कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १)

कीला ह्या माझ्या अत्यंत आवडत्या मद्याची आणि माझी 'तोंड'ओळख फारच अनपेक्षितरीत्या झाली. 2000 साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो असताना जुन्या मित्रांचा न्यू जर्सी येथे गेट टुगेदरचा बेत ठरला. त्यातल्या एका मित्राला मायक्रो-सॉफ्ट मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याबद्दल त्याने 'रेड लॉबस्टर' ह्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्हा सर्वांना पार्टी दिली. तिथेच मला टकीला भेटली Smile

त्या मित्राने जेवणाच्या ऑर्डरीबरोबरच मार्गारीटा कॉकटेलही मागवले होते. त्या कॉकटेल ग्लासबरोबर एक छोटा ग्लासपण सर्व्ह केला गेला होता. (त्याला शॉट ग्लास म्हणतात हे तेव्हा माहिती नव्हते) त्यात सोनेरी रंगाचे द्रव्य होते. आमच्याबरोबर असणार्‍या कोणाच्याही मागच्या सात पिढ्यांमधील कोणीही 'रेड लॉबस्टर' मध्ये जाऊन काहीही ऑर्डर करण्याची सुतराम म्हणतात तसली शक्यता नसल्याने त्या छोट्याश्या ग्लासात काय आहे हे कोणालाही माहिती नव्हते आणि कळलेही नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच जण, पु.लं. आणि त्यांचे मित्र मॉन्जीनीमध्ये गेल्यावर जसे बावचळून गेले होते, डिक्टो तसेच बावचळून गेलो होतो. त्या ग्लासात काय आहे आणि त्याचे काय करायचे ह्या टेन्शनमुळे समोरचा चवदार लॉबस्टरही गोड लागेना. त्यात ऑर्डर घ्यायला आणि सर्व्ह करायला होत्या अमेरिकन ललना, त्यामुळे आम्ही सर्वच जण आणखीनंच संकोचलो होतो. पण देवदयेने समोर मादक 'शराब'च्या जोडीने 'शबाब'ही असताना तसेच बावचळून जाणे आणि तसेच बसून राहणे मनाला काही केल्या पटेना. मग मीच जरा धाडस करून आमच्या वेट्रेसला (आमच्या म्हणजे आमच्या टेबलच्या) बोलावून त्या छोट्या ग्लासात काय आहे ते विचारले.

ती एक टीन एजरच होती. एकदम फसफसणार्‍या उत्साहात तिने सांगितले 'शुअर सर, इट्स टकीला'. ऑ, मी आणि सर? एक मित्र बोललाही 'च्यायला तुझा बाप शाळेत सर होता ना रे, तुला का सर म्हणतेय ती?' तोही मुंढेवाडी बुद्रुक सोडून पहिल्यांदाच गावाबाहेर आला असल्यामुळे त्याच्या त्या तिरकस बोलण्याला त्याचे अज्ञान समजून मी तिकडे दुर्लक्ष केले. आता त्या ग्लासात टकीला आहे हे तर कळले होते पण त्या छोट्या ग्लासात ती टकीला द्यायचे प्रयोजन काही केल्या कळेना. त्यांत पुन्हा ते सर म्हटल्यामुळे आता एक प्रचंड गोची झाली होती, त्या टकीलाचे काय करायचे ते विचारायचे कसे? एका हायस्कूलच्या सरांचा मुलगा असल्याने 'सरांना सर्व काही माहिती असते किंबहुना तसा आव आणायचा असतो' हे मला चांगलेच माहिती होते. मी तसा आव आणायचा प्रयत्न केलाही पण एकंदरीतच आमच्या भंजाळलेल्या अवतारावरून आम्ही सर्वजण कुठल्यातरी 'बुद्रुक' गावावरून आलो आहोत हे तिला बहुदा कळले असावे. 'एनी हेल्प,सर?' असे ती विचारती झाले. मग मात्र मी सर्व लाज सोडून त्या छोट्या ग्लासात दिलेल्या टकीलाचे काय करायचे ते तिला विचारून मोकळा झालो. तिने हसून 'शुअर सर' म्हणून त्या छोट्या ग्लासातली टकीला मार्गारीटामध्ये टाकून ते कॉकटेल अजून स्ट्रॉन्ग करू शकतो असे सांगितले. तसे करायचे नसल्यास नुसताच शॉट घ्यायचा असे ज्ञान वाढवले. नुसताच शॉट घ्यायचा हे तोपर्यंत बियर (तीही सुरुवातीला सोडामिक्स) पिणार्‍या मला काही झेपलेच नाही. 'नुसताच शॉट घ्यायचा म्हणजे कसे?' हे तिला विचारले. तिच्या मधाळ हसून बोलण्यामुळे नाही म्हटले तरी आता माझीही भीड जरा चेपली होतीच. Smile तिने लगेच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करून टाकला आणि परत एकदा मधाळ हसत म्हणाली 'असे!' मग तिला थॅन्क्स म्हणाल्यावर ती निघून गेली.

