पोस्टट्रुथ युगात माधवकृपा

ललित

पोस्टट्रुथ युगात माधवकृपा

- मुग्धा कर्णिक

महालात मंदमंद प्रकाश होता की मंदमंद अंधार ते कळत नव्हतं.

अशी प्रकाशयोजना कायमस्वरूपी कशी काय असू शकते? ...पण होती खरी.

कृष्ण - तोच तो आपला धर्मसंस्थापनवाला युगंधर - निजलेला. काही वर्षं गेली. की शतकं सरली. डिजिटल युग उजाडून बरंच पुढं गेलेलं. बाहेर माहितीच्या युद्धाचे ढग एकमेकांत टकरा घेत होते.

अर्जुन आणि दुर्योधन उशा-पायथ्याशी न बसता बाहेर सोफ्यावर बसून तो उठण्याची वाट पाहात होते. बराच काळापासून ते एकमेकांकडे क्रुद्ध गोपित्यांसारखे पाहात गप्प बसून होते. मधूनच आपापल्या लॅपटॉप्सवर इमेल्स वगैरे टाकत होते. महाभारतावरच्या मालिका बोअर होत्या म्हणून हिस्ट्री चॅनेल पाहात होता अर्जुन. ते ग्रीकोरोमन इतिहास वगैरे मस्त वाटत होतं त्याला. आणि दुर्योधन कुस्त्या पाहात मधेमधे मांड्या थापटत होता. मागल्या युगात चेपटलेली मांडी अजून तशीच होती. पण चड्डी चांगली जाडजूड होती.

अखेर कृष्ण अर्जुन आणि दुर्योधनाच्या लॅपटॉप्सच्या कीबोर्ड्सच्या टकटकीने चाळवला. मधेच होणाऱ्या टुंगडुंग टुंगडुंग आवाजाने त्याची झोप दशकभरानंतर पार उडाली. कृष्णाची झोप अखेर पूर्ण झाली तेव्हा तो फ्रेश होऊन बाहेर आला.

त्याला पाहाताच दोघे चुलतभाऊ लॅपटॉप्स स्लीपवर टाकत, आपल्या स्क्रीनसेव्हरवर कृष्णाचंच निळंनिळं चित्र आहे हे त्याला दिसेल अशा तऱ्हेने स्क्रीन समोर आणत उभे राहिले.

अर्जुन घाईघाईने म्हणाला, "हे रामा, हे माधवा... आम्ही तुझी वाट पाहात काही शतके की सहस्रके येथे थांबून होतो... पुन्हा युद्धाची वेळ आली आहे... महाभारत घडतं आहे पुन्हा या भारतात..."

दुर्योधन म्हणाला, "हे अमितकीर्ती माधवा, हे मोहना, तू ताजातवाना झाला असशील तर आपण जरा चर्चा करू या."

अर्जुन म्हणाला, "द्वापर युगात आम्ही जी मागणी घेऊन तुझ्यापाशी आलो होतो, तीच आता आम्ही आमच्या नव्या रुपात, मागणीचे रूप तेच घेऊन आलो आहोत."

दुर्योधन म्हणाला, "तेव्हा तू मला आधी पाहिलंस आणि तू मला आधी मागणी करू दिलीस. पण त्याचा घंटा काही फायदा झाला नाही. हरलोच आम्ही कौरवलोक. आता मीच सांगतो. मला तूच बरोबर हवा आहेस. तुझे अठरा की अठराशे अक्षौहिणी सैन्य दे या अर्जुनाला. पहिला मी बोल्लोय."

कृष्ण अगदी नितीश भारद्वाज शैलीत मंद हसत आणि स्वप्नील जोशी टाईप ग्वाड्ड दिसत त्यांना न्याहाळून घेत होता. अर्जुनाचा चेहरा आता एकदम गजेंद्र चौहानसारखा झाला. पण संधी गेली होती.

कृष्ण म्हणाला, "अहाहा, सुयोधना, तुझ्यात झालेला हा बदल पाहून मला उत्कट आनंद झाला आहे. अरे, अखेर अर्जुन काय, सुयोधन काय- सारेच निमित्तमात्र. जगात जे व्हायचे ते होतेच. सांगू का पुन्हा उपदेश? दोन गाढवांपुढे गीता सांगण्याचा आनंद मला मिळेल."

