INDIA UNBOUND

इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं. पण का कोण जाणे ते कधीच मला भिडलं नाही. कारण त्यात एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा काहीच संदर्भ नव्हता. "इंग्रजांविरुद्ध सगळा देश पेटून उठला" अशी वाक्ये इतिहासाच्या पुस्तकात वाचून आश्चर्य वाटायचं. तीस-चाळीस कोटी लोक पेटून उठले तरी मूठभर इंग्रज एका झटक्यात नष्ट कसे झाले नाहीत असा प्रश्न पडायचा. एकूणच इतिहास म्हणजे त्रयस्थांची कहाणी असल्याप्रमाणे वाचला. त्याचा उपयोग ना वर्तमान समजायला झाला ना भविष्य. "इतिहास तुम्हाला भविष्यासकट सगळं शिकवतो" हे एक फक्त टाळीखेचक वाक्य असावं असं वाटत होतं.

एका रात्री मित्राकडे गप्पा-टप्पा करता करता पुस्तकांचा विषय निघाला आणि त्याने मोठ्या हौसेने आपलं पुस्तकांचं शेल्फ "वत्सा, तुजप्रत कल्याण असो" च्या अविर्भावात उघडून दाखवलं. इतर अनेक रोचक पुस्तकांमध्ये नाशिकच्या गणेश बँडचा निळा दरवाजा आणि शेजारीच कोकाकोलाची लाल पाटी असं मुखपृष्ठ असलेल्या एका पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. नाव होतं "INDIA UNBOUND: From Independence To The Global Information Age".
इंडिया शायनिंगच्या जमान्यात मला बर्‍याच वेळा प्रश्न पडायचा की उज्ज्वल भूतकाळाच्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरचा इतिहास कसा असेल? इंग्रज वा इतर कोणीही परकीय शत्रू नसताना केवळ चीन-पाकिस्तानची दोन-तीन युद्धे आणि आणिबाणीसारख्या राजकीय घटना एवढाच इतिहास असेल?
पुस्तक पुढून मागून पाहिलं. अमर्त्य सेन आणि नारायण मूर्तींसारख्या दिग्गजांचे गौरवोद्गार लिहीलेले वाचून पुस्तकाबद्दल चांगलं मत झालं आणि ते पुस्तक मी मित्राकडून मागून घेतलं. त्या दिवसानंतर तीन-चार दिवसात ते पुस्तक वाचताना अध्यात्मात आत्मज्ञान मिळाल्यावर जो आनंद होत असेल तो आनंद मला मिळाला.

स्वतः एका मध्यमवर्गीय घरातून आलेले आणि प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल कंपनीचे ग्लोबल एमडी म्हणून काम केलेले, नावाजलेले लेखक आणि विचारवंत श्री. गुरचरण दास यांनी हे अप्रतिम पुस्तक लिहीले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो,"I have followed, I find, the method of Defoe's Memoirs of a Cavalier, in which the author hangs the chronicle of great political and social events upon the thread of an individual's personal eperience"
आणि मग सुरु होतो एकाहून एक सुरस गोष्टींचा आणि अनुभवांचा एक कथाप्रवास. पुस्तकाचे तीन भाग आहेत आणि प्रत्येक भागात साध्या साध्या घटनांतून लेखकाने टिपलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल चपखलपणे आणि रंजकतेने उलगडत जातात.

आमच्या स्वप्नांचा निर्झर (Our Spring of Hope (1942-1965))

१९४२ ते १९६५ चा अनेक उतारचढावांचा कालखंड या भागात येतो. फाळणीचे दु:ख सहन करूनही स्वातंत्र्याने सगळ्या भारतीयांच्या मनात नव्या स्वप्नांच्या झर्‍याला उगम दिला. नेहरूंवर असलेल्या फॅबिअन विचारसरणीच्या प्रभावामुळे लोकशाही समाजवाद भारताने स्वीकारला आणि सर्वकल्याणकारी सरकारयंत्रणेच्या उभारणीला सुरुवात झाली. या उभारणीचे उद्बोधक तपशील पुस्तकात रंजकपणे मांडले आहेतच शिवाय, अठराव्या शतकापर्यंत श्रीमंत असलेला आपला देश गरीब का झाला? कापडाच्या उत्पादनात आघाडीवर असलेला भारत एकदम तळाला का गेला? इंग्रजांनी रेल्वेचं इतकं मोठं जाळं उभारूनही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही भारतात औद्योगिक क्रांती का नाही झाली? याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय राज्यकर्त्यांची परकीय सत्तेची भीती, व्यापार्‍यांवरचा अविश्वास आणि स्वप्नाळू वृत्ती यातून बनलेली लोकशाही आणि समाजवाद यांचं स्वप्नवत मिश्रण असलेली अर्थव्यवस्था अपयशी का झाली? नेहरू आणि समकालीनांचे "सरकारप्रणित औद्योगिक क्रांती"चे स्वप्न का भंगले? नेहरूंच्या स्वप्नातली पोलादी चौकट असलेली नोकरशाही प्रत्यक्षात कशी निघाली? दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणारे संख्याशास्त्री, नेहरूंच्या मर्जीतल्या लोकांची सरकारात वर्णी या सगळ्यात इतर पर्याय मांडणार्‍यांकडे दुर्लक्ष कसे झाले? शेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष का केले गेले?
इंग्रज सोडून गेल्यावर काळ्या बाबूंनी त्यांची जागा कशी घेतली? संस्कृत पठणार्‍या आणि इंग्रजी घोकणार्‍या उच्चवर्णीय मध्यमवर्गाचा उदय कसा झाला? ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या जातीव्यवस्थेमुळे व्यापार्‍यांना प्रतिष्ठा मिळाली नाही. मंत्र पठणाला आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट विचार करण्याला प्रतिष्ठा असल्याने भारतीयांनी कधीच हाताने काम करणे, अंगमेहनत करणे चांगले मानले नाही वगैरे अनेक सुरस गोष्टींचा उहापोह या भागात आहे.
लेखकाने आपल्या आणि अपल्या कुटुंबीयांच्या अनुभवांवरून सरकारी यंत्रणेतला ब्रिटीश काळातला कर्तव्यकठोरपणा जाऊन त्याची जागा भ्रष्टाचार, चलता है वृत्ती आणि कामगार संघटनांची शिरजोरी यांनी कशी घेतली याचे अगदी मार्मिक वर्णन केले आहे.
वानगीदाखल पुस्तकात आलेले दोन किस्से सांगतो.
पहिला विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा. मारवाडी लोकांच्या व्यवसायप्राविण्याचा. चांदी आणि अफूच्या व्यवहारात जमवलेला पैसा जीडी बिर्लांना कलकत्त्यात तागाच्या धंद्यात लावायचा होता पण तागाच्या धंद्यात तेव्हा स्कॉटिश लोकांचा एकाधिकार आणि नियंत्रण होतं. तरीही जीडी बिर्लांनी या स्कॉटिश कंपन्यांचा विरोध पत्करूनही आपला कारखाना टाकला. अवघड परिस्थितीमुळे तो डबघाईला आला यात काहीच नवल नाही आणि मग शेवटी जीडींना त्यांना विरोध करणार्‍या स्कॉटिश लोकांकडेच तो विकण्यासाठी जावे लागले. करखाना विकत घेण्याची बोलणी करताना स्कॉटिश मॅनेजरने "तुझी हा कारखाना काढण्याची हिंमतच कशी झाली?" असं विचारलं. दुखावलेल्या जीडींनी त्याक्षणी कारखाना विकण्याची ऑफर गुंडाळली आणि काहीही झालं तरी ही एकाधिकारशाही मोडायची प्रतिज्ञा केली. थोड्याच वर्षात ज्या कंपनीकडे आपला कारखाना विकायची वेळ आली होती, तीच कंपनी जीडी बिर्लांनी विकत घेतली.
(हेच ते जीडी बिर्ला ज्यांनी गांधींना स्वदेशी कापडच पाहिजे तर चरखा चालवण्याऐवजी स्वदेशी कारखाने काढावे असं सुचवलं होतं पण तंत्रज्ञान, घाऊक उत्पादन आणि नफा कमावणे हे गांधीजींच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने त्यांनी त्यास नकार दिला होता.)

दुसरा प्रसंग स्वातंत्र्यानंतरचा. जेव्हा लेखक हार्वर्डला शिकत होते, तेव्हा "Government 180" या कोर्ससाठी त्यांना शिकवायला त्याकाळी अगदीच अप्रसिद्ध असलेले हेन्री किसिंजर होते. हेन्री किसिंजर यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सर्व देशांनी नीतिमत्तेला महत्त्व न देता फक्त स्वहितालाच महत्त्व दिले पाहिजे कारण त्यामुळे सगळ्या देशांच्या हेतूंचा अंदाज लावून त्यांच्या हालचालींचे भाकित करणे सोपे जाते आणि सत्तेचा समतोल राखण्यास मदत होते. यामुळेच अखेर शांतता प्रस्थापित होते. एका अध्यापनात त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध कसे ठेवू नये यासाठी नेहरूंचे उदाहरण दिलं आणि नेहरूंनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये नीतिमत्तेचं एक धोकादायक रसायन टोचलं आहे असंही सांगितलं. शिवाय कोणालाही नीतिमत्तेवरून प्रवचन ऐकायला आवडत नाही अशीही टिप्पणी केली. हेच हेन्री किसिंजर पुढे "Secretary of State" झाले आणि त्यांनी निक्सनच्या काळात अमेरिकन सरकारचे धोरण पाकिस्तानच्या बाजूने झुकवले.

