ऑस्करची भाषा

ऑस्कर म्हणजे सर्वोत्कृष्ट! 'आमच्या टिमचा सचिन तेंडुलकर' असं म्हटल्यावर ज्याप्रमाणे खेळाडूची छाती अभिमानाने ईंचभर जास्तच फुलुन येते, त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील सन्मानाला त्या क्षेत्रातला 'ऑस्कर' म्हटल्यावर त्या पुरस्कारालाच पुरस्कार प्राप्त झाल्याचं समाधान मिळतं, ईतकं हे नाव आता 'महामहिम' झालेलं आहे. गेल्या ८४ वर्षांपासुन अखिल पृथ्वीवर ज्या ज्या ठीकाणी सिनेमा आहे, त्या त्या ठीकाणी आपलं साम्राज्य गाजवत असलेल्या 'ऑस्कर' पुरस्काराने यंदा 'द आर्टीस्ट' या मुकपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणुन आपला कौल दिला आणि एक नवीनच पायंडा पाडला.

खरं म्हणजे मुकपटाला ऑस्कर मिळण्याची ही पहिली वेळ नव्हे. १९२९ मध्ये, ज्या वर्षी ऑस्कर पुरस्काराची सुरूवात झाली होती, त्या वर्षी 'विंग्स' या मुकपटाला 'ऑस्कर' मिळाला होता. मात्र तो काळच मुकपटांचा होता. आजच्या तंत्रज्ञानप्रगत सिनेविश्वामध्ये एका ब्लॅक ऍण्ड व्हाईट मुकपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणुन सन्मानित करण्याचा ऑस्करच्या निवडकर्त्यांचा निर्णय नक्कीच धाडसी म्हणायला पाहिजे. अर्थात मूकपट ते बोलपट या बदलाच्या उंबरठय़ावरली गोष्ट सांगणारा 'द आर्टीस्ट' हा चित्रपट मुळात एक काळापांढरा मूकपट म्हणून सादर होणं, हेच याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. याबरोबरच या चित्रपटातील फ्रेंच अभिनेता जाँ दुझार्दाँ याच्या अप्रतीम अभिनयाबद्दल त्याला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर मिळालंय. निर्माता थॉमस लॅंगमॅनची निर्मिती, दिग्दर्शक मिशेल हजानविशिअसचे दिग्दर्शन, या सिनेमासाठी थेट एकोणीसाव्या शतकातली वातावरणनिर्मिती करणा-या मार्क ब्रिज याची वेषभुषा, आणि अप्रतीम असं पार्श्वसंगीत तयार करणा-या ल्युदोविक ब्रुसचा 'ओरीजनल स्कोर' अशी एकुण पाच ऑस्कर्स मिळवत 'द आर्टीस्ट' ने यंदाच्या पुरस्कारांमध्ये आपली छाप सोडली आहे.

गेल्या काही वर्षांपासुन 'केवळ व्यावसायिक यश संपादन केलेल्या चित्रपटांचा सन्मान करणारे पुरस्कार' म्हणुन ऑस्करवरती टिका होत होती. 'द आर्टीस्ट'च व्यावसायिक यशसुद्धा वाखाणण्याजोगं असलं, तरीही तो पाहिला गेला, ते वर सांगीतलेल्या त्याच्या वैषिष्ट्यामुळे. म्हणुनच 'द आर्टीस्ट' ला सर्वोकृष्ट ठरवतांनाच ऑस्कर देणा-या 'ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस ऍण्ड सायन्सेस्' च्या ज्युरिने आपलंही 'वैषिष्ट्य' जपलंय असं म्हणायला हरकत नाही.