"माधवा, मला का बरे गाढव ठरवीत आहेस? मी तर तुझ्या बुद्धीचे श्रेष्ठत्व मान्य करून तुझी मदत मागतो आहे. तुझे सैन्यही मागत नाही. हाच माझ्या गाढव नसण्याचा पुरावा नाही काय?" दुर्योधन रागावून म्हणाला.

"अर्जुना, तुझे काय म्हणणे आहे या मागणीवर? नुसता चेहरा पाडून बसू नकोस."

"तू नेहमी धर्माच्या बाजूने असशील असे एकदा सांगितले आहेस मला... मी वेगळे काय बोलणार... तरीही टेबलपाशी बसू, मग बोलू." अर्जुन पुटपुटला.

पुढे जात त्याने टेबलवर आपला लॅपटॉप ठेवला. मोबाईल काढून ठेवला. दुर्योधनानेही तसेच केले.

"देवा, ही पहा, ही आहेत नव्या डिजिटल युगातील शस्त्रे. आणि सध्या काय परिस्थिती आहे त्याचे मला तुला प्रेझेन्टेशन द्यायची अनुज्ञा असावी."

"जाणतो मी. मी झोपलो तरीही मला ज्ञान असतेच, विसरलास?"

"नाही नाही, सवयीने बोललो. प्रेझेन्टेशनमध्ये सुरुवातीला सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीच पुन्हा नव्याने सांगायच्या असतात... त्याचीच सवय."

"राहू दे. मी सारेच जाणतो. तुमची परिस्थितीही जाणतो. आणि पुढे काय करायचंय हेही जाणतो. तेच तेच सांगून माझा वेळ घालवायची गरज नाही. ऐका. पाहा... डिजिटल युगाच्या मध्यापासून ही शस्त्रे प्रत्येकाकडे असतात. आता तर डिजिटल युग ही जुनी गोष्ट झाली. हे तर पोस्टट्रुथ युग आहे. हो, हो, हा शब्द जरी तिकडे पाश्चात्य जगात कॉइन झाला असला तरीही या भरतखंडातही त्याची परंप्रा आहे. सत्यम् ब्रुयात्, प्रियम् ब्रुयात्, न ब्रुयात् सत्यम् अप्रियम् या बनवेगिरीने आपणच या भूमीत या पोस्टट्रुथ युगाची बीजे रोवली होती... अश्वत्थामा मेला. नरो वा कुंजरो वा हा मंत्र धर्माला मीच तर दिला होता... रथचक्र रुतल्यानंतर कर्णाला ठार मारायला या अर्जुनाचे मन वळवून मीच तर नीतीचा घात केला होता... सारे काही घडते ते माझ्याचमुळे... तेव्हा या डिजिटल, पोस्टट्रुथ युगाचाही मीच करविता आहे हे समजून ऐस. मी धर्माच्या बाजूने आहे याची तू मला आठवण दिलीस; पण धर्माची व्याख्याही मीच ठरवतो...

"तर या तू दाखवत असलेल्या शस्त्रांबद्दल... ही असली जुनाट शस्त्रे असलेली सेना आता प्रजाजनच आहेत तुमचे. माझ्या ताब्यात आता वेगळी अशी सेना राहिलेलीच नाही. मी तुम्हाला काय सैन्य देणार... तरीही अर्जुना, तुला जे सैन्य मला द्यावे लागणार त्या सैन्याकडे चांगली ब्रॅन्डेड अशी उत्तम सामग्री असेल याची काळजी मी घेईन. पण मी दुर्योधनाकडे असल्यामुळे पुढे काय होईल त्याची मी काहीच गॅरंटी घेणार नाही हे लक्षात असू दे. पण सारे माझ्यातूनच उत्पन्न होते आणि माझ्यातच लुप्त होते- हे माहीतच आहे तुम्हाला... की सांगू परत?"

"नको, नको..." दोघे एकसुरात म्हणाले.

यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाकडे शंभर कोटी शहरी, नगरी डिजिटली साक्षर लोकांचे सैन्य लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स, मोबाईल स्मार्टफोन्स आदिंनी सज्ज करून सुपूर्द केले. ते सैन्य पाहून दुर्योधनाच्या मनात चलबिचल झाली. तो म्हणाला, "हे त्रेतायुगातील रामा, द्वापरातील माधवा, आपण काही निवडक सैनिक सोबत घ्यावेत का?"