नेहरूंनंतर केवळ १९ महिने पंतप्रधान असलेल्या शास्त्रींनी हरितक्रांतीचा पाया कसा रचला आणि त्यापुर्वी लिंडन जॉन्सनच्या काळात भारताचे अमेरिकेतले राजदूत श्री. बी.के. नेहरू यांची अवस्था डोकं कापलेल्या कोंबडीसारखी का झाली होती हे मुळातूनच वाचलं पाहिजे.
नेहरूंनी ज्या समाजवादी सरकारचं स्वप्न पाहिलं होतं आणि नोकरशाहीची जी पोलादी चौकट आपल्या देशाला मजबूत करेल असं वाटलं होतं, ती चौकट झपाट्याने गंजू लागली होती. संघटित क्षेत्रातल्या कामगारांपैकी बहुसंख्य कामगार सरकारी नोकरीत किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीत काम करत होते (अजूनही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही.) जेआरडी टाटांनी या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या अकार्यक्षमतेकडे नेहरूंचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर लाखो लोकांच्या हृदयातून वाहू लागलेल्या स्वप्नांच्या झर्‍याचं पुढे काय झालं?

एक वाया गेलेली पिढी (The Lost Generation (1965-1991))

नेहरू आणि शास्त्रींनंतर काँग्रेस पक्षातल्या हाणामारीतून इंदिरा गांधींचे नाव पुढे आले आणि बरीच भवति न भवति होऊन त्या पंतप्रधान झाल्या. भारताच्या स्वतंत्र आयुष्यातलं एक वेगळंच युग सुरु झालं. नेहरूंच्या तत्त्वनिष्ठेकडून त्यांच्याच तत्त्वांचा दुरुपयोग करण्याकडे आणि प्रसंगी ती तत्त्वे सोयीस्करपणे सोडून देण्याकडे एक तत्त्वशून्य प्रवास सुरु झाला.
या काळात भारताचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अधःपतन कसं होत गेलं याचा वेदनादायक आलेख पुस्तकाच्या या भागात मांडला आहे.
उदाहरण म्हणून एक किस्सा पुरेसा आहे.
साल १९७१. बंगालातल्या हल्दिया प्रांतात हिंदुस्थान फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचा एक खत कारखाना उभारण्याचे काम सुरु झाले. कर्मचार्‍यांसाठी निवास व्यवस्था, दवाखाने, रस्ते, शाळा आणि इतर गरजेच्या सुखसोयी निर्माण करायला सुरुवात झाली. १९७६ साली सुरु होण्याची अपेक्षा असलेल्या या कारखान्याच्या उभारणीचे काम १९७९ साली वाढीव खर्च करून एकदाचे संपले. पण तोपर्यंत हा कारखाना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही असे लक्षात आले. पण समाजवादी सरकार असताना कामावर घेतलेल्या लोकांना कमी कसे करणार? १९७९ नंतर २३ वर्षे हा कारखाना चालूच रहिला. लोक कामावर येत राहिले, त्यांना पगार मिळत राहिला, ते निवृत्त होत राहिले, यंत्रसामुग्रीची नियमित दुरुस्ती आणि देखभाल होत राहिली आणि ती टाऊनशिपही गजबजलेली राहिली फक्त एक गोष्ट झाली नाही आणि ती म्हणजे उत्पादन. २३ वर्षात या कारखान्याने एक किलोसुद्धा खत तयार केले नाही. (पंधराशे कोटी रुपयांचा फुकटचा खर्च सोसून आणि पंधराशे लोकांना काहीही काम न करता पगार आणि सुखसोयी देऊन हा कारखाना शेवटी २००२ मध्ये बंद करण्यात आला.)
संधीसाधू समाजवाद आणि खाजगी उद्योगांवर सरकारचे गुदमरवणारे नियंत्रण याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भारतात औद्योगिक उत्पादनवाढीचा दर जेमतेम ३-४ टक्क्यांवर आला आणि लोकसंख्या मात्र २ टक्क्यापेक्षा जास्त वेगाने वाढत होती. ८९% आयकर आणि MRTP सारखे कायदे यांचे फटके टाटांसारख्या मोठ्या उद्योजकांनाही सोसावे लागले. राजकीयच काय सगळ्याच पातळ्यांवर भ्रष्टाचार अनिर्बंध झाला आणि जिने लोककल्याणकारक असणे अपेक्षित होते ती सरकारी यंत्रणा स्वहितरक्षक आणि जनहितभक्षक राक्षस बनली. तोंडाने "गरिबी हटाव"ची घोषणा देणार्‍या सरकारने प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील याची पुरेपूर काळजी घेतली. शिवाय आणिबाणी सारख्या प्रसंगांना तोंड देऊन भारतीय लोकशाही एका प्राणविरहित बुजगावण्यासारखी शोभेची वस्तू बनली.
या सगळ्याचे विदारक वर्णन या भागात लेखकाने केलं आहे. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींच्या काळात परिस्थिती थोडी सुधारली आणि राजीव गांधींनी सॅम पित्रोदांना दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतात टेलिकॉम क्रांती झाली. तरीही भारताची आर्थिक स्थिती खालावतच गेली. सरकारी योजनांमधला राक्षसी भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशाची अमाप लूट यातून वित्तीय तूट वाढत गेली. स्वतःची क्षमता कधीच न वाढवल्यामुळे आयात वाढतच गेली आणि १९९१ मध्ये एक वेळ अशी आली की केवळ आठवडाभर पुरेल इतकीच परकीय चलनाची गंगाजळी सरकारच्या खजिन्यात शिल्लक उरली. पण म्हणतात ना, पहाट होण्यापुर्वीच रात्र सगळ्यात जास्त अंधारी असते.

स्वप्नांचा पुनर्जन्म (The Rebirth of Dreams (1991-2000))

१९९१ च्या उन्हाळ्यात जेव्हा भारताच्या तिजोरीत खडखडाट झाला तेव्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाऊन भीक मागण्याचा नेहमीचा पर्याय उपलब्ध होताच. पण कोणताही निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान श्री. पी.व्ही. नरसिंहराव आणि त्यांचे, राजकारणाचा यत्किंचितही अनुभव नसलेले अर्थमंत्री, श्री. मनमोहन सिंग यांनी एका दिवशी गुपचूप क्रांती घडवली. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव सरकारने २१ जूनला सरकार स्थापन झाल्यापासून फक्त एका महिन्यात म्हणजे २४ जुलै १९९१ ला जे क्रांतीकारी औद्योगिक धोरण जाहीर केले त्याने एका फटक्यात कोट्यवधी गरिबांचा समृद्धीकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. जाचक आयात नियंत्रण रद्द केले गेले, १६ मुख्य क्षेत्रे सोडून बाकी सगळी क्षेत्रे परवानामुक्त केली गेली, रुपयाचे अवमूल्यन केले गेले आणि बरीच क्षेत्रे परकीय गुंतवणुकीसाठी मोकळी करण्यात आली.
यामागे घडलेले रामायण आणि नरसिंहराव, मनमोहनसिंग, चिदंबरम आणि सचिव ए.एन.वर्मा या चौकडीने खेळलेला एक धाडसी डाव याचं रोमहर्षक वर्णन एखाद्या युद्धकथेपेक्षा कमी रम्य नाही. १९९१ मध्ये १.५ कोटी डॉलर्स असलेला परकीय चलनसाठा १९९७ पर्यंत ३०० कोटी डॉलर्सवर पोचला. भारताच्या सामान्य जनतेला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ साली नव्हे तर २४ जुलै १९९१ साली मिळाले असेच म्हणावे लागेल इतका फरक केवळ दहा वर्षात पडला.
त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने जो वेग पकडला तो सर्वज्ञातच आहे.
एक उदाहरण. १९९९ मध्ये बंगळुरुस्थित आर्मेडिया नावाची IC डिझाईन करणारी कंपनी अमेरिकेतील ब्रॉडकॉम कॉर्पोरेशनने तब्बल ६.७ कोटी अमेरिकन डॉलर्सना विकत घेतली. या कंपनीचे उद्गाते श्री. दवे हे एक सामान्य मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेले इंजिनिअर होते. इंटेलमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांनी ही स्वतःची कंपनी काढली आणि डिजिटल टीव्हीसाठी लागणारी डिकोडर चिप विकसित केली. १९९१ पुर्वी एका साध्या इंजिनिअरने कंपनी चालू करणे आणि ती परकीय कंपनीला विकणे ही स्वप्नातही करण्यासारखी गोष्ट नव्हती, पण केवळ आठ वर्षात एका इंजिनिअरने स्वतःसकट त्याच्या कंपनीत काम करणार्‍या चाळीस लोकांना करोडपती बनवले.
थोडक्यात, भारतीयांनी औद्योगिक क्रांती चुकवून थेट माहितीतंत्रज्ञान क्रांतीत झेप घेतली. अमूर्त विचार करण्यात पटाईत असलेल्या भारतीयांना कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगलाच सूर गवसला आणि बघताबघता अमेरिकेच्या सिलिकॉनव्हॅलीमध्ये भारतीय नवउद्योजकांनी दबदबा निर्माण केला. भारतात "नवा पैसा" खेळू लागला आणि नवा, आधीच्या 'सुसंस्कृत' मध्यमवर्गीयांना उथळ वाटेल असा पण व्यवहारी आणि लोकांची पर्वा न करता स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारा मध्यमवर्ग देशात तयार झाला.