सामान्य भारतीय चित्रपटरसिकाला 'ऑस्कर' बद्दल माहिती आणि आदर पूर्वीपासुनच असला तरीही तो आवाक्यातला आणि हवाहवासा वाटू लागला तो २००२ मध्ये. आजपासुन दहा वर्षांपुर्वी क़ॉडॅक थिएटर, हॉलीवुड, लॉस एन्जल्स, कॅलीफोर्नियाच्या मधल्या काही रांगांमध्ये पारंपारिक भारतीय शेरवानीमध्ये बसलेले आमिर खान आणि आशुतोष गोवारिकर आपल्यापैकी अनेकांना आठवत असतील. प्रत्येक नामांकनाबरोबर वाढत जाणारी त्यांची उत्सुकता, आणि त्यांच्याबरोबरच हा सोहळा टिव्हीवर अनुभवणा-या कोट्यावधी भारतीयांनी रोखुन धरलेले श्वास कुणीच विसरू शकत नाही. 'लगान' ला सर्वोत्कृष्ट विदेशीभाषिक चित्रपटाच्या ऑस्करपासुन थोडक्यात दूर रहावं लागलं असलं, तरी त्यानंतर अनेक भारतीय निर्माते-दिग्दर्शक 'ऑस्कर' डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवायला लागले. अमोल पालेकर आणि शाहरूख खानच्या 'पहेली' पासुन ते आपला मराठीतला 'श्वास' ही मग ऑस्करवारीची अपेक्षा करू शकला. आपले चित्रपटरसिकही ऑस्करमधली नामांकनं, पुरस्कार, त्यांचे विविध प्रकार, ईत्यादींबद्दल 'अपडेट' राहायला लागले.
२००९ मध्ये सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या 'स्लमडॉग मिलिएनिअर' ने तर भारतीय रसिकांसाठी आनंदाचं भरतंच आणलं. ए आर रहमानला या चित्रपटासाठी दोन ऑस्कर्स मिळाले. एक सर्वोत्कृष्ट पाश्वसंगीतासाठी आणि दूसरा सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी. ऑस्कर नावाची सोन्याचा मुलामा चढवलेली ही ब्रिटॅनियमची बाहूली भारतीय हातांमध्येही मिरवता येऊ शकते हे या वर्षी भारतीयांना कळून चुकलं. याच वर्षी मुळ भारतीय निर्मात्यांनी बनवलेल्या 'स्माईल पिंकी' या शॉर्ट फिल्मला देखील ऑस्कर मिळाला.

