दोघांच्या गोष्टी - अनोळखी

त्याने कचकन ब्रेक दाबला. आवाज करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. थंड नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला "खाली उतर". तिला क्षणभर काही उमजेना. तडक बाहेर पडून त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला, तिला दंडाला धरून बाहेर खेचलं आणि म्हणाला "चल नीघ माझ्या गाडीतून .. ". काही कळायच्या आत तिच्या नजरेसमोरून त्याची गाडी निघूनही गेली. अंगावर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी ती भानावर आली तेव्हा तिला जाणवलं कि तो निघून गेलाय.

टपोरे थेंब. आता हे असेच भुरभुरत राहणार. या शहरातला पाऊस हा असाच. ठिबक सिंचनसारखा. तिला कठीण जायचं सुरुवातीला. सलग दहा मिनिटं झड लागल्यागत कोसळणाऱ्या पावसाची सवय तिला. कळायचंच नाही तिला या अशा पावसात बाहेर पडायचं कि नाही, छत्री उघडायची कि नाही, बाजूला थांबायचं की चालत राहायचं. असला पाऊस सोप्पा केला तो त्यानेच. पहिला पाऊस आला की त्याचा फोन यायचा. "खाली येऊन उभी राहा". दहाव्या मिनिटाला ती त्याच्या कारमध्ये बसायची. ५ मिनिटं ड्राईव्ह केल्यावर गाडी मेनरोडच्या कडेला थांबायची. तिथून आत वीस पावलांवर "अमृततुल्य".
त्याचं सगळं असंच. वेळ अवेळ काही पाहणार नाही. मनात आलं कि भेटायला हजर. त्याचा तो मनस्वीपणाच फार आवडायचा तिला तेव्हा. ती वाफाळणारा चहा प्यायची, तो सिगरेट प्यायचा आणि त्यांना बघत पाऊस ५ मिनिटं जास्तच भरभुरायचा. एकदा ती त्याला बोलली, "सिगरेट नको पीत जाऊस", ते ऐकून त्याने सिगरेट खाली फेकली आणि अशी काही चिरडली की पुन्हा त्या विषयावर त्यांचं बोलणं झालं नाही. पावसासोबत काय काय आठवेल कसला नेम नाही.
विचार करता करता क्षणभर तिने आजूबाजूला नजर फिरवली. या शहरात तिने आयुष्याची चार वर्षं काढली होती. त्या दोघांचं आवडतं ठिकाण तिथून जवळंच होतं. शांतपणे पावलं टाकत ती त्या दिशेनं निघाली.

त्याने गाडी भरधाव सोडली. तिचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. घुमणाऱ्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हाताची पकड स्टिअरिंगवर आणखी घट्ट होत होती. वेग वाढत होता. इतक्यात समोरून येणाऱ्या गाडीचे हेडलाईट्स त्याच्या डोळ्यांना कापत गेले. त्याने झटकन स्टिअरिंग डावीकडे फिरवलं. करकचून ब्रेक दाबला. कर्कश्श आवाज करत त्याची गाडी बाजूला जाऊन थांबली. त्याने झटकन बाजूला पाहिलं. त्याला आवर घालणारी ती बाजूला नव्हती. कपाळावर जमा झालेल्या घामाच्या थेंबांनी त्याला भानावर आणलं. समोरच्या खोक्यातून टिशू काढून त्याने घाम पुसला. आपण भर रस्त्यात तिला एकटं सोडून आलोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने गाडी फिरवली. मोबाईल पाहिला. तिचा फोन नाही, मेसेजही नाही. तिचे शब्द त्याला आठवले. आताशा तो बराच शांत झालेला. त्याने गाडी बंद केली. सिगरेट पेटवली. "येईलच तिचा फोन." म्हणत दोन लांबलचक झुरके घेतले. झक मारत २०० किलोमीटर आलो आपण असं त्याला वाटून गेलं.

हा विषय आज संपायला हवाय कायमचा. तिच्या डोक्यात विचार घुमू लागले तशी तिची चाल वेगावली. त्याने ठरवायलाच हवंय. त्याला काय हवंय, कधी हवंय, कसं हवंय. बाबा म्हणायचे तसं ,आयुष्याचं टाईमटेबल रेडी पाहिजे डोक्यात. काय चूक आहे आयुष्य प्लॅन करण्यात. पूर्वी तर मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीचंही प्लॅनिन्ग करायचे, आयुष्य तर नक्कीच त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हे पण करतो , ते पण करतो, तसं पण करून बघतो , असं कसं चालेल.त्याची हीच गोष्ट कदाचित तिला गेल्या काही महिन्यांपासून खुपत होती. वेळच्या वेळी त्याला सेटल व्हायलाच लागेल. गेल्या चार वर्षांत इतका चाकोरीबद्ध विचार तिने पहिल्यांदाच केला असेल. असं नक्की काय घडलंय कि ज्यामुळे आपण इतकं सरधोपट विचार करायला लागलोय हे तिलाही उमगत नव्हतं. कदाचित, बऱ्याच वर्षांनी तिचं upbringing तिच्या विचारांतून डोकावत होतं.

आपलं upbringing different आहे. मग ही अक्कल चार वर्षांपूर्वी नव्हती का हिला. तेव्हा तर तिला सगळं छान वाटायचं. पासआऊट झाल्यावर मला भारत फिरायचाय हे ऐकून सगळ्यात जास्त तीच एक्साईट झाली होती. अचानक हे सेटल व्हायला हवंय, नोकरी करायला हवीय हे सगळं कुठून आलं. प्रत्येक वेळेस भेटलं कि हाच विषय. मग सगळी चर्चा upbringing, lifestyle वर यायची. माझ्या आयुष्याची "to do" list नाहीये आणि तशी लिस्ट न बनवताही जगता येऊ शकतं हे हजारदा सांगूनही तिला पटायचं नाही. वाटायचंच नाही की काही वर्षांपूर्वी याच आयुष्यावर ती फिदा झाली होती. विचारांच्या तंद्रीत त्याने गाडी त्यांच्या आवडीच्या कॉफी शॉप कडे वळवली.

ती तिथे असणार हे नक्की माहीत होतं त्याला. समोरासमोर बसले दोघं. आपापल्या परीने आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागले. कदाचित दोघांना एकत्रच उत्तरं मिळाली असावीत.
ती त्याला म्हणाली, "I am sorry. Sometimes, you can’t marry your love, you have to find husband”.
तो तिला म्हणाला, "Sometimes, it is better to be wanderer than to settle down for love" आणि मग अनोळखी होऊन ते दोघे कॉफी शॉपच्या बाहेर पडले.

-अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0