"संशयाने तुझा घात यापूर्वीही केला होता. विसरू नकोस. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव, तरच मी येतो. नाहीतर मी आपला पुन्हा तंगड्या ताणून झोपतो आनंदाने."

"अं... नको नको... मातेसमोर तू मला चड्डी घालायला लावलीस ती मी अजून विसरलो नाही. मी अजूनही ती चड्डी वापरतो. आता थोडी आणखी लांब केली आहे ती. माझ्या मांड्या लेच्यापेच्या राहिल्या त्या राहिल्याच."

"हां, आता कसं... बरं अर्जुना निघ आता. तुझं काही खरं नाही आता. पण अखेर तू निमित्तमात्र आहेस हे तू जाणतोसच. की करू पुन्हा सुरू?"

"नको, निघतो मी. आता काही माझ्या हातून लॅपटॉप गळून पडणार नाहीये, गांडीव धनुष्यासारखं. चिंता नको. माधवा, तू सारा विचार करून या देशाच्या कल्याणाचाच विचार करशील असे समजू ना... की नको?" एवढे शब्द त्याच्या तोंडून निघतात न निघतात तोच श्रीकृष्णाने आपला पातळसा लॅपटॉप तर्जनीवर जोरात घुमवला आणि तीक्ष्ण नजरेने पाहिले तसा अर्जुन गां. ला. पा. ला. पळत निघाला.

--

मग रणनीतीवरचे पाठ देण्यासाठी देवाधिदेव त्रेता युगातील राम, द्वापरातील माधव श्रीकृष्ण आपला अगदी पातळसा, हलकासा, हनुमंताने अर्धवट खाल्लेल्या सूर्यफळाचे चित्र असलेला लॅपटॉप तर्जनीवर गरगरा फिरवत दुर्योधनासमोर बसले. आणि बोलू लागले...

"बाळा सुयोधना, तू फक्त माझी मागणी करून मला फार तोषविले आहेस. कलियुगातल्या डिजिटल कालखंडातील पोस्टट्रुथ युगात मी त्रेता-द्वापरातील रामकृष्णापेक्षा अगदी वेगळाच असेन हे तुला कळले असेल हे शक्य नाही. तुझ्या अकलेची लॉटरी लागली एवढेच खरे. पण हरकत नाही, माझ्या या रूपाला न्याय देण्यासाठी तू निमित्तमात्र ठरायचा होतास.

"मग ठरलं डील. सुयोधना, मी तुझ्या रथयात्रेचे सारथ्य करणार. मी स्वतः एकही पोस्ट टाकणार नाही. एकही विधान करणार नाही. मी स्वतः काहीही करणार नाही, जे काही घडवायचं असेल ते घडवण्याचे सूत्र तुला आणि तुझ्या सेनेला शिकवून मी बाजूला रहाणार. न धरी शस्त्र करी मी. उद्या या नव्या युगातल्या कोर्टांनी माझ्यावर काही शेकवायला नको. माझा उपदेश मान्य करून सारे काही तूच करायचे आहे.

"असं पहा, हे जे सैन्य मी अर्जुनाला दिले ती त्याला मदत न ठरता डोकेदुखी कशी ठरेल याचे आपल्याला नियोजन करायचे आहे. तुझ्या पदरचे सेवेकरी, दासदासी हे आपले खरे सैन्य. मोजके का असेनात... त्यांना आता मी असे काही मंत्र देईन की त्यामुळे त्यांच्या हाती असलेल्या केवळ एखाद्या स्मार्टफोनमधून ते हल्ले चढवतील... आणि त्यांच्याभोवती उभारलेल्या व्हीपीएनच्या चक्रव्यूहातून कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. अर्जुनाच्या बावळट नागरिक सैन्याला कळणारच नाही की त्यांच्या मेंदूवर कुठून हल्ला झाला. आणि त्यातून अर्जुनाला तर मुळीच कळणार नाही. तो अजून मनाने मागच्या शतकाच्या उत्तरार्धातच आहे.

"असं पहा, सतत सत्याची बाजू घेऊन घेऊन देवालाही कंटाळा येतो रे. आणि आता तर पोस्टट्रुथचा जमाना आहे. सत्य बाजूला सारून भावनांची आरास मांडण्यात काय गंमत आहे, ती माझ्यासारख्या चालू देवाला बरोब्बर कळते.

