कांदा संस्थानातील 'सामान्य माणूस'

(कांदा संस्थानातील 'विच्छेद' वृत्तपत्रात येणाऱ्या 'सालीखाली' या विश्लेषणात्मक सदरातील लेख इथे सादर करत आहे.)
सामान्य माणूस म्हणजे नक्की कोण? या प्रश्नावरून गेले काही दिवस कांदा संस्थानातील जनमानस ढवळून निघालेले आहे. शेतात उन्हातान्हात राबणाऱ्या तुटपुंज्या रोजगारीवर काम करणाऱ्यापासून ते मोठ्या आयटी कंपनीत एअरकंडिशंड ऑफिसमध्ये राबणाऱ्या व ट्रॅफिकमध्ये रखडणाऱ्या तरुणांपर्यंत सर्वांतच आपल्याला सामान्य माणूस म्हणवून घेण्यासाठी अहमहमिका एकेकाळी लागलेली होती. संस्थानाच्या पंचायतीने नवीन 'सामान्य माणूस' श्रेणीची निर्मिती जाहीर होण्याआधीच सामान्यीकरणाची ही प्रक्रिया वेगात चालू होती. पंचायतीच्या घोषणेनंतर मात्र ही चढाओढ संपलेली आहे. जो तो आपली वर्णी सामान्य माणूस म्हणून लागली म्हणून आनंदात आहे. पंचायतीच्या वार्षिक बजेटप्रमाणेच सर्वांना खुष करणाऱ्या निर्णयाबाबत आम्ही सध्या निव्वळ तटस्थ आहोत. ही घोषणा करताना पंचायतीने एरवी न दिसणारी ताठ वैचारिक भूमिका घेतली आहे, ते प्रशंसनीय आहे. मात्र परिणामांच्या बाबतीत आम्ही अजून साशंक आहोत.

मानवी संस्कृतीच्या निर्मितीपासून सर्व समाजांना वर्गविग्रहाने ग्रासलेले आहे. आदिमानवांतही एका टोकाला, आपल्या शक्तीच्या जोरावर दुसऱ्यांवर हल्ला करून त्यांचे अन्न व स्त्रिया लुटणाऱ्यांचा आहे रे वर्ग, तर कधीतरी आपणही त्यांच्यात समाविष्ट होऊ अशी केवळ स्वप्ने पहाणाऱ्या दुर्बळांचा नाहीरे वर्ग होता. आहेरे वर्गाला सर्व सुखांचा उपभोग घेता यायचा, तर नाहीरे वर्गाला केवळ त्यांचे बघून फारतर शिकता यायचे. संस्कृतीचा विकास झाला, पण हे वर्ग बदलले नाहीत. शारीरिक शक्तीची जागा आर्थिक शक्तीने घेतली. धनदांडग्यांनी सामान्यांना भरडायचे हा समाजाचा अलिखित न्याय झाला.

विसाव्या शतकात साम्राज्यशाहीचा लोप पावल्यानंतर जगभरच सर्वत्र पददलितांच्या अस्मिता जागृत झाल्या. त्यातूनच राखीव जागांसारखे पुरोगामी वाटणारे कायदे झाले. पण तरीही सामान्य माणसांचे भरडणे काही कमी झाले नाही. आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊनदेखील त्याची भरडलेपणाची भावना काही गेली नाही. राखीव जागांमुळे तर काही गटांत ही अन्यायाची भावना अधिकच मूळ धरू लागली. स्वतःला दलित म्हणवून घेण्याचा काही जातींचा प्रयत्न याच भावनेतून उत्पन्न झालेला होता. हे बदलते सत्य लक्षात घेऊन संस्थानाच्या पंचायतीने सामान्यत्वाचीच व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांच्यासाठीचे विशेषाधिकार स्पष्ट केलेले आहेत हे प्रशंसनीय आहे. त्यांचा थोडक्यात आढावा घेणे रास्त ठरेल.

