देखो मगर प्यार से!

संपादकीय.

संपादकीय - देखो मगर प्यार से

- मेघना भुस्कुटे

'पॉर्न' विशेषांक ही कल्पना प्रथमदर्शनी आम्हांला एखाद्या अप्राप्य प्रियकराप्रमाणे आकर्षक वाटली खरी. पण पुढे तिच्याशी विवाह ठरला आणि तिचं नवरेपण चहूअंगी खुपायला लागलं, हे नमनालाच कबूल केलं पाहिजे!

या संकल्पनेत अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी दिलचस्प शक्यता दडलेल्या होत्या. पण तिचा आवाकाही विलक्षण होता. संस्कृतीचा प्रारंभच करणारी कामक्रीडा आणि तिचा काही हजार वर्षांचा इतिहास - त्याबद्दलच्या समजुती, शास्त्र, साहित्य, विद्रोही साहित्य यांच्याही अनेक पिढ्या… आणि मग जागतिकीकरणोत्तर काळात भोगवादानं तिला दिलेलं भयावह परिमाण.

कितीही केलं, तरीही या सगळ्यातून काही ना काही निसटून जाण्याची खातरी होतीच. वर अंकाचा जाडजूड कोशोबा करून, त्यातली सगळी गंमत पिळून काढून, त्याला एक कोरडाठाक संदर्भग्रंथ करून वरच्या फळीवर त्याची रवानगी करण्याची भीतीही. शिवाय पॉर्नसोबत इतर अनेक संकल्पना दत्त म्हणून समोर उभ्या राहत होत्या. भारतीय कायदा पॉर्न या शब्दाची व्याख्याही करत नाही, तो अश्लीलतेसंदर्भात बोलतो, हा साक्षात्कार काम करतानाच झाला. त्यामुळे ही संकल्पना टाळणं शक्यच नव्हतं. पाठोपाठ लैंगिकता आणि कामुकता आल्याच. कोणत्याही प्रकारच्या कोशवाङ्मयात - विशेष करून urban dictionary हाही जेव्हा एक महत्त्वाचा कोश ठरतो अशा संक्रमणाच्या दिवसांतल्या कोशवाङ्मयात - पॉर्नची सर्वसमावेशक अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. तिची काही ना काही अंगं तरी त्या-त्या व्याख्येतून निसटून गेलेली असत.

अशा वेळी आपली स्वत:ची अशी विषयचौकट आखून घेणं अत्यावश्यक झालं.

पॉर्न आणि कामव्यवहार या दोन गोष्टींमध्ये अन्योन्यसंबंध आहे हे नाकारता येण्याजोगं नव्हतं. पण 'पॉर्न' हे काहीसं ओंगळ विशेषण विषयासारख्या सुंदर आणि जीवनानं रसरसून भरलेल्या गोष्टीसोबत जोडलं जाणं खुपतही होतं. अशा आट्यापाट्या खेळताना हा त्रिकोण हाती आला -

०. कोणत्याही प्रकारे लालसा उत्पन्न करणारं, तिला खतपाणी घालणारं, त्यासाठी भोगवस्तूचे गुणधर्म प्रसंगी अवास्तव करून मांडणारं आणि वेळी त्यासाठी जिवंत व्यक्तीचं वस्तूकरण करायला मागेपुढे न बघणारं - पण प्रत्यक्ष भोगाची संधी न देणारं - ते ते पॉर्न. या अर्थानं चराचराचं पॉर्नीकरण होताना लख्ख दिसतंच आहे. खाद्यपदार्थापासून शरीरापर्यंत. माध्यमांपासून मनोरंजनापर्यंत - सगळ्याच गोष्टी कमी-अधिक गतीनं ओरबाडखोर संभोगाच्या दिशेनं वाट चालू लागतात, तो हा प्रकार.