या तिन्ही भागात हे सगळे बदल टिपताना लेखकाने आपल्या आयुष्यातल्या साध्या-साध्या घटनांचा आधार घेतला आहे. लाहोरमधलं त्यांचं घर आणि फाळणीपुर्वीची स्थिती, फाळणीच्या काळातलं त्यांचं स्थलांतर, इंग्रज गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करणारे त्यांचे आजोबा, टीसीला लाच घेताना पकडणारे आणि त्याचीच माफी मागण्यासाठीचा युनियनचा दबाव झुगारणारे त्यांचे काका, मुंबईतलं त्यांचं विक्स-वेपोरबचं ऑफिस, तिथला कांबळे शिपाई, त्यांचा मध्यप्रदेशातला डिस्ट्रिब्युटर, गुजरातमध्ये त्यांना विक्सवेपोरबचा नवाच उपयोग शिकवणारी गृहिणी, आर्थिक सुधारणा झाल्यानंतर तामिळनाडूत चहाच्या ठेल्यावर भेटलेला आणि 'बिल्गे' व्हायचं स्वप्न पाहणारा राजू या आणि अशा अनेक सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या, हृद्य प्रसंगांतून त्यांनी त्या-त्या काळाचा चित्रपट इतक्या मनोवेधक पद्धतीने फिरवला आहे की वाचताना वाचकाला त्या त्या काळात जाऊन आल्याचा भास व्हावा.
२००० साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात त्यांनी वाचकांच्या आग्रहापोटी २००६ साली एक उपसंहार जोडला. त्यात वर्तमानकाळाचा वेध घेताना त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत आणि आजची परिस्थिती पाहता ते मुद्दे किती समर्पक आहेत याची प्रचिती येते.
उपसंहारात भारताच्या प्रगतीचे कौतुक करतानाच ते भारताच्या वाढत्या तुटीकडे लक्ष वेधतात, परवाना-राज संपले असले तरी निरीक्षक-राज (Inspector-Raj) संपलेले नाही, अजूनही वाजवीपेक्षा कडक असलेले कामगार कायदे, पुन्हा एकदा गरिबांच्या नावाखाली काँग्रेसपक्षाचे स्वतःच अंमलात आणलेल्या सुधारणांना खीळ घालण्याचे उद्योग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार शिक्षणाकडे होत असलेली अक्षम्य हेळसांड याबद्दल चिंता व्यक्त करतात.

पुढे काय?
पुस्तकात उपसंहार लिहील्यालाही पाच वर्षे उलटून गेली आहेत. आज परिस्थिती काय आहे? हे पुस्तक वाचल्यानंतर कोणाही माणसाला परिस्थितीचे मूल्यमापन कसे करावे हे समजण्यास हरकत नाही. त्याप्रमाणे आपण आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं?
जगाची परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. अमेरिका आणि युरोपातले श्रीमंत देश अडचणीत आहेत आणि आशियातल्या देशांना पुन्हा समृद्धी मिळवण्याची संधी चालून आली आहे. त्याचवेळी भारतात काय परिस्थिती दिसते? वित्तीय तूट वाढत चालली आहे. कर्ज उत्पन्नाच्या ६०%पेक्षा जास्त झाल्याने मूलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे सरकारला जमत नाहीये. त्याच वेळी महसुली उत्पन्नाच्या बाबतीत गोंधळ चालू असल्याने कित्येक करविषयक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अजूनही परकीयांच्या भयगंड बाळगणारी आणि गरीबांचा खोटा पुळका असणारी माणसं परकीय गुंतवणुकीला विरोध करत आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणतेही विशेष असे धोरण राबवले गेले नाहीय. महाराष्ट्रातली पटपडताळणी या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दल पुरेसे भाष्य करणारे उदाहरण ठरावे. अजूनही सरकारी क्षेत्रातल्या कंपन्या आणि खुद्द सरकारी कर्मचारी स्वहित जपण्यात मश्गुल आहेत, छद्मी समाजवादी प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढत आहेत आणि सरकारला धोरण लकवा झाला आहे.
एक उदाहरण. ऑगस्ट २०११ मध्ये एक बातमी छापून आली होती. HFCL चा हल्दियातला खतकारखाना पुन्हा सुरु करण्याचे काँग्रेस सरकारने ठरवले आहे. त्या आणि बंद पडलेल्या इतर काही खतकारखान्याना पुन्हा सुरु करण्यासाठी एकूण मिळून दहाहजार कोटी रुपये गुंतवण्याचे सरकारने ठरवले आहे.
अशी आव्हानात्मक परिस्थिती असली तरी दुसर्‍या बाजूला भारतीय खाजगी क्षेत्रातले उद्योग वैश्विक भरार्‍या मारत आहेत आणि परकीय उद्योगांनाही भारतात गुंतवणूक करायची आहे. भारतातली बाजारपेठ आणि स्वस्त मनुष्यबळ जगभरातल्या कंपन्यांना अजूनही भुरळ घालते आहे.
सरकारने योग्यवेळीच काही कटू पण आवश्यक निर्णय घेतले नाहीत, नोकरशाहीतला आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार निपटण्यासाठी लोकांनी काही केलं नाही तर पुन्हा सुवर्णयुगात पोचण्याची भारताची ही संधी साधली जाईलच याची खात्री नाही. प्रत्येक भारतीयाचे भविष्य त्याच्या या महाकाय देशाशी निगडीत आहे. भविष्याची काळजी असलेल्या प्रत्येक भारतीयाने आपला इतिहास आणि वर्तमान दाखवणारे हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
झुलत झुलत चालणारा हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हत्ती वेळेवर तलावावर पोचणार की आपल्याच विविध गंडांच्या साखळ्यांनी बांधला जाऊन त्याचं समृद्धीचं स्वप्न विरून जाणार हे भारतीयांनीच ठरवायचं आहे.

INDIA UNBOUND: From Independence To Global Information Age
लेखकः गुरचरण दास
प्रकाशकः Penguin Books
पाने:४१९

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पुस्तक वाचावेसे वाटत आहे. चांगला परिचय.

प्रथमदर्शनी वाटून गेले, की पुस्तक लेखकाने पुरेसे संदर्भ लक्षात घेतलेले नसावेत.
ब्राह्मणी व्यवस्थेमुळे भारतीयांना अंगमेहनत करण्याचा कंटाळा होता, असा निष्कर्ष असेल तर ती मोठीच चूक होती.
ब्राह्मणी व्यवस्था असतानाही खेड्यांत बलुतेदारी व्यवस्था भक्कम होती आणि या सगळ्या जाती (ब्राह्मण वगळता) अंगमेहनत आणि पारंपरिक व्यावसायिक कौशल्ये यांच्याच जोरावर निर्वाह करत होत्या.
भारताचा इतिहास केवळ ब्राह्मणी नाही. या देशाला एक स्वतंत्र व्यापारी इतिहासही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मणी व्यवस्थेमुळे भारतीयांना अंगमेहनत करण्याचा कंटाळा होता, असा निष्कर्ष असेल तर ती मोठीच चूक होती.

थोडा फरक आहे. ब्राह्मणी व्यवस्थेमुळे भारतीयांना अंगमेहनत करण्याचा कंटाळा होता असे म्हटलेले नसून ब्राह्मणी वर्चस्वामुळे अंगमेहनतीला प्रतिष्ठा कमी होती आणि बौद्धिक/अमूर्त विचार करण्याला प्रतिष्ठा जास्त होती असे म्हटले आहे.
याचा तोटा असा झाला की भारतीय विद्यार्थ्यांमध्ये "प्रयोगशीलता" किंवा "करून पाहण्याची वृत्ती" फारच कमी विकसित झाली. शिवाय अनेक धार्मिक/सामाजिक नियमांमुळे आणि प्रोत्साहनाअभावी बलुतेदारांनीही नवनवीन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला नाही. मुळात जातीमुळे विशिष्ट लोकांनीच विशिष्ट काम करायचे असे असल्याने स्पर्धा वगैरे फार भानगड नव्हती. त्यामुळे कष्ट करणारे लोक असले तरी त्यातून इनोव्हेशन कधी झाले नाही आणि झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळाली नाही.

भारताचा इतिहास केवळ ब्राह्मणी नाही. या देशाला एक स्वतंत्र व्यापारी इतिहासही आहे

याच्याशी सहमत. हाच इतिहास दाखवण्यासाठी ते बिर्लांच्या घराण्याचे आणि इतर लोकांचीही उदाहरणे पुस्तकात अनेकदा येतात. पण व्यापारी लोकांना ब्राह्मण वा क्षत्रियांइतकी प्रतिष्ठा नव्हती हा मुद्दा मलातरी पटतो.