"धर्माला ग्लानी येऊन, अधर्मालाच धर्म म्हणणाऱ्या पोस्टट्रुथचे, अर्थात छद्मसत्याचे, सौंदर्य आता मी शिरावर मयूरपंखासह धारण केले आहे. बघ हा माझा स्क्रीनसेव्हर... छान आहे की नाही... हो म्हण!

"कळत नसलं तरीही मान डोलव, मला बरं वाटतं. ते सत्य असण्याचे कारण नाही. असो. आणि उद्यापासून तुझे सेवेकरी, दासदासी, आणि बाकीचे अठ्ठ्य़ाण्णव-नव्व्याण्णव जे काही शिल्लक असतील ते कौरव इथे या सेलमध्ये धाडून दे. तयारी करायचीय. त्यांना शिकवायचंय. आणि हे पहा, जितके मठ्ठ दासदासी तितके माझे काम सोपे. ते युयूत्सू टाईपचे कुणी असतील तर त्यांना आत्ताच पोचव बुडालेल्या द्वारकेत."

"हो भगवन्, पण भगवन्, तू आमच्यासाठी नेमकं काय करणार आहेस?"

"थोडक्यात सांगतो. मी उत्तरगोलार्धातील राक्षसी पात्र - ट्रोल. ट्रोल्स म्हणजे काय ते पाहिजे तर विकीपिडीयातून वाच. ट्रोल्स मंदबुद्धी असतात, राक्षसी ताकदीचे असतात, पाणी घाल म्हटलं की घालतात, लोंबतंय काय म्हणून विचारत नाहीत- ठोक म्हटलं की ठोकतात, त्यांना प्रश्न पडत नाहीत... नीती काय, सत्य कोणते, वगैरे फालतू प्रश्न त्यांना पडत नाहीत. थोडक्यात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तुझी संपूर्ण सभा भीष्म-धृतराष्ट्रासहित ज्या जाड कातडीने वागली त्याच कातडीच्या साच्यातली लॅपटॉप-स्मार्टफोन धारक, ट्वीटर-फेसबुक-ब्लॉग-वेबसाईट-व्हॉट्सॅप अशा निवडक अस्त्रांनी सुसज्ज अशी ट्रोलसेना मी तुला तयार करून देणार आहे.

"'अहमात्मा सुयोधन, सर्वट्रोलाशयस्थित अहमादिश्च मध्यं च ट्रोलानामन्त एव च...' जाऊ दे रे. सगळं इथं फिट बसणार नाही. तू सोड. तुला झेपणार नाही. तू माझा पहिला ट्रोलनायक. बाकी आता या नव्या सेनेत ट्रोलाचार्य, ट्रोलद्रथ, ट्रोलशासन, ट्रोलप्रधान, ट्रोलपती अशी नवी उतरंड तयार करायची आहे.

"तुमच्या भूमीवर तुम्हाला सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन इतर विचारांच्या लोकांना द्यायची नाही, माझीच इतर खोटारडी रूपे मानणारांनाही द्यायची नाही, हे लक्षात आलंय माझ्या. आणि मी तर स्वतः कधीही नियतीच्या चक्रात ढवळाढवळ करीत नाही. जे जे होणार ते ते होणार... आणि ते मी पाहीन. थोडी तिच्या चक्राला गती मिळाली तर डोक्याचा ताप लवकर साफ संपेल एवढेच मला वाटते. पण हे मी तुला का सांगतोय, ट्रोलनायका... जा तू सांगितलं ते कर. पळ. आणि सेवेकरी पाठव..."

दुसरे दिवशीपासून माधवाच्या महालात ट्रोलनायकाचे सेवेकरी पोहोचू लागले. लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि पोस्टट्रुथचे मंत्र घातलेले गंडे बांधून सुसज्ज सेना घडू लागली. कुणाच्या माथ्यावर भगवा फेटा, कुणाच्या कपाळावर भगवी पट्टी, कुणाच्या गळ्यात भगवी उपरणी, कुणाच्या अख्ख्या वेषातच गेरुआ... कपाळावर टिळे, त्रिशूल, तर कुणी अगदी टकाटक पश्चिमी सूटाबुटात, पण प्रत्येकाच्या मनात होते भगवे हलाहल.