ती गेल्यावर मग सर्वांनी तसा शॉट घ्यायचे ठरवले. आता तिने माझा 'सर' केल्यामुळे आणि माहिती मिळवायचा गडही मी 'सर' केल्यामुळे सर्वप्रथम मीच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करावा असा सर्वांनी कल्ला केला. मी ही मग धाडस करून तो शॉट ग्लास उचलून गट्टम केला. त्यानंतरचा अनुभव काय वर्णावा महाराजा! जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत. त्यानंतर त्या चवीमुळे आणि त्या अनुभवामुळे आणखीन 2-3 शॉट्स मागवून ते गट्टम करण्यात आले. प्रत्येक शॉटबरोबर ओव्हरकोट, मफलर, स्वेटर असे प्रचंड थंडीमुळे घातलेले कपड्यांचे थर काढून टाकले, सर्वांनीच. ह्या अनुभवानंतर मी तर टकीलाचा कट्टर भक्त झालो.

त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मदिरेचा महापूर असलेल्या जपानमध्ये जाण्याचा योग आला. तोक्योमध्ये रोप्पोंगी ह्या उपनगरात 'अगावे' नावाचा एक्सक्लूसिव्ह टकीला बार आहे. त्या बारमध्ये गेल्यावर टकीलाचे जे काही असंख्य प्रकार जगात अस्तित्वात आहेत ते सर्व एका छताखाली बघायला आणि चाखायला मिळाले. त्यावेळी चाळीस चोरांच्या गुहेत शिरल्यावर, तिथली अगणित संपत्ती बघितल्यावर अलीबाबाची जशी अवस्था झाली असेल तशीच माझी, टकीला भक्ताची, अवस्था झाली होती. Smile

चला आता नमना नंतर मूळ गाथेकडे वळूयात.

टकीला ही मेक्सिको ह्या उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील देशाची देणगी आहे मद्यविश्वाला. टकीला, मेक्सिकोत, 'अगावे' ह्या निवडुंग (Cacti) सदृश्य, भरपूर प्रमाणात पैदास होणार्‍या, वनस्पतीच्या शर्करायुक्त फळापासून बनवली जाते. हे फळ अननसासारखे असते त्याला स्पॅनिश भाषेत 'piñas' म्हणजेच अननस असे म्हणतात.(हा piñas म्हणजेच pina colada मधला पिना)

ह्या टकीलाचा इतिहास फार रंजक आहे. फार पुर्वीपासून ह्या अगावेच्या फळाच्या (piñas) गरापासून, त्या गराला फर्मेंट करून (आंबवून) एक मादक द्रव्य मेक्सिकोचे स्थानिक लोक बनवत असत. त्याला पल्के (Pulque) असे ते म्हणत. अगावेच्या बर्‍याच प्रजाती आहेत. त्यां विवीध प्रजातींच्या मिलाफापासून (Blend) हे पल्के बनवले जात असे. पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केला. स्पॅनिश लोकांना हे पल्के आवडले पण ते पडले जातीवंत युरोपियन, त्यांनी त्याला 'युरोपियन टच' दिला. म्हणजे त्यांनी त्या फर्मेंटेशनला जोड दिली डिस्टीलेशनाची. स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केल्यावर साधारण एका दशकात उत्तर अमेरिकेतले पहिले डिस्टील्ड मद्य ह्या अगावेपासून तयार झाले जे आजच्या टकीलाचे मूळ रूप, ज्याला 'मेझ्कल (Mezcal)' असे म्हटले जायचे, ते होय.

