धुक्यातून लाल ताऱ्याकडे

ललितच्या जुलै २०१६ अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो मी येथे देत आहे.

जानेवारी महिन्यात, आमच्या भागात, म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. त्यानिमित्त संमेलनाचा आतापर्यंतचा इतिहास, आणि संमेलनाध्यक्ष यांची माहिती असलेली पुस्तिका प्रदर्शित झाली. ती चाळत असता, वि. द. घाटे, अनंत काणेकर यांची देखील माहिती मिळाली. मला मी नववी दहावी मध्ये असताना आमच्या मराठी पाठ्यपुस्तकात असलेल्या त्यांच्या धड्यांची आठवण झाली. मानाने उचल खाल्ली, आणि मी अनंत काणेकारांची काही पुस्तकं मागवली. ५०-६० वर्षापूर्वी प्रकाशित झालेली, २५-३० रुपयांची ती छोटीशी पुस्तके म्हणजे लघुनिबंधांचे संग्रह, एक प्रवास वर्णन होते. प्रवास करणे आणि प्रवास वर्णने वाचणे बऱ्याच जणांना आवडतात. अनंत काणेकरांच्या १९४० च्या आसपास युरोप आणि सोविएत रशिया येथे केलेल्या प्रवासाचे वर्णन असलेले त्या पुस्तकाचे नाव आहे ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’. त्याबद्दल इथे लिहावे म्हणून हा प्रपंच. साहित्य संमेलनाबद्दल देखील लिहायचे आहेच पण नंतर कधीतरी.

त्यांनी हे पुस्तक रोजनिशी स्वरूपात लिहिले आहे. त्याला एक कारणदेखील आहे. त्यांचा प्रवास हा बोटीतून झाला. लक्षात घ्या दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास युरोप आणि रशियाचा बोटीने प्रवास करणे म्हणजे कित्येक दिवसांचा प्रवास. बोटीवरून केलेल्या प्रवासाचे वर्णन वाचून एक-दोन गोष्टींची आठवण मला झाली. मी देखील काही वर्षांपूर्वी लक्षद्वीप येथे जाण्यासाठी बोटीने ५-६ दिवस प्रवास केला होता. दिवस रात्र बोटीवर, वर आकाश, खाली पाणी यांची सोबत, त्यात वर बोट लागणे हे प्रकार, हे सर्व परत आठवले. तसेच विश्राम बेडेकर यांची सुप्रसिद्ध कादंबरी रणांगण याची देखील आठवण झाली. त्यात देखील साधारण त्याच काळाचा संदर्भ आहे, आणि सारे कथानक बोटीवरच घडते.

पुस्तकाला शं. वा. किर्लोस्कर यांची छोटीशी प्रस्तावना आहे, आणि लेखकाचे मनोगत देखील आहे. मनोगतामध्ये रोजनिशीच्या स्वरूपात हे प्रवास वर्णन का लिहिले आहे याची मीमांसा आहे. साधारण २०० पानी पुस्तकात, बराचसा भाग रशिया प्रवासाबद्दल आहे. सुरुवातीला मुंबई ते लंडन ह्या बोटीवरून केलेल्या प्रवासाचे वर्णन, भेटलेले वेगवेगळे लोक आपल्याला त्या काळात घेवून जाते. त्यांची Conte Verde नावाची इटालियन बोट होती. वेगवेगळया जाती-धर्माचे, देशांचे प्रवासी यांचे बहारदार वर्णन आहे, तसेच, बोटीवरील इटालियन कर्मचारी आणि त्यांच्या मनावरील कम्युनिस्ट पगडा याचा आलेला अनुभव, आणि इटलीच्या ताब्यात असलेल्या मासावा बंदारात झालेला बोटीचा थांबा आपल्याला त्यावेळच्या जगाच्या इतिहासात घेवून जातो. त्यानंतर सुएझ कालव्यातून बोट जावून पोर्ट सैय्यद काही तासांसाठी थांबली, आणि तेवढ्यात कैरोची धावती भेटीचे वर्णन आहे. शेवटी व्हेनिस शहरात बोटीचा प्रवास संपला. आणि मग पुढे व्हेनिस ते लंडन ह्या रेल्वे प्रवासाचे वर्णन आहे.