असो. पुस्तकात जातिंवर एक प्रकरण असले तरी तो मुख्य मुद्दा नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम पुस्तक परिचय.

पुस्तक वाचायला हवे.

सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ननि,
तुला उगाच चिमटे काढत बसलोय, असा समज होऊ देऊ नकोस.

पण मला तुझ्या दोन विधानांत गंमतीशीर विसंगती जाणवते.
जर अंगमेहनतीला प्रतिष्ठा नसून बौद्धिक/अमूर्त विचार करण्याला प्रतिष्ठा असेल तर मग पुढचे 'याचा तोटा असा झाला की भारतीय विद्यार्थ्यांमध्ये "प्रयोगशीलता" किंवा "करून पाहण्याची वृत्ती" फारच कमी विकसित झाली.' हे विधान विसंगत ठरेल कारण प्रयोगशीलता किंवा करुन पाहण्याची वृत्ती हा बुद्धीचा खेळ आहे. नवी गोष्ट शोधून काढणे किंवा असलेल्या वस्तूचा विकास करणे,ही संशोधनाची पहिली पायरी बुद्धीच्याच जोरावर गाठता येते. अंगमेहनतीच्या नाही. आजही 'तुम्ही किती मेहनतीने काम करता (हार्डवर्क)यापेक्षा तुम्ही किती चतुराईने (स्मार्टवर्क) काम करता, यावर तुमचे यश ठरते.असो.भारतीयांनी बरीच प्रयोगशीलता दाखवली आहे आणि त्याची बरीच उदाहरणे आहेत. पण आपण आपला इतिहास अद्यापही आपल्याला गुलाम करणार्‍या जेत्यांच्या नजरेतून वाचत असल्याने आपला गैरसमज होतो. युरोपातील प्रबोधन युगाच्या कसोटीवर आपण आपला प्राचीन इतिहास तपासणे आणि 'कुठे होते इनोव्हेशन?' असा प्रश्न विचारणे अन्यायकारक ठरेल.

राजसत्ता अस्थिर असताना, सामाजिक संघर्ष असताना किंवा गुलामगिरीच्या काळातही आपल्याइथे प्रयोगशीलता होतीच. पण राजाश्रय आणि शांतता यांचे मोठे महत्त्व कल्पकतेला असते. बहिणाबाई चौधरी म्हणत 'माणूस उपाशीपोटी भांडण करतो आणि भरल्यापोटी विचार करतो.' हेच पूर्वी चाणक्याने उद्योजकतेबाबत सांगून ठेवले आहे. देशात/समाजात/मनात शांतता असेल तर नवे विचार/साहित्य/संशोधन फुलते.

दगडाचे चीरे विशिष्ट पद्धतीने खाचांत अडकवून एक सुंदर स्थापत्यशैली विकसित करणार्‍या किंवा हात न उचलता लिहिली जाणारी मोडी लिपी शोधणार्‍या हेमाडपंताला इनोव्हेटर मानायचे नाही का? भूल न देता शस्त्रक्रिया करणार्‍या,जगातील पहिले अवयवरोपण करणार्‍या सुश्रुताला इनोव्हेटर मानायचे नाही का? आपल्या संशोधकांची/विकसकांची ही परंपरा फार दीर्घ आहे. अगदी प्राचीन काळापासून आतापर्यंत चालत आलेली.

भारतीय अभिनवतेची खूप उदाहरणे माझ्याकडे आहेत. भारतीयांच्या (सबसेट - मराठी माणसाच्या) उद्योजकतेबद्दल मी गेली काही वर्षे अभ्यास करतो आहे. सध्या तरी मला इतके जाणवते आहे, की आपल्या उत्तम प्रयत्नांची माहिती गौरवाने पुढे मांडली जात नाहीय किंवा आपल्याच लोकांना ती जाणून घेण्यात रस नाहीय.
असो. सारांशाने एवढेच म्हणेन, की तुझे 'कष्ट करणारे लोक असले तरी त्यातून इनोव्हेशन कधी झाले नाही आणि झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळाली नाही' हे विधान अपुरे व चुकीची दिशा दाखवणारे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला उगाच चिमटे काढत बसलोय, असा समज होऊ देऊ नकोस.

अजिबात नाही. उलट हे मत खोटे ठरल्यास आनंदच होईल.

पुस्तकात दास यांनी Thinker आणि Tinkerer असे दोन शब्द वापरले आहेत. नवा विचार करायला बुद्धीची गरज असली तरी "करून पाहणे" यासाठी बुद्धी आणि कृतीची गरज असते आणि कृती म्हणजे फक्त अंगमेहनत नाही.
इथे बुद्धी असलेले आणि बुद्धीहीन ढोरमेहनत करणारे असा भेदभाव नसून सारखीच बुद्धी असलेले पण एक अमूर्त विचार करणारा आणि दुसरा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात कशा उतरतात ते 'करून पाहणारा' असे अभिप्रेत आहे.

भारतीयांमध्ये प्राचीन काळापासून इनोव्हेशन नव्हते असे श्री.दास यांना म्हणायचे असेल असे मला वाटत नाही. हजार-दोन हजार वर्षांपुर्वी भारत इतर जगाच्या कितीतरी पुढे होता हे सगळ्यांनाच माहित आहे. प्रश्न आहे की ही आघाडी टिकली का नाही?
सुश्रुत, हेमाडपंत हे इनोव्हेटर होतेच यात काहीच शंका नाही पण गेल्या काही शे वर्षांत त्या तोडीचे किती निघाले? उलट ज्ञानेश्वारादींच्या काळात तर अशी अवस्था होती की खालच्या जातींना ज्ञानप्राप्तीचा अधिकारही नव्हता, इनोव्हेशन तर दूरची गोष्ट आहे.
हे सगळंच खूप जुनं आहे आणि आधुनिक जगात काय परिस्थिती आहे यात मला जास्त रस आहे. सुश्रुत आणि हेमाडपंत यशस्वी झाले पण त्यानंतर काहीच का घडले नाही? निम्मे जग आदिवासी अवस्थेत असताना भारत समृद्ध होता आणि भारतात हे इनोव्हेटर्स होते तर मग पुढे काय झाले? इंग्रजांकडून बंदुका घ्यायची वेळ का आली? बरं आली तर आली, त्यांच्या बंदुका पाहून आपण त्या तयार करून पाहाव्या, त्यात सुधारणा करून आणखी प्राणघातक कराव्यात असे कोणालाच नाही वाटले? जपान्यांनी अमेरिकन टीव्हीचे इनोव्हेशन ढापून ते बनवण्याचे नवे तंत्र शोधून असे टीव्ही बनवले की अमेरिकन कलर टीव्ही समोर जपानी काळापांढरा टीव्ही विकला जायचा. तसे का नाही झाले?
अजूनही भारतात एखादी वस्तू तयार करायचे नवे तंत्र शोधले आहे असे किती वेळा ऐकू येते? जर्मन कार्स, जपानी टीव्ही, तैवानीज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने असे देश एकेका उत्पादनात प्रसिद्ध असताना भारताने कोणत्या वस्तूचे तंत्र सुधारून प्रगती केली?
बाकीचं जाऊ द्या, आयटी मध्ये बिल गेट्स, बिल जॉय, स्टीव्ह जॉब्ज वगैरे लोकांनी लहानपणी कॉम्प्युटर पाहताच त्याचा ध्यास घेतला आणि रात्रंदिवस त्यावर कित्येक प्रकारचे प्रयोग 'करून पाहिले'. किती भारतीय असं करतात? मी शिकत असताना कोणीतरी लिहिलेले प्रोग्रॅम्स जसेच्या तसे कॉपी करून वापरणारेच बहुसंख्य आढळले.
मराठी समाजात फाळकेंसारखे 'करून पाहणारे' लोक होऊन गेले. त्यांना आता प्रतिष्ठा मिळाली असली तरी तेव्हा किती मिळाली? चित्रपट निर्माण करण्याचा मोठा उद्योग भारतात असताना त्यातले कोणते नवे तंत्र भारतीयांनी शोधले? असे अनेक प्रश्न आहेत.भारतीय संस्कृती महान होती यात शंका नाही आणि लोकांमध्ये खूप क्षमता आहे यातही शंका नाही पण काही चुकीच्या संस्थांच्या प्रादुर्भावामुळे या क्षमता कित्येक शतके वापरल्या गेल्या नाहीत हे सत्य आहे आणि ते मान्य करण्यात मला तरी काहीच कमीपणा वाटत नाही.
सध्या परिस्थिती वेगळी असेल आणि बदलत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम पुस्तक परिचय. साविस्तर प्रतिसादाकरता जागा राखून ठेवत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वा छान परिचय
दुकानात पाहिलं होतं, पण 'इंडीया आफ्टर गांधी' (च्या यशा)नंतर स्वातंत्र्योत्तर इतिहासावरच्या पुस्तकांच्या लाटेतलं हे ही असेल असा समज होता.मात्र परिचय बघता माहितीपेक्षा सामाजिक परिणाम, चिकित्सा, आणि थोडं लाऊड थिंकिंग असम पुस्तकाचं स्वरूप असावंस वाटतंय
पुढल्या वेळी (पदरी इंडीया आफ्टर गांधी असूनही) दुकानात जरा तासभर पुस्तक चाळून बघितलं पाहिजे ही खूणगाठ बांधली आहे. Smile आवडल्यास घेईनच!