मेझ्कल ब्रॅन्डी -> अगावे वाइन -> मेझ्कल टकीला -> शेवटी आजची मॉडर्न टकीला असा आजच्या टकीलाचा सुधारीत आवृत्तींचा प्रवास झाला.

आता प्रश्न असा पडेल की हा सुधारीत आवृत्तींचा प्रवास का वा कसा? तर ह्याचे उत्तर दडले आहे अगावे ह्या वस्पतींच्या प्रजातींमध्ये. सुरुवातीला मूळ मेक्सिकन स्थानिक लोक बर्‍याच प्रकारच्या अगावेच्या प्रजातीपासून मेझ्कल बनवायचे. पण स्पॅनिश लोकांनी त्यावर युरोपियन मद्यसंस्कार केले Smile त्यांनी अगावेच्या विवीध प्रजांतींच्या वापरामधे सुसूत्रता आणली. जसे जसे ह्या प्रजातींवर संशोधन होत गेले तसे तसे आजची सुधारीत टकीला तयार होत गेली.

अगावेच्या ह्या खालील प्रमुख प्रजाती आहेत.

Agave Tequilala : टकीलासाठी वापरली जाणारी अगावे

ह्यातली फक्त 'Agave Tequilala' ही प्रजात आजची मॉडर्न टकीला बनवण्यासाठी वापरली जाते.ह्या अगावेला 'ब्लु अगावे (Blue Agave)' किंवा टकीला अगावे असेही म्हणतात. ह्या प्रजातींच्या फळामध्ये शर्करा फ्रुक्टोजच्या रूपात मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे ही प्रजात टकीला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असते.बाजूच्या चित्रात दिसणारी ही ह्या वनस्पतीची ही पाने आहेत. ती वेळोवेळी कापली जातात ज्यामुळे त्याच्या फळाला जास्त एनार्जी मिळते आणि त्यातले शर्करेचे प्रमाण वाढते. ह्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे परागीकरण वटवाघूळाकडून (आपले 'पुण्याचे वटवाघूळ' नव्हे, ते वेगळे Wink ) होते.
हाच तो piñas म्हणजे अगावेचे शर्करायुक्त फळ ज्याला 'अगावे हार्ट' म्हटले जाते.हे फळ साधारण ह्याच्या झाडाच्या वयाच्या साधारण बाराव्या वर्षी तयार होते. ह्या फळाची पाने काढून टाकल्यावर वजन अंदाजे 35-90 किलो पर्यंत असते. ही कापलेली पाने पुढच्या प्लांटेशनसाठी वापरली जातात.टकीला बनवण्यासाठी ह्या फळाचा गर, हे फळ भाजून काढला जातो.

भौगोलिक स्थानमहात्म्य

जसाजसा टकीलाला लोकाश्रय मिळून ती लोकप्रिय होत गेली तसा मेक्सिकोला एक उत्पनाचे साधन मिळून टकीला डिस्टलरीच्या उद्योगाने तेथे मोठे रूप धारण केले. मग ह्या टकीलाच्या स्वामित्वासाठी तिथले सरकारही जाग़ृत झाले आणि टकीलाची सरकारी मानके ठरली.मेक्सिको मधल्या जालिस्को (Jalisco) राज्यातील Los Altos (Highlands) ह्या पर्वतराशींच्या कुशीत असलेल्या 'टकीला' ह्या महानगरामधे बनलेली टकीला हीच स्वतःला अस्सल मॉडर्न टकीला म्हणवून घेउ शकते.

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

(क्रमश:)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मी काही वर्षांपूर्वी मेक्सिकोला गेलो होतो. तेथे मी घेतलेली ही दोन चित्रे.

मेक्सिको सिटीपासून जवळच अ‍ॅझटेक-पूर्वकालीन Sun-Moon Pyramids ची प्रसिद्ध जागा आहे. त्याचे वाटेवर एका ठिकाणी पूल्के करणे, ऑब्सिडिअनच्या सुर्‍या आणि कलाकुसरीचे काम करणे अशा गोष्टींचे प्रदर्शन (आणि अर्थातच टूरिष्टी सामानाचे दुकान) असलेली एक जागा आहे. तेथे मी घेतलेले अगावे गराचे घेतलेले हे चित्र. हा गर आंबवून पूल्के तयार होते. (त्याच जागी तकीला शॉट, मीठ आणि लिंबाचा स्लाइस ह्यांचे मेक्सिकन-स्टाइल सेवन कसे करायचे ह्याचेहि प्रात्यक्षिक केले.)