१. संस्थानातल्या बहुसंख्य लोकांना 'सामान्य व्यक्ती' अशी श्रेणी मिळणार. सर्व सरकारी ओळखपत्रांवरती ती एका पांढऱ्या ठिपक्याने निदर्शित होईल. त्याचबरोबर 'मी सामान्य माणूस' असे लिहिलेली टोपीदेखील दिली जाईल.
२. 'असामान्य नाही तो सामान्य' या तत्वावर हे श्रेणी वाटप होईल. तूर्तास ही श्रेणी उत्पन्नावर आधारित असेल. म्हणजे सर्वोच्च उत्पन्न असलेले एक टक्का व सर्वात कमी उत्पन असलेले एक टक्का लोक सोडले तर बाकीच्या ९८ टक्क्यांना स्वतःला सामान्य म्हणवण्याचा अधिकार मिळणार. अर्थातच यात काही मोजके अपवाद आहेत.
३. यांतून सर्व राजकारणी, पोलिसदलात काम करणारे व नोकरशाहीत असलेले वगळले जातील. लष्करातले प्रत्यक्ष लढण्याची जबाबदारी असलेले सोडले तर इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही यातून वगळण्यात येणार आहे. प्रचारमाध्यमांमध्ये (किंवा सामान्य लोक ज्याला मीडिया म्हणतात त्यात) काम करणाऱ्या कोणालाही सामान्य व्यक्ती म्हणवण्याचा अधिकार असणार नाही.
४. विचारवंत समजल्या जाणाऱ्यांबाबत तर हा कायदा अधिकच कठोर तरतूद करतो. विचारवंती असण्याचा संशय देखील असणाऱ्यांना गळ्यात एक किलो वजनाचा थिंकरचा पुतळा घालून फिरण्याची जबरदस्ती करण्यात येईल.
५. सामान्य व्यक्ती अशी सरकारदरबारी नोंद झाली की काही अधिकार आपोआपच प्राप्त होतात
- यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे 'आपण सामान्य लोक' हा शब्दप्रयोग मुक्तहस्ताने वापरण्याचा अधिकार.
- सरकार नालायक आहे, राजकारणी हरामखोर आहेत, व नोकरशाही भ्रष्ट आहे अशी ठासून तक्रार करण्याचा अधिकार.
- विचारवंत ओळखू आल्यास त्यांचा जाहीर अपमान करण्याचा अधिकार.
- आपले प्रश्न व इतर सामान्य लोकांचे प्रश्न एकच आहेत हे गृहित धरण्याचा अधिकार.
- 'मतदान करून काही फायदा नाही' असं म्हणून त्या दिवसाच्या सुटीला मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचा अधिकार.

या कायद्यातल्या बहुतांश तरतुदी स्वागतार्हच आहेत. विशेषतः सामान्य या शब्दाची व्याख्या करण्यात कांदा संस्थानच्या पंचायतीने जो सर्वसमावेशकपणा दाखवला आहे तो कौतुकास्पद आहे. वर्गविग्रहाचे प्रथम वर्णन मार्क्सने केले. त्यात उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय व कष्टकरी असे ढोबळ भाग केले होते. पण या रेषा नक्की कुठे आखायच्या हे त्याने लोकांनाच ठरवू दिले. त्यामुळे ते शब्द काहीशा सैलपणे वापरण्याची पद्धत पडली. मध्ये काही काळ मध्यमवर्गाचेच उच्च, मध्यम व कनिष्ठ असे भाग केले गेले. वर त्यांच्याही रेषा कधीच कोणी निश्चित न सांगितल्यामुळे आपण नक्की कोणत्या वर्गात असा प्रश्न सर्वच सामान्य लोकांना पडे. यावर उपाय म्हणून नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनमध्ये येणारे सर्वच नॉर्मल असे ठरवून टाकून कांदा संस्थान पंचायतीने एक क्रांती केलेली आहे. सर्व वर्गविग्रहांचे मूळ असलेल्या वर्गव्यवस्थेवरच घाव घातलेला आहे. मात्र हे करताना शिल्लक राहिलेल्या सामान्य माणसांना नडणाऱ्या सर्व संस्थांचे लोक वेगळे काढलेले आहेत. सध्या सामान्य माणूस म्हटला की तो महिन्याला दहा हजार रुपयांत चौघांचा संसार रेटणारा गरीब माणूस डोळ्यासमोर येतो. हे चित्र साफ चुकीचे आहे. या कायद्यामुळे गरीब, सामान्य, श्रीमंत व अतिश्रीमंत हे भेद नष्ट होऊन मॉलसंस्कृतीत वावरणारे, स्मार्टफोन वापरणारे यपीदेखील सामान्य माणसांत सामावले जातील.

मात्र काही संभाव्य तोटेदेखील आहेत. सर्वांनाच सामान्य म्हटल्याने सामान्यपणाचे विशेषत्व जाण्याचा धोका आहे. जो कोणी सोम्यागोम्या उठेल तो स्वतःला सामान्य म्हणवून घेईल. ते सध्याही होतेच म्हणा. सध्या सर्वसाधारणपणे या तक्रारी जाहीरपणे करणारे हे सुशिक्षित मध्यमवर्गीय - म्हणजे कॉंप्युटर लिटरेट, इंटरनेट वापरणारे, वर्तमानपत्रं वाचणारे व त्यातल्या वाचकांच्या कानोशांत पत्रव्यवहार करणारे, शहरवासीय असतात. त्यांचे उत्पन्न व त्यांना असणाऱ्या संधी पाहिल्या तर कोणी त्यांना उच्चवर्गीय म्हणेल. हे स्वतःला सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणवत असतात. त्यांच्याच हातात जाहीर बोलण्याची माध्यमे असल्यामुळे तेच याही कायद्यानंतर सामान्यांचे प्रतिनिधी रहातील. शेवटी काय 'सर्व मनुष्य सामान्य असतात, मात्र काही अधिक सामान्य असतात' हेच खरे आहे व राहील.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