लंडन वास्तव्या दरम्यान आलेले अनुभव आणि त्यांना दिसलेले त्यावेळचे लंडन हे वाचणे मनोरंजक आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी त्यांना Parliament Hill Road परिसरात दिसलेल्या street corner meetings बद्दल माहिती आहे. तेथील वक्त्यांना Tub Thumpers म्हणतात. त्याचा इतिहास येथे बघता येईल. एका कार्यक्रमात भोर संस्थानाचे, जमखींडी संस्थानाचे राजे भेटल्याचे, तसेच प्रसिद्ध लेखक मुल्कराज आनंद यांची भेट याचे संदर्भ आले आहेत. Hippodrome theater मध्ये Bernard Shaw चे Candida हे नाटक बघितल्याचे वर्णन आहे, त्यात Cavalcade फेम अभिनेत्री Diana Waynard चे काम आहे. अनंत काणेकर हे स्वतः नाटककार होते आणि त्यांची नाट्यमन्वंतर ही नाटक कंपनी होती. त्या दृष्टीने त्यांनी लंडन मधील Left Theater चे कॉम्रेड स्लेटर(Comrade Montagu Slater) यांना भेटले आणि त्यांची मुलाखत घेतली.

यानंतर लंडन वरून लेनिनग्राड(आताचे Saint Petersburg) असा एका रशियन बोटीवरून झालेला प्रवास, त्यावरील अनुभव याचे धमाल वर्णन येते. भाषेचा प्रश्न, कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव, जर्मनी मधील Kiel Canal मधून जाताना निर्माण झालेला तणाव याचे सगळे अनुभव एका वेगळ्या विश्वात घेवून जाते. रशिया कम्युनिस्ट देश असल्यामुळे, तेथील प्रत्येक घरात Red Corner किंवा Lenin Corner नावाचा भाग असतो तेथे, लेनिनचे चित्र किंवा पुतळा असतो, आणि लाल फडक्याची कमान असते, अशी माहिती मिळते. आणि त्या रशियन बोटीवरदेखील असा Red Corner होता. North Seas हा समुद्र Kiel Canal मधून पार करून बाल्टिक समुद्रात आल्यावर रात्री बोटीवरून दिसणाऱ्या White Nights चे रोमांचक वर्णन देखील येते. लेनिनग्राड मध्ये पोचल्यावर तेथील स्थलदर्शन, Alexei Tolstoy ने लिहिलेले Peter I हे नाटक Alexandrisky theater मध्ये पाहिल्याचे वर्णन मजेशीर आहे. पुढे मॉस्कोला रेल्वेने ते गेले. रशियन रेल्वे मध्ये hard class आणि soft class असे दोन वर्ग असतात ही माहिती मिळते. मॉस्को मध्ये देखील रंगभूमी, साहित्य यासंबधी असलेली स्थळे त्यांनी पहिली. रंगभूमीचे संग्रहालय Bakhrushin Museum पहिले त्याचे वर्णन येते(मला वाटते त्यांनी चुकून Pokrovsky Museum असे संबोधले आहे). रशियन लेखक Sholokov याच्या And Quiet Flows the Don कादंबरीवर आधारित असलेले संगीत नाटक त्यांनी Bolshoi Theater मध्ये पहिले. मॉस्को मधील, त्यावेळच्या(१९९३५ च्या आसपासची ) आधुनिक भूमिगत रेल्वेची देखील माहिती आली आहे. त्यावेळची साम्यवादी परिस्थिती, आणि अशी आधुनिक भूमिगत रेल्वेचे जग असा विरोधाभास पाहून लेखकाला ‘Your socialism is still underground’ या वाक्याची आठवण येते. मॉस्को आर्ट थिएटर मध्ये Checkov चे Cherry Orchard हे नाटक, आणि त्यात Checkov पत्नीने(Madame Chekova) केलेले पाहायला मिळाले, असे नमूद केले आहे. त्यावेळेस अपघाताने त्यांची ओळख अमेरिकन चित्रपट अभिनेता Paul Robeson ची ओळख होते. Moskova-Volga canal चे बांधकाम ते तेथे असताना चालू होते, ते पाहायला मिळाले, आणि, त्यामुळे मॉस्को शहर हे पाच समुद्रांचे बंदर ठरणार होते. त्याकाळी रशियात रविवार हा सुट्टीचा दिवस नसे, तर, प्रत्येक पाच दिवसानंतर सहावा दिवस सुट्टीचा(Rest Day), असा प्रकार असे, तो त्यांना अनुभवायला मिळाला. The Theater of the Young Spectators या नाट्यगृहात The Days of the Turbins आणि The Pickwick Club ही नाटके पहिली. नुकतेच Michail V. Vodopyanov नावाच्या एका वैमानिकाने उत्तर ध्रुवावरून monoplane नेले होते. त्यानेच लिहिलेले The Dream ने नाटक, त्याच्या special effects सह लेखकाला पाहायला मिळाले.
Vakhtangov Theatre मध्ये Lev Slavin चे The Intervention हे नाटक पहिले आणि त्या अनुभवाचे वर्णन वाचायला मिळते. हे सर्व वाचल्यानंतर रशियन रंगभूमी आणि तिच्या इतिहासावरती एखादे चांगले पुस्तक मिळवायला पाहिजे. लेखकाने मॉस्को मध्ये आणखीन एक वेगळे संग्रहालय पहिले. ते म्हणजे Anti God Museum. ते Anti-Religious Museum असावे असे वाटते. त्या वेळेस रशियात परमेश्वर विरोधी, धर्म विरोधी चळवळ सुरु होती, त्याचे ते निदर्शक असावे. आत्ता काय स्थिती आहे याची मांहिती मिळत नाही. Palace of Soviets ह्या प्रस्तावित भव्य-दिव्य इमारतीचे पाया भरणीचे काम लेखकाने पाहिल्याचा उल्लेख आहे, पण ती कधीच पूर्ण झाली नाही.