मेक्सिको सिटीमध्ये जो नॅशनल पॅलेस आहे तेथे दियेगो रिवेराच्या इतिहासदर्शन घडविणार्‍या भित्तिचित्रांबरोबर मेक्सिकोचे कोरलेले देखावे आहेत. त्यातील हा एक देखावा. ह्यामध्ये स्पॅनिश-पूर्वकाळातील एक मेक्सिकन पूल्के बनविण्याची तयारी करताना दिसत आहे.

(एक शंकेखोर चौकशी: 'रेड लॉब्स्टर' तुम्ही मफलर-ओवरकोट-स्वेटर अशा polar जामानिम्यात का बसला होतात? बाहेर कितीहि थंडी असली तरी 'रेड लॉब्स्टर'च्या आत तपमान ६८-७० फॅ.च्या घरातच असणार! सेविकेने ड्यूटीवर असतांना तुमचा शॉट पिणे 'रेड लॉब्स्टर'च्या नियमात कसे बसले? तुम्हाला आपणहून रिप्लेसमेंट का दिली नाही? तुम्ही मागायला हवी होती. शेवटी बिल चेक केले का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरती 'रेड लॉब्स्टर'च्या जागी 'रेड लॉब्स्टर'मध्ये असे वाचावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरविंद,

डायरेक्ट मेक्सिकोमध्ये काढलेले फोटो टाकून मूळ लेखाला जी जोड दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
पुढच्या भागात दुसरा फोटो वापरला तर चालेल का?

मेक्सिकन-स्टाइल सेवन कसे करायचे ह्याचेहि प्रात्यक्षिक केले

तीथे 'फ्रेंच-स्टाइल' सेवन कसे करायचे ह्याचेहि प्रात्यक्षिक देत होते का हो Blum 3असल्यास विमानप्रवास पदरखर्चाने करून जायची तयारी आहे Wink

बाहेर कितीहि थंडी असली तरी 'रेड लॉब्स्टर'च्या आत तपमान ६८-७० फॅ.च्या घरातच असणार

आयुष्यात पहिल्यांदा उणे तापमान अनुभवणार्‍या मज पामराला त्या थंडीची एवढी दहशत होती की आतमधे थर्मल्स पण होते. ते काढता येत नसल्यामुळे त्याचा उल्लेख नाही केला Wink

सेविकेने ड्यूटीवर असतांना तुमचा शॉट पिणे 'रेड लॉब्स्टर'च्या नियमात कसे बसले? तुम्हाला आपणहून रिप्लेसमेंट का दिली नाही?

ती बहुदा आधिच टकीलाच्या तारेत असावी Wink आता ते नियमात कसे बसले असा विचार करण्यापेक्षा तिच्या मधाळ हसण्यात हरवून जाणे मला आवडले.
तिने रिप्लेस्मेंट तर दिलीच पण वर एक शॉट फ्री ही दिला. Smile

- (त्यावेळी गारठलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतःशी-
च्यामारी! आणि हे अक्को (आणि शहराजाद) विचारताहेत म्हणे शेवटी कशाकशाचे पैसे दिले. अहो सोक्याला मधाळ हास्यासकट प्रात्यक्षिक, रीप्लेसमेंट शिवाय वर फ्री शॉट फस्स्टाईमलाच! आहात कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोक्स इन फॉर्म! वाचते आहे.

अरविंद कोल्हटकरांचा प्रतिसादही माहितीपूर्ण. त्यातल्या पहिल्या चित्रातल्या फळाच्या आकाराचा अंदाज येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम लेख! वाचतो आहे. मार्गारिटा आवडत नसले तरी तकीला शॉटस आम्हालाही प्रिय आहेत....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मस्त ओळख.
दुसर्‍या भागात काय असेल ही उत्सुकता लवकर शमवा बुवा.
अस्सल मेक्सिकन पद्धतीनुसार तिथे टकीलाच्या बाटलीच्या तळाशी एक विशिष्ट अळी टकून ठेवलेली असते असं ऐकून आहे. ते खरं आहे का? कोणाला अनुभव असल्यास सांगा.

