मिडलाईफ क्रायसिस

आयुष्याच्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भुलवतात, आकर्षक वाटतात. आता लहानपणीच पहा ना, असं मूल क्वचितच सापडेल ज्याला फुलपंखी पर्‍या, राजपुत्र-राजकन्या, आगीच्या ज्वाळा ओकणारे , आकाशात संचार करणारे ड्रॅगन यांनी मोहविले नसेल.
त्याच लहान मुला/मुलीने जरा तारुण्यात पदार्पण केले की वसंतोत्सव, बहाराचा काळ सुरु होतो.ज्या ड्रॅगनची भीती लहानपणी वाटत असते तोच ड्रॅगन जिंकावासा वाटू लागतो. "Evoke the fire within" अशा धाडसी वृत्तीचा वाटून खुणावू लागतो. जग पादाक्रांत करण्याची , इच्छा मनात लसलसू लागते.अशावेळी आपले डेस्क्टॉप वॉलपेपर, आपल्या खोल्यांमधील चित्रे , कलाकृती ह्या ओरडून ओरडून विद्रोही म्हणा अथवा त्या त्या वेळेच्या मनस्थितीचे वर्णन करतात. आपल्या त्या वेळेच्या मनस्थितीच्या त्या द्योतक असतात.
हां हां म्हणता "मिडलाईफ" उंबरठ्यावर येऊन दाखल होतं.आपणही बरेचसे निवळलेलो असतो - मान्य करा वा नका करू.केसांना केशकलप लावा वा नका लावू. बरीचशी, खरच बरीचशी स्वप्ने साकार झालेली असतात. पण अजून जबाबदारीतून पूर्ण मुक्तता झालेली नसते. एकप्रकारचा सौम्यपणा, समजूतदारपणा तुमच्या स्वभावात येऊ घातलेला असतो. आणि काय आश्चर्य डेस्कटॉपवरचा "फायरी ड्रॅगन" एके दिवशी जाऊन त्या जागी शुभ्र तेजस्वी कमळ येते. तुम्ही मनाशी म्हणता "D-I-G-N-I-T-Y" किती सुंदर शब्द आहे. मला सर्वात आवडणारा शब्द. आणि तुमच्यातल्या या बदलावर तुम्हीही चमकता. पण वेल, हा बदल फार वरचा झाला हो. आत आत खोल जो बदल होत असतो तो तर कित्येक पटीने हलवून टाकणारा असतो. या काळात तुमच्या आजवरच्या महत्त्वाकांक्षांचा, जबाबदार्‍यांचा, जोडीदार म्हणून तुम्ही निभावलेल्या नात्याचा प्रत्येक टप्प्याचा तुम्ही आढावा घेत असता. कुठेतरी टिकमार्कींग चालू असते. कधी तुम्ही "अ‍ॅबीसमली डिप्रेस" होऊनरडता कधी "एक्स्टॅटीकली" आनंदी होता. काहीच मधले नसते. यालाच "मिडलाईफ क्रायसिस" म्हणतात का?
असो. कालपरवापर्यंत फक्त "सेक्स, हॅपीनेस, सोशल लाइफ" या विषयावर इंटुक (मानसशास्त्रीय) लेख वाचणारे तुम्ही आज "एजींग" या विभागाकडे वळता. कारण तुम्हाला कुठेतरी वार्धक्याची चाहूल लागलेली असते. मग तुम्ही "वय वाढण्याचे फायदे" वगैरे लेख वाचत सुटता. मी ही वाचला. मला खूप आवडला. न आवडून करते काय. तुम्ही आतापर्यंत एक मात्र जरूर शिकलेले असता - तुमची मूठभर का होईना तत्वे जर ठाम असतील आणि तुम्ही त्या तत्वांशी तडजोडी केल्या नसतील, तुम्हाला थोडेसे का होईना मित्र-मैत्रीणी असतील, छंद असतील, आणि जर तुमचे कुटुंब तुम्हाला साथ देईल तर तुम्ही सहज या क्रायसिसमधून पार पडाल.
पण एकंदर असे आहे. This is my perspective on midlife crisis.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आपल्या आवडीनिवडी कळल्या. सुंदर आत्मचरित्रात्मक लेख.