रशियाच्या मुक्कामानंतर लेखक रेल्वेने जर्मनी आणि फ्रान्स मध्ये जातात, त्याचे थोडेफार वर्णन आले आहे. एक-दोन गोष्टी बद्दल सांगतो. त्यांना Paris मधील Pneumatic Letters नावाची मजेशीर गोष्ट समजली. पोस्टाच्या शाखा ह्या भूमिगत ट्यूबने जोडल्या गेल्या आहेत, ज्यातून हवेच्या दाबाने पत्र पाठवले जाते. पत्र तातडीने मिळण्यासाठीची ही व्यवस्था. ही व्यवस्था अर्थातच आता नाही, १९८४ मध्ये बंद झाली. दुसरी गोष्ट त्यांनी नमूद केली ती अशी की लेखक ज्या PEN International(PEN म्हणजे Poets, Essayists, Novelists ) संस्थेचे सभासद होते तिचे अधिवेशन भरले होते, त्याबद्दल माहिती आली आहे. आणि शेवटी, फ्रान्स मधून Jean Laborde नावाच्या बोटीने, कोलंबो पर्यंत येवून, पुढे भारतात, धनुष्यकोडी येथपर्यंत त्यांनी केलेल्या प्रवासाचे वर्णन येते.

भारत रशिया मैत्री, १९६०-७० च्या दशकात राजकपूरचे रशियात प्रसिद्ध असलेले चित्रपट, तेथील अजरामर साहित्य, झारची जुलमी राजवट, साम्यवादाचा उदय आणि भारतात त्याचा झालेला परिणाम, अमेरिका-रशिया शीत युद्ध(cold war), अंतराळसंशोधनात त्यांनी मारलेली भरारी, चेर्नोबील अणु दुर्घटना, यामुळे रशिया आपल्या थोडाफार ओळखीचा असतो, पण त्याच बरोबर भाषा माहीत नसल्यामुळे, आणि इतर गोष्टीमुळे बरेचसे गुढ असते. रशियाबद्दलचे प्रवास वर्णन मराठी मी तर पहिल्यांदा वाचले आणि तेही इतके जुने. अनंत काणेकर जेव्हा रशियाला गेले होते, त्याच्या वीसच वर्षे आधी तेथे क्रांती होवून, साम्यवादी सरकार आले, आणि तेवढ्या कालावधीत त्यांनी केलेली प्रगती, काणेकरांना दिसली. हे सर्व वाचताना आपल्याला रशियाच्या विविध अंगांची, इतिहासाची ओळख होते.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