०. दुसरा अर्थ कलाकृतीच्या संदर्भातला. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकर कुठेसं म्हणाले आहेत. त्या अर्थानं - कलाकृतीच्या गाभ्याला अनावश्यक असूनही जे जे निव्वळ 'आणखी-आणखी' अशी हाव वाढवणारं, बांडगुळासारखं जोडलेलं आहे - ते ते पॉर्न. मग ते वरकरणी सुंदर आहे की असुंदर आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. कलाकृतीच्या बांधेसूदपणाला ते किती मारक आहे, ते तेवढं महत्त्वाचं. टीव्हीवरच्या मालिकांमधले अनेक प्रसंग, कालबाह्य असूनही नव्वदोत्तर म०म०वर्गात अचानक बोकाळलेली गदिमा-बाबुजी-भावगीतं, अजय-अतुलचं हॉलिवुडी रेकॉर्डिंग आणि त्याला मिळालेली अनाठायी प्रसिद्धी… सगळंच.

०. तिसरा अर्थ शृंगाराच्या संदर्भातला. जे जे शृंगाराशी संबंधित आहे, पण नागडं-उघडं आहे, अनावश्यकरीत्या असुंदर-असंस्कृत-निर्लज्ज आहे - ते ते पॉर्न. म०चा०क०, बरीचशी स्लॅश-स्मट फॅनफिक्शन, पोर्नोग्राफिक चित्रफितींचा आंतरजालावरचा पूर इत्यादी.

हा त्रिकोणही व्यक्तिसापेक्षच, पण त्यानं आम्हांला एक निश्चित रिंगण आखून दिलं.

या रिंगणाच्या सीमारेषेवर वसणारा आणि पल्याड पसरलेला भलामोठा प्रदेश होता. बरंचसं शृंगारविषयक अभिजात साहित्य त्यात मोडतं. वात्स्यायन, गाथासप्तशति, गीतगोविंद, खजुराहोची कामशिल्पं, चौरपञ्चाशिका, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, मराठमोळी रांगडी शृंगारिक लावणी… या सगळ्यात खणखणीत चोख शृंगार होता. त्याला क्वचित आध्यात्मिक अर्थाची डूब होती. बदलत्या अस्मितांच्या दिवसांत या साहित्यानं अनेक वादही ओढवून घेतले होते. त्याबद्दल बोलणं अत्यावश्यक होतं. त्रिकोणाच्या आतल्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या होत्या, तितक्याच - पॉर्नचं लांछन घेऊनही - संस्कृतीचा खुला वारसा जपणार्‍या या गोष्टीही महत्त्वाच्या होत्या. त्यामुळेच अंकात - तळ्यातल्या आणि मळ्यातल्या - दोन्ही प्रकारच्या साहित्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

एकीकडे हा असा खुला वारसा असताना, मधल्या काळात पॉर्न ही संदिग्ध संज्ञा शिवीसदृश होऊन बसली. शृंगाराबद्दल असलेल्या टॅबूचा सोयीस्कर वापर करून ही शिवी अनेक गोष्टींना देण्यात आली, आजही येते. त्याआडून अनेक घटकांचं शोषण करण्यात येतं. त्याच वेळी आधुनिकतेतून येणारी स्वातंत्र्यं वापरून अंतहीन भुकेचं समर्थनही करण्यात येतं. राजकारण, समाजकारण, कलाव्यवहार… ही सगळी अंगं अखेर बाजारात विसर्जित करण्यात येतात -

आणि आपण सगळा अभिजात शृंगाररस बेडरूमच्या अंधारात दडपून, बाहेर 'मैं तो आरती उतारू रे…'छाप पॉर्न लावतो आणि कान मिटून घेतो…

या विश्लेषणातल्या हरेक मुद्द्याला स्पर्श करेल असं साहित्य अंकात समाविष्ट करता आलंच असेल असं नाही, याची प्रामाणिक कबुली देतो आहोत. केवळ तेवढ्यासाठी, या विषयाला वाहिलेल्या उत्तरार्धाची शक्यता खुली ठेवून, हा पूर्वार्ध सादर करतो आहोत. आमचं आणि आमच्या 'विषय'वस्तूचं वैवाहिक जीवन पुरेसं व्यामिश्र आणि वाह्यात झालं असेल अशी आशा करत त्यात तुम्हांलाही आमंत्रण देत आहोत. वाचा, मजा लुटा, विचारात पडा आणि मनमुराद प्रतिसादा. पॉर्न-ओके-प्लीज!

