आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी याचा गैरवापर केला.

आपणा सर्वाना कल्पना आहेच की, केंद्र सरकार आधारकार्ड लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. गॅस सिलिंडर, वेगवेगळ्या सरकारी योजना यावर मिळणारे अनुदान, शिष्यवृत्ती या आणि अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला आता आधारकार्ड आपल्या बचत खात्याशी संलग्न करावे लागते. जो काही लाभ आहे, तो वापरकर्त्यांच्या हातात थेट पडावा आणि शक्यतो भ्रष्टाचाराला जास्तीत जास्त आळा बसावा, यासाठी केंद्र सरकार करत असलेले उपाय नक्कीच स्वागतार्ह व स्तुत्य आहेत आणि आता सरकारने आधारकार्ड ‘डिजिटल वॉलेट’ या नव्या पिढीतील संकल्पनेशीही संलग्न केले आहे.
प्रथम आपण ‘डिजिटल वॉलेट’ ही संकल्पना समजून घेऊ या. हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. काही ठरावीक कंपन्या तसेच बँकांमार्फत ही सेवा पुरवली जाते. ही सेवा सर्वसाधारणपणे विनाशुल्क पुरवली जात असून वापरायलाही सोपी आहे.आपले एटीएम अथवा डेबिट कार्ड आपल्या खात्याशी संलग्न असते, आणि त्याद्वारे काही आर्थिक व्यवहार करायचे असल्यास आपल्या खात्यात पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘डिजिटल वॉलेट’च्या वापरासाठी सुद्धा काही ठरावीक रक्कम आधी भरणे आवश्यक आहे.आपण खरेदीला बाहेर पडतो, तेव्हा खिशातील पाकिटातही काही रक्कम ठेवतो, तसाच हा प्रकार. आपल्या देशात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण खूप कमी असले, तरी तो अडथळा न ठरता या सेवेचा वापर अनेक जणांनी सुरू केला आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात.अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी या संपूर्ण व्यवस्थेतील पळवाटा व त्रुटी शोधल्या.

या संबंधीचे एक भीषण वास्तव नुकतेच एका अहवालाद्वारे उघड झाले आहे. खासगी क्षेत्रातील एका बँकेने आपल्या ग्राहकांना रक्कम दुसरीकडे पाठवणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वत:ची ‘डिजिटल वॉलेट’ प्रणाली आणली.कोलकातामध्ये राहणा-या अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्यांने या प्रणालीतील एक त्रुटी शोधून काढली व झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने आणखी चार विद्यार्थ्यांची मदत घेऊन एक टोळी तयार केली आणि केवळ चार महिन्यांत आठ कोटी साठ लाख रुपये इतक्या प्रचंड रकमेचे अपहरण केले! ही त्रुटी अशी होती की, समजा मला एखाद्याला या प्रणालीमार्फत पैसे पाठवायचे असतील आणि त्याचे इंटरनेट चालू नसेल, तर माझ्या खात्यातून पैसे वळते होत नाहीत, मात्र तरीही बँक ते पैसे समोरच्याच्या खात्यात जमा करते!

अभियांत्रिकीच्या या टोळीची कार्यपद्धती काहीशी अशी होती – बँकेत खाती उघडण्यासाठी त्यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही गावांमधून आधीच डिजिटल वॉलेट कार्यान्वित केलेली मोबाईल सीम कार्ड विकत घेतली.मग गावांमधील भोळ्याभाबडया लोकांना त्यांच्या आधारकार्डशी संलग्न अशी बँक खाती उघडण्यास सांगितले व त्यासाठी त्यांना बक्षिसी म्हणून काही रक्कम देऊ केली. बँक खाती उघडल्यानंतर या सीम कार्डाचा क्रमांक या खात्यांबरोबर जोडला. अशा त-हेने या टोळीने सर्व पूर्वतयारी पूर्ण केली.

आता बँकेत खाते उघडण्याबद्दल बोलायचे, तर आपणा सर्वाना ठाऊक आहे की, ‘आपला ग्राहक जाणून घ्या’ (KYC – Know Your Customer ) या नियमानुसार विशिष्ट कागदपत्रे, फोटो इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. हीच गोष्ट सीमकार्डसाठी सुद्धा लागू आहेत. परंतु दोन्ही बाबतीत हे नियम पाळले गेले नाहीत.मात्र बँकांसाठी काही अपवाद आहेत आणि आधार क्रमांक हे या अपवादाचे व त्रुटीचे कारण आहे. जर एखाद्या व्यक्तीला ‘प्रधानमंत्री जन धन योजने’अंतर्गत बँक खाते उघडायचे असेल तर आधारकार्डाची प्रत आणि अर्जाला चिकटवलेल्या आपल्या फोटोवर बँक अधिका-यासमोर केलेली स्वाक्षरी एवढया गोष्टी पुरेशा आहेत. हे खाते उघडले गेले की एटीएम कार्डासारखेच ‘रूपे कार्ड’ दिले जाते, तसे ते गावक-यांना दिले गेले.

हे पार पडल्यावर या टोळीने पुढील कार्यवाही चालू केली. वर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थेतील त्रुटीचा फायदा घेऊन त्यांनी मोठमोठया रकमांचा भरणा या खात्यांमध्ये केला व लगेच ‘आपण बँकेतील अधिकारी आहोत आणि अधिक चांगली सेवा देण्यासाठी आपले आधारकार्ड आपल्या मोबाईलशी जोडणे आवश्यक आहे,’ अशी बतावणी करून या टोळीने खातेधारकांकडून रूपे कार्ड क्रमांक, त्याच्या मागे असलेला C V V क्रमांक, इत्यादी माहिती काढून घेतली.त्याद्वारे खातेधारकांच्या मोबाईलवर एका वेळचा पासवर्ड (OTP – One Time Password) पासवर्ड साधारणत: ५ ते १० मिनिटांपर्यंत चालू शकतो. तेवढया वेळात या लफंग्यांनी ऑनलाईन खरेदीसाठी वेगवेगळी संकेतस्थळे उघडली व भरपूर खरेदी केली. त्यासाठीचे पैसे अर्थातच या खात्यांमधून वळते झाले. तुम्ही म्हणाल की त्याबद्दलचा SMS या गावक-यांकडे आला असेल. हो, पण ज्यांना केवळ फोन करणे व फोन घेणे इतकेच कळते, त्यांच्याकडून SMS कसा वाचला जाणार, किंवा तो त्यांना कसा कळणार?

या सर्व प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य लोक मोठया प्रमाणात बँकिंग क्षेत्राकडे वळत आहेत. परंतु त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था ना सरकारकडे आहे, ना बँकांकडे! दुर्दैवाने आर्थिक साक्षरतेचा अभाव केवळ गरीब, अडाणी, अशिक्षित लोकांमध्येच आहे असे नाही, तर चांगले शिकले-सवरलेले लोकही भूलथापांना फसून खड्डयात पडत आहेत.भारत येत्या २०-२५ वर्षात आर्थिक महासत्ता बनणार आहे, असे आपण नुसतेच ऐकतो किंवा म्हणतो, परंतु त्यासाठी या क्षेत्रातही साक्षर होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची दाखल योग्य पातळीवर घेतली गेली असून कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी आवश्यक ते प्रयत्न चालू झाले आहेत. परंतु आपणही आपली जबाबदारी विसरता कामा नये.

- अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत पुर्वप्रसिध्दी - प्रतिबिंब, दै. प्रहार, मुंबई

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet