गोळाबेरीज? छे:, बाकी शून्य!!

"A picture is worth a thousand words!" हे जर चित्राबद्दल असेल, तर दृकश्राव्य माध्यम तर त्याहून प्रभावी म्हणायला हवं. अर्थात ही झाली अपेक्षा, प्रत्यक्षात तसं होतंच असं नाही हा प्रत्यय बर्‍याचदा येतो. मला ही आला. 'दा विंची कोड', 'शाळा' ही अलीकडली उदाहरणं. त्यात आता पुलंच्या सार्‍या व्यक्तिचित्रांची भर पडलीय. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.

सारांश सांगायचा तर, सिनेमात एकंदरीत सगळ्याच गोष्टींची वाट लावली आहे. बालगंधर्व मध्ये नारायणरावांच्या चरित्राचा स्लाईडशो होता असं म्हटलं तर गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळे व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकार होत नाही. चितळे मास्तर, हरितात्या, भय्या नागपूरकर, अंतू बर्वा, नाथा कामत एक ना दोन!! प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिरेखेची चार वाक्यं म्हणतात आणि निघून जातात. उदाहरणार्थ भय्या नागपूरकर आणि कुठल्याशा परांजपे साहेबाला एकेरी संबोधून 'डोन्ट वरी' म्हणणारा बापू अनुक्रमे चाळीस व तीस सेकंदात आणि पाच व चार वाक्यांत आटोपले. यांना न घेताही मग काम चालू शकलं असतंच की. सगळंच दाखवायला हवं हा अट्टहास का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. त्यातल्या त्यात नंदा, गटणे, चितळेमास्तर या लोकांना पुन्हा संधी देऊन त्यांना अगदीच उडवलं नाही हे दाखवतात. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं म्हणता येत नाही.

पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यं माराठी मनावर कोरली गेली आहेत. आमच्या नंदनलाच विचारा, एका क्षणात सटासट दहा वाक्यं फेकेल. तर या अशा वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय. वानगीदाखल सांगायचं तर "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?" हे वाक्य प्रश्नार्थक न येता तारस्वरात विधानार्थी येतं, तसंच "इथं पण ऑटोमॅटिक होतं की कुंथायला लागतं?" या टंग इन चीक वाक्याची तर अगदी फेफे उडवलीय. पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात. सिनेमातले पुलं स्वगत बोलताना चेहर्‍यावर सास बहू सिरियलमधल्या बायकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त हावभाव दाखवतात. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटात नर्मविनोद आणि सटल्टी या दोन गोष्टी जाम हरवून गेल्या आहेत.

दिग्दर्शन कसं असावं याबद्दल जास्त काही बोलता येत नसलं तरी 'किमानपक्षी' कसं असावं याच्या काही माफक अपेक्षा असतात. आनंदवनातलं कथाकथन संपल्यावर बाबा आमटे पुलंना भेटायला येतात. प्रथम दिसतो तो त्यांचा कटिप्रदेश(!) आणि मग कॅमेरा वर जाऊन चेहर्‍यावरती स्थिरावण्याऐवजी तो पाठी जाऊन होऊन आमटे उर्ध्व-अधर दिशेने वाढतात. गदिमांची आई किंवा बायको, "अधून मधून दिसत जा" म्हणते आणि निर्विकार चेहर्‍याने फ्रेममधून निघून जाते. संवाद म्हणताना जर तिचा चेहरा दाखवला नाही, तर नंतर आणि तोही असा दाखवायची गरज काय? तसेच चित्रपटभर नको तिथे संगीत आणि भरीस भर म्हणून क्लोज-अप्सचा भडिमार आहे. नवीन कॅमेरा घेतला की आपण जसे दिसेल ते चेहरे टिपायला लागतो तसे इथे पडदाभर नुसतेच चेहरेच चेहरे दिसतात. पुलं वृद्ध होतात पण त्यांचा मित्र बबडू अगदी तरणाबांड आहे, नंदा प्रधानची आई ही सुद्धा पुलंच्याच वयाची दिसते. नंदा शेवटपर्यंत पहिल्या दृश्यात दिसला तसाच दिसतो, वार्धक्याचा कुठे इतकासा म्हणून लवलेश नाही. त्याची आई कुठल्याही अँगलमधून श्रीमंत-सुखवस्तू बाई वाटत नाही. एक ना दोन!!! इतर गोष्टींबद्दल सांगायचं तर आपला सिनेमा विंटरनॅशनल फिल्म फेष्टिवलमध्ये दाखवला जाणार असल्याची खात्री असल्याने सगळ्या पाट्या विंग्रजीत आहेत. पुलंच्या कथाकथन आणि इतर गोष्टी सांगताना त्यांचे दोन-चारच फोटो पुन्हा पुन्हा दाखवलेयत.सिनेमात अधून मधून रंगमंचावर मनोज जोशी पुलंच्या रूपात कथावाचन करताना दिसतात. मूळ पुलंचा फोटो आहे, आणि वर निखिल रत्नपारखी पुलं जगत असतोच. इतके तीन तीन पुलं का हाही एक प्रश्न आहे. आदरांजली म्हणून मूळ पुलं नी असण्याशी मला हरकत नाही. मग निखिल रत्नपारखी आणि मनोज जोशी दोघे कशाला हवेत? एकानेच काम काम भागलं नसतं का? असो. सिनेमात पुलंची आई अगदी सर्वसामान्याला अगम्य (म्हणे शुद्ध गोवन) असलं कोंकणी बोलते. तीच गोष्ट सुनिताबाई आणि पुलंच्या लग्नाची. तिथे पण तीन फोटो(तीन सेकंदां)त त्यांचे प्रेमप्रकरण आणि लग्न आटोपून नंतर लक्षात न राहिलसं पाच मिनिटांचं गाणं खर्ची घातलंय. (बहुधा 'आहे मनोहर तरी' मध्ये वाचल्याप्रमाणे दोघांची भेट कॉलेजात शिकवताना न होता संघाच्या हापिसात झाली होती, आणि बर्‍याच ठिकाणी वाचल्याप्रमाणे लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.)

बाकी, काय बरं आहे हे सांगायचं तर शेवटाकडे चितळे मास्तर सॉल्लीड जमून आले आहेत, रावसाहेब मस्त रंगलेयत आणि 'इंद्रायणी काठी' हे गाणं छान जमून आलंय, आणि त्यातल्या त्यात सुनिताबाईच काय त्या आपला आब आणि भूमिकेचा बाज सांभाळून आहेत. थोडक्यात सिनेमाला माझ्याकडून दहापैकी अर्धा गुण. पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

हे वाचून चित्रपट पाहण्याची चूक नक्कीच करणार नाही. पण चित्रपटाचं नाव समजायला फार वेळ लागला.लेखाच्या सुरुवातीला नाव स्पश्ट केलं असतं तर बरं झालं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर पाहिला तेव्हाच थोडी निराशा झाली होती. पुलंनी रे़खाटलेली व्यक्तीचित्रे ही आपल्या मराठी मनावर इतकी कोरली गेली आहेत की ती जर तश्शीच्या तश्शी दिसली बोलली नाहीत तर निराशा होणे सहाजीक आहे. शिवाय, ट्रेलरमधे एवढी व्यक्तीचित्रे दाखवलेली बघूनच प्रत्येक पात्र १-२ मिनीटासाठी पदद्यावर येवून पाठ केलेलं वाक्य म्हणत असेल असे वाटले होते, त्याची आता खात्री पटली. चित्रपट बघण्याची जी थोडीफार इच्छा होती ती आता राहिली नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.

बरं झालं, आज सुनीताबाई नाहीत!

वाट लावलेल्या चित्रपटाची मापं व्यवस्थित काढली आहेस. फक्त चित्रपटाचा दिग्दर्शक कोण ते ही सांग, म्हणजे नावावरच फुली मारता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि हे परीक्षण वाचल्यानंतर पाहेन असं वाटतही नाही. अदिती म्हणते त्याप्रमाणे मापं व्यवस्थित काढलेली आहेत.

इतक्या बहुरंगी आणि लोकप्रिय व्यक्तीवर चरित्रात्मक कलाकृती करायची म्हणजे महाकठीण काम. त्यांच्या व्यक्तिमत्वातली आणि आयुष्यातली 'ही सगळी बुलेट पाइंटं आली पाहिजेत' अशी जबाबदारी टाळणं कठीण जातं. मग मोजके मोत्याचे मणी घेऊन एका कथेच्या सूत्रात ओवून दागिना करायचा, की सगळीच जंत्री घेऊन एक कोलाजरूपी गोधडी करायची यात दुसऱ्या बाजूला झुकणं स्वाभाविक ठरतं. तसंच या सिनेमाचं झालं असावं असा अंदाज येतो.