- मेघना भुस्कुटे आणि इतर

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

आणि आपण सगळा अभिजात शृंगाररस बेडरूमच्या अंधारात दडपून, बाहेर 'मैं तो आरती उतारू रे…'छाप पॉर्न लावतो आणि कान मिटून घेतो…

फक्त टाळ्या!
_______
त्रिकोणामुळे पॉर्नची व्याख्या/संकल्पना ठाशीव झाली. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाक्यावाक्याला टाळ्या. वर शुचिने उदधृत केलेले वाक्य तर जबरदस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खणखणीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅार्नची आपली व्याख्या या विशेषांकानिमित्ताने बनवायची का?
१) प्राण्यांनी केलेली लैंगिक दृष्ये बघणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला ,पॉर्नचा विषय चालू आहे आणि आमच्या एकपॉर्नव्रता सनीबाई लहाने यांचा उल्लेखही नाही ,काय म्हणावं याला.णिषेध णिशेध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

संपादकीय हा प्रकार पुन्हा पुन्हा वाचावा असा एरवी नसतो, पण हा लेख त्याला अपवाद आहे. पॉर्नची व्याख्या करणं तसंही कठीणच, पण तो शब्द केवळ लैंगिक चित्रणासाठीच वापरला जातो हे बंधन ओलांडून त्याला नवीन आयाम प्राप्त करून देणं साधलेलं आहे. कुठच्याही 'निव्वळ क्षुधाशांतीसाठी आणि उद्दीपनासाठी तयार केलेली अतिरेकी बटबटीत कलाकृती म्हणजे पॉर्नच' हे अधोरेखित झालं आहे, आणि ते महत्त्वाचं आहे. सास-बहु छाप मालिका हे स्त्रियांच्या कौटुंबिक भावनांचा रस पिळून पिळून काढण्यासाठी उभारलेले चरकही पॉर्नच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकीय छानच झालंय आणि पुन्हापुन्हा वाचण्यासारखेही. मेघना आणि टीमचे अभिनंदन. आतापर्यंत वाचलेल्या लेखांच्या दर्जावरून पुढच्या लेखनाबद्दल उत्सुकता चाळवली गेली आहे.

०. दुसरा अर्थ कलाकृतीच्या संदर्भातला. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकर कुठेसं म्हणाले आहेत. त्या अर्थानं - कलाकृतीच्या गाभ्याला अनावश्यक असूनही जे जे निव्वळ 'आणखी-आणखी' अशी हाव वाढवणारं, बांडगुळासारखं जोडलेलं आहे - ते ते पॉर्न. मग ते वरकरणी सुंदर आहे की असुंदर आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. कलाकृतीच्या बांधेसूदपणाला ते किती मारक आहे, ते तेवढं महत्त्वाचं. टीव्हीवरच्या मालिकांमधले अनेक प्रसंग, कालबाह्य असूनही नव्वदोत्तर म०म०वर्गात अचानक बोकाळलेली गदिमा-बाबुजी-भावगीतं, अजय-अतुलचं हॉलिवुडी रेकॉर्डिंग आणि त्याला मिळालेली अनाठायी प्रसिद्धी… सगळंच.

पुन्हा वाचताना, या वाक्यावर नजर खिळली, आत्मावलोकन करावं असं वाक्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तंच लिहिलय. कोशोबा शब्द आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तिचं नवरेपण चहूअंगी खुपायला लागलं,

ह्या वाक्यातल्या अशक्य खवचटपणाबद्दल मेघनाला १३ चुम्मे.

---

अंकाची मटाने घेतलेली दखल -
‘ऐसी अक्षरे’चा पॉर्न ओके प्लीज विशेषांक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुपर्ब. तालियां!!

