आणि तुम्हाला कुत्रा चावुन सुद्धा तुमचा नवरा गडगडाटी हास्य का करत होता?
हे नक्की काय आहे? तुमचा सासरची माणसे कीती पाषाण हृदयी आहेत हे सांगायसाठी तुम्ही हा धागा काढलात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे! पाषाण हृदयी?

अहो, विनोदी पद्धतीने लिहायचा प्रयत्न केलाय तर तुम्ही एकदम घरच्यांवरच इतके गंभीर आरोप करताय. कठीण आहे.

देवाच्या कृपेने सासरचे सगळे प्रेमळ आहेत हो!

महत्वाचा मुद्दा लिहायचा राहून गेला की मला विशेष काही लागले/झाले नव्हते. थोडी अतिशयोक्ती केली आहे इतकेच.

तरीही असा अर्थ कोणी काढेल असे वाटले नव्हते. पुन्हा लिहिताना विचार करेन हे मात्र नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

मस्त आहे अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0