बाकी काहि मुद्यांवर जमल्यास सविस्तर लिहेन..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो.

हे वाचून या पुस्तकात तसा प्रयत्न असेल असं वाटून खूप आशा निर्माण झाल्या होत्या. कारण इतिहास हा कोणी कुठची युद्धं जिंकली आणि कोणी किती राज्य केलं असा राजवटींचा आणि सनावळ्यांचा असतो. समाजातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी अकबराने काय केलं, दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीने काय केलं याचे उल्लेख कुठे येत नाहीत. अर्थात अपुरी माहिती हा भाग आहेच. मात्र

author hangs the chronicle of great political and social events upon the thread of an individual's personal eperience

हे वाचून थोडा विरस झाला. कारण यात सामान्य माणसाच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अशाच काही ठळक घटना, काही आश्चर्यकारक किस्से यावर भर येईल असं वाटतं. अशी पुस्तकं अत्यंत वाचनीय व रंजक असतात, आणि लेखकाने मांडलेल्या विचाराशी वैयक्तिक इतिहासातल्या घटनांची जोड घालायला प्रवृत्त करतात. त्यामुळे एरवी जो वाचक आकडेवारीला कंटाळून लांब गेला असता तो रस घेऊन वाचतो आणि काहीतरी नवीन शिकतो. मात्र असं लेखन व्यक्तिनिष्ठ होण्याची शक्यता असते.

पुस्तकांतले निष्कर्ष सगळेच पचले नाहीत. उदाहरणार्थ

तोंडाने "गरिबी हटाव"ची घोषणा देणार्‍या सरकारने प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील याची पुरेपूर काळजी घेतली. शिवाय आणिबाणी सारख्या प्रसंगांना तोंड देऊन भारतीय लोकशाही एका प्राणविरहित बुजगावण्यासारखी शोभेची वस्तू बनली.

ही चमत्कृतीपूर्ण वाक्यं आहेत. पण स्वातंत्र्यानंतरच्या कुठच्याही काळात गरीबी वाढल्याचा कसलाही पुरावा नाही. वेळोवेळी ती कमीच झालेली आहे, किंवा होती तितकीच राहिलेली आहे.

सरकारने योग्यवेळीच काही कटू पण आवश्यक निर्णय घेतले नाहीत, नोकरशाहीतला आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार निपटण्यासाठी लोकांनी काही केलं नाही तर पुन्हा सुवर्णयुगात पोचण्याची भारताची ही संधी साधली जाईलच याची खात्री नाही.

कोणे एके काळी भारत सुवर्णयुगात होता यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.
हत्ती डुलत डुलत चाललेला आहे, यथावकाश पुढे पुढे जात राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र असं लेखन व्यक्तिनिष्ठ होण्याची शक्यता असते.

याच्याशी सहमत आहे. वाचकाने थोडे तारतम्य बाळगून तार्किकदृष्ट्या ते किती पटतंय ते पाहूनच स्वतः ठरवावे.

पण स्वातंत्र्यानंतरच्या कुठच्याही काळात गरीबी वाढल्याचा कसलाही पुरावा नाही. वेळोवेळी ती कमीच झालेली आहे, किंवा होती तितकीच राहिलेली आहे.

हे लिहीताना अर्थातच तुमच्याकडे गरिबी बद्दलचा विदा असणार याची खात्री आहे. परंतु माझी एक (कदाचित बालिश) शंका आहे, स्वातंत्र्यापुर्वी गरीब असलेल्या माणसाला गरिबीतून वर आणण्यासाठी करोडो रुपयांची सार्वजनिक संपत्ती खर्च करूनही त्याच्या गरिबीत फारसा फरक पडत नसेल तर तो खर्च कोणाच्या खात्यात टाकतात? त्या खर्चाने तो माणूस गरीबच होत नाही काय? उदाहर्णार्थ समजा मी गरीब आहे आणि देशाच्या एकूण साधनसंपत्तीमध्ये माझा वाटा समजा एक लाख रुपयांचा आहे, त्यापैकी १०० रुपये सरकारने एका हलवायाला दिले आणि सांगितले की बाबा याला पोटभर खाऊ घाल. ते शंभर रुपये घेऊन हलवायाने मला तीस रुपयांचेच जेवण दिले तर मी तीस रुपयांनी श्रीमंत झालो की सत्तर रुपयांनी गरीब? सगळे पैसे मला मिळाले असते तर मी ते गुंतवून आणखी मिळवले असते वगैरे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट बद्दल नको बोलायला.

कोणे एके काळी भारत सुवर्णयुगात होता यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.

ह्म्म. प्रगती मोजताना ती कशाच्या तरी तुलनेत मोजतात की नाही? मग तेव्हा सापेक्षता आणि सुवर्णयुग म्हटलं की लगेच अ‍ॅबसोल्यूट विचार ए ना चॉल्बे. दोष अर्थात माझा आहे की भारताचे सुवर्णयुग म्हणजे काय हे मी इथे स्पष्ट केले नाही. पुस्तकात अर्थातच त्याचे विवेचन आहे. सतराव्या शतकापर्यंत भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या २५% वगैरे होता.
"India is estimated to have had the largest economy of the ancient and medieval world between the 1st and 17th centuries AD, controlling between one third and one fourth of the world's wealth up to the time of the Marathas, from whence it rapidly declined during European rule."
"The annual revenues of Mogul emporor Aurangzeb (1659-1701) are said to have amounted to $450,000,000 more than ten times those of (his contemporary) Loius XIV."
"(Indian agriculture was) not in any way backward when compared with other contemporary societies including those of Western Europe" according to the historian Irfan Habib. Even the subsistennce-oriented peasant got a good return.
म्हणजे इतर जगाच्या तुलनेत भारत महासत्ता होता असे म्हणायला हरकत नाही. बाकी अ‍ॅबसोल्यूट सुवर्णयुगाचं म्हणायचं तर ते कधीच नव्हतं आणि कधीच येणार नाही (अगदी अमेरिकेतही). HDI च्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सुवर्णयुग साधारण दहा हजार वर्षांपुर्वीच संपलं.

हत्ती डुलत डुलत चाललेला आहे, यथावकाश पुढे पुढे जात राहील.

यात काय संशय? भांडवलवाद असो वा समाजवाद आणि लोकशाही असो वा ठोकशाही कोणत्याही वाटेने गेलो तरी सर्वसुखाचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा युटोपियन तलाव दिसणार नाहीय हे सगळ्यांनाच मनोमन माहित असते पण तो याच वाटेवर आहे असे सांगणे आवश्यक ठरते नाहीतर हत्ती पुढेच चालला आहे हे कसे ठरवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तेव्हा सापेक्षता आणि सुवर्णयुग म्हटलं की लगेच अ‍ॅबसोल्यूट विचार ए ना चॉल्बे.

हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. सुवर्णयुग हा शब्द फारसा विचार न करता दोन्ही प्रकारे वापरला जातो खरा. गुप्तकाळाला सुवर्णयुग म्हटलं जातं. ते त्या काळी सोन्याचा धूर निघत असे, रत्नं उघड्यावर विकली जात असत वगैरे वगैरे माहितीवरून. यात तो काहीसा ऍब्सोल्यूट पद्धतीने वापरला जातो. कदाचित त्या काळी भारत सर्वात श्रीमंत देश असल्याने येणाऱ्या प्रवाशांनी तो सापेक्षतेने वापरला असेल. सुवर्णयुग म्हणजे इतर देशांच्या मानाने बरी परिस्थिती अशा सापेक्ष अर्थाबाबत तक्रार नाहीच. पण वापरताना तसा साक्षेप रहात नाही.

कारण बहुतेक वेळी तो शब्द 'जुने ते सोने' 'गेले ते दिन गेले' या तक्रारीत आजच्या काळासाठी तुलना करण्यासाठी देखील वापरला जातो. आणि या वापरातून आजच्यापेक्षा ऍब्सोल्यूटली अधिक चांगला काळ एकेकाळी होता असा विश्वास मूळ धरतो.

मुघल साम्राज्याचं उत्पन्न प्रचंड होतं खरं. आकडेवारी औरंगजेबाची दिली आहे, पण त्याच्याच वडिलांच्या काळात (१६३०-३२) महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा २० ते ३० लाख लोक मेले. त्यावेळी सध्याच्या भारताची लोकसंख्या १४ कोटी होती, महाराष्ट्र व आसपासच्या भागात जिथे दुष्काळ पडला तिथे १.५ ते २ कोटी असावी. पंधरा वीस टक्के लोक अन्नान्न होऊन मरतात त्या काळाला सुवर्णयुग हा शब्द निश्चितच काळजीपूर्वक वापरावा लागतो.

शब्द मोजूनमापून वापरणं हे युक्तिवादांमध्ये फार कमी वेळा होताना दिसतं. उदाहरणार्थ

तोंडाने "गरिबी हटाव"ची घोषणा देणार्‍या सरकारने प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील याची पुरेपूर काळजी घेतली.