मार्मीक लेख. लेखातील विनोद सोडला तर असलीच सत्य परिस्थिती आहे.
- सामान्यरेषेखालील अतीसामान्य पाभे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या एक टक्का असामान्य लोकांना दंडाला निळी फीत बांधून फिरणे, गळ्यात मडकं बांधणे वगैरे काही त्यांची लायकी दाखवण्याची पद्धत नाही याचा खेद वाटला. हे सरकारी नोकर, सेनाधिकारी, पोलिस, नोकरशहा, विचारवंत, उद्योगपती वगैरे सगळे ह**** लोकं आहेत; यांच्यातल्या फक्त विचारवंतांनाच का वेगळं काढा? बाकीचेही सगळे एकजात हलकट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुर्दैवाने विचारवंतांना कोण कुत्रेही विचारत नसल्याने त्यांच्या बाबतीत हे नियम झाले असा प्राथमिक अंदाज आहे. बाकीचे सगळे सिस्टिमचा भाग असल्याने त्यांच्या लॉब्या वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत असतात. मात्र कांदा संस्थानात झालेल्या कायद्यात किमान त्यांना सामान्य माणसात अंतर्भूत करण्यात आले नाहीत याचा आनंद तरी माना! चांगल्याकडे दुर्लक्ष करून नेमक्या त्रुटीबाबत तक्रार करण्याची तुमची पद्धत पहाता तुम्ही विचारवंत असाव्यात असे वाटते. तुमचा लवकरच जाहीर अपमान कसा करावा याबाबत काही योजना होईलच. जर तुम्ही तुमच्या ओळखपत्रावरचा पांढरा ठिपका मिळवण्यात यशस्वी झालात तर मात्र तुमच्याशी सहमत होऊन या सगळ्याच हलकट, पाजी लोकांना जाहीरपणे शिव्या देऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा एकदा कांदा संस्थानाच्या राज्यकर्त्यांनी आपला हलकटपणा दाखवून दिला आहे असेच म्हणावे लागेल.
हे राज्य सामान्य माणसाचे असताना सामान्य माणसासाठी परवाना असण्याची सक्ती करणे हा लोकशाहीवर घाला, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि या भ्रष्ट राजकारण्यांचा भ्रष्टाचारासाठी आणखी एक कुरण निर्माण करण्याचाच डाव आहे.
यातले पाचवे कलम म्हणजे तर हद्द आहे आणि ते नक्कीच कोणा रेम्याडोक्या विचारवंताच्या बौद्धिक अतिसारातून निघालेले कलम दिसते आहे. या कलमात सांगितलेले अधिकार सामान्य माणसाना जन्मत:च प्राप्त होत असून ते आम्ही देतो असे म्हणणे हे या असामान्य माणसांच्या अहंकाराचे आणखी एक हिडीस प्रदर्शनच म्हणले पाहिजे.
आधीच सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य माणसाची आधीचे परवाने मिळवताना चिरीमिरीसाठी वाटमारी होत असताना आणखी एका परवान्याची त्यात भर घालून सामान्य माणसाचे आयुष्य आणखी अवघड करणार्‍या या पंचायतीचा मी कडाडून निषेध करतो.
असो. कुठे मिळेल म्हणे हा परवाना? अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे जोडायची वगैरे काहीच माहिती दिलेली नाही.
एजंट लोक तरी आहेत का? एजंटपण साले हलकटच असतात. पण आता राज्यकर्तेच एवढे नालायक म्हटल्यावर काय, एजंट लोकांचे पाय धरावेच लागणार. सगळे एकमेकांना सामील आहेत चोर कुणीकडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अतिसामान्य असल्याने सामान्य माणसाचे कायदे आम्हाला लागू होऊ नयेत का? हा अन्याय आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<< 'असामान्य नाही तो सामान्य' या तत्वावर हे श्रेणी वाटप होईल. >>

काही वेळा आम्ही 'असामान्य' आहोत असं आम्हाला वाटतं, पण अखेर आम्ही निघतो 'सामान्य'च. अशी वेळी कोणेती स्थिती ग्राह्य धरण्यात येईल श्रेणीवाटपाची यावर संस्थानाने सखोल विचार करून काही मार्गदर्शक तत्त्व दिली पाहिजेत!! उगीच अन्याय नको आपण असामान्य आहेत असे समजणा-या आमच्यासारख्या सामान्य लोकांवर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉर्पोरेट जगताचा उल्लेख राहिला वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.