मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं दुसरं अनावरण

मागच्या लेखात आपण मुंगळा या दृक्श्राव्याच्या शक्तिस्थानांचा आढावा घेतला. त्यात वापरलेलं माध्यम, चित्रपटातील स्थान, एकाच वेळी स्वतंत्र कलाकृती असणं आणि चित्रपटात योग्य ठिकाणी चपखल बसणं इत्यादी मुद्दे मांडले. एखाद्या नामी इमारतीकडे बाहेरून पाहून तिचं देखणं रूप, भक्कम बांधणी, आणि चिरान् चिरा योग्य जागी असल्याचा विचार करावा तसं. या लेखात आपण त्या इमारतीत शिरून तिच्या अंतरंगांचं अवलोकन करू.

सर्वप्रथम या गाण्यात पार्श्वभूमी होऊन राहिलेल्या गुत्त्याकडे बघू. हा अक्षरशः कालातीत आहे. हरिवंशराय बच्चनच्या मधुशालेसारखा. त्यांच्या कवितांत तो आयुष्यातल्या नशेचं, आनंदाचं, मोहाचं, धुंदीचं, भोगांचं प्रतीक होऊन तो येतो. त्याचबरोबर मधुशाला हे गोंडस नावही लेऊन येतो. मुंगळामधल्या या गुत्त्याला मात्र तसं मधुलेपन नाही. तो गुत्ता आहे, आणि गुत्ताच रहातो. शालीनतेची झालर पांघरून येत नाही. मला वाटतं या विझिवॅगी शैलीमुळे त्याच्या नशिलेपणात भरच पडते. 'मै शिव की प्रतिमा बन बैठू, मंदिर हो ये मधुशाला' सारख्या स्वप्नरंजनाला वाव देत नाही. बच्चनांची धूसर सर्वव्यापी मधुशाला जाऊन इथे अधिक धारदार प्रतिमा निर्माण करण्यात दिग्दर्शकाला यश मिळालेलं आहे. आणि तरीही या नशिल्या वातावरणाची कालातीतता मरत नाही. कारण टेबलावर खाली येणारे इलेक्ट्रिकचे दिवे सोडले तर बाकी कुठचीही गोष्ट गेल्या दोन हजार वर्षातल्या गुत्त्यात दिसली असती अशीच. दिव्यांपेक्षा त्यांनी पंक्चरलेला मळकट, धुरकट, धूसर अंधार अधिक अस्सल, जातिवंत. गुत्त्याचा, त्या नशेचा हा कालातीत गुणधर्म महत्त्वाचा आहे, कारण हे दृक्श्राव्य अशाच एका चिरंतन सत्याविषयी आहे.

गाण्याची सुरूवात होते ती दोन दारुड्यांमधल्या काहीशी कार्टूनी भांडणाने. त्यातला एक जण चिडून दुसऱ्यावर ग्लास फेकून मारतो. तो कुठे जातो हा प्रश्न मनात येत असतानाच एका हाताने तो झेलला जातो. त्या ग्लासावर कोयत्याने टिंग टिंग आवाज करत हेलन ठुमकत ठुमकत फिरते. एका दारुड्याच्या तोंडातली सिगरेट काढून घेते, ती दुसऱ्याच्या हातावर विझवते. सगळा गुत्ता खडबडून जागा होतो. हवेत काहीतरी वेगळीच जादू आहे हे सगळ्यांनाच जाणवतं. गाणं अजून सुरू झालेलं नाही, पण काहीतरी होणार हे कळतं. आणि होतंही. अमजद खान गुत्त्याच्या दारात येऊन उभा रहातो. रप्पकन् तो कोयता त्याच्यापासून काही इंचांवर दाराच्या चौकटीत रुततो. जराही विचलित न होता तो थंड डोळ्यांनी त्या कोयत्याकडे बघतो आणि आपली सिगरेट त्यावर विझवतो. गाण्याचे पहिले शब्द उच्चारले जायच्या आतच केवढं नाट्य घडलेलं आहे. किती वेगवेगळी चिह्नं वापरली गेली आहेत.

गुत्त्याचा थोडक्यात उल्लेख केलाच. त्यानंतर गिऱ्हाइकांत भांडण, फेकला गेलेला ग्लास, हेलनने तो अधिकारवाणीने पकडणं. तोच ग्लास भरून मागणं, आत्तापर्यंत मागे घेतलेला कोयता, अमजदखानची सिगरेट, तुच्छतादर्शक डोळे, आणि ग्लासमध्ये बंद केलेला मुंगळा... या सगळ्या प्रतीकचिह्नांचा अर्थ लावण्याची जबाबदारी दिग्दर्शक अमजदखानसारख्याच मग्रूरीने प्रेक्षकावर टाकतो. या सर्वाकडे दुर्लक्ष करून आणि ही जबाबदारी झटकून उच्चभ्रू मात्र या गाण्याकडे गल्लाभरू, बाजारू म्हणून तुच्छता दर्शवतात तेव्हा त्यांची कीव येते.

तू मुंगळा, मुंगळा, मुंगळा
मैं गुड की दली
मंगता है तो आजा रसिया
नाही तो मै ये चली.

हेलन म्हणते की अरे, मुंगळ्या, तुझ्यासाठी मी गुळाची आख्खी ढेप आहे. तुला जर माझी गोडी चाखायची असेल तर मर्दासारखा पुढे ये. जसजसं गाणं पुढे सरकतं तसतसं या मर्दानगीला असलेलं आव्हान स्पष्ट होत जातं.

ले बैया थाम गोरी गुलाबी
दारू की बोतल छोड
दो रे अनाडी शराबी
ओ शराबी मुंगळा
मै गुड की दली
जरा मेरा नशा भी चख ले
आया जो मेरी गली.

माझ्या शरीरात जी नशा आहे ती दारूमध्ये कुठे सापडणार? मी तुला दारू विकते, आणि तू ती पितोस. पण तिच्यातली नशा हे केवळ तुझ्यासाठी माझ्याजवळ येण्याचं निमित्त आहे.

आफत है चाल देखे सो मिट जाय
दूं जिसपे नैना डाल
हाथोसे प्याला सटक जाय
आ चिटक जा मुंगळा मुंगळा
मै गुड की दली
कैसा मुलगा है रे शर्मिला
तुझसे तो मुलगी भली

स्वतःच्या नशील्या सौंदर्याचं वर्णन करून ती म्हणते ये, माझ्या जवळ ये. इतकं बोलावूनही तू येणार नसशील तर बांगड्या भरण्याच्याच लायकीचा आहेस.

हा थोडक्यात वाच्यार्थ आहे. पण यामागे नक्की काय गहन अर्थ दडला आहे? वरवर वाचताना एका स्त्रीने पुरुषाला दिलेल्या आव्हानापलिकडे काही दिसत नाही. ती स्त्री म्हणते ये, मला घे, मी तुझीच आहे. सगळे मोह सोडून मला स्वीकार. ती स्वतःच्या सौंदर्याचं, कामुकतेचं वर्णन करते. वर ती त्याच्यातल्या पौरुषाला जागं करण्यासाठी डिवचून म्हणते, की अरे कसली लाज बाळगतोस, तुझ्यापेक्षा एखादी मुलगीदेखील कमी लाजेल. यापलिकडे यात काय आहे?

त्यासाठी ही रूपकांची वस्त्रं अलगद उलगडून या कलाकृतीचा आत्मा तपासून बघावा लागतो. या गाण्यातली सुंदर स्त्री हे उघड उघड सत्तेचं प्रतीक आहे. ती या गुत्त्याची मालकीण आहे. पैसे न देता पळून जाणाऱ्यांना ती धमकावून त्यांच्याकडून अधिकाराने पैसे काढून घेते. आपल्या शरीराची ती मालकीण आहे, आणि कुठे कोणाशी सौदा करायचा हे ठरवण्याची धमक आहे. आपल्याला जो हवा आहे त्याला आव्हानात्मक मागणी घालण्याइतकी आक्रमक आहे. सेडक्ट्रेस आहे. ही सर्व सत्तेचीच लक्षणं आहेत. या भूमिकेसाठी हेलनला निवडण्यातही दिग्दर्शकाने खोल विचार दाखवला आहे. सत्तरीतल्या भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेची आठवण होती. त्यामुळे गोरी, युरोपीय वंशातल्यासारखी दिसणारी हेलन त्या ब्रिटिश सत्तेची आठवण करून देते. तिचे कपडे मात्र अस्सल भारतीय आहेत. सत्तांतरानंतर भारतीय बाबूंनी नवीन वेषात तीच धोरणं चालू ठेवली अशी टिप्पणी यात दडलेली आहे.

हेलन जर सत्ता असेल तर बाकीच्या प्रतीकांचा अर्थ काय? त्यांची सुसंगत सांगड घालता येते का? याचं उत्तर होकारार्थी आहे. हा दारूचा गुत्ता म्हणजे सत्तेचं क्षेत्र. ज्याला इंग्लिशमध्ये 'कॉरिडॉर्स ऑफ पॉवर' म्हणतात ते. अनेक लोक तिथे बसून दारू पितात. हेलनला दूरूनच पहात. तिची लालसा बाळगत. हेलन स्वतः तिथे दारू विकते. इथे दारू म्हणजे सत्तेच्या आसपास असणाऱ्यांना जे पैसा, प्रतिष्ठा, हांजीहांजी मिळते ते सर्व. पण हे फुकटात मिळत नाही. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आत्म्याचं मोल चुकवावं लागतं. फाउस्टने मेफिस्टोफिलिसला आपला आत्मा विकला तसा. एकदा तुम्ही गुत्त्यात शिरलात की याच्यापासून पळवाट नाही. पैसे न देता पळून जाणाऱ्याकडून हेलन कोयता दाखवून ते बळकावून घेते या छोट्याशा प्रसंगातून ते अधोरेखित केलेलं आहे.

हेलन कोयता वापरते म्हणजे कष्टकरी वर्गाला (जो गुत्त्याच्या बाहेरच आहे) त्याला मुठीत ठेवते. हे साम्यवादी प्रतीक दोनदा वापरलं आहे. गाण्याच्या सुरूवातीलाच ती कोयत्यावर तोलून दारूचा ग्लास आणते. नंतर तो पैसे वसूल करण्याचा प्रसंग. दोन्ही प्रसंगांतून या रूपकाचा अतिशय तरल वापर केलेला आहे. सत्तेतून मिळणारी सुखं (दारू) मिळण्यासाठी पाया म्हणून कष्टकरी वर्गाचा वापर करावा लागतो हे पहिल्या प्रसंगात सांगितलेलं आहे. तीच जनशक्तीची धार वापरून आत्मा वसूल केला जातो हे दुसऱ्या प्रसंगात.

या गाण्यात सत्तेसाठी दोन स्पर्धक आहेत. एक त्या गुत्त्यातला बाउन्सर. गुत्त्याची आणि हेलनची इमानेइतबारे रखवाली करणारा. दारूवरचा पहिला हक्क त्याचा. सर्व गुत्त्यातही त्याचा दरारा. दिसायला बरा आहे, अंगाखांद्याने बळकट आहे, पण हेलनला तो विशेष पसंत नाही. ती दुसऱ्या कोणाच्या तरी शोधात असते. अमजद खान गुत्त्यात शिरायच्या अगोदर एकंदरीत परिस्थितीबाबत ती गाणं म्हणते. ग्लासात ठेवून खऱ्या मुंगळ्याला उद्देशून. स्वप्नातल्या राजकुमाराला उद्देशून एखाद्या अल्लड तरुणीने गाणं म्हणावं तसं. आपली अस्वस्थता ती गुत्त्यात खळबळ माजवून व्यक्त करते. आहे का इथे कोणी माझ्या लायक? असा अनुच्चारित प्रश्न विचारत. मग अमजद खान शिरतो. त्याची परीक्षा घेण्यासाठी फेकलेल्या कोयत्यावर तो बेदरकारपणे सिगरेट विझवतो. आणि हेलन त्याच्या प्रेमात पडते. आणि बाउन्सरला सोडून अमजदखानला पटवायचा प्रयत्न करते.

सत्तेच्या संदर्भात या सगळ्याचा अर्थ वेगळा लावायला लागतो. सत्तेच्या महालात अनेक लोक वावरत असले तरी तिचं शयनगृह रिकामंच असतं. सत्तेतून मिळणाऱ्या सुखांवर प्रेम असलं तरी विशुद्ध सत्तेवर प्रेम करणारं कोणीच नसतं. ती ज्याच्या प्रेमात पडू शकेल असे तर विरळाच. या गाण्यातल्या केष्टोप्रमाणे सगळे तिचे लांगूलचालन करणारे, पित्त्येच असतात. किंवा तिचं दुकान राखणाऱ्या व दारू चाखणाऱ्या बाउन्सरसारखे नोकर असतात. सत्तेवर सत्ता गाजवेल अशा पुरुषवीराच्या ती शोधात असते. तो दिसला की ती त्याला आव्हान करते. या गीतातून हा संदेश दिलेला आहे.

दुसराही गहन अर्थ काढता येतो. हेलन हे परमात्म्याचं प्रतीक असून गुत्ता म्हणजे पृथ्वीतल. दारू म्हणजे ऐहिक सुखं. परमात्मा जेव्हा या गुत्त्यात येणाऱ्या आत्म्यांना निव्वळ ऐहिक सुखात दंग झालेला बघतो तेव्हा त्याला सगळ्यांना जागं करावंसं वाटतं. तो म्हणतो की तुमची खरी आत्मिक भूक आहे ती माझ्याशी मीलन करण्याची. मोक्ष हवा असेल तर ऐहिक सुखं टाळा आणि माझ्या मागे या. मोहिनीरूपात जसा विष्णू आला तसाच इथे परमात्मा हेलनरूपात येतो. यात इतर सर्व रूपकांचा मेळ नीट लागत नसला तरीही इतके भिन्न दोन अर्थ ज्या कलाकृतींतून निघतात ती उच्च दर्जाची आहे यात वादच नाही.

या विवेचनानंतर इनकार चित्रपट लक्षात न रहाता केवळ हेच गाणं का लक्षात रहातं याबाबत शंका येऊ नये. तथाकथित सामान्य प्रेक्षकाच्या उच्च अभिरुचीचंच ते द्योतक आहे. उच्चभ्रूंना यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

संपूर्ण इन्कार चित्रपटाची पोथी (तीही One Shot) वाचून दाखविणारा मी एका बाजुला आणि मुंगळा गाण्याच्या ढाई अक्षरांचा रसास्वाद (आणि तोही चवीचवीने दोन लेखांत मिळून) घेणारे तुम्ही दुसर्‍या बाजुला असं ध्रुवीकरण झाल्यासारखं वाटु लागलंय.

कबीराचा हा दोहा तुम्हाला अर्पण :-

पोथी पढ पढ जगमुवा पंडित भया न कोय|
ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हेलन नि:सीम आध्यात्मिक भक्त आहे, आणि "तू" परमात्मा आहे. गुत्ता म्हणजे उथळ संसारी भक्तांनी बुजबुजलेली देवळे, आणि त्यातील दारू म्हणजे "द्र्व्यमय भक्ती": तिरुपतीच्या हुंडीत पडणारे सोने किंवा शिरडीचे चांदीचे सिंहासन वगैरे.

देवळातले देव उथळ संसारी भक्तांच्या गराड्यात अडकलेले आहेत, दानपेटीत द्रव्य टाकणार्‍यांच्या व्ही-आय-पी लाईनच्या दर्शनात गुंगलेले आहेत. चारीही जगांचा स्वामी... खरे तर नि:सीम भक्ताकरिता देव आसुसलेला आहे. त्याने बावरलेल्या मुलगीसारखी भीड टाकून द्यावी, आणि हेलनच्या गोड खर्‍या भक्तीला जाऊन बिलगावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि ती सत्ता किंवा सत्ताप्रधान, एक स्त्री आहे, हे विशेष रुपकात्मक आहे.

रसग्रहण पटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सन्जोप राव कुठं आहेत? हे असं काही तरी त्यांनी लिहावं आता प्रतिसादात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येणार येणार म्हणून शेवटी हा भाग आलाच
गुर्जी ग्रेट आहेत
एवढे दिवस घेतले "सखोल अभ्यासासाठी" त्याच चीज झाल म्हणायच

अहाहा काय ते विवेचन
एकेक पदर अगदी नाजूकपणे ऊलगडलाय
काय ती राजहंसी नजर
किती आशयपूर्ण रसग्रहण

बाकी ह्या मालिकेचे अजूनही भाग येऊ द्यात
वेगवेगळ्या गाण्यावर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

अहाहा काय ते विवेचन
एकेक पदर अगदी नाजूकपणे ऊलगडलाय
काय ती राजहंसी नजर
किती आशयपूर्ण रसग्रहण

अगदी अगदी. एकदम दारू की दारू और पानी का पानी केले आहे.

बाकी ह्या मालिकेचे अजूनही भाग येऊ द्यात
वेगवेगळ्या गाण्यावर

सहमत
अजून याचेच अर्थसंपृक्त रुपकांतर्वस्त्रांचे अनावरण आले तरी हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे मत थोडेसे गुर्जींसारखे आहे आणि धनंजय यांच्याशी माझी ओघाने असहमती आहे.

हेलन हे प्रतीक आहे स्त्री शक्तीचे. हेलन मादक आणि आकर्षक आहे. पण म्हणून कोणी फार जवळ गेला तर ती फक्त गुळाची ढेप न रहाणार नाही, ती मुंगळ्याला जशी ग्लासात बंदीस्त करते तशीच प्रत्यक्षात पुरूषांबरोबरही स्त्री वागते. हेलन या स्वतःची शक्तीस्थानं ओळखून असणार्‍या स्त्रियांची प्रतिनिधी आहे. मागच्या भागात मी घासकडवी गुर्जी यांच्या लिखाणावर आक्षेप घेतला होता, तो मी सखेद मागे घेते.

आताच्या जमान्यात स्वतःची बदनामी मिरवणारी मुन्नी आणि स्वतःला से. म्हणवणारी आणि पुरूषांना "चल हट" म्हणणारी शीला यांना आपापल्या शक्तीची जाणीव करून देणारी हेलन अतिशय महान आहे.

१. http://www.aisiakshare.com/node/578

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.