१९६२-६३ च्या काळात पुण्यात प्रथम ISCUS (Indo-Soviet Cultural Society) च्या विद्यमाने नतालिया गूसेवा-पताबेन्को नावाच्या शिक्षिका बाईंनी उन्हाळ्यात रशियन वर्ग चालविला आणि तदनंतर लगेचच पुणे विद्यापीठाने Certificate Course In Russian आणि पुढील वर्षी Lower Dioloma in Russian असे शिक्षणक्रम सुरू केले. त्यावेळी मला रशियाचे देश म्हणून बरेच आकर्षण होते. मी दोन्ही कोर्सेस केले. यिवग्येनी सिम्योनोविच गोर्बेंको नावाचे आमचे शिक्षक होते आणि मी त्यांचा 'पट्टशिष्य'च होतो. (दोन्ही वर्षांमध्ये मीच पहिला आलो.)

त्या काळात मी रशियाबद्दल बरेच वाचन (War and Peace, Crime and Punishment, चेखोवच्या गोष्टी इत्यादि) इंग्रजीमधून केले होते. त्यामध्येच केस्लरचे Darkness at Noon, The God That Failed हा निबंधसंग्रह, जॉन गुंथरचे Inside the Soviet Union अशीहि पुस्तके होती आणि रशियन प्रचार संपूर्ण गिळण्यात अर्थ नाही हे माझ्या ध्यानात आले होते. तरीहि William Shirer चे The Rise and Fall of the Third Reich, मार्शल झुकोव ह्यांचे आत्मचरित्र वाचून रशियाने दुसर्‍या महायुद्धामध्ये दिलेल्या चिवट प्रतिकारामुळे त्या देशाचे कौतुकहि वाटले होते.

नेहरूंपासून अनेकांना प्रारंभी त्या देशात चाललेल्या नव्या सामाजिक प्रयोगाचे आकर्षण होते. काणेकरहि त्यामधीलच एक. नंतर सोल्झेनित्सिन ह्यांचे 'गूलाग' बाहेर आले आणि त्या कारभाराचे नग्न स्वरूप डोळ्यासमोर आले. 'गूलाग' हा शब्दच मुळात Gosudarstvenniy Upravitelnii Lager - सरकारने चालवलेला दुरुस्तीचा कॅम्प - ह्याचे संक्षिप्त रूप आहे.

स्तालिनच्या रशियाचे वर्णन वर दिलेल्या गुंथर ह्यांच्या पुस्तकामध्ये उत्तम दिलेले आहे. हे जुने पुस्तक मिळाल्यास जरूर वाचा असे सुचवेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी ७०-७२ पर्यंत (इंदिराबाईंच्या आशिर्वादाने कदाचित?) हा सोवियेत प्रसार भारतात चालू होता. दोन-चार प्रकाशनं वाचल्यावर त्याचं प्रचारी स्वरूप लक्षात आलं. मग वाचन थांबलं...
बाकी सोवियेत प्रकाशनांची एक विशिष्टता होती. त्यांसाठी वापरलेला कागद अतिशय उच्च क्वालिटीचा असायचा. मग सोवियेत लॅन्ड (हिंदीत सोवियेत देश) ह्या मासिकाच्या पानांची पुस्तकं-वह्यांना घालायला उत्तम कव्हरं होतात हा शोध लागला. विशेषतः मुंबईच्या पावसाळ्यात आपल्या देशी कव्हरांच्या मानाने ही कव्हरं अतिशय चांगली टिकतात हे कळलं. मग तीन-तीन मासिकं मोफतात घेऊन (लोकांना वाटायची आहेत म्हणून सांगून, रशियन अधिकारीही त्यांचा प्रसार होतोय म्हणून खूष!!) त्यांची घरातल्या सगळ्या पुस्तकांना त्यांची कव्हरं बनवण्याचा त्याकाळी उपद्व्यापही केला.
शिवाजीचे वंशज आम्ही, गनिमी कावा वापरणार नाय काय?
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दीनानाथ बात्रांचे पूर्वज सोव्हिएट रशियात कार्यरत असावेत.