त्यामानाने हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि ध्यासपर्व या दोन्हीमध्ये चित्रपटांचा फोकस नेटका राहिला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अदिती, दिग्दर्शक झारापकर आहेत. ऐकीव माहितीप्रमाणं रावसाहेबांची भूमिका त्यांनीच साकारलीय, आणि ती झकास वठलीय. मला त्यांचे इतर सिनेमे माहित नाहीत, कदाचित जंतू काही याव्र प्रकाश टाकू शकतील.
@गुर्जी,
मोठ्या आणि एकोळी, दोन्ही परिच्छेदांशी अगदी सहमत आहे. परवा शाळावर उतारा म्हणून, पाहून बरेच दिवस(२ वर्षं) झालीत म्हणून 'ग म भ न' पुन्हा पाहिलं. आणि पुन्हा एकदा आवडलं. त्यात फक्त शाळाच आहे. आणीबाणी, सुकडी-महेश, मांजरेकरसर, बिबीकर इ. संदर्भ वगळ्लेयत. अगदी हेडमास्तरांनाही दाखवलं नाहीय, तरीही ही एकांकिका सिनेमापेक्षाही जास्त प्रभावी वाटली. पुस्तक वाचलेलं असेल असा पूर्वग्रह घेऊन केल्यासारखी तर नक्कीच नाही वाटली.(मी शाळा त्यानंतर दीडेक वर्षानंतर वाचली) सगळंच दाखवावं हा अट्टहास खरंच चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचका करतो असं माझं मत होत चाललं आहे खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यं माराठी मनावर कोरली गेली आहेत. आमच्या नंदनलाच विचारा, एका क्षणात सटासट दहा वाक्यं फेकेल. तर या अशा वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय.

पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात.

थोडक्यात, सर्व काही जनरीतीस साजेसेच चाललेले आहे, म्हणायचे.

पु.लं.ची प्रचंड लोकप्रियता हेच मला वाटते त्यांचे सर्वात मोठे अपयश ठरावे. म्हणजे, स्वतःस पु.ल.प्रेमी समजणारा जो तो उठतो आणि संदर्भ असो वा नसो, पु.लं.ची वाक्ये नको नको तेथे उद्धृत करताना त्यांची वाटेल तशी मोडतोड करण्याचा पु.ल.प्रेमाखातर आपल्याला जणू परवानाच मिळाला आहे, असे त्यास वाटू लागते. परिणामी, अशी उद्धृते ऐकल्यावर, पु.लं.च्याच भाषेत सांगायचे तर, 'कोटाच्या बाहीतून झुरळ गेल्यासारखे'* वाटू लागते. हा अनुभव सार्वत्रिक आहे.

* 'प्रेझेंट पार्टीज़ एक्सेप्टेड'चा न्याय सर्वत्र लागू आहे.

असो.

चित्रपट पाहायला मिळण्याची शक्यता तशी धूसरच आहे, पण तरीही कधी अशी यदृच्छा झालीच, तर संधी टाळावयास हरकत नसावी, म्हणायची.

सिनेमात पुलंची आई अगदी सर्वसामान्याला अगम्य (म्हणे शुद्ध गोवन) असलं कोंकणी बोलते.

भावनेबद्दल पूर्ण सहानुभूती व्यक्त करू इच्छितो. असाच अनुभव मराठी संकेतस्थळांवरही अनेकदा आलेला आहे.