हे जे काही तुम्ही लिहिलंय ते साफ चूक आहे, सांगून ठेवतो. अहो, बालपण संपतं वगैरे ठीक आहे. तारुण्य संपतं असं सांगितलं कोणी तुम्हाला? वयाप्रमाणे तारुण्याची मर्यादा पुढेपुढे सरकते, बाकी काही नाही. आणि नवीन स्पोर्ट्स कार वगैरे घेतली की वार्ध्यक्याची चाहूल वगैरे लांब पळते. आपल्यापेक्षा दहा पंधरा वर्षं तरुण गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड वगैरे करण्याच्या मागे लागण्याची संधीदेखील वय वाढल्यानेच मिळते ना? हे तेजस्वी कमळ, डिग्निटी वगैरे सगळं भंपक आहे. ड्रॅगनवरच स्वार रहायचं. तो जर फार पुढे जात नसेल तर मस्त हार्ले डेव्हिडसनची बाईक घ्यायची त्याच्या जागी, चांगल्या फ्लेम्स वगैरे काढून.

अमुक तमुक असलं की क्रायसिसमधून बाहेर पडायला मदत होते म्हणताय तुम्ही... काहीतरीच. अहो, क्रायसिसमध्ये शिरायचंच्च नाही मुळी. तुम्हाला मिडलाइफ क्रायसिस काही समजलेलाच नाहीये, त्यामुळे तुमचा परस्पेक्टिव्ह पार गंडला आहे, असं माझं ठाम मत आहे.

आता काकू म्हणताना घाबरायला नको.. नाही का? Wink

-Nile

मिडलाईफ क्रायसिस टाळण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ती तारुण्याची, यौवनाची भानगड आपल्या आयुष्यात येऊ न देणे. बालपण, पौगंडावस्था वगैरे संपली की डायरेक्ट म्हातारं व्हायचं. नकोच ती नव्हाळी आणि नकोच ती जवानी!

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तात्पर्यः फार मासिके वाचू नये. त्यात लिहीलेले क्रायसिस आणि सिंड्रोम माणूस स्वत:ला कधी होतात त्याची वाट पाहू लागतो आणि एक प्रकारचा हायपोकाँड्रिया होतो.

राजेश घासकडविंशी सहमत ... ब्रावो ..

हे असं मिडलाईफ क्रायसिस वगैरे म्हणून स्वतःच स्वतःला अजून म्हातारं करून घेऊ नका बुवा ..

वयाप्रमाणे तारुण्याची मर्यादा पुढेपुढे सरकते .. ते ड्रॅगन वगैरे अजूनही आवडत असतो फक्त डेस्क्टॉपवर कमळ येत कारण ड्रॅगनची नवीन चित्र फारच वेगळी दिसू लागलेली असतात ... आमच्या वेळी असलं काही नव्हतं असं सांगायला श्रोते मिळालेले असतात .. पूर्वी बाईक वरून फिरायला आवडायचं ते आता गाडी घेऊन जायला आवडतं इतकंच .

मिडलाईफ क्रायसिस वगैरे सगळं झूट आहे ... मानलं तर आयुष्याचा प्रत्येक टप्पा एक क्रायसिस आहे .. मानलं नाही तर नाही ..

मस्तपैकी बाईक वरून एक लांब फेरफटका मारून बघा .. जाणवेल तुम्हाला की सगळं अजून पूर्वीसारखंच आहे ...

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

काहीतरीच बाई तुझं! शंभर वर्षांपूर्वी जन्माला आली असतीस तर या वयात तुझी शंभरी भरली असती. आनंदच मान, तू घृत पिणार्‍या भारतात जन्माला आलीस!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.