मिर पब्लिशर्स नामक प्रकाशन संस्थेची इंजिनिअरिंगची पुस्तकेही मिळत. त्यात अनेक शोधांचे श्रेय मूळ (आपल्याला ठाऊक असलेल्या) संशोधकाला न देता स्थानिक रशियन व्यक्तीच्या नावाने दिलेला असे. उदा. फ्लुइड मेकॅनिक्सच्या पुस्तकात बर्नोलीचे नाव न देता कुठल्या रशियन माणसाचे नाव असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्तम परीक्षणाबद्दल धन्यवाद. शाळेत असताना "सोव्हिएत रशियाची पन्नास वर्षे" याचे दोन प्रचंड खंड वाचून काढल्याची आठवण झाली.
आजच्या रशियाबद्दलही गूढ कायम आहे. पुतिनचे रहस्यमय व्यक्तिमत्व, विरोधकांच्या खुनांमध्ये त्याचे सतत घेतले जाणारे नाव , त्याने घडवून आणलेला रशियाचा नवे "पेट्रो-स्टेट " म्हणून उदय, आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या पायावर नवे रशियन साम्राज्य उभे करण्याची त्याची महत्वाकांक्षा हे सर्वच वाचनीय ठरेल . असे चांगले पुस्तक आता मराठीत आले असल्यास माहिती नाही: सुचवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"बोटीवरील इटालियन कर्मचारी आणि त्यांच्या मनावरील कम्युनिस्ट पगडा" हे वाचून Walter Benjamin च्या "behind every fascism, there is a failed revolution" या वचनाची आठवण झाली, कारण मुसोलिनीचा उदय झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार, विविध संदर्भाबद्दल देखील धन्यवाद, त्या विषयाबद्दल आणखीन माहिती कळली. हे 'ऐसी'चे यश आहे. अण्णाभाऊ साठे देखील रशियात गेले होते. त्यांनी देखील आपल्या प्रवासाचे वर्णन करणारे छोटेखानी पुस्तक लिहिले होते. अनंत कणेकरांच्या पुस्तकानातर तेही सापडले. त्यावर मी लिहिले आहे. तो लेख मी येथे देतो आहे. ब्लॉगची लिंक न देता, मूळ लेख देत आहे. प्रतिक्रियेत लेख जरा विचित्र वाटेल, पण रहावत नाहीये.

अण्णा भाऊ साठे आणि रशिया

कित्येक वर्षापासून असलेली भारत रशिया मैत्री ही जरी काही राजकीय हेतुमुळे निर्माण झालेली एकेकाळची गरज होती. तसेच भारतातील साम्यवादी, कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक त्यावेळच्या सोविएत रशियाकडे आकृष्ट झालेले दिसतात. रशियात झालेली १९१७ मधील क्रांती, कामगारांचे आलेले राज्य, ह्या सर्व गोष्टी भारतातील पुढाऱ्यांना रशियाकडे खेचित होत्या. लेनिनने साकार केलेले मार्क्सचे तत्वज्ञान कसे असेल, तेथील नवीन संस्कृती कशी असेल हे पाहण्यास अनुभवण्यास बरीच मंडळी त्या दृष्टीने रशिया प्रवास करीत. महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे जे प्रसिद्ध साहित्यिक, क्रांतिकार, हे ही कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली आले होते आणि त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला होता, हा इतिहास आहेच. त्यांनी तर दुसऱ्या महायुद्धात सोविएत जनतेने केलेल्या पराक्रमामुळे भारावून जाऊन स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिला होता. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या रशियन भाषेतदेखील अनुवादित झाल्या होत्या. अण्णा भाऊ साठे यांनीही रशियाचा प्रवास केला होता. त्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तक देखील लिहिले होते(नाव-माझा रशियाचा प्रवास). मी काही दिवसांपूर्वी अनंत काणेकर यांच्या रशिया प्रवासावरील पुस्तकावर येथे लिहिले होते.

अण्णा भाऊ साठे १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारतभरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले अनुभव याविषयी जरा लिहावे म्हणून हा ब्लॉग-उद्योग.