बाकी, आपली भाषा 'सर्वसामान्यांना समजतेच', अशा थाटात जेथे तेथे वापरणे, ही खास कोंकणीभाषकांची खासियत नसावी. असाच अनुभव फारा वर्षांपूर्वी एकदा आम्ही दिल्लीत घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचे, तर 'अ' ठिकाणाहून 'ब' ठिकाणाकडे जाताना मध्ये 'कोठल्यातरी चौकात उजवीकडे वळायचे आहे, हे ठाऊक आहे, पण ते या चौकात की पुढच्या चौकात, ते नक्की आठवत नाही' अशी अवस्था व्हावी, आणि म्हणून समोरच उभ्या असलेल्या शीख पोलिसाकडे हिंदीतून विचारणा करावी. त्यानेही मोठ्या तत्परतेने नि तितक्याच आस्थेने अत्यंत तपशीलवार मार्गदर्शन करून आपल्याला मदत करण्याचा उत्साह दाखवावा. फक्त, त्या तपशीलवार सूचना अस्खलित पंजाबीतून असाव्यात. त्याचे ते 'दा-विच'क्राफ्ट पार डोक्यावरून गेल्याने, आपण त्यास पुन्हापुन्हा त्याच सूचना हिंदीतून देण्याची विनंती करावी, आणि त्यानेही 'हिंदीतूनच तर सांगतोय' (आणि त्यापुढे, मनातल्या मनात, 'च्याxx, मला समजू शकताहेत तर यालाच कशा बरे समजत नाहीत?') अशा थाटात पुन्हापुन्हा त्याच सूचना - तितक्याच उत्साहाने, तत्परतेने आणि आस्थेने - पंजाबीतून दोहराव्यात. कल्पना करून पहा काय होईल ते.

(शेवटी, 'मदत नको, पण पंजाबी आवर' असे - अर्थातच मनातल्या मनात - म्हणत आम्ही त्याचा नाद सोडला, आणि त्याचे आभार मानून, अडम्-तडम्-तड्तड्-बाजा पद्धतीने ज्या चौकात वळावेसे वाटले, त्या चौकात वळते झालो. पहिलाच तुक्का बरोबर लागला, हे कळवण्यास अत्यंत आनंद होतो.)

पण तरीही, पु.लं.च्या मातु:श्रींनी सिनेमातल्या एखाद्या संवादात कोंकणी बोलणे हे अगदीच अस्थानी नसावे.

आणि, शुद्ध गोवन कोंकणी? गोव्यातील कोंकणी ही (जोपर्यंत ती मंडळी - आणि विशेषतः मंडळी किरिस्तांव असल्यास - गाऊ लागत नाहीत, नुसतीच बोलतात, तोपर्यंत) सर्वसामान्य मराठीभाषकास बर्‍यापैकी कळू शकते, अशी (मुंबई 'ब' वरची कोंकणी कार्यावळ ऐकून झालेली) धारणा होती. याउलट, कारवारी (म्हणजे, जीस मराठीभाषकांमध्ये अनेकदा 'हांगेपळे भाषा' या कुत्सितनामाने संबोधले जाते, ती भाषा) ही सर्वसामान्य मराठीभाषकाच्या दृष्टिकोनातून 'एक-अक्षर-कळल-तर-शपथ' छापात मोडते, अशी समजूत होती.

चित्रपट पाहिलेला नाही, परंतु, (अ.) पु.लं.च्या मातु:श्रींच्या संवादातली भाषा ही (आपणांस) सर्वसामान्य (मराठीभाषक) प्रेक्षकास अगम्य भासण्यासारखी वाटली, आणि (ब) पु.लं.च्या मातु:श्री या कारवारीभाषक होत्या, या दोन बाबी लक्षात घेता, (१) पु.लं.च्या मातु:श्रींच्या संवादातली भाषा ही बहुधा कारवारी असावी, अशी अटकळ ठोकून द्यावीशी वाटते, आणि (२) वरील (ब) मधील बाब पुन्हा एकदा लक्षात घेतला असता, पु.लं.च्या मातु:श्रींच्या संवादातली भाषा ही खरोखरच कारवारी असल्यास ते कदाचित काहीसे नैसर्गिक अत एव वातावरणनिर्मितीस पोषकच ठरावे (कारवारी-न-समजणारा-मराठीभाषक-प्रेक्षक-नॉटविथष्ट्यांडिंग (अथवा -बी-ड्याम्ड - शेवटचा 'ड' पूर्ण)), असे मत नोंदवावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पु.लं.ची वाक्ये नको नको तेथे उद्धृत करताना त्यांची वाटेल तशी मोडतोड करण्याचा पु.ल.प्रेमाखातर आपल्याला जणू परवानाच मिळाला आहे, असे त्यास वाटू लागते.

बर्‍याच लोकांचं इंग्लिश ऐकूनही असाच विचार येतो. तिथे फक्त इंग्लिश भाषेबद्दल प्रेम नसून आपल्याला इंग्लिश येतं असा समज असतो.

एका वाक्याचा शेवटचा परिच्छेद समजण्यासाठी दोनदा वाचावा लागला.