०. कोणत्याही प्रकारे लालसा उत्पन्न करणारं, तिला खतपाणी घालणारं, त्यासाठी भोगवस्तूचे गुणधर्म प्रसंगी अवास्तव करून मांडणारं आणि वेळी त्यासाठी जिवंत व्यक्तीचं वस्तूकरण करायला मागेपुढे न बघणारं - पण प्रत्यक्ष भोगाची संधी न देणारं - ते ते पॉर्न. या अर्थानं चराचराचं पॉर्नीकरण होताना लख्ख दिसतंच आहे. खाद्यपदार्थापासून शरीरापर्यंत. माध्यमांपासून मनोरंजनापर्यंत - सगळ्याच गोष्टी कमी-अधिक गतीनं ओरबाडखोर संभोगाच्या दिशेनं वाट चालू लागतात, तो हा प्रकार.

०. दुसरा अर्थ कलाकृतीच्या संदर्भातला. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकर कुठेसं म्हणाले आहेत. त्या अर्थानं - कलाकृतीच्या गाभ्याला अनावश्यक असूनही जे जे निव्वळ 'आणखी-आणखी' अशी हाव वाढवणारं, बांडगुळासारखं जोडलेलं आहे - ते ते पॉर्न. मग ते वरकरणी सुंदर आहे की असुंदर आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. कलाकृतीच्या बांधेसूदपणाला ते किती मारक आहे, ते तेवढं महत्त्वाचं. टीव्हीवरच्या मालिकांमधले अनेक प्रसंग, कालबाह्य असूनही नव्वदोत्तर म०म०वर्गात अचानक बोकाळलेली गदिमा-बाबुजी-भावगीतं, अजय-अतुलचं हॉलिवुडी रेकॉर्डिंग आणि त्याला मिळालेली अनाठायी प्रसिद्धी… सगळंच.

पॉर्नच्या व्याख्यांचे रिंगण इतकं व्यापक आहे, तरी इथे अगदी नेमकं मांडलं आहे. मेघना, तुझ्या लेखनक्षमतेला सलाम!

भारतीय कायदा पॉर्न या शब्दाची व्याख्याही करत नाही, तो अश्लीलतेसंदर्भात बोलतो, हा साक्षात्कार काम करतानाच झाला.

पन इंटेंडेड? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय असा असरटपसरट असूनही संपादकीय काय खडखडीत नेमकं आणि तीक्ष्ण आहे. वाचतेच आता पुढे. पण त्या आधी मेघनाचं कौतुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान लिहिलंय।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

एक नंबर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीरो वाल्यू अडिशेन टु द टॉपिक. मटावर पोर्न ओके प्लीज ची बातमी वाचुन उन्चावलेलया अपेक्षाञ्चा बोर्या वाजला. एक दोन लेख सोडले तर अत्यंत रसहीन विशेशांक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

छान लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसलं सुंदर आणि मुद्देसुद संपादकीय आहे. पुन्हा पुन्हा वाचावं असं. अंक वाह्यात असो Wink की कोशोबा वाचनीयच असणार याची खणखणीत हमी देणारं. निव्वळ संपादकीय म्हणूनच नाही तर पॉर्न या संकल्पनेच्या मिती स्पष्ट करणारा लेख म्हणूनही उत्तम. मेघना _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलखुलास दाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

हे संपादकीय लिहिण्याची प्रक्रिया एकटाकी नव्हती, खरंतर एकमेंदूही नव्हतीच. अंकाची कल्पना सुचल्यापासून ते या संपादकीयाचे अनेक खर्डे होईस्तोवर दीर्घकाळ ती चालूच होती. त्याला अनेकांचा हातभार लागला. संकल्पनेबद्दल शंका प्रकट करणार्‍यांपासून ते अर्धकच्च्या खरड्याबद्दल असमाधान व्यक्त करणार्‍यांपर्यंत अनेकांचा, आणि 'तुझ्या मुखातून देवच की रे बोलला' असं वाटायला लावणारी मुक्ताफळं कळत-नकळत उधळणार्‍यांपासून ते यांतल्या नेमकेपणाला दाद देणार्‍यांपर्यंत अनेकांचा - त्यात सहभाग आहे.

त्या सगळ्यांच्या वतीनं आभार. अशा प्रकारचं विचाराला प्रवृत्त करणारं, भाषेत शास्त्रकाटा आणायला भाग पाडणार लेखन करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन