Skip to main content

त्याचा ब्लाॅग

तेव्हा डोळ्यात लोलक होते
सिंदबादी स्वप्नं होती
बोटाबोटात परीस होते
ओठी थोर गाणी होती

वेळोवेळी करंदकाळी
धोंड साचलेलं अडवायची
लेखनलाट भिडून तिच्या
सुबक ठिकर्‍या करायची

कीबोर्डावर त्याची बोटं
वीज लाजेलशी लहरायची
उमटायची मग स्क्रीनवरती
भळभळ शब्दांपलिकडची

चाकोरीत तो आज धावतो
वेगाने, पण गायब आग,
गंजून गेलीय जुनाट छिन्नी,
शरशय्येवर त्याचा ब्लाॅग

हल्ली जेव्हा कुंद सकाळी
त्याचा ब्लाॅग साद घालतो
औटघटकेच्या लाक्षागृही
तोच चुपचाप चूड लावतो

भांबड Sat, 16/06/2018 - 09:20

जवळपास सगळे मराठी ब्लाॅगची स्टोरी.
#आम्ही_आरंभशूर

तिरशिंगराव Sat, 16/06/2018 - 12:43

आम्ही तर, ब्लॉगचा उपयोग केवळ 'गोडाऊन' म्हणून करतो. त्यामुळे त्याची जाहिरातही करावी लागत नाही.