'स्लमडॉग' नंतर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ऑस्करसाठी नामांकीत होण्याच्या शर्यतीत मागे पडला, आणि गेल्या दोन वर्षांपासुन भारतीय चित्रपटसृष्टीचं ऑस्करमधील यश काही उल्लेखनिय असं राहिलं नाही. याचं कारण म्हणजे ऑस्करमध्ये गेल्या काही वर्षात आलेले बदलाचे वारे म्हणता येइल. व्यावसायिक गणितांचा आधार घेऊन दिले जाणारे पुरस्कार अशी टिका होत असली तरीही ऑस्करच्या ज्युरीने नेहमी नव्याचा स्विकार केलेला आहे. ते सहाजीकही आहे. केवळ 36 सहका-यांसह सुरू झालेल्या 'ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस ऍण्ड सायन्सेस्' चे आज जगभर सहा हजारावर सदस्य आहेत. आपापल्या देशात ते आपापली क्षेत्रं गाजवत आहेत. म्हणुनच दिवसेंदिवस जगातल्या कानाकोप-यातून येणारी नामांकनं ऑस्करला अधीक श्रीमंत करत आहेत. यंदाच्या विदेशी भाषेच्या विभागात सर्वोत्कृष्ठ ठरलेला चित्रपट 'जुदाई-ए-नादेर-अस्-सिमिन' (अ सेपरेशन) हा 'ऑस्कर' जिंकणारा पहिला ईराणि चित्रपट आहे.
या चित्रपटाला यंदाच्या ऑस्करमध्ये दोन नामांकनं होती. एक उत्कृष्ट विदेशी भाषिक चित्रपटासाठी आणि दूसरं उत्कृष्ट पटकथेसाठी. या आधी ईराणी चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळून आता चौदा वर्ष झालीत. चौदा वर्षांनंतर नामांकन मिळणे, आणि उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळणे असं काय खास आहे या चित्रपटात? खरं सांगायचं तर एक संवेदनशील गोष्ट आणि त्याच संवेदनशिलतेने केलेली त्या गोष्टीची मांडणी यातच सगळं येतं. तेहरानमध्ये रहाणा-या एका जोडप्याची ही गोष्ट. आपल्या अकरा वर्षाच्या मुलीला तेहरानमधल्या अस्थीर वातावरणात ठेवायचं नाही असा बायकोचा निश्चय तर आपल्या म्हाता-या बापाला त्याच्या आयुष्याच्या शेवटी देश सोडायला लावायचा नाही, ही नव-याची ईच्छा. त्यामुळे दोघे वेगळं व्हायचं ठरवतात. न्यायालय या कारणासाठी घटस्फोट देत नाही. मग तात्पूरते वेगळे राहू लागतात. घरी वडिलांची काळजी घ्यायला कुणी बाईमाणूस हवं म्हणुन नवरा एका गरीब पण धार्मिक वृत्तीच्या बाईला कामावर ठेवतो. या बाईचा नवरा दुष्ट आणि गुंड प्रवृत्तीचा, तीला सतत मारहाण करणारा, स्वतः कमाई करायची नाही, आणि बायकोला काम करू द्यायचं नाही अश्या हेकेखोर वृत्तीचा. कथानक पुढे जातं आणि घरकामाला ठेवलेल्या बाईचा अपघात होतो, यात तिच्या पोटात असलेलं बाळ जातं. या पापाला जबाबदार कोण, यासाठी मग संघर्ष सुरू होतो. अशा अवस्थेत तिच्याकडून काम करवून घेणारा मालक, की मारहाण करणारा नवरा, की कधीतरी झालेला अपघात? कोर्टात केस जाते. या दरम्यान तेहरानमधल्या एकूण मध्यमवर्गीय जीवनाचे, गरिबिचे, अस्थीरतेचे, कायदा सुव्यवस्थेचे ईतके पैलू बघायला मिळतात की चित्रपट ही पुर्णतः सोशल कॉमेन्ट्री होतो. शेवटी चित्रपट मुळ मुद्यावर परत येतो आणि जोडप्याला घटस्फोट मिळतो. अकरा वर्षाच्या मुलीला आईजवळ रहायचे की वडिलांजवळ, असं न्यायाधिश विचारतात. तिचा निर्णय होईपर्यंत आई वडिलांना बाहेर उभे रहायला सांगतात. मुलीच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत जोडपे बाहेर उभे आहे, या चित्रासह सिनेमा संपतो. ऑस्करसाठी नामांकन मिळावं अशी पटकथा, आणि दिग्दर्शन ही त्याची वैषिष्ट्ये असली, तरीही भाषा या माध्यमाच्या पलिकडे जाऊन संवाद साधण्यात यशस्वी होणे, ही 'अ सेपरेशन' च्या यशाची गुरूकिल्ली मानली पाहिजे. चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक असगर फरहादी याच्य चित्रपट बनवण्यावर ईरानमध्ये अनेक वर्षे सरकारी बंदी होती, हे येथे उल्लेखनिय.

यंदाच्या ऑस्करमध्ये 'शॉर्टफिल्म्स' विभागात निवड झालेल्या 'ऍसिड' नावाच्या लघुपटाबद्दलही असेच म्हणता येइल. पाकिस्तानच्या शरमीन ओबैद चिनॉयने बनवलेला हा लघुपट. ऍसिडमुळे आयुष्य उद्धवस्त झालेल्या मुलींच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री तयार करणारी आणि ऑस्कर पटकावणारी शरमीन पहिली पाकिस्तानी व्यक्ती आहे. स्त्रीया आणि मुलींना शिक्षा देण्यासाठी ऍसिडचा वापर करणारा पाकिस्तान जगातला तिसरा भयानक देश आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी १००पेक्षा जास्त स्त्रीया आणि मुलींवर ऍसिड टाकुन त्यांच आयुष्य उद्धवस्त करण्यात येतं. शरमीनने आपल्या डॉक्युमेंट्रीमधून आजपर्यंत पडद्यामागे बंदिस्त असलेल्या स्त्रीयांच्या गंभीर परिस्थितीचं योग्य चित्रण जगापुढे उभं केलं आहे. पाकिस्तानी महिलांना आपली स्वप्न सोडू नका असंही तीनं म्हटलं आहे. मात्र पाकिस्तानच्या डॉन आणि ट्रीब्युन वगळता इतर वृत्तपत्रांनी शरमीनच्या यशाकडे पाहून डोळे बंद केले आहेत. ब-याच वृत्तपत्रांमध्ये शरमीनला ऑस्कर मिळाल्याची साधी बातमीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली नाही. यावरून काय ते लक्षात येतेच.