या वाक्यातून सरकारने गरीब लोक अधिक गरीब कसे होतील हे उद्दिष्ट ठेवून धोरणं राबवल्याचं चित्र उभं रहातं. साठ व सत्तरच्या दशकांत सुमारे चार टक्क्याची उत्पादनवाढ होत असताना ते चित्र निखालस चूक ठरतं.

...It wasn't until the 1970s when there was massive public investment in agriculture that India became free of famine...

मग प्रश्न असा निर्माण होतो की लेखकाने जे लिहिलं आहे ते खरोखर जनसामान्यांचं आयुष्य सुधारलं की नाही विचार करून की समाजवादी धोरणं अवलंबणाऱ्या अथवा विशिष्ट राजवटीच्या विरोधातून? इथे व्यक्तिनिष्ठतेच्या मर्यादा दिसतात.

आपला हत्ती शर्यतीत एके काळी इतरांच्या पुढे होता, आता तो मागे पडला आहे हे म्हणणं ठीक आहे. पण तो पुढेच गेला नाही किंवा प्रत्यक्षात मागेच गेला आहे असं म्हणणं बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर चर्चा....
विशेषतः
राजेशचे

हे वाचून या पुस्तकात तसा प्रयत्न असेल असं वाटून खूप आशा निर्माण झाल्या होत्या. कारण इतिहास हा कोणी कुठची युद्धं जिंकली आणि कोणी किती राज्य केलं असा राजवटींचा आणि सनावळ्यांचा असतो. समाजातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी अकबराने काय केलं, दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीने काय केलं याचे उल्लेख कुठे येत नाहीत.

व ननिंचे

यात काय संशय? भांडवलवाद असो वा समाजवाद आणि लोकशाही असो वा ठोकशाही कोणत्याही वाटेने गेलो तरी सर्वसुखाचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा युटोपियन तलाव दिसणार नाहीय हे सगळ्यांनाच मनोमन माहित असते पण तो याच वाटेवर आहे असे सांगणे आवश्यक ठरते नाहीतर हत्ती पुढेच चालला आहे हे कसे ठरवणार?

उद्धरणे मस्तच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कारण बहुतेक वेळी तो शब्द 'जुने ते सोने' 'गेले ते दिन गेले' या तक्रारीत आजच्या काळासाठी तुलना करण्यासाठी देखील वापरला जातो. आणि या वापरातून आजच्यापेक्षा ऍब्सोल्यूटली अधिक चांगला काळ एकेकाळी होता असा विश्वास मूळ धरतो.

सहमत आहे. मध्ययुगीन तथाकथित सुवर्णयुगापेक्षा आजची परिस्थिती निश्चितच चांगली आहे. म्हणूनच मी माझा दोष मान्य करतो की 'पुन्हा सुवर्णयुग' असे मी म्हटले. त्याऐवजी भारत महासत्ता होईल असे म्हणणे कदाचित तितकेसे चूक नसते ठरले. असो. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड.

शब्द मोजूनमापून वापरणं हे युक्तिवादांमध्ये फार कमी वेळा होताना दिसतं.

मान्य आहे.

या वाक्यातून सरकारने गरीब लोक अधिक गरीब कसे होतील हे उद्दिष्ट ठेवून धोरणं राबवल्याचं चित्र उभं रहातं. साठ व सत्तरच्या दशकांत सुमारे चार टक्क्याची उत्पादनवाढ होत असताना ते चित्र निखालस चूक ठरतं.

या बद्दल साशंक आहे. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट असा विचार कोणीच करत नाही. आणी चार टक्क्यांची उत्पादनवाढ ही सरकारी धोरणांमुळे होती की सरकारी धोरणे असूनही (because of की inspite of) हा वादाचा मुद्दा आहे.

मग प्रश्न असा निर्माण होतो की लेखकाने जे लिहिलं आहे ते खरोखर जनसामान्यांचं आयुष्य सुधारलं की नाही विचार करून की समाजवादी धोरणं अवलंबणाऱ्या अथवा विशिष्ट राजवटीच्या विरोधातून?

लेखक समाजवादी राजवटीच्या विरोधात असला तरी हरितक्रांती कशी झाली आणि लालबहादूर शास्त्रींनी थोडा खुलेपणा दिल्याने १९६६ साली उत्पादनवाढ ७% कशी झाली हेही सांगतो. केवळ राजवटीला विरोध म्हणून विरोध असे मला जाणवले नाही. माझ्या लेखातून असे प्रतीत होत असेल तर ती माझी मोठीच चूक म्हणायची. परंतु हरितक्रांती ही सरकार या संस्थेमुळे झाली की ती संस्था चालवणारा प्रमुख एक वेगळा विचार करणारा मनुष्य आला म्हणून झाली असा ही एक प्रश्न निर्माण होतो. आजकालचा महसुली धोरणातला अजागळपणा वगैरे पाहता भारतात संस्थात्मक दृष्ट्या अगदी पद्धतशीरपणे काही होत नसून बर्‍याचदा संस्था चालवणार्‍या व्यक्तीवर संस्थेची कामगिरी अवलंबून असते असा निष्कर्ष निघणे अवघड नाही. शिवाय समाजवादी राजवटीपेक्षा खुल्या भांडवलशाही राजवटीत जास्त प्रगती झाली असती असे लेखकाचे मत आहे आणि त्याच्या समर्थनार्थ त्याने मते मांडली आहेत. हरितक्रांती भांडवली राजवटीतही झाली असती असे म्हटले तरी ते सिद्ध करणे शक्य नाही म्हणून ते एक व्यक्तिगत मत वाटते, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यापारी लोकांना सरकारचा हस्तक्षेप नको असं वाटत राहणार.
पण व्यापारी नफेखोरीसाठी वाट्टेल ते करतो.
त्याचं तत्बज्ञान करून करून किती करणार?
हे दासमहाशय एकेकाळी 'सकाळ'मध्ये तेच तेच आळवून जाम बोर करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

व्यापारी लोक स्वतःचा फायदा बघणारच. ते स्वतःचा वाजवीच फायदा करून घेताहेत की नाही हे पाहण्याचे काम सरकारचे आहे, स्वतः व्यापार करण्याचे नाही. (अर्थात महत्वाची क्षेत्रे सरकारने ताब्यात ठेवायला कोणाचीच ना नाही.)
व्यापारी नफेखोरी करतात म्हणून व्यापारावरच बंदी घालणे म्हणजे जास्त खाल्ल्याने जाडी वाढते म्हणून स्वयंपाकच न करण्यासारखे नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम पुस्तक परिचय.

खतांच्या कारखान्याबद्दल वाचून 'येस मिनिस्टर' मालिकेतला हा भाग आठवला:
http://www.youtube.com/watch?v=Eyf97LAjjcY

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिप्राय आणि दुवा याबद्दल धन्यवाद.
आणि पाहा लोक म्हणतात भारतीयांना विनोदबुद्धी नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचय आवडला. परिचयात दिलेल्या मुद्द्यांमुळे पुस्तक वाचायला आवडेल असे वाटते.

पूस्तक वाचल्याशिवाय परिचयातील मुद्द्यांवर चर्चा करणे अंधारातून बोलिंग करणार्‍या गोलंदाजीवर बॅटिंग करण्यासारखे होईल. पण तरी सुद्धा...

(उच्च)वर्णीय संस्कृतीचा भारतीय मानसिकतेवर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या प्रगतीच्या वेगावर त्याचा परिणाम महत्त्वाचा असेल हा निष्कर्ष पटत नाही.

अनेक वर्षांचे पारतंत्र्य, "भोगविलासाला" असलेला वैचारिक विरोध, १९-२० व्या 'शतकाच्या' मानाने मागास असलेला समाज अशी अनेक कारणं यामागे आहेत. मुळात सद्ध्याची विकासाची व्याख्याच पाश्चिमात्य आहे. आज भारताचा होणारा विकास इंडस्ट्रीयल विकास आहे. इंग्रजांनी रेल्वे इ. विकास केला हे जरी खरे असले तर स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय जनतेला, पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत, अद्द्ययावर शैक्षणिक सुविधाच उपलब्ध नव्हत्या. अशा वेळी इनोव्हेशन होणे फार अवघड गोष्ट आहे.

६० च्या जशकात जेव्हा जगात मायक्रोफॅब्रिकेशनवर संशोधन होत होते (There's Plenty of Room at the Bottom , Moore's law) तेव्हा भारतात काय सुविधा होत्या? युरोप, रशिया आणि अमेरिकेत आवाजाच्या वेगापेक्षा कित्येकपटीने वेगात जाणारी विमानं जेव्हा बनवली जात होती (Bell X-1 त्यावेळी भारतात मात्र इंग्रजांनी सुरु केलेल्या कॉलेजातून मोटरमन, फिटर इत्यादी 'इंजीनिअर्स' बाहेर पडत होते. विकसीत जगात अणू बाँब बनवले जात असाताना भारतात लोक बी. एस्सी, बी. कॉम आणि बी. ई होऊ लागले होते.

