रॅंडम रात्रीची गोष्ट

रॅंडम रात्रीचा प्रवास काळोखासोबत सुरु होतो. काळोख उतरत जातो आजूबाजूला. शांतपणे. जसं जमिनीत पाणी मुरतं तसं. काळोखासोबत प्रवास करते ती रात्र. रॅॅंडम प्रवास. वाट फुटेल तिथे जायचं. रात्रीला बंधन नाही. तिला कुणी सांगत नाही तू नको येउस इकडे. काळोख जसजसा जमिनीवर उतरत जातो तसतशी रात्र अजून काळवंडत जाते. आपणसुद्धा रात्रीसोबत बाहेर पडायचं. तिच्यासोबत चालायचं. तिच्यावर बंधनं नाहीत पण आपल्यावर आहेत. निर्बंध नसणारी रात्र म्हणूनच हवीहवीशी वाटते. रात्रीला कुठेही जाता येतं. दरी-डोंगरांत उतरता येतं. निर्मनुष्य पठारांवरून चालता येतं. रॅॅंडमपणे कुठेही कसंही. आपल्याला वाटतं रात्रीला डोळे नसतात, पण तसं नसतं. डोळे सताड उघडे ठेऊन रात्र फिरते. तिच्या उघड्या डोळ्यांना जे दिसतं ते ती पाहते. पाहते आणि पचवते. त्याचा बोभाटा करत नाही. रात्र आवडण्यामागे हे एक कारण असतं.

रॅॅंडमपणे कुठेही जाते रात्र. मावळच्या खोऱ्यात. अलगद उतरते. काळोखाचा फायदा घेऊन जमिनीशी लगट करायला आलेल्या ढगांना हलकेच चिरत जाते; त्यांच्या लगटपणाकडे बिल्कुलही न पाहता. तितक्याच सहजतेने ती फिरते इंद्रायणीच्या घाटावरून. एकाच लयीत नादणाऱ्या मृदंगाना ऐकत. त्या रात्रीच्या जगात सारखेच असतात सगळे…घाटावर झोपलेले, फुटपाथवर झोपलेले, फलाटावर झोपलेले, सायडिंगला लागलेल्या गाडीच्या डब्ब्यात झोपलेले किंवा भल्या महालात झोप लागत नाही म्हणून अस्वस्थ कुढणारे. रात्रीचं चांदणं उतरत जातं मशिदीच्या घुमटावर, मंदिराच्या कळसावर. तेव्हा रात्रीला कुणी तिचा धर्म नाही विचारत. मंदिराच्या पायथ्याशी ती घुटमळत नाही कारण तिला कुणी म्हणत नाही… हे बहुजनांचं मंदिर आणि हे बामणांचं. सहजतेने ती पाहते, देवापुढे घातलेल्या गोंधळात अंगात आल्यावर मुक्तपणे नाचणार्यांकडे आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेल्या एखाद्या "ट्रान्स"मध्ये हेडबॅंगिंग करणार्यांकडे. गांजाच्या धुराकडे आणि कुठल्याश्या खोपट्यातल्या चुलीत अर्धवट जळणाऱ्या लाकडातून येणाऱ्या धुराकडे. रात्र साक्ष असते. फडात रंगलेल्या तमाशाला, दारू पिउन घातलेल्या गोंधळाला, तुकडे तुकडे करून फेकून दिलेल्या मृतदेहाला.… पण रात्र कधीच ह्या साऱ्याची साक्ष देत नाही. रात्र अशी रॅॅंडम असते. काहिही पाहणारी आणि पचवणारी.

याच रात्रीसोबत फिरताना, एका धोक्याच्या क्षणी आपला डोळा लागतो आणि रात्र संपते. रात्रीसोबत संपतो तो रॅॅंडमनेस. दिवस साचेबद्ध असतो. कारण तो बांधून घेतो स्वतःला तासांमध्ये, मिनिटांमध्ये. दिवस उजाडतो आणि जे फक्त रात्रीला दिसत असतं ते सगळ्यांना दिसायला लागतं. आपणसुद्धा बांधून घेतो स्वतःला दिवसांमध्ये, वर्षांमध्ये. ठरवतो सगळं. बाविसाव्या वर्षी डिग्री, चोविसाव्या वर्षी दुसरी डिग्री, सव्वीसाव्या वर्षापर्यंत नोकरी, अठ्ठाविसाव्या वर्षी लग्न , तिसाव्या वर्षी पोरं.…. बांधून घेतो स्वतःला.…. रात्रीचा रॅॅंडमनेस जेव्हा हवाहवासा वाटतो तेव्हा चारचाकी काढून जातो लोणावळ्याला. काही तास.… छान वाटतं. अगदी तसंच जसं "capitalism"चे सगळे फायदे घेतलेल्याला "Communism" छान वाटतो.

मला व्हायचं असतं रात्रीसारखं एकदम रॅॅंडम. पण माझ्या आजूबाजूचे मला थोपटतात. छान छान गोष्टी सांगून. नकळत माझा डोळा लागतो. मी उठलयावर पाहतो तर दिवस उजाडलेला असतो. उठलयावर ते मला सांगतात…. रात्र संपली. त्याच रात्रीसोबत, रात्रीसाठी लिहिलेली ही रॅॅंडम गोष्टसुद्धा संपली.

-अभिषेक राऊत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)