बाकी ,

एक शंकेखोर चौकशी: 'रेड लॉब्स्टर' तुम्ही मफलर-ओवरकोट-स्वेटर अशा polar जामानिम्यात का बसला होतात? बाहेर कितीहि थंडी असली तरी 'रेड लॉब्स्टर'च्या आत तपमान ६८-७० फॅ.च्या घरातच असणार! सेविकेने ड्यूटीवर असतांना तुमचा शॉट पिणे 'रेड लॉब्स्टर'च्या नियमात कसे बसले? तुम्हाला आपणहून रिप्लेसमेंट का दिली नाही? तुम्ही मागायला हवी होती. शेवटी बिल चेक केले का?

असंच म्हणते. विशेषतः सेविकेबद्दलच्या प्रश्नांचे उत्तर काय असावे ह्याचे ( भोचक) कुतुहल आहे. म्हणजे, सेविका तेव्हा नुकतीच 'ऑफ ड्यूटी' असेल का, सोकाजींनी ज्ञानपिपासूपणे तिला पुढील मार्ग दाखवण्यासाठी आमंत्रित केले असेल का, इ. इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहराजाद यांची चौकशी.

काही वर्षांपूर्वी माझ्याजवळ एक Dos Gosanos Mezcal अशी तकीलाची बाटली होती आणि तिच्यात खरोखरच दोन आळ्या तळाशी (अर्थात मृतावस्थेतल्या) होत्या. Gosano म्हणजे grub किंवा आळी.

त्याच प्रमाणे तळाशी एक सापाचे पिल्लू (अर्थात मृतावस्थेतले) असलेली एक जपानी वाइनची बाटलीहि एकेकाळी माझ्याजवळ होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्म हा मेझ्कल मधे असतो, टकीला मध्ये नसतो.
पुढच्या भागात यावर माहिती येणार आहे.

- (साकिया) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाटलीतले पेय संपवल्यावर अळीदेखील खातात म्हणे. असो, पुढच्या भागात कळेलच.
( बाकी ह्या अक्कोंच्या घरी आपण फक्त चहाच घेणार. ) Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरातली मेक्सिकोहून आणलेली डॉन हुलिओची बाटली चेक केली. अळी-बिळी काही नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टकीला शॉट्स हा एक अत्यंत आवडीचा प्रकार आहे.
दुसर्‍या भागाची उत्सुकता आहे. आने दो.

सोकाजींनी ज्ञानपिपासूपणे तिला पुढील मार्ग दाखवण्यासाठी आमंत्रित केले असेल का, इ. इ.

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यामारी,

सर्वांना मूळ गाथेपेक्षा तीथे 'सेविका आणि सोक्या' ह्यांच्यात नेमके काय घडले ह्यातच रस दिसतोय. Wink

स्वगतः 'गाथा सेविका आणि सोक्याची' अशी गाथा लिहावी काय आता?

- (विचारत पडलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आतापर्यंत चाखलेले - खरंतर प्यालेले- पहिले (आणि आतापर्यंतचे एकमेव) मद्य म्हणजे टकीला!
माझ्या लग्ना आधी गोव्या गेलो असताना मित्रांनी लग्नाआधी निदान एकदा तरी प्यालीच पाहिजे असा हेका धरला नी मग म्हटलं एकदाच प्यायची आहे तर थेट भरपूर (जवळ जवळ ४०-४५%) अल्कोहोलच्या 'टकीला'लाच मान द्यावा! Wink

त्यामुळे हा भाग सर्वात जास्त आवडला! Smile

याची इतकी माहिती वाचुन बरेच ज्ञानकणथेंब मिळाले. आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचते आहे रे सोकाजी. छान लिहिले आहेस.
जपून प्या म्हणजे झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यकदा शास्त्रापुरती पघितली पाहिजे या टकिला ला! हा सोका ल्वॉकांना लई जळवतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी इतके दिवस फक्त ज्ञानपिपासु होतो. पण आता तुमचे लेख वाचून कॉकटेल- पिपासु आणि टकीलापिपासु व्हायची तीव्र इच्छा झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.