असे असुनही या आणि ईतर अनेक देशांमध्ये चित्रपट ही चळवळ म्हणुन सुरू आहे. चित्रपट थोडेफार का असे ना बदल घडवून आणतील असं निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, आणि कलाकारांनाही वाटतंय. म्हणुनच चळवळीत सहभागी अश्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचं धोरण नेहमी अती-व्यावसायिकतेचा आरोप सहन करणा-या ऍकॅडमीने येत्या काही वर्षात घेतला असावा असं दिसतंय. अगदी आपल्या सगळ्यांच्या जवळच्या स्लमडॉग मिलॅनियर बाबतही हेच म्हणता येइल. भारताची गरिबी चव्हाट्यावर मांडणारा सिनेमा म्हणुन देशात त्यावर टिका झाली असली, तरीही सत्य परिस्थीती पुढे करणारा म्हणुन त्याला ऑस्कर मिळालं, असंही नाही का म्हणता येणार?

स्लमडॉग नंतर ऑस्कर पटकावणारा 'द हर्ट लॉकर' हा वरवर पहाता युद्धपट असला तरीही बॉम्ब डिफ्युज करणा-या पथकातील तीन सदस्यांची कथा दाखवत ईराक युद्ध, त्या वेळची परिस्थीती यावर अनेक वर्षे न बोललेलं बोलून दाखवणारा चित्रपट होता. मागच्या वर्षीचा ऑस्कर विजेता चित्रपट 'द किंग्स स्पीच' हा तर ब्रिटिश ईतीहासातील राजकिय सत्य घडामोडिवर आधारित चित्रपट होता. ब्रिटिश राजा सहाव्या जॉर्जच्या जीवनातल्या जर्मनीविरूद्ध युद्धाची घोषणा करण्याच्या महत्त्वाच्या भाषणाची गोष्ट मांडणारा हा चित्रपट आहे. असं म्हणतात की या चित्रपटाच्या लेखकाने डेव्हीड सेडलरने, प्रत्यक्ष किंग ज़ॉर्ज़च्या पत्नी 'किंग मदर' यांच्या विनंतीवरून चित्रपट लिहण्याची प्रक्रिया १९८० पासुन ते २००२ पर्यंत थांबवून ठेवली होती. या चित्रपटांनी व्यावसायिक यशही ब-यापैकी मिळवलं असलं तरीही काही वर्षांपुर्वी ऑस्कर विजेते ठरलेल्या 'टाय़टॅनिक', 'द ब्युटिफुल माईंड', 'लॉर्ड ऑफ द रिंग', 'ग्लॅडिएटर', 'मिलिअन डॉलर बेबी' या चित्रपटांसारखा 'मसाला गल्ला' मात्र जमवला नाही, हे नक्की.