भ्रष्टाचाराच्या मुद्यांबाबत सहमत. (खतांच्या कारखान्याच्या उदाहरणाला समांतर असे आजचे उदाहरण म्हणजे जीटीआरई. http://drdo.gov.in/drdo/labs/GTRE/English/index.jsp?pg=homebody.jsp&labh... . कित्येक वर्षे जाऊनही विमानाचे हवे तसे इंजिन अजूनही बनविण्यात आपल्याला यश आलेले नाही.) अशा सर्व परिस्थितीत भारताची प्रगती बर्‍याच वेगाने झाली असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रतिसादात काही गोष्टींचे सरसकटीकरण झालेले दिसते.
बहरताची १९९१ पूर्वीचे कथा सांगायचीच झाली, त्यातही त्म्त्रज्ञानाबाबतीत तर एक निश्चित की उच्च तंत्रज्ञानात आपण काही जागतिक सरासरीच्य्या फार मागे नव्हतो. निम्न तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मात्र आपण अजूनही धड उभे राहू शकलेलो नाही.

उच्च तंत्रज्ञान (high end technology) :-
आण्विक शक्ती, सॅटेलाइट/उपग्रह प्रोग्राम्स,वैद्यकीय सुविधा आणि नाविन्य अजूनही बरेच, सध्या आठवत नाही.
देशाच्या अस्मितेसाठी हे नेहमीच महत्वाचे असते,भारतही कित्येक काळ ह्यातील उपलब्धी मिरवीत होताच.

निम्न तंत्रज्ञान (lower end technologies) :-
इंडस्ट्रलाय्झेशन होणे. म्हटले तर ह्यात मोठे असे काही नाही, पण ह्यात प्रचंद प्रमानात रोजगार निर्माण करायची क्षमता
आहे, उच्च त्म्त्रज्ञात मात्र मोठ्या लोकसमूहास रोजगार दिला जात नाही. साधी सुई,नेलकटर,कात्री,चश्मे,टीव्ही,रेडिओ
(इलेक्ट्रोनिक उपकरणे) ह्या सर्वाचे उत्पादन ह्यात येते. हे करण्यात आपण फारच मागे पडलो. एशियन टायगर्स,
मिरॅकल इकॉनिमिज् (द कोरिया, तैवान्,सिंगापूर व बहुदा हाँगकाँग) ह्यांनी व जपानने १९९१ पूर्वी ह्यात बरीच बाजी
मारली होती. आज चीनने घेतलेली भरारी दिसते आहे.

असे होण्याचे संभाव्य कारणः-
निम्न तंत्रज्ञासाठी भक्कम अशा पायाभूत सुविधा लागतात, नुसती वैयक्तिक उच्च बुद्धीमत्ता व चिकाटी असणे ह्यात पुरेसे नाही. बहुसंख्य जनतेला जेव्हा रस्ते-वीज्-पाणी वाहतूक व्यवस्था असते, व मध्यमदर्जाचे, उत्पादनक्षम शिक्षण उपलब्ध असते, तेव्हा निम्न तंत्रज्ञान(lower end technology) व पर्यायाने इंडस्ट्रलायझेशन वाढते, रोजगार वाढतो.
उच्च त्म्त्रज्ञानासाठी अत्युच्च बुद्धीमत्ता व कमालीची जिद्द, चिकाटी असनारी काही मोजकीच माणसे असलेले पुरते. ह्यांच्यासाठी भारतभर पायाभूत सुविधांचे जाळे उभारायची गरज नसते.फक्त त्यांच्या प्लांटपुरती व्यवस्था पाहिली, की काम झाले. भारतात ह्या टॅलंटची कमतरत वगैरे कधीच नव्हती. अगदि रामानुजम, सी व्ही रामन, होमी भाभा वगैरेंपासून, गोवारीकर,माशेलकर अशी शेकडो मंडळी आहेत.

वेगळ्या भाषेत सांगायचे तर आजही भारत काही इलेक्ट्रोनिक वस्तूंचा निर्यातदार सोडाच, आघाडीचा उत्पादकही नाही, १९९०च्या दशकात तर विचारूच नका. पण तेव्हाही हातपाय मारुन लोकांनी(विजय भटकर वगैरे, बहुदा नारळीकरही) आपल्याकडे परम् हा जागतिक दर्जाचा महासंगणक बनवलाच. म्हणजेच, mass prodution नाही, वैयक्तिक क्षमता प्रचंड ही भारताची बोंब आहे. भविष्यातही ह्या व इतर गोष्टींत समन्व्य नसल्याने आपण चीएनकडून पुन्हा जबरदस्त मार खायच्या मार्गावर जातोय. असो, ते अवांतर होइल. इथेच थांबतो.

वरील सर्व बाबींमुळेच
विकसीत जगात अणू बाँब बनवले जात असाताना भारतात लोक बी. एस्सी, बी. कॉम आणि बी. ई होऊ लागले होते.
ह्याअच्याशी सहमत नाही.उलट उर्वरित जग अणुबाँब बनवत होते, त्याच्याच आसपास आपनही बनवत होतो. पण उलट उर्वरित जग उत्त्म इंजिनीरिंगवर कष्ट घेत होते, तेव्हा आपण किरकोळ कामावर समाधानी होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणत्या काळाच्या गोष्टी करताय? लेखातील काळ, माझ्या प्रतिसादातील काळ आणि तुमच्या प्रतिसादातील काळ याच संबंध आहे का?

उलट उर्वरित जग अणुबाँब बनवत होते, त्याच्याच आसपास आपनही बनवत होतो.

उर्वरीत जगाबद्दल कोण बोलतंय? मी विकसीत जगाबद्दल बोलतोय. तुलना इतर भारतापेक्षा मागसलेल्या देशांशी नाही.

आण्विक शक्ती, सॅटेलाइट/उपग्रह प्रोग्राम्स,वैद्यकीय सुविधा आणि नाविन्य अजूनही बरेच, सध्या आठवत नाही.
देशाच्या अस्मितेसाठी हे नेहमीच महत्वाचे असते,भारतही कित्येक काळ ह्यातील उपलब्धी मिरवीत होताच.

हं? हे केव्हा? भारताचा न्युक्लिअर प्रोग्राम सुरु झाला आणी हिरोशिमावर अणुबाँब पडला यामध्ये किती फरक आहे हे पहावे.
भारताचा सॅटेलाईट प्रोग्राम ६२ मध्ये सुरु झाला आणि पहिला एसएलव्ही ८०च्या सुमारास लाँच झाला. (अमेरीकेची चांद्रमोहिम ६० मध्ये सुरु झाली, रशियाचा स्पुटनिक ५७ मध्ये ऑर्बिट मध्ये गेला) तांत्रिक बाबींमध्ये जायची इच्छा नाही.

आण्विक आणि सॅटेलाईटमध्ये भारताने चांगली प्रगती केली हे खरे आहे. विक्रम साराभाई, होमी भाभा सारख्यांनी भारतीय शास्त्रज्ञांना परदेशातून परत आणण्याचे बरेच प्रयत्न केले. माशेलकर, गोवारीकर त्यामधलेच.

उच्च त्म्त्रज्ञानासाठी अत्युच्च बुद्धीमत्ता व कमालीची जिद्द, चिकाटी असनारी काही मोजकीच माणसे असलेले पुरते. ह्यांच्यासाठी भारतभर पायाभूत सुविधांचे जाळे उभारायची गरज नसते.फक्त त्यांच्या प्लांटपुरती व्यवस्था पाहिली, की काम झाले.

हे वाक्य फार्फार विनोदी आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

(उच्च)वर्णीय संस्कृतीचा भारतीय मानसिकतेवर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या प्रगतीच्या वेगावर त्याचा परिणाम महत्त्वाचा असेल हा निष्कर्ष पटत नाही.

वर्णीय व्यवस्थेचा परिणाम हा अनेक घटकांपैकी एक म्हणून मांडला आहे असे मला वाटते. केवळ जातच नव्हे तर एकूणच cultural conditioning असा एक मोठा घटक नक्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>१९७९ नंतर २३ वर्षे हा कारखाना चालूच रहिला. लोक कामावर येत राहिले, त्यांना पगार मिळत राहिला, ते निवृत्त होत राहिले, यंत्रसामुग्रीची नियमित दुरुस्ती आणि देखभाल होत राहिली आणि ती टाऊनशिपही गजबजलेली राहिली फक्त एक गोष्ट झाली नाही आणि ती म्हणजे उत्पादन. २३ वर्षात या कारखान्याने एक किलोसुद्धा खत तयार केले नाही. (पंधराशे कोटी रुपयांचा फुकटचा खर्च सोसून आणि पंधराशे लोकांना काहीही काम न करता पगार आणि सुखसोयी देऊन

रोजगार उत्पन्न होत असेल तर वेस्टफुल खर्च बिनदिक्कत करणे हे बहुधा भांडवलशाहीचे लक्षण आहे. उदाहरणार्थ आयपीएल किंवा तत्सम बाबींवर अफाट खर्च होतो त्याचे समर्थन असेच केले जाते.

आता येथे कामगारांना काम न करता पगार मिळत असेल तर ते बाजारात खर्च करीत असतील त्यामुळे त्या टाउनशिपमध्ये अनेक व्यापारी, दुकानदार, कारागीर यांना रोजगार मिळत असेल. यालाच बहुधा ट्रिकल डाऊन म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यालाच बहुधा ट्रिकल डाऊन म्हणतात.