ते दिल्लीहून पालम विमानतळावरून ‘चितोड की रानी’ नावाच्या विमानाने उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पोचले. त्यावेळी विमानांना नावे असत? आहे की नाही गमतीशीर माहिती? पुढे तेथून मॉस्कोला दुसऱ्या विमानाने गेले. मॉस्कोवरून लेनिनग्राडला रेल्वेने गेले. त्यांनी त्या रेल्वे प्रवासाबद्दल असे लिहिले आहे-‘एका कंपार्टमेंट मध्ये दोन पलंग, स्वच्छ गाद्या, उशा, चादरी, नळ, कंगवा, साबण, पावडर, रेडियो म्हणजे सारंच! शिवाय प्रवाश्यांची देखभाल करायला एक बाई होती….मला तो प्रवास कसासाच वाटला. मला बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली. ती गर्दी, तो कोलाहल, ती धावपळ…’ आणखीन एक गम्मत त्यांना दिसली. एक तरुण स्त्री गादीत खिडकीत बसली होती, तिच्या तान्ह्यासाठी एक छोटासा पाळणा होता. त्या बद्दल ते लिहितात-‘…कारण हाच बालनागरिक मोठेपणी आपल्या मातृभूमीसाठी शंभरदा मरणार याबद्दल सोविएत संघराज्याला खात्री होती’. काही वेळात म्हणे डब्यात रेल्वेचा एक गडी वेगवेगळया दारूच्या बाटल्या घेवून आला आणि रशियन भाषेत त्याबद्दल सांगू लागला, आणि काय हवे आहे ते विचारू लागला. असे जर भारततल्या रेल्वेत असते तर काय झाले असते असा विचार करून, आणि हसून त्यांनी त्याला वाटेला लावला!

लेनिनग्राड मध्ये त्यांना प्रोफेसर ततियाना म्हणून कोणी भेटल्या, ज्यांनी रशियन-मराठी शब्दकोश केला होता. आचार्य अत्रे यांनी साठेंकडे त्यांच्यासाठी एक पत्र दिले होते, जी त्यांनी त्या बाईना दिली. लेनिनग्राड मध्ये त्यांनी विंडसर राजवाडा, त्यातील लेनिनची खोली पहिली, १९४२ मध्ये युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे स्मारक पहिले. लेनिनग्राड मध्ये त्यांनी एक सिनेमा पहिला, ज्याचे वर्णन त्यांनी असे केले आहे, की तो 3-D सिनेमा असावा असे मला वाटते.

त्यांनी मॉस्को पाहिल्याचे जे वर्णन केले आहे त्या प्रकरणाचे शीर्षक आहे ‘लाल ताऱ्याखाली. मॉस्को मध्ये प्रसिद्ध रशियन लेखक गॉर्की याच्या नावाच्या राजमार्गावरून ते फिरले, त्याचे वर्णन येते. मॉस्को मध्ये मध्ये त्यांनी ठिकठिकाणी सिगरेटची राख टाकण्यास सोय आहे असे त्यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे, त्यावरून रशियन लोकात सिगरेटचे व्यसन किती होते/आहे ह्यास पुष्टी मिळते. रशियात कलाकारांना किती मान आहे ह्याचे त्यांना पदोपदी दर्शन झाले. काम आणि कला या दोघांवर रशियन जनता सारखेच प्रेम करते. त्यांनी बोल्शोविक नाट्यगृहात दगडाचे फुल नावाचा ओपेरा पहिला.

त्यानंतर ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले. स्टालिनग्राडवरून एक दिवसाचा विमान प्रवास करून जावे लागले. ते लिहितात, बाकू हे रशियातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे-मॉस्को, लेनिनग्राड, खार्कोव, आणि बाकू. त्यांनी पहिले की बाकू मध्ये संपन्नता आहे. अझरबैजानची हे मुस्लीम घटक संघराष्ट्र आहे, असे असून सुद्धा खनिज तेलाच्या समृद्धीमुळे, आणि तेथील लोकांच्या अपार कष्टामुळे, संपन्नता आहे, असे त्यांना आढळले. बाकूपासून जवळच एके ठिकाणी त्यांनी सामुदायिक शेती पहिली. रशियात त्यांना जीवनात कुठेही विसंगती आढळली नाही. खेडी, शहर यात काही फरक दिसला नाही. बऱ्याच ठिकाणी यंत्रांचा वापर दिसला, जसे की दोन रुबल्स टाकले की शरबत देणारे यंत्र त्यांनी त्यावेळी पहिले.

त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ते ताश्कंद येथे गेले, जी उझबेकीस्तानची राजधानी आहे.उझबेकीस्तान हे बरेचसे वाळवंटी प्रदेश आहे, तरी सुद्धा ऑक्टोबर क्रांती नंतर, त्यांनी झपाट्याने प्रगती केली. ताश्कंद मध्ये त्यांनी दिलाराम नावाचे एक नाटक पहिले असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर ते दिल्लीस परतले.