मागची काही वर्ष ऑस्करमध्ये व्यायसायिक यशाची हमी देणा-या झगमगाटी, मल्टीस्टारर, बिगबजेट चित्रपटांचा रंग होता, तेव्हा भारतात 'मां! मुझे आशिर्वाद दे, तेरा बेटा आज फर्स्ट क्लास फर्स्ट आया है,' वाले चित्रपट सुरू होते. गेली पाच-सहा वर्षे तीकडे 'स्थानिक' विषयांची 'जागतीक' मांडणी (ग्लोबल परस्पेक्टीव ऑफ लोकल ईश्युज) सुरू झाली, तर आपल्याकडे हॉलीवूड ऍक्शनपटांची कॉपी करून हिंदी चित्रपट आले. (त्या काळात स्थानिक जीवन घेऊन आलेले लगान, पहेली, बरोबर पुढे गेले). अगदी हल्लीच्या काळात भारतीय चित्रपट आता स्थानिक समस्या घेऊन येऊ लागला आहे. तरल संवेदनशिल असं काही वेगळं आता चित्रपटांतून पुढे येतंय. मात्र तेवढ्या ताकदिचं काहीतरी निर्माण होईपर्यंत कदाचित ऑस्करचा रंग काहीतरी वेगळा झालेला असेल. याची नांदी या वर्षीच पहायला मिळते आहे. 'द आर्टीस्ट' चित्रपटाचा रंग ब्लॅक-एण्ड-व्हाईट आहे. विषय खुप वेगळा, फ्रेंच मुकचित्रपटसृष्टीच्या स्थित्यंतरादरम्यानचा आहे. दिग्दर्शक, कलाकार, निर्माता फ्रेंच आहे; पण चित्रपट अमेरिकन आहे. मुकपट असल्यामुळे चित्रपटाला भाषा नाही. आणि त्यामुळे तो सगळ्या भाषांचा आहे.

म्हणुन मग 'ऑस्कर हा आमचा निकष नाही', आणि 'आमची चित्रपटसृष्टी आपली वेगळी आहे. आमची ओळख वेगळी, आमचे अवॉर्ड वेगळे' असाही सुर हल्ली निघू लागला आहे. एकुण काय, तर थेट मदर ईंडिया पासुन हरिश्चंद्राची फॅक्टरीपर्यंत 'ऑस्करची भाषा' आपल्या पल्ले पडलेलीच नाही. कदाचित आपला चित्रपट त्या निकषांपेक्षाही उत्तम काहीतरी देत असेल, आणि त्यांना कळतच नसेल. किंवा आपण "माझा सिनेमा निखळ मनोरंजनासाठी" असं म्हणुन व्यावसायिकतेकडे झुकलो असु आणि या स्पर्धेतून स्वतःला आपोआपच बाद करत असु. कारणे शोधल्यास शंभर सापडतील, आणि कारणांची कारणे हजारो सांगता येतील. मात्र जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या चित्रपटसृष्टीला आजवर ऑस्करने हुलकावणी दिलीय हे सत्य आहे. आता हे ऍकॅडमिचं दुदैव म्हणायचं की आपल्या चित्रसृष्टीच अपयश, ते आपलं आपण ठरवायचं.

व्यावसायिकतेने चालवलेले म्हणा अथवा कलात्मकतेने चालवलेले; पण 'अँड दि ऑस्कर गोज टू ...' पुढचे शब्द ऐकायला केवळ कलाकारचं नाही तर जगभरातील चित्रपट रसिकांचे कान आसुसलेले असतात. दरवर्षी ऑस्करच्या चर्चा रंगतातच. ऑस्करची उत्कंठा आणि सोहळ्यानंतरची हुरहुर कायम राहते. या सोहळ्यात जिंकणा-याच नव्हे तर नामांकन मिळवण्या-या चित्रपटांचीही चर्चा होते, ते पाहिले जातात आणि त्यांच्याबद्दल एक मत तयार होत असते. त्यामुळे सहाजीकच निवड करतांना खुप वेगळे निकश लावले जातात. ऑस्करची भाषा म्हणुनच केवळ ईंग्रजी, फ्रेंच, किंवा हिंदी-मराठी नाही. ती जगाची, चित्रपटाची, सर्जनशिलतेची भाषा आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लिखाण आवडले. माहितीपूर्ण असताना काही ठिकाणी थोडे विस्कळीत झाले आहे असे वाटून गेले.
मात्र गेल्या काही वर्षांचा घेतलेला परामर्श आवडला, अनेक चित्रपट जे बघायचे राहून गेले आहेत त्याची परत एकदा आठवण झाली.