बरोबर आहे. पण फक्त सरकारी ट्रिकल डाऊन पुरेसा नाही हेच तर आपण पुस्तक वाचून शिकतो. या सरकारी ट्रिकल डाऊनपायी काळ्या पैशाची मोठी समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते आणि शेकडो लिटर पाणी ओतले तरी खाली करंगळीएवढी सुद्धा धार ट्रिकल होत नाही हे आपण पाहिलेच आहे.
आयपीएल सारख्या कंपन्यांकडून कचकावून कर वसूल करायचा सोडून मनोरंजन करात सूट देणे हा भ्रष्टाचार एकीकडे करायचा आणि दुसरीकडे हे असले कारखान्यांचे अनुत्पादक उद्योग करायचे हे चुकीचे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पुस्तकाची ओळख सगळ्यांना करून दिल्याबद्द्ल धन्यवाद.
हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि फारच आवडलंही होतं.
माझ्या लहानपणी टी व्ही (दूरदर्शन) वर पाहिलेल्या "गॅट करार", "देश सोने की चिडिया है फिरसे बना.." वगैरेंचा
अर्थ हे पुस्तक वाचल्यावर लागला.

तुम्ही (इथे जे लिहिलयत त्यावरून) "एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्रॉट" (लेखक पी. साईनाथ) या पुस्तकाची छान शब्दांत
ओळख करून देऊ शकाल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऋता. पी. साईनाथांचं ते पुस्तक केव्हाचं वाचायचं आहे. कधी मुहूर्त लागतोय कोण जाणे?
तुम्हीच लिहा की त्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पी साईनाथ यांच्या या पुस्तकाचे मराठी भाषांतर म्हणजे "दुष्काळ आवडे सर्वांना" त्या पुस्तकाबद्दल येथे वाचता येईल :
http://muktasunit.blogspot.com/2010/04/blog-post.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पुस्तक परिचय खूप आवडला. आता वाचलंच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ओळख. वरील ननि अन योगप्रभु यांची चर्चा आवडली. इतरही रोचक प्रतिसाद आहेतच.

मला फारसं कळत नाही पण आजही सगळ्या बाबी लक्षात घेउनही प्रगतीच्या बाबतीत चीनच बाजी मारु शकतो असं वाटतं. चीनमधे इन्फ्रास्ट्र्क्चर चांगल्या दर्जाचं आहे अन अगदी खेड्यापाड्यातही चांगल्या सुविधा आहेत असं ऐकुन आहे. चायनीज वस्तुंनी बाजारपेठा भरलेल्या आहेत, अगदी भारताच्या सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. चीनमध्ये दडपशाही खूप आहे असे ऐकले आहे. एकवेळ आर्थिक प्रगती नसली तर चालेल पण स्वातंत्र्य पाहिजेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकपरिचय आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा आवडली.

'टाईम्स ऑफ इंडिया'चे टॅब्लॉईड ऑफ इंडिया होण्यापूर्वी त्यात गुरचरण दास यांचे सोप्या इंग्रजीतले एक अर्थविषयक सदर येत असे. तुम्ही परीक्षणात म्हटले आहे तशी साध्या, रंजक घटनांतून आणि मार्मिक टिप्पण्यांतून लिहिलेले ते सदर वाचताना मजा यायची. प्रस्तुत पुस्तकही काही वर्षांपूर्वी वाचण्याचा योग आला होता, आणि ते आवडलेही होते.

थोडे अवांतर -
हे थोडे 'लाऊड थिंकिंग' आहे. पुस्तक वाचताना, त्यात मांडलेला एखादा वेगळा मुद्दा आपल्या ध्यानी यावा आणि काहीतरी पठडीबाहेरचं वाचल्याची जाणीव व्हावी, अशा 'आहा! मोमेंट्स' या पुस्तकात नक्कीच आहेत. बर्‍याचदा प्रश्नाचे मूळ आणि निरसन या संदर्भात. तीच गत 'गन्स, जर्म्स अँड स्टील'ची आणि काही प्रमाणात 'इंडिया आफ्टर गांधी'/'अ पीपल्स हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स'ची. ही पुस्तकं किंचित 'इन्फोटेनमेंट'कडे झुकतात असं कधी कधी वाटून जातं.

ही पुस्तकं जेव्हा वाचली, तेव्हा कुठेही कंटाळा आला नाही. वाचण्याच्या ओघात, वेगळ्या विचारांनी थोडं भारावून जाऊन ती वाचून झाली. मात्र काही महिन्यांनी विचार केला तर या यादीतल्या बर्‍याचशा पुस्तकांचं सार दहा मिनिटांत सांगून होण्यासारखं आहे, असं वाटतं. 'इंडिया आफ्टर गांधी'चा विषय परिचित असल्यामुळे आणि जेअर्ड डायमंडच्या पुस्तकातल्या मुद्द्यांचा - मग ते कितीही अभिनव, क्रांतिकारक असोत - सोदाहरण, सविस्तर खुलासा केल्यामुळे; हे थोडं अधिकच जाणवतं.

इथे हे स्पष्ट करायला हवं, की वाचन ही गुंतवणूक आहे आणि त्यातून नियमित दराने परतावा मिळायला हवा - ह्या धारणेतून हे लिहिलेलं नाही. (शिवाय कृपया याचा अर्थ कादंबर्‍या किंवा ललित असं हलकंफुलकंच वाचा; असा घेऊ नये). ही पुस्तकं वाचताना वेळ वाया गेला किंवा याऐवजी पुस्तकाची 'विकी'वर माहिती वाचून भागलं असतं, असंही म्हणायचं नाही. अधिकाधिक लोकांनी इतिहास, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र ह्यासारख्या शास्त्रांबद्दल वाचावं हा हेतू जर साध्य करायचा असेल; तर ते लेखन बोजड न वाटता, रंजक शैलीत लिहायला हवं हे उघड आहे - आणि त्या आवश्यक रंजनाची मर्यादाही पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहे; हेही मान्य. मात्र तरीही नॉन-फिक्शन प्रकारातल्या पुस्तकांना उपयुक्ततेचा थोडा अधिक कठोर निकष लावायला हवा का, असा प्रश्न कधी कधी ही पुस्तकं वाचताना - खरं तर, वाचून झाल्यानंतर काही काळाने - पडतो. [अर्थात यातही 'जी.इ.बी.' सारखे काही अपवाद आहेत.] ललितेतर स्वरूपाचं लेखन फारसं न वाचल्यामुळे, कदाचित हे प्रश्न 'टीथिंग पेन' सारखे असावेत :). त्यांच्याबद्दल इतरांचं मत जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ही पुस्तकं किंचित 'इन्फोटेनमेंट'कडे झुकतात असं कधी कधी वाटून जातं.<<

अगदी सहमत. अशा पुस्तकाच्या लेखकांना विचारवंत हा शब्द खूप स्वस्त झाल्यासारखा वापरला जातो ते पाहून अधिकच त्रास होतो.

>>नॉन-फिक्शन प्रकारातल्या पुस्तकांना उपयुक्ततेचा थोडा अधिक कठोर निकष लावायला हवा का, असा प्रश्न पडतो.<<

याबाबत मात्र मला असं काहीसं वर्गीकरण करावंसं वाटतं -

  • सर्वत्र उपलब्ध माहितीचंच किरकोळ संकलन करून सर्वत्र उपलब्ध असणाराच परिप्रेक्ष्य देणारी पुस्तकं
  • इतरत्र उपलब्ध माहितीचंच थोडं वेगळं संकलन करून थोडा वेगळा परिप्रेक्ष्य देणारी पुस्तकं
  • सहसा लोकांना सहज उपलब्ध नसणार्‍या माहितीचं अनोखं संकलन करून अकल्पित परिप्रेक्ष्य देणारी पुस्तकं
  • नवीन माहिती आणि अकल्पित परिप्रेक्ष्य देणारी पुस्तकं

यात कदाचित आणखी काही पोटवर्ग असू शकतील. असं वर्गीकरण करण्यासाठी कोणती माहिती किती सहज उपलब्ध आणि कोणता परिप्रेक्ष्य किती वेगळा याची पातळी सुरुवातीला खूपशी व्यक्तिसापेक्षदेखील असेल. आणि तरीही हे लक्षात येतं की या वर्गवारीतल्या पहिल्या प्रकारची पुस्तकं पुष्कळ असतात, पण वर्गवारीत खाली जावं तशी ही संख्या कमी होत जाते. हे निकष नियमितपणे अनेक पुस्तकांना लावत गेलं तर ह्ळूहळू असं लक्षात येऊ लागतं की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींनी विचार मांडणारे पुष्कळ नवनवे (म्हणजे आधीपासून अस्तित्वात असणारे, पण आपल्याला नवे) स्रोत सापडत गेले. मग एखाद्या पुस्तकानं पटकन भारावून जायला होत नाही; आणि तरीही ज्यांचा परीघ अधिक बंदिस्त आहे अशांसाठी काही पुस्तकांची उपयुक्तता मात्र जाणवते. मग बाळबोध भाबडेपणा आणि टोकाचा कडवट तुच्छतावाद यांच्यापेक्षा एक सम्यक उदारमतवादी दृष्टिकोन घेऊन अशा पुस्तकांचं मूल्यमापन करता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||