कारवारी कोंकणी समजत नाही, त्यामानाने गोवन कोंकणी चटकन समजते याच्याशी सहमत. पण आमच्या मकामावशी तशा मुंबईच्या नाहीत, तस्मात त्यांच्या बालकर्णांवर 'मुंबई-ब'च्या गोवन कोंकणीचे संस्कार झाले असतील असं वाटत नाही. दोन कोकणींमधला फरक त्यांना समजत नाही म्हणजे त्या घाटावरच्या आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बर्‍याच लोकांचं इंग्लिश ऐकूनही असाच विचार येतो. तिथे फक्त इंग्लिश भाषेबद्दल प्रेम नसून आपल्याला इंग्लिश येतं असा समज असतो.

एका वाक्याचा शेवटचा परिच्छेद समजण्यासाठी दोनदा वाचावा लागला.

पहिल्या परिच्छेदाचा दुसर्‍या परिच्छेदाशी काही संबंध नसावा, अशी आशा आहे.

एका वाक्याचा शेवटचा परिच्छेद समजण्यासाठी दोनदा वाचावा लागला.

हा बग नसून फ़ीचर आहे, असा दिलासा देऊ इच्छितो.

पण आमच्या मकामावशी तशा मुंबईच्या नाहीत

(अवांतरः) आम्हीही नाही. (द्या टाळी!)

पण (आमच्या मुळात जिल्हा-सिंधुदुर्ग-छाप आणि अर्धेअधिक आयुष्य मुंबईत काढलेल्या आजीच्या नादाने) मुंबई 'ब' आणि त्यावरची ती कोंकणी कार्यावळ ऐकण्याचा योग एके काळी अनेकदा आलेला आहे.

कारवारी त्या मानाने फारशी कानावर पडलेली नाही. (आणि त्यातही जी काही क्वचित, अत्यल्प आणि उडतउडत ऐकलेली आहे, तीही प्रकर्षाने मुंबईत किंवा मुंबईकरांकडून ऐकल्याचे आठवत नाही; काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, महाराष्ट्रात अधूनमधून मुंबईबाहेरही एखादा कारवारीभाषक सापडतो - अगदी पुण्यातसुद्धा! तर ते एक असो.) पण जी काही थोडीफार ऐकलेली आहे, त्यावरून 'हे काही आपल्याला कळण्यासारखे प्रकरण नाही' (उलटपक्षी, गोव्याची कोंकणी ही गोळाबेरीज का होईना, पण तुलनेने चटकन कळते; कारवारी मात्र 'बाकी शून्या'त जमा होते) असा ग्रह झालेला आहे. (कदाचित तो चुकीचाही असू शकेल. आपण काय बॉ त्यातले तज्ज्ञ नाही - किंवा, खरे तर, कशातलेच तज्ज्ञ नाही. असो.)

दोन कोकणींमधला फरक त्यांना समजत नाही म्हणजे त्या घाटावरच्या आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

आम्हीही घाटीच. दोन कोंकणीमधला (किंवा कोंकणी-कोंकणीमधला) फरक आम्हालाही कळत नाही. (त्याचाशी घेणेदेणेही नाही.) पण, गोव्याची कोंकणी ही कानावर पडल्यास त्यातल्या त्यात कळू शकेल, एवढे (मुंबई 'ब'-कृपेने) ठाऊक आहे, एवढेच.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या परिच्छेदाचा दुसर्‍या परिच्छेदाशी काही संबंध नसावा, अशी आशा आहे.

परिच्छेद का पाडतात याची मला कल्पना आहे. भाषेवर प्रेम आहे म्हणून प्रभुत्त्व आहेच असं नाही; पण निदान साधेसाधे नियमतरी माहित आहेत. आणि एखाद्या सामान्य, मध्यमवर्गीय, पापभीरू व्यक्तीप्रमाणे मी नियम शक्यतोवर पाळते.

हा बग नसून फ़ीचर आहे, असा दिलासा देऊ इच्छितो.

तुमच्या तळटिपा लिहीण्याचा किडा (का फीचर) आवडल्यामुळे मलाही लागला आहे अशी नोंद करू इच्छिते. त्यामाने एकाच रंगांच्या छटांची पूजा करण्याचा नाद लागलेला नाही.

(अवांतरः) आम्हीही नाही. (द्या टाळी!)