द सेपरेशन ची कथा सांगितली आहेत (spoiler) हे जरा टीप म्हणून लिहिता का, (spoiler warning) म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------------------------------
सूरज में लगे धब्बा, फितरत के करिश्मे है |
बुत हमको कहे काफिर, अल्लाह की मर्जी है ||
...आणि अस्मादिक

ईराणवर पाश्चिमात्य देश दबाव आणू पाहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑस्कर पुरस्कार एका ईराणी चित्रपटाला-ज्यात ईराण मधले जीवन कसे कठीण आहे, तिथली माणसे देश सोडून जावू पाहात आहेत असे दर्शवणार्या चित्रपटाला- मिळावा हा निव्वळ योगायोग आहे हे पटत नाही.

मला ऑस्कर पुरस्कार विजेत्यांबददल आदर आहेच..चित्रपटाला ऑस्कर मिळालं आहे म्ह्ट्लं की मी अर्थातच जास्त प्रयत्न करून तो पाह्ण्याचा प्रयत्न करते...आणि नक्कीच ते चित्रपट तुलनेने सरस असतात. पण बातम्यांमधून समोर येणार्या गोष्टिंची सांगड अशा पुरस्कारा साठी निवड्लेल्यांशी न घालणं अशक्य आहे.

लेख थोडा विस्कळीत वाट्ला ..पण चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑस्करची भाषा आत्मसात करण्यात येणाऱ्या यशापयाशाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आवडला. बदलत्या भाषेबद्दलची टिप्पणीही चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या चांगल्या आणि अभ्यासपूर्ण लेखात "गल्ल्याची भाषा" आणण्याचे प्रयोजन लेखकापुढे का यावे हे उमजत नाही. "ऑस्कर" हा विषय इतका निखळ आहे की तिथे फक्त 'कला' हे एकच केन्द्रीभूत लक्ष्य असते त्या प्रक्रियेत भाग घेणार्‍या सर्व घटकांचे. अमुक एका चित्रपटाने तमुक इतका धंदा केला आहे म्हणून तो ऑस्कर रेसमध्ये आला असे कधीच मानले गेलेले नाही. "मसाला गल्ला" असा तद्दन फिल्मी शब्द वापरून लेखाच्या एरव्हीच्या सुंदर मांडणीला डाग लागल्यासारखे झाले आहे. असो, एवीतेव्ही तुम्ही गल्ल्याचा विषयच काढला आहे म्हणून त्याबद्दल थोडेसे स्पष्टीकरण देतो.

म्हणजे "टायटॅनिक' वा 'मिशन इम्पॉसिबल-४' च्या गल्ल्ल्याची तुलना होऊ शकते पण त्यांची तुलना किंग्ज स्पीचशी करणे अन्यायकारक आहे. तसे पाहिल्यास मूळ चित्रपटनिर्मितीला आलेला खर्च आणि त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेला धंदा यावरून मिळकतीची टक्केवारी काढली तर टायटॅनिकपेक्षा किंग्ज स्पीचची टक्केवारी खुलून दिसेल.
किंग्ज स्पीचच्या निर्मितीचा एकूण खर्च झाला १५ मिलिअन डॉलर्स तर चित्रपटाने जगभर मिळकत केली ती तब्बल ४१५ मिलिअन डॉलर्सची. तर टायटॅनिक निर्मिती खर्च होता अंदाजे २०० मिलिअन डॉलर्स तर चित्रपटाने धंदा केला १८०० मिलिअनपेक्षा जास्तीचा. म्हणजे निव्वळ आकडेवारीवरून टायटॅनिकची मिळकत अवाढव्य दिसते हे जरी खरे असले तरी ज्या रकमेची गुंतवणूक आणि त्यावरील मिळकतीची टक्केवारी काढली तर किंग्ज स्पीचची मिळकत बिलकुल कमी नाही. नगण्य तर नाहीच नाही.

आपल्याकडील उदाहरण द्यायचे झाल्यास "जय संतोषी माँ" आणि 'शोले' यांचे देता येईल. टक्केवारीच्या हिशोबात त्या वर्षी संतोषी मातेने शोलेवर मात केली होती.

असो. बाकी लेख छानच झाला आहे हे सांगितले पाहिजेच.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0