मोहनाला गोकुळाची आठवण आली आणि त्याने आपल्या मदतीला सारे 'गो'कुल घेतले. कारण अर्जुनाला बहाल केलेल्या सैन्याला थेट हात घालणे त्याच्या इभ्रतीला साजून दिसले नसते. गो-कुलाची रक्षा हे ट्रोलसैन्याचे प्रथम कर्तव्य आहे असे सांगितल्यानंतर ट्रोललीला रंगू लागली.

त्यांच्या मनातून असंस्कृत वर्तनाची, भाषणाची सारी किल्मिषे, जळमटे झटकून धर्मसंस्थापकाने त्यांची वाणीलेखणी मुक्त केली. इतिहास, वर्तमान यातील कोणत्याही व्यक्तींवर काहीही गलिच्छ लिहू बोलू शकण्याची प्राज्ञा त्यांच्या ठायी निर्माण केली.

सत्यासत्य काय हे काहीही न पडताळता आपल्याला सोयीचे, लोकभावना भडकावू शकेल असे शब्द म्हणजेच सत्य याची त्यांना खात्री होती. ग्रहणावर सूर्यास्ताचे फोटोशॉप करणे कसे योग्य होते हे त्यांना सहजच पटले... आणि मग कुठल्याही घटनेचे फोटोश़ॉप हे योग्यच अस्त्र ठरले.

ज्यांना सुईच्या अग्राइतकीही जमीन द्यायची नाही त्या सर्वांबद्दलचा खोटा प्रचार करणे हे तर धर्मकृत्यच ठरले.

'क्व ते धर्मस्तदा गतः' या प्रश्नाला अर्थात व्हॉटअबाउट्रीला पोस्टट्रुथ युगात भारतभूवर पुन्हा एकदा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

या प्रचाराच्या माऱ्यासोबत, फोटोशॉप दर्शनासोबत आणखी एक अस्त्र हवे होते. त्या मालिकादर्शनदूरदर्शन माध्यमालाही श्रीकृष्णाने संजयाला व्यासांनी दिली होती तशीच दिव्यदृष्टी बहाल केली. त्यांना जे घडलेच नाही तेही दिसू लागले आणि जे घडले ते दिसेनासे झाले. नको त्या घटनांचा उल्लेखही कुठल्या स्क्रीन्सवर येणार नाही, आलाच तर ट्रोलसैन्याची टिवटिव कुठल्याही किंकाळ्यांना, आऱोळ्यांना झाकून टाकेल असे डेसिबल्स वाढण्याची सोय माधवाने व्हीपीएनमधून केली.

आता प्रश्न उरला तो काही मूठभर अवलक्षणी व्यास-वारसांचा... त्या वर्णसंकर-जातीसंकरातून जन्माला आलेल्या, प्रचंड स्वतंत्र वृत्तीच्या, प्रतिभावंत व्यासाचे तेज न झेपून एका स्त्रीपोटी धृतराष्ट्र जन्मला... पण त्याचबरोबर तो निःस्पृह, भिकारडा विदुरही जन्मला... धृतराष्ट्राची प्रजा होती... तशी विदुराचीही होती. व्यास, विदुरांची गुणपरंपरा सांगणारे काही नतद्रष्ट प्रतिभावंत लेखक, कवी, वैज्ञानिक या पोस्टट्रुथ युगातही तग धरून राहिले होते.

युगपुरुष श्रीकृष्णाच्या नव्या अवताराला या प्रजातीला कसे तोंड द्यावे हे काही काळ कळत नव्हते... भीष्माला पराभूत करताना तो जसा हतबल झाला होता तसेच आत्ताही होत होते. बराच विचार करून झाल्यावर त्याने चुटकी वाजवली. शिखंडी... शिखंडी... जे तो नाही त्याचे रूप धारण करणारे कुणीतरी... आभासी... पोस्टट्रुथी...

मग मायावी बुद्धीवंतांची सेनाही उभी राहिली. ज्यांना भाषा, परिभाषा, इतिहाससंस्कृतीचे सखोल ज्ञान होते. आणि त्या सर्वांचे पुनर्लेखन करून, सत्याअसत्याची बेमालूम मिसळण करण्याची हातोटी होती. हे सारे लोक श्रीकृष्णाच्या मायेने त्या प्रतिभावंत प्रजातीत मिसळले. प्रज्ञेचेही फोटोशॉप झाले. सत्याचे उत्तरसंस्कार सुरू झाले. शिखंडीची योजना तर केवळ एक बालिश खेळ होता. हे नवे शिखंडीसैन्य आणि ट्रोलसैन्य यांची पोस्टट्रुथ युगातील घडण भविष्यात एक दुर्धर चमत्कार मानला जाईल. श्रीकृष्ण नवयुग महिम्यामध्ये त्याचे कित्येक अध्याय रचले जातील.