अण्णा भाऊ साठे स्वतः कामगार वर्गातून आलेले, समाजवादी चळवळ जवळून पाहिलेले, त्यांना साहजिकच त्यावेळचा क्रांतीनंतरचा रशिया त्यांना मनोहारी वाटला, त्या पासून त्यांनी नक्कीच प्रेरणा घेतली असणार. पुस्तकात ते एके ठिकाणी म्हणतात, ‘मॉस्को पहावे संध्याकाळी, लेनिनग्राड पहावे दिवसा, स्टालिनग्राडचा मर्दपणा युद्धात, तर बाकूचे सौंदर्य रात्री’. हे सर्व अनुभवायला तेथे जायलाच हवे! तर एकूण मला हे पुस्तक वाचनाताना खुपच मजा आली, काही दिवसापूर्वीच अनंत कणेकरांचे धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे त्यांच्या १९३६ च्या आसपास केलेल्या रशिया प्रवासाचे वर्णन वाचले होते. साठे जवळ जवळ ३० वर्षानंतर तेथे गेले. त्यांना दिसलेली रशियाची प्रगती आणखीनच झालेली एकूण वर्णनावरून दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

अण्णाभाऊंचा सोवियट अनुभव अन्य कोठल्याहि Fellow Traveller चा असावा तसाच दिसतो. अर्थात भारतातून तिकडे गेलेल्या आणि अन्य पाश्चात्य देश न पाहिलेल्या कोणाहि माणसाचे असेच भारावून गेल्यासारखे मत होईल.

अण्णाभाऊंचे इंग्रजी वाचन फारसे नसावे कारण स्तालिनची दडपशाही, ट्रॉट्स्कीसारख्या सहकार्‍यांचा काटा काढणे, त्याचे व्यक्तिपूजन, तेथील वैयक्तिक स्वातन्त्र्याचा पूर्ण अभाव, त्याचे अनेक लहरी निर्णय अशा अनेक गोष्टी, ज्या तदनंतर लवकरच ख्रुश्चोव ह्यांनीच देशापुढे आणि जगापुढे उघडपणे मांडल्या आणि त्यामुळे स्तालिन-कल्ट दुभंगला, एव्हांना इंग्रजीमधून पुष़्कळ प्रमाणात जगाला माहीत झालेल्या होत्या. आम्हालाहि त्याच काळात इंग्रजी पुस्तकावरून त्या माहीत झाल्या होत्या. अण्णाभाऊंना लाल चष्म्यामुळे त्या दिसल्या नसाव्यात.

अण्णाभाऊंना लेनिनग्राडमध्ये दाखविण्यात आलेला 'विंडसर पॅलेस' हा त्सारच्या निवासाचा 'विंटर पॅलेस' असला पाहिजे. खरा 'विंडसर पॅलेस' इंग्लंडमध्ये आहे.

'लेनिनग्राड' ह्या नावाचा मनोरंजक इतिहास असा आहे. पहिल्या पीटरने हे संपूर्ण नवे शहर युरोपीय शहरांच्या धर्तीवर बाल्टीक समुद्राकडे आणि युरोपकडे बघण्याची खिडली ह्या दृष्टीने बांधले. त्याचे नाव 'सेंट पीटर्सबर्ग' (रशियन उच्चार 'सांक्त पित्येरबुर्ग') असे ठेवले. क्रान्तीनंतर १९१७ साली हे जर्मन छटा असलेले नाव बदलून शहराचे नाव पेट्रॉग्राड (रशियन उच्चार 'पित्रोग्राद - ग्राद म्हणजे गोरद-शहर) असे झाले. त्याचेच दुसर्‍या युद्धानंतर 'लेनिनग्राद' झाले आणि कम्युनिस्ट सत्ता संपल्यावर पुनः मूळ 'सेंट पीटर्सबर्ग' जागेवर आले. तसेच बदल अन्य बर्‍याच नावांमध्ये झाले . उदाहरणार्थ त्सारित्सिन - वोल्गोग्राद - स्तलिनग्राद - पुनः वोल्गोग्राद, येकातेरिनबुर्ग - स्वेर्द्लोव्स्क (क्रान्तिनेता याकोब स्विर्दलोव्स्क ह्याच्या नावे, त्सार कुटुंबाची कत्तल येथेच झाली) - पुनः येकातेरिनबुर्ग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0