समुद्र-शंखशिंपले

समुद्राची गाज ऐकणे हा तुझा आवडीचा छंदच होता म्हणा ना. आपण कॉलेजचे तास बंक करून समुद्रकिनार्‍यावर गाज ऐकत तासनतास घालवले आहेत. तुला समुद्र आणि आकाशाच्या शांत नीळाईची ओढ असायची. समुद्राचा धीरगंभीर आणि मर्यादाशील स्वभाव तुला आकर्षित करायचे.
याउलट समुद्रपक्षांची झेप, नारळीची झाडे, भणाणणारा खारा वारा हे माझे वीक पॉईंट्स असत. मला आकर्षक वाटणारी अजून एक गोष्ट जी केवळ माझ्या हट्टाखातर तू करत असे ती म्हणजे - चपला हातात धरून, मऊ मखमली रेतीतून चालणे.
आठवतं तुला सुबक, कंगोरेदार , सोनेरी अथवा शुभ्र शंख-शिंपले मिळवण्यासाठी मी किती अट्टाहास करीत असे ते. गिर्रेबाज, जीन्यासारख्या दातेरी कडा कोरीवकाम असलेला शंख मिळवण्यासाठी माझा आटापीटा चालत असे.

तू मात्र मिष्कीलपणे माझी धडपड न्याहाळत म्हणत असे - "अगं वेडे पण नाही मिळाला शंख तर काय आभाळ कोसळणार आहे का?" आणि मी थोडी वैतागून म्हणत असे - "हो माझ्यावर कोसळणार आहे. मला सुंदरसा , पूर्ण आणि शुभ्र शंख तरी हवा नाहीतर जांभळी शिंपल्याची डबी तरी हवी, गुलाबी बसकट शंखही चालतील पण पूर्ण आणि मला आवडणारे हवे."
यावर का कोण जाणे थोडासा गंभीर होऊन तू म्हणत असे - "काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." हा तुझा प्रतिवाद, हे तुझे तत्वज्ञान मला अजिबातच पटत नसे आणि मी अधिकच खणत असे, शोधत असे, हताश होत असे.
आता अर्ध्याहून अधिक आयुष्य सरल्यावर मला माहीतदेखील नाही तू कुठे आहेस, पण समुद्राची जागा प्रत्यक्ष जीवनाने घेतली आहे आणि शंख-शिंपल्यांची सुंदर नात्यांनी. अजूनही त्याच आसुसलेपणाने मी शोधते आहे आणि दर वेळेला रिकाम्या हाताने अन भरल्या डोळ्याने तुझे शब्द आठवते आहे-"काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." . कधी???? कधी???कधी??? लाकडे सरणावर गेल्यावर? का माझ्यापाशी तुझ्या स्वभावातील शीतलता नाही? का मला शाप आहे -"सतत शोध घेण्याचा आणि न सापडण्याचा". दिवस न दिवस माझा त्रागा वाढतच आहे. रात्र रात्र माझ्या उशा अश्रूंनी भीजतच आहेत.
मला मात्र खात्री आहे तू जिथे कुठे असशील समुद्र (आयुष्य) शांतपणे उपभोगत असशील. असो, तू म्हणतोस तशी नि:संग होऊन वाट पहाण्याचा प्रयत्न करेन.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा! रुपक, मांडणी सारे आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छोटेखानी लेखन आवडले.

(एकामागोमाग एक येणारी प्रश्नचिन्ह थोडी कमी टाकली तर चालतील का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.