इथे मात्र थोडा विचार करावा लागेल. तशी मी पण मुंबईची नाही. पण वाढले त्या घरी मुंबई-ब ऐकू येतं, महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा फोन आहे. त्यामुळे त्या बाबतीत प्रादेशिक अस्मिता थोड्या भंजाळल्या आहेत. पण तरीही मागताच आहात तर टाळी देते, पुढचं पुढे!
एकेकाळी जेव्हा सकाळी सकाळी आमच्या घरच्या सगळ्यांची शाळा-कॉलेजं असायची, तास-लेक्चर देण्या-घेण्यासाठी वेळच्यावेळी घराबाहेर पडणं भाग असायचं तेव्हा घड्याळाकडे बघण्याचा त्रास आणि वेळ वाचावा म्हणून सकाळी रेडीओ सुरू असे. तिथे असं काय काय कानावर पडत असे. एकदा सकाळी बदाबदा पाऊस गळत असताना, आम्ही तळमजल्यावरच्या आमच्या घरातलं खालचं सगळं सामान, पावसाचं पाणी घरात घुसल्यास निदान सामान खराब होऊ नये म्हणून आवरत होतो. सकाळी सात ते सात-पाच प्रथमोपचार, आरोग्य अशी काही माहिती द्यायचे त्यात सर्पदंशाची माहिती दिली. त्यानंतर "कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी" गाणं वाजवलं. त्याच आठवड्यात "वीज वाचवा" असा संदेश देऊन झाल्यानंतर सकाळी सात वाजून पाच मिनीटांनी "मालवून टाक दीप" गाणं सुरू झालं. त्यानंतरमात्र जसपाल भट्टीच्या 'फ्लॉप शो'नंतर मुंबई-ब चा विनोदात नंबर लागतो असं माझ्या मनाने घेतलं. अजूनही कधी चुकून मुंबई-ब कानावर आलं तरी माझ्या कानात ती दोन भावगीतं नाहीतर 'फ्लॉप शो'चं शीर्षकगीत वाजायला लागतं. विडंबनाशी पहिली ओळख जसपाल भट्टीनेच करून दिली.

आम्हीही घाटीच. दोन कोंकणीमधला (किंवा कोंकणी-कोंकणीमधला) फरक आम्हालाही कळत नाही.

इथे माझ्या अस्मिता फारच भंजाळल्या आहेत. कागदावर जात पहायची तर मी ही घाटीच. पण आयुष्यातली बालपण नामक सोनेरी का कायसासा काळ भौगोलिकरित्या कोकणात गेला. लौकीकार्थाने शहरात. आणि त्यातही मुंबईमुळे स्वतःची कसलीही ओळख नसणार्‍या ठाणे शहरात. आता निदान लोकसभेचा लोकसंख्येने सर्वात मोठा मतदारसंघ अशी ओळख स्थलांतरीत लोकं आणि मुंबईच्या कृपेमुळे का होईना आहे. दोन कोंकणींमधला फरक आम्हाला कळत नाही, आणि दोन घाटींमधला फरकही आम्हाला कळत नाही. प्रमाण मराठीच काय ती समजते. नाही म्हणायला ठाण्यात कष्टकरी वर्गात आगरी समाज, विशेषतः स्त्रिया, चिक्कार असल्यामुळे आगरी बोलीशी लहानपणापासूनच परिचय. माझ्याशी बोलताना "तू कुठे गेला होतास?" असं काहीसं बोलणारी बंगाली जमात पहिली नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'टु बी ऑर नॉट टु बी ' हा संभ्रम संपवल्याबद्दल आभार. थेटरला जा, तिकिटं काढा, पिडाच की हो ती!
रावसाहेब मस्त रंगलेयत
हे बाकी वाचून बरे वाटले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'बाकी शून्य' हे शीर्षकात वाचूनच शिणुमाची वासलात लावली गेली आहे, याचा अंदाज आला होता. आता हे परीक्षण वाचून सिनेमा पाहीन, असं वाटत नाही. (पाहिलाच तर 'दिग्दर्शकेचि केला किती हीन पिक्चर'-मूड असल्यास Lol

गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळे व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकार होत नाही

वर्ण्य व्यक्तिरेखेची परिस्थिती/स्वभाव आणि निवेदकाची परिस्थिती/स्वभाव ह्यांच्यात असणारा विरोधाभास (उदा. - बबडू, नंदा प्रधान, नाथा कामत) आणि त्या व्यक्तिरेखेच्या परिसराशी नाळ जुळलेल्या उपमा/बोलण्याच्या लकबी - ही 'व्यक्ती आणि वल्ली'ची वैशिष्ट्यं अशा धावत्या जंत्रीतून दिसणं अशक्य आहे.

पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात.

याबद्दल 'न'वी बाजू ह्यांच्या मताशी सहमत आहे. मॉमने म्हटल्याप्रमाणे 'The ability to quote is a serviceable substitute for wit.'* चा पडताळा इथे येतो. पु.लं.चेच 'सखाराम गटणे'मधील 'संदर्भ सोडून लिहिलेलं ते वाक्य वाचताना माझी मलाच दया आली' हे उद्गार या संदर्भात आठवले.*

* - दोन्ही विधाने उद्धृत करण्यामागची विसंगती म्हणा वा सायक्लिक रेफरन्स एरर म्हणा, जाणीवपूर्वक / 'पन इन्टेन्डेड' ह्या लेबलाखाली करण्यात आली आहेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मॉमने म्हटल्याप्रमाणे ...

इथे थोडी गडबड झाली. पूर्ण नाव आणि/किंवा रोमन लिपी वापरून निष्कारण होणारा न-विनोद टाळता आला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होमोफोन इज मॉम ऑफ अनइन्टेन्शनल ह्युमर Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- वर्ण्य व्यक्तिरेखेची परिस्थिती/स्वभाव आणि निवेदकाची परिस्थिती/स्वभाव ह्यांच्यात असणारा विरोधाभास (उदा. - बबडू, नंदा प्रधान, नाथा कामत) आणि त्या व्यक्तिरेखेच्या परिसराशी नाळ जुळलेल्या उपमा/बोलण्याच्या लकबी - ही 'व्यक्ती आणि वल्ली'ची वैशिष्ट्यं अशा धावत्या जंत्रीतून दिसणं अशक्य आहे.

तडाखेबंद ब्याटिंग करणार्‍या प्रतिसादांमधे ह्या शॉटशी मनापासुन सहमत, लिखित स्वरुपात असलेलं स्वातंत्र्य दृष्य स्वरुपात नसतं असा समज गेल्या काही काळात आलेल्या दृक-श्राव्य अनुभावामुळे थोडासा बदलत चाल्ला आहे, तरीदेखील कलाकृती प्रसवणार्‍याची, माध्यमांतर करणार्‍याची आणि अनुभव घेणार्‍याची मानसिकता ह्यामधला फरक कमी झाला तरी तो राहाणारच. खुद्द पुलंनी जरी ते माध्यमांतर करायचं म्हंटल असतं तर कितपत जमलं असतं ह्याबद्दल मी जरा साशंकच असतो.

चंद्रकांत कुलकर्णींच व्यक्ति आणि वल्ली नाटक त्यामानाने मला फारच उजवं वाटलं होतं.

ता.क. - पु.लंच्या म्हशीला चित्रपटात आणण्याचे असंख्य प्रयत्न आज मराठी चित्रपट सृष्टीत चालू आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तर हा शिणूमा येणारेय असे घोषित झाल्यापासूनच भिती + राग आला होता. कशाला झेपत नाहित असल्या गोष्टी करायला जातात हे लोक.
रावसाहेबांच्या शब्दातच सांगायचं तर (आधि धैर्यधराची पार्टी धैर्य एकवटून म्हणते की आम्ही चाली बदलायच्याच नाहीत का?" त्यावर रावसाहेब)
"अरे बदला की कोण म्हणतं बदलु नका. दिनानाथ मंगेशकरांनी नाही का बदललं ते चालं.. पण कोणाच्या बापाचं टाप होतं का त्यांना विचारायचं का बदललं रे म्हणून.. त्याचं अधिकार होतं ते.. त्याच्यासारखं एक तान तुम्ही घ्या, मुळव्याध होतं की नाही सांगा... चाल बदलायचं म्हंजे काय अधिकार नको काय!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला असा काही चित्रपट तयार होतो आहे हेही माहीत नव्हतं (अज्ञानातलं सुख!). परवा सिग्नलला थांबले असताना याचं होर्डिंग पाहिलं. उत्सुकता चाळवली गेली होतीच. काल घरी येऊन पाहते तर मकचं परीक्षण. नाव वाचूनच अंदाज आला आणि वाईट वाटलं.
वर ऋ ने म्हटलंय त्याप्रमाणे अशा प्रसिद्ध पुस्तकांवर, व्यक्तींवर चित्रपट निघणार म्हटलं की हल्ली पोटात गोळाच येतो. कधी व्यावसायिक कारणांसाठी असेल किंवा काही इतर अडचणींमुळे असेल पण असे चित्रपट काढताना अनेकदा भट्टी जमण्याऐवजी बिघडलेलीच आढळते. आपल्या कलाकृतीचा गुरुत्वमध्य आणि पर्यायाने तोल सांभाळणे आपल्याला जमले आहे का याचा अंदाज घेणारा आणि अंदाज घेता येणारा दिग्दर्शक नसेल तर प्रकरण अवघड असते हेच खरे.
एकूण परीक्षण वाचल्यावर असे वाटते आहे की पुलंवरचा हा चित्रपट रावसाहेबांनी पाहिला असता तर त्यांनी काढलेले उद्गार ऐक्ल्यावर चित्रपटाचा चमू खरोखरच गोरक्षणसंस्थेची पेटी घेऊन श्लोक म्हणत हिंडला असता Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

परीक्षण आवडले. परीक्षण वाचायच्या आधीच , चित्रपटाची जी संकल्पना कानावर आलेली होती, त्यावरून "हे आपले काम नोहे" अशी खूणगाठ मारलेलीच होती.

माध्यमांतराच्या धाग्यावर "नवे इंटरप्रिटेशन" या अंगाने जी चर्चा चालली आहे ती प्रस्तुत संदर्भातही उद्बोधक आहे. पु ल देशपांड्यांसारख्या लोकप्रिय लेखकाचे सर्वाधिक लिखाण निवडून त्यावर नव्याने काम करताना याचा विचार व्हायला हवा होता आणि तसा तो होत नाही हे उघड आहे.

दुसरं असं की ऊर्जा, वेळ, कल्पनाशक्ती , कलात्मकता यांची सांगड घालून केलेला अर्ध्या-पाऊण तासाचा कार्यक्रम या अशा चित्रपटांपेक्षा कितीतरी अधिक पटीने अर्थपूर्ण होईल. कुठल्याही गोष्टीची - मग ते पु ल देशपांडे का होईनात - "गोळाबेरीज" ही कधीच कलात्मक दृष्ट्या सोडा, रंजनाच्या दृष्टीनेही यशस्वी होणे अशक्य आहे. इतके सोपे सूत्र ही अशी कल्पना राबवणार्‍या आणि त्या कल्पना राबवण्याच्या (पु लंचाच शब्द वापरायचा तर) खोगीरभरतीमधे सामील होणार्‍यांना कळू नये हे आश्चर्यजनक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुळात पुलं शब्दप्रभू आहेत आणि चित्रपटासारख्या दृक्-श्राव्य माध्यमात निव्वळ शब्दांवर भिस्त टाकता येत नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यकृतीवर चित्रपट काढणं हे येरागबाळ्याचं काम नाही. त्यात त्यांच्याविषयी लोकांना इतकं प्रेम आहे की त्यामुळेही हे जोखमीचं काम आहे. मराठी चित्रपटांच्या एकंदर दर्जाकडे पाहता अशा माध्यमांतरातून बरं काही निघू शकेल याची शक्यता सध्या तरी धूसरच वाटते. 'गोळाबेरीज'मुळे हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे असं या परीक्षणातून दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कहर म्हणजे ह्या चित्रपटात एक आयटम साँगपण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

थोडक्यात चित्रपटापेक्षा हा धागा आणि प्रतिक्रिया जास्त मनोरंजक आहेत तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा चित्रपट आहे?
असला तरी कोण पाहणार?
पुलंवरची नाटकं, एकांकिका, मालिका किंवा चित्रपट आम्ही पाहात नाही.
नक्कल करायलाही अक्कल लागते हे या लोकांना कधी कळणार?
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शंभर दिडशे रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद. नाहीतरी आपल्या मनातल्या दैवताच्या प्रतिमेची हेळसांड केलेली पाहवली जात नाहीच म्हणा. चला वाचलेल्या पैशांची प्यारटी करू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हे परीक्षण वाचून गोळाबेरीज वजाबाकी झाली

आता टीव्हीवर लागला तरच पाहीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.