दुर्योधनाचा विजय आता निश्चित होता.

त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णमाधवरुपाच्या ध्वजावर बजरंग लहरत होता.

या नवयुद्धात लॅपटॉपमोबाइल स्क्रीन्सवरून प्रत्यक्ष भूमीवरही युद्ध सरकत गेले. अनेक हत्या झाल्या, अनेक प्रकारे क्रौर्य कळसाला पोहोचले, अर्जुनाचे नागरिक दिग्मूढ झाले, शुभयुगवर्तमानाची वाट पाहात वेडे झाले आणि नंतर चिंध्या झाले... दुर्योधनासवे लढत असलेल्या आप्तजनांपैकी काही सदसद्विवेकाची बढाई सांगणारांनाही याचे दुःख वाटू लागले. नैतिकता, सत्य सालं कधी पूर्ण बुडत नाही. कधीतरी अचानक उसळी मारून वर येतं. कुणीकुणी या साऱ्या चित्राने व्यथित होऊ लागले. असं कसं असं कसं म्हणू लागले. आपापल्या लॅपटॉप्सवरून आपल्या गढूळ सदसद्‌विवेकाच्या पोस्टी टाकू लागले... पण थोड्या अवधीतच त्या सर्वांना श्रीकृष्णाचा उपदेश मिळाला...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:॥

तुमची सारी कर्तव्ये, धर्म यांचा त्याग करून मला शरण जा. सर्व प्रकारच्या पापांपासून मी तुम्हाला मुक्त करीन. तात्पर्य, 'जय श्रीकृष्ण' म्हटलं की झालं काम...

'जय श्रीकृष्ण'चा उद्घोष सुरू झाला... सारे पाप फोटोशॉप झाले.

दुर्योधनास आता कसलीच क्षिती बाळगायचे कारण नव्हते. अर्जुनाची नागरसेना बसल्या जागी पराभूत होत चालली होती. सत्य काय याचे नेमके आकलन होणे अशक्य बनले होते. असत्याने पोट भरता येते, मानसन्मानही मिळवता येतात हे सतत फुगत चाललेल्या ट्रोलसेनेतील खालपासून वरपर्यंतच्या सर्वांनाच कळले होते.

तिकडे अर्जुन एकलव्याचा तुटका अंगठा आपल्या हाताला चिकटवून चोखत बसला.

कारण अर्जुनाचे स्वतःचे सैन्यच कौरवसेनेकडे कौतुकाने पाहात दंगले होते.

अर्जुनाच्या लोकांची शिरकमळे लॅपटॉप्सच्या स्क्रीन्सवर तरंगू लागली.

आणि नव्या महाभारतातल्या पोस्टट्रुथ धर्माच्या संस्थापनेसाठी दुर्योधन त्यांना समरी अर्पू लागला.

युद्ध अखेर सत्याशीच लढले गेले की सुईच्या अग्राइतकीही नीती शिल्लक रहायचे कारण नाही आणि मग सर्वच समस्या समस्या रहात नाहीत हे भारतभूमीत भिनत चालले.

दुर्योधन संतृप्त होता...
आणि थँक्यू म्हणताना तो माधवाला म्हणाला-
"हे अच्युता, तुझ्या प्रसादे माझा नीतीमोह पार झडला आहे, मला अनीतीचे ज्ञान झाले आहे. सर्व शंका दूर झाल्या आहेत. आता तू म्हणशील तसेच मी करीन.

नष्टो नीती अनितीर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव॥"

---

टीप- ही कथा जो भक्तीने श्रवण करील त्यालाच सांगावी, भक्तांनाच सांगावी, अभक्तांना सांगू नये. आणि मला दोष देणारांना सांगून काहीही उपयोग नाही असेही नंतर श्रीकृष्णाने सांगून ठेविले आहे.

इदं ते नातपस्काय नाभक्ताप कदाचन।
न चाशुश्रुषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति॥

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet